मंगळवार, २९ ऑक्टोबर, २०२४

मानसिक आरोग्य सेवा कायदा (MHCA, 2017)

 मानसिक आरोग्य सेवा कायदा (MHCA, 2017)

समुपदेशक (तथाकथित): नमस्कार मला आपला फोन नंबर आपल्या मुलाच्या शाळेतून मिळाला. मी या क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ आहे आणि तुमचं आयुष्य बदलून टाकणारे मार्गदर्शन देऊ शकतो. पण त्यासाठी तुम्हाला माझ्या खास योजनांमध्ये नोंदणी करावी लागेल.

ग्राहक: काय योजना आहेत? त्याची माहिती द्याल का?

समुपदेशक (तथाकथित): आमच्याकडे अनेक पॅकेजेस आहेत - बेसिक, प्रीमियम, आणि अल्टिमेट. बेसिक पॅकेज फक्त काही मार्गदर्शनासाठी आहे, तर प्रीमियम आणि अल्टिमेट पॅकेजेसमध्ये तुम्हाला विशेष उपचार मिळतील. अल्टिमेट पॅकेजसाठी मात्र एकदा १०,००० रुपये भरावे लागतील.

ग्राहक: पण, काय तुम्ही प्रमाणित समुपदेशक आहात?

समुपदेशक (तथाकथित): अहो, मी अनुभवाने प्रमाणित आहे. मुळात तुमच्या समस्या सोडवण्यासाठी कितीही कोणतेही प्रमाणपत्रे लागत नाहीत, अनुभव लागतो! शिवाय, माझा दावा आहे की, फक्त एक-दोन सत्रांतच तुमच्या सर्व समस्या दूर होतील.

ग्राहक: फाम करा, तुमच्याकडे समुपदेशनाची कोणती डिग्री आहेत?

समुपदेशक (तथाकथित): अहो, आमची मुंबईला संस्था आहे. शालेय मार्गदर्शन आणि मानसिक  समस्या सोडवण्यासाठी आम्हाला एका आठवड्याचे प्रशिक्षण दिले जाते, गेली दीड वर्षे या क्षेत्रातील अनुभव आहे. आमची डिग्री म्हणजे MBA झालेले आहे (मला आलेला DMIT बाबतचा अनुभव, असे काही महाभाग आहेत ज्याच्याकडे इंजिनियरिंगची डिग्री होती).

ग्राहक: पण, मला थोडं समुपदेशनाचा अनुभव घेऊन मगच पॅकेज घ्यायचं आहे.

समुपदेशक (तथाकथित): वेळ आणि पैसे वाया घालवू नका (खरं बोलत होते). माझ्याकडे येणारे सगळे लोक एकाच सत्रात समाधानी होतात. तुमचं आयुष्य बदलायचं आहे ना? मग तुमच्या भविष्याचा विचार करूनच अल्टिमेट पॅकेज घ्या.

ग्राहक: मला थोडा विचार करायला वेळ मिळेल का?

समुपदेशक (तथाकथित): वेळ वाया घालवू नका. तुमचं आयुष्य बदलायचं असेल तर आत्ताच निर्णय घ्या. वेळ गेल्यावर तुम्हाला ही खास ऑफर मिळणार नाही.

या संभाषणात, स्वतःला तथाकथित समुपदेशक समजणारा हा समस्येचा गाभा न समजून घेता फक्त पॅकेजेस विकण्यावर भर देतो आणि तातडीने पैसे भरण्याचा आग्रह करतो. अस्सल समुपदेशकाला व्यक्तीच्या भावनिक आणि मानसिक गरजा लक्षात घेऊन परानुभूतीने (सहानुभूती नव्हे) मार्गदर्शन करणे महत्वाचे असते, मात्र फ्रॉड समुपदेशक अशा मूल्यांवर काम करत नाही, त्यामुळे असे संवाद हा धोका ओळखण्यास मदत करू शकतात.

DMIT आणि समुपदेशन

असाच अनुभव DMIT परीक्षण करून देण्याबाबत आला होता. इंडियन सायकियाट्रिक सोसायटी (IPS) ही भारतातील मानसोपचारतज्ज्ञ आणि मानसिक आरोग्य व्यावसायिकांची सर्वात मोठी प्रतिनिधी संस्था आहे आणि ती डर्माटोग्लिफिक्स मल्टिपल इंटेलिजेंस टेस्ट (DMIT) चा निषेध करते. (यात हाताचे ठसे घेऊन 60 आणि 70 पानाचे अहवाल देतात ज्यात, अध्ययन शैली, बोधनिक शैली आणि बहुविध बुद्धिमत्ता शोधली जाते, अशा चुकीच्या पद्धतीने गंडवतात.)    इंडियन सायकियाट्रिक सोसायटी म्हणते की DMIT ही वैज्ञानिक पुराव्यावर आधारित नाही. तसेच ती बुद्धिमत्ता चाचणी, ब्रेन लोब फंक्शन चाचणी आणि भविष्यातील वर्तनाचा अंदाज लावण्यासाठी उपयुक्त नाही. त्यामुळे IPS पालकांना आणि शाळांना अशा चुकीच्या प्रथांपासून दूर राहण्याचे आवाहन करते. अशा आशयाचे पत्र त्यांनी प्रकाशित केलेले आहे.

आज मानसशास्त्रीय परीक्षण क्षेत्रात प्रमाणित आणि मानदंड आधारित मानसशास्त्रीय चाचण्या उपलब्ध असताना अशा फ्रॉड आणि कालबाह्य सुडो सायकोलॉजी (खोट्या, पक्षपाती किंवा अवैज्ञानिक पद्धतींचा वापर करून मनाचा किंवा वर्तनाचा अभ्यास) वर आधारित चाचण्या पासून सावधान.    

समुपदेशन: समज आणि गैरसमज

"समुपदेशन" हा शब्द मानसिक आरोग्य, व्यक्तिगत विकास, आणि मानसिक, भावनिक समस्येत मदतीसाठी वापरली जाणारी एक महत्त्वपूर्ण संकल्पना आहे. पण आजच्या काळात हा शब्द काही ठिकाणी गैरसमज व गैरवापरामुळे बदनाम होऊ लागला आहे. यामागे काही ठराविक लोक आणि व्यवसाय आहेत, जे समुपदेशनाची संकल्पना विक्रय साधन म्हणून वापरून ग्राहकांना गोंधळात टाकत आहेत. योग्य मार्गदर्शनाऐवजी केवळ आर्थिक फायदा मिळविणे हा त्यांचा उद्देश असतो, ज्यामुळे वास्तविक समुपदेशन प्रक्रिया बदनाम होते.

पहिल्यांदा, सोशल मीडियावर अनेक लोक आणि 'लाइफ कोचेस' असे दावा करतात की, त्यांच्याकडे सर्व समस्यांचे खात्रीशीर समाधान आहे. हे लोक, जे स्वत:ला समुपदेशक म्हणवून घेतात, कोणतेही अधिकृत प्रशिक्षण, अनुभव किंवा प्रमाणपत्र नसतानाही समुपदेशनाची सेवा देतात. या लोकांच्या सेवा भरमसाठ किंमतीत असतात, परंतु यात मानसशास्त्रीय, अस्सल अनुभवाची किंवा शास्त्रीय दृष्टिकोनाची कमतरता असते. परिणामी, लोकांचा या सेवेवरील विश्वास कमी होतो, कारण त्यांना आवश्यक ती वास्तविक मदत मिळत नाही.

दुसरं म्हणजे, अनेक व्यवसाय समुपदेशनाचे नाव वापरून केवळ स्वत:चे उत्पादन किंवा सेवा विकण्याचा प्रयत्न करतात. उदाहरणार्थ, इन्शुरन्स एजंट, काही वजन कमी करणाऱ्या कंपन्या किंवा व्यक्तिमत्व विकासाचे प्रशिक्षण देणाऱ्या संस्था, त्यांच्या उत्पादनांची विक्री करण्यासाठी समुपदेशनाचे नाव वापरतात. मात्र, त्यांचे उद्दिष्ट फक्त विक्री असते, समुपदेशनाचे योग्य तत्त्वज्ञान नाही. ग्राहकांच्या वास्तव समस्या समजून घेण्याऐवजी, त्यांना विशिष्ट पद्धतींमध्ये फिट होण्यासाठी प्रेरित केले जाते, ज्यामुळे मानसिक आरोग्याच्या क्षेत्रातील विश्वासार्हता कमी होते.

तसेच, काही ऑनलाइन प्लॅटफॉर्म्स देखील समुपदेशनाची संकल्पना वापरून पैसा मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. या प्लॅटफॉर्म्सवर स्वस्त दरात समुपदेशनाची सेवा दिली जाते, परंतु अशा सेवा देणाऱ्यांकडे कधीही व्यावसायिक अनुभव किंवा उचित प्रशिक्षण नसते. असे सत्र घेणारे ग्राहक नेहमीच समाधानकारक परिणाम अनुभवत नाहीत, ज्यामुळे त्यांच्या दृष्टीने समुपदेशनाच्या सेवेबद्दल नकारात्मक भावना निर्माण होते.

हे सगळे परिणाम समुपदेशनाची प्रतिमा खराब करतात. त्यामुळे, लोक समुपदेशनाकडे एका फसवेगिरीचा धंदा म्हणून पाहू लागले आहेत, जे खरं तर पूर्णपणे चुकीचे आहे. खरं समुपदेशन ही एक शास्त्रशुद्ध आणि अनुभवावर आधारित प्रक्रिया आहे, जी व्यक्तींना त्यांचे प्रश्न, समस्या आणि आव्हान समजून घेण्यात मदत करते आणि ती सोडण्यास सक्षम बनविते.

त्यासाठी आवश्यक आहे की, लोकांनी समुपदेशन आणि त्याच्याशी संबंधित व्यावसायिक क्षेत्राबद्दल योग्य माहिती मिळवावी आणि प्रशिक्षित, प्रमाणित समुपदेशकांची निवड करावी. त्याचप्रमाणे सरकारने आणि संबंधित संस्था या क्षेत्रासाठी कठोर नियमावली ठरवावी आणि व्यावसायिक पद्धतींसाठी आवश्यक असे निकष आखावेत अशी वारंवारची मागणी आणि गरज लक्षात घेऊन भारतीय मानसिक आरोग्य सेवा कायदा (The Mental Health Care Act) ७ एप्रिल २०१७ रोजी लोकसभेत बहुमताने संमत करण्यात आला आणि २९ मे २०१८ पासून या कायद्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी सुरु झाली.

मानसिक आरोग्य सेवा कायदा (MHCA, 2017)

भारतीय मानसिक आरोग्य सेवा कायदा (MHCA, 2017) हा कायदा मानसिक आरोग्यसेवा पुरवणाऱ्या व्यावसायिकांसाठी स्पष्ट मार्गदर्शक नियम आणि रूग्णांसाठी हक्क सुनिश्चित करतो. तसेच मानसिक आरोग्याच्या समस्यांबाबतच्या गैरसमजूतींतून मुक्तता देण्यासाठी उचलले गेलेले एक महत्वाचे पाउल असल्याचे सांगतिले जात आहे.

1. समुपदेशनाची व्याख्या:

मानसिक आरोग्य कायद्यात समुपदेशन म्हणजे मानसिक आरोग्य समस्यांचे निराकरण करण्यासाठी केलेले मार्गदर्शन, भावनिक मदत, आणि सहानुभूतीपूर्वक संवाद असे व्यापक स्वरूपाने समजावले आहे. यात केवळ तांत्रिक किंवा औषधोपचार नव्हे, तर व्यक्तीच्या मानसिक, भावनिक आणि सामाजिक परिस्थितीचे समर्थन, त्यांना त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यास मदत करणे आणि योग्य निर्णय घेण्यास सहकार्य करणे समाविष्ट आहे.

2. समुपदेशकाची पात्रता: मानसिक आरोग्य कायदा, २०१७ नुसार, मानसिक आरोग्य सेवा पुरवणाऱ्या समुपदेशकांसाठी काही पात्रता निकष आवश्यक आहेत:

  • मान्यताप्राप्त शिक्षण: समुपदेशकाकडे संबंधित क्षेत्रात आवश्यक शिक्षण असणे आवश्यक आहे, ज्यामध्ये मानसशास्त्र, सामाजिक कार्य, किंवा समुपदेशनातील पदवी/पदविका असावी.
  • प्रमाणन: समुपदेशकाने सरकार किंवा मान्यताप्राप्त संस्थेकडून प्रमाणित प्रशिक्षण घेतलेले असावे आणि आवश्यक प्रमाणपत्रे बाळगला हवीत.
  • व्यवसायिक कौशल्य: समुपदेशकांकडे भावनिक समस्या समजून घेण्याचे आणि रुग्णाला उचित मार्गदर्शन देण्याचे व्यावसायिक कौशल्य असावेत.

3. समुपदेशकाच्या जबाबदाऱ्या: मानसिक आरोग्य कायदा, २०१७ नुसार समुपदेशकाच्या जबाबदाऱ्या पुढीलप्रमाणे आहेत:

  • समुपदेशकाने रुग्णांच्या वैयक्तिक माहितीची गोपनीयता राखणे आवश्यक आहे.
  • समुपदेशकाने रुग्णांना त्यांच्या उपचार, पद्धती, आणि सेवा प्रक्रियेची योग्य माहिती द्यावी आणि त्यांचे स्वातंत्र्य आदरात राखले पाहिजे.
  • रुग्णाच्या मानसिक स्थितीचा विचार करून त्यांना सहानुभूतीपूर्वक मार्गदर्शन देणे, त्यांना स्वतंत्र विचार करण्यास प्रेरित करणे, आणि त्यांच्या निर्णयांचा आदर करणे आवश्यक आहे.
  • रुग्णांच्या प्रगतीची नोंद ठेवणे आणि योग्य सल्लामसलत प्रक्रिया वापरणे आवश्यक आहे.

4. फसवणूकीबाबत कारवाई: फ्रॉड समुपदेशन आणि गैरप्रकारांवर मानसिक आरोग्य सेवा कायद्यात काही प्रावधानं आहेत:

  • अप्रशिक्षित आणि अयोग्य समुपदेशकांवर कारवाई: जर कोणी प्रशिक्षित नसताना किंवा अयोग्य प्रमाणन असतानाही समुपदेशनाची सेवा पुरवत असेल, तर त्यावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
  • भ्रामक माहिती: जर कोणताही समुपदेशक, व्यक्तीला भ्रामक किंवा असत्य माहिती देऊन समुपदेशनाची सेवा पुरवत असेल आणि त्यातून आर्थिक लाभ मिळवत असेल, तर तो फसवणुकीचा भाग ठरतो.
  • रुग्णांच्या हक्कांचे उल्लंघन: रुग्णांच्या हक्कांचे उल्लंघन केल्यास किंवा त्यांना मानसिक, भावनिक किंवा आर्थिक नुकसान केल्यास संबंधित समुपदेशकावर कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते.
  • गैरव्यवसायिक आचरण: कायद्याचे उल्लंघन केल्यास संबंधित समुपदेशकाचा परवाना रद्द होऊ शकतो किंवा त्याच्यावर अन्य कडक कारवाई केली जाऊ शकते.

समारोप

    भारतीय मानसिक आरोग्य कायदा, २०१७ समुपदेशकांच्या कार्यपद्धतीसाठी नीतिनियम ठरवतो आणि रुग्णांचे हक्क सुरक्षित करतो. यामुळे मानसिक आरोग्य सेवा अधिक संरक्षित, प्रभावी आणि पारदर्शक बनवण्यासाठी मदत होते, आणि फसवणूक किंवा गैरव्यवहार रोखण्यासाठी आवश्यक कायदेशीर तरतुदी दिलेल्या आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments and suggestions

मानसिक आरोग्य सेवा कायदा (MHCA, 2017)

  मानसिक आरोग्य सेवा कायदा ( MHCA, 2017) समुपदेशक (तथाकथित) : नमस्कार मला आपला फोन नंबर आपल्या मुलाच्या शाळेतून मिळाला. मी या क्षेत्रातील...