शुक्रवार, २७ नोव्हेंबर, २०२०

यशाची गुरुकिल्ली | Success Factor

 

यशाची गुरुकिल्ली

एके काळी ज्ञान प्रकाश नावाचा एक ज्ञानी माणूस आसरा नावाच्या खेडे गावात राहत होता. तो श्रीमंत आणि ज्ञानाने परिपूर्ण होता, त्याचे हे ज्ञान पाहून दूरदूरच्या ठिकाणाहून लोक त्यांच्या समस्या सोडवण्यासाठी त्याच्याकडे येत असत. ज्ञान प्रकाश आपल्या अनुभव आणि ज्ञानाने लोकांच्या समस्या सोडवत असत. म्हणून प्रत्येकजण त्यांना गुरुजी संबोधत असत. एके दिवसी एक तरुण गुरुजींकडे आला आणि म्हणाला - "गुरुजी, मला यशाचे रहस्य सांगा, मलासुद्धा तुमच्यासारखे विद्वान बनून माझ्या गरीबीवर मात करता यावी अशी माझी इच्छा आहे."

गुरुजी हसले आणि त्यांनी त्यांस दुसऱ्या दिवशी सकाळी नदीच्या काठावर भेटण्यास बोलावले. त्या युवकाने आंघोळ करावी लागेल म्हणून आपले कपडे घेतले आणि सकाळी नदीकाठी पोहोचला. गुरुजींनी त्या तरूणास नदीच्या खोल पाण्यात नेले आणि गळ्यापर्यंत पाणी पाहून तिथे त्यांनी त्यास बुडविले. थोड्या वेळाने त्या तरूणाने धडपड करून जोरदार प्रतिकार केला तेंव्हा गुरूजीनी त्यास सोडून दिले. तरूण धापा टाकत नदीकाठी पळाला. जेव्हा त्यास आराम वाटू लागले, तेव्हा तो म्हणाला - "मला मारायचे ठरविले आहे का?"

गुरुजी म्हणाले - "नाही बाळा, मी तुला यशाचे रहस्य सांगत होतो. मला सांग जेंव्हा मी तुझ्या मानेला धरून पाण्यात बुडविले तेव्हा तुला कशाची तीव्र इच्छा झाली होती? ”

तो तरुण म्हणाला - "श्वास घेण्याची"

गुरुजी म्हणाले - "हेच यशाचे रहस्य आहे, जेव्हा आपल्याकडे यशाची दुर्दम्य इच्छा असेल तेंव्हाच आपण यश मिळवू शकतो, त्याखेरीज दुसरे कोणतेही रहस्य नाही."

विद्यार्थी मित्रांनो, जर आपणास आयुष्यात काहीही मिळवायचे असेल तर तीव्र इच्छाशक्ती असणे गरजेचे आहे. याचा अर्थ असा की आपणास जे मिळवायचे आहे त्यासंबंधी आपल्या डोक्यात सदासर्वदा (जळी, स्थळी, काठी, पाषाणी) त्याचाच विचार असला पाहिजे. जर तसे नसेल तर आपणास कदाचित उशीरा यश मिळेल किंवा कदाचित मिळणारही नाही. एक हिन्दी चित्रपटातील हा संवाद यश प्राप्तीसाठी लागू पडतो.  “कहते है अगर किसी चीज को दिल से चाहो तो पुरी कायनात उसे तुमसे मिलाने की कोशिश में लग जाती है.”  तसेच त्याच चित्रपटातील आणखीन एक संवाद “इतनी शिद्दत से मैंने तुम्हे पाने की कोशिश कि है कि हर जर्रे ने मुझे तुमसे मिलाने की साजिश की है.”

प्रत्यक्ष जीवनात असे कधी घडले आहे का की, आपण इच्छा व्यक्त केली आणि आपणास ते मिळाले, की आपण आपल्या जीवनात कोणतीच गोष्ट मनापासून इच्छिली नाही. अस कस असू शकेल की एखादी व्यक्ती कोणतीच गोष्ट मनापासून इच्छित नाही. 

गरीब माणसाला मनापासून श्रीमंत व्हायचे असते. गरीब असलेलला माणूस एकवेळ श्रीमंत होण्याची इच्छा नसेल बाळगत, परंतु आपल्याला निश्चितपणे गरीबीतून मुक्त व्हायचे आहे याची इच्छा असतेच. गरीबीतच राहायचे आहे अशी व्यक्ती आपणास आढळणार नाही. दररोज अन्न मिळविण्यासाठी कोणताही संघर्ष करावा लागू नये अशी प्रत्येकाची इच्छा असते. आपली मुले कधीही उपाशी नसावीत, मुलांचे शिक्षण चांगल्या शाळांमध्ये व्हावे, जो माणूस दिवसभर खुप काबाडकष्ट करत असेल, तर त्यास दुसरे कमी कष्टाचे काम मिळवायचे नसते का. यापेक्षा अधिक कोणी मनापासून काय मागेल?

गरीबी व्यतिरिक्त चर्चा करायची असेल तर एखादा विद्यार्थी आयआयटीमध्ये प्रवेश घेऊ इच्छितो, एखादा आय.ए.एस. होऊ इच्छित असेल तर त्यासाठी सलग 2-3 वर्षे कसून अभ्यास करवा लागतो. हजारो लाखो लोक आपले घर सोडून मुंबईत चित्रपटांमधील भूमिकांसाठी संघर्ष करतात. जर त्यांना मनापासून करायचे नसेल तर ते असे संघर्षपूर्ण आयुष्य जगतील का? काही स्त्रिया आपल्या पतींवर नाराज असतात तर काही पुरुष आपल्या पत्नीवर नाराज असतात. त्यांना सुखी वैवाहिक जीवन नको आहे का? जर ही इच्छा नसेल तर मनापासून असलेली वेगळी इच्छा कोणती आहे? सर्वाना जे हवे ते सर्व मिळते का? नाही ना? जे उघड आहे ते नाकारु कसे शकतो? म्हणजेच, जे प्रत्यक्षात नाही, ते कसे स्वीकारावे? याचा फायदा किंवा तोटा पाहण्यागोदार आपण याचे तंत्र मंत्र समजावून घेऊ या.

1. 'अलकेमिस्ट' - पाउलो कोहेलो यानी दुर्दम्य इच्छाशक्ती ही कल्पना आपल्या 'अलकेमिस्ट' पुस्तकात मांडलेली आहे. अशा गोष्टी आता वाचण्यास कोणाला आवडत नाही? एका मेंढपाळाने खजिना शोधण्याचे स्वप्न पाहिले. अंतःकरणातून इच्छा, विश्वाचे रहस्य, उर्जा, निसर्गाचे संकेत, नशीब इ. हे स्पष्ट आहे की त्यांचे पुस्तक आंतरराष्ट्रीय बेस्टसेलर आहे. 2014 पर्यंत याच्या 65 दशलक्ष प्रती विकल्या गेल्या होत्या. त्याचे 80 भाषांमध्ये अनुवादही झालेले आहे. जिवंत असलेल्या सर्व लेखकांपैकी त्यांच्या पुस्तकांचे सर्वात जास्त भाषांतरित झालेले लेखक म्हणून पाउलो यांच्याकडे गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड आहे.

2. लॉ ऑफ अट्रॅक्शन - आपल्या आयुष्यात जे काही घडत आहे ते आपणच आपल्या जीवनात इच्छित आहोत. आपण हे सर्व आपले विचार आणि स्मृतीतील प्रतिमाद्वारे आकर्षित करत आहोत. आकर्षणाचा नियम सांगतो की आपण ज्या प्रकारचे विचार आपल्या मनात करतो ते आपल्या जीवनात असेच विचार आकर्षित करतात. जर आपण सकारात्मक विचार केला तर आपण आपल्या जीवनात सकारात्मक विचार आणि सकारात्मक परिस्थिती असलेल्या लोकांना आकर्षित करतो. आपण नेहमी मनात नकारात्मक विचार ठेवल्यास आपण आपल्याकडे नकारात्मक विचार असलेल्या लोकांना आकर्षित करतो.

सृष्टीचे नियम आपल्या सर्वांसाठी समान आहेत. आपण भारत, ऑस्ट्रेलिया, अमेरिका किंवा जगाच्या कोणत्याही प्रदेशात रहात असू, सृष्टीचे नियम आपल्या सर्वांसाठी एक आहेत. आपण सर्व समान नियम आणि समान सामर्थ्याने कार्य करत असतो आणि हा नियम आकर्षणाचा नियम आहे ज्यास इंग्रजीमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन असेही म्हणतात. आकर्षणचा नियम हे एक रहस्य आहे जे रोंडा बर्न यांनी संपूर्ण जगभर त्याचा प्रसार केलेला आहे.

फळांची अपेक्षा न बाळगता आपल्या कृतींवर लक्ष केंद्रित करणे

पहिली गोष्ट अशी आहे की मनापासून आपल्याला किती हवे असले तरीही आपल्याला कठोर परिश्रम करावे लागतीलच. आता यावर, पाउलो असे म्हणू शकते की ज्यांना मनापासून इच्छा आहे ते कठोर परिश्रम करतील परंतु हे पुरेसे नाही. अनेक वेळा लोकांना मनापासून इच्छा असते पण ते आपला आळस सोडत नाहीत. आळशीपणा सोडण्यास इच्छुक असलेल्यांना यशाचे अनेक मार्ग सापडतात. ज्यांना मार्ग माहित आहे आणि कठोर परिश्रम करतात त्यांच्यातदेखील प्रत्येकाला सर्व काही मिळतेच असे नाही. याची काही कारण आहेत.

1. बऱ्याच ठिकाणी असणारी मर्यादित जागा - भारताच्या क्रिकेट संघात 11 खेळाडू असतात,  राखीव खेळाडू धरून 12 जन असतात, आणखीन 4-5 जन अतिरिक्त गृहीत धरू या. प्रत्येक रणजी खेळाडू ज्याची राष्ट्रीय संघात निवड थोडक्यात हुकली आहे, त्याने मेहनत केलेली नसते का? तसेच त्यास मनापासून राष्ट्रीय संघात खेळायचे नव्हते का?

त्याचप्रमाणे आय.ए.एस. किंवा आयआयटी तील मोजक्या जागेबाबत पाहूया, समजा 3000 जागा आहेत आणि अशा 50 लोकांची रँक जी 3001 आणि 3050 च्या आसपास आहे, त्यांनी कठोर परिश्रम घेतले नव्हते का? ऑलिम्पिक शर्यतीत एका मिलि सेकंदाच्या फरकाने सुवर्ण पदक जिंकू शकला नाही, तो कठोर परिश्रम केल्याशिवाय तिथेपर्यंत पोहोचला का?

ही समाजाची संकुचित वृत्ती आहे. जो जिंकला केवळ त्यालाच डोक्यावर घेतात. त्याचीच मुलाखत, तोच आदर्श, पैसा, नोकरी, त्याच्याबरोबर सेल्फी तसेच त्याचे नातेवाईक आणि शेजारी हे त्याचवर खुश असतात. त्यानेच केवळ परिश्रम घेतले. त्यालाच फक्त मनापासून ते हवे होते. जो थोडक्यात हुकला प्रत्येकजण त्याला ज्ञान देत बसतात. तुझ काहीतरी चुकत, असं करायला हव, तसं करायला हव, तु केला असतास तर योग्य झाले असते. यामुळेच कोणत्याही स्पर्धेत लोकांना खूप ताण असतो.

2. प्रत्येक गोष्ट स्पष्ट नाही – कोणतीही स्पर्धा असो त्याचे काही नियम व अटी असतात. तसेच स्पर्धेचे म्हणून काही मर्यादा असतात तर आपण एक उमेदवार म्हणून आपल्याही काही मर्यादा असतात याची जाणीव प्रत्येकास असायला हवी. प्रत्यक्ष ती परिस्थिती हाताळत असताना अनेक मानसिक, सामाजिक, नैतिक, आर्थिक आणि शारीरिक अडथळे निर्माण होतात ज्यामुळे काही लोक स्पर्धेमधून बाहेर होतात. यश मिळविताना आपली त्यावेळची शारीरिक आणि मानसिक बळकटी आपणास मदत करते. त्यामुळे थोडक्यात नंबर हुकलेल्या उमेदवारास उपदेश देताना नदीच्या काठावर उभे राहून नसलेले ज्ञान पाजाळू नये कारण त्यामुळे तो उमेदवार नैराशेच्या गर्तेत जाण्याची शकता असते.

3. नशीब म्हणजे काय? - जर आपणास यशाचा सुरक्षित आराखडा सापडला नाही तर आपण तणावग्रस्त होतो. जगात हे असेच चालू आहे हे आपण स्वीकारण्यात अक्षम आहोत. या जगात विशिष्ट ठिकाणी पोहचण्यासाठी एकच एकच मार्ग नसून अनेक मार्ग व योजना असतात. पण आपण आपले अपयश लपविण्यासाठी आणि स्वत:ला सुरक्षित वाटण्यासाठी आम्ही एक शब्द शोधला आहे तो म्हणजे नशीब. आपण योगायोगाने घडणाऱ्या घटनना निसर्गाचा संकेत मानू लागतो. कठोर परिश्रम करूनसुद्धा जर काही विचित्र होत असेल आणि आपलणास काहीही मिळत नसेल तर आपण स्वतःला सांत्वन देण्यासाठी नशिबात नाही असे मानतो. पण नशीबही सार्थ प्रयत्न करणाऱ्याच्या बरोबर असते हे विसरतो. प्रत्यक्षात जग हे खूपच सुसूत्रबद्ध आहे, एखादी गोष्ट योग्य ठिकाणी, योग्य वेळी आणि योग्य लोकांबरोबर घडते. आपण योग्य वेळी, योग्य ठिकाणी योग्य लोकांबरोबर राहिल्यास आपणास यश नक्की मिळू शकते.

     सर्व परिस्थिती इतकी निराशाजनक आहे का?  नक्कीच नाही, कारण आपण केवळ मनापासून एखादी इच्छा बाळगून उपयोग होत नाही तर त्यासाठी योग्य वर्तन, कृती अपेक्षित असते, ते करतो का?

आपली भूमिका काय असायला हवी:

यश हे आपण बाजारातून विकत घेऊ शकत नाही किंवा बाजारात विकली जाणारी वस्तू नाही. ते केवळ आपले प्रयत्न, आपला संयम आणि आपल्या निर्णयावर अवलंबून आहे. असे बरेच लोक आपण पाहिले असतील ज्यांना थोडेसे यश मिळविण्यासाठी अनेक वर्षांचा कालावधी लागतो. त्याचप्रकारे, यशस्वी होण्यासाठी वेळ लागतो, परंतु आपण अशा काही वेगळ्या गोष्टी करून ती वेळ निश्चितपणे कमी करू शकतो. कारण प्रत्येकवेळी यश प्राप्त करताना खड्यात पडलेच पाहिजे असे काही नाही, तर आपण इतरांच्या अनुभवातून अनावश्यक गोष्टी टाळल्या पाहिजेत. निश्चित यश प्राप्तीसाठी मदतगार ठरतील अशा काही ट्रिक्स.

1. एकला चलो रे! : जर आपणास आयुष्यात यशस्वी व्हावयाचे असेल तर मग यशाची लढाई एकटयानेच लढली पाहिजे. जर आपणास यश हवे असेल तर आपण आयुष्यात नेहमीच एकट्याने पुढाकार घ्यायला हवा. आपणास आपले विचार, आपले नियोजन आणि त्याची अंमलबजावणी स्वत: करावी लागेल. एकट्याने चालण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे आपणास अनेक बरे वाईट अनुभव मिळत जातात. एकत्र राहून आपण कधीही ते अनुभव घेवू शकत नाही. जर एखादी समस्या आली तर त्याचे व्यवस्थापन कसे करावे, या समस्येचे निराकरण कसे होईल. या समस्या आपल्याला बरेच काही शिकवतील. त्यामुळे जीवनात एकट्याने अनेक समस्यांचे उकल होत असते. जो दुसऱ्यावर विसंबला त्याचा कार्यभार बुडाला आणि सर्वात महत्त्वाचे दुसऱ्याच्या सावलीत आपण स्वतःची सावली कधीच बनवू शकत नाही; त्यासाठी एकट्याला उन्हात उभे राहावे लागते.

2. ध्येयप्राप्तीसाठी नियोजन हवे:  जेव्हा ध्येय हा शब्द येतो तेव्हा नियोजन तिथे सर्वात प्रथम येते. नियोजन केल्याशिवाय कोणतेही लक्ष्य साध्य होऊ शकत नाही. आपल्या उद्दिष्टांचे कोणतेही नियोजन नसल्यास भविष्यात आपण आपल्या ध्येयापासून विचलित होवू आणि आपले मुख्य लक्ष्य पूर्ण होणार नाही. म्हणूनच, यशासाठी आपण आपल्या ध्येयांची संपूर्ण योजना तयार करणे आणि नंतर आपले लक्ष्य साध्य करण्यासाठी मनापासून एकत्रित होणे खूप महत्वाचे आहे. जर आपले ध्येय मोठे असेल तर आपण त्यास बर्‍याच लहान भागांमध्ये विभागू शकतो. अशाप्रकारे आपणास वेळापत्रक बनविण्याचा फायदा होईल जेणेकरून आपण आपला वेळ आणि शक्ती योग्य प्रकारे वापरण्यास सक्षम असू.

3. यशाचा मार्ग खडतर: जेव्हा एखादी व्यक्ती स्वत:च्या प्रयत्नानी यशाच्या पायर्‍या चढते तेव्हा बरेच लोक त्यास खाली खेचण्याचा प्रयत्न करतात. कोणतेही मोठी कार्य किंवा ध्येय सुरू करताना बर्‍याच नकारात्मक गोष्टी ऐकायला मिळतात. तसेच आपणास सुरूवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागू शकतो. अनेक लोक आपल्या ध्येयांपासून आपले लक्ष विचलित करू शकतात, आपली दिशाभूल करण्याचा प्रयत्न करू शकतात. तसेच अनेक लोक आपणास नकारात्मक प्रतिक्रिया देतील आणि टीकाही करतील परंतु आपणास अशा अनावश्यक गोष्टीकडे दुर्लक्ष करावे लागेल. आपणास आपल्या ध्येयावर लक्ष केंद्रित करावे लागेल. कारण यश मिळविण्याचा तयार महामार्ग अस्तित्त्वात नाही.

4. आपला संयम कायम हवा:

आपले ध्येय गाठायचे असेल तर आपणास संयम राखता आला पाहिजे. या जगातल्या सर्व महान पुरुषांमध्ये ही गोष्ट सामान्य होती आणि धैर्य त्यांचा स्वभाव होता. आपण आपले ध्येय साध्य करण्यासाठी खूप मेहनत घेतली असेल, पण आपणास हवे असलेले यश न मिळाल्यास आपण नाराज होतो. ज्यावेळी धैर्य आपली परीक्षा घेते त्यावेळी संयम आपल्या कमी येते. आपण ती परिस्थिती कशी हाताळतो यावर आपले यश अवलंबून असते म्हणून योग्य वेळी संयम बाळगल्यास आपण आतापर्यंत केलेली मेहनत फळाला येते. जर आपण कठीण परिस्थितीत संयम राखला असेल तर मग आपणास जिंकण्यापासून कोणीही रोखू शकत नाही. संयम म्हणजे दुबळेपणा नसून स्वत:विरुद्ध पुकारलेले बंड असते, इच्छा, आकांक्षा आणि सहज प्रवृत्ती उफाळून वर येत असताना मनाला घातलेला आवर होय.

5. प्रयत्नातील सातत्य:  

यशस्वी होण्यासाठी शेवटची आणि अत्यंत महत्त्वाची टिप म्हणजे सतत प्रयत्न करत राहणे. अनेक लोक यशस्वी होत नाहीत कारण त्यांना सतत प्रयत्न करण्याची भीती असते. जेव्हा ते होत नाही तेव्हा त्यांना त्यांच्या पहिल्या प्रयत्नात यश हवे असते. पहिल्याच प्रयत्नात महान लोकांदेखील यश प्राप्त झालेले नाही. त्यांनाही यश मिळवण्यासाठी अनेक वेळा प्रयत्न करावे लागले.

अब्राहम लिंकन यांना अमेरिकेचे अध्यक्ष होण्यापूर्वी बर्‍याच वेळा पराभवाला सामोरे जावे लागले. पण त्यांनी कधीही हार मानली नाही. त्यांनी आपले प्रयत्न सुरू ठेवले आणि स्वतःला अमेरिकेचे अध्यक्ष म्हणून सिद्ध केले. जर त्यांनी पहिली किंवा दुसरी निवडणूक हरल्यानंतर आपला पराभव स्वीकारला असता. तर आज अमेरिकेच्या इतिहासात त्यांना स्थान नसते. 

जर आपणास मोठे यश हवे असेल तर आपण सतत प्रयत्न करत राहणे गरजेचे असते. सतत प्रयत्न करून, आपणास आपले ध्येय आणि उद्दीष्टांच्या छोट्या छोट्या गोष्टी कळतात. त्यामुळे जीवनात कोणत्याही क्षेत्रात यश संपादन करावयाचे असेल तर प्रयत्नातील सातत्य, चिकाटी आणि स्मार्ट वर्क या गोष्टी कामी येतात. ‘So, Best Wishes

(सदर लेखातील चित्र, इमेज Google वरून साभार)

अधिक वाचनासाठी पुस्तके:

लीच आणि ओक (2017). यशाचे सूत्र दुसरी आवृत्ती, पुणे: जायको बुक्स  

खान आणि लिमये (2009). यशाची गुरुकिल्ली, मुंबई: तन्वीर पब्लिकेशन    

पाउलो कोहेलो आणि कोत्तापल्ले (2014). द अल्केमिस्ट, पुणे: पद्मगंध प्रकाशन

बर्न, रोंडा (2010). सिक्रेट रहस्य, पुणे: मंजुळ पब्लिशिंग हाऊस   

1 टिप्पणी:

Thank you for your comments and suggestions

किट्टी जेनोविस | Kitty Genovese: Case of bystander effect

  किट्टी जेनोविस | Kitty Genovese: Case of bystander effect किट्टी जेनोविस , ही एक 28 वर्षीय महिला , जी 1964 मध्ये न्यू यॉर्क शहरात जिचा ख...