शनिवार, २२ जानेवारी, २०२२

किशोरांना समजून घेताना | To understand the Teenager

 

किशोरांना समजून घेताना

किशोरावस्थेतील मुलांना शरीरात होणाऱ्या संप्रेरकांमळे आणि अन्य स्थित्यंतरांमुळे भिन्नलिंगी व्यक्तीचे आकर्षण वाटू लागते. मात्र या आकर्षणाला प्रेम समजून त्यात वाहत जाणे, लैंगिकदृष्ट्या अनैतिक गोष्टी करणे, व्यसनाच्या आहारी जाणे अशा गोष्टी घडतात. यामुळे शैक्षणिकदृष्ट्या लक्ष विचलित होणे, प्रेमभंग वगैरेमुळे नैराश्य येणे, अनैसर्गिक कृत्यांमुळे शारीरिक आजार होणे अशा अनेक गोष्टी मोठ्या प्रमाणात पाहायला मिळतात. याशिवाय किशोरवयीन मुले अधिक साहसी, बेधडक तसेच निर्भय असतात. संकटांना आणि आव्हानात्मक प्रश्नांना भिडण्याची त्यांची वृत्ती असते. त्याचबरोबर धोक्याचे मोजमाप करून, पारखून धोका पत्करण्याच्या क्षमतेचा विकास न झाल्याने, या वयात चुका होण्याचे प्रमाणही जास्त असते.

एकविसाव्या शतकात लक्षणीयरीत्या प्रभावी असणारं किशोरवयीन मुलांच वास्तव आज समाजाच्या सर्वच स्तरांना आव्हान देत असताना आजचा पालक मात्र द्विधा मनस्थितीत आहे. आजचा पालक आपली मुलं हाताबाहेर गेली म्हणून गोंधळून गेला आहे, तर दुसरीकडे आम्ही काय चुकीच केलं म्हणून किशोरावस्थेतील पिढी घाबरून आहे आणि संपूर्ण समाजच बिघडून गेला म्हणून माध्यमांची आगपाखड सुरु आहे. आमच्यावेळी असं काही नव्हतं म्हणून जुणेजाणत्यांची मध्येच आपल्या मतांची शेरेबाजी सुरु असते, असं गदारोळाचं चित्र सर्वत्र कमी - अधिक प्रमाणात उभं असलेल पाहायला मिळत. तर सुजाण पालक विचार करू लागलेत, सर्व काही संपलं आहे का ? की काही आशेचा किरण बाकी आहे ? यासाठी डॉ ग्लासेर यांचे विचार आजच्या काळात मदगार ठरू शकतील.

मूलभूत मानसशास्त्रीय गरजा

डॉ. विल्यम ग्लासेर यांच्या मते, चार मूलभूत मानसिक गरजा आहेत ज्या वर्तनाला चालना देतात. त्यामुळे सर्व व्यक्ती या दैनंदिन गरजामुळे प्रेरित होत असतात. आपल्या मूलभूत चार गरजा समजून घेतल्यास स्वतःला आणि आपल्या मुलांना समजून घेण्यास मदत होईल.

जवळीकता (Belonging)– ही गरज इतरांशी प्रेम, देवाणघेवाण आणि सहकार्याने पूर्ण होते

सत्ता (Power)– ही गरज काहीतरी मिळवून, पूर्ण करून, आणि ओळख आणि आदर याद्वारे पूर्ण होते

स्वातंत्र्य (Freedom)– ही गरज योग्य पर्यायांची निवड करून पूर्ण होते

मनोरंजन (Fun)– ही गरज हसून आणि खेळून पूर्ण होते

डॉ ग्लासेरच्या मते, जेव्हा किशोर चुकीचे वर्तन निवडतात, तेव्हा ते फक्त मोठ्यांची आज्ञा न पाळण्यासाठी किंवा मोठ्यांना मूर्ख बनवण्यासाठी असे करत नाहीत; तर वरील चारपैकी कोणत्यातरी एका गरजेची पुर्ती करण्यासाठी, हे त्यांचे वर्तन घडत असते. डॉ ग्लासेर म्हणतात की, मुलांना त्यांच्या भावना असतात आणि ते पूर्ण न झाल्याने किंवा त्यांना आनंदी वाटत नसल्यामुळे ते असू शकते. चला तर मग आपल्या किशोरांना समजून घेण्यासाठी चार मूलभूत गरजांची तपशीलवार माहिती पाहूया जेणेकरून त्या गरजा काय आहेत आणि त्यांची किशोरांच्या वर्तनात कोणती भूमिका आहे?

मानवी जीवन जगण्याची गरज स्पष्टपणे अधोरेखित होते आणि ते आपल्या सर्वामध्ये जन्मापासून आढळून येते. ही गरज वर्णन करणे सर्वात सोपे आहे. सर्व सजीव प्राणी आनुवंशिकपणे जगण्यासाठी प्रोग्राम केले गेलेले आहेत. जगण्याच्या मुलभूत गरजामध्ये भूक, तहान, आराम आणि लैंगिक इच्छा पूर्ण करण्याची गरज समाविष्ट होते. जगण्याची गरज म्हणजे शारीरिक धोक्यांना प्रतिसाद देणे आणि बचाव आणि सुरक्षितता शोधणे. डॉ ग्लासेर यांनी सांगितलेल्या चार मूलभूत गरजा पुढीलप्रमाणे:

1. प्रेमाची आणि जवळीकतेची गरज

मूलभूत मानसिक गरजांपैकी सर्वात आवश्यक असणारी ही गरज आहे. जवळच्या व्यक्तींवर प्रेम करणे आणि जवळच्या व्यक्तींनी आपल्यावर प्रेम करणे, आपले असे कोणीतरी असणे आणि मित्रपरिवार असणे ही गरज जगण्याच्या गरजेइतकी आवश्यक आहे. जेव्हा आपल्याला कोणी प्रेम करत नाही आणि एकटे वाटते तेव्हा आपण खूप दुःखी होतो. किशोरवयीन मुलांचे पालकांनी या गरजेशी परिचित असणे आवश्यक असते. 15 वर्षांच्या एखाद्या मुलाने अनेकदा "मला माझ्या मित्रांसोबत राहायचे आहे" अशी भावना  व्यक्त केली असेल आणि सर्व किशोरवयीन मुलांप्रमाणेच, त्याची स्वतःची आणि मैत्रीची आवश्यकता सामान्यत: काम, गृहपाठ किंवा कोणत्याही गोष्टींपेक्षा जास्त असते.

एक पालक म्हणून स्वमुल्यांकन केल्यास आणि विचार केल्यास असे दिसून येईल की आपले आयुष्य आपल्या कुटुंबाशिवाय किंवा जवळच्या मित्रांशिवाय कसे असेल आणि प्रेम आणि जवळीकतेची गरज पूर्ण करण्याचे अनन्यसाधारण महत्त्व असलेले दिसेल.

ही गरज पूर्ण करण्यासाठी एक सुजाण पालक म्हणून आपण आपल्या मुलांना पाठिंबा देणे अत्यावश्यक आहे. जेव्हा पालक आपल्या कामात खूप व्यस्त असतात किंवा त्यांना ही गरज कशी पूर्ण करावे हे माहित नसते, तेव्हा ही मुले गोंधळलेली किंवा त्रस्त असतात. त्यामुळे लहान वयातच मुलांचे सामाजिकीकरण होणे महत्वाचे आहे कारण ते स्वतःची जबाबदारी स्वतः घेऊ शकतील. आपण त्यांना स्वावलंबी बनण्यास संधी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. यातूनच कोणताही निर्णय घेताना जबाबदारीचे भान राहते.

2. सत्तेची/ शक्तीची गरज

मानसशास्त्रीय गरजांपैकी हा सर्वात मोठा गैरसमज आहे कारण आपण नकारात्मक अर्थाने सत्तेचा विचार करतो, जसे इतर लोकांवर सत्ता गाजविणे. डॉ. ग्लासेर ज्या सत्तेबद्दल बोलत आहेत ती म्हणजे वैयक्तिक सत्ता असून ती आत्म-मूल्याची भावना आहे जी सिद्ध करण्यातून आणि ओळखीतून येते.

सत्तेची गरज ही आपल्या स्वतःच्या जीवनावर आपले नियंत्रण आहे असे वाटण्याची गरज आहे. जेव्हा आपण आपल्या मुलांना आदेश किंवा आज्ञा देतो, तेव्हा आपण त्यांच्या सत्तेची गरजेला बाधा आणतो. जेव्हा आपण त्यांना निवड करण्याची संधी देतो, तेव्हा आपण त्यांच्या सत्तेची गरज भागवत असतो आणि त्यांना अशी भावना निर्माण करतो की ते त्यांच्या स्वतःच्या वर्तनावर नियंत्रण ठेवण्यासाठी पुरेसे जबाबदार आहेत.

जेव्हा आपण आपल्या मुलांची स्तुती करतो आणि त्यांच्या चांगल्या गोष्टींकडे लक्ष देतो, जेव्हा आपण त्यांची कामगिरी ओळखतो, तेव्हा आपण त्यांच्या सत्तेची गरज भागवत असतो. जेव्हा मुलांना शक्तीहीन वाटते, तेव्हा ते गुंडगिरी करून, घरात किंवा वर्गात नियमांची अवहेलना करून (ते नियम ठरवणाऱ्या व्यक्तीपेक्षा अधिक शक्तिशाली असल्याचे दर्शवून) ही गरज भागवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे किशोरांना हाताळताना सावधगिरी बाळगली पाहिजे त्यांच्या स्व-आदरास धक्का बसेल असे वर्तन किंवा शिक्षा करू नये.

3. स्वातंत्र्याची गरज

आपण आपले जीवन कसे जगतो हे निवडण्याची, स्वतःला मोकळेपणाने व्यक्त करण्याची आणि इतरांच्या नियंत्रणापासून मुक्त होण्याच्या स्वातंत्र्याची ही गरज आहे. डॉ ग्लासेर म्हणतात की अमेरिकन समाजात बऱ्यापैकी स्वतंत्रपणे राहण्याचे भाग्य त्यांना लाभले आणि ते दररोज मुक्तपणे असंख्य निवडी करू शकतात. आजकाल भारतातही ही संस्कृती रुजत आहे ज्यामुळे अनेक किशोर मुक्तपणे अनेक गोष्टी करू लागले आहेत.

मुलांना ही गरज पूर्ण करण्यास मदत करणे म्हणजे त्यांना जे करायचे आहे ते करण्याचे मुक्तपणे स्वातंत्र्य देणे असा नाही. जेव्हा आपण मुलांना जबाबदारी आत्मसात करण्याबद्दल बोलतो, तेव्हा आपण त्यांना निवडण्याचे स्वातंत्र्य देण्याबद्दल बोलत असतो. उदाहरणार्थ, पालकांनी आपल्या मुलाला दिलेल्या पर्यायांचा विचार करु या: "जर तु तुझे काम पूर्ण केला नाहीस तर तु बास्केटबॉल खेळामध्ये भाग घेऊ शकणार नाहीस." आता, या विधानाची तुलना या विधानाशी करु या: "तुझ्या हातातील काम पूर्ण झाल्याबरोबर, तु बास्केटबॉल खेळामध्ये भाग घेऊ शकतोस."

धमकीमुळे मुलांच्या सत्तेच्या गरजेमध्ये निराशा येते आणि त्याचा त्यांच्या स्वातंत्र्याची गरज पूर्ण करण्यासाठी काहीही उपयोग होत नाही. निवडीची ऑफर त्यांच्या शक्ती आणि स्वातंत्र्याच्या दोन्ही गरजा पूर्ण करते आणि त्यांना जबाबदारीबद्दल शिकवते.

4. मनोरंजनाची गरज

डॉ ग्लासेर मनोरंजनाची मानसिक गरज मी सर्वात महत्वाची मानतात. जेव्हा आपण  मौजमजा करत असतो तेव्हा आपण  खूप आनंदी असतो. आपण खूप आनंदी असतो तेंव्हा आपली सर्व काळजी किंवा चिंता ही त्या कालावधीत विसरली जाते. जेव्हा आपण मौजमजा करत असतो, तेव्हा आपण शारीरिक आणि मानसिक स्तरावर आराम करतो, आपल्या उत्साहाची, आनंदाची बॅटरी रिचार्ज करतो आणि आपल्या सभोवतालच्या ताण-तणावापासून दूर जातो. आयुष्यात प्रत्येक वयोगटामधील व्यक्तींनी मौजमजा केली पाहिजे; हे केवळ मुलांसाठीच आवश्यक आहे असे नाही.

डॉ ग्लासेर मनोरंजन हे अध्ययनासाठी अनुवांशिक बक्षीस म्हणून गणना करतात. पालक आणि शिक्षकानी मुलांशी आंतरक्रिया आणि सुसंवाद साधताना हे लक्षात ठेवणे फार महत्वाचे आहे. मुले खेळत असताना त्यांच्याकडे लक्ष दिल्यास आपणास ते सतत काहीतरी शोधत असतात, नवीन काहीतरी शिकत असतात आणि खूप छान वेळ घालवत असतात हे लक्षात येईल. आपल्यापैकी कोणीतरी नवीन काहीतरी शोधत असतो, तेव्हा उत्साहाची आणि मजेची भावना असते जी शिकण्याद्वारे मिळत असते.

डॉ ग्लासेर पालकांना नेहमी सांगतात की शिक्षा मुलांना काहीही शिकवत नाही आणि ती देण्यातही काही मजा नाही. हे केवळ वेदनादायक नसून येथे शिकणे देखील नाही आणि म्हणूनच मजा नाही. त्याऐवजी, डॉ ग्लासेर पालकांना मुलांमध्ये आणि त्यांच्या वर्तनातील सकारात्मकतेकडे लक्ष देण्यास सांगतात आणि त्यामुळे अधिक सकारात्मक वागणूक मिळेल आणि प्रत्येकाला चांगले वाटेल.

डॉ. विल्यम ग्लासेर यांनी आपल्या व्यावसायिक आयुष्यातील 40 वर्षांहून अधिक काळात वैवाहिक, कौटुंबिक, शिक्षक-विद्यार्थी संबंध आनंदी ठेवून तथाकथित मानसिक आजार बरे किंवा निरोगी ठेऊ शकतो हे सिद्ध केले आहे. त्यांनी द पीसएबल स्कूल प्रोग्राम, अध्यापन समस्या निराकरणासाठी एक व्यापक कार्यक्रम विकसित केलेला आहे. डॉ ग्लासेर यांच्या पालक आणि किशोरांसाठी (2003) या पुस्तकामधील काही महत्त्वाचे टिप्स # :

#1: किशोरांना बदलण्याचा प्रयत्न केल्याने दुःख निर्माण होईल त्यामुळे स्वतःला बदला.

डॉ ग्लासेर असा युक्तिवाद करतात की दुःख ही एकमेव खरी मानवी समस्या आहे (गौतम बुद्धाने सांगितलेल्या चार आर्यसत्यापैकी एक). लोक सुखी किंवा दु:खी असतात, तर हे दुःख कशामुळे होते? डॉ ग्लासेर याचे कारण देतात की, जे लोक नेहमी इतरांवर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न करतात ते सर्वात दु:खी असतात. इतरांवर नियंत्रण ठेवणे कुचकामी असूनही त्यामुळे दुःख निर्माण होते आणि, "जवळजवळ सर्व जुनाट आजारांचा दुःखाशी खूप जवळचा संबंध आहे." डॉ ग्लासेर आपणास इतरांना बदलण्यास भाग पाडणे सोडून देण्याची आठवण करून देतात. फक्त त्या व्यक्तीला बदला ज्याच्याकडे बदलण्याची ताकद आपल्याकडे आहे आणि ती व्यक्ती म्हणजे आपणच.

हवामान किंवा किशोरांना बदलण्याचा प्रयत्न करणे अशक्य आहे. त्यांना बदलण्याचा प्रयत्न केल्याने केवळ दुःख होईल. आपण स्वतःला बदलू शकतो. आपण आपल्या  नियंत्रणाबाहेरच्या गोष्टी बदलू करू शकतो आणि त्यासाठी पुर्यतयारी करू शकतो. आपण कोणत्याही हवामानाच्या अगोदर पुर्यतयारी करतो तसेच किशोरवयीन मुलांसाठी पुर्यतयारी करावे.

#2: आपल्या किशोरवयीन मुलांसाठी पुर्यतयारी कशी करावी, बाह्य नियंत्रण मर्यादित असल्यामुळे आत्म-नियंत्रण विकसित करावे.

बाह्य नियंत्रण मर्यादित आहे. "जेव्हा मांजर घरात नसेल तेव्हा उंदीर धुमाकूळ घालतील" या म्हणीनुसार बाह्य नियंत्रण असे बरेच आहे. जेव्हा नियंत्रक सक्ती करण्यासाठी उपलब्ध असतो तेव्हा सर्वोत्तम कार्य घडून येते. तथापि, नियंत्रक नसताना ते कार्य त्वरीत थांबते. डॉ ग्लासेर यांनी अशा सात बाह्य नियंत्रक वर्तनाविषयी चर्चा केलेली ज्यामुळे किशोरवयीन मुलांशी पालकांचे नातेसंबंध नष्ट होतात. टीका करणे, दोष देणे, तक्रार करणे, त्रास देणे, धमकावणे, शिक्षा करणे आणि नियंत्रणासाठी बक्षीस देणे यांचा समावेश होतो. जर आपणास आपल्या किशोरवयीन मुलाला आपल्यापासून दूर करायचे असेल तर वरीलपैकी कोणतेही वर्तन करावे.

आत्म-नियंत्रण हे बाह्य नियंत्रणाच्या थेट विरुद्ध आहे. आत्म-नियंत्रण अधिक प्रभावी असून हा दृष्टिकोन स्वयं-वर्णनात्मक आहे. आत्म-नियंत्रण असलेल्या व्यक्तीवर योग्य गोष्टी करण्यासाठी (मांजर दूर असताना देखील) विश्वास ठेवला जाऊ शकतो. पालक केवळ स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतात तसेच किशोरही केवळ स्वतःवर नियंत्रण ठेवू शकतात.

#3: आपल्या मुलाला प्रौढांसारख्या निवडी करण्यासाठी (जरी आपण जवळपास नसला तरीही) प्रोत्साहित करण्यासाठी मजबूत नातेसंबंध (विश्वासासह) तयार करा.

आपले आपल्या मुलांशी चांगले हितसंबंध असतील तर आपली विनंती मान्य करण्याची अधिक शक्यता कधी असते. डॉ ग्लासेर यांनी "हितसंबंध सवयी" बाबत असे सांगितलेले आहे की, जे वर्तन नियंत्रित करण्याच्या थेट विरुद्ध आहेत (टीप # 2 मध्ये पाहिलेले आहे). या हितसंबंधाच्या सवयींमुळे सदृढ नातेसंबंध निर्माण होतात. काळजी घेणे, ऐकण्यावर विश्वास ठेवणे, समर्थन करणे, वाटाघाटी करणे, मैत्री करणे आणि प्रोत्साहन देणे या सवयींचा समावेश आहे. याप्रकारचे नातेसंबंध विकसित करण्यासाठी वेळ आणि संयम लागेल.

#4: बाह्य नियंत्रणाचा वापर न करता किशोरांना आधीच प्रेरित केले जाते.

डॉ ग्लासेर असा युक्तिवाद करतात की लोक आधीच वेदना आणि आनंदाने प्रेरित आहेत त्यामुळे लोकांना वेदना टाळून आनंदाचा अनुभव घ्यायचा असतो. आपले किशोर यापेक्षा वेगळे नाहीत. जेव्हा नियंत्रक किशोरवयीन मुलाच्या वागण्यावर नाखूश असतो तेव्हा नियंत्रकाचा दृष्टीकोन वेदना (सलत राहणे, झुरत राहणे, त्रागा करणे) निर्माण करणारा असतो. मूल जे काही करत आहे त्याबद्दल नियंत्रक आनंदी असतो तेव्हा नियंत्रकाचा दृष्टीकोन आनंद (बक्षीस, प्रशंसा, फायदे) देणारा असतो. आपण देऊ शकणार्‍या बक्षिसांमुळे मूल आनंदी नसेल तेव्हा काय होते?

डॉ ग्लासेर यांनी पालकांसाठी काही सूचना केलेल्या आहेत. किशोरवयीन अद्याप सर्वोत्तम निर्णय घेण्यासाठी पुरेसे परिपक्व नसतात त्यामुळे पालक काळजी करत असतात. शेवटी, किशोरवयीन मुले ही अजूनही लहान असल्याने पालकांना काळजी वाटते की अपरिपक्व निवडी केल्यामुळे मूलाच्या जीवनात  गोंधळ निर्माण होऊ शकतो. पालक चिंतित आहेत की किशोरवयीन मुलाची स्वतःची आनंदाची कल्पना देखील त्यांचे जीवन उध्वस्त करू शकते. पण एक सुजाण पालक म्हणून आपल्या मुलाशी शक्य तितके सर्वोत्तम संबंध विकसित करणे आणि त्यांच्या कल्याणाविषयी आपले प्रामाणिक, अस्सल विचार आणि काळजी व्यक्त करणे हा अधिक चांगला मार्ग आहे. संभाव्य धोके आणि हानींबद्दल जाणीव-जागृती आणि आपण त्यांच्याशी कोणताही निर्णय घेताना मित्राप्रमाणे चर्चा घडून आणावी.

#5: मनोरंजनाच्या शक्तीचा वापर

डॉ ग्लासेरने असा युक्तिवाद केला की मनोरंजन हा जगातील सर्वात मोठा व्यवसाय आहे. मौजमजा अनुभवण्यासाठी लोक खूप पैसे खर्च करतात. किशोरवयीन मुलाला शिकण्यास मदत करण्याचे रहस्य म्हणजे ते मजेदार बनवणे. त्यांना शिकण्याचा आनंद घेण्यास मदत केली पाहिजे. पालकांना त्यांच्या मुलाच्या कल्याणाची काळजी असते त्यामुळे मजेदार आणि आनंददायक बनवणे हा एक प्रभावी दृष्टीकोन आहे. आपल्याला त्यांची काळजी आहे हे मुलाला कळू द्या. त्यांच्या समस्या आधी ऐका. त्यांच्या प्रयत्नांमध्ये त्यांना पाठिंबा द्या. शक्य तितक्या सर्वोत्तम निवडी करण्यासाठी त्यांना प्रोत्साहित करा.

थोडक्यात, आपल्या सर्वांच्या मूलभूत गरजा आहेत ज्या आपण पूर्ण करण्याचा सतत प्रयत्न करत असतो. जर आपण मुलांना इतरांच्या गरजांवर अतिक्रमण न करता त्यांच्या मूलभूत गरजा कशा पूर्ण करायच्या हे शिकवू शकलो, तर आपण त्यांना स्वतःच्या जीवनासाठी जबाबदार कसे असावे हे कळेल आणि यामुळे त्यांना स्वतःला तसेच इतरांना अधिक चांगल्या प्रकारे समजून घेण्यास मदत होईल. या सर्व प्रक्रियेतून अधिक परिपूर्ण जीवन जगता येईल आणि ते मित्र बनवायला आणि टिकवायला शिकतील जे आजच्या काळात खूपच गरजेचे बनलेले आहे.

                 (सदर लेखातील चित्र, इमेज Google वरून साभार)

संदर्भ:

Glasser, W. (1975). Reality Therapy: A New Approach to Psychiatry. New York: Harper Collins

Glasser, W. (1999). Choice Theory: A New Psychology of Personal Freedom. New York: Harper Collins

Glasser, W. (1999). Choice Theory in the Classroom. New York: Harper Collins

Glasser, W. (2001). Counselling with Choice Theory: The New Reality Therapy. New York: Harper Collins

Glasser, W. (2002). Unhappy Teenagers: A Way for Parents and Teachers to Reach Them. New York: Harper Collins

Glasser, W. (2003). For parents and teenagers: Dissolving the barrier between you and your teen. New York: Harper Collins

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments and suggestions

आपणही ‘ब्रेन रॉट’ चे शिकार झालेले आहात का? | Brain Rot

  आपण ‘ब्रेन रॉट’ चे शिकार झालेले आहात का ? ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने 2024 चा ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर म्हणून ‘ब्रेन रॉट’ ( Brain Rot...