कनेक्टिव्हिझम
(Connectivism): 21 व्या शतकातील नवीन अध्ययन पद्धती
कनेक्टिव्हिझम
हा 21 व्या शतकातील एक अत्याधुनिक आणि महत्त्वाची अध्ययन पद्धती आहे, जो विशेषतः डिजिटल तंत्रज्ञानाच्या उदयानंतर उदयास आला. पारंपरिक अध्ययन पद्धती
जसे की वर्तनवाद, बोधनिकवाद, व्यवहारवाद,
मानवतावाद आणि ज्ञानरचनावाद ह्या अध्ययन प्रक्रिया वेगवेगळ्या दृष्टिकोनांतून
समजून घेण्यास मदत करतात, यामध्ये शिक्षक-शिक्षार्थी नात्याला विशेष
महत्त्व दिले जात असे. परंतु कनेक्टिव्हिझम डिजिटल युगातील
वेगाने बदलणाऱ्या ज्ञानाच्या पार्श्वभूमीवर अधिक प्रभावी ठरतो. तसेच कनेक्टिव्हिझममध्ये
शिक्षण आणि ज्ञान हे केवळ व्यक्तीगतरित्या नव्हे, तर जागतिक
स्तरावर डिजिटल नेटवर्क्सच्या माध्यमातून सामायिक केलेल्या संबंधांमध्ये विकसित
होते, हा दृष्टिकोन मांडला जातो.
डिजिटल क्रांतीमुळे माहिती सहरित्या
उपलब्ध झाली असून, शिकण्याची प्रक्रिया ही आता एकल
केंद्रित न राहता विविध स्रोतांमधून संकलित ज्ञानावर आधारित झाली आहे.
कनेक्टिव्हिझम हे या नव्या युगातील शिकण्याचे प्रतिमान आहे, जिथे ऑनलाइन
साधने, सामाजिक माध्यमे, आणि विविध डिजिटल प्लॅटफॉर्म्स हे
ज्ञाननिर्मितीचे केंद्र आहेत. यामध्ये माणूस-माणूस, माणूस-मशीन, आणि मशीन-मशीन
यांच्यातील कनेक्शनवर भर दिला जातो, ज्यामुळे
माहितीचा वेगाने प्रसार होतो आणि नवीन ज्ञाननिर्मितीला चालना मिळते.
कनेक्टिव्हिझमचा
उगम व उद्देश
कनेक्टिव्हिझम
ही संकल्पना जॉर्ज सिमेन्स आणि स्टीफन डाऊन्स या शैक्षणिक क्षेत्रातील संशोधकांनी
2005 मध्ये मांडली आणि कनेक्टिव्हिझम या विचारधारेचा पाया रचला. या
सिद्धांताचा उद्देश अध्ययन प्रक्रियेत डिजिटल तंत्रज्ञानाचा समावेश करून
शिकणाऱ्यांना अधिक सक्षम बनवणे हे आहे. सिमेन्स आणि डाऊन्स यांनी असा युक्तिवाद
केला की आधुनिक जगात ज्ञान हे स्थिर स्वरूपात राहात नाही, तर ते सतत बदलत असते. त्यामुळे, अध्ययनाच्या
पारंपरिक पद्धती पर्याप्त ठरत नाहीत, आणि कनेक्टिव्हिझमने
नवीन ज्ञानार्जनाच्या पद्धती सुचविलेल्या आहेत.
कनेक्टिव्हिझमची
मुख्य तत्त्वे
1. जोडण्याची
प्रक्रिया (Connection-Making): कनेक्टिव्हिझमच्या
मते, शिकण्याची प्रक्रिया म्हणजे विविध माहितीस्त्रोत,
व्यक्ती, साधने आणि प्रणाली यांच्यातील संबंध जोडणे.
हा दृष्टिकोन "नेटवर्क थिअरी" वर आधारित आहे, जिथे
ज्ञान हे जाळ्यासारखे एकत्रित राहते. एखादी माहिती मिळवण्यासाठी किंवा समस्येचे
समाधान शोधण्यासाठी विविध स्रोतांमधील संबंध वापरले जातात. कनेक्टिव्हिझममध्ये
मानवी मेंदूला नेटवर्कचा एक भाग मानले जाते, जिथे माहितीचे
स्त्रोत एकमेकांशी जोडलेले असतात. यात व्यक्ती केवळ स्वतंत्र शिकणारा नसते, तर नेटवर्कमधील
एका घटकाप्रमाणे कार्य करते.
2. डिजिटल
युगातील ज्ञान: इंटरनेट आणि डिजिटल साधने अध्ययन प्रक्रियेत महत्त्वाची भूमिका
बजावतात. पारंपरिक शिक्षण पद्धतीमध्ये अध्ययन प्रक्रिया मुख्यतः वर्गखोल्या आणि
निश्चित अभ्यासक्रमांवर आधारित असते. परंतु डिजिटल तंत्रज्ञानामुळे शिकणाऱ्यांना
जगभरातील संसाधनांशी जोडले जाऊन स्वतःसाठी उपयुक्त ज्ञान निवडण्याची मुभा मिळते. कनेक्टिव्हिझमनुसार
अध्ययन प्रक्रिया म्हणजे विविध माहितीचे स्त्रोत एकत्र जोडणे. हे जोडलेले
स्रोत इंटरनेट, सामाजिक माध्यमे, ग्रुप डिस्कशन, किंवा फ्लिफ्फड
शिक्षण पद्धती असू शकते.
3. माहितीचा
प्रवाह आणि अद्ययावतता: कनेक्टिव्हिझम शिकण्याच्या प्रक्रियेत गतिशीलतेवर भर देतो.
ज्ञान सतत अद्ययावत करण्यासाठी शिकणाऱ्यांनी नेटवर्कमधील बदलांशी सुसंगत राहणे
गरजेचे आहे. वेगाने बदलणाऱ्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात, ज्या व्यक्ती ज्ञानाला अद्ययावत ठेवतात, त्या अधिक
यशस्वी ठरतात. माहिती सतत बदलत असते, त्यामुळे शिकणे
हे स्थिर किंवा निश्चित स्वरूपाचे नसते. व्यक्तीला सतत नवीन माहितीचा शोध घेऊन ती
वापरणे आवश्यक असते.
4. स्वयं-अध्ययनाची
भूमिका: व्यक्ती स्वतःच स्वतःच्या अध्ययनाची जबाबदारी घेतात. यामुळे अध्ययन ही
सक्रिय प्रक्रिया बनते. इंटरनेटवरील विविध स्त्रोतांचा वापर करून व्यक्ती स्वयं-अध्ययन
करू शकतात. हे शिक्षण अधिक स्वतंत्र, लवचिक आणि वैयक्तिक गरजांसाठी सुसंगत ठरते. कारण हे
"जाणणे" (Knowing) आणि "कसे शोधायचे" (Knowing
how to find) यावर आधारित आहे.
डिजिटल
युगातील शिकण्याचे फायदे
- इंटरनेटमुळे
माहिती 24x7 उपलब्ध असते. यामुळे पारंपरिक
वेळा आणि जागेच्या बंधनांपासून मुक्त होऊन शिक्षणाची प्रक्रिया अधिक लवचिक आणि
सुलभ होते.
- ऑनलाइन
साधनांमुळे व्यक्ती वेगवेगळ्या लोकांशी जोडले जाऊन ज्ञानाची देवाणघेवाण करू शकतात.
उदा. सोशल मीडिया, वेबिनार्स, आणि ऑनलाइन चर्चा गट इ.
- ग्लोबल
नेटवर्किंग: कनेक्टिव्हिझम ग्लोबल स्तरावर नेटवर्क तयार करण्यास प्रोत्साहन देते.
यामुळे विविध सांस्कृतिक, भौगोलिक, आणि शैक्षणिक दृष्टिकोनांशी संपर्क साधता येतो, ज्यामुळे
विचारांमध्ये वैविध्य येते.
ग्लोबल टिचर पुरस्कार' विजेते तंत्रस्नेही
अशी ओळख असलेल्या डिसले गुरुजीनी
विद्यार्थ्यांना इतर देशातील शिक्षक आणि विद्यार्थ्यांशी संवाद घडविले
आणि व्हर्च्यूअल पद्धतीने विज्ञान प्रयोग
शिकवले
कनेक्टिव्हिझम
आणि पारंपरिक शिक्षणाची तुलना
- कनेक्टिव्हिझमधील अध्ययन प्रक्रिया ही वैयक्तिक आणि गटाधारित नेटवर्क तयार करण्यात मदत करते. तर पारंपरिक अध्ययन हे पुस्तकी ज्ञान आणि साचेबद्ध अभ्यासक्रमांवर आधारित असते.
- कनेक्टिव्हिझमध्ये माहिती साठवण्यापेक्षा तिला योग्य ठिकाणी शोधणे आणि वापरणे महत्त्वाचे मानले जाते. तर पारंपरिक पद्धतीत वैयक्तिक सर्जनशीलतेपेक्षा परिक्षेत गुण मिळवण्यावर भर दिला जातो.
डिजिटल
साधनांचा वापर आणि त्यांचे महत्त्व
- सोशल मीडिया
प्लॅटफॉर्मवर शिकणाऱ्यांना विविध नेटवर्क्सशी जोडले जाते. उदा. ट्विटरवर शैक्षणिक
चर्चा, लिंक्डइनवर व्यावसायिक कनेक्शन तयार करणे.
- मूडल (Moodle),
ब्लॅकबोर्ड (Blackboard), आणि कॅनव्हास (Canvas)
यांसारख्या ऑनलाइन लर्निंग मॅनेजमेंट सिस्टिम्स (LMS) शिकवणाऱ्यांना आणि शिकणाऱ्यांना एकत्र आणतात. यामुळे वैयक्तिक
शिक्षणासाठी साधने उपलब्ध होतात.
- ओपन एज्युकेशनल
रिसोर्सेस (OER) म्हणजे विनामूल्य उपलब्ध
अभ्यास सामग्री. या साधनांचा वापर करून शिकणाऱ्यांना विविध पर्याय मिळतात आणि
शिक्षणाच्या खर्चात कपात होते.
- व्हिडीओ, पॉडकास्ट, आणि इन्फोग्राफिक्स ही मल्टीमीडिया साधने
शिकण्याची प्रक्रिया अधिक आकर्षक बनवतात. यामुळे जटिल संकल्पनांचे सुलभ स्पष्टीकरण
शक्य होते. AI मुळे ते आणखीनच सुलभ आणि सहज शक्य झालेले आहे.
ज्ञान
निर्माण प्रक्रियेत तंत्रज्ञानाची भूमिका
- कृत्रिम
बुद्धिमत्ता (AI): AI वैयक्तिक
शिकण्याच्या गरजेनुसार सानुकूलित शैक्षणिक अनुभव निर्माण करते. उदाहरणार्थ,
Duolingo किंवा Coursera यासारख्या अॅप्स AI
चा वापर करून शिकणाऱ्यांची गती, बलस्थाने,
आणि आव्हानांचा अभ्यास करतात.
- IoT (Internet of Things): IoT आधारित स्मार्ट उपकरणे शिकण्याच्या प्रक्रियेला अधिक गतिशील बनवतात. उदाहरणार्थ, स्मार्ट क्लासरूम्स, जिथे विविध साधनांमधील डेटा एकत्र केला जातो.
- ब्लॉकचेन
तंत्रज्ञान: ब्लॉकचेन तंत्रज्ञान शैक्षणिक डिप्लोमा, प्रमाणपत्रे, आणि डेटा सुरक्षितपणे साठवण्यासाठी
उपयुक्त आहे. यामुळे संस्थांमधील विश्वासार्हता वाढते.
कनेक्टिव्हिझमच्या
मर्यादा आणि आव्हाने
- सर्वांना समान दर्जाचे डिजिटल साधने आणि इंटरनेट प्रवेश उपलब्ध नसणे हे मोठे आव्हान आहे.
- डिजिटल साधनांचा प्रभावी वापर करण्यासाठी तांत्रिक कौशल्य आवश्यक आहे. याचा अभाव असल्यास शिक्षण प्रक्रियेत अडथळे निर्माण होतात.
- इंटरनेटवरील सर्व माहिती विश्वासार्ह नसते. चुकीची माहिती प्रसारित झाल्यास शिकणाऱ्यांचे नुकसान होऊ शकते.
कनेक्टिव्हिझम
तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यावसायिक, संशोधक, आणि विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त ठरतो.
भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), ब्लॉकचेन, आणि IoT यासारख्या तंत्रज्ञानामुळे
कनेक्टिव्हिझमच्या व्याप्तीत आणखी वाढ होईल. शैक्षणिक संस्थांनी डिजिटल
तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करून शिक्षण प्रणाली अधिक समृद्ध करण्याचा प्रयत्न
केला पाहिजे.
समारोप
कनेक्टिव्हिझम
ही 21 व्या शतकातील एक महत्त्वाचा आणि समकालीन अध्ययन पद्धती आहे, जी तंत्रज्ञानाच्या सहाय्याने ज्ञानाची निर्मिती, विस्तार
आणि उपयोग याला नवी दिशा देते. या पद्धतीमुळे शिक्षण फक्त पुस्तकी स्वरूपात न
राहता व्यावहारिक आणि सर्जनशील स्वरूपात विकसित होत आहे. डिजिटल युगातील
शिकणाऱ्यांसाठी कनेक्टिव्हिझमने ज्ञानाचा प्रसार अधिक सोपा, गतिशील
आणि समृद्ध बनवला आहे.
(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)
संदर्भ
Anderson,
T., & Dron, J. (2011). Three generations of distance
education pedagogy. International Review of Research in Open and Distributed
Learning, 12(3), 80–97.
Cormier,
D. (2008). Rhizomatic education: Community as curriculum.
Innovate
Downes,
S. (2012). Connectivism and connective knowledge: Essays
on meaning and learning networks. National Research Council Canada.
Siemens,
G. (2005). Connectivism: A learning theory for the digital
age. International Journal of Instructional Technology and Distance Learning, 2(1).
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thank you for your comments and suggestions