सोमवार, १० ऑक्टोबर, २०२२

मानसिक आरोग्य आणि आपण | Mental health

 

मानसिक आरोग्य आणि आपण | Mental health

प्रत्येकवर्षी 10 ऑक्टोबर रोजी जागतिक मानसिक आरोग्य दिन साजरा करण्यात येतो. जागतिक मानसिक आरोग्य दिनाचे मुख्य उद्दिष्ट जगभरातील मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल जागरुकता पसरविणे आणि मानसिक आरोग्याच्या समर्थनार्थ प्रयत्नांना बळकटी देणे हा आहे. मानसिक आरोग्य समस्यांवर काम करणार्‍या सर्व भागधारकांना त्यांच्या कार्याबद्दल आणि जगभरातील लोकांसाठी मानसिक आरोग्य सेवा प्रत्यक्षात आणण्यासाठी आणखी काय करू शकतो याबद्दल बोलण्याची संधी हा दिवस प्रदान करतो. 2022 या वर्षीची थीम सर्वांसाठी मानसिक आरोग्य आणि जीवन-कल्याण यास जागतिक प्राधान्य बनविणे (Make mental health & well-being for all a global priority) ही आहे.

भारतातील मानसिक आरोग्याची स्थिती

कोविड-19 महामारी साथीच्या प्रारंभापासून, अनेक संशोधनामधून विविध वयोगटातील व्यक्तींचे मानसिक आरोग्य बिघडत असल्याचे सूचित केले आहे.  2017 मध्ये भारताचे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी “भारत संभाव्य मानसिक आरोग्य साथीचा सामना करत आहे” असे प्रतिपादन केले होते. एका अभ्यासानुसार असे दिसून आले आहे की त्याच वर्षी भारताची 14% लोकसंख्या मानसिक आरोग्याच्या आजारांनी ग्रस्त होती, ज्यात 45.7 दशलक्ष लोक अवसाद (depression) विकारांनी ग्रस्त होते आणि 49 दशलक्ष चिंता विकारांनी ग्रस्त होते. कोविड -19 महामारी साथीच्या आजाराने या मानसिक आरोग्याच्या संकटाला आणखी बळकटी दिलेली आहे, जगभरातील संशोधने असे सूचित करतात की व्हायरस आणि संबंधित लॉकडाऊनचा एकूण लोकसंख्येवर विशेषतः तरुण व प्रौढावर लक्षणीय परिणाम झालेला आहे.

इंडिया स्टेट लेव्हल डिसीज बर्डन इनिशिएटिव्ह संघटनेच्या 2017 मधील अभ्यासात असे दिसून आले आहे की मानसिक विकारांमुळे भारतातील रोगाचा भार 1990 मध्ये 2.5% वरून 2017 मध्ये 4.7% पर्यंत वाढला. अवसाद आणि चिंता विकार, तसेच खाण्याच्या विकारांचे प्रमाण महिलांमध्ये लक्षणीय प्रमाणात अधिक असल्याचे दिसून आले. अवसाद आणि आत्महत्येमुळे मृत्यू यांच्यातील संबंध देखील महिलांमध्ये जास्त असल्याचे दिसून आले.

भारतात मानसिक आरोग्यविषयक विकार असणे हे सामाजिक मागासलेपण समजले जाते आणि मानसिक आरोग्य समस्या असणाऱ्यांशी संबंधित कलंक आहे असे मानले जाते (द लाईव्ह लव्ह लाफ फाउंडेशन, 2018). आजही अनेक ठिकाणी मानसिक विकार हे स्वयं-शिस्त आणि इच्छाशक्तीच्या अभावाचे परिणाम मानले जातात. मानसिक आरोग्याशी संबंधित कलंक याबाबत उपचारांची उपलब्धता, खर्चिकता आणि जागरूकतेचा अभाव यामुळे उपचारांमध्ये लक्षणीय अंतर निर्माण झालेले पाहायला मिळते. राष्ट्रीय मानसिक आरोग्य सर्वेक्षण (NMHS), 2018-19 मध्ये असे आढळून आले की मानसिक विकारांनी ग्रस्त असलेल्यांपैकी जवळजवळ 80% लोकांना वर्षभरापासून उपचार मिळाले नाहीत. या सर्वेक्षणाने विविध मानसिक विकारांमध्ये (मानसिक आरोग्य आणि चेताविज्ञान संस्था (NIMHANS), 2016) 28% ते 83% पर्यंतच्या मानसिक आरोग्य सेवा उपचारांमध्ये मोठे अंतर असल्याचे नमूद केलेले आहे.

कायदे आणि मानसिक आरोग्य सक्षमता

मानसिक आरोग्य सेवा कायदा (2017) भारतातील मानसिक आरोग्याची स्थिती सुधारण्यासाठी अनेक तरतुदी करते. हा कायदा मानसिक आरोग्य सेवा कायदा, 1987 रद्द करतो ज्यावर मानसिक आजार असलेल्यांचे अधिकार आणि एजन्सी ओळखण्यात अपयशी ठरल्याबद्दल टीका केली गेली (मिश्रा आणि गल्होत्रा 2018). यामध्ये 'आरोग्य' म्हणून मानसिक आरोग्यसेवेचा अंतर्भाव केलेला आहे; आणि केंद्रीय आणि राज्य मानसिक आरोग्य प्राधिकरण (SMHA) ची स्थापना करणे, जे मानसिक आरोग्य व्यवसायींची नोंदणी आणि सेवा-वितरण निकष लागू करण्याबरोबर भक्कम पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर भर देईल. कायदा मंजूर झाल्याच्या नऊ महिन्यांत राज्यांना SMHA स्थापन करणे आवश्यक असले तरी 2019 पर्यंत 28 पैकी फक्त 19 राज्यांनी SMHAची स्थापना केलेली आहे.

राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम (NMHP)  हे 1982 मध्ये, WHO च्या शिफारशी लक्षात घेऊन, सामान्य आरोग्य सेवा प्रणालीचा एक भाग म्हणून मानसिक आरोग्य सेवा पुरवण्यासाठी सादर करण्यात आले. जरी हा कार्यक्रम सामुदायिक स्तरावर मानसिक आरोग्य सेवांमध्ये सुधारणा करण्यात यशस्वी झाला असला तरी, संसाधन मर्यादा आणि अपुऱ्या पायाभूत सुविधांनी त्याचा प्रभाव मर्यादित झाला होता (गुप्ता आणि सागर 2018).

विकसित देश मानसिक आरोग्यासाठी त्यांच्या वार्षिक आरोग्यसेवेच्या बजेटच्या 5-18% वाटप करतात, तर भारत अंदाजे 0.05% वाटप करतो (आर्थिक सहकार्य आणि विकास संस्था, 2014). 2018 आणि 2019 मध्ये, वार्षिक अर्थसंकल्पात राष्ट्रीय मानसिक आरोग्य पुनर्वसन संस्थेवरील खर्चाचाही समावेश होता. मानसिक आरोग्य क्षेत्रात मानव संसाधन आणि संशोधनाच्या दृष्टीने क्षमता वाढवण्याच्या उद्देशाने 2018 मध्ये संस्थेला मंजुरी देण्यात आली. याव्यतिरिक्त, सरकार दरवर्षी आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाअंतर्गत लोकप्रिया गोपीनाथ बोर्डोलोई प्रादेशिक मानसिक आरोग्य संस्था (तेजपूर) आणि निमहांस (NIMHANS) यांना निधी वाटप करते. जरी निमहांस आवश्यक असलेल्या सर्वांना परवडणारी आणि सुलभ मानसिक आरोग्य सेवा देण्याचे वचन देत असले, तरी हे प्रयत्न अपुरे आहेत कारण निमहांस एकाच शहरात (बेंगळुरू) कार्यरत आहे.

मानसिक आरोग्य म्हणजे काय?

मानसिक आरोग्य ही मानसिक कल्याणाची स्थिती असून ती लोकांना जीवनातील ताण-तणावांचा सामना करण्यास, त्यांच्या क्षमता ओळखण्यास, चांगले शिकण्यास आणि चांगले काम करण्यास आणि त्यांच्या समुदायासाठी योगदान देण्यास सक्षम बनविते. निर्णय घेण्यासाठी, नातेसंबंध निर्माण करण्यासाठी आणि आपण राहत असलेल्या जगाला आकार देण्याच्या आपल्या वैयक्तिक आणि सामूहिक क्षमतेला आधार देण्यासाठी मानसिक आरोग्य आणि जीवन-कल्याण हे अविभाज्य घटक आहेत. मानसिक आरोग्य हा मूलभूत मानवी हक्क आहे आणि तो वैयक्तिक, सामुदायिक आणि सामाजिक-आर्थिक विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. मानसिकदृष्ट्‍या आरोग्यपूर्ण व्यक्तीची लक्षणे खालीलप्रमाणे (WHO).

मानसिकदृष्ट्‍या आरोग्यपूर्ण व्यक्ती

  • मानसिकदृष्ट्या निरोगी व्यक्तीमध्ये समायोजन करण्याची क्षमता असते.
  • मानसिकदृष्ट्या निरोगी व्यक्तीला वैयक्तिक मूल्याची जाणीव असते, ती योग्य आणि महत्त्वाची वाटते.
  • एक मानसिकदृष्ट्या निरोगी व्यक्ती त्याच्या समस्या शक्यतो स्वतःच्या प्रयत्नांनी सोडवते आणि स्वतःचे निर्णय स्वतः घेते.
  • अशी व्यक्ती एकटी असताना आणि समूहात असताना भावनिकदृष्ट्या सुरक्षित असते, इतर लोकांच्या समस्या आणि हेतू समजून घेते.
  • मानसिकदृष्ट्या निरोगी व्यक्तीला जबाबदारीची जाणीव असते.
  • अशी व्यक्ती प्रेम देऊ शकतो आणि स्वीकारू शकतो.
  • अशा व्यक्ती कल्पनेपेक्षा वास्तव जगात राहत असतात.
  • अशा व्यक्ती आपल्या वर्तनातून भावनिक परिपक्वता दाखवतात आणि त्यांच्या दैनंदिन कामात निराशा आणि अपेक्षाभंग सहन करण्याची क्षमता विकसित करतात.
  • मानसिकदृष्ट्या निरोगी व्यक्तीस विविध प्रकारच्या आवड-निवडी असतात आणि सामान्यत: काम, विश्रांती आणि मनोरंजनाचे संतुलित जीवन जगत असतात.

निरोगी व्यक्ती केवळ शारीरिकच नव्हे तर मानसिकदृष्ट्याही निरोगी असते. याचा अर्थ मानसिक आरोग्याशिवाय शारीरिक आरोग्य असूच शकत नाही. आरोग्याची आधुनिक संकल्पना ही शरीराच्या योग्य क्रियाशीलतेवर अवलंबून आहे. यात एक निकोप, कार्यक्षम मन आणि नियंत्रित भावनांचा समावेश आहे. शरीर आणि मन दोन्ही कार्यक्षमतेने आणि एकजुटीने काम करत आहेत असा त्याचा अर्थ होतो. आपण सर्वजन मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने मानसिक आरोग्यपूर्ण जीवन जगण्यास सक्षम बनू या.

समारोप:

बदलत्या जीवनशैलीमुळे सर्वांनाच मानसिक तणावाला सामोरे जावं लागत आहे. स्टिग्मा, डिमेंशिया, हिस्टीरिया, चिंता, आत्महीनता यांसारख्या आजारांचा त्यामुळे सामना करावा लागत आहे. मानसिक आजारावर किंवा समस्यांवर वेळीच तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरु शकतो. मानसिक आरोग्य दिनाच्या निमित्ताने लोकांमध्ये मानसिक आरोग्याची जनजागृती करण्यासाठी आपण सगळे एकत्र येऊ या. तसेच मित्रपरिवार, नातलग आणि सामाजिक संस्था यांना सामावून घेऊन सर्वांचे मानसिक आरोग्य निरोगी राहील यासाठी प्रयत्न करू या. आपणास मानसिक आरोग्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा!


(सर्व छत्रे, इमेजेस Google वरून साभार)

संदर्भ:

Gupta, Snehil and Rajesh Sagar (2018), “National Mental Health Programme-Optimism and Caution: A Narrative Review”, Indian Journal of Psychological Medicine, 40 (6): 509-516. Available here.

India State-Level Disease Burden Initiative Mental Disorders Collaborators (2020), “The burden of mental disorders across the states of India: the Global Burden of Disease Study 1990–2017”, The Lancet Psychiatry, 7(2): 148-161. 

International Labour Organization (2020), ‘Youth and Covid-19: Impact on jobs, education, rights, and mental well-being’, Survey Report. 

Mishra, A. and Galhotra, Abhiruchi (2018), “Mental Healthcare Act 2017: Need to Wait and Watch”, International Journal of Applied and Basic Medical Research, Vol. 8/2 pp. 67-70.

National Institute of Mental Health and Neuro Sciences (2016), ‘National Mental Health Survey of India, 2015-16: Summary’, Survey Report.

Singh, O.P. (2018). District Mental Health Program - Need to look into strategies in the era of Mental Health Care Act, 2017 and moving beyond Bellary Model, Indian Journal of Psychiatry, Vol. 60/2 pp. 163-164. 

The Live Love Laugh Foundation (2018).How India perceives mental health’, National Survey Report. 

WHO (2022). Mental health: strengthening our response. World Health Organization. Retrieved September 30, 2022, from https://www.who.int/en/news-room/fact-sheets/detail/mental-health-strengthening-our-response

 

सोमवार, १२ सप्टेंबर, २०२२

जगणं मात्र राहून गेलं | Top five regrets of the dying

 

जगणं मात्र राहून गेलं | Top five regrets of the dying

मरण्यापूर्वी व्यक्तीचा जीवन प्रवास हा फ्लॅशबॅक सारखा निघून जातो. जरा विचार करा की हा फ्लॅशबॅक जर पश्चातापाने भरलेला असेल तर तो किती वेदनादायी असेल. काश मी काही बदल करू शकलो असतो तर......... प्रत्येक व्यक्तीच्या काही ना काही इच्छा असतात. त्यापैकी काही लोकांच्या इच्छा पूर्ण होतात, तर काही लोकांच्या इच्छा या अपूर्णच राहतात. पण बहुतांश व्यक्तीची मृत्यूपूर्वी शेवटची इच्छा काय आहे हे विचारले जाते. प्रत्येक व्यक्ती त्याच्या इच्छेनुसार ती गोष्ट आपल्या जवळच्या लोकांना सांगत असते. पण एका परिचारिकेने मृत्यूबद्दल सर्वसामान्य असे पश्चात्ताप नोंदविलेले आहेत. ब्रॉनी वेअर ही एक ऑस्ट्रेलियन परिचारिका आहे जिने अनेक वर्षे उपशामक काळजी विभागामध्ये रुग्णांच्या आयुष्याच्या शेवटच्या काही आठवड्यांमध्ये त्यांची काळजी घेण्याचे काम केले. उपशामक काळजी विभागात रोगाची तीव्रता किंवा वेदना कमी करण्याचे काम केले जाते. तिने इन्स्पिरेशन आणि चाई नावाच्या ब्लॉगवर रुग्णांच्या मृत्यूच्या अगोदर त्यांच्याकडून ऐकलेला दिव्यत्वाचा किंवा अलौकिक अस्तित्वाचा साक्षात्कार प्रकट केला, या लेखन प्रपंचाने इतके लक्ष वेधले की तिने तिची निरीक्षणे द टॉप फाइव्ह रिग्रेट्स ऑफ द डायिंग (2012) नावाच्या पुस्तकात नोंदविलेली आहेत.

      ब्रॉनी वेअर यांनी रुग्णांच्या शेवटच्या आयुष्यातील प्राप्त झालेली दृष्टी अभूतपूर्व स्पष्ट केल्याबद्दल आणि त्यांच्या शहाणपणापासून आपण काय आणि कसे शिकू शकतो याबद्दल लिहिलेले आहे. जेव्हा रुग्णांना कोणत्याही पश्चात्तापाबद्दल किंवा आपले जीवन वेगळ्या पद्धतीने जगण्याबद्दल विचारले असता, त्यांनी दिलेल्या माहितीमधून काही सर्वसामान्य कल्पना पुन्हा पुन्हा समोर आल्या. सदर निरीक्षणे नोंदवत असताना प्रत्येक रुग्ण वेगळा होता पण त्यांच्या पश्चातापामध्ये एकसमानता दिसून आली त्यातूनच ब्रॉनी वेअरने, मृत्यूशय्येवरील रुग्णांच्या प्रमुख पाच पश्चात्ताप पुढील प्रमाणे सांगितलेल्या आहेत:

1. इतरांच्या अपेक्षेप्रमाणे जीवन जगण्यापेक्षा, स्वत:च्या इच्छेप्रमाणे जीवन जगण्याचे धैर्य दाखविले असते तर...........

लोक काय म्हणतील या एका वाक्याने अनेक लोकांचे जीवन खराब केलेले आढळते. अनेक लोकामध्ये ही सर्वसामान्य खंत होती. जेव्हा लोकांना समजते की त्यांचे आयुष्य जवळजवळ संपले आहे आणि ते स्पष्टपणे मागे वळून पाहतात, तेव्हा किती स्वप्ने अपूर्ण राहिली आहेत हे सहज लक्षात येते. बहुतेक लोकांनी त्यांच्या अर्धवट स्वप्नांचाही सन्मान केला नव्हता आणि ते त्यांनी केलेल्या किंवा न केलेल्या निवडीमुळे घडत आहे हे जाणून मरण पत्करावे लागले. असले कपडे घालून नकोस लोक काय म्हणतील... ही शाखा निवडू नकोस लोक काय म्हणतील... हा जोडीदार निवडू नकोस लोक काय म्हणतील... हे करू नकोस, ते करू नकोस लोक काय म्हणतील... यातच अनेक लोकांचे खरे जगणे राहून जाते. पण 3 इडीयटस मधील फरहान सारखी हिम्मत करून एकदा बोलून तर बघा; आपलं मन हलक होईल. चांगल्या आरोग्यामुळे जीवन जगण्याचे स्वातंत्र्य मिळते हे फार कमी लोकांना जाणवले होते,  हे जेंव्हा कळले तोपर्यंत त्यांचे आरोग्य त्यांच्या हातून निसटून गेलेलं होत. यावरून खालील चार ओळी अलगद ओठावर येतात.

आज उद्या म्हणता म्हणता

खूप काही करायचं राहून गेलं

आयुष्य निसटलं हातून

मात्र जगायचं राहून गेलं......

2. मला असे वाटते की मी इतके कठोर परिश्रम केले नसते तर........

ब्रॉनी वेअरने देखभाल केलेल्या प्रत्येक पुरुष रुग्णाकडून अशी प्रतिक्रिया आलेली आहे. जीवनातील कठोर परिश्रमामुळे त्यांनी त्यांच्या मुलांचे बालपण, तारुण्य आणि त्यांच्या जोडीदाराचा सहवास गमावला आहे. याचा अर्थ आपण कठोर परिश्रम करू नका असे लेखिकेला म्हणायचे नाही. उलट आपल्या जीवनातील अमूल्य क्षणांना मुकावे लागेल असा करंटेपणा करू नका. महिलांही या खेदाबद्दल बोलल्या, परंतु त्या बहुतेक जुन्या पिढीतील असल्याने, बऱ्याच महिला रुग्णांना पैशाची कमतरता होती. ज्या पुरुषांची मी काळजी घेतली त्या सर्व पुरुषांना त्यांचे संपूर्ण आयुष्य काम आणि अस्तित्वाच्या ट्रेडमिलवर घालवल्याबद्दल अंत्यतिक पश्चाताप वाटत होते. जर त्यांची ही खंत शब्दबद्ध केल्यास खालील ओळी उमटतील.......

दूर गेलेल्या सा-यांनाच एकत्र गोळा करायचं राहून गेलं

हरवलेल्या आठवणींची छान मैफिल जमवायच राहून गेलं

दु:ख सारी विसरून आनंदाने नाचायचं राहून गेलं

स्वप्न सारी एकत्र करून जीवन जगायचं राहून गेलं.........

3. मला मा‍झ्या भावना व्यक्त करण्याचे धैर्य मिळाले असते तर............

अनेक रुग्णांनी इतरांसोबत शांततापूर्वक जीवन जगण्यासाठी स्वतःच्या भावना दाबून टाकल्या. परिणामी, ते इतरांच्या अस्तित्वासाठी स्वत:चे जीवन वाहून घेतले आणि ते जे बनण्यास सक्षम होते ते कधीही बनले नाहीत. जे आहे ते रोखठोक पण इतरांना न दुखावता व्यक्त केले असते तर बरे झाले असते अशी खंत राहून गेली. परिणामी त्यांच्यामध्ये कटुता आणि रागाशी संबंधित अनेक आजार जडले. राग तुम्हाला लढा-किंवा-पळा स्थितीमध्ये आणतो, ज्यामुळे हृदय गती, रक्तदाब आणि रोगप्रतिकारक शक्तीच्या प्रतिसादात असंख्य बदल होतात. ते बदल नंतर नैराश्य, हृदयरोग आणि मधुमेहाचा धोका वाढवतात. त्यामुळे योग्य शब्दात, योग्य वेळी, योग्य पद्धतीने, योग्य व्यक्तीसमोर व्यक्त व्हायला शिका नाहीतर जीवनाच्या शेवटी  आपल्या भावना व्यक्त करण्यासाठी खालील ओळी गुनगुनाव्या लागतील............

सगेसोयरे सांभाळताना

मनातील आस विरून गेले 

आयुष्याच्या अंती मागे पाहताना

आपले खरे जगणेच राहून गेले….........

4. मी मा‍झ्या मित्रांच्या संपर्कात राहिलो असतो तर..........

खरा मित्र अडचणीत योग्य वाट दाखवतो, सुखात आनंदी होतो, दुःखात गहिवरून जातो, वेळ प्रसंगी खंबीर होऊन साथ देतो, ढासळताना तोल सावरतो, अडखळताना पावलांना बळ देतो, आपल्या आनंदाच्या क्षणात हाच भारावून जातो. अनेकांना खऱ्या मित्रांचे फायदे त्यांच्या मृत्यूच्या आठवड्यांपर्यंत कळले नाहीत आणि त्यांचा मागोवा घेणे नेहमीच शक्य नव्हते. अनेकजण त्यांच्या स्वतःच्या आयुष्यात इतके अडकले होते की त्यांनी मैत्रीचे सोनेरी क्षण वर्षानुवर्षे निसटू दिली होती. मैत्रीला त्यांनी योग्य वेळ आणि मेहनत न केल्याने खूप खेद वाटत होता. प्रत्येकजण मरत असताना आपल्या मित्रांना खूप मिस करत होते. जर त्या रुग्णांना आपल्या मित्रा बद्दलच्या भावना व्यक्त करण्याची संधी मिळाली असती तर............

जो आपल्या प्रत्येक क्षणाचा सोबती असतो,

आपल्या प्रत्येक भल्याबुऱ्या कर्माचा साथी असतो

आयुष्यातील सगळे गुण दुर्गुण निभावुन नेईल

अशा खऱ्या मित्रासोबत जगायचे राहून गेले ...........

5. मला असे वाटते की मी स्वतःला अधिक आनंदी होऊ दिले असते तर..........

हे सर्वसामान्यपणे सर्व रुग्णांमध्ये आश्चर्यकारकपणे आढळून आलेले सत्य आहे. अनेकांना शेवटपर्यंत कळले नाही की आनंद ही एक निवड आहे. अनेकजण जुन्या रूढी परंपरा आणि सवयींमध्ये अडकलेले होते. नेहमीचा तथाकथित 'आराम' त्यांच्या भावनांमध्ये, तसेच त्यांच्या भौतिक जीवनात ओसंडून वाहत होता. बदलाच्या भीतीने ते इतरांसमोर आणि स्वतःशीदेखील असे ढोंग करत होते की ते समाधानी आहेत, जेव्हा त्यांनी स्वतःशी सुसंवाद साधला तेंव्हा त्यांना असे लक्षात आले की आपण मनमुराद कधी हसलो होतो? एखादा उनाड दिवस स्वतःसाठी जगलो होतो? आजच्या धकाधकीच्या जीवनात स्वतःसाठी वेळ काढणं फारच अवघड झालंय. तरीही दिवसभर काम केल्यावर थोडासा विरंगुळा म्हणून आपण आपले छंद जोपासायचे प्रयत्न करतोच ना. मृत्युच्या दारात उभ्या असलेल्या एखाद्या व्यक्तीकडून जर आणखी एखादा बंगला बांधला असता, जमीन जुमला घेतला असता, नवीन दागिने घेतले असते असे शब्द आपण ऐकलेत का? तर याचे उत्तर शक्यतो नाही असेच असेल. कारण मृत्युसमयी भौतिक गोष्टीपेक्षा आपल्या आसपास असणाऱ्या, आपण करू शकलो नाही अशाच गोष्टींचा पश्चाताप केला जातो.    आनंदाची व्याख्या करण तसं जिकिरीच काम आहे, पण एका कवीने आपला जीवनपट खालील काही ओळीमध्ये मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे.

डोळ्यात दाटून भावना सारे मलाच पाहत होते

कितीतरी ओळखी अनोळखी चेहरे त्यात होते

कधी नव्हे ते आज सार गाव मला पाहून गेल

मरता मरता सहज कळाल जगणं आपलं राहून गेल

आयुष्यात नागमोडी वळणाना मी खुपदा पाहील होत

जे क्षण होते निसटले त्यांना पुन्हा जगायचं होत

शेवटच्या श्वासात डोळ्यांसमोरून जीवन सार धावून गेलं

मरता मरता सहज कळाल जगणं आपलं राहून गेल

घरच्यांची स्वप्ने आज सारी एकदम चूर झाली

कोणी तरी म्हणाला नियती इतकी क्रूर का झाली

माझं त्यांच्यातून जान घरच्यांना घोर लावून गेलं

मरता मरता सहज कळाल जगणं आपलं राहून गेल

खोटा मान सन्मान यांना मी माझा म्हणालो

आयुष्यभर अपेक्षांचे केवळ ओझेच वाहत आलो

शेवटी खांदे पालटत लोकांनी प्रेत स्मशानापर्यंत वाहून नेलं

जळता जळता परत आठवलं जगणं आपलं राहून गेल.....

जीवन सुंदर आहे, अनुभव तुम्हास येत जाईल. प्रयत्न करायला विसरू नका; मार्ग तुम्हांला सापडत जाईल. जीवन ही रंगभूमी आहे, जीवन म्हणजे दोन घडीचा डाव आहे. जीवन हा एक संघर्ष आहे. अशा जीवनाच्या अनेक व्याख्या थोर पुरुषांनी केलेल्या आहेत. आपले जीवन ही एक अनुभव सरिता आहे. प्रत्येक व्यक्तीचे जीवनाविषयीचे मत हे स्वत:ला येणार्‍या अनुभवांवर अवलंबून असते. जीवनात चढउतार हे हटकून असतात कारण जीवन म्हणजे ऊन-सावलीचा खेळ असतो. सतत सुख किंवा सतत दु:ख असे क्वचितच आढळते. जाईल त्या क्षेत्रात कोणी मागे तर कोणी पुढे अशी स्थिती आढळते. आपण गतिमान असावे व प्रगतिपथावर राहावे. ही प्रक्रिया सुरू होण्यात व चालू राहण्यात जीवनाचे खरे सार्थक आहे. खरे म्हणजे जगण्याइतक आनंददायक असे जीवनात काहीच नाही. शेवटी मला एवढेच म्हणावेसे वाटते की कितीही आणि कसेही जगलो  तरीही जीवन अजून जगायचे राहिले कारण खर जगण मात्र राहून गेलं...........

जीवन हा न संपणारा प्रवास आहे!

त्यामुळे जीवनात काहीही कमवा पण पश्चाताप मात्र कमवू नका.


References

Ware, Bronnie (2012). Top five regrets of the dying: A Life Transformed by the Dearly Departing, California: Hay House

वेअर, ब्रॉनी (2022). द टॉप फाइव्ह रिग्रेट्स ऑफ द डायिंग (अनुवादक: नंदापुरकर-फडके, सुचिता) भोपाळ: मंजुळ पब्लीशिंग हाउस 

गुरुवार, १८ ऑगस्ट, २०२२

नातेसंबंधातील हाताळणी | मॅनिप्युलेशन | manipulation

 

आपल्या नकळत आपला वापर होत तर नाही ना?

आपणाला कधीकधी गोंधळलेल्यासारखे वाटते का? कधीकधी आपल्या हातून काही चुकीच्या गोष्टी घडल्यामुळे अपराधीपणाची भावना जाणवते का? कोणीतरी तुमच्या भावनाशी नकळत खेळत आहे आणि तुम्हाला ते माहित देखील नाही? असे काही आपल्याबाबत घडत आहे का? कोणत्यातरी कारणाने तुमचा गैरवापर केल्याने केवळ तुमचे नातेच खराब होत नाही, तर तुमच्या मानसिक आरोग्यावरही त्याचा नकारात्मक परिणाम होऊ शकतो. नातेसंबंधातील भावनिक हाताळणी (मॅनिप्युलेशन) ओळखणे कठीण असले तरी, हाताळणीची छुपे संकेत ओळखता आल्यास आपल्याला स्वतःचे संरक्षण करण्यात मदत होऊ शकते आणि असलेले नातेसंबंध सदृढ करता येते.

नातेसंबंधातील भावनिक हाताळणी

भावनिक हाताळणी हे एक प्रकारचे असामाजिक वर्तन आहे आणि त्यात शब्द, वर्तन, कृती आणि वगळणे समाविष्ट आहे जे तुमचे विचार, भावना आणि वर्तन नियंत्रित आणि विकृत करतात. हे स्वतःला, तुमच्या प्रियजनांना आणि तुमच्या सभोवतालचे जग तुम्ही कसे पाहता यावर परिणाम करू शकते. सतत हाताळणी केल्याने तुमच्या आत्मसन्मानावर नकारात्मक परिणाम होतो आणि दीर्घकाळासाठी तणाव, चिंता आणि नैराश्य येऊ शकते. आपणही हाताळले जात आहात का? हे खालील काही प्रश्नांच्या सहाय्याने जाणून घेऊ या.

1. आपणास नेहमी अपराधीपणा वाटतो का?

तुम्हाला प्रत्येकवेळी असे वाटते की नेहमी तुमचीच चूक असते? आपणास हाताळणारे अनेकदा त्यांना हवे ते मिळवण्यासाठी गिल्ट-ट्रिपिंगचा वापर करतात. तुमचे विचार, भावना आणि वर्तन बदलण्यासाठी ते त्यांच्या चुकांसाठी तुम्हाला जबाबदार धरतात.  ते आपल्या स्वतःच्या कृतींचे समर्थन करण्यासाठी सत्य लपवून, आपण नेहमी चुका करत आहात यावर विश्वास ठेवण्यासाठी आपल्या प्रयत्नांना दुय्यम लेखले जाते. तुम्हाला असे वाटते का, की काहीही झाले तरी तुम्ही कधीही काहीही करू शकत नाही. याचे कारण तुम्हाला कोणीतरी त्यांच्या कामासाठी वापरून घेत आहेत.

2. आपल्यावर सतत टिकाटिप्पणी केली जाते का?

तुमचा जोडीदार, बॉस, मित्रमैत्रिणी किंवा कुटुंबातील इतर सदस्य तुम्ही करत असलेल्या प्रत्येक गोष्टीवर टिकाटिप्पणी करतात का? तुम्ही एखाद्या गोष्टीवर कितीही कठोर परिश्रम करत असलात तरी, आपणास हाताळणारे तुमच्यावर टीका करण्यास किंवा ती गोष्ट ते किती चांगल्या प्रकारे करू शकले असते हे दाखवण्यास कधीही कचरत नाहीत. ते तुम्हाला सतत जाणवून देतात की तुम्ही त्यांच्यापेक्षा कनिष्ठ आहात आणि ते तुमच्यापेक्षा श्रेष्ठ आहेत. कपडे, घर, नोकरी, जोडीदार किंवा साधे चप्पल यातही ते काहीतरी चूक दाखवून आपण कसे टापटीप किंवा सरस आणि तुम्ही किती तकलादू हे दाखविण्याचा नेहमी प्रयत्न सुरु असतो.

3. तुमचा स्व-आदर कमी झाला आहे का?

तुम्ही स्वत:ला कमकुवत मानता का? तुमच्यात आत्मविश्वास कमी आहे असे तुम्हाला वाटते का? तुम्हाला हाताळणारे नेहमी तुमचा आत्मविश्वास तोडण्यावर भर देत असतात कारण त्यांना त्यामुळे तुमच्यावर नियंत्रण ठेवणे सोपे होईल. म्हणूनच ते तुम्हाला त्यांच्यापेक्षा कनिष्ठ दर्जाचे वाटण्यासाठी वेगवेगळ्या रणनीती वापरतात. ते तुम्हाला नेहमी जाणीव करून देत असतात की, तुम्ही तुमची योग्यता सिद्ध करणे आवश्यक आहे आणि तुम्ही नेहमी प्रत्येक गोष्टीसाठी त्यांचे प्रमाणीकरणाचे सर्टिफिकेट घेणे आवश्यक असते. ते तुमच्यावर सत्ता गाजण्यासाठी तुम्हाला कमी लेखतात कारण ते तुम्हाला त्यांच्या समान मानत नाहीत. ते तुमचा स्वाभिमान भंग करतात म्हणून, तुम्ही त्यांना हवे असलेले सराव काही करायला लागता, कारण संघर्ष टाळण्यासाठी आणि स्वतःच्या नैसर्गिक भावना व्यक्त करण्यापासून थांबवता. कशाला वाद घाला, जाऊदे ही कटकट म्हणून नेहमी त्यांच्यासाठी राबत असता.

4. तुम्हाला तुमच्या विवेकशक्तीवर शंका आहे का?

तुम्ही तुमच्या मानसिक आरोग्याबाबत चिंता व्यक्त करण्यास सुरुवात केली आहे का? तुमचे वागणे इतरापेक्षा वेगळे आहे असे तुम्हाला वाटते का? आहारी जाणे (गॅसलाइटिंग) ही एक धोकादायक हाताळण्याची युक्ती आहे जी हाताळण्याऱ्याकडून वापरली जाते ज्यामुळे तुम्हाला स्वतःबद्दल आणि तुमच्या वास्तविकतेवर शंका येते. जेव्हा तुमचा हाताळणारा तथ्ये फिरवतो किंवा तुम्ही त्यांचा सामना करता तेव्हा ते पूर्णपणे नाकारतात तेव्हा तुम्ही पूर्णपणे त्यांच्या आहारी गेलेले असता. ते तुम्हाला पटवून देतात की तुम्ही घटना चुकीच्या लक्षात ठेवत आहात किंवा तुमच्या डोक्यात गोष्टी तयार करत आहात, तुम्हाला तुमच्या स्वतःच्या विचारांवर, आठवणींवर, भावनांवर आणि निर्णयांवर शंका घेण्यास भाग पडतात. गॅसलाइटिंगमुळे तुम्ही गोंधळलेले, तणावग्रस्त, चिंताग्रस्त, असुरक्षित आणि शंकेच्या विचारांनी त्रस्त असता.

5. तुमची तुलना नेहमी इतर लोकांशी केली जाते का?

तुमचा जोडीदार, पालक, मित्रमैत्रिणी किंवा बॉस सतत तुमच्या प्रयत्नांची किंवा यशाची तुलना दुसऱ्या कोणाशी तरी करतात का? तुमची इतरांशी तुलना करणे ही तुम्हाला कमीपणाची जाणीव करून देण्यासाठी आणि तुमचा आत्मविश्वास भंग करण्यासाठी एक छुपी हाताळणी असते. अशा तुलनेतून इतर तुमच्यापेक्षा चांगले कसे करत आहेत आणि तुम्ही नेहमीच अपेक्षा भंग कसे करता हे हाताळणाऱ्याला तुम्हाला दाखवून द्यायचे असते. जेणेकरून आपण त्यांची प्रत्येक गोष्ट ऐकली पाहिजे आणि त्यांच्या मतानुसार वागले पाहिजे.

6. हाताळणी करणारे तुमच्यावर अतिप्रेम करतात का?

तुमचा जोडीदार तुमच्यावर नेहमीच प्रेम, कौतुक आणि लक्ष देतो का? जरी ते चांगले वाटत असले तरी, तुम्हाला वाटते की ते अनावश्यक आहे? प्रेमाचा वर्षाव (लव्ह बॉम्बिंग) हे तुमच्या भावनांवर प्रभाव टाकण्यासाठी आणि तुम्हाला हाताळणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून राहण्याचे तंत्र आहे. तुमच्यावर अधिकचे लक्ष आणि आपुलकी दाखवून, तुमचा मॅनिप्युलेटर तुमचे विचार आणि भावना हायजॅक करण्याचा प्रयत्न करतो आणि तुम्हाला पाहिजे त्यापेक्षा लवकर नातेसंबंधात अडकविण्याचा प्रयत्न करतो. जसजसे तुम्ही त्यांना अधिक गांभीर्याने घेता आणि त्यांच्यावर अवलंबून राहता, ते नातेसंबंधात अधिक मागणी करणारे आणि अपमानास्पद वागतात. ते तुमच्यावर प्रेमाचा वर्षाव करून तुमचा विश्वास संपादन करतात आणि जेव्हा तुम्ही त्यांच्यावर विश्वास ठेवण्यास सुरुवात करता तेव्हा ते त्यांना हवे तसे करायला भाग पडतात.

7. तुमच्या असुरक्षिततेचे शोषण करतात असे वाटते का?

कोणीतरी आपल्या भीतीचा उपयोग त्यांच्या फायद्यासाठी करत आहे का? तुमचा आत्मविश्वास तोडण्यासाठी तुमची सर्वात मोठी कमकुवतता, दोष आणि असुरक्षितता कशी ओळखायची हे मॅनिपुलेटरला नेहमी कळत असते. ते हेतुपुरस्सर तुमच्यावर टीका करतील किंवा इतरांसमोर तुमच्या दोषांबद्दल बोलतील किंवा जेव्हा तुम्हाला एखाद्या गोष्टीची भीती किंवा असुरक्षितता वाटत असेल तेव्हा तुमची भीती आणि असुरक्षितता अधिकच अधोरेखित करतात. तुम्ही त्यांच्या तुलनेत किती कमकुवत आहात हे दाखवण्यासाठी, ते तुमच्या दोषांचा आणि भीतीचा वापर तुम्हाला दुखावण्यासाठी आणि अपमान करण्यासाठी करतात. तुम्हाला अस्वस्थ आणि असुरक्षित करून ते तुमचा फायदा घेतात. आपण अशा लोकांपासून सावध झाले पाहिजे, त्यांच्यापासून सुरक्षित अंतर ठेऊन नातेसंबंध जपले पाहिजेत. तर यासाठी खालील काही मार्ग आपणास मदतगार ठरू शकतील.

हाताळणी करण्याऱ्यापासून स्वतःचा बचाव कसा करावा?

तुमची होणारी फसवणूक आणि शोषण नष्ट होऊन तुमचे नाते मजबूत करू इच्छित आहात का? हाताळणी थांबवण्याचे काही मार्ग खालीप्रमाणे:

  • तुमच्या स्वाभिमानावर काम करा. हाताळणी करणाऱ्या बर्‍याच लोकांमध्ये एक प्रकारची असुरक्षितता असते. स्वत:वर लक्ष केंद्रित करण्याचा सराव करून पहा जसे की, काही नवीन कपडे खरेदी करा किंवा एखाडी मजेदार गोष्ट करून किंवा नवीन प्रोडक्ट वापरून पहा.
  • परिपूर्णतेच अट्टाहास सोडा. प्रवाहाबरोबर जायला शिका. सर्व काही तुमच्या नियंत्रणात नाही आणि स्वतःला त्याची नियमितपणे आठवण करून द्यावी लागेल.
  • काहीतरी नवीन शिका. नवीन छंद शोधा आणि तुम्ही यापूर्वी कधीही न केलेले काहीतरी करून पहा. हे तुम्हाला तुमच्या नातेसंबंधांवर कमी आणि तुमच्या  आवडीनिवडीवर अधिक लक्ष केंद्रित करण्यास मदत करेल.
  • चिंता कमी करण्याचा प्रयत्न करा. ध्यान आणि योगासने चिंतेसाठी चमत्कार ठरू शकतात. जेव्हा तुम्हाला असुरक्षित वाटत असेल तेंव्हा इतर उपचारांच्या संयोगाने या पद्धतीचा वापर करून तुमच्या मनाला आणि शरीराला आरोग्यपूर्ण ठेवण्यास मदत करू शकतात.
  • व्यायाम करा. आपणास दैनंदिन कार्यासाठी काही सेरोटोनिनची आवश्यकता असते. ट्रेडमिलवर जा किंवा तुमचा मूड सुधारण्यासाठी तुमचा आवडता व्यायाम करा आणि तुमचे लक्ष स्वतःला सुधारण्याकडे वळवा.
  • समुपदेशकाकडे जा. मानसशास्त्रीय समुपदेशनात प्रामुख्याने अशा लोकांशी डील करतात ज्यांना दैनंदिन जीवनात अडचणी येतात. जसे वैयक्तिक जीवन आणि कौटुंबिक त्रास, शाळेतील खराब कामगिरी, आत्मविश्वासाचा आणि आत्म-सन्मान यांचा अभाव, निर्णय घेताना संकोच, परस्पर संबंध प्रस्थापित करण्यात आणि टिकवून ठेवण्यात अडचणी इ.
  • थेरपीकडे जा. थेरपीचा फायदा सर्वांना होऊ शकतो, परंतु विशेषत: टोकाचे वर्तन असणाऱ्या व्यक्तींना याचा फायदा अधिक होतो. एखाद्या असामाजिक किंवा अपसामान्य वर्तनाला सामान्य बनविण्यासाठी याचा वापर सर्रास केला जातो.
  • इतरांचा आदर करा. इतरांच्या सीमा आणि वैयक्तिक जागा ओळखा. वादाच्या वेळी इतरांचा आदर बाळगा आणि शक्य तितक्या तर्कसंगत राहण्याचा प्रयत्न करा.
  • बोलण्या अगोदर ऐका. जेव्हा कोणी तुम्हाला सांगत असेल की तुम्हाला त्यांना कसे वाटते, तेव्हा लक्ष द्या आणि लक्षपूर्वक ऐकून झाल्यावर आपले मत शांतपणे मांडा.

त्यामुळे वेळीच सावध व्हा, स्व-आदर जपा, आपल्या कमकुवत बाजू केवळ विश्वासू व्यक्तिनाच सांगा, आपल्या भावनांचे प्रकटीकरण सर्वासमोर करून नका कारण असे काही लोक त्याचा बाजार मांडतात. स्वतःची काळजी घ्या, स्वत:ला ओळख आणि कोणाच्याही आहारी जाऊ नका. थोडेसे डोळस व्हा त्यासाठी ठेच लागलीच पाहिजे असे काही नाही.

(सर्व चित्रे इमेजेस Google वरून साभार)

जेंटल पालकत्व (Gentle Parenting): आधुनिक पालकत्व

  जेंटल पालकत्व ( Gentle Parenting): आधुनिक पालकत्व (सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार) आजच्या वेगवान , स्पर्धात्मक आणि तणावपूर्ण य...