रविवार, २ फेब्रुवारी, २०२०

ज्ञानरचनावाद: एक निरंतर प्रवास | Constructivism |

ज्ञानरचनावाद: एक निरंतर प्रवास

! जे सहज मिळतं ते शेवटपर्यंत टिकत नाही,
आणि जे शेवटपर्यंत टिकत ते सहज मिळत नाही !
विद्यार्थी केद्रिंत शिक्षण पद्धती असावी यावर प्रत्येक शिक्षण आयोगाने जोर दिला आहे. आजची शिक्षण पद्धती खरीच विद्यार्थी केंद्रित आहे का? असेल तर बहुंताश विद्यार्थी  केवळ मार्कांच्याच मागे का धावत आहेत (मार्क्ससाठी विद्यार्थ्यापेक्षा पालकांचाच जोर अधिक असतो). 90% पेक्षा अधिक गुण मिळविणारे अनेक विद्यार्थी विविध प्रवेश परीक्षा (CET, NEET सारख्या) किंवा स्पर्धा परीक्षेत अपयशी का ठरतात? एखादा विषय आवडतो तर दुसरा एखादा विषय का आवडत नाही? विशिष्ट विद्याशाखा (उदा. शास्त्र) घेतली म्हणजे प्रतिभाशाली; इतर विद्याशाखा कनिष्ठ असतात का? अशी अनेक मुद्दे सर्वत्र चर्चिले जात आहेत. याची सुरुवात कुटुंबापासून होते कारण घरातील मंडळी आपल्या पाल्यास कोणकोणती लेबले लावत असतात त्यावर त्याचे यशापयश अवलंबून असते.

तु मूर्ख आहेस! तुला काही जमतच नाही; ते बघ तुझे मोठे/ छोटे भावंडे कशी प्रगती करत आहेत आणि तु मठ्ठ काय करतो आहेस. ही एक बाजू आहे आणि आजकाल मुलांना विनासायास सर्व गोष्टी मिळत आहेत त्यामुळे त्यासाठी लागणारे वैयक्तिक प्रयत्न न झाल्याने त्याचे रुपांतर ज्ञानात न होता केवळ माहितीमध्येच राहून जाते. मेंदूमध्ये त्या विषयीचे अनुभवाचे ठसे (schema) वरवरचे राहतात. त्यासाठी ज्ञानरचनावादी विचारप्रवाह समजावून घेणे गरजेचे वाटते. त्याची सुरुवात आकृतिबंध समजावून घेऊन करू या.

आकृतिबंध (Schemas): आपल्या जीवनात तसेच शैक्षणिक वातावरणात आपणास अनेकविध अनुभव नित्य येत असतात. अशा अनुभवातून मानसिक ठसे किंवा मानसिक रचना तयार होतात. प्रत्येक व्यक्ती आपल्या पुर्वानुभावावर आधारित एक बोधात्मक आकृतिबंध तयार करते. असा आकृतिबंध पूर्वीच अस्तित्वात असलेल्या पुर्वानुभावावर आधारित असतो. अशा आकृतिबंधाचा उपयोग नवीन अनुभवांचा अर्थ लावताना केला जातो. बार्टलेट यांनी “विशिष्ट परिस्थिती किंवा प्रसंगाचे स्पष्टीकरण देण्यासाठी किंवा त्या प्रसंगी काय घडेल याचा अंदाज बांधताना उपयोगी पडणाऱ्या व त्या प्रसंगाशी संबंधीत माहिती अंतर्भूत असणाऱ्या मानसिक रचना म्हणजे आकृतिबंध” अशी आकृतिबंधाची व्याख्या दिलेली आहे. थोडक्यात आकृतिबंध म्हणजे स्मृतीत साठवलेल्या व व्यवस्थित जुळणी केलेल्या माहितीचा संचय होय. व्यक्ती असे विविध आकृतिबंध आयुष्यभर तयार करत असते.
व्यक्तीचा स्वत:विषयीचा बोध समाविष्ट असलेल्या आणि अशा बोधामुळे स्वत:विषयीच्या माहितीचे संस्करण करण्यामध्ये मदत करते त्यास स्व-आकृतिबंध असे म्हणतात. यामध्ये व्यक्तिच्या जीवनातील जन्मापासून मृत्यूपर्यंतचे सर्व अनुभव समाविष्ट असतात. एखाद्या विशिष्ट व्यक्तीविषयी किंवा समूहाविषयी तयार होणाऱ्या आकृतिबंधास व्यक्तीविषयक आकृतिबंध असे म्हणतात. उदा. शिक्षक म्हटले की तो नेहमी पुस्तकांच्या आणि ग्रंथाच्या सानिध्यात असणारी मानसिक रचना तयार होते. ठराविक भूमिका पार पाडणाऱ्या व्यक्तीकडून कोणत्या वर्तनाची अपेक्षा असते यांचा समावेश भूमिका आकृतिबंधात होतो. उदा. कुटुंबप्रमुख, गृहिणी, मुख्याध्यापक, महापौर इ. ठराविक प्रसंगी लोकांनी, व्यक्तींनी कसे वागावयास हवे, त्याप्रसंगी कोणत्या घटना घडावयास हव्या, याविषयी कांही निश्चित विचार हे घटना आकृतीबंधामध्ये असतात. लग्नसमारंभ आणि अंत्ययात्रा या दोन भिन्न घटनांमध्ये जे वातावरण आढळायला पाहिजे (PK चित्रपटातील दृश्य आठवून पहा) हे सर्व घटना आकृतिबंधामध्ये मोडते. यावरून स्व-आकृतिबंध, व्यक्ती आकृतिबंध, भूमिका आकृतिबंध आणि घटना आकृतिबंधाव्दारे आपण माहिती मेंदूमध्ये साठवत असतो.
Good आणि Brophy यांनी Bartlett (1932) ला ज्ञानरचनावादी दृष्टिकोनाचा प्रवर्तक मानले आहे. ज्ञानरचनावादी सिध्दांतामध्ये अध्ययन म्हणजे बाहय जगताशी अर्थपूर्ण आंतरक्रिया साधून स्वत:च स्वत: ज्ञानाची रचना करण्याची प्रक्रिया होय. यामध्ये  पूर्वज्ञानाच्या आधारे सक्रीय अनुभवाच्या सहाय्याने नवीन ज्ञानाची बांधणी करतात.  पियाजे, ब्रुनर, डयुई, आणि व्यगास्की या मानसशास्त्रज्ञानी आणि शिक्षण तज्ज्ञाच्या लेखनातून ज्ञानरचनावादामधील आशय निदर्शनात आलेला आहे.

ज्ञानरचनावादी दृष्टीकोन:
ज्ञानरचनावाद ही अशी तत्वज्ञानात्मक आणि वैज्ञानिक प्रक्रिया आहे की, जी ज्ञान सक्रिय रचनात्मक प्रक्रियेद्वारे निर्माण होते. (मस्कॉलॉल आणि फिशर २००५)
अध्ययन-अध्यापनात अनुभवात्मक / विश्लेषणवादी दृष्टीकोन हा शिक्षणातील पायाभूत पद्धतीशास्त्र मानला जातो. दुसरीकडे या दोन दृष्टीकोनांचा सामायिक पद्धतीशास्त्र आधार म्हणजे स्पष्टीकरण आहे, जिथे अनुकरण किंवा पुनरावृत्तीऐवजी अर्थासहित सहभागाद्वारे ज्ञान प्राप्ती करणे यावर विश्वास असतो. (क्रोल आणि लॅबोस्की, 1996)
कोणतेही ज्ञान परिपूर्ण नसते, आपण केवळ त्याबद्दलचे स्पष्टीकरण देऊ शकतो. ज्ञानाच्या संपादनासाठी व्यक्तीला भूतकाळातील अनुभव, वैयक्तिक दृष्टीकोन आणि सांस्कृतिक पार्श्वभूमीवर आधारित माहितीचा विचार करणे आवश्यक असते.
पूर्वज्ञान आणि सद्य अनुभवाच्या आधारे विद्यार्थी विशिष्ट गोष्टींचा अर्थ तयार करतात. विद्यमान ज्ञानाच्या विरोधात नवीन कल्पना आणि अनुभवांची सांगड आणि परीस्थितीची जाणीव करून घेण्यासाठी अध्यानार्थी नवीन किंवा अनुकूल नियम तयार करतात. प्रत्येकाचे वास्तविकतेकडे पाहण्याचा दृष्टिकोन इतका वेगळा असेल आणि विद्यार्थी जगाच्या स्वतःच्या रचनानवर आधीपासून शिकत असतील तर अशा वातावरणात शिक्षक विद्यार्थ्यांच्या शिकण्याची जबाबदारी घेऊ शकत नाहीत. उपदेशात्मक, स्मृतीवर आधारित अशा पारंपारिक अध्यापनाच्या शैलीवरून अधिक विद्यार्थी-केंद्रित दृष्टिकोनाकडे जाण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला पाहिजे.
जॉन डुई (१९३३) यांचा ज्ञानरचनादी दृष्टिकोनाचा तत्त्वज्ञानात्मक संस्थापक म्हणून वारंवार उल्लेख केला जातो. ब्रूनर (1990) आणि पियाजे (1972) यांचे सिद्धांत हे प्रमुख  बोधत्मक ज्ञानरचनावादी म्हणून मानले जातात, तर सामाजिक ज्ञानरचनावादामध्ये व्यागॉस्की (1978) हे महत्त्वाचे मानले जातात.

जॉन डुईचा शैक्षणिक विचार:
शाळांनी पुनरावृत्ती, पोपटपंच्छी, घोकंपट्टी  यावर लक्ष केंद्रित केले पाहिजे ही धारणा  जॉन डुई यांनी नाकारली याऐवजी अध्यनार्थ्याच्या प्रत्यक्ष जीवनाशी निगडीत प्रत्यक्ष अनुभव, प्रात्यक्षिक कार्ये याद्वारे त्यांच्या सर्जनशील आणि सहकार्य वृत्तीला चालना मिळेल अशा पद्धतीचा अवलंब करावा यावर भर दिला. विद्यार्थ्यांना स्वतःहून विचार करण्याची आणि त्यांचे विचार प्रकट करण्याची संधी दिली पाहिजे. यावरून जॉन डुई यांनी शिक्षणामध्ये प्रत्यक्ष अनुभवायला महत्त्व दिले आहे.  त्यांनी पुढे "शिकण्याची प्रक्रिया कशी होते याबद्दल आपल्याला शंका असल्यास, सतत चौकशी करण्यात गुंतून रहा: अभ्यास, विचार आणि पर्यायी शक्यतांचा विचार करा आणि  पुराव्याच्या आधारे निष्कर्षापर्यंत पोहोचा" असे म्हटले आहे.

जीन पियाजे: बोधात्मक ज्ञानरचनावाद
ज्ञान निष्क्रीयपणे आत्मसात करणे ही कल्पना पियाजे यांनी नाकारली. त्याऐवजी शिकणे ही वास्तविकतेशी जुळवून घेण्याच्या सलग टप्प्यांचा समावेश असलेली गतिशील प्रक्रिया आहे असे मत त्यांनी मांडले आहे. या प्रक्रियेदरम्यान जगाविषयी स्वतःचे सिद्धांत तयार करून आणि त्याचे परीक्षण करून शिकणारे सक्रियपणे ज्ञान निर्मिती करत असतात असे त्यांनी सुचवलेले आहे.
शोधात्मक अध्ययन, मुलांच्या तयारीसाठी संवेदनशीलता, व्यक्तीभिन्नतेचा स्वीकार आणि शिकणाऱ्याना जबरदस्तीने ज्ञान देता येत नसते – ते स्वतःच स्वतःसाठी निर्माण करतात अशी समकालीन, प्रभावी आणि महत्त्वपूर्ण शैक्षणिक तत्त्वे पियाजे यांनी मांडलेली आहेत.
ज्ञानरचनावादाबद्दल सामान्य गैरसमज म्हणजे शिक्षकांनी विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष काही न सांगता त्याऐवजी नेहमीच विद्यार्थ्यांनी स्वतःच स्वत:साठी ज्ञान निर्माती करण्याची परवानगी दिली पाहिजे. हे प्रत्यक्षात आकलन करून घेणे याबरोबर अध्यापनशास्त्राबाबत गोंधळ निर्माण करणारे आहे. एखाद्याने कसे शिकवावे याची पर्वा न करता, ज्ञानरचनावादाचे असे गृहीतक आहे की सर्व ज्ञान शिकवणाऱ्याच्या पूर्व ज्ञानाशी सांगड घालून तयार होत असते. अशा प्रकारे, व्याख्यानाद्वारेही नवीन ज्ञान निर्मितीमध्ये विद्यार्थी सक्रिय राहातील यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.

पियाजेची बोधात्मक विकास उपपत्ती:
पियाजे (1970) यांनी मुलांच्या बोधात्मक क्षमतेमधील गुणात्मक फरक गृहित धरुन मुलांची चार टप्प्यात विभागणी केलेली आहे. विद्यार्थी विकासाच्या विशिष्ट टप्प्यात पोहोचलेला नसल्यास अगर त्यांना मुख्य वेगवेगळ्या विकासाच्या अवस्थेतील तार्किक रचनामध्ये मर्यादा असतील तर बोधात्मक कामे शिकविली जाऊ शकत नाहीत.
पियाजेनी 1985 नंतर अध्यानार्थ्याच्या विद्यमान ज्ञानाशी जुळवून घेण्यासाठी नवीन माहिती कशी आकार घेते याच्या स्पष्टकरणासाठी या सिद्धांताचा विस्तार केला आणि विद्यमान ज्ञान स्वतःच नवीन माहिती सामावून घेण्यासाठी बदल करते हे स्पष्ट केले. व्यक्तीच्या वर्तमान पुर्वरचनेमध्ये नवीन, बाह्य घटकांचा अंतर्भाव करणे म्हणजे सात्मीकरण तर नवीन घटकाशी जुळवून घेण्यासाठी वर्तमान रचनेतच बदल करणे म्हणजे समावेशन होय. सात्मीकरण व समावेशन या संकल्पना आपल्या संपूर्ण आयुष्यभर कार्यरत असतात आणि या दोन्हीमध्ये समतोल साधने हेच बोधात्मक विकासाचे मूळ उद्देश आहे.

जेरोम ब्रूनर: संकल्पना निर्मिती
ब्रूनरवर व्यगस्कीचा प्रभाव होता. ब्रूनर यांनी शिक्षणात शिक्षक, भाषा आणि सूचना यांच्या भूमिकेवर जोर दिले. त्यांना असे वाटायचे की समस्येचे निराकरण करण्यासाठी शिकणा-यांनी वेगवेगळ्या प्रक्रिया वापरल्या पाहिजेत, त्यामध्ये व्यक्तीपरत्वे भिन्नता असू शकेल आणि सामाजिक संवाद चांगल्या शिक्षणाचे मूळ असते असे प्रतिपादन त्यांनी केलेले आहे.
ब्रूनरला सक्रेटीसच्या व्दंव्दविकासी पद्धतीचा अवलंब आपल्या अध्ययन प्रक्रियेत असावे आणि शिक्षणात स्वतःच्या ज्ञानाचे प्रतिबिंब स्वत:ला ज्ञान मिळवून देण्यासाठी प्रोत्साहित करतील असे प्रयत्न व्हावेत असे वाटत होते. अभ्यासक्रम काळजीपूर्वक तयार करणे आवश्यक आहे जेणेकरून एक क्षेत्र दुसर्‍या क्षेत्राशी निगडीत असावे (आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन). स्वतःच्या ज्ञानाची निर्मिती करताना शिक्षकाशी सक्रिय सुसंवाद साधून अध्यानार्थ्यानी शिकणे ही शोधांची प्रक्रिया बनविणे आवश्यक आहे.
शिक्षण ही एक सक्रिय, सामाजिक प्रक्रिया आहे ज्यामध्ये विद्यार्थी त्यांच्या सध्याच्या ज्ञानावर आधारित नवीन कल्पना किंवा संकल्पना तयार करतात या कल्पनेवर आधारित अभ्यासक्रमात बदल व्हावा असे ब्रूनरला अपेक्षित होते. जो ज्ञानरचनात्मक शिक्षणाची खालील तत्त्वे प्रदान करतो:
  •  सूचना या अनुभव आणि संदर्भांशी संबंधित असल्या पाहिजेत जे विद्यार्थ्यांना शिकण्यास आणि तयार राहण्यास (तत्परता) सक्षम बनवतात.
  • सूचना ह्या विद्यार्थ्याद्वारे सहजपणे आकलन होऊ शकेल अशा रचनात्मक असणे आवश्यक आहे.
  • प्राप्त माहितीचे विश्लेषण सुलभ करण्यासाठी आणि त्यातील रिक्त जागा (दिलेल्या माहितीच्या पलीकडे जाऊन) भरण्यासाठी सूचना तयार केल्या पाहिजेत.
शोधात्मक अध्ययन प्रतिमान:
शोधात्मक अध्ययनात, विद्यार्थ्यांना समस्या परिहार परिस्थितीत ठेवले जाते जिथे त्यांना तथ्ये, नातेसंबंध आणि नवीन माहिती शोधण्यासाठी पुर्वानुभव आणि विद्यमान ज्ञान यावर भर देणे आवश्यक असते.
पारंपारिक अध्यापन पद्धतींपेक्षा वास्तविक परिस्थिती आणि प्रसंगानुरूप समस्येचे निराकरनाव्दारे विद्यार्थ्यांना मिळालेली माहिती चांगल्या प्रकारे स्मरणात राहण्याची शक्यता अधिक असते.
सुव्यवस्थित शोध, समस्या आधारित अध्ययन, अभिरूप अध्ययन, व्यक्ती केद्रित अध्ययन आणि प्रसंगानुरूप अध्ययन अशा प्रतीमानाचा समावेश शोधात्मक अध्ययन प्रतिमानामध्ये आढळतो.

लेव्ह व्यागॉस्की: सामाजिक ज्ञानरचनावाद
सामाजिक ज्ञानरचनावाद व्यागस्कीने विकसित केले. पियाजे यांनी मांडलेल्या गृहितकांना नाकारून, शिक्षणातून सामाजिक संदर्भ वेगळे करणे शक्य नाही असे प्रतिपादन त्यांनी केलेले आढळते.
मुलाच्या सांस्कृतिक विकासाचे प्रत्येक कार्य दोनदा दिसून येतेः प्रथम, सामाजिक पातळीवर आणि नंतर वैयक्तिक पातळीवर; प्रथम, सभोवतालच्या लोकांमध्ये (inter psychological) आणि नंतर मुलाच्या आतमध्ये (intra psychological). हे ऐच्छिक अवधान, तार्किक स्मरणशक्ती आणि संकल्पना निर्मितीसाठी देखील तितकेच लागू होते. सर्व उच्च कार्ये व्यक्तिव्यक्तींमधील वास्तविक संबंधामधून उद्भवतात असे व्यगॉस्कीने नमूद केलेले आहे. तसेच व्यगॉस्की यानी समीपस्थ वैकासिक अवस्था (zone of Proximal development) ही संकल्पना मांडली. यामध्ये एखादा नवीन विद्यार्थी कोणत्याही मदतीशिवाय काय करू शकतो आणि कुशल जोडीदाराकडून मार्गदर्शन आणि प्रोत्साहन मिळाल्यास काय साध्य करू शकतो यामधील फरक यामध्ये सांगितलेला आहे.
1934 मध्ये वयाच्या 38 व्या वर्षी व्यगॉस्की यांचे निधन झाले असले तरी त्यांची बहुतेक प्रकाशने 1960 नंतर इंग्रजीत दिसून आली आहेत. तथापि, याकाळात शैक्षणिक तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात सामाजिक ज्ञानरचनावादाचे योगदान दिसून येते.
1980 च्या दशकात डयुई आणि व्यागॉस्कीच्या संशोधनात पियाजेच्या विकासात्मक मानसशास्त्रातील कार्य एकत्र करून ज्ञानरचनावादाचा व्यापक दृष्टिकोन विकसित केला. ज्ञानरचनावादाचा मूलभूत हेतू म्हणजे विद्यार्थी निरीक्षणाऐवजी कृतीद्वारे शिकतात हा आहे. विद्यार्थ्यांनी आपल्या पूर्वीच्या ज्ञानाचे एखाद्या नवीन अध्ययन परिस्थितीत परीक्षण आणि पुर्न-मूल्यांकन केले पाहिजे असे याव्दारे निष्पन्न होते.
विद्यार्थी जोपर्यंत त्यांच्या विषयावर प्रभुत्व मिळवत नाहीत तोपर्यंत अर्थनिर्वचन, उच्चारण आणि पुनर्मूल्यांकनाची ही प्रक्रिया वारंवार घडत राहिली पाहिजे. त्यामुळे विद्यार्थी नेहमी माहिती संकलन करीत असताना ती छोट्या छोट्या भागात रुपांतरीत करतो, काही चुका असतील तर त्या दुरुस्त करतो, छोट्या छोट्या भागातील माहितीचे एकत्रीकरण करतो, त्या माहितीचे घटकानुसार वर्गीकरण करतो आणि शेवटी त्याची पुनर्मांडणी करून ज्ञान निर्मिती करतो. त्यामुळे प्रत्येक शिक्षकाने कटाक्षाने अवलबावीत असे काही मुद्दे खालीलप्रमाणे:
  •  आयत्या गोष्टी त्यांच्या डोक्यात घालण्याऐवजी विद्यार्थ्यांनी त्या गोष्टी कशा प्रकारे मानसिक प्रक्रिया करून आत्मसात करावी हे शिकविणे गरजेचे वाटते.
  • शिक्षकाने शिकविण्याऐवजी त्यांना शिकण्यास प्रवृत्त केले पाहिजे.
  • शिक्षकांनी विद्यार्थ्यांना त्यांची स्वतःची मते (दृष्टीकोन) मांडण्यास मुभा दिली पाहिजे.
  • मेंदुआधारित अध्ययन-अध्यापन प्रक्रिया अवलंबिली पाहिजे.
  • मुलानवर माहितीचे ओझे लादण्यापेक्षा त्यांच्यामध्ये नवनिर्माण क्षमता विकसित केली पाहिजे.
   बऱ्याचदा अनेक पालक आणि शिक्षकसुद्धा मुलांच्यावर माहितीचा धो-धो पाऊस पाडतात पण प्रत्यक्षात तो/ती त्या पावसात कितपत भिजतात हे पहिलेच जात नाही. एकदा एका शिक्षकाला विचारण्यात आले की, शिकवून झाले का? तेंव्हा त्याने असे सांगितले की, माझे शिकवून झाले पण त्यांना कितपत समजले आणि त्यांच्यापर्यंत कितीपत पोहचले हे माहित नाही. आपण आपली तयारी करून आलेली माहितीची घागर त्यांच्यावर रिकामी करतो पण प्रत्यक्षात त्यांच्या (वेदनेन्द्रिये) भांड्याचे तोंड उघडे होते का? हा आजचा खूप मोठा आणि गहन प्रश्न आहे. भारत सरकारच्या राष्ट्रीय संपादन सर्वेनुसार (NAS) अर्थबोध न होता वाचणाऱ्या मुलांचे प्रमाण सर्वाधिक असल्याचे आढळून आलेले आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांची भाषा विषयक प्रगती ही गणितीय क्षमतेपेक्षा अधिक आढळते पण शहरी मुले ही क्षमताबाबत ग्रामीण मुलांच्या तुलनेत मागे असलेले आढळतात आणि त्यांचे हे गुणांक भारतीय सरासरी गुणांकाच्या जवळ जाणारे आहे. त्यामुळे आपण सर्वांनी मिळून बदल घडविण्यासाठी ज्ञानरचनावादाचा निरंतर प्रवास सुरु ठेऊ या.
(सदर लेखातील चित्र, इमेज Google वरून साभार)
संदर्भ:
संकपाळ, एस. पी. (जुलै, 2017). ज्ञानरचनावाद आणि मूल्यमापन, भारतीय शिक्षण-17-24
Agrawal, m. (may,2007) “Constructivism and pupil evaluation” in journal of Indian education, New Delhi:NCERT
Anderson, (2003) “The next enlightment” New York: Martin’s Press
Brooks, j. and Brooks, m. (1999) “In search of understanding: the case of constructvist Classroom” Alexadria: Association for supervision and curruculumdevelopment
Bruner, J. (1966) Toward a Theory of Instruction. Cambridge, MA: Harvard University Press.
Bruner, J. (1973) Going Beyond the Information Given. New York: Norton.
Bruner, J. (1983) “Education as social invention,” Journal of Social Issues 39: 129–141.
Dewey, J. (1909). How we think. New York: D. C. Health and Co.
Dewey, J. (1938). Experience & Education. New York: Kappa Delta Pi
Good, t. and Brophy, j. (1990) “Educational Psychology: A realistic approach” New York” Longman, white plains
Mahoney, m.j. (2004) “What is Constructivism and why is it ngrowing? In Constructive   psychotherapy” New York: Guilford
Merrill, M. D. (1991) “Constructivism and Instructional Design in Educational Technology”
NCERT (2005) “National Curriculum Framwork- 2005” New Delhi” NCERT
Piaget, J. (1970) Structuralism. New York: Harper & Row.
Piaget, J. (1972) The Psychology of the Child. New York: Basic Books.
Pritchard, A. and Woollard, J. (2010). Psychology for the Classroom: Constructivism and Social Learning, New York: Taylor & Francis e-Library
Sharma, s. (2006) “Constructivism in Constructivist Approaches to teaching and learning”  New Delhi: NCERT
Von, Glaserfeld (1989) “An Exposition of Constructivism: why some like it radical” Massachusetts University, Amherst: Scientific reasoning research institute
Vygotsky, L. (1978) Mind in Society. Cambridge, MA: Harvard University Press.

शनिवार, १९ ऑक्टोबर, २०१९

विद्यार्थ्यांची ओळख: विचारांची शैली | Thinking Style |

विद्यार्थ्यांची ओळख: विचारांची शैली
शैक्षणिक क्षेत्रात अपयशी ठरलेले बरेच विद्यार्थी प्रत्यक्ष जीवनात का यशस्वी होतात? काही विद्यार्थी कायदा शाखेकडे वळतात, इतर कांही डॉक्टरी पेशा निवडतात, आणि इतर कला/वाणिज्य शाखेकडे वळतात. डॉक्टर झालेल्यापैकी शाळेत प्रतिभावान असणारे विद्यार्थी त्यांच्या रूग्णाबाबत अपयशी का ठरतात? असे काही आहे का की काही प्रतिभावान असलेल्या विद्यार्थ्यांना वर्गात ए श्रेणी मिळते, तर इतरांची क्षमता असूनही त्याना डावलेले जाते? हे असे काही प्रश्न आहेत जे विचारांची शैली समजून घेताना मनामध्ये निर्माण होऊ शकतात.
आपल्या आयुष्यात काय घडते ते केवळ आपण किती चांगले विचार करतो यावर अवलंबून नाही तर आपण कसे विचार करतो यावर अवलंबून असते. लोक वेगळ्या पद्धतीने विचार करतात आणि त्याशिवाय, रॉबर्ट स्टर्नबर्ग यांच्या संशोधनाने असे दर्शविलेले आहे की ते ज्या प्रकारे विचार करतात त्याबद्दल इतरांनी किती प्रमाणात त्याचा विचार केला आहे याची जाणीव त्यांना असते. परिणामस्वरूप, पालक आणि मुले, शिक्षक आणि विद्यार्थी, व बॉस आणि कर्मचारी यांच्यात गैरसमज विकसित होऊ शकतात. विचार आणि  अध्ययन शैली समजून घेतल्यामुळे लोकांना या गैरसमजापासून रोखण्यास मदत होते आणि प्रत्यक्षात एकमेकांच्या आणि स्वत:चे विचार चांगल्या पद्धतीने समजून घेण्यास मदत होऊ शकते.
विचार शैलीची गरज :
शैली म्हणजे विचार करण्याचा एक प्राधान्यक्रम आहे. विचार शैली ही क्षमता नाही तर आपल्या क्षमता आपण कशा वापरतो यावर अवलंबून असते. आपल्याकडे एकच शैली नसते तर अनेक शैलीचे रेखाचित्र असते. लोक त्यांच्या क्षमतेप्रमाणे व्यवहार्यदृष्टया एकसारखे असू शकतात आणि तरीही त्यांची शैली भिन्न असू शकते पण समाजात समान क्षमता असलेले लोक नेहमी असतीलच असे नाही. त्याऐवजी, विशिष्ट परिस्थितींमध्ये अपेक्षित असलेल्या व्यक्तींशी जुळवून घेणारे लोक उच्च क्षमता असणारे मानले जातात पण ते खरे नाही. त्या लोकांच्या शैली आणि ते ज्या कार्यांशी निगडित आहेत ते त्यामध्ये सुयोग्य/बरोबर असतात.
बऱ्याचदा, ज्या विद्यार्थ्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागते ते आपल्या शैलीनुसार चांगले कार्य करू शकतात किंवा ते त्यांचे कार्य सुधारण्यासाठी आपल्या शैलीमध्ये बदल करतात. परंतु जर एखाद्या विद्यार्थ्याला आवश्यक क्षमता नसतानाही श्रेय दिले गेले तर त्या विद्यार्थ्यांना त्यांचा दृष्टिकोन बदलण्याची संधी देखील मिळत नाही.
कोणत्याही हायस्कूल किंवा महाविद्यालयीन माजी विद्यार्थी मेळाव्यात गेल्यावर आपणास असे  अनेक लोक भेटतील जे स्वत: चुकीच्या कामात गुंतलेले आहेत. मार्गदर्शक किंवा करिअर सल्लागाराने त्यांच्या क्षमता किंवा अगदी आवडी-निवडीवर आधारित त्यांना ते निवडण्यास सांगितले होते तरीही ते निराश आहेत. परंतु त्यांच्यापैकी बऱ्याच जणांनी जे करिअर निवडले आहे तिथे त्यांना कोणतीच यशाची आशा वाटत नाही. शैली समजून घेतल्यामुळे काही क्रिया त्यांच्यासाठी योग्य का ठरतात आणि इतरांसाठी का नाही? तसेच काही लोक एखाद्या कार्यासाठी योग्य असतात आणि इतर का नाहीत हे समजून घेण्यास मदत होते.
मानसिक स्व-शासन सिद्धांत
स्टर्नबर्ग यांच्या मानसिक स्व-शासन सिद्धांताची मूलभूत कल्पना म्हणजे जगात आपल्याकडे असलेल्या शासकीय व्यवस्थेचे स्वरूप संयोगजन्य नाही तर लोकांच्या मनात काय चालले आहे त्याचे ते बाह्य प्रतिबिंब असते. ते आपल्या विचारांचे आयोजन करण्याचा पर्यायी मार्ग दर्शवतात. अशा प्रकारे आपण पाहिलेल्या शासकीय व्यवस्थेचे स्वरूप आपल्या मनाचा आरसा असतो.
स्व-संघटन आणि सामाजिक संघटन यादरम्यान अनेक बाबतीत साम्य आढळते. एकाद्या विशिष्ठ गोष्टीसाठी, जसे समाजाने स्वत:ला शासित करण्याची गरज आहे, तशीच आपणास स्वतःवर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. शासकीय व्यवस्थेप्रमाणेच आपणासही प्राधान्यक्रमांवर निर्णय घेण्याची गरज असते, आपण आपल्या संसाधनांचे वाटप करण्याची गरज आहे तसेच, जगातील बदलांसाठी आपणास प्रतिसाद देण्याची गरज देखील आहे. जर सरकारमध्ये बदल होण्यास अडथळे येत असतील तर आपल्यामध्येही बदल घडवून आणण्यामध्ये अडथळे येतात. प्रस्तावित मानसिक स्व-शासन सिद्धांतांचे विहंगावलोकन खालीलप्रमाणे.
सर्वसामान्यपणे कार्यकारी, वैधानिक आणि न्यायालयीन अशी तीन कार्ये प्रत्येक शासन व्यवस्थेमध्ये असतात. कार्यकारी शाखेस कायदा आणि धोरणे तयार करण्याचा अधिकार असतो व वैधानिक शाखा त्यास अधिनियमित करते. न्यायालयीन शाखा या कायद्याचे योग्यरीत्या पालन होत आहे का याचे मुल्यांकन करते आणि या कायद्यांचे उल्लंघन होत असल्यास काय? तर लोकांनी त्यांच्या विचारामध्ये आणि कार्यामध्ये याचा अंतर्भाव करण्याची गरज भासते अशी अपेक्षा व्यक्त करतात. मानसिक स्व-शासनाचा सिद्धांत चार प्रकारचे स्वरूप स्पष्ट करतो: राजेशाही, श्रेणीबद्द, उतावीळ, आणि अनाकलनीय. प्रत्येक स्वरूप हे जग आणि त्याचा समस्येकडे पाहण्याचा एक वेगळा दृष्टीकोन सांगतो. पण सदर प्रकल्पामध्ये आपण केवळ सर्वंकष सूक्ष्म जे स्तरानुसार शैलीचे प्रकार आहेत आणि आंतरिक व बाह्य जे व्याप्तीनुसार शैलीचे प्रकार आहेत त्यांचा समावेश यामध्ये करणार आहे.
मानसिक स्व-शासनाचे स्तरानुसार प्रकार:
सर्वंकष शैलीचे विद्यार्थी हे तुलनेने मोठी आणि अमूर्त समस्या हाताळण्यास प्राधान्य देतात. ते कोणत्याही गोष्टीच्या तपशीलात न जाता विस्तृत घटकावर लक्ष केंद्रित करतात जसे जंगलातील झाडांऐवजी पूर्ण जंगलाकडे पाहण्यास प्राधान्य देतात. बऱ्याचदा 'झाडापासून बनलेल्या जंगलाकडे ते लक्ष देतात; परिणामी त्यांना "परिपूर्ण आनंदाची अवस्था" गमावू नये याची काळजी घ्यावी लागते.

सर्वंकष शैलीच्या विद्यार्थ्यांची लक्षणे:
  • अशा विद्यार्थ्यांचे लक्ष हे एकदम सर्व घटकावर जाते.
  • अशा विद्यार्थ्यांना एकाचवेळी सर्व गोष्टी जाणून घ्यायला आवडते.
  • असे विद्यार्थी अधिक व्यापक व अमूर्त घटकावर काम करतात.
  • अशा विद्यार्थ्यांना एखादी गोष्ट एका बैठकीतच समजून घ्यावयाची असते.
  • अशा विद्यार्थ्यांना अखंड अध्ययन पध्दती उपयुक्त ठरते.
  • अशा विद्यार्थ्यांना दीर्घकालीन प्रकल्पावर काम करायला आवडते.
  • अशा विद्यार्थ्यांना चौकटीत काम करायला आवडत नाही ते मुक्तपणे काम करणे पसंत करतात.

परीक्षा पध्दती:
1. सर्वंकष शैलीचे विद्यार्थी परीक्षेत सविस्तर प्रश्नांची संख्या अधिक असल्यास ते चांगल्या प्रकारे सोडवू शकतात.
2. निबंध लेखन, कथा लेखन, अमूर्त कल्पना विस्तार, जीवन वृन्तात सारख्या लेखनात त्यांना आनंद मिळतो.
सुक्ष्म शैलीचे विद्यार्थी हे तपशीलवार व विस्तृत अशा मूर्त समस्यांवर लक्ष केंद्रित करतात. ते एखाद्या परिस्थितीच्या व्यावहारिक बाबींकडे लक्ष केंद्रित करतात आणि ते विनम्र असतात. त्यांच्याकडून झाडाकडे लक्ष दिल्याने जंगल दुर्लक्षित राहू शकते. तथापि, विमान चालक आणि रॉकेट सारख्या किचकट प्रणालीच्या अपयशामागे अशा लहान तपशीलांकडे दुर्लक्ष करणे हे सर्वात मोठे कारण असू शकते. अशा प्रकारे, जवळजवळ सर्वच समूहात किंवा संघटनेत काही सुक्ष्म शैलीच्या विद्यार्थ्यांची  आवश्यकता असते.
सूक्ष्म शैलीच्या विद्यार्थ्यांची लक्षणे:
  • असे विद्यार्थी हे केवळ विशिष्ठ एखाद्या घटकावर लक्ष केंद्रित करतात.
  • अशा विद्यार्थ्यांना एकावेळी ठराविक गोष्टी जाणून घ्यावयाच्या असतात.
  • असे विद्यार्थी सूक्ष्म व मूर्त घटकावर काम करतात.
  • या विद्यार्थ्यांना सर्व गोष्टी छोट्या छोट्या भागात समजावून घ्यावयला आवडते.
  • अशा विद्यार्थ्यांना खंडीत अध्ययन पध्दती उपयुक्त ठरेल.
  • अशा विद्यार्थ्यांना छोट्या छोट्या प्रकल्पातून आनंद मिळतो.
  • असे विद्यार्थी जेवढे सांगितलेले आहे तेवढेच करतील त्यापेक्षा वेगळे व अधिकचे जराही करणार नाहीत.

परीक्षा पध्दती:
1. सूक्ष्म शैलीचे विद्यार्थी परीक्षेत थोडक्यात उत्तरे लिहा सारख्या प्रश्नांनी अशा विद्यार्थ्यांना अधिक समाधान मिळते.
2. जर प्रश्न वस्तुनिष्ठ बहुपर्यायी असेल तर दुधात साखरच.
सर्वंकष आणि सुक्ष्म शैलीचे विद्यार्थी विशेषतः एकत्रित चांगले कार्य करू शकतात, कारण प्रत्येकजण कार्य पूर्ण करण्याच्या एका विशिष्ठ पैलूकडे लक्ष केंद्रित करतो जे इतर लोक विसरतात. एखाद्या प्रकल्पाची पूर्तता करण्याचा प्रयत्न करणारे दोन सर्वंकष शैलीचे विद्यार्थी हे तपशीलात न जाता मोठ्या समस्याच निवडतील; परंतु दोन सुक्ष्म शैलीचे विद्यार्थी काम पूर्ण करण्यासाठी आवश्यक असलेल्या व्यावहारिक तपशीलवार पद्धतीने उच्चस्तरीय योजना आखतील. जर एखादे कार्य पूर्ण करावयाचे असेल तर एकदम टोकाचे विचार मदत करू शकत नाहीत त्यासाठी एकमेकांच्या विचारांची कदर करणे गरजेचे असते. एकदम टोकाचे सुक्ष्म शैलीचे विद्यार्थी किंवा सर्वंकष शैलीचे विद्यार्थी हे प्रवाहापासून बाजूला फेकले जाऊ शकतात तर त्यांना प्रवाहात आणण्यासाठी सुवर्णमध्य साधने गरजेचे असते. एकदम टोकाचे सुक्ष्म शैलीचे विद्यार्थी किंवा सर्वंकष शैलीचे विद्यार्थी यांना एकत्र काम करताना नक्की अडचणी येतील कारण त्यांचे विचार एकमेकांच्या विरुद्ध दिशेने चाललेले असतात.
मानसिक स्व-शासनाचे व्याप्तीनुसार प्रकार:
आंतरिक शैलीचे विद्यार्थी अंतर्गत बाबींशी संबंधित असतात - याचा अर्थ असा आहे की, हे विद्यार्थी अलिप्तवादी असतात. ते अंतर्मुख, कार्यशील, अलिप्त आणि कधीकधी सामाजिकदृष्टया कमी जागरूक असतात. त्यांना एकटे काम करायला आवडते. अनिवार्यपणे, त्यांचे प्राधान्य हे त्यांची बुद्धीमत्ता ही इतर माध्यमातून अलिप्तपणे गोष्टी किंवा कल्पना आमलात आणणे असते.
बऱ्याचदा क्षमता आणि शैली याची गफलत लोक करत असतात. बालवाडीची एक शिक्षिका आपल्या वर्गात शिकणाऱ्या मुलाच्या धारणेबाबत चुकीची शिफारस करते. तिने अशी शिफारस का केली होती असे विचारले असता शिक्षिकीने सांगितले की मुलाची शैक्षणिक गुणवत्ता खुप चांगली असली तरी, प्रथम वर्गासाठी मुल "सामाजिकदृष्ट्या तयार" दिसत नाही. ते मुल शाळेमध्ये इतरांमध्ये न मिसळता स्वतःची कामे एकट्यानेच करणे पसंत करत होते. याचा अर्थ त्या शिक्षिकेने असा घेतला की त्याच्यामध्ये सामाजिक बुद्धिमत्तेची कमतरता आहे. वास्तवात ते मुल आंतरिक विचार शैलीचे होते. या सर्व गोष्टी लक्षात आल्यावर त्यास प्रथम वर्गात प्रवेश मिळाला आणि त्या मुलाने भविष्यात चांगली शैक्षणिक प्रगती तर केलीच शिवाय इतरांशी चांगले आंतरावैयक्तिक संबंध दृढ केलेले आढळले.
आंतरिक शैलीच्या विद्यार्थ्यांची लक्षणे:
  • असे विद्यार्थी अंतर्मुखी व्यक्तिमत्व असलेले आढळतात.
  • या विद्यार्थ्यांना एकट्याने काम करायला आवडते.
  • या विद्यार्थ्यांचा दृष्टीकोन अलिप्तवादी स्वरूपाचा असतो.
  • या विद्यार्थ्यांना इतरांच्या तुलनेत सामाजिक जाणिवा कमी असतात.
  • अशा विद्यार्थ्यामध्ये आंतरवैयक्तिक संबंधामध्ये कमतरता असते.
  • यांना स्वतःच्या कल्पना आणि विचारांनी काम करायला आवडते.
  • वर्गात पुस्तकी किडा म्हणून यांना हिणवले जाऊ शकते.
  • अशा विद्यार्थ्यांना वर्गात व्याख्यान, प्रयोग, सृजनशील पद्धतीने शिकायला आवडते.

परीक्षा पध्दती:
आंतरिक शैलीच्या विद्यार्थ्यांना सृजनशील लेखन, काव्य वाचन, प्रयोग यासारख्या पद्धतीने परीक्षा द्यायला आवडते.
बाह्य शैलीचे विद्यार्थी बहिर्मुखी, मोकळ्या मनाचे आणि लोकात मिसळणारे असतात. सहसा, ते सामाजिकरित्या संवेदनशील असतात आणि इतरांचे काय चालले आहे याची जाणीव असणारे असतात. त्यांना शक्य असेल तेथे इतर लोकांबरोबर काम करणे आवडते.
विद्यार्थ्यासाठी कोणती शैली चांगली याबाबत शैक्षणिक वर्तुळात बऱ्याच चर्चा घडून येतात. अलिकडच्या काही वर्षांमध्ये "सहयोगी शिक्षण" नावाची संकल्पना पुढे आली ज्याव्दारे मुलांनी एकत्रितपणे शिकण्याचा प्रयत्न केला पाहिजे. लहान मुले त्यांच्या स्वत:च्या साहित्याबरोबर लहान गटात चांगले शिकतील अशी कल्पना असावी. पण प्रत्येक मुल वेगळ्या पद्धतीने, कलाने, क्षमतेने व शैलीने शिकत असते हे विसरून चालणार नाही.
बाह्य शैलीच्या विद्यार्थ्यांची लक्षणे:
  • अशा विद्यार्थ्यांचे व्यक्तिमत्व हे बहिर्मुखी स्वरूपाचे आढळते.
  • या विद्यार्थ्यांना समूहाने/ गटाने काम करायला आवडते.
  • असे विद्यार्थी हे व्यापक दृष्टीकोन असलेले आढळतात.
  • असे विद्यार्थी सामाजिक जाणिव अधिक असलेले आढळतात.
  • अशा विद्यार्थ्याचे आंतरवैयक्तिक नातेसंबंध सदृढ असतात.
  • स्वतःच्या कल्पना आणि विचारांबरोबर इतरांचेही ऐकण्यावर भर दिला जातो.
  • वर्गात असे विद्यार्थी सर्वासोबत मिळूनमिसळून असतात.
  • अशा विद्यार्थ्यांना प्रकल्प पध्दती, सहल, सहयोगी पध्दती अध्ययनास अनुरूप असतात.

परीक्षा पध्दती:
बाह्य शैलीच्या विद्यार्थ्यांना समूह चाचणी, समूह प्रकल्प, चर्चा, वादविवाद   यासारख्या पद्धतीने परीक्षा द्यायला आवडते.
मानसिक स्व-शासन सिद्धांताच्या दृष्टिकोनातून, अशा प्रश्नांचे एकच असे बरोबर उत्तर नसते जसे की मुले वैयक्तिकरित्या किंवा गटांमध्ये चांगले शिकतात की नाही आणि खरोखरच हा प्रश्न इतर प्रश्नाप्रमाणेच चुकीचा ठरतो. बाह्य शैलीचे विद्यार्थी गटांमध्ये काम करण्यास प्राधान्य देतात आणि इतरांसोबत शिकताना कदाचित चांगले शिकतील. अंतर्गत शैलीचे विद्यार्थी कदाचित एकटे काम करण्यास प्राधान्य देतात आणि समूहामध्ये काम करण्यास अनुत्सुक असू शकतील.
याचा अर्थ असा नाही की आंतरिक शैलीच्या विद्यार्थ्यानी कधीही समूहात काम करू नये, किंवा बाह्य शैलीचे विद्यार्थी एकट्याने. अर्थात, प्रत्येक प्रकारच्या विद्यार्थ्याने विविध परिस्थितींमध्ये कार्य करण्यास शिकण्यासाठी लवचिकता विकसित करण्याची आवश्यकता आहे. परंतु शैलीच्या दृष्टिकोनातून असे सूचित होते की विद्यार्थ्याप्रमाणे शिक्षकांना अध्ययन-अध्यापन प्रक्रियेत लवचिकता असली पाहिजे. शिक्षकांनी विद्यार्थ्यांना वैयक्तिक आणि समूहात काम करण्याश प्रोत्साहित केले पाहिजे जेणेकरुन मुलांना काही ठिकाणी सोयीस्कर आणि काही ठिकाणी आव्हानात्मक वाटेल. नेहमीच समान कार्य परिस्थिती प्रदान केल्याने काही विद्यार्थ्यांना त्याचा फायदा होतो आणि इतरांना शिक्षा केली जाऊ शकते.
सर्व शिक्षक व पालकांना विनंती की आपला पाल्य काय विचार करतो याचा विचार अगोदर करा आणि त्यानंतरच आपले विचार त्याच्यासमोर मांडा. कारण तो कशा पद्धतीने विचार करतो हे समजल्याशिवाय आपण त्यास समजावून घेणे अवघड असते. त्यामुळे पालकांनी आपल्या पाल्याच्या आणि शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्याच्या सर्वांगीण विकासासाठी हा विचार समजावून घेणे गरजेचे वाटते.
(सदर लेखातील चित्र, इमेज Google वरून साभार)
संदर्भ:
Brown, D. H. (2000). Principles of language learning & teaching. (4th ed.). New York: Longman. (pp. 49-58)
Cassidy, S. (2004). Learning styles: An overview of theories, models, and measures, Educational Psychology,24(4), 419-444
Fleming, N. D. and Mills, Colleen (1992). Not Another Inventory, Rather a Catalyst for Reflection, To Improve the Academy, Vol. 11, pp. 137
King, A., (2011). Culture, Learning and Development: A Case Study on the Ethiopian Higher Education System.
Lewis, M. A., 2014. Learning  Styles, Motivations, and Resource Needs of Students, s.l.: Chapel Hill, North Carolina.
Markus, H.R. & Kitayama, S., H. R. & Kitayama, S., (1991). Culture and the self: implications for cognition, emotion and motivation. Psychological Review, Volume 2, p. 98.
Rayner, S., & Riding, R. J. (1996). Cognitive style and school refusal. Educational Psychology, 16, 445–451.
Rayner, S., & Riding, R. J. (1997). Towards a categorisation of cognitive styles and learning styles. Educational Psychology, 17, 5–28.
Sadler-Smith, E. (2009). A duplex model of cognitive style. In L. F. Zhang & R. J. Sternberg (Eds.), Perspectives on the nature of intellectual styles (pp. 3–28). New York, NY: Springer Publishing Company.
Sternberg, R. J., & Grigorenko, E.L. (1997). Are cognitive styles still in style?.Ameerican Psychooloogist, 52, 700-712
Sternberg, R. J.  (2009). Thinking Styles. Cambridge University Press
Sternberg, R. J., & Grigorenko, E.L. (1997). Styles of thinking in school. European journal of High Ability, 6(2), 1-18
Sternberg, R. J., & Zhang, Li-Fang (2001). Perspectives on thinking, learning, and cognitive styles. Mahwah, NJ: Lawrence Erlbaum associates.

शुक्रवार, ११ ऑक्टोबर, २०१९

बोधनिक शैली: माहिती प्रक्रियेसाठी | Cognitive style |

बोधनिक शैली: माहिती प्रक्रियेसाठी

या जगामध्ये प्रत्येक व्यक्ती इतराहून वेगळी आहे आणि त्याच्याकडे ज्ञान मिळविण्याची एक अद्वितीय शैली असते.  याव्यतिरिक्त प्रत्येक व्यक्तीकडे माहितीचे संघटन आणि प्रक्रिया करण्याची तसेच ज्ञान व्यक्त करण्याची एक अद्भूत शैली असते. शैली या संकल्पनेची सुरुवात सहजपणे कोठेही आढळून येत नाही. आजपर्यंत अनेक संदर्भग्रंथाचे पुनरावलोकन केल्यानंतर शैलीबाबत ठोस माहिती समाविष्ट असलेली आढळते. शैली ही संकल्पना पाच घटकाशी निगडीत आहे. अर्थात् बोधनिक, अध्ययन, अध्यापन, विचार आणि बौद्धिक शैली यांचा समावेश होतो. सर्व प्रकारच्या या चाचण्या शैली व क्षमता यापासून भिन्न आहेत.
शैली ही बौद्धिक कार्यप्रणाली व व्यक्तिमत्त्व प्रकाराचे सामान्य गुणवैशिष्ट्य आहे जे प्रत्यक्ष एखाद्या व्यक्तीशी वैयक्तिकरित्या संबंधित असते आणि ती त्यास इतराहून वेगळे बनवते (ब्राउन, डी. एच., 2000).
शैली, क्षमता आणि कार्यपद्धती यांच्यातील फरक:
शैलीबद्दलची माहिती वरील व्याख्यामध्ये स्पष्ट होते; परंतु 'शैली' आणि 'क्षमता' यांच्यातील फरक स्पष्ट करणे आवश्यक वाटते. कारण अनेक लोक शैलीलाच क्षमता म्हणून संबोधतात. गिलफोर्ड (1980) यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे त्याचे तीन वैशिष्टये आहेत. 1) क्षमता ही कार्यक्षमतेच्या पातळीशी निगडीत असते, तर शैली ही कार्यक्षमतेच्या पद्धतीवर लक्ष केंद्रित करते. 2) क्षमता एकांगी आहे, तर शैली सर्वांगीण आहे. 3) क्षमता या मूल्यांनी युक्त असतात ज्यामध्ये एका बाजूला क्षमतेचे परिणाम महत्त्वपूर्ण असतात आणि दुसऱ्या बाजूला नाही, तर शैलीचा परिणाम संपूर्णपणे एकसारखाच मानला जातो.
राइडिंग (1992) यांच्या मते शैली आणि क्षमता या दोन्ही कार्यक्षमतेवर परिणाम करू शकतात. त्यांच्यात मूलभूत फरक असा आहे की क्षमता जसजशी वाढते तसतसे कार्यप्रदर्शन सुधारते आणि व्यक्तीच्या शैलीमुळे कार्यप्रदर्शनात एकतर सकारात्मक किंवा नकारात्मक परिणाम दिसून येईल.
बऱ्याच वेळा, आपण सर्वजण रोजच्या जीवनात शैली हा शब्द आणि कार्यपद्धतीची व्याख्या चुकीची पद्धतीने करतो. आपण नैसर्गिकरित्या मानवी गुणधर्म प्रकट करतो, प्रत्येकजण समस्या सोडवतो / वास्तवाचा एक संच शिकतो / त्याच्या शैली किंवा धोरणावरील एखाद्या अद्वितीय दृष्टीकोनातून भावनांचे संयोजन करतो.
कार्यपद्धती: एखाद्या समस्येकडे किंवा कृतीजवळ येण्याची विशिष्ट पद्धत आहे, विशिष्ट निष्कर्ष मिळविण्यासाठीची कार्यपद्धती, माहिती नियंत्रित करण्यासाठी आणि माहिती हाताळण्यासाठी नियोजित रचना म्हणजे रणनीती होय. रणनीती ही एका विशिष्ट समस्येचे वर्णन करण्याचे अनेक संभाव्य मार्ग सुचवते आणि एखाद्या विशिष्ट समस्येसाठी एक किंवा अनेक अनुक्रमांची शक्यता पुरविते.
या सदरात आपण बोधानिक शैलीविषयी जाणून घेणार आहोत. पद्धतशीर आणि अंतस्फूर्ती शैलींचे वर्णन मॅककेनी आणि किनी, (1974); आणि बॉटकिन, (1974) यांच्या संशोधनावर आधारित आहे:
1. पद्धतशीर बोधानिक शैली: पद्धतशीर बोधानिक शैली असल्याची ओळख असलेला विद्यार्थी म्हणजे पद्धतशीर श्रेणीवर अधिक आणि अंतस्फूर्ती श्रेणीवर निम्न पातळी असते. हर्वार्ड अभ्यासातील निष्कर्षांनुसार, एखादी व्यक्ती जी सामान्यत: सुव्यवस्थित माहिती गोळा करते, ती समस्या सोडवताना एक सुधारीत, टप्याटप्याचे दृष्टीकोन अंगिकारते; एक संपूर्ण पद्धत किंवा पूर्वनिर्धारित दृष्टिकोन शोधत असते; आणि नंतर समस्येचे निराकरण करण्यासाठी एक समग्र योजना बनवते.
पद्धतशीर बोधानिक शैलीची वैशिष्टे:
  • एकांगी व मूर्त विचारसरणी,
  • अत्यंत संरचित आणि तर्कसंगत अनुमान,
  • सरळमार्गी व क्रमबद्द/नियमबद्ध दृष्टीकोन,
  • तथ्ये, आकडेवारी आणि माहितीवर आधारित मूर्त विचार,
  • कार्य करण्यायोग्य विभागांमध्ये समस्येचे विभाजन,
  • एखाद्या समस्येचे लहान भागात विभाजित करून समस्या हाताळणी,
  • निगामी अनुमान पद्धतीचा अवलंब,
  • समस्या सोडवण्यासाठी एक सुस्पष्ट पद्धत किंवा योजना,
  • अतिशय जागरूक दृष्टीकोन
  • एखाद्या कामात खुप वेळ घेतात आणि एकावेळी एकच गोष्ट करतात,
  • कामाचे छोटे छोटे भाग करणे,
  • वर्गात जसे शिकवले आहे तसेच उद्दिष्ट केंद्रित सर्वोत्तम पर्यायाची निवड,
  • जेथे स्पष्टीकरणाची आवश्यकता असते तेव्हा मदत मिळणे गरजेचे,
  • बुद्धीप्रामाण्य आणि अमूर्त विचार प्रक्रियावर भर
2. अंतस्फूर्ती बोधानिक शैली: पद्धतशीर श्रेणीवर निम्न आणि अंतस्फूर्ती श्रेणीवर उच्च पातळी निर्धारित करतो असे विद्यार्थी अंतर्ज्ञानी शैली असल्याचे वर्णन होते. एखाद्याची शैली अंतस्फूर्ती प्रकारची असेल तर समस्या सोडविताना विश्लेषणात्मक पायरीवर अनपेक्षित क्रमवारी वापरली जाते. असंतुलित चिन्हे किंवा स्थिरता नसणाऱ्या वर्णनाद्वारे अनुभवलेल्या नमुन्यांवर अवलंबून असतात, नवीन पर्यायांचा शोध घेतात आणि असे पर्याय शिघ्रपणे सोडूनही देतात.
अंतस्फूर्ती बोधानिक शैलीची वैशिष्टे:
  • अमूर्त पातळीवर विचार,
  • विविधांगी विचार प्रक्रिया,
  • कल्पना आणि भावनांवर आधारीत वैश्विक दृष्टीकोन,
  • उत्स्फुर्तपणे प्रक्रिया केंद्रित विगामी अनुमान,
  • दृष्टीकोन जाणीवपूर्वक जागरूक नाही,
  • सामान्यतः अनुभवाद्वारे चालविली जाणारी एक पद्धत वापरतात,
  • संपूर्ण समस्या सतत लक्षात ठेवतात,
  • वारंवार समस्या पुन्हा परिभाषित करतात,
  • समस्येचे मोठे चित्रण किंवा समस्येची संपूर्णता व्याप्ती माहित असते,
  • गतिशील, अरेखीय, एकावेळी अनेक गोष्टी करतात,
  • नमुना जुळणी व स्वैरपणे विचारावर आधारित व्यवहार्य पर्यायाची निवड,
  • गरज असेल तेंव्हा क्रिया आवश्यक
3. एकात्मिक बोधानिक शैली: एकात्मिक शैली असलेली व्यक्ती दोन्ही प्रकारात उच्च प्रगती दर्शविते आणि दोन्ही शैलीमध्ये जलद गतीने स्वतःला सहज बदलू शकते. अशा शैलीतील बदल हे अचूक असून ते काही सेकंदात घडतात. या "वेगवान गती" क्षमतेचा परिणाम असा आहे की समस्या सोडवण्यासाठी ऊर्जा आणि सक्रिय दृष्टिकोन निर्माण होतो असे दिसते. प्रत्यक्षात, एकात्मिक विद्यार्थी बऱ्याचदा "समस्या शोधक" म्हणून ओळखले जातात कारण ते संभाव्य समस्या परिहारामध्ये उत्कृष्ट मार्ग शोधण्यासाठी सतत संधी शोधण्याचा प्रयत्न करतात.
एकात्मिक बोधानिक शैलीची वैशिष्टे:
  • मानसिक व भावनिक संतुलित विकास,
  • दुहेरी बोधात्मक प्रक्रिया सुरु असते,
  • विविध क्षेत्रातील विशेष माहिती असते,
  • अतिशय लवचिक आणि अनुकूल असतात,
  • सहज आणि त्वरीत एका शैलीतून दुसऱ्या शैलीत रुपांतर,
  • आंतरिक नियंत्रण केंद्र उच्च दिसून येतो,
  • समस्या सोडविण्यासाठी संधी शोधत असतात,
  • नाविन्यपूर्ण/ सर्जनशील व नेहमी सक्रीय असतात.
प्रत्यक्ष वर्गाचा विचार केल्यास आपणास असे अनेक विद्यार्थी आढळून येतील जे वेगळ्याच तालात, विचारात गुंतलेले असतात. अशा विशिष्ठ बोधानिक शैली असलेल्या विद्यार्थ्याची गुणवैशिष्टे खालीलप्रमाणे:
पद्धतशीर बोधानिक शैली :
  • नवी पध्दती शोधून काढून व नव्या नियोजनाच्या सहाय्याने समस्या सोडवितात.
  • स्वतःच्या मताविषयी खूपच जागरूक असतात.
  • अशा व्यक्तीनी मांडलेले विचार हे पद्धती म्हणून स्वीकारली जाते.
  • अशा व्यक्तींना आपल्या मर्यादा माहित असतात.
  • नको असलेल्या पर्यायाचा तात्काळ त्याग करतात.
  • प्रत्येक गोष्टीचे मार्मिकपणे विश्लेषण केले जाते.
  • टप्या-टप्याने प्रक्रीया पूर्ण केली जाते.
  • पूर्व निर्धारित नियोजनानुसार प्रत्येक गोष्टीची पूर्तता केली जाते.
पद्धतशीर (तर्कसंगत) शैली असलेले लोक नियमांच्या आधारे विचार करतात. मूलभूत नियम शोधण्यासाठी वेगवेगळ्या पर्यायांचे तार्किकपणे मूल्यांकन करून ते परिस्थितीचे विश्लेषण करतात. हे नियम त्यांना विविध परीस्थितीत पद्धतशीर जगण्यास मदत करतात व एखादे कार्य कसे करावे यावर अवलंबून असू शकतात. उदाहरणार्थ, एक अकाउंटंट/लेखापाल पद्धतशीर बोधानिक शैलीचा असू शकतो. कामावर आणि इतर संदर्भांमध्ये, लेखाकार संघटित आणि कार्यक्षम असण्याची शक्यता असते आणि परिस्थितींचे वर्गीकरण आणि विश्लेषण करणे, नियम आणि नियमितता शोधणे आणि लागू करणे अशी शक्यता असते.
अंतस्फूर्ती बोधानिक शैली:
  • असे विद्यार्थी प्रत्येक गोष्टीचा सातत्याने विचार करीत असतात.
  • असे विद्यार्थी गरजेनुसार समस्येची पुर्नमांडणी करतात.
  • असे विद्यार्थी नेहमी अशाब्दिक संकेतावर विश्वास ठेवतात.
  • असे विद्यार्थी जोपर्यंत मनासारखे घडत नाही तोपर्यंत प्रयत्न करत राहतात.
  • असे विद्यार्थी एकावेळी अनेक पर्यायांचा विचार करतात.
  • असे विद्यार्थी सुनिश्चित टप्याचा विचार न करता स्वैरपणे विचार करतात.
  • असे विद्यार्थी एखादा पर्याय तात्काळ शोधतात व तेवढ्याच शिघ्रपणे सोडूनही देतात.
आपल्या जीवनातील ९० टक्के निर्णय हे अंतस्फूर्तीद्वारे घडून येतात. असे गॅरी क्लेन (2004) यांनी त्यांच्या The power of Intuition या पुस्तकात अधोरेखित केलेले आहे. पण रॉबिन्सन (2005) यांच्या संशोधनातून असे आढळून आलेले आहे की एकूण नमुन्याच्या केवळ 5 टक्के लोक अंतस्फूर्ती बोधानिक शैलीचे असतात. अंतस्फूर्ती बोधानिक शैलीचे लोक हे तथ्ये आणि प्रदत्ताच्या आधारे बुद्धिनिष्ठ प्रक्रियेचा विचार न करता अनेक वर्षाच्या अनुभवातून त्यांची विचार प्रक्रीया सुरु असते. पूर्वनिर्धारित किंवा गृहीतकाचा आधार न घेता ते प्रत्येक गोष्टीचे आकलन करत असतात.
सॅडलर – स्मिथ (2005) यांच्या मते अंतस्फूर्ती बोधानिक शैलीचे लोक हे शीघ्र गतीने, जाणीवेच्या पलीकडे जाऊन, समग्र संबधाचा प्रभावीपणे अंदाज बांधतात. वास्तव परिस्थितीच्या पलीकडे जाऊन कार्य करण्याची वृत्ती असते. प्राप्त परीस्थितीत माहितीचे विश्लेषण पटकन करतात व मिळालेली माहिती आहे तशीच न मांडता स्वतःची अशी एक वेगळी छाप त्यासोबत सोडतात. बऱ्याचदा त्यांनी मांडलेले विचार अतार्किक व सत्याला सोडून असतात. कारण हे लोक नेहमी सर्व सामान्यापेक्ष्या वेगळा विचार करतात. पण अंतस्फूर्ती बोधानिक शैलीचे लोक हे आपले विचार अनेक वर्षाच्या अनुभवातून आलेल्या निश्चित तथ्याच्या आधारे मांडत असतात. ईपस्टेन (1996) यांच्या मते अंतस्फूर्ती बोधानिक शैली ही प्राप्त माहितीपेक्षा व्यक्तीच्या सजग (mindfulness) अनुभवावरच अधिक अवलंबून असते.
अंतर्ज्ञानी बोधानिक शैली असलेल्या व्यक्ती साहचर्य पद्धतीने विचार करतात, याला अनुभवात्मक विचार देखील म्हटले जाते. त्यांच्याकडे समग्र आणि वैश्विक दृष्टीकोन असतो आणि त्यांना त्यांची विचार करण्याची पध्दती माहित नसते. ते अनुभव साहचर्य एकाग्र करतात आणि अंतर्ज्ञानांवर अवलंबून असतात, केवळ तथ्येच नव्हे तर भावना आणि संदर्भ देखील लक्षात घेतात. उदाहरणार्थ, एखाद्या कलाकारास अंतर्ज्ञानी शैली असणे आवश्यक आहे. कामावर आणि इतर संदर्भांमध्ये, कलाकार एकत्रितपणे माहितीच्या तुकड्यांना जोडणाऱ्या जटिल, समग्र पद्धतीने परिस्थितींचे विश्लेषण करण्याची शक्यता असते.
एकात्मिक बोधानिक शैली:
  • अशा विद्यार्थ्याचे मानसिक व भावनिक संतुलित असते,
  • अशा विद्यार्थ्याची संज्ञानात्मक प्रक्रिया व्दिमार्गी सुरु असते,
  • अशा विद्यार्थ्याना विविध क्षेत्रातील विशेष माहिती असते,
  • असे विद्यार्थी अतिशय लवचिक आणि अनुकूल असतात,
  • असे विद्यार्थी सहज आणि त्वरीत एका शैलीतून दुसऱ्या शैलीत रुपांतरीत होतात,
  • अशा विद्यार्थ्याचे आंतरिक नियंत्रण केंद्र उच्च दिसून येते,
  • असे विद्यार्थी समस्या सोडविण्यासाठी संधी शोधत असतात,
  • असे विद्यार्थी नाविन्यपूर्ण/ सर्जनशील व नेहमी सक्रीय असतात.
विद्यार्थी जीवनात बरेचसे विद्यार्थी हे एकात्मिक बोधानिक शैलीचे आढळून येतात. कारण बऱ्याच विद्यार्थ्यांना विविध प्रसंगांना अनुसरून कार्य करायचे असते. तसेच अनेक विद्यार्थी हे आपल्या अनुकुलतेनुसार कार्य करणे पसंद करतात. त्यामुळे अशा विद्यार्थ्यांना पद्धतशीर आणि अंतर्ज्ञानी बोधानिक शैली अंगी बाळगणे अत्यावश्यक असते. परिस्थितीचा अंदाज घेऊन कार्य केल्याने कमीतकमी श्रमात अधिक कार्य घडून येते अशा विद्यार्थ्यांना आपण स्मार्ट म्हणतो. जीवन समृध्द करण्यासाठी कोणत्याही टोकाचा विचार न करता परिस्थितीनुसार आपले आचरण असणे आवश्यक असते.

(सदर लेखातील चित्र, इमेज Google वरून साभार)

संदर्भ:
Brown, D. H. (2000). Principles of language learning & teaching. (4th ed.). New York: Longman. (pp. 49-58)
Cassidy, S. (2004). Learning styles: An overview of theories, models, and measures, Educational Psychology,24(4), 419-444
Fleming, N. D. and Mills, Colleen (1992). Not Another Inventory, Rather a Catalyst for Reflection, To Improve the Academy, Vol. 11, pp. 137
King, A., (2011). Culture, Learning and Development: A Case Study on the Ethiopian Higher Education System.
Lewis, M. A., 2014. Learning  Styles, Motivations, and Resource Needs of Students, s.l.: Chapel Hill, North Carolina.
Markus, H.R. & Kitayama, S., H. R. & Kitayama, S., (1991). Culture and the self: implications for cognition, emotion and motivation. Psychological Review, Volume 2, p. 98.
Rayner, S., & Riding, R. J. (1996). Cognitive style and school refusal. Educational Psychology, 16, 445–451.
Rayner, S., & Riding, R. J. (1997). Towards a categorisation of cognitive styles and learning styles. Educational Psychology, 17, 5–28.
Sadler-Smith, E. (2009). A duplex model of cognitive style. In L. F. Zhang & R. J. Sternberg (Eds.), Perspectives on the nature of intellectual styles (pp. 3–28). New York, NY: Springer Publishing Company.
Sternberg, R. J., & Grigorenko, E.L. (1997). Are cognitive styles still in style?. Ameerican Psychooloogist, 52, 700-712
Sternberg, R. J., & Zhang, Li-Fang (2001). Perspectives on thinking, learning, and cognitive styles.                 Mahwah, NJ: Lawrence Erlbaum associates.
Tourangeau, R. and Sternberg, R. J. (1981). Aptness in metaphor. Cognitive Psychology 13, 27-55.

उपवास (Fasting) : थांबण्याची, स्वच्छ होण्याची आणि जीवनाच्या लयीशी जुळवून घेण्याची कला

  उपवास : थांबण्याची , स्वच्छ होण्याची आणि जीवनाच्या लयीशी जुळवून घेण्याची कला (सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार) उपवास ही भारतीय ...