बौद्ध
मानसशास्त्र (Buddhist Psychology)
बौद्ध
मानसशास्त्र ही केवळ धार्मिक श्रद्धांपुरती मर्यादित अशी प्रणाली नसून, मानवी मनाचा अनुभवाधारित, निरीक्षणात्मक आणि
विश्लेषणात्मक अभ्यास करणारी एक सुसंगत मानसशास्त्रीय चौकट आहे. सर्वपल्ली राधाकृष्णन म्हणतात की, बौद्धदर्शन हे प्रामुख्याने मानसशास्त्र मानतात. गौतम बुद्ध यांनी
मांडलेले तत्त्वज्ञान मानवी दुःखाच्या (suffering)
अस्तित्वाला नाकारत नाही, तर त्याचे वस्तुनिष्ठ विश्लेषण
करून त्यामागील मानसिक कारणे स्पष्ट करते. दुःख, त्याची
उत्पत्ती, दुःखातून मुक्ती आणि मुक्तीकडे नेणारा मार्ग ही
चौकट चार आर्यसत्यांच्या स्वरूपात मांडली असून, ती मानवी
मानसिक जीवनाचे एक प्रकारचे “diagnostic framework” म्हणून
पाहता येते (Rahula, 1974).
आधुनिक
मानसशास्त्रात बोधन, भावना, वर्तन आणि मानसिक आरोग्य या संकल्पनांचा शास्त्रीय अभ्यास केला जातो.
बौद्ध मानसशास्त्रात याच घटकांचे सूक्ष्म, खोल आणि
परस्परसंबंधित विवेचन आढळते. विशेष म्हणजे, येथे मनाला
आत्मकेंद्री किंवा आध्यात्मिक अमूर्त घटक न मानता, अनुभवातून
निरीक्षण करता येणाऱ्या मानसिक प्रक्रियांचा संच म्हणून समजले जाते. त्यामुळे अनेक
अभ्यासक बौद्ध मानसशास्त्राला “proto-scientific psychology” किंवा अनुभवाधारित मानसशास्त्राचा प्राचीन अवतार मानतात (Wallace
& Shapiro, 2006).