शुक्रवार, २ फेब्रुवारी, २०२४

आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता

 

आर्टिफिशियल इंटेलिजेंस म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता | Artificial Intelligence  

मानवी मेंदू हे एक अतिशय गुंतागुंतीचे अद्भुत रसायन आहे. अनेक भावभावनांचं, स्वप्नांचं, विचारांचं, विश्लेषणात्मक बुद्धीचं, सापेक्ष अनुभवांचं आणि या अनुभवांचे साहचर्य प्रस्थापित करणारे अद्भुत केंद्रस्थान म्हणजे मेंदू होय. मेंदूचे एक महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे बुद्धिमत्ता. ‘बुद्धिमत्ता’ हा एकमेव असा शब्द आहे की जो मानवाला अन्य सजीवांपासून वेगळा बनवितो. आजपर्यंत  मानवाला बुद्धिमत्ता, बौद्धिक क्षमता, अंदाज बांधण्याची क्षमता, तर्कशक्ती आणि विश्‍लेषणाच्या ताकदीवरच जग जिंकणं शक्‍य झालं आहे. 21 व्या शतकातील पहिले 20 वर्षे संपतात तोवर मानवनिर्मित म्हणजे ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ असलेले संगणक आणि यंत्रमानव मानवाशीच स्पर्धा करू लागले आहेत. ही ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’ विकसित केल्याने मानवजातीचा अंत होण्याची भीती जगप्रसिद्ध भौतिकशास्त्रज्ञ स्टीफन हॉकिंग आणि ‘मायक्रोसॉफ्ट’चे संस्थापक बिल गेट्स यांनी व्यक्त केली आहे. ‘कृत्रिम बुद्धिमत्ते’ ची हि दुनिया रहस्यमयी आहे, अद्भुत आहे; तशीच ती भीतीदायक देखील आहे. वाढतं तंत्रज्ञान थेट मानवी जीवनात हस्तक्षेप करू लागल्याने मानवी जीवनात अनेक आव्हाने उभी ठाकलेली आहेत.

कृत्रिम बुद्धीमत्तेचा इतिहास  

मानवी बुद्धिमत्तेसारखे शिकण्याची क्षमता मशीन्समध्ये आणि त्या मशीनमधल्या सॉफ्टवेअर प्रोग्रॅम्समध्ये तयार करण्यासाठी वापरले जाणारे तंत्रज्ञान हे आर्टिफिशिअल इंटेलिजन्स म्हणजेच ‘कृत्रिम बुद्धिमत्ता’  माणसाच्या अचाट कल्पनाशक्तीचे आणि सातत्यपूर्ण प्रयोगशीलतेचे फलित आहे. 1943 मध्ये मॅकलॉक आणि पिट्‌स या संशोधकांनी मेंदूसारखे शिकणाऱ्या मेंदू-आधारित  तंत्रज्ञानाची संकल्पना प्रस्तुत केली. आयझॅक आसिमोव्ह यांनी 1950 मध्ये ‘आय रोबोट’ कादंबरीत रोबोटिक तंत्रज्ञानाचा वेध घेतला होता. त्याच वेळी एलन टुरिंग या संशोधकानं आपल्या ‘कॉम्प्युटिंग मशिनरी अँड इंटेलिजन्स’ या पहिल्या शोध निबंधामध्ये यंत्राची बौद्धिक कुवत आजमावून पाहणाऱ्या ‘टुरिंग टेस्ट’ची संकल्पना मांडलेली आढळते. जॉन मॅकार्थी यांनी 1955 मध्ये ‘आर्टिफिशिअल इंटेलिजन्स’ ही संकल्पना सर्वप्रथम जगासमोर मांडली. बुद्धिमान यंत्रे बनविन्यासाठी विज्ञान-तंत्रज्ञान आणि अभियांत्रिकीचा वापर करणे, अशी या आर्टिफिशिअल इंटेलिजन्सची व्याख्या  केली होती. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासाला खऱ्या अर्थाने चालना मिळण्यासाठी 1956 पर्यंत थांबावं लागलं. जेफ्री हिंटन यांना आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे गॉड फादर म्हणून ओळखले जाते त्यांनी 1970 मध्ये केंब्रिजमधून प्रायोगिक मानसशास्त्रात बीएची पदवी प्राप्त केली. आणि 1978 मध्ये त्यांनी आर्टिफिशियल इंटेलिजन्स या विषयात पीएचडी पदवी घेतली. यानंतर जेफ्री हिंटन यांनी अनेक विद्यापीठांमध्ये काम केलेले आहे. नंतर ‘डार्टमाऊथ कॉन्फरन्स’मध्ये जगभरातील संशोधकांनी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासावर अधिक लक्ष केंद्रित करण्याचा संकल्प केला. ‘आयबीएम’ने तयार केलेल्या ‘डीप ब्ल्यू’ कॉम्प्युटरने 1996 मध्ये जागतिक कीर्तीचा बुद्धिबळपटू गॅरी कास्पारोव्हला पराभूत केल्यानंतर ‘कृत्रिम बुद्धिमत्ता‘ या तंत्रज्ञानामध्येही कामाचे असल्याचं दिसून आलं.

दैनंदिन जीवनात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर

कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर गूगल असिस्टंट, एप्पल सिरी, अमेझोन अलेक्सा, मायक्रोसॉफ्ट कर्टोना सारख्या व्हर्च्युअल असिस्टंटमध्ये केला जातो. नैसर्गिक भाषा प्रक्रियेद्वारे सदर मशीन मानवी भाषा समजतात आणि त्यानुसार उत्तरे देतात. विशिष्ट कामासाठी तयार करण्यात आलेली काही यंत्रे, सभोवतालच्या परिस्थीतीचा अंदाज घेऊन त्या परिस्थितीशी जुळून घेतात आणि काम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी योग्य निर्णय घेऊन कृती करतात. विशिष्ट कामासाठी तयार केलेल्या अशा यंत्रांमध्ये निर्माण होणाऱ्या प्रश्नांसाठीची संभाव्य उत्तरे, त्याची कारणे, आवश्यक माहिती, संवादप्रक्रिया, विशिष्ट परिणाम, नियोजन,आणि नियंत्रण करण्याची क्षमता अशा प्रकारच्या विविध घटकांवर आधारित कृत्रिम बुद्धिमत्ता असलेले तंत्रज्ञान विकसित केले जाते. माहितीच्या महाजालात अशा सॉफ्टवेअरला 'स्मार्ट डीसीजन सपोर्ट सिस्टीम' (SDSS) असे म्हणतात. आज रुग्णालयात, हवामान आणि अवकाशशास्त्र, कृषी, वाहन उद्योग, खाद्यपदार्थ प्रक्रिया, वीजनिर्मिती, दळणवळण, हवाई वाहतूक, बंदरामध्ये जहाजांची देखरेखीसाठी, खाणकामात, औषध निर्मिती आदी अनेक क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमतेच्या तंत्रज्ञानाचा उपयोग मोठ्या प्रमाणात होत आहे.

कृत्रिम बुद्धिमत्तेचे भविष्य

कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात संशोधन करणाऱ्या संशोधकांमध्ये दोन मतप्रवाह आहेत. मेंदू हे दुसरे-तिसरे काही नसून, एक जैविक यंत्रच आहे असे एक प्रवाह आहे. यंत्राला जशा मर्यादा असतात अगदी तशाच मर्यादा मानवास नैसर्गिक उत्क्रांतीत देखील आहेत. मात्र, स्वतःचा विकास स्वतःच करावा असे प्रशिक्षण दिलेली यंत्रे मानवजातीस भविष्यात कायमची नष्ट करू शकतील किंवा गुलाम बनवतील, असा धोका व्यक्त केला जातो. तर दुसऱ्या मतप्रवाहानुसार मेंदूला यंत्र म्हणू शकत नाही, ती एक गुंतागुंतीची जैविक प्रक्रिया आहे. त्यामुळे यंत्रांपासून घाबरण्याचे कुठलेही कारण नाही. या दोन्ही प्रवाहांमध्ये मतभिन्नता असली तरी मेंदूकडून खूप काही शिकण्यासारखे आहे, हे दोन्हीही मतप्रवाह मान्य करतात. कृत्रिम बुद्धिमतेच्या प्रवासात स्वतःहून शिकू शकणारे संगणक बनविण्याचा प्रयत्न आज संशोधक करीत आहेत.

ऍपल, गुगल, फेसबुक आदी अनेक बड्या-बड्या कंपन्या कृत्रिम बुद्धिमतेच्या संशोधनासाठी भरभक्कम आर्थिक गुतंवणूक करीत आहेत. कृत्रिम बुद्धिमतेच्या तंत्रज्ञानात प्रोग्रामिंगसाठी ‘ओपन सोर्सकोड’चे खुलेआम आदान-प्रदान केले जाते आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेचे लाभ सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहचविण्यासाठी ‘ओपनएआय’ ही संस्था कटिबद्ध आहे. शिवाय ‘ओपनएआय’ या नावाने एक नवा ‘प्लॅटफॉर्म’ जगभरातील संशोधकांना दिला आहे. भविष्यकाळात कृत्रिम बौद्धिकतेने माणसापेक्षा अधिक बुद्धिमान यंत्रे निर्माण झाली तरी ती माणसाची जागा कधीच घेऊ शकणार नाहीत असे मानणारा शास्त्रज्ञांचा मोठा गट आहे. तर्कावर काम करणारे संगणक एक वेळ आल्यानंतर अडखळतात-थांबतात; पण मेंदूचे असे होत नाही. कारण मेंदू तर्काचा ज्या पद्धतीने वापर करतो, त्याप्रमाणे सृजनशीलतेचा ही करतो. संशोधन प्रक्रिया अशा पद्धतीचे मेंदू-आधारित तंत्रज्ञान बनवायचा प्रयत्न करीत आहेत, यांत्रिक पद्धतीने असे करणे सध्या तरी शक्य झालेले नाही. मात्र भविष्यात हे शक्य होणारच नाही असे ठामपणे सांगणे अशक्य आहे आणि हाच खरा मानवजातीसाठी धोका आहे, असा नवावाद या कृत्रिम बुद्धिमतेच्या तंत्रज्ञानाने निर्माण केला आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेतून तयार झालेली यंत्रे उद्या स्वतःचे असे वेगळे मत देऊ लागले आणि मानवी जीवनात हस्तक्षेप करू लागली तर माणसांनी काय करायचे? हादेखील यक्षप्रश्न निर्माण होऊ शकतो.

कृत्रिम बुद्धिमत्तेची वैशिष्ट्ये

  1.  मानवी उणीवा आणि चुका दूर करून उत्पादकता वाढविते
  2.  निष्पक्ष निर्णय घेण्याची क्षमता
  3.  कोणत्याही व्यत्ययाशिवाय 24×7 कार्य करण्यास सक्षम
  4.  अचूक आणि जलदपणे कार्य करण्याची क्षमता
  5.  धोकादायक आणि प्रतिकूल परिस्थितीत काम करण्याची क्षमता
  6.  कंटाळा न करता पुनरावृत्ती कार्ये करण्यास सक्षम

कृत्रिम बुद्धिमत्तेचे विविध क्षेत्रातील योगदान

1.   AI आरोग्य आणि वैद्यकीय क्षेत्रात अतुलनीय भूमिका बजावत आहे. कॅन्सरची अचूक ओळख, घातक रक्त रोगांचे निदान, दुर्मिळ आजारांवर उपचार, आभासी आरोग्य सहाय्यक, वैद्यकीय नोंदींचे व्यवस्थापन आणि नवीन औषधांची निर्मिती यासारख्या कामांमध्ये AI महत्त्वपूर्ण योगदान देत आहे.

2.   बुद्धिबळ, लुडो, पोकर यांसारख्या खेळांमध्ये मानवी खेळाडू विरुद्ध खेळण्यासाठी AI चा वापर केला जातो. अगदी आयबीएमने बनवलेल्या डीप ब्लू नावाच्या संगणकाने 1996 मध्ये तत्कालीन विश्वविजेत्या गॅरी कास्पारोव्हचा पराभव केला होता.

3.   AI चा वापर गूगल असिस्टंट, व्हर्च्युअल असिस्टंटमध्ये केला जातो. नैसर्गिक भाषा प्रक्रियेद्वारे, मशीन मानवी भाषा समजून घेते आणि उत्तरे देते.

4.   ऑटोमॅटिक चॅटबॉट, अल्गोरिदम ट्रेडिंगद्वारे AI आर्थिक क्षेत्रात मदत करत आहे.

5.   AI2 आणि AEGbot सारख्या AI चा वापर डेटा सुरक्षित करण्यासाठी आणि सायबर हल्ले टाळण्यासाठी केला जात आहे.

6.   रोबोटिक तंत्रज्ञान पूर्णपणे AI वर अवलंबून आहे. त्याच्या मदतीने एरिका आणि सोफिया हे आजपर्यंतचे सर्वात बुद्धिमान रोबोट तयार झाले आहेत जे माणसांसारखे बोलू शकतात आणि वर्तन करू शकतात.

7.   ईकॉमर्स क्षेत्रात AI चा मोठ्या प्रमाणावर वापर केला जात आहे amazon, Flipkart इत्यादी.

8.   लष्करी आणि सुरक्षेच्या क्षेत्रात, गंभीर परिस्थितीत (जसे की बॉम्ब निकामी करणे) मानवी जीवितहानी टाळण्यासाठी सैन्यात रोबोटच्या स्वरूपात वापर केला जात आहे.

कृत्रिम बुद्धिमत्ता वापरून फेसबुकचे मुख्य कार्यकारी अधिकारी मार्क झुकेरबर्ग यांनी स्वत:च्या घरातील दैनंदिन कामे पार पाडण्यासाठी ‘जार्विस’ नावाचा कृत्रिम सहायक तयार केला आहे. ‘जार्विस’च्या निर्मितीसाठी मार्क गेल्या वर्षापासून स्वत: संगणकीय प्रणालीचे (कोडिंग) काम करीत होते. त्यापैकी काही यशस्वी प्रयोगांबद्दल त्यांनी ‘फेसबुक’च्या वॉलवरून माहिती दिली आहे. मार्क झुकेरबर्गच्या घरातील घराचा दरवाजा पासून बाथरूम पर्यंत, अंगण, दिवाणखाणा, शयनकक्ष, स्वयंपाकघर आदी ठिकाणी ‘जार्विस’चे अस्तित्व आहे. मात्र, अजूनही जार्विस या सहायकात काही त्रुटी आहेत आणि झुकेरबर्ग त्यावर काम करत आहेत. AI मध्ये मानवी बुद्धिमत्तेच्या पलीकडे जाण्याची पूर्ण क्षमता आहे आणि ते कोणतेही विशिष्ट कार्य अचूक आणि कार्यक्षमतेने करू शकते यात तिळमात्र शंका नाही. तथापि, कोणत्याही गोष्टीवर अवलंबून राहणे चांगले नाही आणि कोणतीही गोष्ट मानवी मेंदूशी पूर्णपणे समान असू शकत नाही. कारण मानवी मेंदूची उकल केवळ 10% झालेली आहे. अभी दिल्ली बहुत दूर है| असेच म्हणावे लागेल.

 

(सर्व चित्रे, इमेजेस google वरून साभार)

संदर्भ

गोडबोले, अ. (2021). आर्टिफिशियल इंटेलिजेंस, पुणे: मधुश्री प्रकाशन

जालान, अ. (2023). आर्टिफिशियल इंटेलिजन्स: तंत्रज्ञान लिहित असलेली मानव जातीच्या भविष्याची साहसकथा, साकेत प्रकाशन (अनुवाद सुश्रुत कुलकर्णी)   

शिकारपूर, दि. (2023). आर्टिफिशियल इंटेलिजन्स, दिलीपराज पब्लिकेशन्स

Russell, S. and Norvig, P. (2022). Artificial Intelligence: A Modern Approach, Pearson Education; 4th edition

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments and suggestions

योगा थेरपी आणि मनोसामाजिक आरोग्य| Yoga Therapy and Psychosocial health

  योगा थेरपी आणि मनोसामाजिक आरोग्य आंतरराष्ट्रीय योग दिवस दरवर्षी 21 जून रोजी साजरा केला जातो. हा दिवस जगभरातील लोकांना योगाचे फायदे जाणू...