बुधवार, १० एप्रिल, २०१९

विचार कौशल्ये आणि ताण | Thinking skills and Stress |

विचार कौशल्ये आणि ताण:
मनुष्य हा विचारशील प्राणी आहे. त्याच्या बौद्धिक व उच्चस्तरीय विचार कौशल्यामुळे तो इतर प्राण्यांच्या तुलनेत सर्वश्रेष्ठ ठरतो. दैनंदिन जीवनात उद्भवणाऱ्या अनेक लहान मोठ्या समस्या सोडविताना परिस्थितीचा सर्व बाजूने विचार करून, उपलब्ध पर्याय लक्षात घेऊन निर्णय घ्यायचा असतो. अशा अनेक मानसिक क्रियांना आपण विचार म्हणतो. विचार प्रक्रिया जागृतावस्थेत अव्याहतपणे चालू असतेच, तसेच निद्रावस्थेतही ती चालू असते. ब्रूनर यांनी 'प्राप्त माहितीच्या पलीकडे जाणे म्हणजे विचार' अशी व्याख्या केलेली आहे. तर बार्टलेट यांनी 'पुराव्यांमधील रिक्त जागा भरून काढणारे एक संकीर्ण आणि उच्च स्तरीय कौशल्य ' असे म्हंटले आहे. 
या कौशल्यांचा विकास करण्यासाठी खालील काही महत्त्वाचे मार्गदर्शक तत्त्वे आहेत.
चिकीत्सक विचारांसाठी टिप्स्:
चिकीत्सक विचारसरणी आपणास समस्या, माहिती आणि निर्णय समजून घेण्यास योग्य वेळी योग्य प्रश्न विचारण्याची संधी देते. ही क्षमता विकसित करण्यासाठी खालील टिप्स लक्षात ठेवा.
कोणताही युक्तिवाद करण्यापूर्वी विविध दृष्टीकोन विचारात घेऊन स्वंतत्र आणि गंभीरपणे विचार करा.
  • योग्य, विश्वासार्ह आणि पुरेशा माहितीच्या आधारे आपल्या तर्काचे समर्थन करा. चिकित्सक विचारसरणीमध्ये मताला किंमत नसते.
  • आपल्या दृष्टीकोनातील मतभेद असलेल्या घटकांचा  अभ्यास करा आणि आपल्या निर्णयातील त्रुटी स्वीकारण्यास संकोच करू नका.
  • वस्तुनिष्ठ आणि तार्किकदृष्ट्या विचार करण्याची क्षमता निर्माण करण्यास हस्तक्षेप करणारे असे आपले स्वतःचे पक्षपाती विचार आणि पूर्वग्रह शोधून काढा.
  • आपले युक्तिवाद हे केवळ मुद्यावर केंद्रित असावे आणि इतरांच्या वैयक्तिक गुणवैशिष्ट्यांवर दोष दाखवणे टाळण्याचा प्रयत्न करा.

सृजनशील विचारासाठी टिप्सः
सृजनशील विचार, यशस्वीरित्या अंमलात आल्यास समाधानाचा अनुभव देऊन आनंद निर्माण होतो. पण हेही सत्य आहे की असे अनुभव दुर्मिळ असतात. ही क्षमता विकसित करण्यासाठी खालील टिप्स उपयोगात आणा:
  • नवीन माहिती गोळा करण्यासाठी अफाट उर्जेसह बाल-जिज्ञासा जिवंत ठेवा.
  • नवीन शक्यता आणि पर्याय तयार करण्यासाठी ज्ञात गोष्टींची पुनर्मांडणी करण्याची किंवा 'एकदम नव्याने मांडणी करण्याची’ सवय लावा आणि त्यासाठी प्रयत्न करा.
  • अधिक नाविन्यपूर्ण आणि प्रभावी समस्यचे उत्तर शोधण्यासाठी स्वत:स पुन्हा पुन्हा  प्रश्न विचारण्याचे धैर्य दाखवा.
  • ताठर विचार टाळा, समस्येसाठी एक सर्वोत्कृष्ट किंवा योग्य उत्तर असते हे लक्षात ठेवा. लवचिक रहा आणि आयुष्यामध्ये अनेक शक्यता आहेत हे मान्य करा. समस्येचे अनेक उपाय अस्तित्वात आहेत आणि सर्वच चांगले आणि योग्य संदर्भ असू शकतात.
  • लोकांची आणि साधनाची एकच निश्चित कृती पाहू नका. कोणतीही कृती प्रत्यक्षात आणण्यासाठी नवीन मार्गांचा विचार करा. मुख्यतः कारसाठी वापरल्या जाणाऱ्या टायरचा वापर इतर अनेक नाविन्यपूर्ण मार्गांनी करता येऊ शकतो. बऱ्याच प्रसंगामध्ये तीच गोष्ट खरी आहे. आपण जुन्या गोष्टी नवीन मार्गांनी शोधण्याची सवय लावावी.
  • प्राप्त माहितीवर प्रक्रिया होत असताना संयम ठेवा. जलद परिणामाची अपेक्षा ठेऊ नका. प्रत्येक नवीन कल्पना प्रयत्न प्रमाद पद्धतीने सुरू होते आणि सुरुवातीचे अपयश अध्ययन अनुभव म्हणून स्वीकारले पाहिजे या अनिश्चिततेचाही आनंद घ्या. लक्षात ठेवा 'एखादी गोष्ट होत नाही हे जाणून घेणे ' देखील ज्ञानच आहे.

ताण-तणाव व्यवस्थापन
नको असणारा ताण - चला बाजूला करू या
     ताणाची व्याख्या: आपल्या जीवन कल्याणमध्ये असणाऱ्या धोक्यांना (वास्तव किवा काल्पनिक) सामोरे जाण्याची असमर्थता म्हणजे ताण, ज्यामुळे आपल्या शरीराद्वारे प्रतिसाद आणि जुळवून घेण्याची मालिका सुरु होते.


      बहुतेकदा आपण ताण हा शब्द त्रास किंवा नकारात्मक म्हणून पाहतो. ताण-तणावाची सामान्य लक्षणे खालीलप्रमाणे आहेत.
शारीरिक लक्षणे:
  • भूक वाढणे किंवा मंदावणे
  • झोप कमी किंवा वाढणे
  • श्वासोच्छवासाची गती
  • चिंताग्रस्तता
  • मळमळ
  • स्नायू ताणणे
  • डोकेदुखी
  • तोंड कोरडे पडणे

भावनिक लक्षणे:
  • अपयशाची भावना
  • डोळ्यातील अश्रू
  • आत्मविश्वास गमावलेला
  • एकलकोंडेपणा
  • माघार घेतलेला
  • स्व आदर कमी
  • गोंधळलेला
  • अवास्तववादी/अतार्किक
  • लक्ष केंद्रीकरणातील अक्षमता
  • कोणतीही अभिरुची नसलेला

ताण-तणावाचा सामना कसा करावा
  1. योग्य-संतुलित आहार घ्यावा.
  2. पुरेशी झोप घ्यावी.
  3. दररोज व्यायाम करावा. आराम केल्याने आपले शरीर ताजेतवाने बनते.
  4. खोलवर श्वास घ्या आणि 10 पर्यंत मोजत हळूहळू श्वास सोडा.
  5. चहा कॉफी सोडून द्या.
  6. जवळच्या व्यक्तीशी सुसंवाद साधा.
  7. आपण सर्व गोष्टीवर नियंत्रिण ठेऊ शकत नाही हे स्वीकारा.
  8. सकारात्मक वृत्तीत वाढ करण्यास प्रयत्न करा. आपण अनमोल आहोत हे मान्य करा, आपण चांगल्या कार्यासाठी स्वतःला शाब्बासकी द्या. इतराकडून मिळणारी प्रशंसा स्वीकार त्यास नकार देऊ नका.
  9. ताण-तणाव बदलण्यासाठी प्रयत्न करा, ते बदलता येत नसल्यास, ते स्वीकारा; ते स्वीकारण्यास असमर्थ असल्यास दूर जा.
  10. आपल्या स्वतःच्या भावना स्वीकारा, त्यांना वाट करून द्या. त्यांना वाट करून देण्यास नकार देऊ नका.
(सदर लेखातील चित्र, इमेज Google वरून साभार)

संदर्भ:
अभ्यंकर, ओक व गोळविलकर (2008). मानसशास्त्र- दक्षिण आशिया आवृत्ती. दिल्ली: पिअरसन लॉंगमन
अभ्यंकर, ओक व गोळविलकर (2014). सामान्य मानसशास्त्र. दिल्ली: पिअरसन लॉंगमन
बडगुजर, बच्छाव व शिंदे (2009). सामान्य मानसशास्त्र. पुणे: डायमंड प्रकाशन
बर्वे बी. एन. (2006). व्यक्तिमत्व सिद्धांत. नागपूर: विद्या प्रकाशन 
नाईक, शिरगावे, घास्ते व बिराजे (2013). सामान्य मानसशास्त्र. पुणे: निराली प्रकाशन
पलसाने, एम. एन. (2006). मानसशास्त्र. पुणे: कॉन्टिनेन्टल प्रकाशन
संकपाळ, एस. पी. ताण-तणाव व्यवस्थापन blog वाचावा
Ciccarelli, S.K. and White, J.N. (2012). Psychology- south Asia edition. New Delhi: Pearson Publication  
ShivajiUniversity online SIM: Personality Development Skills, retrieved from  

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments and suggestions

विद्यार्थ्यांसाठी माइंडफुलनेस | Mindfulness for children

  विद्यार्थ्यांसाठी माइंडफुलनेस | Mindfulness for children दोन बौध्द भिक्खू नदी ओलांडत होते तेव्हा वृद्ध भिक्खूने पाहिले की एक तरुणी नदी प...