रविवार, २८ जानेवारी, २०२४

ताण-तणावापासून सुटकेसाठी संरक्षण यंत्रणा |Défense Mechanism

 ताण-तणावापासून सुटकेसाठी संरक्षण यंत्रणा (Défense Mechanism)

मानसशास्त्रज्ञांच्या मदतीशिवाय आपल्या समस्यांचे खरे कारण समजून घेणे आपल्यासाठी अवघड जाते का? कारण त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करताना आपल्या लक्षात येईल की, अनेकदा हे कार्य अबोध पातळीवर सुरु असते. सोप्या भाषेत सांगायचे तर, जेव्हा आपण नकळतपणे स्वतःची फसवणूक करतो तेव्हा ते आपल्यासाठी सोपे होते. हे एखाद्या व्यक्तीसाठी मानसिक संरक्षणाचे एक चांगले, पर्यावरणास अनुकूल कार्य असते. पण दुसरीकडे, ते आपले नुकसान करतात कारण ते वास्तवाचा विपर्यास करतात आणि आपल्या समस्यांकडे डोळेझाक करतात. नेमके हे प्रकरण काय आहे हे सविस्तर पाहू या.

फ्रॉईडचा असा विश्वास होता की, मनाचे बोध, बोधपूर्व आणि अबोध असे तीन स्तर असतात. तसेच फ्रॉईडने असे प्रतिपादन केले की व्यक्तिमत्त्वाचे तीन भाग असतात. हे तीनही भाग परस्परसंबंधित असतात. त्यांच्यात सतत आंतरक्रिया सुरू असते. येथे एक गोष्ट लक्षात ठेवणे आवश्यक आहे, ती अशी की, फ्रॉईडने सुचवलेले हे तीनही भाग म्हणजे प्रत्यक्षातील मेंदूत असणारे शारीरिक भाग नसून व्यक्तिमत्त्वाचे स्वरूप जाणून घेण्यासाठी मांडलेल्या सांकेतिक संकल्पना आहेत.

1. इदम् (Id): इदम् पूर्णतया अबोध पातळीवर काम करत असून व्यक्तिमत्त्वाचा हा भाग 'सुखतत्त्वा' नुसार काम करतो. इदम् हा तात्काळ समाधान मिळवण्यासाठी मूलभूत इच्छा आणि उर्मी याद्वारे चालवला जातो. यांमध्ये सर्व प्राथमिक प्रेरणांचाही (उदाहरणार्थ, भूक, तहान इत्यादी) समावेश होतो, इदमची  तुलना अर्भकाबरोबर करता येईल, अर्भकापुढे फक्त भूक, झोप या गरजा तत्क्षणी पूर्ण करणे एवढेच लक्ष्य असते. इतरांची ते पर्वा करत नाही. तसेच काहीसे इदमचे असते. परिणामांचा विचार न करता सुखप्राप्तीसाठी इदम काहीही करायला तयार असतो, या अर्थाने तो अवास्तववादी आणि अविवेकवादी असतो, सामाजिक बंधने, नैतिकता, मूल्ये सतत त्याच्या गरजपूर्तीच्या आड येत असतात. यावर अहम हा त्यांच्यावर सतत लगाम ठेवत असतो.

2. अहम् (Ego): व्यक्तिमत्त्वाचा हा भाग 'वास्तव' तत्त्वानुसार काम करतो मानून तो विवेकवादी असतो. याचे कार्य बोधपातळीवर चालते. व्यक्तिमत्त्वाचा सर्वाधिक बुद्धिमान, विचारशील, तर्कसंगत संयमी भाग म्हणजे अहम्, वास्तवतेचे भान ठेवून गरज पूर्ण करण्यास तो उद्युक्त करतो, वेळप्रसंगी तो इदमला त्याच्या अवास्तव मागण्या मागे घ्यायला भाग पाडतो, त्यांच्या पूर्ततेला मनाई करतो, अहम् म्हणजे उच्च विचारप्रक्रियांचे अधिष्ठान होय. 'इगो' या शब्दाचा लॅटिनमध्ये अर्थ 'मी' असा होतो. हा अहम अबोध मनामधल्या कल्पनांना, विचारांना आणि इच्छांना सतत धमकावून दाबून ठेवत असतो. बाह्य जगाला आणि समाजाला कुठल्याही व्यक्तीच्या मनाचा जो दृश्य भाग असतो तो अहम असतो. सामाजिक रूढीरिवाजांचा या अहमवरच जास्तीत जास्त परिणाम होत असतो.

3. पराहम् (Super Ego): पराहम् हा 'नैतिक' तत्त्वानुसार काम करतो. चांगले-वाईट, नैतिक-अनैतिक, चूक- बरोबर हा भेद तो जाणतो, नैतिक वर्तन करण्यास प्रवृत्त करतो. पराहमचे पुन्हा दोन भाग पडतात: अहम् आदर्श (Ego Ideal) आणि सदस‌द्विवेक बुद्धी (Conscience). अहम् आदर्श हा व्यक्तीला आदर्श, नैतिक कृत्य करण्यास प्रवृत्त करतो, तर सदसद्विवेक बुद्धी व्यक्तीला अनैतिक कृत्य करण्यापासून परावृत्त करतो. या दोन्ही भागांच्या एकत्रित कार्यामुळे ईदमच्या स्वार्थी कृत्याला लगाम बसतो व सद्‌गुणांचा विकास होता. पराहम् हे अंतर्गत नैतिक होकायंत्र, सामाजिक मूल्ये आणि अपेक्षांचे प्रतिनिधित्व करते.

प्रत्यक्ष विचार करता आपणास असे दिसेल, की इदम् आणि पराहम् हे दोघेही अवास्तववादीच आहेत. वर्तन घडत असताना दोघेही वास्तवतेचा विचार करत नाहीत. इदम् सर्व सामाजिक, नैतिक बंधने झुगारून परिणामांची तमा न बाळगता गरजा भागवण्याच्या प्रयत्नात असतो; तर पराहम् मर्यादापलीकडे नैतिकतेचा, सत्याचा आग्रह धरतो. एका विशिष्ट मर्यादेपर्यंत ही आग्रही भूमिका ठीक असते. पराहमच्या अतिप्रभावाखाली असणारी व्यक्ती नैतिक आचार पालनाविषयी टोकाची भूमिका घेते.

'अति ताणले की तुटते' याचे भान न ठेवता जीवनात यशस्वी होण्यासाठी आवश्यक असणारी व्यावहारिक तडजोड करण्यास नकार दिल्याने काही वैयक्तिक, सामाजिक समस्या संभवतात. अहम् मात्र इदम् व पराहम् यांच्यात सामंजस्य घडवून आणण्याचा नेहमी प्रयत्न करत असतो. इदमच्या स्वार्थी कृत्यांना प्रतिबंध करणे आणि पराहमला व्यावहारिक सोईसाठी तडजोड स्वीकारण्यास भाग पाडणे या दोन्ही गोष्टी एकाच वेळी साधून अहम् दोन्ही टोकाच्या भूमिकांचा सुवर्णमध्य गाठतो. पण फ्रॉईडच्या मते, अहममध्ये अशी एक यंत्रणा असते की, जी स्व-अस्तित्त्व धोक्यात आल्यामुळे निर्माण झालेली चिंता कमी करते त्यास संरक्षण यंत्रणा असे म्हणतात. ॲना फ्रॉईडने तिचे वडील सिग्मंड फ्रायड यांच्या कार्यातून दिसून येणाऱ्या संरक्षण यंत्रणांची नोंद संरक्षण यंत्रणांवरील पहिले पुस्तक, द इगो अँड द मेकॅनिझम ऑफ डिफेन्स (1936) यामध्ये केलेली आढळते.   

संरक्षण यंत्रणा (Defence Mechanism)

जीवनात समायोजन साधणाऱ्या व्यक्तीला सुखसमाधान लाभते तसेच अशी व्यक्ती अधिक कार्यक्षम असते. प्रत्येकजण आपापल्या कुवतीनुसार जीवनात समायोजन साधण्याचा प्रयत्न करीत असतो, समायोजन साधण्याच्या प्रक्रियेत व्यक्तीला संरक्षण यंत्रणेचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो, आपली प्रतिमा उजळ ठेवण्याचा, प्रतिष्ठा टिकविण्याचा व वाढविण्याचा आपण सतत प्रयत्न करीत असतो, एखादी चूक झाली तर त्याचा दोष आपण स्वत:कडे घेत नाही. दोष इतर कोणाचा आहे असे सांगून मोकळे होतो. एखाद्या मुलाला गणिताच्या पेपरात कमी गुण पडले तर तो आपण अभ्यास केला नाही हे न सांगता सरांनी नीट शिकविले नाही असे सांगून मोकळा होतो, दोष आपला नाही, परिस्थितीचा आहे किंवा अन्य कोणाचा आहे हे सांगण्याकडे आपला कल असतो. चूक न स्वीकारता आपल्या वर्तनाचे समर्थन करण्याच्या अनेक युक्त्या प्रयुक्त्या आपण योजतो, आपल्याभोवती संरक्षण यंत्रपणेच्या माध्यमातून एक प्रकारची तटबंदी आपण तयार करतो आणि 'स्व' चा बचाव करतो. 'स्व' च्या प्रतिष्ठेला धक्का बसू देत नाही, उलट आपली प्रतिष्ठा कशी वाढेल हे दाखविण्याचा आपला प्रयत्न असतो, या प्रयत्नामुळे आपला मानसिक ताण काही प्रमाणात कमी होतो व परिस्थितीशी समायोजन साधले जाते.

आपल्या वर्तनातील चुका व दोष न स्वीकारता आपल्या चुकीच्या वर्तनाचे समर्थन करण्यासाठी आपण युक्त्या व पद्धती योजतो. या युक्त्यांना व पद्धतींना संरक्षण यंत्रणा असे म्हणतात. संरक्षण यंत्रणा उभी करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या विविध प्रकारच्या युक्त्या व पद्धती पुढीलप्रमाणे सांगता येतील. संरक्षण यंत्रणा मानसशास्त्रीय ढाल म्हणून काम करतात ज्या आपण नकळतपणे गुंतागुंतीच्या भावनांचे व्यवस्थापन करण्यासाठी आणि तणावपूर्ण परिस्थितींना तोंड देण्यासाठी वापरतो. काहीवेळा, या तीन शक्ती एकमेकांशी भिडतात, ज्यामुळे चिंता आणि अस्वस्थता निर्माण होते. संरक्षण यंत्रणा अशा तणाव कमी करण्यासाठी सामना करण्याची यंत्रणा म्हणून काम करतात:

1. वेदनादायक भावनांपासून स्वतःला दूर ठेवणे (painful emotions):

दमन (Repression): वेदनादायक विचार आणि आठवणी अबोध मनामध्ये खोलवर दाबून टाकणे. माणसाच्या मनात कित्येक वेळा अतिशय वाईट विचार येतात, वासना निर्माण होतात. व्यक्ती असे विचार, वासना दडपून टाकण्याचा प्रयत्न करीत असते. या दाबून टाकण्याच्या, दडपून टाकण्याच्या कृतीला दमन असे म्हणतात. एखाद्याने त्याचा राग मनातल्या मनात गिळून टाकला असे आपण म्हणतो, हा दमनाचा एक प्रकार आहे. वासनेचे आपल्या मनात अस्तित्वच नाही असे दाखविण्याचा आपण जेव्हा प्रयत्न करतो तेव्हा ते दमन असते. मनातल्या मनात उफाळून येणारी वासना आपण दडपून टाकीत असतो. चिंता वाटत असली ती आपण निश्चिंत आहोत, भीती वाटत असली तरी आपण निर्भय आहोत असे दाखविण्याचा आपला प्रयत्न असतो. पण अशा वेळी आपल्या मनावर एक प्रकारचा ताण वाढत जात असतो. त्यातून गंभीर स्वरूपाच्या मानसिक व्याधी निर्माण होण्याची शक्यता असते. ज्यावेळी आपण जाणीवपूर्वक दमन करतो व मनाला वळण लावण्याचा प्रयत्न करतो तेव्हा ते निरोधन (Supression) असते. निरोधन हे दमनापेक्षा जास्त धोकादायक असते.

अस्वीकार (Denial): वास्तव किंवा आपल्या स्वतःच्या कृती मान्य करण्यास नकार देणे. ताण निर्माण करणाऱ्या माहितीचा स्वीकार करण्यास तयार नसणे. तसेच चिंता, क्लेश निर्माण करणाऱ्या सत्याचा स्वीकार करण्यास नकार देणे म्हणजे अस्वीकार होय. उदा. स्वतःच्या अतिप्रिय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे हे न स्वीकारणे. अस्वीकारामुळे स्वतःला किंवा इतरांना लक्षणीय त्रास किंवा हानी होत आहे. अस्वीकार दैनंदिन जीवनात, नातेसंबंधात किंवा कामात हस्तक्षेप करते. अस्वीकार व्यक्तीला मदत मिळविण्यापासून किंवा मूळ समस्येचे निराकरण करण्यापासून प्रतिबंधित करते. दुःख, भीती किंवा राग यासारख्या तीव्र भावनांचे व्यवस्थापन करण्यासाठी अस्वीकार ही तात्पुरती सामना करण्याची यंत्रणा असू शकते. "डोळे झाकून समस्या दूर होत नाहीत" ही म्हण अस्वीकार या संरक्षण यंत्रणेशी संबंधित आहे.

प्रतिक्रिया निर्मिती (Reaction Formation): सिग्मंड फ्राइडच्या मते "प्रतिक्रिया निर्मिती म्हणजे एखादी कल्पना, प्रभाव किंवा इच्छा यांचे बोधावस्थेमध्ये स्थिरीकरण जे भीतीदायक अबोध आवेगाच्या विरुद्ध असते." प्रतिक्रिया निर्मिती ही एक प्रकारची संरक्षण यंत्रणा आहे ज्यामध्ये एखाद्या व्यक्तीला त्याच्या खऱ्या भावना किंवा इच्छा सामाजिकदृष्ट्या, किंवा काही प्रकरणांमध्ये, कायदेशीररित्या अस्वीकाहार्य असल्याचे समजते आणि त्यामुळे ते स्वतःला किंवा इतरांना पटवून देण्याचा प्रयत्न करतात जे सत्याच्या उलट असते, अनेकदा अतिशय अतिशयोक्तीपूर्ण कामगिरी असू शकते. एकूणच हे एखाद्या व्यक्तीला जसे वाटते याच्या उलट वागणे आहे. एक व्यक्ती जो भूतकाळात कोणावर अतिशय प्रेम करत होता पण काही कारणामुळे ते क्लेशकारक आठवणींमध्ये रूपांतरण होते तेंव्हा तो असा दावा करतो की त्याचा प्रेमावर विश्वास नाही आणि त्याला त्याची फिकीरही नाही. तसेच मूल नको असलेले एखादी आई चांगली आई बनताना दिसते.

 2 . विकृत वास्तव (Distorting Reality):

प्रक्षेपण (Projection): आपल्या स्वतःच्या चुकांसाठी किंवा नकारात्मक भावनांसाठी इतरांना दोष देणे. प्रत्यक्षात दोष आपला असला तरीही तो दुसऱ्यांच्या माथी मारला जातो. परीक्षेत नापास होणारा विद्यार्थी शिक्षकांनी नीट शिकविले नाही असे सांगतो, किंवा शिक्षकांनी पेपर कडक तपासले असे म्हणतो. स्नेहसंमेलनात एखाद्या विद्यार्थिनीस नीट गाता आले नाही तर ती, पेटी तबल्याची साथ चांगली नव्हती असे म्हणते. निवडणुकीत पडलेला 'हिरो' मुलींनी मला मते दिली नाहीत असे सांगतो. यात आपल्या दोषांना झाकण्याचा प्रयत्न असतो. प्रक्षेपण हेदेखील एका अर्थाने समर्थनच असते! मराठीतील नाचता येईना अंगण वाकडे ही म्हण सार्थ ठरते.  

समर्थन (Rationalization): तार्किक स्पष्टीकरणांसह आपल्या कृतींचे समर्थन करणे. एखाद्या कृतीत आपली चूक झाली असता, ती मान्य न करता इतरांना खऱ्या वाटतील, अशा सबबी सांगणे म्हणजे समर्थन होय मेडिकलला प्रवेश मिळाला नाही याचे कारण आपल्याला गुण कमी पडले हे मान्य न करता 'आता काय करायचे डॉक्टर होऊन, गल्ली बोळातसुद्धा शेकडो डॉक्टर आहेत' असे इतरांना पटणारे कारण सांगणे हा या संरक्षण यंत्रणेचा एक भाग आहे. ऑफिसमध्ये  काही मिनिटे उशिरा आलेली महिला ‘उशीर झाला आहे' हे मान्य करीत नाही तर ऑफिसचे घड्याळ काही मिनिटे पुढे आहे असे सांगते तेव्हा ती आपल्या वर्तनाचे समर्थन करीत असते. एखाद्या हुशार विद्यार्थ्यांचा परीक्षेत पहिला क्रमांक आला नाही तर तो आपला अभ्यास कमी पडला असे मान्य करीत नाही, तर परीक्षेच्या वेळी मी आजारी होतो असे कारण सांगून स्वत:चा बचाव करतो. मराठीतील चोराच्या उलट्या बोंबा ही म्हण सार्थ ठरते

तादात्म्य (Identification) : आपली प्रतिष्ठा वाढविण्यासाठी, आपली उणीव लपविण्यासाठी काही व्यक्ती प्रसिद्ध व्यक्तींच्या छायेत राहतात. प्रसिद्ध नटाबरोबर, नटीबरोबर किंवा मंत्र्याबरोबर, श्रेष्ठ कलावंताबरोबर स्वतःचा फोटो काढून घेतात. वर्गातला एखादा मुलगा सतत हुशार मुलाबरोबर वावरतो. मुलगा आपले दोष लपविण्यासाठी वडिलांच्या मोठेपणाचा, अधिकाराचा तोरा मिरवितो. मुलगी आपल्या आईवडिलांची दिगंत कीर्ती सतत सांगत राहते. एखादी सामान्य मुलगी वर्गाने मिळविलेल्या यशात स्वतःचे यश दाखविण्याचा प्रयत्न करते. माझे चुलत चुलते पोलिस इन्स्पेक्टर आहेत असे सांगून स्वत:ची प्रतिष्ठा वाढविण्याचा प्रयत्न एखाद्या व्यक्तीकडून केला जातो. दुसऱ्या प्रसिद्ध व्यक्तीशी आपला संबंध प्रस्थापित करून, त्या व्यक्तीशी तादात्म्य पावून आपले दोष झाकण्याचा किंवा प्रतिष्ठा वाढविण्याचा प्रयत्न केला जातो व समायोजन साधले जाते.

3. धोके कमी करणे (Minimizing Threats):

विस्थापन (Displacement):  भावना किंवा चिंता एका सुरक्षित लक्ष्यावर हस्तांतरित करणे. आपल्यापेक्षा श्रेष्ठ, वरचढ व्यक्ती आपल्यावर रागावली तर आपण त्या व्यक्तीवर रागावू शकत नाही. तर तो राग आपण आपल्यापेक्षा कनिष्ठ व्यक्तीवर प्रगट करतो. पती रागावला तर पत्नी त्याच्यावर राग व्यक्त करीत नाही. ती मुलांवर आपला राग व्यक्त करते. याला विस्थापन असे म्हणतात. एखाद्या कारकुनावर साहेब रागावले तर कारकून साहेबावर रागावू शकत नाही. तो घरी आल्यावर बायकोवर किंवा मुलाबाळांवर रागावतो. लहान मुले हातपाय आपटून, भांड्यांची आदळापट करून आपला राग व्यक्त करतात. “वड्याच तेल वाग्यांवर काढण’’ या म्हणी नुसार ज्यांच्यावर आपण सहज हक्क गाजवू शकतो अशा व्यक्तींचा बळी देणे.   

उदात्तीकरण (Sublimation): सामाजिकदृष्ट्या स्वीकाहार्य किंवा अगदी उत्पादक क्रियामध्ये तीव्र भावनांचे वाट करून देणे. समायोजन साधण्याचा उदात्तीकरण हा एक अत्यंत चांगला मार्ग आहे.  आक्रमक असलेली व्यक्तीने अन्यायाविरुद्ध झगडणे हे केवढे चांगले उदात्तीकरण आहे. वात्सल्य ही एक सहज प्रवृत्ती आहे, एखाद्या जोडप्याला दुर्दैवाने अपत्य नसेल तर अनाथाश्रमातून एखादे बालक आणून त्यावर वात्सल्याचा वर्षाव करणे समायोजन साधले जाते. संभोग ही कामनिष्ठ सहजप्रवृत्ती आहे. शृंगारास विविध कलांच्या माध्यमातून, चित्रकलेतून, शिल्पकलेतून, नृत्यकलेतून तिचे उदात्तीकरण होईल त्यामुळे उदात्तीकरणात केलेल्या कृतीला समाजमान्यता असते.

प्रतिपूरण (Compensation) : एका क्षेत्रात यश मिळवता आले नाही तर दुसऱ्या क्षेत्रात यश मिळवून त्याची भरपाई करण्याचा प्रयत्न व्यक्ती करीत असते. एखादया विद्यार्थ्यांला अभयासक्षेत्रात यश मिळविता आले नाही तर तो एखादया खेळात नेत्रदीपक यश मिळवून स्वतःच्या अभ्यासक्षेत्रात आलेल्या अपयशाची भरपाई करतो. शारीरिक व्यंग असलेली व्यक्ती कला क्षेत्रात खूप आघाडीवर राहण्याचा प्रयत्न करते. कुरूप स्त्री अभ्यासाच्या क्षेत्रात किंवा स्वयंपाकाच्या क्षेत्रात खूप प्रगती करते; आणि अशा प्रकारे कुरूप दिसण्याची भरपाई करते. एखाद्या क्षेत्रातील न्यूनता नाहीशी करण्यासाठी दुसऱ्या एखाद्या क्षेत्रात विशेष परिश्रम करून उणीव भरून काढण्याचा प्रयत्न प्रतिपूरणात केलेला दिसून येतो.

संरक्षण यंत्रणा तात्पुरती आराम देऊ शकतात, परंतु अधिक प्रमाणात किंवा अयोग्यपणे अवलंबून राहिल्यास ते समस्याग्रस्त देखील होऊ शकतात. अतिवापरामुळे भावनांवर प्रभावीपणे प्रक्रिया करणे, नातेसंबंध बिघडवणे आणि वैयक्तिक वाढीस अडथळा येऊ शकतो. संरक्षण यंत्रणा सामान्य आहेत, अगदी आवश्यक देखील आहेत, काही प्रमाणात. परंतु त्यांची उपस्थिती ओळखणे आणि निरोगी सामना करण्याची यंत्रणा शिकणे भावनिक कल्याणास प्रोत्साहन देऊ शकते आणि आव्हानांना अधिक प्रभावीपणे नेव्हिगेट करू शकते. यांचा अतिरेकी वापर व्यक्तीला मनोविकाराकडे घेऊन जाऊ शकतो असा इशारा अनेक मानसशास्त्रज्ञानी दिलेला आहे.

मानसोपचारतज्ज्ञ जॉर्ज इमान वेलंट यांनी संरक्षण यंत्रणेचे चार-स्तरीय वर्गीकरण मांडलेले आहे. 1937 मध्ये सुरू झालेल्या आणि 1977 संपलेल्या ग्रँट अभ्यासाचे निरीक्षणावरून ही  पदानुक्रम जीवनाशी जुळवून घेण्याच्या क्षमतेशी उत्तम प्रकारे संबंधित असल्याचे दिसून आले आहे. 1977 मध्ये झालेल्या अभ्यासावरून अभ्यासाचा फोकस हा विकारापेक्षा मानसिक आरोग्यावर होता.

स्तर I – मनोविकार संरक्षण यंत्रणा (मानसिक नकार, भ्रामक प्रक्षेपण)

स्तर II - अपरिपक्व संरक्षण यंत्रणा (कल्पना, प्रक्षेपण, निष्क्रिय आक्रमकता, अभिनय)

स्तर III – विक्षिप्त संरक्षण यंत्रणा (समर्थन, प्रतिक्रिया निर्मिती, पृथक्करण, विस्थापन, दमन)

स्तर IV – परिपक्व संरक्षण यंत्रणा (विनोद, उदात्तीकरण, परोपकार, अपेक्षा)


(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)

संदर्भ

American Psychological Association (2020). Publication manual of the American Psychological Association (7th ed.). Washington, DC: Author.

Freud, Anna (1937). The Ego and the Mechanisms of Defense. London: Hogarth Press.

Vaillant, G. E. (1977). Adaptation to Life. Boston: Little Brown.

Vaillant, G. E. (2002). Adaptation to life. American Psychological Association.

1 टिप्पणी:

  1. खूपच अभ्यासपूर्ण लेख, दैनंदिन जीवनात अशा खूप संरक्षण यंत्रणा अगदी सहज वापरल्या जातात. पण त्यांची सवय होणे चांगले नाही आपण अतिशय सोप्या आणि मार्मिक शब्दात विश्लेषण केलेले आहे धन्यवाद

    उत्तर द्याहटवा

Thank you for your comments and suggestions

मानसिक आरोग्य सेवा कायदा (MHCA, 2017)

  मानसिक आरोग्य सेवा कायदा ( MHCA, 2017) समुपदेशक (तथाकथित) : नमस्कार मला आपला फोन नंबर आपल्या मुलाच्या शाळेतून मिळाला. मी या क्षेत्रातील...