मानसिक विकार समजून घेण्याची चौकट | Framework Mental Disorder
मानसिक आरोग्य हे केवळ आजारांच्या अभावाचे मापन नव्हे, तर व्यक्तीचे विचार, भावना, आणि वर्तन हे समाजाशी, संस्कृतीशी व व्यक्तीच्या दैनंदिन आयुष्याशी किती सुसंगत आहेत, यावरही त्याचे मापन होते. मानसिक आरोग्याच्या अडचणी ओळखण्याकरिता व त्या समजून घेण्यासाठी आधुनिक मानसोपचारशास्त्रात काही मूलभूत निकष वापरले जातात. या निकषांपैकी चार अत्यंत महत्त्वाचे घटक म्हणजे विचलन (Deviance), मनस्ताप (Distress), कार्यात्मक बिघाड (Dysfunction) आणि धोका (Danger) हे चार “D” म्हणून ओळखले जातात.
हे चार D मानसिक आरोग्याच्या तपासणीसाठी आणि
निदानासाठी वापरली जातात. त्या व्यक्तीच्या वर्तनाची व्याख्या, गांभीर्य, आणि उपचाराची
गरज ओळखण्यास मदत करतात. या आधारांवर आपण मानसिक आजारांची व्याख्या अधिक
शास्त्रशुद्ध पद्धतीने करू शकतो आणि वेळेवर समुपदेशन, उपचार किंवा
वैद्यकीय सहकार्य मिळवू शकतो. मानसिक आरोग्याचा विचार करताना या चारही घटकांचा
समतोल अभ्यास करणे हे मानसिक आरोग्य विज्ञानातील एक मूलभूत आणि अत्यावश्यक पाऊल
आहे.
1. विचलन (Deviance): सामाजिक आणि
सांस्कृतिक अपसामान्यता
मानसिक आरोग्याच्या संदर्भात
"विचलन" (Deviance) ही संकल्पना
अत्यंत महत्त्वाची असून ती DSM-5-TR (American
Psychiatric Association, 2022) नुसार निदानाच्या प्राथमिक
निकषांपैकी एक आहे. याचा अर्थ असा की एखाद्या व्यक्तीचे वर्तन, विचार किंवा भावना जर समाजाने सामान्य मानलेल्या मूल्यांपासून, मानकांपासून किंवा अपेक्षांपासून फारकत घेतात, तर
त्या स्थितीस विचलन म्हटले जाते. हे विचलन नैसर्गिक, सामाजिक
आणि सांस्कृतिक घटकांच्या परस्परसंबंधातून उत्पन्न होते.
अ. सामाजिक आणि सांस्कृतिक संदर्भातील महत्त्व:
सामाजिक संदर्भात, समाजातील बहुसंख्य लोक जे वर्तन "सामान्य" किंवा
"स्वीकार्य" मानतात त्यापासून झालेली फारकत म्हणजे deviance होय (Sue, Sue, Sue, & Sue, 2016). मात्र,
हे "सामान्यपणाचे" मोजमाप स्थिर नसते. प्रत्येक समाजाची
आपली एक संस्कृती, परंपरा, धार्मिक
मूल्ये आणि सामाजिक संरचना असते. त्यामुळे एकाच वर्तनास एका संस्कृतीत सामान्य
मानले जाऊ शकते, तर दुसऱ्या संस्कृतीत ते विचलन ठरू शकते.
उदाहरणार्थ, मृत व्यक्तीशी संवाद साधणे हे काही अफ्रिकन
वंशीय समाजांमध्ये आध्यात्मिक किंवा धार्मिक दृष्टिकोनातून सामान्य समजले जाते,
परंतु अमेरिकन मानसोपचार पद्धतीनुसार हे hallucinatory
behavior म्हणून वर्गीकृत केले जाते (Kirmayer, 2007).
ब. व्यक्तिनिष्ठ घटकांचा प्रभाव:
विचलन हे फक्त सामाजिक मानकांपुरते
मर्यादित नसून, ते व्यक्तीचे वय, लिंग, सामाजिक स्तर, धार्मिक
पार्श्वभूमी आणि जीवनानुभव यांवरही अवलंबून असते. उदाहरणार्थ, लहान मुलांमध्ये काल्पनिक मित्र असणे हे सामान्य developmental
phase चा भाग मानले जाते, परंतु तीच गोष्ट जर
प्रौढ व्यक्तीबाबत घडली, तर ती मानसिक विचलन समजली जाऊ शकते.
त्याचप्रमाणे, स्त्रियांमध्ये भावनिक अभिव्यक्ती अधिक असल्याने जर एखादी स्त्री अश्रू
ढाळत असेल तर ते अनेकदा सामाजिकदृष्ट्या स्वीकारले जाते, परंतु
पुरुष व्यक्तींनी तेच केल्यास काही समाजांमध्ये ते 'कमजोरीचे
लक्षण' मानले जाऊ शकते. परिणामी त्याच्या भावनिक
अभिव्यक्तीला "विचलन" म्हणून पाहिले जाऊ शकते (Mahalik et al., 2003).
मानसोपचारशास्त्रात विचलनाचे मूलभूत
लक्षण म्हणजे वास्तविकतेपासून फारकत घेणारे विचार. उदाहरणार्थ, जर एखादी व्यक्ती सतत असे म्हणते की "सर्वजण माझ्या विरोधात कट करत
आहेत" किंवा "सरकार माझ्यावर लक्ष ठेवत आहे", तर हे delusional thinking म्हणून ओळखले जाते. अशा
प्रकारचा विश्वास सत्याधारित नसतो, आणि तरीही व्यक्ती त्यावर
पूर्णपणे विश्वास ठेवते, ज्यामुळे त्याचे सामाजिक, भावनिक आणि वैयक्तिक कार्य बिघडते. ही स्थिती paranoid delusion या प्रकारात मोडते आणि Schizophrenia Spectrum and Other Psychotic
Disorders च्या श्रेणीत वर्गीकृत केली जाते (DSM-5-TR, APA, 2022).
विचलन ही संकल्पना केवळ
मानसशास्त्रीयदृष्टिकोनातून नव्हे, तर सामाजिक, सांस्कृतिक आणि नैतिक दृष्टिकोनातूनही
अभ्यासण्याजोगी आहे. मानसिक आरोग्य मूल्यांकन करताना वर्तन "विचलित" आहे
की नाही हे ठरवताना केवळ वैद्यकीय निकष नव्हे, तर त्या
व्यक्तीच्या सामाजिक पार्श्वभूमीचाही सखोल विचार करणे आवश्यक असते. म्हणूनच DSM-5-TR ने सांस्कृतिक संदर्भातील परिशिष्ट (Cultural
Formulation Interview) दिले आहे, जे निदान
करताना अशा भिन्नतेचा विचार करण्यास मदत करते (APA, 2022).
2. Distress (मनस्ताप / मानसिक त्रास):
Distress म्हणजे मानसिक किंवा भावनिक स्तरावर
अनुभवला जाणारा अंतर्गत त्रास, जो व्यक्तीच्या विचारांमुळे, भावना, किंवा
वर्तनांच्या प्रतिक्रियेमुळे निर्माण होतो. हा त्रास बहुतेक वेळा व्यक्तीच्या
आत्मसमजुतीत, आत्म-संवादात किंवा सामाजिक परस्पर संबंधांमध्ये
दिसून येतो. Distress ही संकल्पना DSM-5-TR (APA,
2022) मध्ये
मानसिक आजार ओळखण्याच्या महत्त्वाच्या निकषांपैकी एक मानले जाते. ही अशी अवस्था
आहे ज्यामध्ये व्यक्तीला स्वतःच्या मानसिक स्थितीमुळे क्लेश होतो, आणि ती
परिस्थिती सहजपणे झेलता येत नाही.
अ. Distress चा स्वरूप आणि परिणाम:
Distress म्हणजे केवळ छोटासा ताण किंवा
नैराश्य नाही. हा एक गंभीर आणि सतत जाणवणारा त्रास असतो जो व्यक्तीच्या संपूर्ण
जीवनावर परिणाम करतो. अशा वेळी व्यक्ती दैनंदिन कार्यांमध्ये लक्ष केंद्रित करू
शकत नाही, सामाजिक संबंधांमध्ये अडचणी येतात, आणि निर्णय
क्षमतेवर परिणाम होतो (Insel, 2015).
Distress ही भावना कोणत्याही मानसिक आरोग्य
स्थितीत दिसू शकते, जसे की अवसाद (Depression), चिंतेचे विकार
(Anxiety Disorders), आघातानंतरचा तणाव विकार (PTSD),
किंवा
द्विध्रुवी विकार (Bipolar Disorder). उदाहरणार्थ, अवसादग्रस्त
व्यक्तीला सतत दु:ख, निराशा, आणि व्यर्थतेची
भावना येते. अशा व्यक्तीला आयुष्य व्यर्थ वाटते, कोणत्याही
गोष्टीत रस वाटत नाही, आणि भावनिक दडपणामुळे झोप, भूक, एकाग्रता आणि
ऊर्जा या बाबतीत मोठे बिघाड होतात (Beck, 1967).
ब. Distress आणि स्व-समज:
Distress हा अनेकदा स्वतःच्या मूल्याबाबत
नकारात्मक विचारांशी निगडित असतो. जसे की, "मी अपयशी
आहे", "कोणालाही माझी गरज नाही",
"माझं
अस्तित्वच निरर्थक आहे" अशा विचारांची पुनरावृत्ती होते. ही विचारपद्धती Aaron
T. Beck यांच्या Cognitive Theory of Depression मध्ये "Negative
Cognitive Triad" म्हणून स्पष्ट केली आहे (Beck, Rush,
Shaw, & Emery, 1979). या त्रिकोनात व्यक्ती स्वतःबद्दल, भविष्यासंबंधी, आणि जगाबद्दल
नकारात्मक दृष्टिकोन बाळगते, ज्यामुळे distress
वाढतो.
क. Distress चे जैविक परिणाम:
Distress केवळ भावनिक मर्यादेत राहत नाही; त्याचे परिणाम
शारीरिक आरोग्यावरही होतात. Robert Sapolsky यांच्या
संशोधनानुसार, दीर्घकालीन मानसिक तणावामुळे कॉर्टिसोलसारख्या
तणाव संप्रेरकांचे स्रव वाढते, जे मेंदूतील hippocampus
(स्मरण
व अध्ययनाशी संबंधित भाग) यावर नकारात्मक परिणाम करतो आणि प्रतिकारशक्तीही कमकुवत
होते (Sapolsky, 2004).
Distress ही मानसिक आरोग्य निदानासाठी एक
अत्यंत महत्त्वाची आणि मूलभूत बाब आहे. केवळ लक्षणे नव्हे तर व्यक्ती त्या
लक्षणांमुळे कशी त्रस्त आहे, हे लक्षात घेऊनच चिकित्सक निदान
करतात. Distress मुळे व्यक्तीचा अनुभव अस्वस्थतेकडे झुकतो, आणि हेच अनुभव
तिच्या जीवनशैलीवर खोल परिणाम घडवतात. म्हणूनच, distress चे सम्यक
मूल्यांकन करणे आणि त्यावर तातडीने योग्य मानसोपचारात्मक उपाययोजना राबवणे आवश्यक
असते.
3. कार्यात्मक बिघाड (Dysfunction):
मानसिक आरोग्याच्या मूल्यांकनामध्ये "कार्यात्मक बिघाड" (Dysfunction)
ही संकल्पना
अत्यंत महत्त्वाची मानली जाते. DSM-5-TR (APA, 2022) नुसार, केवळ मानसिक
लक्षणे असणे पुरेसे नाही, तर ती लक्षणे व्यक्तीच्या सामाजिक, शैक्षणिक, व्यवसायिक
किंवा दैनंदिन कार्यक्षमतेवर लक्षणीय व अडथळा निर्माण करणारा परिणाम करत असल्यासच
ती एक मानसिक आरोग्य समस्या म्हणून ओळखली जाऊ शकते.
अ. कार्यात्मक
बिघाड म्हणजे काय?
Dysfunction म्हणजे एखादी व्यक्ती आपल्या
जीवनातील महत्त्वाच्या कार्यक्षेत्रांमध्ये जसे की नोकरी, शिक्षण, कौटुंबिक
जबाबदाऱ्या, नातेसंबंध किंवा समाजाशी संवाद किंवा प्रभावीपणे
कार्य करू शकत नाही. मानसिक विकारामुळे येणाऱ्या भावना, विचार किंवा
वर्तन यात इतका अडथळा निर्माण होतो की व्यक्ती पूर्वी सहजतेने करत असलेली कामे करताना
अडखळते.
हे बिघाड बहुतेक वेळा सूक्ष्मपणे सुरु होतो आणि हळूहळू व्यक्तीच्या
संपूर्ण जीवनशैलीत बदल घडवून आणतो. उदाहरणार्थ, झोपेच्या
समस्यांमुळे कामाच्या वेळा चुकणे, सतत राग किंवा चिंता यामुळे
सहकाऱ्यांशी वाद होणे, किंवा आत्मविश्वास कमी झाल्यामुळे
निर्णय घेण्याची क्षमता बिघडणे, हे सर्व कार्यात्मक बिघाडाचे नमुने
मानले जातात.
ब. सामाजिक व
व्यवसायिक कार्यात बिघाड:
अनेक मानसिक विकार सामाजिक कार्यक्षमतेवर थेट परिणाम करतात. Generalized
Anxiety Disorder (GAD) असलेल्या व्यक्तींना सार्वजनिक ठिकाणी बोलताना किंवा सहकाऱ्यांशी
संवाद साधताना तीव्र अस्वस्थता वाटू शकते. त्यामुळे त्या व्यक्तीच्या कार्यालयीन
कामगिरीवर परिणाम होतो, ज्यामुळे प्रमोशन, सामाजिक
प्रतिष्ठा, आणि उत्पन्न यावर नकारात्मक प्रभाव पडतो (Stein
& Sareen, 2015).
उदाहरणार्थ, एका माहिती-तंत्रज्ञान कंपनीमध्ये
काम करणाऱ्या एका व्यावसायिक व्यक्तीस वारंवार panic attacks येऊ लागले.
त्यामुळे तिला मीटिंगमध्ये बोलणे, क्लायंटला ईमेल लिहिणे किंवा
ऑफिसमध्ये नियमितपणे हजर राहणे कठीण झाले. काही महिन्यांनंतर तिने नोकरी सोडली. हे
एक कार्यात्मक बिघाडाचे उदाहरण आहे.
क. नातेसंबंधांमध्ये
बिघाड:
कार्यात्मक बिघाड केवळ बाह्य सामाजिक भूमिकांपुरता मर्यादित नसतो, तर तो घरगुती
नातेसंबंधांवरही परिणाम करतो. अवसाद (Depression) असलेली व्यक्ती
जवळच्या नात्यांमध्ये सहभाग घ्यायला नकार देते, संवाद टाळते, किंवा सतत
नकारात्मकता प्रदर्शित करते, ज्यामुळे कुटुंबातील इतर सदस्य
भावनिकदृष्ट्या थकतात (Whisman, 2007).
ड. जीवनशैलीतील
अडथळे:
दैनंदिन जीवनातील सामान्य कृती जसे की अंघोळ करणे, वेळेवर जेवणे, स्वस्थ झोप घेणे, वैयक्तिक स्वच्छता ठेवणे, ही
कार्यक्षमता बिघडल्यास प्रभावित होऊ शकते. Schizophrenia किंवा तीव्र अवसाद
असलेल्या व्यक्तींमध्ये हे टोकाचे दिसून येते (American
Psychiatric Association, 2022). अशी व्यक्ती वारंवार अन्नपाणी विसरते, अंथरुणावर पडून
राहते किंवा घरातील जबाबदाऱ्या पार पाडू शकत नाही.
Dysfunction म्हणजे फक्त "काम न होणे"
इतकीच मर्यादित गोष्ट नाही, तर ती एक व्यापक संकल्पना आहे
जिच्यात मानसिक विकाराचा परिणाम व्यक्तीच्या पूर्ण जीवनावर होतो. सामाजिक संवाद, नातेसंबंध, आर्थिक स्थिती, शारीरिक आरोग्य, आणि स्व-सन्मान
यावर या बिघाडाचा खोलवर प्रभाव पडतो. DSM-5-TR मध्ये अशा
बिघाडाची उपस्थिती मानसिक विकाराचे एक महत्त्वाचे निदानात्मक निकष मानले गेले आहे.
4. Danger (धोका / धोकादायक वर्तन):
"Danger" म्हणजे मानसिक
आरोग्याच्या मूल्यमापनात अत्यंत महत्त्वाचं मानलं जाणारं क्षेत्र, ज्याचा संबंध
व्यक्तीच्या स्वतःच्या किंवा इतरांच्या सुरक्षिततेशी असतो. जर एखाद्या व्यक्तीचं
वर्तन इतकं गंभीर असेल की त्यातून स्वतःला इजा पोहोचण्याचा (self-harm)
किंवा इतरांना
धोका निर्माण होण्याची शक्यता असते, तर ती स्थिती
गंभीर मानसिक आजाराचं निदर्शक असू शकते. DSM-5-TR नुसार, अशा प्रकारच्या
धोकादायक वर्तनांचं अस्तित्व निदान प्रक्रियेत एक निर्णायक घटक मानलं जातं (APA,
2022).
अ. स्वतःला इजा
पोहोचवण्याचा धोका (Self-directed Danger):
स्वतःला इजा पोहोचवण्याचा धोका मुख्यतः अवसाद (major
depressive disorder), द्विध्रुवीय विकार (bipolar disorder), आणि बॉर्डरलाईन
व्यक्तिमत्व विकार (borderline personality disorder) या मानसिक
आजारांमध्ये आढळतो. अशा व्यक्तींना आत्महत्येचे विचार (suicidal
ideation), आत्महत्येचा प्रयत्न (suicide
attempt), किंवा स्वतःला शारीरिक इजा (non-suicidal
self-injury) करण्याची प्रवृत्ती असते.
उदाहरणार्थ, आत्महत्येचे विचार हे अवसादाचे
प्रमुख निदर्शक असून त्याकडे दुर्लक्ष केल्यास प्राणघातक परिणाम होऊ शकतात. जागतिक
आरोग्य संघटनेनुसार, जगभरात दरवर्षी सुमारे ७ लाख लोक
आत्महत्या करतात (WHO, 2021). DSM-5-TR नुसार, अशा
व्यक्तींच्या मूल्यांकनात त्यांचं आत्महत्येचं जोखमीचं (suicide
risk assessment) प्रमाण महत्त्वाचं मानलं जातं (APA, 2022).
ब. इतरांना इजा
पोहोचवण्याचा धोका (Other-directed Danger):
धोकादायक वर्तन केवळ स्वतःपुरतंच मर्यादित राहत नाही, तर काही मानसिक
स्थितींमध्ये व्यक्ती इतरांना देखील शारीरिक किंवा मानसिक इजा पोहोचवू शकते. हे
वर्तन मुख्यतः आक्रमकता, समजुतीचा अभाव, किंवा विभ्रमांमुळे
(delusions) प्रेरित असते.
स्किझोफ्रेनिया (Schizophrenia) याचं एक ठळक उदाहरण आहे. या आजारात
व्यक्तीला वास्तविकतेपासून तुटलेलं जाणवू शकतं जसे की आवाज ऐकू येणे (auditory
hallucinations) किंवा कोणीतरी त्याच्या विरोधात कट करत असल्याचा विभ्रम (paranoid
delusions). या विभ्रमांमुळे काही वेळा व्यक्ती इतरांवर हल्ला करू शकते किंवा स्वरक्षणाच्या
उद्देशाने स्वतःलाही इजा पोहोचवू शकते (Torrey, 2014). तथापि, हे स्पष्टपणे
नमूद करणे आवश्यक आहे की बहुतेक मानसिक आजार असलेल्या व्यक्ती हिंसक नसतात; परंतु काही
विशिष्ट आजार आणि अतिरेकी परिस्थितींमध्ये धोका वाढू शकतो.
क. न्यायवैद्यकीय
मानसिक आरोग्य व ‘Danger’ यांचे महत्त्व:
मानसिक आरोग्य क्षेत्रातील न्यायवैद्यकीय अभ्यासात (forensic
psychiatry) देखील "danger" हा घटक फार महत्त्वाचा मानला जातो.
कोर्टात, एखाद्या व्यक्तीच्या आचरणामुळे समाजाला धोका आहे का हे ठरवताना याच
मूल्यमापनाचा आधार घेतला जातो. काही प्रकरणांमध्ये, व्यक्तीला
जबरदस्तीने रुग्णालयात दाखल (involuntary commitment) करण्यासाठी
देखील ‘danger to self or others’ हे एक कायदेशीर निकष म्हणून वापरले जाते (Melton
et al., 2018).
"Danger" या घटकाचं
मूल्यांकन केवळ निदानासाठी नव्हे तर उपचार नियोजन, कायदेशीर
निर्णय, आणि समाजसुरक्षेसाठीही अत्यंत आवश्यक आहे. स्वतःला किंवा इतरांना इजा
पोहोचवण्याची शक्यता असलेली मानसिक स्थिती ओळखणे, त्याचं योग्य
मूल्यांकन करणे आणि आवश्यकतेनुसार त्वरित उपचार देणे हे मानसिक आरोग्यसेवकांचं आणि
समाजाचंही नैतिक कर्तव्य आहे.
समारोप:
मानसिक आरोग्य समस्यांचं निदान करताना ही चार D –
Deviance, Distress, Dysfunction, आणि Danger या घटकांचा
समतोलपणे विचार केला जातो. कोणतीही एकच बाब निदानासाठी पुरेशी नसते; या चारही
मुद्द्यांची सखोल तपासणी आणि व्यावसायिक मूल्यांकन आवश्यक असते. हे निकष वापरूनच
एखाद्या व्यक्तीला DSM-5-TR च्या आधारे
मानसिक आजार आहे की नाही हे ठरवले जाऊ शकते.
संदर्भ:
American
Psychiatric Association. (2022). Diagnostic and Statistical Manual of Mental
Disorders, Fifth Edition, Text Revision (DSM-5-TR). Washington, DC.
Beck,
A. T. (1967). Depression: Clinical, experimental, and theoretical aspects.
University of Pennsylvania Press.
Beck,
A. T., Rush, A. J., Shaw, B. F., & Emery, G. (1979). Cognitive Therapy of
Depression. Guilford Press.
Insel,
T. R. (2015). Mental health awareness and the science of change. National
Institute of Mental Health.
Kirmayer,
L. J. (2007). Psychotherapy and the cultural concept of
the person. Transcultural Psychiatry, 44(2), 232–257.
Mahalik,
J. R., Burns, S. M., & Syzdek, M. (2003). Masculinity
and perceived normative health behaviors as predictors of men's health
behaviors. Social Science & Medicine, 64(11), 2201–2209.
Melton,
G. B., Petrila, J., Poythress, N. G., & Slobogin, C. (2018). Psychological
Evaluations for the Courts: A Handbook for Mental Health Professionals and
Lawyers. Guilford Press.
Sapolsky,
R. M. (2004). Why Zebras Don't Get Ulcers. Holt Paperbacks.
Stein,
M. B., & Sareen, J. (2015). Generalized Anxiety Disorder. New England
Journal of Medicine, 373(21), 2059–2068.
Sue,
D., Sue, D. W., Sue, S., & Sue, D. M. (2016). Understanding
Abnormal Behavior (11th ed.). Cengage Learning.
Torrey,
E. F. (2014). Surviving Schizophrenia: A Family Manual. HarperCollins.
Whisman,
M. A. (2007). Marital distress and psychopathology. In A. E. Kazdin & J. R.
Weisz (Eds.), Evidence-Based Psychotherapies for Children and Adolescents.
World
Health Organization. (2021). Suicide worldwide in 2019: global health
estimates. https://www.who.int/publications/i/item/9789240026643
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thank you for your comments and suggestions