मंगळवार, २१ नोव्हेंबर, २०२३

कायझेन: एक छोटेसे पाऊल आयुष्य बदलू शकते

 

कायझेन: एक छोटेसे पाऊल आयुष्य बदलू शकते

आज चारचाकी वाहनांच्या बाजारात टोयोटा या कंपनीला तोड नाही. ही जपानी कंपनी वर्षांनुवर्षे आपल्या उत्पादनांमुळे व विक्रीनंतरची सेवा यासाठी वाखाणली जाते. आपल्या उत्पादनांची गुणवत्ता टिकवून ठेवण्यासाठी यांनी कायझेन नावाचे तंत्र यशस्वीपणे राबविले आहे. कायझेन हा मुळत: जपानी शब्द आहे. म्हणजेच, जपानी व्यवसाय तत्त्वज्ञानातून कैझेन तत्त्वाचा उदय झाला. कायझेन शब्दाला विभाजित केल्यास दोन शब्द मिळतात. KAI शब्दाचा अर्थ ‘विकास’ आणि ZEN शब्दाचा अर्थ ‘चांगल्यासाठी’ असा होतो. Kaizen या शब्दाचा अर्थ सामान्यतः सतत सुधारणा असा होतो. तसेच KAI आणि ZEN हे दोन शब्द छोटे छोटे चांगले बदल या भावनेशी निगडित आहेत. छोटय़ा-छोटय़ा गोष्टींद्वारे मोठमोठी ध्येये गाठता येतात, हा कायझेन विचारसरणीचा मूलभूत पाया आहे. Kaizen ही जपानी संज्ञा दुसऱ्या महायुद्धानंतर प्रथम जपानमधील व्यवसाय सुधारण्यासाठी लागू करण्यात आली होती, तेव्हापासून कायझेन हे तंत्र जगातील सर्व व्यवसायांमध्ये सतत सुधारणा करण्यासाठी समाविष्ट आहे.

      कायझेन तंत्राची सुरुवात दुसऱ्या महायुद्धानंतरच्या काळात जेव्हा आर्थिक सुधारणांनी जपानचा ताबा घेतला तेंव्हा मिळू शकतात. टोयोटा मोटर कॉर्पोरेशनने मे 1951 मध्ये क्रिएटिव्ह आयडिया सजेशन सिस्टीम लागू केल्यापासून, बदल आणि नव-नवीन कल्पनांमुळे टोयोटा कंपनीची उच्च उत्पादन गुणवत्ता आणि कामगारांची उत्पादकता वाढली. अलिकडे amazon ही कंपनी देखील याच तंत्राचा वापर करून ऑनलाईन मार्केटिंगमधील आपले अढळ स्थान निर्माण केलेले पाहायला मिळते.

मासाकी इमाई यांना काइझेनचे जनक म्हणून ओळखले जाते. यांनी जागतिक स्तरावर 1986 मध्ये पद्धतशीर व्यवस्थापन पद्धती म्हणून काइझेनची ओळख करून दिली (Kaizen: The Key to Japan’s Competitive Success). आज, विविध उद्योगांमधील संस्था त्यांच्या मूळ मूल्यांचा एक भाग म्हणून काइझेनचा अवलंब करतात आणि सिक्स सिग्मा (DMAIC – Define, Measure, Analyse, Improvement, Control  आणि DMADV – Design, Validate) आणि लीन (3M शी निगडीत) संकल्पनांबरोबर रोजच्या रोज सतत सुधारणा करण्याचा सराव करतात. हे SWOT आणि SOAR यासारख्या इतर विश्लेषणात्मक फ्रेमवर्कसह देखील वापरले जाऊ शकते. कायझेन हा प्रकार चार वेगवेगळ्या प्रकाराने उपयोगात आणता येतो. पहिल्या प्रकारात 3M  चे तत्त्व अंगीकारण्यात येते. दुसऱ्या प्रकारात 5S  चे तत्त्व तर तिसऱ्यामध्ये 5W  चे तत्त्व वापरण्यात येते. शेवटच्या प्रकारात “Small’’ या शब्दाभोवती कायझेनची विचारसरणी फिरत राहाते.

3M (MUDA, MURI, and MURA)

जापनीज भाषेत MUDA, MURI MURA या शब्दांना खूप महत्त्व आहे. MUDA चा अर्थ एखाद्या प्रक्रियेत येणारे अडथळे किंवा अनावश्यक गोष्टी; MURI म्हणजे अतिभार, एखाद्याच्या सामर्थ्यापलीकडे, अतिरेक, किंवा अशक्य प्राय. MURA चा अर्थ एखाद्या प्रक्रियेतील अनिश्चितता/चढउतार. कायझेन टीम या तीनही M ना किमान पातळीवर ठेवण्यासाठी कार्यरत असते. उदा. उत्पादन करताना कमीतकमी वेस्ट मटेरिअल (कचरा वा अनावश्यक गोष्टी) निर्माण होतील यासाठी कायझेन टीम तोडगा शोधते किंवा कामाच्या ठिकाणी असे वातावरण/तंत्रज्ञान निर्माण होईल की ज्यायोगे उत्पादनप्रक्रियेतील जोखीम कमी होऊन, कर्मचाऱ्यांचे मानसिक व शारीरिक स्वास्थ्य जपले जाईल याकडेही कायझेन टीम लक्ष पुरवते. नेहमी एकाच गुणवत्तेचे उत्पादन व्हावे व गुणवत्तेमध्ये नकोसे असलेले चढउतार टाळले जातील यावरही कायझेन टीम मार्ग शोधते.

5S  (Seiri, Seiton, Seiso, Seiketsu and Shitsuke)

सेरी (Sorting): म्हणजे अनावश्यक वस्तू काढून टाकणे, साचू न देणे आणि अडथळा ठरणाऱ्या वस्तू काढून टाकणे.

सीटन (order): म्हणजे महत्त्वाच्या साधनांची वर्गवारी करणे.

सिसो (Clean up): म्हणजे स्वच्छ असणे, स्वच्छ ठिकाणी काम करणे जिथे कामगारांना सुरक्षित वाटते.

सीकेत्सु (standardization): काही चूक झाल्यास समस्येवर आगाऊ उपाय करणे.

सीत्सुके (Discipline): म्हणजे गुणवत्ता, सुधारणा आणि यश, सातत्य यासाठी सतत शोध.

कायझेन टीम या 5S  नुसार काम करते. उदा. कामाच्या ठिकाणी आवश्यक तसेच अनावश्यक गोष्टींचा पसारा असतो. तेव्हा सर्वप्रथम दोन्ही प्रकारच्या गोष्टी वेगवेगळ्या केल्या जातात आणि अनावश्यक गोष्टी कामाच्या ठिकाणाहून बाहेर जातात. यामुळे जरुरी असलेली गोष्ट कमीतकमी वेळात  शोधता येतात. त्यानंतर सर्व आवश्यक गोष्टी वेगवेगळ्या गटांत विभागल्या जातात जसे की स्क्रू, पान्हे एका ठिकाणी तर ग्रीस, ब्रश दुसऱ्या ठिकाणी यामुळे गोष्टींचा जमा-खर्च मांडणे सोपे होते, कोणती वस्तू कधी ऑर्डर करावी, हे पटकन कळते. कारण मोजदादही सोपी होते. कामाच्या ठिकाणी टापटीप, ताजेतवाने, आल्हाददायक, मोकळे वातारण असावे म्हणून पॅसेजमधील भंगारचे अडथळे दूर करणे, वातानुकूलित यंत्राचे फिल्टर साफ करून वातावरण आल्हाददायक करणे यासारखे साफसफाईचे कामदेखील वरचेवर कायझन टीम करते. दर्जा मानांकनाचे कामही ही टीम करते. उदा. एखादी उच्चगुणवत्तेची गोष्ट तयार करण्यासाठी कोणते कच्चे माल किती प्रमाणात एकत्र करावेत, प्रक्रियेदरम्यान तापमान किती ठेवावे हे सर्व काटेकोरपणे नमूद केल्यास प्रत्येक वेळी एकाच गुणवत्तेचा माल तयार होतो व दर्जामधील तफावत टाळली जाते. सर्वात शेवटी कामाच्या ठिकाणी शिस्त पाळणे यावरही कायझेन टीम काम करते, कारण शिस्त पाळली गेली तर पहिले चार S आपोआप पाळले जातात.

5W- (What, Why, When, Where and Who)

वरील पहिला W दोन प्रकारे वापरून कायझेन टीम विविध सुधारणा घडवून आणते. नक्की काय (What) प्रॉब्लेम आहे व नक्की काय (What) केले पाहिजे होते हे दोन प्रश्न विचारून टीम आपल्या विश्लेषणाची सुरुवात करते. मग जे काही चांगले वा वाईट झाले ते का (Why) झाले हे विचारून घटनाक्रम उलगडण्याचा प्रयत्न केला जातो. घटना कधी (When) घडली किंवा कधी घडायला पाहिजे होती हे विचारून कालमर्यादेबद्दल माहिती घेतली जाते. एखादी घटना कुठे (Where) घडायला हवी होती हे विचारून स्थळाचा पर्याय बरोबर आहे का हे तपासले जाते व सर्वात शेवटी मूळ योजनेनुसार कोणाला (Who) नेमके या सर्व प्रक्रियेसाठी नियुक्त करण्यात आले होते किंवा नेमके कोणाला त्या मूळ माणसाच्या जागी प्रत्यक्षात जबाबदारी देण्यात आली होती, हे विचारले जाते. यामुळे एखादी घटना योग्य वेळी, योग्य जागी, योग्य माणसाद्वारे न केली गेल्याने प्रॉब्लेम झाला का, हे सिद्ध केले जाते.

छोट्या छोट्या गोष्टीतून मोठी गोष्ट साध्य करणे

कायझेनचा अर्थच मुळी छोटे छोटे सतत होणारे बदल असा असल्याने बेबी स्टेपप्रमाणे, छोटय़ा छोटय़ा प्रयत्नांच्या आधारे सुधारणा केल्या जातात. त्यामुळे एकावेळी एकच छोटा प्रश्न हाती घेऊन, एकावेळी एकच विचारावर लक्ष केंद्रीत करणे, एका वेळी एकाच मुद्दय़ावर कृती करणे, एका वेळी एकाच किंवा छोटय़ा छोटय़ा अडचणींवर मार्ग काढणे, एखाद्या छोटय़ा यशाचा आनंदोत्सव साजरा करून पुढील आव्हानांसाठी मनोबल वाढवणे असे सर्व प्रकार कायझेन टीमद्वारे केले जातात. शेव्हार्ट चक्र किंवा डेमिंगच्या सिद्धांतानुसार कायझेनमध्ये plan-do-check- Action or Adjust  असे चक्र असते. थोडक्यात काय तर कायझेन एका कॅलिडोस्कोपसारखे असते. आपण ज्या दृष्टीकोनातून बघू, त्याप्रमाणे ते आपल्याला जाणवते.

कायझेन तंत्राचा वापर

कायझेन तंत्र सुरू करण्यापूर्वी, प्रथम कोणतेही एखादे ध्येय निश्चित करा. उदा: रोज व्यायाम करण्याची योजना. आता दररोज व्यायाम करण्याचा वेळ निश्चित करा आणि तो वेळ तुमच्या मोबाईलमध्ये अलार्म म्हणून सेट करा. आता अलार्म वाजल्याबरोबर सर्व काम सोडून रोज व्यायामाला सुरुवात करा. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे तुम्हाला केवळ एक मिनिट व्यायाम करायचा आहे. होय! केवळ एक मिनिट यापेक्षा जास्त नाही.

एका दिवसात 1440 मिनिटे असतात, तुम्हाला केवळ एक मिनिट काढायचा आहे. तुम्हाला वाटेल की फक्त एक मिनिट काही केल्याने काय फरक पडेल? सवय एका दिवसात तयार होत नाही किंवा ती एका दिवसात सोडली जात नाही. जेव्हा एखादी गोष्ट सवय बनते तेव्हा ती करण्याचा विचार करण्याची गरज नसते. कायझेन तंत्र वापरून 60 सेकंदांचा हा छोटासा वेळ आपले आयुष्य सहज बदलेल.

कायझेनचे फायदे

तंतोतंत आणि सतत कायझेन तंत्र वापरल्याने दोषमुक्त उत्पादन मिळेल. काइझेन तंत्र कर्मचाऱ्यांच्या कार्यक्षमतेवर सकारात्मक पद्धतीने खूप प्रभाव पाडते. सतत कायझेन तंत्र लागू केल्याने कर्मचार्‍यांचे कार्य समाधान वाढते. ग्राहकांचे अधिक चांगले समाधान मिळविण्यासाठी सतत कायझेन मदत करते. शेवटी कचरामुक्त उत्पादन मिळविण्यासाठी कायझेन मदत करते. कायझेनमध्ये असलेल्या परिस्थीतीत समाधानी न राहता त्यात सतत सुधारणा करण्याचा प्रयत्न केला जातो. कायझेन हे केवळ उत्पादन क्षेत्रातच सुधारणेसाठी नाही, तर ते जीवनाच्या प्रत्येक क्षेत्रातील सुधारणेसाठी वापरले जाऊ शकते. कायझेन ही सतत सर्वोत्तमाचा शोध घेणारी एक जीवनशैलीच आहे.

कायझेन वरील पुस्तके

मसाकी इमाई यांनी 1970 मध्ये Kaizen (Ky'zen), the key to Japan's competitive success नावाचे पुस्तक लिहिलेले आहे. व्यावसायिक व्यवस्थापक किंवा व्यवस्थापनाच्या विद्यार्थ्यासाठी, 16 कायझेन व्यवस्थापन पद्धतींचे एक व्यापक कृतीशील हँडबुक आहे. तसेच 1997 मध्ये Gemba Kaizen: A Commonsense, Low-Cost Approach to Management नावाचे पुस्तक लिहिलेले आहे.

रॉबर्ट मॉरर मसाकी इमाई यांनी 2004 मध्ये One Small Step Can Change Your Life: The Kaizen Way नावाचे पुस्तक लिहिलेले आहे. काइझेन म्हणजे छोट्या, स्थिर पावलांमधून महान आणि चिरस्थायी बदल घडवून आणण्याची कला. सदर छोटेखानी पुस्तक खुपच उपयोगी आणि प्रभावी आहे.

साराह हार्वे यांनी 2019 मध्ये Kaizen: The Japanese Method for Transforming Habits, One Small Step at a Time नावाचे पुस्तक लिहिलेले आहे. काइझेनच्या जादूचा अनुभव घेण्यासाठी  चिरस्थायी बदल घडवण्याचा जपानी मार्ग. या सुंदर छायाचित्रित मार्गदर्शकामध्ये जीवनशैलीतील बदल जबरदस्त असू शकतात. अलिकडे प्रकाशित झालेले पुस्तक खुपच चिंतनशील आणि योग्य मार्गदर्शक आहे.

 

(सर्व चित्र, इमेजेस google वरून साभार )

1 टिप्पणी:

Thank you for your comments and suggestions

मानसशास्त्रीय प्रयोग | Psychological Experiments

  मानसशास्त्रीय प्रयोग | Psychological Experiments मानवी वर्तन अभ्यासत असताना अनेक प्रसिद्ध प्रयोगांनी मानसशास्त्राच्या मूलभूत समजुतीवर प...