किशोरावस्था आणि मेंदू : बदलत्या मनामागचे बदलते मेंदू
किशोरावस्था ही मानवी जीवनातील अत्यंत महत्त्वाची
संक्रमणावस्था आहे. बालपणातून प्रौढत्वाकडे जाणाऱ्या या काळात शरीरात जसे वेगाने
बदल होतात, तसेच मेंदूमध्येही अत्यंत
गुंतागुंतीचे आणि मूलभूत बदल घडत असतात. त्यामुळे किशोरवयीन मुलांचे वर्तन कधी
अतिशय उत्साही, कधी भावनिक, कधी हट्टी,
तर कधी धाडसी किंवा बेफिकीर का दिसते, याचे
स्पष्टीकरण केवळ “वयाचा परिणाम” म्हणून करता येत नाही. त्यामागे त्यांच्या विकसित
होत असलेल्या मेंदूची महत्त्वपूर्ण भूमिका असते.
पूर्वी मानवी मेंदूचा विकास बालपणातच जवळजवळ
पूर्ण होतो, अशी समजूत होती. मात्र आधुनिक
मेंदूविज्ञानाने हे स्पष्ट केले आहे की मेंदूचा विकास किशोरावस्थेतही मोठ्या
प्रमाणावर सुरू असतो आणि विशेषतः प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचा विकास तुलनेने
उशिरापर्यंत चालू राहतो. त्यामुळे किशोरवयीन मुलामध्ये भावना, बक्षिसाची अपेक्षा, सामाजिक मान्यता आणि तर्कशुद्ध
निर्णयक्षमता यांच्यात काही काळ असमतोल दिसून येऊ शकतो.
किशोरावस्था म्हणजे काय?
किशोरावस्था म्हणजे बालपण आणि प्रौढत्व
यांच्यामधील संक्रमणाचा काळ. साधारणपणे 10 ते 19 वर्षांचा कालखंड (पूर्वी 12 ते 18 मानले जात होते) किशोरावस्था म्हणून विचारात घेतला जातो; मात्र तिची
सुरुवात व समाप्ती प्रत्येक व्यक्तीनुसार बदलू शकते. या काळात लैंगिक परिपक्वता,
शारीरिक वाढ, भावनिक बदल, सामाजिक संबंधांतील परिवर्तन आणि स्व-ओळखीचा विकास घडतो.
किशोरावस्थेतील बदल केवळ शरीरापुरते मर्यादित
नसतात. “मी कोण आहे?”, “इतर लोक
माझ्याबद्दल काय विचार करतात?”, “माझे भविष्य काय आहे?”
अशा प्रश्नांचा विचार या काळात अधिक तीव्र होतो. यासाठी आवश्यक
असलेल्या स्व-जाणीव, सामाजिक आकलन, नियोजन
आणि निर्णयक्षमतेच्या मेंदूतील यंत्रणा याच काळात विकसित होत असतात.
किशोरावस्थेतील
मेंदूचा विकास आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्स
किशोरावस्था
ही केवळ शरीरातील हार्मोनल आणि शारीरिक बदलांची अवस्था नसून मेंदूच्या संरचनात्मक, कार्यात्मक आणि
न्यूरल नेटवर्कच्या पुनर्रचनेची अत्यंत महत्त्वाची अवस्था आहे. बालपण संपून
प्रौढत्वाकडे वाटचाल करताना मेंदूमध्ये नवीन न्यूरल जोडण्या निर्माण होणे, काही जुन्या
जोडण्यांची छाटणी होणे, व्हाईट-मॅटरचा विकास, मायलिनेशन, मेंदूतील विविध
भागांमधील संपर्क अधिक कार्यक्षम होणे आणि कार्यकारी क्षमतांचा विकास अशा अनेक
प्रक्रिया एकाच वेळी सुरू असतात. त्यामुळे किशोरवयीन मुलांची विचारशक्ती, निर्णयक्षमता, भावनिक
नियंत्रण, सामाजिक आकलन आणि जोखीम घेण्याची प्रवृत्ती ही स्थिर नसून सतत विकसित
होत असते. मानवी मेंदूचा विकास किशोरावस्थेनंतरही तरुण प्रौढत्वापर्यंत सुरू राहतो, हे दीर्घकालीन MRI आणि diffusion-imaging
अभ्यासांनी
दाखवून दिले आहे.
1. सिनॅप्टिक
प्रुनिंग : मेंदूची नैसर्गिक छाटणी
मेंदूतील
दोन न्यूरॉन्समध्ये संदेशवहनासाठी निर्माण होणाऱ्या संपर्कस्थळांना सिनॅप्स म्हणतात. बालपणात मेंदू मोठ्या प्रमाणावर न्यूरल जोडण्या निर्माण
करतो. या प्रक्रियेमुळे मुलाला विविध प्रकारचे अनुभव आत्मसात करण्यासाठी मोठी
न्यूरल क्षमता उपलब्ध होते. मात्र विकासाच्या पुढील टप्प्यांमध्ये मेंदूला निर्माण
झालेल्या प्रत्येक जोडणीची आवश्यकता समान राहत नाही. अनुभव, शिकणे आणि
वापराच्या आधारे काही न्यूरल कनेक्शन्स अधिक स्थिर व कार्यक्षम होतात, तर काही
कनेक्शन्सची घनता कमी होते. या विकासात्मक पुनर्रचनेला सिनॅप्टिक प्रुनिंग किंवा छाटणी म्हणतात. किशोरावस्थेतील मेंदूच्या परिपक्वतेमध्ये ही
प्रक्रिया विशेष महत्त्वाची मानली जाते.
सिनॅप्टिक
प्रुनिंगची तुलना बागेतील छाटणीशी करणे उपयुक्त ठरते. बागेत झाडाच्या प्रत्येक
फांदीला समान प्रमाणात वाढू दिल्यास झाडाची वाढ विस्कळीत होऊ शकते. त्याऐवजी
अनावश्यक किंवा कमी उपयुक्त फांद्यांची छाटणी करून महत्त्वाच्या फांद्यांना अधिक
चांगली वाढ होण्यासाठी संधी दिली जाते. त्याचप्रमाणे मेंदू विकासाच्या प्रक्रियेत
वापरातून मजबूत झालेल्या न्यूरल मार्गांना अधिक कार्यक्षम बनवतो आणि काही कमी
वापरल्या जाणाऱ्या किंवा अनावश्यक जोडण्यांची घनता कमी करतो. त्यामुळे प्रौढ
मेंदूमध्ये माहिती प्रक्रिया अधिक संघटित आणि कार्यक्षम होण्यास मदत होते.
तथापि, “मेंदू वापरात
नसलेली प्रत्येक जोडणी कापून टाकतो” असे सरळ म्हणणे वैज्ञानिकदृष्ट्या अचूक नाही. MRI मध्ये
किशोरावस्थेत दिसणारी कॉर्टेक्सवरील थराचे ग्रे-मॅटरची जाडी ही
सिनॅप्टिक प्रुनिंगशी संबंधित असू शकते; परंतु कॉर्टेक्सवरील
थराची जाडी किंवा ग्रे-मॅटरची घनता
हे केवळ
सिनॅप्सचे प्रत्यक्ष मापन नाही. त्यामध्ये न्यूरॉन्स, डेंड्राइट्स, ग्लिया, रक्तवाहिन्या
आणि मायलिनेशनसह अनेक सूक्ष्म घटकांचा सहभाग असतो. त्यामुळे संशोधनात “cortical
thinning = pruning” असा थेट समानार्थी निष्कर्ष काढण्यापेक्षा प्रुनिंग हा या व्यापक
विकासात्मक पुनर्रचनेचा एक संभाव्य घटक आहे, असे म्हणणे
अधिक योग्य आहे.
2. सिनॅप्टिक
प्रुनिंग आणि अनुभवाचे महत्त्व
सिनॅप्टिक
प्रुनिंगचा एक महत्त्वाचा पैलू म्हणजे अनुभवावर आधारित न्यूरल पुनर्रचना.
किशोरावस्थेत व्यक्तीचे अनुभव शाळा किंवा महाविद्यालयीन वातावरण, मित्र-मैत्रिणी, डिजिटल माध्यमे, क्रीडा, संगीत, अभ्यास, प्रेमसंबंध, सामाजिक भूमिका, नवीन
जबाबदाऱ्या आणि करिअरविषयक निर्णय इत्यादीमुळे मोठ्या प्रमाणावर बदलतात. या
अनुभवांमधून वारंवार सक्रिय होणारे न्यूरल नेटवर्क अधिक मजबूत होण्यास मदत होते.
याच
कारणामुळे किशोरावस्था ही न्यूरोप्लॅस्टीसिटीच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची
अवस्था आहे. चांगले शैक्षणिक अनुभव, संगीत किंवा
क्रीडा प्रशिक्षण, समस्या सोडविण्याचे अनुभव, सामाजिक
कौशल्यांचा सराव आणि भावनिक नियमनाचे प्रशिक्षण मेंदूच्या कार्यक्षमतेच्या
विकासाला पोषक ठरू शकते. याउलट, दीर्घकालीन ताण, झोपेची कमतरता
किंवा पदार्थांचा गैरवापर यांसारखे अनुभव विकसित होत असलेल्या मेंदूवर प्रतिकूल
परिणाम करू शकतात. किशोरावस्थेतील मेंदू हा स्थिर नसून अनुभवांना प्रतिसाद देणारी
विकसित होत असलेली प्रणाली आहे, ही बाब येथे महत्त्वाची आहे.
3. मायलिनेशन :
न्यूरल संदेशवहनाची गती वाढविणारी प्रक्रिया
किशोरावस्थेतील
दुसरी अत्यंत महत्त्वाची प्रक्रिया म्हणजे मायलिनेशन. न्यूरॉन्सच्या अक्षतंतूंना
(axons) वेढणाऱ्या मायलिन नावाच्या आवरणामुळे विद्युत संदेशांचे वहन अधिक
वेगाने आणि कार्यक्षमतेने होण्यास मदत होते. मध्यवर्ती मज्जासंस्थेत मायलिन तयार
करणाऱ्या पेशींना oligodendrocytes म्हणतात.
मायलिनला
विद्युत तारेभोवतीच्या insulating आवरणाशी तुलना करता येते. ज्या
प्रकारे योग्य insulation मुळे विद्युत संदेश अधिक
कार्यक्षमतेने प्रवाहित होतो, त्याचप्रमाणे मायलिनयुक्त अक्षतंतूंमधून
न्यूरल सिग्नल्स अधिक कार्यक्षमपणे प्रवास करतात.
किशोरावस्थेत व्हाईट-मॅटरची
घनता आणि विविध व्हाईट-मॅटरच्या
ट्रक्टमध्ये सूक्ष्म संरचनात्मक बदल सुरू राहतात. या बदलांचा संबंध
मायलिनेशनबरोबरच अक्षतंतूं डायमिटर, अक्षतंतूं पॅकिंग आणि इतर मायक्रोस्ट्रक्चरल घटकांशीही
असतो.
विशेषतः
मेंदूच्या दूरवरच्या भागांना जोडणाऱ्या दीर्घ-पल्ल्याचे मज्जातंतूंच्या जाळ्याच्या
विकासामुळे माहितीचे एकत्रीकरण अधिक प्रभावी होते. उदाहरणार्थ, प्रीफ्रंटल भाग
आणि subcortical किंवा इतर cortical भागांमधील व्हाईट-मॅटर जोडण्या विकसित होत
गेल्याने विचार, भावना, स्मरण, सामाजिक माहिती
आणि निर्णय यांचे अधिक समन्वित प्रक्रियाकरण शक्य होते. संशोधनात व्हाईट-मॅटरची परिपक्वता किशोरावस्थेतच
थांबत नाही, तर काही सहयोगी ट्रक्टची परिपक्वता
तारूण्य आणि प्रौढत्वातही पुढे सुरू राहते असे आढळते.
४.
मायलिनेशन म्हणजे फक्त “मेंदूची वायरिंग” नव्हे
मायलिनेशनचे वर्णन अनेकदा “मेंदूच्या
वायरिंगवर insulation चढणे” असे केले जाते; ही उपमा
समजण्यास सोपी असली तरी प्रत्यक्ष जैविक प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची आहे. व्हाईट-मॅटरच्या विकासात
मायलिनेशनबरोबर axonal packing, axonal diameter आणि इतर
सूक्ष्म संरचनात्मक बदलांचाही सहभाग असतो. Diffusion MRI मधून दिसणाऱ्या
व्हाईट-मॅटर परिपक्वतेच्या सर्व बदलांचे
कारण केवळ मायलिनेशन आहे असे मानता येत नाही. आधुनिक संशोधन या प्रक्रियांना वेगळे
करण्यासाठी अधिक प्रगत MRI पद्धतींचा वापर करत आहे.
यामुळे किशोरवयीन मेंदूच्या विकासाचे अधिक
योग्य वर्णन असे करता येईल की मेंदूतील न्यूरल
नेटवर्क्स अधिक कार्यक्षम, समन्वित आणि विशेषीकृत होत आहेत.
म्हणजेच किशोरावस्थेत मेंदू “नवीन” तयार होत नाही; उलट आधीपासून
अस्तित्वात असलेल्या न्यूरल आर्किटेक्चरची मोठ्या
प्रमाणावर पुनर्रचना, परिष्करण आणि एकत्रीकरण होत असते.
प्रीफ्रंटल
कॉर्टेक्स : निर्णयक्षमतेचा नियंत्रक
किशोरावस्थेतील मेंदू समजून घेण्यासाठी
प्रीफ्रंटल कॉर्टेक्स (PFC) हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तो अग्रखंडाच्या
पुढील भागात स्थित असून नियोजन, कार्यकारी नियंत्रण, निर्णयक्षमता, प्रतिसादाचे
नियमन, समस्या सोडविणे आणि ध्येयाभिमुख वर्तन यांसारख्या उच्चस्तरीय बोधात्मक
प्रक्रियांमध्ये त्याचा सहभाग असतो. किशोरावस्थेत या भागाची संरचनात्मक आणि
कार्यात्मक परिपक्वता सुरू राहते. मानवी cortical परिपक्वतेच्या दीर्घकालीन MRI अभ्यासात उच्च
स्तरीय साहचर्य बाह्यक (cortex) तुलनेने उशिरा परिपक्व होत असल्याचे दिसून आले
असून पृष्ठ-पार्श्व (dorsolateral) अग्रखंड बाह्यकामधील
परिपक्वता किशोरावस्थेच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत चालू राहू शकते.
1.
प्रीफ्रंटल कॉर्टेक्सची प्रमुख कार्ये
- नियोजन: एखादे ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी आवश्यक पायऱ्या ठरविणे.
- निर्णयक्षमता: उपलब्ध पर्यायांमधून योग्य पर्याय निवडणे आणि संभाव्य परिणामांचा विचार करणे.
- आवेग नियंत्रण: तात्काळ प्रतिक्रिया देण्याऐवजी थांबून विचार करणे.
- समस्या सोडविणे: नवीन किंवा गुंतागुंतीच्या परिस्थितीत पर्यायी उपाय शोधणे.
- कार्यकारी नियंत्रण: लक्ष, कार्यरत स्मृती, बोधनिक लवचिकता आणि ध्येय-आधारित वर्तन यांचे समन्वय करणे.
- भावनांचे नियमन: भावनिक उत्तेजना आणि परिस्थितीजन्य मागणी यांच्यात संतुलन निर्माण करण्यास मदत करणे.
- सामाजिक निर्णय: सामाजिक नियम, इतर व्यक्तींचे दृष्टिकोन आणि परिस्थितीचा संदर्भ लक्षात घेऊन वर्तन करणे.
ही सर्व कार्ये एका स्वतंत्र “निर्णय
केंद्रा”त घडत नाहीत. त्यासाठी PFC चे इतर cortical
आणि subcortical
भागांशी असलेले
परस्परसंबंध महत्त्वाचे असतात. त्यामुळे किशोरावस्थेतील बोधनिक
नियंत्रणाचा विकास म्हणजे एका मेंदूच्या भागाचा विकास एवढाच नसून विविध न्यूरल नेटवर्क्सच्या एकत्रित परिपक्वतेची प्रक्रिया आहे.
2.
किशोरांना योग्य-अयोग्य समजत नाही का?
किशोरवयीन मुलांबद्दल एक लोकप्रिय गैरसमज
असा आहे की त्यांचा प्रीफ्रंटल कॉर्टेक्स पूर्ण विकसित नसल्यामुळे त्यांना
योग्य-अयोग्य किंवा परिणाम-परिणामांची जाणीव नसते. हा निष्कर्ष अतिसुलभीकरण करणारा
आहे.
किशोरवयीन व्यक्ती अनेक परिस्थितींमध्ये
तर्कशुद्ध विचार करू शकते, भविष्यातील परिणाम समजू शकते आणि
योग्य निर्णय घेऊ शकते. मात्र प्रत्यक्ष जीवनातील निर्णय हे केवळ तर्कावर आधारित
नसतात. निर्णय घेताना भावनिक उत्तेजना, तात्कालिक
बक्षीस, सामाजिक परिस्थिती, मित्रांची उपस्थिती, ताण आणि
परिस्थितीची तीव्रता यांचा प्रभाव पडतो. म्हणून “किशोराला परिणाम माहिती नाही” आणि
“किशोराला परिणाम माहिती असूनही तो तात्कालिक आकर्षणाला बळी पडतो” या दोन गोष्टी
वेगळ्या आहेत.
याच संदर्भात किशोरावस्थेतील बोधनिक नियंत्रण प्रणाली आणि प्रबलन किंवा
सामाजिक-भावनिक प्रणाली यांच्या विकासाच्या वेळेत असणारा फरक महत्त्वाचा ठरतो. संशोधनानुसार
किशोरावस्थेत प्रबलन आणि सामाजिक-भावनिक
प्रक्रियेशी संबंधित न्यूरल प्रणाली अधिक संवेदनशील असू शकतात, तर बोधनिक नियंत्रण नेटवर्क्स अजून परिपक्व होत असतात. त्यामुळे भावनिक किंवा
सामाजिक परिस्थितीत निर्णय घेताना तात्कालिक परिणामांचे वजन वाढू शकते.
3. प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आणि आवेग नियंत्रण
किशोरवयात “थांबून विचार करणे” ही क्षमता
विकसित होत असते. उदाहरणार्थ, एखाद्या किशोराला मित्रांनी एखादे
धोकादायक काम करण्यास सांगितले. त्याला ते धोकादायक आहे हे कदाचित माहीत असेल.
तरीही मित्रांचा दबाव, उत्साह, स्वीकारले
जाण्याची इच्छा आणि तात्कालिक बक्षिसाची अपेक्षा यांमुळे तो निर्णय बदलू शकतो.
यामध्ये PFC चे काम भावनिक
किंवा प्रबलन संबंधी संकेत पूर्णपणे बंद करणे नसून, त्या संकेतांचे
नियमन आणि संदर्भानुसार मूल्यांकन करणे आहे. म्हणून किशोरांच्या निर्णयक्षमतेचा
विकास हा “भावना विरुद्ध तर्क” अशा साध्या संघर्षापेक्षा अधिक गुंतागुंतीचा आहे.
याच कारणामुळे किशोरावस्थेत स्वयंनियंत्रण, नियोजन, विलंबित समाधान आणि परिणामाचे मूल्यमापन यांचा सराव महत्त्वाचा
ठरतो. अशा अनुभवांमुळे किशोरांना केवळ “काय करू नये” हे कळत नाही, तर निर्णय
घेण्याची प्रक्रिया शिकता येते.
4.
मेंदूचा विकास आणि भविष्यातील परिणामांचा विचार
प्रीफ्रंटल कॉर्टेक्स आणि संबंधित न्यूरल नेटवर्क्सच्या परिपक्वतेमुळे किशोरावस्थेत भविष्यातील
परिणामांचा विचार करण्याची क्षमता क्रमशः सुधारते. अभ्यास, करिअर, आर्थिक नियोजन, सामाजिक
जबाबदाऱ्या आणि वैयक्तिक ध्येये यांसारख्या बाबतीत किशोर अधिक संकीर्ण नियोजन करू लागतो.
दीर्घकालीन
चेता-मानसशास्त्रीय संशोधनात किशोरावस्थेत प्रतिबंध, नियोजन आणि
भावना ओळखणे यांसारख्या क्षमतांमध्ये सुधारणा
दिसून आली आहे. त्याच वेळी जोखीम पत्करण्याच्या विकासाचा नमुना सरळ रेषेत नसतो; वय आणि
परिस्थितीनुसार त्यात चढ-उतार होऊ शकतात.
5.
किशोरवयीन मेंदू : “अपूर्ण” नव्हे, तर “विकसनशील”
किशोरवयीन मेंदूबद्दल बोलताना “teenage brain is immature” असे म्हणणे सोपे आहे; परंतु आधुनिक वैकासिक
न्यूरोसायन्स अधिक सूक्ष्म चित्र दाखवते. किशोरावस्था म्हणजे केवळ प्रीफ्रंटल
कॉर्टेक्स उशिरा विकसित होत असल्यामुळे निर्माण झालेली समस्या नाही. सामाजिक,
भावनिक आणि बोधात्मक प्रणालींचे पुनर्संयोजन ही या अवस्थेची
नैसर्गिक वैशिष्ट्ये आहेत. Crone आणि Dahl यांनी किशोरावस्थेला केवळ जोखीम आणि नियंत्रणाच्या कमतरतेच्या
दृष्टिकोनातून न पाहता सामाजिक-भावनिक गुंतवणूक आणि ध्येय
लवचिकता वाढण्याचा काळ म्हणून पाहण्याची आवश्यकता अधोरेखित केली आहे.
यामुळे किशोरावस्था ही धोक्याचीच नव्हे तर
संधीचीही अवस्था आहे. नवीन कौशल्ये शिकणे, नवीन सामाजिक भूमिका स्वीकारणे,
सर्जनशील विचार करणे, स्वतंत्र ध्येये निश्चित
करणे आणि स्वतःची ओळख निर्माण करणे यासाठी हा अत्यंत महत्त्वाचा वैकासिक खिडकी आहे.
किशोरवयीन मेंदू अजून विकसित होत आहे हे
समजल्यामुळे पालक आणि शिक्षकांची भूमिका अधिक वैज्ञानिक पद्धतीने ठरविता येते.
मुलाने एखादी चूक केली तर केवळ शिक्षा देण्याऐवजी “तू हा निर्णय का घेतलास?”, “दुसरा पर्याय
कोणता असू शकतो?”, “याचा पुढे काय परिणाम होऊ शकतो?” अशा प्रश्नांद्वारे त्याला कार्यकारी विचारप्रणालीचा सराव देता येतो.
त्याचप्रमाणे किशोरांना नियोजन, समस्या परिहार,
भावनांचे नियमन, विलंबाने मिळणारे समाधान आणि परस्पर
दृष्टीकोन यांचा अनुभव देणे उपयुक्त ठरते. नियम आवश्यक आहेत; परंतु नियमांसोबत नियमांमागील कारण समजावून सांगणे आणि निर्णय घेण्याची
संधी देणे अधिक विकासात्मक दृष्ट्या उपयुक्त ठरू शकते.
भावनिक
मेंदू आणि किशोरवय
किशोरावस्था ही मानवी जीवनातील अशी
विकासात्मक अवस्था आहे, ज्यामध्ये शरीरातील जैविक बदलांबरोबरच मेंदूच्या
भावनिक, प्रेरणात्मक आणि सामाजिक प्रक्रिया करणाऱ्या
यंत्रणांमध्येही मोठे परिवर्तन घडते. या काळात व्यक्तीची भावनिक प्रतिक्रिया,
नवीन अनुभव घेण्याची इच्छा, सामाजिक
स्वीकाराची गरज आणि बक्षिसाची अपेक्षा वाढू शकते. मात्र याच वेळी भावनांवर
नियंत्रण ठेवणे, आवेगांना थांबवणे आणि तात्कालिक
आकर्षणापेक्षा दीर्घकालीन परिणामांचा विचार करणे यांच्याशी संबंधित प्रीफ्रंटल
मेंदूचे जाळे अजून परिपक्व होत असते. त्यामुळे किशोरावस्थेतील भावनिक वर्तन समजून
घेण्यासाठी भावनिक मेंदू आणि संज्ञानात्मक नियंत्रण यांच्यातील विकासात्मक
परस्परसंबंध समजून घेणे आवश्यक आहे.
1.
भावनिक मेंदूची संकल्पना
‘भावनिक मेंदू’ हा एकच स्वतंत्र मेंदूचा
भाग नसून भावना निर्माण करणे, त्यांना अर्थ देणे, भावनिक
महत्त्व ओळखणे, प्रेरणा निर्माण करणे आणि त्या भावनांनुसार
कृती करणे यामध्ये सहभागी असलेल्या अनेक परस्परसंलग्न मेंदूच्या भागांचे
कार्यात्मक जाळे आहे. यामध्ये अमिग्डला, हिप्पोकॅम्पस,
व्हेंट्रल स्ट्रायटम, न्यूक्लियस अकम्बन्स,
ऑर्बिटोफ्रंटल कॉर्टेक्स, मेडियल प्रीफ्रंटल
कॉर्टेक्स आणि इतर संबंधित भागांचा सहभाग असतो. त्यामुळे ‘लिंबिक प्रणाली’ ही
संकल्पना उपयुक्त असली तरी आधुनिक न्यूरोसायन्समध्ये भावना ही केवळ एका ‘लिंबिक
भागाची’ क्रिया नसून अनेक cortical आणि subcortical नेटवर्क्स यांच्या परस्परसंवादातून निर्माण होणारी प्रक्रिया मानली जाते.
किशोरावस्थेत या भावनिक व प्रेरणात्मक
प्रणालींची कार्यक्षमता आणि प्रीफ्रंटल नियंत्रण प्रणालीची परिपक्वता एकाच वेगाने
विकसित होत नाही. संशोधनात असे सूचित होते की अमिग्डला आणि व्हेंट्रल
स्ट्रायटमसारख्या subcortical भागांमध्ये होणारे विकासात्मक बदल
प्रीफ्रंटल नियंत्रण यंत्रणेच्या परिपक्वतेपेक्षा तुलनेने आधी किंवा वेगळ्या गतीने
घडतात. या विकासात्मक वेळेतील फरकामुळे भावनिकदृष्ट्या तीव्र किंवा
सामाजिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण परिस्थितींमध्ये किशोरांचे वर्तन अधिक प्रतिक्रियाशील
होऊ शकते.
2.
अमिग्डला : भावनिक महत्त्व ओळखणारा मेंदूचा भाग
अमिग्डला हा टेम्पोरल लोबच्या आतील भागात
असलेला न्यूरल संरचनांचा समूह असून तो भावनिकदृष्ट्या महत्त्वपूर्ण माहितीच्या
प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका बजावतो. विशेषतः संभाव्य धोका, भीती, भावनिक चेहऱ्यावरील संकेत, सामाजिक धोक्याची जाणीव
आणि इतरांच्या भावनिक अवस्थांशी संबंधित माहितीवर प्रक्रिया करण्यामध्ये
अमिग्डलाचा सहभाग असतो. तो केवळ ‘भीतीचे केंद्र’ नसून एखाद्या उत्तेजक घटनेला
भावनिक महत्त्व किंवा शांतता देण्यामध्येही महत्त्वाची भूमिका बजावतो.
किशोरावस्थेत अमिग्डला आणि प्रीफ्रंटल
कॉर्टेक्स यांच्यातील परस्परसंबंध अजून विकसित होत असतो. त्यामुळे एखाद्या सामाजिक
किंवा भावनिक परिस्थितीचे मूल्यमापन करताना किशोरवयीन व्यक्तीला त्या घटनेचे
भावनिक महत्त्व प्रखरपणे जाणवू शकते, तर त्यावर शांतपणे विचार करून
प्रतिसाद देण्याची नियंत्रणक्षमता परिस्थितीनुसार कमी-अधिक असू शकते. संशोधनाच्या
काही आढाव्यांमध्ये भावनिक चेहरे किंवा भावनिक कार्यांदरम्यान किशोरांमध्ये
अमिग्डलाची सक्रियता मुले किंवा प्रौढांच्या तुलनेत अधिक असल्याचे आढळले आहे;
मात्र हा परिणाम सर्व अभ्यासांमध्ये एकसारखा दिसत नाही आणि कार्याचे
स्वरूप, वय, विकासाची अवस्था आणि
संशोधनपद्धती यांनुसार परिणाम बदलतात.
यामुळे एखाद्या किशोराला पालकांनी केलेली
साधी टीका,
शिक्षकांनी केलेली सार्वजनिक सूचना किंवा मित्राने केलेले दुर्लक्ष
हे प्रौढ व्यक्तीपेक्षा अधिक भावनिकदृष्ट्या महत्त्वाचे वाटू शकते. याचा अर्थ
किशोर मुद्दाम ‘अति प्रतिक्रिया’ देत आहे असे नसते. त्याच्या मेंदूमध्ये त्या
घटनेला दिले जाणारे भावनिक महत्त्व आणि त्यावर नियंत्रण ठेवण्याची प्रक्रिया
अद्याप विकासाच्या टप्प्यात असते. म्हणूनच किशोरांच्या भावनिक प्रतिक्रियांना
‘नाटक’, ‘हट्ट’ किंवा ‘अति संवेदनशीलपणा’ म्हणून
नाकारण्याऐवजी त्या प्रतिक्रियेमागील विकासात्मक आणि सामाजिक संदर्भ समजून घेणे
आवश्यक आहे.
3.
अमिग्डला आणि प्रीफ्रंटल कॉर्टेक्स यांचा संवाद
किशोरावस्थेतील भावनिक विकास समजून
घेण्यासाठी अमिग्डला–प्रीफ्रंटल कॉर्टेक्स सर्किट अत्यंत महत्त्वाचे आहे. अमिग्डला
भावनिक महत्त्व असलेली माहिती वेगाने प्रक्रिया करण्यात सहभागी असतो, तर प्रीफ्रंटल
कॉर्टेक्स त्या भावनिक प्रतिक्रियेचे नियमन, पुनर्मूल्यांकन,
निर्णयक्षमता आणि परिस्थितीनुरूप प्रतिसाद यासाठी महत्त्वाचा असतो.
किशोरावस्थेत या दोन प्रणालींमधील कार्यात्मक आणि संरचनात्मक संपर्क अधिक विकसित
होत जातो.
उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याची वर्गात
शिक्षकांनी चूक दाखवून दिली असे गृहीत धरू. त्या क्षणी किशोराच्या अमिग्डलाला ही
घटना सामाजिक अपमान किंवा धोक्याची घटना वाटू शकते आणि राग, लाज
किंवा निराशा निर्माण होऊ शकते. प्रौढ व्यक्तीमध्ये विकसित झालेली प्रीफ्रंटल
नियंत्रण प्रणाली अशा भावनेचे पुनर्मूल्यांकन करून, “शिक्षक
माझा अपमान करण्यासाठी नव्हे तर माझी चूक सुधारण्यासाठी बोलत आहेत,” असा विचार करण्यास मदत करू शकते. किशोरामध्ये ही क्षमता अस्तित्वात असते;
परंतु ती प्रत्येक भावनिकदृष्ट्या तीव्र परिस्थितीत समान
कार्यक्षमतेने वापरली जाईलच असे नाही.
महत्त्वाचे म्हणजे किशोरांना तर्कशुद्ध
विचार करता येत नाही, असे या संशोधनातून सिद्ध होत नाही. उलट, अनेक अभ्यास दर्शवतात की किशोरांना जोखीम आणि त्यांचे संभाव्य परिणाम समजू
शकतात; परंतु भावनिक उत्तेजना, सामाजिक
दबाव किंवा बक्षिसाची अपेक्षा असलेल्या परिस्थितीत त्या ज्ञानाचा प्रत्यक्ष
निर्णयावर परिणाम कमी होऊ शकतो.
बक्षिसाची
भावना आणि न्यूक्लियस अकम्बन्स
किशोरावस्थेतील मेंदू समजून घेण्यासाठी
न्यूक्लियस अकम्बन्स हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. तो व्हेंट्रल स्ट्रायटम चा एक
भाग असून बक्षिसाची अपेक्षा, बक्षिसाचे मूल्यांकन, प्रेरणा
आणि उद्दिष्टाकडे वर्तनाला प्रवृत्त करण्यामध्ये त्याचा सहभाग असतो. डोपामिनर्जिक प्रबलन
circuitry शी त्याचा घनिष्ठ संबंध आहे.
किशोरावस्थेत बक्षिसाशी संबंधित न्यूरल
प्रतिसादांमध्ये विकासात्मक बदल दिसून येतात. काही संशोधनानुसार किशोरांमध्ये प्रबलन
anticipation किंवा बक्षिसाच्या अपेक्षेच्या अवस्थेत ventral striatum/NAcc ची प्रतिक्रिया बालपण किंवा प्रौढत्वाच्या तुलनेत काही परिस्थितींमध्ये
अधिक तीव्र असू शकते. मात्र हा परिणाम प्रत्येक किशोरामध्ये किंवा प्रत्येक
प्रकारच्या बक्षिसासाठी सारखा नसतो. त्यामुळे “किशोरांचे प्रबलन प्रणाली नेहमीच hyperactive
असते” असे सरळ विधान करण्याऐवजी “काही परिस्थितींमध्ये किशोरवयीन प्रबलन
संवेदनशीलता वाढू शकते” असे म्हणणे अधिक वैज्ञानिकदृष्ट्या योग्य आहे.
1.
नवीन अनुभवांचे आकर्षण
किशोरावस्था ही अन्वेषणाची आणि नवीन अनुभव
घेण्याची अवस्था आहे. नवीन ठिकाणी जाणे, नवीन मित्र बनवणे, नवीन कौशल्य शिकणे, साहसी अनुभव घेणे किंवा
सामाजिकदृष्ट्या वेगळे काही करून पाहणे यामधून मिळणारे बक्षिस किशोरांसाठी विशेष
आकर्षक असू शकते. विकासात्मक न्यूरोसायन्सच्या दृष्टीने हे पूर्णपणे नकारात्मक
नाही. उलट, योग्य सामाजिक वातावरणात हीच reward-seeking
प्रवृत्ती शिक्षण, सर्जनशीलता, क्रीडा, कला, संशोधन आणि
स्वावलंबन यांना चालना देऊ शकते.
उदाहरणार्थ, एखाद्या विद्यार्थ्याला
विज्ञानाचा प्रयोग करून पाहण्यात, नवीन संगीत शिकण्यात किंवा
एखाद्या क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यात प्रचंड उत्साह वाटतो. येथे reward
system त्याला सकारात्मक आणि कौशल्यविकासाला मदत करणाऱ्या
अनुभवांकडे प्रवृत्त करत असतो. म्हणून किशोरवयीन reward sensitivity कडे केवळ ‘धोकादायक वर्तनाचे कारण’ म्हणून पाहणे योग्य नाही.
2.
सामाजिक मान्यता : किशोरांसाठी एक शक्तिशाली बक्षिस
किशोरावस्थेत बक्षिस केवळ पैसा, खाद्यपदार्थ किंवा
वस्तू यापुरते मर्यादित राहत नाही. सामाजिक स्वीकार, मित्रांची
प्रशंसा, लोकप्रियता आणि समूहातील स्थान हीसुद्धा अत्यंत
शक्तिशाली बक्षिसे बनतात. संशोधनातून असे दिसून आले आहे की किशोरांच्या reward
circuitry वर सामाजिक उत्तेजनांचा प्रभाव महत्त्वपूर्ण असू शकतो.
समवयस्कांशी संवाद आणि सामाजिक मान्यता यांना किशोरवयात विशेष प्रेरणात्मक मूल्य
प्राप्त होते. म्हणूनच मित्रांनी “तू हे छान केलेस!” असे म्हटल्यावर मिळणारा आनंद
किंवा समूहाने स्वीकारल्याची भावना किशोराच्या वर्तनावर प्रभाव टाकू शकते.
यामुळे “मित्र काय म्हणतील?” हा प्रश्न
किशोरांच्या निर्णयप्रक्रियेत महत्त्वाचा ठरतो. Peer presence असताना reward system अधिक सक्रिय होऊ शकतो आणि
जोखमीच्या कृती अधिक आकर्षक वाटू शकतात. संशोधनातील peer-influence मॉडेल्सनुसार सामाजिक संदर्भ reward value वाढवू
शकतो आणि त्यामुळे काही परिस्थितींमध्ये जोखीम घेण्याची शक्यता वाढू शकते.
3.
सोशल मीडिया आणि “Likes” : डिजिटल बक्षिसाची नवी रूपे
आजच्या किशोरांच्या जीवनात सोशल मीडिया हा
सामाजिक बक्षिसांचा महत्त्वाचा स्रोत बनला आहे. एखाद्या फोटोला अनेक Likes, एखाद्या
व्हिडिओला views, मित्रांकडून comments किंवा एखाद्या पोस्टला मिळणारी प्रशंसा यामुळे सामाजिक मान्यता मिळाल्याचा
अनुभव येतो. न्यूरोसायन्सच्या दृष्टीने अशा सामाजिक feedback कडे reward-related processing च्या संदर्भात पाहता
येते.
तथापि, येथे एक महत्त्वाची शास्त्रीय
खबरदारी आवश्यक आहे. “Likes मिळाल्यावर किशोरांच्या
न्यूक्लियस अकम्बन्समध्ये नेहमीच डोपामिनचा स्फोट होतो” असे लोकप्रिय भाषेत
सांगितले जाते; परंतु मानवी मेंदूमधील अशा सूक्ष्म
न्यूरोकेमिकल प्रक्रियांबाबत थेट निष्कर्ष काढण्यासाठी अधिक विशिष्ट पुरावे आवश्यक
असतात. उपलब्ध संशोधन सामाजिक feedback आणि reward-related
neural circuitry यांच्यातील संबंध दर्शवते; मात्र
प्रत्येक सोशल मीडिया वापराचे परिणाम एकसारखे असतील असे नाही.
त्यामुळे सोशल मीडिया वापराचा परिणाम समजून
घेताना वापराचा कालावधी, वापराचा प्रकार, सामाजिक तुलना,
व्यक्तिमत्त्व, झोप, पालकांचे
वातावरण आणि किशोराची मानसिक अवस्था यांचा एकत्रित विचार करणे आवश्यक आहे.
4.
बक्षिसाची अपेक्षा आणि जोखमीचे वर्तन
किशोरावस्थेतील जोखमीचे वर्तन समजावून
सांगण्यासाठी “प्रबलन संवेदनशीलता–बोधनिक नियंत्रण गॅप” ही कल्पना उपयुक्त
ठरते. किशोरावस्थेत बक्षीस-शोधक आणि संवेदन-शोधक यामध्ये वाढ होऊ शकते, तर बोधनिक नियंत्रण आणि स्व-नियमन ही क्षमता
किशोरावस्थेतून तरुण प्रौढत्वाकडे हळूहळू विकसित होत जाते. या दोन प्रक्रियांच्या
वेगातील फरकामुळे काही परिस्थितींमध्ये जोखमीचे निर्णय वाढू शकतात.
दाहरणार्थ, एखाद्या किशोराला वाहन वेगाने
चालवणे धोकादायक आहे हे माहिती असू शकते. परंतु मित्र त्याच्यासोबत असतील, वेगाचा रोमांच जाणवत असेल आणि “तू किती छान गाडी चालवतोस!” अशी सामाजिक
प्रशंसा मिळण्याची शक्यता असेल, तर तात्कालिक प्रबलन मूल्य वाढू
शकते. अशा परिस्थितीत दीर्घकालीन परिणामांचा विचार करण्यापेक्षा तात्कालिक सामाजिक
बक्षिस अधिक प्रभावी ठरू शकते.
याच कारणामुळे किशोरांच्या जोखमीच्या
वर्तनाला केवळ “त्यांना धोका समजत नाही” असे म्हणणे अचूक नाही. अनेकदा धोका समजतो, परंतु त्या क्षणी
बक्षिसाचे मूल्य आणि सामाजिक संदर्भ त्यापेक्षा अधिक प्रभावी ठरतो.
5.
भावनिक मेंदू आणि बक्षिस प्रणाली यांचा परस्परसंबंध
अमिग्डला आणि न्यूक्लियस अकम्बन्स यांची
कार्ये पूर्णपणे स्वतंत्र नाहीत. किशोरवयीन वर्तनामध्ये भावना, बक्षिस आणि
संज्ञानात्मक नियंत्रण यांचा सतत परस्परसंबंध असतो. म्हणूनच काही संशोधकांनी
किशोरांच्या प्रेरित वर्तनासाठी अमिग्डला–न्यूक्लियस
अकम्बन्स–मेडियल/वेंट्रल अग्रखंड
बाह्यक यांचा त्रिसदस्यीय किंवा triadic दृष्टिकोन मांडला
आहे. या मॉडेलनुसार अमिग्डला भावनिक आणि संभाव्य धोक्याच्या संकेतांशी, न्यूक्लियस अकम्बन्स प्रबलन आणि दृष्टीकोन प्रेरणेशी, तर अग्रखंड बाह्यक नियमन आणि निर्णयक्षमतेशी संबंधित असतो.
याचा अर्थ असा की किशोर एखाद्या परिस्थितीत
तीन वेगवेगळ्या शक्तींमध्ये मानसिक संघर्ष अनुभवू शकतो—
- “हे खूप मजेदार आहे.” — प्रबलन प्रणाली
- “लोक
मला पाहत आहेत;
मला त्यांची मान्यता हवी आहे.” — सामाजिक-भावनिक
प्रणाली
- “याचा
पुढे काय परिणाम होईल?” — अग्रखंड बोधनिक नियंत्रण प्रणाली
या
तिन्हींच्या संतुलनाची क्षमता अनुभव आणि मेंदूच्या विकासासोबत सुधारत जाते.
प्रत्येक
किशोर धोकादायक वर्तन करतो का?
नाही, हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे.
किशोरावस्था आणि जोखमीचे वर्तन यांच्यात संबंध आढळला म्हणून प्रत्येक किशोरवयीन
व्यक्ती धोकादायक किंवा आवेगशील असते असे म्हणता येणार नाही. व्यक्तिमत्त्व, पालकांचे संबंध,
सामाजिक वातावरण, आर्थिक परिस्थिती, शाळेचे वातावरण, मानसिक आरोग्य, झोप, आधीचे अनुभव आणि मित्रांचा प्रभाव यांसारखे
अनेक घटक या प्रक्रियेला प्रभावित करतात. संशोधनातही adolescent
risk-taking च्या विकासात्मक स्वरूपाबाबत काही मतभेद आहेत आणि individual
differences महत्त्वाच्या आहेत.
म्हणून “किशोरवयीन मेंदू = धोकादायक मेंदू”
ही समजूत चुकीची आहे. अधिक अचूक विधान असे आहे की किशोरावस्था ही प्रबलन
संवेदनशीलता,
नाविन्यतेच शोध आणि सामाजिक-भावनिक जबाबदारी यांना
अनुकूल अशी, पण स्व-नियमन अद्याप
विकसित होत असलेली अवस्था आहे.
पालक
आणि शिक्षकांसाठी मानसशास्त्रीय अर्थ
या न्यूरोविकासाचा सर्वांत महत्त्वाचा
व्यावहारिक अर्थ असा आहे की किशोरांच्या वर्तनाकडे फक्त शिक्षा किंवा
नियंत्रणाच्या दृष्टिकोनातून पाहण्याऐवजी स्व-नियमन शिकविण्याच्या प्रक्रियेचा भाग
म्हणून पाहावे. किशोराने चूक केली तर “तुला काही कळत नाही” असे म्हणण्यापेक्षा
“त्या वेळी तुला काय आकर्षक वाटले?”, “तू कोणता निर्णय घेतलास?”,
“त्याचा परिणाम काय झाला?” आणि “पुढच्या वेळी
दुसरा पर्याय कोणता असू शकतो?” अशा प्रश्नांमधून reflective
thinking विकसित करता येते.
भावनिक नियमन, समस्या सोडविणे,
विलंबित समाधान, परिणामांचा अंदाज, सामाजिक दबावाला प्रतिसाद देणे आणि निर्णय घेण्याचा सराव यामुळे
प्रीफ्रंटल नियंत्रणाशी संबंधित कौशल्यांना आधार मिळतो. किशोरावस्था ही मेंदूच्या
विकासाच्या दृष्टीने अत्यंत लवचिक अवस्था असल्यामुळे सकारात्मक अनुभव आणि योग्य
सामाजिक वातावरणाचे महत्त्व मोठे आहे.
समारोप
किशोरावस्था ही केवळ हार्मोन्स, हट्टीपणा किंवा
भावनिक अस्थिरतेची अवस्था नाही. ती मेंदूच्या पुनर्रचनेची, सामाजिक-जाणीवेच्या
विस्ताराची, आत्मओळखीच्या निर्मितीची आणि प्रौढ
व्यक्तिमत्त्वाच्या पायाभरणीची अवस्था आहे. या काळात प्रीफ्रंटल कॉर्टेक्सचा विकास,
भावनिक आणि बक्षिसाशी संबंधित मेंदूच्या भागांची सक्रियता, सिनॅप्टिक प्रुनिंग, मायलिनेशन आणि सामाजिक अनुभव
यांचा परस्पर परिणाम होत असतो. म्हणून किशोरांचे काही निर्णय प्रौढांच्या
निर्णयांपेक्षा वेगळे असू शकतात. किशोरांच्या वर्तनाकडे केवळ शिस्त, आज्ञाधारकता किंवा नैतिकतेच्या दृष्टिकोनातून न पाहता मेंदूविकास, मानसशास्त्र आणि सामाजिक वातावरण या तिन्हींच्या संदर्भात पाहणे आवश्यक
आहे.
सर्वांत महत्त्वाचे म्हणजे, किशोरवयीन मुलांना
“समस्या” म्हणून न पाहता विकसित होत असलेला मेंदू, निर्माण
होत असलेली व्यक्तिमत्त्वाची ओळख आणि अमर्याद शक्यता असलेली व्यक्ती म्हणून पाहिले
पाहिजे. योग्य मार्गदर्शन, प्रेम, विश्वास,
स्वातंत्र्य आणि जबाबदारी यांचा समतोल साधला, तर
किशोरावस्था ही केवळ संक्रमणाची अवस्था न राहता सर्जनशील, सक्षम
आणि मानसिकदृष्ट्या सुदृढ प्रौढत्वाची भक्कम पायाभरणी ठरू शकते.
संदर्भ
Ahmed,
S. P., Bittencourt-Hewitt, A., & Sebastian, C. L. (2015). Neurocognitive
bases of emotion regulation development in adolescence. Developmental Cognitive
Neuroscience, 15, 11–25.
Casey,
B. J., Jones, R. M., & Hare, T. A. (2008). The
adolescent brain. Annals of the New York Academy of Sciences, 1124,
111–126.
Crone,
E. A., & Dahl, R. E. (2012). Understanding adolescence
as a period of social-affective engagement and goal flexibility. Nature Reviews
Neuroscience, 13, 636–650.
Ernst,
M., & Fudge, J. L. (2009). A developmental
neurobiological model of motivated behavior: Anatomy, connectivity and ontogeny
of the triadic nodes. Neuroscience & Biobehavioral Reviews, 33,
367–382.
Galvan,
A. (2010). Adolescent development of the reward system.
Frontiers in Human Neuroscience, 4, 6.
Giedd,
J. N., et al. (1999). Brain development during childhood
and adolescence: A longitudinal MRI study. Nature Neuroscience, 2,
861–863.
Gogtay,
N., et al. (2004). Dynamic mapping of human cortical
development during childhood through early adulthood. Proceedings of the
National Academy of Sciences, 101, 8174–8179.
Ladouceur,
C. D., Peper, J. S., Crone, E. A., & Dahl, R. E. (2012). White
matter development in adolescence: The influence of puberty and implications
for affective disorders. Developmental Cognitive Neuroscience, 2,
36–54.
Lebel,
C., & Beaulieu, C. (2011). Longitudinal development of
human brain wiring continues from childhood into adulthood. Journal of
Neuroscience, 31, 10937–10947.
Paul,
M. J., et al. (2017). Adolescence and reward: Making sense
of neural and behavioral changes amid the chaos. Journal of Neuroscience, 37, 10855–10862.
Shulman,
E. P., et al. (2016). The dual systems model: Review,
reappraisal, and reaffirmation. Developmental Cognitive Neuroscience, 17, 103–117.
Steinberg,
L. (2008). A social neuroscience perspective on adolescent
risk-taking. Developmental Review, 28, 78–106.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thank you for your comments and suggestions