मंगळवार, ८ जून, २०२१

इंटरनेट आणि डिजिटल साक्षरता | Internet and Digital Literacy

 इंटरनेट आणि डिजिटल साक्षरता

अब्राहम मास्लो या मानवतावादी मानसशास्त्रज्ञाने गरजांची अधिश्रेणी सांगितलेली आहे. या गराजांच्या अधिश्रेणीमध्ये अन्न, वस्त्र, आराम या मानवाच्या मूलभूत आणि अत्यावश्यक गरजा आहेत असा सिद्धांत मांडलेला आहे. या मूलभूत गरजा पूर्ण करण्यामध्येच अनेक लोकांचे आयुष्य खर्ची पडते. पण आजकाल आजूबाजूला दिवसेंदिवस वाढणाऱ्या धकाधकीच्या परिस्थितीमुळे ताण-तणाव आणि असुरक्षितताही वाढली आहे. त्यामुळे मन दुसरीकडे रमवण्यासाठी करमणूक ही एक महत्त्वाची गरज बनलेली आहे.

कधीकधी आर्थिक परिस्थितीमुळे एखादी वस्तू घेणे आपल्याला परवडत नाही. पण ती वस्तू आपण घ्यावी असे आपल्या मनात सतत सुरू असते आणि तीच वस्तू कोणी आपल्याला दिली तर आपल्या आनंदाला पारावर उरत नाही. रेडू या चित्रपटात देखील रेडिओसाठी वेड्या असणाऱ्या एका माणसाची कथा आपल्याला पाहायला मिळते. आपण कधी रेडिओ घेऊच शकत नाही असे या व्यक्तिला वाटत असते. पण तोच रेडिओ त्याच्या आयुष्यात आल्यानंतर हा रेडू त्याच्या आयुष्याचा भाग कसे बनतो हे मजेशीरपणे दिग्दर्शकाने चित्रपटात मांडलेले आहे. प्रत्येक वेळी जनसामान्यांना नाटक-सिनेमा ही परवडणारी करमणूक नव्हती.

पूर्वीच्या काळी घरात रेडिओ असणे प्रतिष्ठेचे आणि करमणुकीचे साधन होते. वरील कथेतील अनेक पात्रे आपण ऐंशी-नव्वदीच्या कालखंडात अनुभवलेली असतील. त्यानंतर लॅंडलाइन घरात असणे प्रतिष्ठेचे होऊन गेले, त्यानंतर पूर्ण जगच एका खिडकीत मावेल अशी गोष्ट घरात आली आणि अबलावृद्ध आपला पुर्ण वेळ त्या टीव्हीच्या समोर घालवू लागले; त्यावेळी चॅनेल्स मर्यादित होते म्हणून टीव्हीचा वापरही मर्यादित होता पण आज सगळंच अमर्यादित झालेलं पाहायला मिळते. भारतात एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीस इंटरनेट सावकाश आपले अस्तित्व दाखवू लागले होते. अनेक लोक मोबाइल फोन प्रतिष्ठा म्हणून वापरत होते. पण बऱ्याच लोकांना त्याचा फायदा त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसाईक कामासाठी झालेला होता. पण आज चित्र पूर्णपणे बदललेले आहे कारण मोबाइल आणि इंटरनेट हे आपल्या जीवनाचे अविभाज्य घटक होऊन बसलेले आहेत. ज्या मोबाइलला शाळेत प्रवेश नव्हता त्याच मोबईलवर आज शाळा सुरू आहे.

सिस्को या नेटवर्किंग कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात ३३ टक्के तरुणांनी इंटरनेटशिवाय जगणे शक्य नसल्याचे मान्य केलेले आहे. पाच पैकी चार कॉलेज विद्यार्थी आणि तरुण नोकरदारांनी इंटरनेट आजच्या युगात महत्त्वाचे असून आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनले असल्याचे म्हटले आहे.  भारतातील ९५ टक्के तरुणांनी इंटरनेट हे आमच्यासाठी पाणी, अन्न, शुद्ध हवा आणि निवारा इतकेच महत्त्वाचे असल्याचे मान्य केलेले आहे. याचबरोबर सोशल मीडिया आणि स्मार्ट मोबाइलमुळे इंटरनेटचा वापर वाढल्याची माहिती सिस्को इंडिया सर्वेक्षणातून समोर आली आहे. गाणी ऐकणे, मित्रांशी गप्पा मारणे यासाठी इंटरनेट हे माध्यम अधिक प्रभावी आणि योग्य असल्याचे ४० टक्के तरुणांचे म्हणणे आहे. पण दुसरी बाजू अशी आहे की काही युवक याच्या पूर्ण आहारी गेलेले आहेत. अनेक लोकांना नोमोफोबिया (मोबाइल काम करत नाही याची भीती किंवा चिंता) सारख्या मानसिक विकृतीने ग्रासलेले आहे. तसेच अनेक लोकांना योग्य खबरदारी न घेतल्यामुळे अनेक ऑनलाइन गैरप्रकारांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळेच आज आपण डिजिटल किंवा इंटरनेट साक्षर होणे गरजेचे बनलेले आहे.

डिजिटल अधिकार

डिजिटलायझेशनच्या युगात इंटरनेट हे संप्रेषण आणि माहिती संप्रेषणाचे एक महत्त्वपूर्ण माध्यम बनले आहे. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीस इंटरनेट असणे ही प्रतिष्ठेची बाब मानली जात असे, परंतु सध्याच्या काळात इंटरनेट ही सर्वांची गरज बनली आहे. इंटरनेटची गरज लक्षात घेऊन केरळ हायकोर्टाने अलीकडेच फहिमा शिरीन विरुद्ध केरळ राज्य प्रकरणात, इंटरनेटवर प्रवेश मिळवण्याचा मूलभूत अधिकार, या कलमांतर्गत गोपनीयता आणि शिक्षणाच्या अधिकाराचा एक भाग म्हणून जाहीर केलेले आहे.

केरळच्या कोझिकोड येथे शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीला वसतिगृहात प्रतिबंधित कालावधीत मोबाइल फोन वापरल्यामुळे महाविद्यालयीन वसतिगृहातून काढून टाकण्यात आले. यावर त्या विद्यार्थिनीने केरळ उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. वसतिगृहांमध्ये बंदीचा हा प्रकार लिंगाच्या आधारे भेदभाव करणारा होता, असा दावाही याचिकाकर्त्याने केला होता, दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती पी. व्ही. आशा यांनी इंटरनेट अॅक्सेस हा मूलभूत अधिकार म्हणून घोषित केला आहे.

इंटरनेटचे महत्त्व

  • इंटरनेट हे संप्रेषणाचे एक अनमोल साधन आहे आणि सध्याच्या युगात इंटरनेट उपलब्धतेमुळे संप्रेषण सोपे आणि सोयीस्कर झाले आहे हे नाकारता येणार नाही.
  • इंटरनेटने आतापर्यंत अशा प्रकारच्या सुविधा नसलेल्या दुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम शिक्षणाचा पर्यायदेखील (मर्यादित का असेना) उघडला आहे.
  • इंटरनेटच्या माध्यमाने माहिती क्षेत्रातही क्रांती घडली आहे. आता आपण काही मिनिटांतच इंटरनेटद्वारे कोणत्याही प्रकारची माहिती मिळवू शकतो.
  • माहिती सहज उपलब्ध झाल्यामुळे सामान्य लोकांनाही त्यांच्या हक्कांची जाणीव झालेली आहे.

सर्व सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देऊन शासनाचा खर्च कमी करणे देखील सुनिश्चित केले जाऊ शकते:

  • हे सरकारची जबाबदारी आणि पारदर्शकता वाढवते.
  • शासकीय योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीस मदत होते.
  • राजकारण आणि लोकशाहीमध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्यात देखील मदत होते.
  • हे चांगले शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देते.
  • हे भारतीय समाजातील सामाजिक-सांस्कृतिक विवधतेसाठी उपयुक्त आहे.

शिक्षणात इंटरनेटची भूमिका

  • शिक्षण क्षेत्रात इंटरनेटची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, यात काही शंका नाही की सध्या बहुतेक सर्व लोक त्यांच्या समस्या आणि प्रश्नांसाठी गुगलवर शोध घेतात.
  • इंटरनेटवर जवळजवळ सर्व विषयांवर बरेच ज्ञान उपलब्ध आहे, जे आपल्या गरजेनुसार कधीही शोधले जाऊ शकते. (त्याची विश्वसनियतता आणि अस्सलपणा तपासणे गरजेचे आहे)

शिक्षणातील इंटरनेटचे फायदेः

  • देशातील शिक्षणासमोरील सर्वात मोठा अडथळा म्हणजे शिक्षणाचा खर्च, परंतु इंटरनेटने हा अडसर बर्‍याच अंशी दूर केला आहे. याबरोबरच शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा देखील इंटरनेटच्या माध्यमातून शक्य झाली आहे.
  • शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात संवाद साधण्यास इंटरनेटमुळे सुलभ झाले आहे. (कोविड-19 महामारीच्या काळात आपण त्याचा अनुभव घेतच आहोत)

भारतात इंटरनेट उपलब्धतेपुढील आव्हाने

  • गेल्या काही वर्षांमध्ये बर्‍याच खाजगी आणि सरकारी सेवा डिजिटल करण्यात आल्या आहेत आणि त्यातील काही केवळ ऑनलाइन उपलब्ध आहेत ज्यामुळे डिजिटल अशिक्षित लोकांना असमानता निर्माण झाली.
  • विश्वसनीय माहिती, पायाभूत सुविधा आणि डिजिटल साक्षरतेच्या अभावामुळे उद्भवणारे डिजिटल तफावत यामुळे सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण येते.
  • डिजिटल विभाजन संपूर्ण सामाजिक आणि आर्थिक स्पेक्ट्रममध्ये म्हणजे ग्रामीण आणि शहरी भारत, श्रीमंत आणि गरीब, भारतातील लोकसंख्याशास्त्रीय प्रोफाइल (वृद्ध आणि तरुण, स्त्री आणि पुरुष) मध्ये पाहिले जाऊ शकते.
  • 2016 च्या मध्यभागी जाहीर केलेल्या अहवालात असे दिसून आले आहे की भारतात डिजिटल साक्षरता दर 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे.

डिजिटल साक्षरतेचा अर्थ

    डिजिटल साक्षरता म्हणजे इंटरनेट वापरणे आणि डिजिटल जगाशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक अशा कौशल्यांचा समूह होय. मुद्रण माध्यमाची व्याप्ती हळूहळू कमी होत चालली आहे आणि ऑनलाइन उपलब्ध माहितीची व्याप्ती व्यापक होत चालली आहे, ऑनलाइन उपलब्ध माहिती समजण्यासाठी डिजिटल साक्षरता आवश्यक आहे.

डिजिटल साक्षरता आणि भारत

हे लक्षात घेण्याजोगे आहे की चीननंतर भारत ही जगातील दुसरी सर्वात मोठे ऑनलाइन बाजारपेठ आहे.

  • जानेवारी 2021 मध्ये भारतात 624 दशलक्ष इंटरनेट वापरकर्ते होते.
  • 2020 ते 2021 दरम्यान भारतात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या 47 दशलक्ष म्हणजे 8.2% ने  वाढली आहे.
  • जानेवारी 2021 मध्ये भारतात इंटरनेटचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 45% इतके होते.
  • वरील आकडेवारीने हे स्पष्ट केले आहे की भारताचा इंटरनेट बेस खूप विस्तृत आहे, ज्यामुळे येथे डिजिटल साक्षरतेचा विषय खूप महत्वाचा बनला आहे.

डिजिटल साक्षरतेसाठी भारताचे प्रयत्न

भारतनेट प्रोग्राम:

  • भारतनेट प्रकल्पाला पूर्वी ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन नेटवर्क असे नाव देण्यात आले होते.
  • या प्रकल्पातील उद्दीष्ट म्हणजे ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना आणि राज्य आणि खाजगी क्षेत्राच्या सहभागाने संस्थांना प्रवेशयोग्य ब्रॉडबँड सेवा प्रदान करणे.
  • भारतनेट प्रकल्पांतर्गत अडीच लाखाहून अधिक ग्रामपंचायतींना परवडेल अशा दराने ऑप्टिकल फायबरच्या माध्यमातून हाय स्पीड ब्रॉडबँड उपलब्ध करुन देणार आहेत. त्याअंतर्गत ब्रॉडबँडचा वेग 2 ते 20 एमबीपीएस पर्यंत ठेवण्यात आला आहे.
  • प्रोजेक्टला युनिव्हर्सल सर्व्हिस बिलिगेशन फंड (USOF) यांनी वित्तपुरवठा केला आहे.
  • त्याअंतर्गत शाळा, आरोग्य केंद्रे आणि कौशल्य विकास केंद्रांमध्ये मोफत इंटरनेट कनेक्शन देण्यात येणार आहे.

राष्ट्रीय डिजिटल साक्षरता अभियान

    सन 2020 पर्यंत भारतातील प्रत्येक घरात किमान एक व्यक्ती डिजिटल साक्षर व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय डिजिटल साक्षरता अभियान (एनडीएलएम) सुरू करण्यात आली होती. या प्रकल्पातील उद्दीष्ट तांत्रिकदृष्ट्या निरक्षर प्रौढांना वेगाने डिजिटलायझिंग जगात त्यांचे स्थान शोधण्यात मदत करणे हा आहे.

सायबर गुन्हे:

2019 मध्ये, इतर राज्याच्या तुलनेत ऑनलाइन बँकिंगशी संबंधित सर्वाधिक फसवणूकीची गुन्हे महाराष्ट्र राज्यातील अधिकाऱ्यांकडे अंदाजे 552 खटले नोंदविण्यात आले. 2019 मध्ये देशात इंटरनेट बँकिंग फसवणूकीची सुमारे दोन हजार प्रकरणे नोंदवली गेली. या प्रकारचा गुन्हा भारतीय दंड संहितेच्या कलम 420 च्या अखत्यारीत आला आहे.

टेलिनॉरने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार आशियाई देशांच्या तुलनेत भारतीयांनी ऑनलाइन फसवणूकीमध्ये सर्वाधिक पैसे गमावलेले आहेत. आकडेवारीनुसार 36% भारतीयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली, या इंटरनेट फसवणूकीमुळे प्रत्येक व्यक्तीसाठी सरासरी 8.19 लाख रूपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे, तर आशियातील प्रत्येक व्यक्तीसाठी 6.81 लाख रुपये आहे. या सर्वेक्षणात असेही दिसून आले आहे की 17% वापरकर्ते बनावट बँक ई-मेल फसवणूकीला बळी पडले आहेत.

इंटरनेट बँकिंगचा वापर सुरक्षितपणे करण्यासाठी टिप्स:

1. नेहमी अस्सल अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर वापरा (फुकटचे अँटी-व्हायरस वापरू नका). 

२. सार्वजनिक वाय-फाय किंवा व्हीपीएन सॉफ्टवेअर वापरणे टाळा.

3. आपल्या स्मार्टफोनची ऑपरेटिंग सिस्टम अद्ययावत करा.

4. आपला पासवर्ड नियमितपणे बदलत रहा आणि तो अधिक संदिग्ध असावा.

5. सर्व बँकिंग व्यवहाराच्या सूचना मोबाइलवर मिळण्यासाठी बँकेला विनंती करा.

6. इतर मोबाइल किंवा डीवाईसवरून आपल्या नेट-बँकिंग खात्यावर साइन इन करणे टाळा.

7. सामान्यत: इंटरनेट ब्राउझ करताना वेबसाइटच्या यूआरएलची सुरूवात "http" च्या अक्षराने होते. तथापि, सुरक्षित इंटरनेट ब्राउझ करण्यासाठी तो "https" ने सुरू झाला पाहिजे - शेवटी "s" (secure) लक्षात घ्या.

8. सगळ्यात महत्त्वाचे अनओळखी मेसेज किंवा मेलमधील लिंकवर क्लिक करून नेट-बँकिंग करू नका.

9. आपले बँक अकाऊंट नंबर, डेबिट/ क्रेडिट कार्ड नंबर आणि पिन कोणालाही सांगू अगर देऊ नका.

10. आपले नेट-बँकिंग किंवा ऑनलाइन खरेदी सुरक्षित करण्यासाठी डिजिटल साक्षर बना. 

(सदर लेखातील चित्र, इमेज Google वरून साभार)


५ टिप्पण्या:

  1. सद्यस्थिती मधील संप्रेषणाचे मुख्य साधन म्हणून गणले जाणारे इंटरनेट आणि डिजिटल साक्षरता याबद्दल खूपचं सुंदर आणि सोप्या भाषेत माहिती दिली आहे.धन्यवाद सर..

    उत्तर द्याहटवा
  2. अतिशय सोप्या भाषेत छान महत्वपूर्ण माहिती....

    उत्तर द्याहटवा

Thank you for your comments and suggestions

ॲनिमा आणि ॲनिमस | Archetypes: Anima and Animus

  जन्मताच आपण स्त्री-पुरुष असतो?  रामकृष्ण परमहंस हे एक भारतीय रहस्यवादी संत होते , जे आत्मज्ञान अनेक मार्गांनी प्राप्त केले जाऊ शकते या श...