CBT मानसोपचार
पद्धती
बोधनिक वर्तन उपचार पद्धती, म्हणजेच Cognitive Behavioural Therapy (CBT), ही एक वैज्ञानिक पद्धतीने सिद्ध झालेली मानसोपचार पद्धत आहे. या थेरपीमध्ये व्यक्तीच्या
विचारसरणी (cognition) आणि वर्तन (behavior) यावर विशेष भर दिला जातो. CBT च्या मते, एखाद्या
व्यक्तीच्या भावना (emotions)
आणि कृती (actions) या थेट तिच्या विचारांवर (thoughts) अवलंबून असतात. म्हणजेच, व्यक्ती एखाद्या परिस्थितीकडे कशी पाहते, त्यावर तिच्या भावना आणि प्रतिसाद ठरतात (Beck, 1976).
उदाहरणार्थ, जर
एखादी व्यक्ती सतत स्वतःला "मी निकृष्ट आहे" किंवा "मी अपयशी
आहे" असे नकारात्मक विचार करत असेल, तर
ती व्यक्ती अवसादाच्या (depression)
किंवा चिंता विकारांच्या (anxiety disorders) विळख्यात अडकू शकते. अशा परिस्थितीत ती
समाजापासून दूर राहू लागते,
तिचा आत्मविश्वास कमी होतो आणि ती
अनेकदा चुकीच्या पद्धतीने समस्या हाताळते. त्यामुळे CBT मध्ये अशा नकारात्मक आणि अविवेकी विचारांची (irrational or distorted thoughts) ओळख करून त्यांचं विश्लेषण केलं जातं, आणि त्याऐवजी अधिक विवेकी, सकारात्मक विचार विकसित करण्यावर भर दिला जातो
(Beck, 1995; Dobson,
2010).
CBT हे "think- feel - act" या साखळीतून कार्य करते. या त्रिकोनामध्ये, व्यक्तीच्या विचारांचा तिच्या भावना आणि
कृतींवर थेट परिणाम होतो. जर विचार बदलता आले, तर
भावना आणि वर्तन आपोआप बदलतात. म्हणूनच, CBT मध्ये विचार पातळीवर काम करून मानसिक आरोग्यात सुधारणा साधली जाते.
ही थेरपी समस्या-केंद्रित (problem-focused) आणि
उपाय-आधारित (solution-oriented)
असल्याने ती अनेक मानसिक विकारांवर
प्रभावी ठरते (Hofmann et
al., 2012).
बोधनिक वर्तन उपचार पद्धती: उत्पत्ती व इतिहास
बोधनिक वर्तन उपचार पद्धती (CBT) ही 20व्या शतकाच्या मध्य ते उत्तरार्धात विकसित झालेली एक प्रभावी मानसोपचार पद्धत आहे. याचा उगम प्रामुख्याने 1960 ते 1970 च्या दशकात झाला आणि ही पद्धत आज जागतिक स्तरावर अत्यंत परिणामकारक थेरपी म्हणून ओळखली जाते. CBT हे Behavioural Therapy (वर्तन उपचार) आणि Cognitive Therapy (बौद्धिक उपचार) या दोन प्रमुख मानसशास्त्रीय प्रवाहांचा संगम आहे .
CBT च्या इतिहासाचा पहिला भाग Behaviourism या मानसशास्त्रीय दृष्टिकोनाशी संबंधित आहे.
20व्या शतकाच्या सुरुवातीला John B. Watson, Ivan Pavlov, आणि पुढे B.F.
Skinner यांनी
वर्तनात्मक मानसशास्त्र विकसित केलं. त्यांनी असे प्रतिपादन केले की मानवाचं वर्तन
हे शिकलेलं (learned) असतं आणि ते बाह्य उत्तेजनांमुळे बदलता
येऊ शकतं. Skinner च्या operant conditioning या सिद्धांतानुसार, बक्षिसे आणि शिक्षांद्वारे वर्तन बदलता येते (Skinner, 1953).
यानंतर Albert Bandura ने observational
learning (modelling) हा
सिद्धांत मांडला, ज्यात व्यक्ती इतरांच्या वर्तनाचे
अनुकरण करून नवीन वर्तन शिकते (Bandura, 1977).
या सर्व विचारधारांमुळे वर्तन सध्या काय आहे आणि ते बाह्य उपायांनी कसे सुधारता
येईल याकडे लक्ष देणारी उपचार पद्धती जन्माला आली.
Cognitive Therapy ची उगमकथा
1960 च्या दशकात Dr. Aaron T. Beck, एक मानसोपचारतज्ज्ञ आणि मनोविश्लेषण
पद्धतीतील अभ्यासक, यांनी अवसादग्रस्त रुग्णांवर उपचार करत
असताना एक महत्त्वाचा शोध लावला. त्यांना लक्षात आलं की या रुग्णांच्या नकारात्मक
भावनांचं मूळ त्यांच्या "स्वतःविषयी, जगाविषयी
आणि भविष्यातील अपेक्षांविषयी असलेल्या अपयशी विचारांमध्ये" आहे (Beck, 1967). Beck यांनी या विचारसरणीला "negative automatic thoughts" असे नाव दिलं आणि त्यावर आधारित Cognitive Therapy विकसित केली. यात विचारसरणीतील त्रुटी
शोधून त्यांना आव्हान देणे आणि सकारात्मक विचार पद्धती तयार करणे यावर भर दिला
जातो.
1970 च्या दशकात वर्तनात्मक (Behavioural) आणि बोधनिक (Cognitive) या दोन्ही स्वतंत्र प्रवाहांचे एकत्रीकरण झाले. यातून जन्म झाला Cognitive Behavioural Therapy (CBT) या नव्या संकल्पनेचा. CBT या पद्धतीत विचार, भावना, आणि
वर्तन यांचं परस्परसंबंध लक्षात घेऊन, वैचारिक
बदल (cognitive
restructuring) व वर्तन
बदल (behavior
modification) यांचा
एकत्रित वापर करून मानसिक आरोग्य सुधारण्याचा प्रयत्न केला जातो (Dobson & Dozois, 2001).
बोधनिक वर्तन उपचार (CBT) ही एक संरचित, लक्ष्य-केंद्रित आणि कालमर्यादित उपचार
पद्धत आहे, जी
रुग्णाच्या विचारसरणी आणि वर्तनामधील असमंजसता ओळखून त्यात बदल घडवण्यावर लक्ष
केंद्रित करते. ही पद्धत मुख्यतः मानसिक आरोग्याशी संबंधित समस्या, जसे की अवसाद, चिंता विकार, फोबिया, OCD, PTSD यांच्यावर वापरली जाते (Beck, 1979; Dobson & Dozois, 2010).
CBT ची संरचना
CBT ही उपचारांची एक पद्धतशीर, टप्प्याटप्प्याने रचना असलेली पद्धत
आहे. प्रत्येक सत्रात विशिष्ट उद्दिष्ट ठरवले जाते आणि थेरपिस्ट रुग्णाला विचार
आणि वर्तन यामधील संबंध समजावतो. सत्रांमध्ये विशिष्ट गोष्टी शिकवल्या जातात आणि 'होमवर्क' स्वरूपात त्याचा सराव दिला जातो (Beck, 2011). त्यामुळे रुग्ण थेरपीमध्ये
सक्रियपणे सहभागी राहतो आणि त्याचे आत्मनिरीक्षण वाढते.
1. लक्ष्य-केंद्रित (Goal-Oriented):
CBT ही समस्या-केंद्रित आणि
लक्ष्य-केंद्रित पद्धत आहे. थेरपीच्या सुरुवातीलाच, रुग्ण आणि थेरपिस्ट मिळून उपचाराचे विशिष्ट
उद्दिष्टे ठरवतात. उदाहरणार्थ, “दैनंदिन चिंता कमी करणे” किंवा “स्वत:बद्दल नकारात्मक विचार कमी
करणे” ही उद्दिष्टे असू शकतात. यामुळे थेरपी मोजता येण्याजोगी, परिणामकारक आणि थेट लक्ष केंद्रित
करणारी ठरते (Kuyken et al., 2009).
2. कालमर्यादा (Time-Limited):
CBT ही इतर पारंपरिक थेरपीच्या तुलनेत लवकर
परिणाम देणारी पद्धत मानली जाते. सामान्यतः 12 ते 20 सत्रांमध्ये (साप्ताहिक) CBT पूर्ण होते, यामुळे ती अल्पकालीन (short-term)
उपचारपद्धती म्हणून ओळखली जाते (Butler et
al., 2006). अर्थात
काही क्लिष्ट समस्या असल्यास अधिक सत्रांची आवश्यकता भासू शकते.
3. सहभागी (Collaborative):
CBT ही एक ‘collaborative’ म्हणजे सहकार्यात्मक थेरपी आहे.
थेरपिस्ट 'शिक्षक' नसून 'मार्गदर्शक' म्हणून कार्य करतो. रुग्ण आणि थेरपिस्ट एकत्र
काम करून विचार तपासतात, अनुभव शेअर करतात, आणि उपाययोजना करतात. या प्रक्रियेला "collaborative
empiricism" असेही
म्हणतात – म्हणजे दोघंही अनुभवांवरून शिकतात आणि प्रयोग करतात (Beck, 1995).
4. पद्धतशीर (Systematic):
CBT मध्ये वापरण्यात येणाऱ्या तंत्रांची
रचना वैज्ञानिक पद्धतीने केली गेलेली असते. Cognitive restructuring, behavioural
activation, exposure therapy, relaxation techniques यांसारखी विविध तंत्रे ठराविक क्रमाने वापरली
जातात. त्यामुळे रुग्णाच्या समस्या अधिक परिणामकारक पद्धतीने हाताळल्या जातात (Hofmann
et al., 2012).
ही प्रक्रिया फक्त तात्पुरता दिलासा देण्यापेक्षा दीर्घकालीन सुधारणा साधण्यावर भर
देते.
CBT च्या पद्धती (Techniques used in CBT)
1. स्वयंचलित विचारांचा अभ्यास (Automatic Thoughts): CBT मध्ये रुग्णाच्या "स्वयंचलित
विचारांची" (automatic thoughts) ओळख करणे हे एक महत्त्वपूर्ण पाऊल असते. हे
विचार क्षणभरात, अनायासपणे, एखाद्या घटनेनंतर व्यक्तीच्या मनात
येतात आणि त्यांच्या भावना व वर्तनावर प्रभाव टाकतात. उदाहरणार्थ, जर एखाद्या विद्यार्थ्याचा निकाल
अपेक्षेप्रमाणे आला नाही, तर त्याच्या मनात लगेच “मी अपयशी आहे”, “कोणीच मला गंभीरतेने घेत नाही” असे विचार येऊ
शकतात. हे विचार अनेकदा अतिशयोक्त, अपुरे किंवा वास्तवाला धरून नसतात (Beck, 1976). थेरपिस्ट "विचार
नकाशा" (thought record) वापरून रुग्णाला हे विचार ओळखण्यास आणि त्यांचं निरीक्षण करण्यास
शिकवतो.
2. विचार पुनर्रचना (Cognitive Restructuring): स्वयंचलित विचार ओळखल्यानंतर, CBT मध्ये त्यांना "आव्हान"
देण्याची प्रक्रिया सुरू होते. याला Cognitive Restructuring म्हटले जाते. यात थेरपिस्ट रुग्णासोबत
अशा विचारांची पडताळणी करतो: “तुला हे वाटण्यामागे कोणते पुरावे आहेत?”, “याला पर्यायी काय विचार असू शकतो?” या प्रकारे नकारात्मक विचारांना अधिक
संतुलित आणि यथार्थ दृष्टिकोनाने बदललं जातं (Dobson & Dozois, 2010). उदाहरणार्थ, “मी काही चांगलं करू शकत नाही” या
विचाराला “मी या गोष्टीत अपयशी ठरलो, पण याआधी मी अनेक गोष्टींमध्ये यशस्वी झालो
आहे” अशा प्रकारे बदलले जाऊ शकते.
3. वर्तनात्मक प्रयोग (Behavioural Experiments): CBT मध्ये विचारांच्या सत्यतेची चाचणी घेण्यासाठी
वर्तनात्मक प्रयोग वापरले जातात. हे म्हणजे एखादा नकारात्मक किंवा भीतीजनक विचार
वास्तवात किती खरा आहे हे पाहण्यासाठी केलेला लघुप्रयोग. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला वाटत असेल की तो जर
लोकांसमोर बोलला, तर सर्वजण त्याची चेष्टा करतील – तर थेरपिस्ट त्याला छोट्या गटासमोर
काही बोलायला सांगतो. नंतर अनुभव काय होता याचा आढावा घेतो. यामधून व्यक्तीला
स्वतःच्या भीतीप्रेरित विचारांमधील त्रुटी लक्षात येतात (Bennett-Levy
et al., 2004).
4. भीतीला सामोरं जाण्याचा सराव (Exposure Techniques): CBT मध्ये exposure therapy हे तंत्र विशेषतः फोबिया, सोशल अँझायटी आणि PTSD सारख्या विकारांमध्ये वापरले जाते. यात
रुग्णाला हळूहळू आणि नियंत्रित पद्धतीने त्याच्या भीतीच्या स्त्रोताला सामोरे
जाण्याचा सराव दिला जातो. यामुळे रुग्णाची भीती हळूहळू कमी होते, आणि avoidance behavior (टाळण्याचा प्रयत्न) दूर होतो.
उदाहरणार्थ, उंचीची
भीती असलेल्या व्यक्तीला सुरुवातीला फक्त उंच इमारतींचे फोटो दाखवले जातात, नंतर तिथे जाण्याचा सराव करावा लागतो (Craske et
al., 2008). Exposure च्या या टप्प्यांना “gradual
exposure” किंवा
“systematic desensitization” म्हणतात.
5. शारीरिक आणि मानसिक शिथिलता तंत्र (Relaxation
Techniques): चिंता
विकारांमध्ये रुग्णांचे शरीर वारंवार “फाईट-ऑर-फ्लाइट” (Fight-or-Flight)
स्थितीत जात असते. म्हणून CBT मध्ये relaxation techniques महत्त्वाच्या असतात. यात प्रामुख्याने
श्वसनाचे तंत्र (deep breathing), प्रगत स्नायू शिथिलता (progressive
muscle relaxation), सजग
ध्यान (mindfulness meditation) यांचा समावेश होतो. या तंत्रांचा नियमित सराव केल्याने शरीर आणि मन
दोघेही शांत राहतात आणि प्रतिक्रिया अधिक समतोल होतात (Andrews
et al., 2018).
CBT च्या
सुरुवातीच्या टप्प्यातच रुग्णाला हे तंत्र शिकवलं जातं जे तो सत्रांबाहेरही
वापरतो.
6. गृहपाठ किंवा सत्रांबाहेरचा सराव (Homework Assignments): CBT मध्ये फक्त सत्रादरम्यान काम करणं पुरेसं नसतं, म्हणून थेरपिस्ट रुग्णाला गृहपाठ देतो
म्हणजे सत्रात शिकलेल्या गोष्टींचा प्रत्यक्ष आयुष्यात सराव. उदा., विचार नकाशा भरून आणणे, एखाद्या प्रसंगात भीतीचा सामना करणे, किंवा relaxation techniques चा सराव करणे. या सरावामुळे रुग्णाची स्व-जाणीव
वाढते आणि बदल अधिक दीर्घकालीन व प्रभावी होतो (Kazantzis et al., 2005). गृहपाठ ही CBT ची मूलभूत आणि प्रभावी बाब मानली जाते.
CBT कधी वापरावी? (When
is CBT used?)
बोधनिक वर्तन उपचार पद्धती (CBT) ही आजच्या काळातील सर्वात प्रभावी आणि
वैज्ञानिक दृष्टिकोनातून तपासलेली मानसोपचार पद्धत मानली जाते. ती विविध
प्रकारच्या मानसिक आरोग्याच्या समस्या आणि विकारांवर प्रभावी ठरते. CBT ही मुख्यत्वे करून विचार, भावना आणि वर्तन यांच्यातील परस्पर
संबंध ओळखून त्यात सकारात्मक बदल घडवण्यावर आधारित आहे.
1. अवसाद (Depression): CBT ही
अवसादावर उपचार करण्यासाठी सर्वाधिक वापरली जाणारी पद्धत आहे. अवसादग्रस्त
व्यक्तींमध्ये दिसणाऱ्या "नकारात्मक विचारसरणी" (Negative
thought patterns) जसे
की स्वतःविषयी, भविष्यातील
शक्यतांविषयी किंवा जगाविषयी निराश विचार यांना बदलण्यासाठी CBT प्रभावी ठरते (Beck, 1979). उदाहरणार्थ, रुग्ण सतत स्वतःला "मी काहीच
चांगलं करू शकत नाही" असे म्हणतो, तर CBT मध्ये त्या विचारांचा सामना करून त्यांना अधिक
वास्तवदर्शी विचारांमध्ये रूपांतरित केले जाते. संशोधनानुसार, औषधोपचारांसोबत CBT दिल्यास दीर्घकालीन सुधारणा अधिक ठोस
आणि टिकाऊ ठरते (Cuijpers et al., 2013).
2. चिंता विकार (Anxiety Disorders): CBT ही जनरलाइज्ड अँझायटी डिसऑर्डर (GAD), पॅनिक डिसऑर्डर, सोशल अँझायटी, आणि हेल्थ अँझायटी यांसारख्या
विकारांवर अत्यंत परिणामकारक आहे. यामध्ये "catastrophizing" म्हणजे एखादी गोष्ट खूपच भीतीदायक आहे
असे गृहीत धरणे, किंवा
नेहमी वाईटच होईल असे वाटणे यावर लक्ष दिले जाते (Clark & Beck, 2010). CBT मध्ये रुग्णाला त्याच्या भीतीच्या विचारांची
सत्यता तपासायला शिकवले जाते, आणि Exposure व Relaxation techniques चा वापर करून चिंता कमी केली जाते.
3. OCD (Obsessive-Compulsive Disorder): CBT मध्ये ERP (Exposure and Response
Prevention) नावाचे
तंत्र वापरले जाते जे OCD वर अत्यंत प्रभावी आहे (Foa et al., 2005). यात रुग्णाला त्यांच्या "obsessions"
(उदा. घाण लागली
आहे) यांचा सामना करायला शिकवले जाते, आणि "compulsions" (उदा. सतत हात धुणे) न करता राहण्याचा
सराव केला जातो. यामुळे अंशतः नकारात्मक भावना सहन करण्याची क्षमता वाढते आणि
लक्षणांमध्ये घट दिसून येते.
4. PTSD (Post-Traumatic Stress Disorder): CBT हे PTSD साठी वापरताना Trauma-focused CBT या स्वरूपात वापरले जाते. यात
व्यक्तीला त्यांच्या ट्रॉमाशी संबंधित आठवणी, विचार आणि भावना पुन्हा अनुभवायच्या असतात (controlled
exposure), आणि
त्यांच्याशी निगडित नकारात्मक विचारसरणी बदलावी लागते (Resick et
al., 2002). उदा.
"माझ्याशी असं झालं कारण मीच दोषी आहे" हे विचार बदलून "मी
सुरक्षित होण्यासाठी जे शक्य होतं ते केलं" असा दृष्टिकोन तयार करण्यास मदत
केली जाते.
5. फोबिया (Phobias): CBT ही
फोबियांसाठी सर्वात प्रभावी उपचारांपैकी एक मानली जाते. विशेषतः "Systematic
Desensitization" व
"Graded Exposure" हे तंत्र वापरून रुग्णाला त्याच्या भीतीदायक घटकांना (उदा. उंची, प्राणी, गर्दी) हळूहळू सामोरे जाण्याचा सराव केला जातो
(Öst, 1989).
या प्रक्रियेमुळे रुग्णाच्या भीतीची तीव्रता कमी होते आणि avoidance
वर्तन कमी होऊ लागते.
6. व्यसनमुक्ती (Addiction): CBT व्यसनाच्या उपचारामध्ये वापरली जाते कारण ती
रुग्णाला "triggers" ओळखायला शिकवते म्हणजे कोणत्या परिस्थितीत, भावनांमध्ये किंवा लोकांमुळे त्याला
व्यसनाची गरज भासते. नंतर त्या triggers चा सामना करण्यासाठी coping
skills शिकवल्या
जातात (Carroll & Onken, 2005). उदा. व्यसनाकडे नेणारे विचार जसे की "थोडं घेतल्याने (दारू)
काही होत नाही" हे विचार ओळखून ते बदलले जातात.
7. खाण्याचे विकार (Eating Disorders): Anorexia Nervosa, Bulimia
Nervosa, आणि
Binge Eating Disorder यांसाठी CBT उपयोगी ठरते (Fairburn, 2008). यात शरीरप्रतिमा विकृती (body
image distortion), वजनाची
भीती, किंवा
खाण्याशी निगडित चुकीचे विचार यावर काम केले जाते. उदाहरणार्थ, "जर मी वजन वाढवलं तर मी निष्काळजी
होईन" असा विचार अधिक यथार्थ विचारात बदलला जातो.
8. निद्रानाश (Insomnia): CBT-I (CBT for Insomnia) ही निद्रानाशाच्या उपचारासाठी
शास्त्रीय पद्धती आहे. यात झोपेच्या वेळेचा रूटीन, झोपेशी निगडित विचार (उदा. "माझी झोप न
झाली तर उद्या सगळं बिघडेल") आणि relaxation techniques यांचा समावेश असतो (Edinger
& Means, 2005).
CBT-I औषधोपचारांपेक्षा
अधिक टिकाऊ परिणाम देते असं संशोधन सांगतं.
CBT च्या मर्यादा (Limitations
of CBT)
- CBT ही विचारसरणी आणि वर्तन यांवर केंद्रित असल्यामुळे ती मुख्यतः वैचारिक विश्लेषणावर भर देते. त्यामुळे अतिशय सखोल भावनिक वेदना, दु:ख किंवा बालपणातील भावनिक जखमा यांना थेट हाताळण्याची क्षमता या पद्धतीमध्ये कमी असते. उदाहरणार्थ, बालपणी झालेला अत्याचार, भावनिक उपेक्षा किंवा अन्य खोल भावनिक आघात CBT ने तितक्या प्रभावीपणे हाताळले जात नाहीत, जितके psychodynamic थेरपीत केले जातात.
- CBT ही सहकार्यात्मक (collaborative) पद्धत असल्यामुळे रुग्णाने थेरपीत सक्रिय सहभाग घ्यावा लागतो. जे रुग्ण कमी शिक्षित असतात, विचारांच्या विश्लेषणासाठी मानसिक क्षमतेची कमतरता असते, किंवा जे रुग्ण गंभीर मानसिक आजाराने ग्रस्त असतात (उदा. psychosis, manic episodes), त्यांच्यासाठी ही थेरपी फार उपयुक्त ठरत नाही.
- CBT मध्ये असे मानले जाते की भावनिक त्रास हे चुकीच्या किंवा अपयशी विचारांमुळे (cognitive distortions) निर्माण होतात. परंतु सर्व मानसिक आजारांचे मूळ केवळ विचारांमध्ये नसते; बरेचदा सामाजिक, आर्थिक, जैविक आणि सांस्कृतिक घटक त्यामागे कारणीभूत असतात. उदाहरणार्थ, गरीबीतून आलेल्या व्यक्तीच्या चिंता किंवा नैराश्याचे मूळ केवळ त्याच्या विचारपद्धतीत नसून वास्तवात असते.
- CBT ही कालमर्यादित (short-term) थेरपी आहे आणि ती विशिष्ट समस्यांवर केंद्रित असते. त्यामुळे व्यक्तिमत्त्वविकास, दीर्घकालीन आंतरिक संघर्ष किंवा अर्थशून्यता (existential issues) यांसारख्या खोल प्रश्नांवर CBT चा मर्यादित परिणाम होतो.
- CBT मध्ये बहुतेक वेळा अनुभवांना (emotions/sensations) बायपास करून थेट विचारांवर काम केले जाते. पण अनेकदा व्यक्तीला भावनिक स्वीकृतीची (emotional validation) गरज असते. अशावेळी CBT मधील "तू असं का विचारतो?" किंवा "हे विचार योग्य आहेत का?" यासारखे तर्कशुद्ध विश्लेषण रुग्णाला त्रासदायक ठरू शकते.
- CBT ही प्रामुख्याने पाश्चिमात्य देशांमध्ये विकसित झालेली पद्धत आहे. त्यामुळे भारतासारख्या बहुसांस्कृतिक, धार्मिक आणि सामाजिक रूपाने गुंतागुंतीच्या समाजात ती थेट लागू करता येत नाही. उदाहरणार्थ, सामूहिक निर्णयप्रक्रिया, धार्मिक विश्वास, सामाजिक प्रतिष्ठा यांसारख्या गोष्टी विचारांत न घेतल्यास CBT अपुरी ठरू शकते.
- CBT मध्ये विचार, भावना आणि वर्तन यांचं त्रिकोनात्मक मॉडेल वापरलं जातं. पण वास्तवात मानवी मनाचे कार्य हे अनेकदा अतर्क्य, अस्पष्ट आणि अरेषात्मक (non-linear) असते. अशा गुंतागुंतीच्या परिस्थितींमध्ये CBT चं सरळ मॉडेल अपुरं भासतं.
- CBT प्रभावी होण्यासाठी थेरपिस्टचे प्रशिक्षण, अनुभव आणि संवाद कौशल्य अत्यंत महत्त्वाचे असते. अयोग्य किंवा यांत्रिक पद्धतीने CBT करणारा थेरपिस्ट रुग्णाला नकारात्मक अनुभव देऊ शकतो, ज्यामुळे थेरपी निष्फळ होते.
समारोप:
बोधनिक वर्तन उपचार पद्धती (CBT) ही आजच्या काळातील एक अत्यंत प्रभावी, वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेली आणि
रुग्ण-केंद्रित मानसोपचार पद्धत आहे. ही थेरपी व्यक्तीच्या विचार, भावना आणि वर्तन यांच्यातील सुसंवादी
संबंध ओळखून मानसिक आरोग्यात सकारात्मक बदल घडवते. CBT हे नकारात्मक, विकृत विचारांचे विश्लेषण करून विवेकी आणि
वास्तवाधारित विचारशैली निर्माण करण्यावर भर देते. ही पद्धत संरचित, कालमर्यादित, सहभागी व लक्ष्य-केंद्रित असल्याने ती
परिणामकारक आणि रुग्णासाठी व्यावहारिक ठरते.
संदर्भ
Andrews, G., Basu,
A., Cuijpers, P., et al. (2018). Computer therapy for the
anxiety and depression disorders is effective, acceptable, and practical health
care: A meta-analysis. PLOS One.
Bandura, A. (1977). Social Learning Theory. Prentice-Hall.
Beck, A. T. (1967). Depression: Clinical, Experimental, and Theoretical
Aspects. Harper & Row.
Beck, A. T.
(1976). Cognitive Therapy and the Emotional Disorders. International
Universities Press.
Beck, A. T. (1979). Cognitive Therapy of Depression. Guilford Press.
Beck, A.T. (1979). Cognitive Therapy and the Emotional Disorders. Penguin.
Beck, J. S.
(1995). Cognitive Therapy: Basics and beyond. Guilford Press.
Beck, J.S. (2011). Cognitive Behavior Therapy: Basics and Beyond (2nd ed.). The Guilford Press.
Bennett-Levy, J.,
Butler, G., Fennell, M., Hackmann, A., Mueller, M., & Westbrook, D. (2004). Oxford Guide to Behavioural Experiments in Cognitive
Therapy. Oxford University Press.
Butler, A.C.,
Chapman, J.E., Forman, E.M., & Beck, A.T. (2006). The
empirical status of cognitive-behavioural therapy: A review of meta-analyses.
Clinical Psychology Review, 26(1), 17–31.
Carroll, K. M.,
& Onken, L. S. (2005). Behavioural therapies for drug
abuse. American Journal of Psychiatry.
Clark, D. A.,
& Beck, A. T. (2010). Cognitive Therapy of Anxiety
Disorders. Guilford Press.
Craske, M. G.,
Kircanski, K., Zelikowsky, M., Mystkowski, J., Chowdhury, N., & Baker, A. (2008). Optimizing inhibitory learning during exposure therapy.
Behaviour Research and Therapy, 46(1), 5–27.
Cuijpers, P., et
al. (2013). Psychological treatment of depression in
primary care: a meta-analysis. British Journal of General Practice.
Dobson, K. S.
(2010). Handbook of Cognitive-Behavioural Therapies. Guilford Press.
Dobson, K. S.,
& Dozois, D. J. A. (2001). Historical and
philosophical bases of the cognitive-behavioral therapies. In K. S. Dobson
(Ed.), Handbook of Cognitive-Behavioural Therapies (2nd
ed., pp. 3–39). Guilford Press.
Dobson, K. S.,
& Dozois, D. J. A. (2010). Risk factors in depression.
Elsevier.
Dobson, K.S.,
& Dozois, D.J.A. (2010). Historical and philosophical
bases of the cognitive-behavioral therapies. In Handbook of Cognitive-Behavioural
Therapies (3rd ed.).
Edinger, J. D.,
& Means, M. K. (2005). Cognitive–behavioural therapy
for primary insomnia. Clinical Psychology Review.
Fairburn, C. G. (2008). Cognitive Behavior Therapy and Eating Disorders. Guilford
Press.
Foa, E. B., et al.
(2005). Exposure and response prevention for OCD.
Hofmann, S. G.,
Asnaani, A., Vonk, I. J., Sawyer, A. T., & Fang, A. (2012). The Efficacy of
Cognitive Behavioural Therapy: A Review of Meta-analyses. Cognitive Therapy and
Research, 36(5), 427–440.
Kazantzis, N.,
Deane, F. P., Ronan, K. R. (2005). Homework assignments in
cognitive and behavioural therapy: A meta-analysis. Clinical Psychology:
Science and Practice, 12(2), 144–156.
Kuyken, W.,
Padesky, C.A., & Dudley, R. (2009). Collaborative Case
Conceptualization. Guilford Press.
Öst, L. G. (1989). One-session treatment for specific phobias. Behaviour
Research and Therapy.
Resick, P. A., et
al. (2002). Cognitive processing therapy for PTSD. Journal
of Consulting and Clinical Psychology.
Skinner, B. F. (1953). Science and Human Behavior. Macmillan.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thank you for your comments and suggestions