बुधवार, १० एप्रिल, २०१९

प्रभावी संप्रेषण | Effective Communication |


संप्रेषण म्हणजे काय?
ही एक प्रक्रिया आहे ज्याद्वारे आपण इतरांशी संवाद साधतो किंवा आपले विचार, मते, भावना, बातम्या आणि ज्ञान यांची देवाणघेवाण करतो. ऑक्सफर्ड शब्दकोषानुसार बोलणे, लिहिणे किंवा इतर माध्यमांद्वारे माहितीची देवाणघेवाण करणे म्हणजे संप्रेषण होय. संप्रेषण तोंडी किंवा लिखित स्वरुपात किंवा देहबोलीद्वारे केले जाऊ शकते. उदा. हातवारे, देहबोली, शरीराची ठेवण आणि चेहऱ्यावरील हावभाव.

प्रभावी संप्रेषण म्हणजे काय?
इच्छित परिणाम मिळविण्यासाठी आपल्या विचारांना आणि कल्पनांना इतरांपर्यंत स्पष्टपणे, अचूक आणि सौजन्याने व्यक्त करण्याची क्षमता म्हणजे प्रभावी संप्रेषण होय. यामध्ये कधी, केंव्हा, कसे आणि कोणत्या पद्धतीने बोलावे हे शिकणे समाविष्ट असते.

प्रभावी संप्रेषणाची आवश्यकता किंवा महत्त्व:
प्रभावी संप्रेषण ही एक कला आहे त्यासाठी आपणास बऱ्याच काळापासून तयारी आणि सराव केला पाहिजे. आपल्याला निरंतर संवाद साधण्याची आणि निरनिराळ्या पातळीवर व विविध लोकांबरोबर संवाद साधण्याची गरज असते; अशा प्रकारे आपल्या स्वत:च्या वैयक्तिक तसेच व्यावसायिक विकासासाठी संप्रेषण कौशल्ये विकसित करणे महत्त्वाचे आहे.

प्रभावी संप्रेषणामुळे:
संदेश स्पष्ट समजून घेतले जातात.
  1. मन वळविता येते किंवा वाटाघाटी करण्याची शक्ती वाढते.
  2. योग्य निर्णय घेता येईल.
  3. दीर्घकालीन आणि चांगले वैयक्तिक संबंध निर्माण करता येईल.
  4. ज्ञानाचे योग्य शेअरिंग करता येईल.
  5. आत्मविश्वास आणि जीवन कल्याणाची भावना वाढीस लागते.
  6. परिपक्व, आत्मविश्वास, विश्वासार्ह आणि सक्षम म्हणून  आपली प्रथम छाप चांगली पाडता येते.
  7. संघ भावना (चैतन्य) सुधारते.

"आपण केवळ संप्रेषणाने गोष्टी विकत घेऊ शकतो, परंतु कुशलतेने संप्रेषण साधल्यास आपण हवे ते विकू शकतो." - जिम रॉम

प्रभावी संप्रेषणसाठी 6 C:
1. पूर्णत्व (Completeness): सर्व व्यक्त केलेली माहिती परिपूर्ण असावी जेणेकरून शंका घेण्यास जागा नसावी. त्यामुळे निर्णय घेणे सुलभ बनते आणि अप्रत्यक्षपणे, आपल्याला इच्छित परिणाम देण्यासाठी इतर घटकांना प्रभावित करते.

2. सुसंगतता (Conciseness): याचा अर्थ आपण शक्य तितक्या कमीतकमी संभाव्य शब्दांत आणि जितके  शक्य असेल तितक्याच स्पष्ट शब्दात सांगावे; असा संदेश अधिक आकर्षक आणि समजून घेण्यास सोपा असतो.

3. स्पष्टता (Clarity): याचा अर्थ आपले विचार किंवा कल्पना स्पष्टपणे पारदर्शक असण्याबरोबरच आपले ध्येय किंवा उद्दीष्टाला अनुसरून असावे व संदिग्धता नसावी.

4. अचूकता (Correctness): सर्व तथ्ये, आकडेवारी, तारीख, रेखाचित्र आणि माहिती योग्यरित्या आणि शक्य असल्यास कालनुक्रमाने नमूद केलेली असावी.

5. संलग्नता (Cohesiveness): संदेशाची सामग्री सलग्न असावी. एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूकडे सहजतेने आणि तार्कीकपणे जाणारी हवी. एका बिंदूपासून दुसऱ्या बिंदूकडे अचानक उडी मारू नका. कारण त्यामुळे संदेश सहज समजण्यास अडथळा निर्माण होतो.

6. नम्रता (Courtesy): सौजन्य म्हणजे संप्रेषण करताना नम्र असणे होय. इतरांबद्दल आदर बाळगल्यामुळे बंध मजबूत करण्यास आणि प्रतिकूल परिस्थिती टाळण्यास मदत करते.

संप्रेषण प्रभावी करण्यासाठीची कौशल्ये:
1. भाषिक कौशल्ये: प्रभावीपणे संवाद साधण्यासाठी, भाषेवर चांगले प्रभुत्व असणे आवश्यक आहे. त्यामध्ये शब्द आणि वाक्यांचा योग्य वापर आवश्यक असतो. व्याकरणाबद्दलचे आपले ज्ञान तपासून पहा. आपला शब्दसंग्रह वाढवा. साधी आणि लहान वाक्ये वापरा. आकलनास अवघड आणि अत्यंत तांत्रिक संज्ञा टाळा. चांगली वाचन सवयी विकसित करा.

2. देहबोली आणि वक्तृत्व कौशल्ये: एखाद्या व्यक्तीच्या देहबोलीमध्ये त्याच्या शब्दांपेक्षा कितीतरी अधिक माहिती सादर होते. देहबोली आणि व्यक्तीचा आवाज (स्वर) आपल्या भावनिक स्थितीबद्दल बरेच काही सांगून जातात. चांगल्या देहबोली संकेताबद्दल जाणून घ्या. चेहऱ्यावरील हावभाव आणि शारीरिक ठेवण चांगली कशी राहील यावर काम करा. डोळ्यात डोळे घालून संपर्क साधा. स्थिर आणि खालच्या आवाजात हळू हळू बोलण्याने आत्मविश्वास आणि अधिकार वाढतो. आवाजातील चढ-उतार, संवाद फेक आणि उच्चार याविषयी जाणून घ्या.

3. श्रवण कौशल्ये: चांगला श्रोता बनायला शिका. इतरांना बोलण्याची संधी द्या. इतरांच्या बोलण्यात व्यत्यय आणू नका. त्यांना काय म्हणायचे आहे ते काळजीपूर्वक आणि स्वारस्यपूर्ण ऐका. महत्त्वपूर्ण गोष्टींच्या मानसिक नोट्स बनवा किंवा त्यांची नोंद ठेवा. सर्व मुद्दे समजून घ्या, विश्लेषण आणि मूल्यांकन करा आणि नंतर आपला दृष्टीकोन तयार करा.

4. वाचन कौशल्ये: चांगल्या वाचन सवयी विकसित करा. वाचा, समजून घ्या, स्मरण करून माहिती एकत्रित करा. गरज असल्यास नोट्स तयार करा. प्राप्त माहिती सुज्ञपणे वापरा. आपण जे वाचता आहात भावपूर्ण अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करा दोन ओळींमधील गर्भित  अर्थाचा शोध घ्या.

5. भावनिक कौशल्ये: शांत चित्ताने राग, तणाव आणि असुखद परिस्थितींचा सामना करण्यास शिका. स्वत:विषयी स्व-आदर आणि सकारात्मक दृष्टीकोन विकसित करा. पूर्वग्रह आणि चुकीच अंदाज विकसित होऊ नये यासाठी प्रयत्न करा. विविध सामाजिक प्रसंगात  सक्रिय व्हा. छंद जोपासा, व्यायाम आणि ध्यान-धारणा करा.

(सदर लेखातील चित्र, इमेज Google वरून साभार)
संदर्भ:
अभ्यंकर, ओक व गोळविलकर (2008). मानसशास्त्र- दक्षिण आशिया आवृत्ती. दिल्ली: पिअरसन लॉंगमन
अभ्यंकर, ओक व गोळविलकर (2014). सामान्य मानसशास्त्र. दिल्ली: पिअरसन लॉंगमन
बडगुजर, बच्छाव व शिंदे (2009). सामान्य मानसशास्त्र. पुणे: डायमंड प्रकाशन
बर्वे बी. एन. (2006). व्यक्तिमत्व सिद्धांत. नागपूर: विद्या प्रकाशन 
नाईक, शिरगावे, घास्ते व बिराजे (2013). सामान्य मानसशास्त्र. पुणे: निराली प्रकाशन
पलसाने, एम. एन. (2006). मानसशास्त्र. पुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन
Ciccarelli, S.K. and White, J.N. (2012). Psychology- south Asia edition. New Delhi: Pearson Publication  
ShivajiUniversity online SIM: Personality Development Skills, retrieved from http://www.unishivaji.ac.in/uploads/syllabus/Home/Skill%20development%20courses%202018/Personality%20development.PDF

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments and suggestions

आपणही ‘ब्रेन रॉट’ चे शिकार झालेले आहात का? | Brain Rot

  आपण ‘ब्रेन रॉट’ चे शिकार झालेले आहात का ? ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी प्रेसने 2024 चा ऑक्सफर्ड वर्ड ऑफ द इयर म्हणून ‘ब्रेन रॉट’ ( Brain Rot...