लॉरेन्स
कोहलबर्ग (Lawrence Kohlberg):
नैतिक विकासाचा शोध घेणारा मानसशास्त्रज्ञ

(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)
मानवी
समाजाच्या इतिहासात “योग्य काय आणि अयोग्य काय?” हा प्रश्न अत्यंत मूलभूत आणि प्राचीन मानला जातो. धर्म, तत्त्वज्ञान, सामाजिक परंपरा आणि कायदेव्यवस्था या
सर्वांनी या प्रश्नाचे विविध प्रकारे उत्तर देण्याचा प्रयत्न केला आहे. प्राचीन
भारतीय तत्त्वज्ञानात धर्म, ग्रीक तत्त्वज्ञानात virtue
ethics, तर आधुनिक काळात मानवी हक्क आणि न्याय या संकल्पनांद्वारे
नैतिकतेचे स्पष्टीकरण केले गेले आहे. तथापि, नैतिकतेचा विकास
मानवी मानसशास्त्रीय प्रक्रियेशी कसा जोडलेला आहे, हा प्रश्न
वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासण्याचा प्रयत्न विसाव्या शतकात विशेषतः वैकासिक
मानसशास्त्रात झाला.
या
क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या मानसशास्त्रज्ञांमध्ये लॉरेन्स कोहलबर्ग
यांचे नाव अग्रक्रमाने घेतले जाते. कोहलबर्ग यांनी मानवी नैतिकतेचा विकास हा जैविक
किंवा धार्मिक आदेशांवर आधारित नसून मानवी बोधात्मक विकासाशी संबंधित एक श्रेणीबद्ध
अवस्थांची प्रक्रिया आहे, असे प्रतिपादन केले.
त्यांनी मांडलेली नैतिक विकासाची अवस्था ही संकल्पना (Stages of Moral
Development) आजही मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र,
समाजशास्त्र, नैतिक तत्त्वज्ञान आणि
गुन्हेगारी अभ्यास या क्षेत्रांमध्ये अत्यंत प्रभावी मानली जाते.
कोहलबर्ग
यांच्या जीवनाकडे पाहिले असता असे दिसते की त्यांच्या वैयक्तिक अनुभवांनी, सामाजिक प्रश्नांबद्दल असलेल्या संवेदनशीलतेने आणि न्यायाच्या शोधाने
त्यांच्या संशोधनाला दिशा दिली. त्यामुळे त्यांचे जीवन केवळ एका संशोधकाची कथा
नसून न्याय, नैतिकता आणि मानवी विकास यांचा शोध घेणाऱ्या
विचारवंताची प्रेरणादायी यात्रा आहे.
प्रारंभिक
जीवन
लॉरेन्स
कोहलबर्ग यांचा जन्म 25 ऑक्टोबर 1927 रोजी अमेरिकेतील Bronxville,
New York येथे झाला. त्यांचे वडील अल्फ्रेड कोहलबर्ग हे यशस्वी
उद्योगपती आणि व्यापारी होते, तर त्यांची आई चार्लोट कोहलबर्ग
सामाजिक आणि बौद्धिक क्षेत्रात सक्रिय असलेल्या व्यक्ती होत्या. कुटुंब
आर्थिकदृष्ट्या संपन्न असल्यामुळे कोहलबर्ग यांचे बालपण आरामदायी वातावरणात गेले;
परंतु त्यांच्या घरात सामाजिक आणि राजकीय प्रश्नांवर सतत चर्चा होत
असे. त्यामुळे लहान वयातच त्यांना सामाजिक न्याय, विषमता आणि
नैतिक जबाबदारी यांसारख्या प्रश्नांविषयी कुतूहल निर्माण झाले (Crain,
2014).
कोहलबर्ग
यांच्या बालपणातच त्यांच्या आई-वडिलांचा घटस्फोट झाला, ज्यामुळे त्यांना भावनिक आणि सामाजिक पातळीवर काही आव्हानांचा सामना करावा
लागला. या अनुभवामुळे मानवी संबंध, सामाजिक नियम आणि न्याय
यांविषयी त्यांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले. मानसशास्त्रज्ञांच्या मते,
व्यक्तीच्या बालपणीच्या अनुभवांचा त्याच्या नैतिक आणि सामाजिक
संवेदनशीलतेवर मोठा प्रभाव पडतो, आणि कोहलबर्ग यांच्या
बाबतीतही हेच दिसून येते (Power, Higgins & Kohlberg, 1989).
त्यांनी
आपले शालेय शिक्षण अमेरिकेतील प्रतिष्ठित Phillips
Academy येथे पूर्ण केले. ही संस्था उच्च दर्जाच्या शिक्षणासाठी
प्रसिद्ध असून अमेरिकेतील अनेक नामवंत व्यक्तींनी येथे शिक्षण घेतले आहे. येथे
शिकत असताना कोहलबर्ग अत्यंत बुद्धिमान आणि जिज्ञासू विद्यार्थी म्हणून ओळखले जात
होते. तथापि, पारंपरिक पाठांतरावर आधारित शिक्षणपद्धती
त्यांना फारशी आकर्षक वाटत नव्हती. त्याऐवजी त्यांना वास्तविक जीवनातील सामाजिक
प्रश्न, नैतिक द्वंद्व आणि मानवी वर्तनाचे विश्लेषण यांमध्ये
अधिक रस होता.
कोहलबर्ग
यांना विशेषतः एक प्रश्न सतत विचार करायला लावत असे, लोक योग्य आणि अयोग्य याचा
निर्णय कसा घेतात? काही लोक कायद्याचे
पालन करतात, तर काही वेळा लोक न्यायासाठी कायद्यालाही आव्हान
देतात. या नैतिक द्वंद्वांचा उगम नेमका कुठे आहे, हा प्रश्न
त्यांच्या मनात लवकरच निर्माण झाला. पुढे त्यांनी वैकासिक मानसशास्त्राचा अभ्यास
करताना या प्रश्नाचे वैज्ञानिक स्पष्टीकरण शोधण्याचा प्रयत्न केला.
कोहलबर्ग
यांच्या व्यक्तिमत्त्वातील आणखी एक महत्त्वाचा पैलू म्हणजे त्यांची सामाजिक जाणीव.
बालपणात त्यांनी समाजातील आर्थिक विषमता, वर्णद्वेष आणि सामाजिक अन्याय यांविषयी ऐकले आणि पाहिले. अमेरिकन समाजात
त्या काळात नागरी हक्कांच्या चळवळीची सुरुवात होत होती. या पार्श्वभूमीवर कोहलबर्ग
यांच्या मनात न्याय, समानता आणि नैतिक जबाबदारी या
मूल्यांविषयी विशेष संवेदनशीलता निर्माण झाली. पुढे त्यांच्या संशोधनातही या
मूल्यांचे प्रतिबिंब दिसून येते.
याच
काळात कोहलबर्ग यांच्या बौद्धिक विकासावर स्विस मानसशास्त्रज्ञ जीन पियाजे यांच्या
वैकासिक मानसशास्त्राच्या विचारांचा अप्रत्यक्ष प्रभाव पडला. पियाजे यांनी
मुलांच्या बोधात्मक विकासाचे टप्पे मांडले होते. पुढे कोहलबर्ग यांनी या विचारांवर
आधारित राहून नैतिक विचारांच्या विकासाचे टप्पे मांडले आणि वैकासिक मानसशास्त्राला
एक नवीन दिशा दिली (Piaget, 1932; Kohlberg, 1984).
अशा
प्रकारे कोहलबर्ग यांचे प्रारंभिक जीवन आर्थिकदृष्ट्या समृद्ध असले तरी सामाजिक
प्रश्नांविषयीची संवेदनशीलता, बौद्धिक जिज्ञासा आणि
न्यायाविषयीचा शोध या गोष्टींनी आकार घेत होते. या सर्व घटकांनी त्यांच्या पुढील
संशोधनाची पायाभरणी केली आणि त्यांना जगातील सर्वात प्रभावी वैकासिक
मानसशास्त्रज्ञांपैकी एक बनवले.
दुसऱ्या महायुद्धानंतरचा अनुभव
दुसऱ्या महायुद्धानंतरचा काळ हा
संपूर्ण जगासाठी नैतिक आणि मानवी मूल्यांच्या पुनर्मूल्यांकनाचा होता. विशेषतः होलोकॉस्ट
म्हणजे दुसऱ्या महायुद्धादरम्यान (1941-1945) ॲडॉल्फ हिटलरच्या नाझी जर्मनी आणि
त्यांच्या सहकाऱ्यांनी युरोपमधील सुमारे 60लाख ज्यूंची पद्धतशीरपणे केलेली
राज्य-प्रायोजित हत्या, या वंश संहारात ज्यू लोकसंख्येच्या अंदाजे दोन-तृतीयांश
लोकांचा बळी गेला, ज्यांना छळछावण्यांमध्ये विषारी वायू
किंवा गोळ्या घालून ठार मारण्यात आले. या भीषण
घटनेमुळे लाखो ज्यू लोक विस्थापित झाले होते आणि त्यांना सुरक्षित आश्रयाची गरज
निर्माण झाली होती. अशा संवेदनशील आणि अस्थिर परिस्थितीत Lawrence
Kohlberg यांनी अत्यंत धाडसी आणि मानवतावादी निर्णय घेतला. त्यांनी एका जहाजावर
स्वयंसेवक म्हणून काम करत युरोपमधील ज्यू निर्वासितांना गुप्तपणे पॅलेस्टाईनमध्ये
(त्या काळातील ब्रिटिश मंडेट प्रदेश) पोहोचविण्याच्या मोहिमेत सक्रिय सहभाग घेतला
(Colby et al., 1987).
ही मोहीम केवळ मानवी मदतीची नव्हती, तर ती राजकीय
आणि कायदेशीरदृष्ट्या अत्यंत धोकादायक होती. त्या काळात ब्रिटिश सरकारने
पॅलेस्टाईनमध्ये ज्यू स्थलांतरावर निर्बंध लादले होते. त्यामुळे अशा प्रकारचे
स्थलांतर हे कायद्याच्या विरोधात होते. तरीही अनेक स्वयंसेवकांनी, त्यात कोहलबर्ग
यांचाही समावेश होता, मानवी मूल्यांना प्राधान्य देत हा
धोका पत्करला (Power, Higgins & Kohlberg, 1989).
या अनुभवामुळे कोहलबर्ग यांच्या
विचारविश्वात एक मूलभूत परिवर्तन घडले. त्यांनी प्रत्यक्ष अनुभवले की कायदा आणि नैतिकता हे नेहमीच एकसारखे नसतात. काही वेळा
कायदा अन्यायकारक असू शकतो, आणि अशा वेळी नैतिक दृष्टिकोनातून
योग्य निर्णय घेण्यासाठी कायद्याचे उल्लंघन करणेही आवश्यक ठरू शकते. हा अनुभव
त्यांच्या पुढील संशोधनाचा केंद्रबिंदू बनला.
याच अनुभवातून त्यांच्या मनात एक
महत्त्वाचा प्रश्न निर्माण झाला “लोक नैतिक निर्णय कसे घेतात? आणि त्या
निर्णयामागील विचारप्रक्रिया कशी विकसित होते?” हा प्रश्न पुढे
त्यांच्या नैतिक विकासाच्या सिद्धांताचा पाया ठरला. त्यामुळे असे म्हणता येईल की, कोहलबर्ग
यांच्या नैतिक विकासाच्या सिद्धांताची बीजे या युद्धोत्तर अनुभवांमध्येच रोवली
गेली होती (Crain, 2014).
शिक्षण आणि संशोधनाची सुरुवात
या जीवनानुभवानंतर कोहलबर्ग यांनी
औपचारिक शिक्षणाकडे वळण्याचा निर्णय घेतला आणि त्यांनी University
of Chicago येथे प्रवेश घेतला. त्यांच्या बौद्धिक क्षमतेमुळे आणि स्व-अभ्यासाच्या
सवयीमुळे त्यांनी केवळ एका वर्षात आपली पदवी पूर्ण केली, जे त्यांच्या
असामान्य बुद्धिमत्तेचे द्योतक आहे (Colby et al., 1987).
यानंतर त्यांनी मानसशास्त्राच्या
क्षेत्रात संशोधन सुरू केले आणि विशेषतः वैकासिक मानसशास्त्राकडे लक्ष केंद्रित
केले. या काळात त्यांच्यावर स्विस मानसशास्त्रज्ञ जीन
पियाजे यांच्या सिद्धांतांचा खोल प्रभाव
पडला. पियाजे यांनी मुलांच्या बोधात्मक विकासाचे टप्पे मांडले
होते आणि त्यांनी दाखवून दिले होते की मुलांचे विचार करण्याची पद्धती वयानुसार बदलते
(Piaget, 1932/1965).
कोहलबर्ग यांनी पियाजे यांच्या या
संकल्पनेला पुढे नेले, परंतु त्यांनी एक वेगळा प्रश्न
विचारला “मुलांचा नैतिक विचार कसा विकसित
होतो?” त्यांनी असे गृहित धरले की, जसे
संज्ञानात्मक विकास टप्प्याटप्प्याने होतो, तसेच नैतिक
विकासही विशिष्ट टप्प्यांमध्ये होत असावा.
आपल्या पीएच.डी. च्या संशोधनात
त्यांनी मुलांना आणि किशोरवयीन व्यक्तींना विविध नैतिक दुविधा सादर केल्या आणि त्यांच्या उत्तरांचे सखोल विश्लेषण केले. त्यांनी
विशेषतः उत्तर “योग्य” आहे की “अयोग्य” यावर लक्ष न देता, त्या
उत्तरामागील तर्कशक्ती समजून घेण्यावर भर दिला.
या संशोधनातून त्यांनी नैतिक
विकासाचे सहा टप्पे मांडले, जे तीन व्यापक स्तरांमध्ये विभागले
गेले. या टप्प्यांमधून व्यक्तीची नैतिक विचारसरणी कशी साध्या दंड-आधारित
विचारांपासून सार्वत्रिक नैतिक तत्त्वांपर्यंत विकसित होते, हे त्यांनी
स्पष्ट केले (Kohlberg, 1958; Kohlberg, 1981).
यामुळे कोहलबर्ग यांनी वैकासिक
मानसशास्त्रात एक नवे दालन उघडले. त्यांनी नैतिकतेचा अभ्यास केवळ वर्तनाच्या
पातळीवर न करता, विचारप्रक्रियेच्या पातळीवर नेला. त्यांच्या या
दृष्टिकोनामुळे मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र आणि नैतिक तत्त्वज्ञान
या तिन्ही क्षेत्रांमध्ये संशोधनाची नवी दिशा निर्माण झाली (Rest,
1979).
नैतिक विकासाच्या सहा अवस्था
अमेरिकन मानसशास्त्रज्ञ कोहलबर्ग यांनी
नैतिक विकासाचा अभ्यास करताना असे प्रतिपादन केले की, नैतिकता ही
जन्मजात नसून ती बोधनिक विकासाशी निगडित एक क्रमिक प्रक्रिया आहे. त्यांनी आपल्या
संशोधनात विविध वयोगटातील मुलांना नैतिक दुविधा देऊन त्यांच्या विचारप्रक्रियेचे
विश्लेषण केले आणि त्यावरून नैतिक विकासाचे तीन प्रमुख स्तर आणि सहा टप्पे मांडले (Kohlberg, 1969; 1981).
त्यांच्या या संकल्पनेवर जीन पियाजे यांच्या बोधात्मक
विकासाच्या सिद्धांताचा प्रभाव स्पष्टपणे दिसून येतो (Piaget,
1932/1965).
अ. पूर्व-पारंपारिक स्तर (Pre-conventional
Level)
पूर्व- पारंपारिक स्तर हा
प्रामुख्याने बाल्यावस्थेत आढळतो. या स्तरावर मुलांची नैतिकता बाह्य नियंत्रणावर (external
control) आधारित असते. म्हणजेच, योग्य-अयोग्य
ठरवताना मुलं दंड, बक्षीस किंवा अधिकार असलेल्या
व्यक्तींच्या प्रतिक्रियांवर अवलंबून असतात. येथे नैतिकता ही अंतर्गत
मूल्यांपेक्षा परिणामांवर (consequences) आधारित असते.
टप्पा 1: शिक्षा-आज्ञापालन
अभिमुखता (Punishment-Obedience Orientation)
या टप्प्यात मुलं एखादे वर्तन “वाईट” आहे असे
मानतात कारण त्यासाठी शिक्षा मिळू शकतो. म्हणजेच, नैतिकता ही दंड
टाळण्यावर आधारित असते. उदाहरणार्थ, एखादे मूल चोरी
करणे चुकीचे आहे असे मानते, कारण त्याला शिक्षा होईल न की ते
नैतिकदृष्ट्या चुकीचे आहे म्हणून. येथे अधिकार व्यक्ती (पालक, शिक्षक) हेच
नैतिकतेचे अंतिम स्रोत मानले जातात (Kohlberg, 1976).
टप्पा 2:
साधनात्मक-सापेक्ष अभिमुखता (Instrumental-Relativist Orientation)
या टप्प्यात मुलं स्वतःच्या
फायद्याच्या दृष्टीने नैतिक निर्णय घेतात. “तू मला मदत कर, मी तुला मदत
करेन” अशा प्रकारचा व्यवहार येथे दिसतो. नैतिकता ही परस्पर लाभावर आधारित असते, परंतु ती
अजूनही स्वार्थप्रधान असते. उदाहरणार्थ, एखादे मूल
मित्राला मदत करते कारण भविष्यात त्याच्याकडून मदत मिळेल अशी अपेक्षा असते (Kohlberg,
1981).
ब. पारंपारिक स्तर (Conventional
Level)
या स्तरावर व्यक्ती समाजातील नियम, परंपरा आणि
अपेक्षा यांना महत्त्व देऊ लागते. नैतिकता ही सामाजिक मान्यतेशी आणि सामाजिक
सुव्यवस्थेशी जोडली जाते. हा स्तर किशोरावस्था आणि प्रौढावस्थेच्या सुरुवातीला
अधिक स्पष्ट दिसतो.
टप्पा 3: चांगला
मुलगा / चांगली मुलगी अभिमुखता (Good Boy–Nice Girl Orientation)
या टप्प्यात व्यक्ती “इतर लोक काय
म्हणतील?” यावर आधारित निर्णय घेते. सामाजिक मान्यता मिळवणे, चांगली प्रतिमा
राखणे आणि इतरांना आनंदी ठेवणे हे महत्त्वाचे ठरते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती
प्रामाणिक वर्तन करते कारण तिला “चांगला” किंवा “सुसंस्कृत” म्हणून ओळखले जावे असे
वाटते. येथे परानुभूती आणि सामाजिक संबंधांना महत्त्व दिले
जाते (Rest et al., 1999).
टप्पा 4: कायदा आणि
सुव्यवस्था अभिमुखता (Law-and-Order Orientation)
या टप्प्यात व्यक्ती समाजातील नियम, कायदे आणि
कर्तव्ये पाळण्याला सर्वोच्च प्राधान्य देते. येथे नैतिकता ही व्यवस्था
टिकवण्यासाठी आवश्यक असलेल्या नियमांवर आधारित असते. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती
चोरी चुकीची आहे असे मानते कारण ती कायद्याच्या विरोधात आहे आणि त्यामुळे सामाजिक
सुव्यवस्था बिघडते. येथे वैयक्तिक भावना किंवा नातेसंबंधांपेक्षा सामाजिक व्यवस्था
अधिक महत्त्वाची असते (Kohlberg, 1984).
क. पारंपारिक पश्चात स्तर (Post-conventional
Level)
हा स्तर उच्च नैतिक विचारसरणी
दर्शवतो आणि सर्व व्यक्ती या स्तरापर्यंत पोहोचत नाहीत. येथे नैतिकता ही
सार्वत्रिक तत्त्वांवर आधारित असते आणि व्यक्ती स्वतंत्रपणे
विचार करून निर्णय घेते. सामाजिक नियमांपेक्षा न्याय, समानता आणि
मानवी हक्क यांना अधिक महत्त्व दिले जाते.
टप्पा 5: सामाजिक
करार अभिमुखता (Social Contract Orientation)
या टप्प्यात व्यक्ती असे मानते की
समाजातील नियम हे मानवी करारावर आधारित असतात आणि ते बदलू शकतात. कायदे हे
लोकांच्या हितासाठी असतात; जर ते अन्यायकारक ठरले, तर त्यात बदल
करणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, एखादी व्यक्ती अन्यायकारक कायद्याचा
विरोध करते कारण तो मानवी हक्कांचे उल्लंघन करतो. येथे लोकशाही, स्वातंत्र्य
आणि समानतेसारख्या मूल्यांना महत्त्व दिले जाते (Kohlberg, 1981).
टप्पा 6: सार्वत्रिक
नैतिक तत्त्वांची अभिमुखता (Universal Ethical Principles
Orientation)
हा नैतिक विकासाचा सर्वोच्च टप्पा
मानला जातो. येथे व्यक्ती सार्वत्रिक नैतिक तत्त्वांवर—जसे की न्याय, मानवी
प्रतिष्ठा आणि समानता—आधारित निर्णय घेते, जरी त्यासाठी
कायद्याचे उल्लंघन करावे लागले तरी. या स्तरावर व्यक्ती स्वतःच्या अंतःकरणाशी प्रामाणिक राहते. उदाहरणार्थ, महात्मा गांधी
किंवा मार्टीन ल्युथर किंग Jr. यांसारख्या
व्यक्तींनी अन्यायकारक कायद्यांविरुद्ध अहिंसात्मक संघर्ष केला, जो या
टप्प्याचे उदाहरण मानले जाते (Colby & Kohlberg, 1987).
कोहलबर्ग यांच्या मते, नैतिक विकास हा
एक क्रमिक आणि अपरिवर्तनीय प्रक्रियेतून होतो, म्हणजेच व्यक्ती एक टप्पा वगळून
पुढे जाऊ शकत नाही. तथापि, सर्व व्यक्ती टप्पा
5 किंवा 6
पर्यंत पोहोचतातच असे नाही. बहुतेक लोक टप्पा 3 किंवा 4
पर्यंतच मर्यादित राहतात (Kohlberg, 1984).
या सिद्धांताचे वैशिष्ट्य म्हणजे तो
केवळ “योग्य काय?” यावर लक्ष केंद्रित करत नाही, तर “आपण योग्य
निर्णय कसा घेतो?” या विचारप्रक्रियेवर भर देतो.
त्यामुळे नैतिक शिक्षण, सामाजिक न्याय, आणि
व्यक्तिमत्त्व विकास यांसाठी हा सिद्धांत अत्यंत महत्त्वपूर्ण मानला जातो.
“हाइन्झ दुविधा” (Heinz
Dilemma)
कोहलबर्ग यांनी नैतिक विकासाचा
अभ्यास करण्यासाठी वापरलेले सर्वात प्रसिद्ध साधन म्हणजे Heinz
Dilemma होय. ही एक काल्पनिक नैतिक परिस्थिती आहे, ज्यामध्ये
योग्य-अयोग्य याचे स्पष्ट उत्तर नसते; उलट व्यक्ती
कोणत्या नैतिक तर्कावर निर्णय घेते हे महत्त्वाचे ठरते. या कथेनुसार,
Heinz नावाच्या
व्यक्तीची पत्नी गंभीर आजाराने ग्रस्त असते आणि तिचा जीव वाचवण्यासाठी आवश्यक औषध
अत्यंत महाग असते. Heinz कडे पुरेसे पैसे नसल्यामुळे तो औषध
विक्रेत्याला विनंती करतो; परंतु तो नकार देतो. अशा परिस्थितीत Heinz
ने औषध चोरावे
का?
या प्रश्नाचे उत्तर "हो"
किंवा "नाही" हे गौण असते; मुख्यतः
व्यक्ती त्या निर्णयासाठी कोणते नैतिक तर्क वापरते हे महत्त्वाचे असते. उदाहरणार्थ, एखादे मूल
म्हणू शकते की “चोरी करू नये कारण शिक्षा होईल” हे पूर्व-पारंपारिक स्तराचे तर्क आहे. दुसरीकडे, एखादी व्यक्ती म्हणू शकते की
“पत्नीचे जीवन अधिक मौल्यवान आहे” हे उत्तर-पारंपारिक स्तराचे सूचक आहे.
कोहलबर्ग यांनी या प्रकारच्या
दुविधांचा वापर करून दाखवून दिले की नैतिक विकास हा केवळ नियमांचे पालन करण्यावर
आधारित नसून तो तर्कशक्ती, मूल्ये आणि सामाजिक जाणीव यावर
आधारित असतो (Kohlberg, 1969; Crain, 2014). Heinz Dilemma हे मानसशास्त्रीय संशोधनात नैतिक
विचारांची गुणवत्ता मोजण्यासाठी आजही महत्त्वाचे साधन मानले जाते.
हार्वर्डमधील कार्य
कोहलबर्ग यांनी नंतर Harvard
University येथे प्राध्यापक म्हणून कार्य केले आणि येथे त्यांनी नैतिक
शिक्षणाच्या क्षेत्रात अत्यंत महत्त्वाचे प्रयोग केले. त्यापैकी सर्वात उल्लेखनीय
प्रयोग म्हणजे “Just Community Schools” ही संकल्पना
होय.
या शैक्षणिक मॉडेलमध्ये
विद्यार्थ्यांना शाळेच्या नियमांच्या निर्मितीत आणि अंमलबजावणीत सक्रिय सहभाग दिला
जात असे. पारंपरिक शिक्षणपद्धतीत नियम वरून लादले जातात; परंतु Just
Community मॉडेलमध्ये नियम सामूहिक चर्चेतून आणि लोकशाही प्रक्रियेतून तयार केले
जातात. यामुळे विद्यार्थ्यांना केवळ नियमांचे पालन करणे शिकवले जात नाही, तर त्या
नियमांच्या नैतिक आधाराची जाणीवही निर्माण होते.
या प्रयोगाचा उद्देश
विद्यार्थ्यांमध्ये न्यायभावना, सामाजिक जबाबदारी आणि नैतिक
स्वायत्तता विकसित करणे हा होता. संशोधनातून असे
दिसून आले की अशा शाळांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये नैतिक विचारांची पातळी
अधिक प्रगत होते (Power, Higgins & Kohlberg, 1989). या
प्रयोगामुळे कोहलबर्ग यांनी शिक्षण हे केवळ ज्ञान देण्याचे साधन नसून नैतिक
विकासाचे माध्यम आहे हे अधोरेखित केले.
वैयक्तिक संघर्ष
कोहलबर्ग यांच्या जीवनात केवळ
बौद्धिक यश नव्हते, तर अनेक वैयक्तिक संघर्षही होते.
त्यांच्या संशोधनाचा विस्तार, सामाजिक बांधिलकी आणि शैक्षणिक
जबाबदाऱ्या यामुळे त्यांच्यावर सतत मानसिक ताण होता.
1971 मध्ये त्यांना एक गंभीर शारीरिक
आजार झाला (उदा. परजीवी संसर्गाशी संबंधित गुंतागुंत), ज्यामुळे
त्यांना दीर्घकाळ तीव्र वेदना सहन कराव्या लागल्या. या आजाराचा त्यांच्या मानसिक
आरोग्यावरही परिणाम झाला. तरीही, या कठीण परिस्थितीतही त्यांनी संशोधन
आणि लेखन सुरू ठेवले, जे त्यांच्या दृढनिश्चयाचे उदाहरण
आहे.
दुर्दैवाने, 19 जानेवारी 1987
रोजी त्यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूच्या परिस्थितीवरही अनेक चर्चा झाल्या
आहेत; परंतु त्यांच्या वैयक्तिक संघर्षांनी एक गोष्ट स्पष्ट केली की महान
विचारवंतही मानवी मर्यादांपासून मुक्त नसतात. त्यांच्या जीवनातून संशोधकांना हे
शिकायला मिळते की ज्ञाननिर्मितीचा प्रवास हा अनेकदा वैयक्तिक वेदना आणि संघर्षांनी
भरलेला असतो (Colby et al., 1987).
कोहलबर्ग यांच्या विचारांचे महत्त्व
कोहलबर्ग यांच्या नैतिक विकासाच्या
सिद्धांताने मानसशास्त्र आणि शिक्षणशास्त्रात क्रांतिकारी बदल घडवून आणला. त्यांनी
स्पष्टपणे दाखवून दिले की नैतिकता ही जन्मजात नसून ती सामाजिक आणि बोधात्मक
विकासाच्या प्रक्रियेतून निर्माण होते.
त्यांच्या मते, व्यक्तीचा
नैतिक विकास हा तिच्या सामाजिक अनुभवांवर, संवादांवर आणि
समस्यांच्या निराकरणातील सहभागावर अवलंबून असतो. म्हणजेच, नैतिकता ही
केवळ शिकवता येत नाही; ती अनुभवातून आणि विचारप्रक्रियेतून
विकसित होते.
शिक्षणाच्या संदर्भात, कोहलबर्ग यांनी
मांडले की शाळा आणि शिक्षणसंस्था या नैतिक विकासाला चालना देऊ शकतात, जर त्या
विद्यार्थ्यांना विचार करण्याची, चर्चा करण्याची आणि नैतिक निर्णय
घेण्याची संधी देतात. आज त्यांच्या सिद्धांताचा वापर विविध क्षेत्रांमध्ये केला
जातो:
- नैतिक शिक्षण: विद्यार्थ्यांच्या नैतिक विचारांचा विकास करण्यासाठी
- गुन्हेगारी मानसशास्त्र: गुन्हेगारांच्या नैतिक तर्कशक्तीचे विश्लेषण करण्यासाठी
- बालविकास संशोधन: मुलांच्या नैतिक विकासाचा अभ्यास करण्यासाठी
- सामाजिक न्याय चळवळी: मानवी हक्क आणि नैतिक तत्त्वांवर आधारित धोरणे तयार करण्यासाठी
यामुळे कोहलबर्ग यांचे कार्य केवळ
सैद्धांतिक मर्यादेत न राहता व्यावहारिक आणि सामाजिक परिवर्तनासाठी उपयोगी ठरले
आहे (Rest, 1979; Nucci, 2001).
समारोप:
लॉरेन्स कोहलबर्ग यांचे जीवन
आपल्याला एक महत्त्वाचा संदेश देते की, खरा संशोधक तोच, जो समाजातील
नैतिक प्रश्नांना वैज्ञानिक दृष्टिकोनातून समजून घेण्याचा प्रयत्न करतो. त्यांनी
आपल्या जीवनातून दाखवून दिले की मानवी नैतिकतेचा विकास समजून घेणे म्हणजे समाज
अधिक न्याय्य आणि मानवी बनविण्याचा प्रयत्न आहे. लॉरेन्स कोहलबर्ग हे केवळ
मानसशास्त्रज्ञ नव्हते; ते नैतिकतेचे शोधक होते. त्यांच्या
सिद्धांतामुळे आपल्याला समजते की मनुष्य केवळ नियम पाळणारा प्राणी नाही, तर तो विचार
करणारा, न्याय शोधणारा आणि नैतिक मूल्ये विकसित करणारा सामाजिक प्राणी आहे.
संदर्भ:
Colby,
A., & Lawrence Kohlberg. (1987). The measurement of moral judgment.
Cambridge University Press.
Crain,
W. (2014). Theories of development: Concepts and applications (6th ed.).
Pearson Education.
Lawrence
Kohlberg. (1958). The development of modes of thinking and choices in years 10
to 16 (Doctoral dissertation, University of Chicago).
Lawrence
Kohlberg. (1969). Stage and sequence: The cognitive-developmental approach to
socialization. In D. A. Goslin (Ed.), Handbook of socialization theory and
research (pp. 347–480). Rand McNally.
Lawrence
Kohlberg. (1981). Essays on moral development, Vol. 1: The philosophy of moral
development. Harper & Row.
Lawrence
Kohlberg. (1984). Essays on moral development, Vol. 2: The psychology of moral
development. Harper & Row.
Nucci,
L. (2001). Education in the moral domain. Cambridge University Press.
Jean
Piaget. (1965). The moral judgment of the child. Free Press. (Original work
published 1932)
Power,
F. C., Higgins, A., & Lawrence Kohlberg. (1989). Lawrence Kohlberg’s
approach to moral education. Columbia University Press.
Rest,
J. (1979). Development in judging moral issues. University of Minnesota Press.
Rest,
J. R., Narvaez, D., Bebeau, M. J., & Thoma, S. J. (1999). Postconventional
moral thinking. Lawrence Erlbaum Associates.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thank you for your comments and suggestions