बौद्ध
मानसशास्त्र (Buddhist Psychology)
बौद्ध
मानसशास्त्र ही केवळ धार्मिक श्रद्धांपुरती मर्यादित अशी प्रणाली नसून, मानवी मनाचा अनुभवाधारित, निरीक्षणात्मक आणि
विश्लेषणात्मक अभ्यास करणारी एक सुसंगत मानसशास्त्रीय चौकट आहे. गौतम बुद्ध यांनी
मांडलेले तत्त्वज्ञान मानवी दुःखाच्या (suffering)
अस्तित्वाला नाकारत नाही, तर त्याचे वस्तुनिष्ठ विश्लेषण
करून त्यामागील मानसिक कारणे स्पष्ट करते. दुःख, त्याची
उत्पत्ती, दुःखातून मुक्ती आणि मुक्तीकडे नेणारा मार्ग ही
चौकट चार आर्यसत्यांच्या स्वरूपात मांडली असून, ती मानवी
मानसिक जीवनाचे एक प्रकारचे “diagnostic framework” म्हणून
पाहता येते (Rahula, 1974).
आधुनिक
मानसशास्त्रात बोधन, भावना, वर्तन आणि मानसिक आरोग्य या संकल्पनांचा शास्त्रीय अभ्यास केला जातो.
बौद्ध मानसशास्त्रात याच घटकांचे सूक्ष्म, खोल आणि
परस्परसंबंधित विवेचन आढळते. विशेष म्हणजे, येथे मनाला
आत्मकेंद्री किंवा आध्यात्मिक अमूर्त घटक न मानता, अनुभवातून
निरीक्षण करता येणाऱ्या मानसिक प्रक्रियांचा संच म्हणून समजले जाते. त्यामुळे अनेक
अभ्यासक बौद्ध मानसशास्त्राला “proto-scientific psychology” किंवा अनुभवाधारित मानसशास्त्राचा प्राचीन अवतार मानतात (Wallace
& Shapiro, 2006).
बौद्ध
मानसशास्त्राची सैद्धांतिक पार्श्वभूमी
बौद्ध
मानसशास्त्राची सैद्धांतिक मुळे बौद्ध त्रिपिटकांमध्ये आढळतात. या त्रिपिटकांमध्ये
सुत्त पिटक (उपदेश), विनय पिटक (शिस्त)
आणि विशेषतः अभिधम्म पिटक यांचा मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून मोठा वाटा आहे.
अभिधम्म म्हणजे “धम्माचा विशेष अभ्यास” ज्यात मन (चित्त), चेतना
(विज्ञान), मानसिक अवस्था (चित्तावस्था) आणि भौतिक घटक (रूप)
यांचे तर्कशुद्ध आणि वर्गीकरणात्मक विश्लेषण केलेले आहे (Gethin, 1998).
अभिधम्म
परंपरेनुसार मन हे कोणतेही स्थिर, कायमस्वरूपी अस्तित्व
नसून, क्षणोक्षणी उद्भवणाऱ्या आणि नष्ट होणाऱ्या मानसिक
घटनांची मालिका आहे. या दृष्टिकोनात “mind as a process” ही
संकल्पना केंद्रस्थानी आहे. आधुनिक cognitive psychology आणि
neuroscience मध्येही मनाला dynamic system म्हणून समजले जाते; त्यामुळे बौद्ध अभिधम्मातील
विचार contemporary process-oriented psychology शी साधर्म्य
दर्शवतो (Varela, Thompson & Rosch, 1991).
“स्व”
(Self) संकल्पनेचे मानसशास्त्रीय विश्लेषण
बौद्ध
मानसशास्त्रातील एक मूलभूत व क्रांतिकारक संकल्पना म्हणजे अनात्म (no-self).
बौद्ध दृष्टिकोनानुसार “स्व” ही कोणतीही स्थिर, स्वतंत्र किंवा शाश्वत सत्ता नसून, ती विविध मानसिक
व शारीरिक घटकांच्या परस्परसंबंधातून निर्माण झालेली एक प्रक्रिया आहे. ही
प्रक्रिया पंचस्कंधांद्वारे स्पष्ट केलेली आहे: रूप (शरीर), वेदना
(भावनिक अनुभूती), संज्ञा (ओळख व अर्थनिर्णय), संस्कार (मानसिक प्रवृत्ती व सवयी) आणि विज्ञान (चेतना).
मानसशास्त्रीय
दृष्टीने पाहता, ही संकल्पना self-concept,
ego आणि identity यांवर प्रश्नचिन्ह निर्माण
करते. आधुनिक psychology मध्ये self ला
socially constructed आणि cognitively maintained
entity मानले जाते; बौद्ध मानसशास्त्र याच
निष्कर्षापर्यंत हजारो वर्षांपूर्वी पोहोचलेले दिसते (Markus &
Kitayama, 1991). “स्व” ही केवळ अनुभवांची एक सतत बदलणारी माळ आहे,
ही जाणीव व्यक्तीला attachment, ego-defence आणि
self-centered suffering पासून मुक्त करण्यास मदत करते, ही
बाब मानसिक आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची आहे.
पंचस्कंध आणि मानसशास्त्रीय विश्लेषण
बौद्ध मानसशास्त्रात मानवी अनुभवांचे
विश्लेषण पंचस्कंध (Five Aggregates / Five Heaps) या
संकल्पनेद्वारे केले जाते. बुद्धांनी “मनुष्य” किंवा “स्व” ही स्वतंत्र, स्थिर आणि
अपरिवर्तनीय सत्ता मानण्याऐवजी मानवी अनुभव हे पाच घटकांच्या परस्परसंबंधातून सतत
निर्माण होणारे आणि नष्ट होणारे प्रवाही प्रक्रियास्वरूप आहेत, असे स्पष्ट
केले. ही मांडणी प्रामुख्याने अभिधम्म पिटक आणि सुत्त पिटकातील अनेक प्रवचनांमध्ये
आढळते. पंचस्कंधांचे विश्लेषण केवळ तात्त्विक नसून, मानवी अनुभूती, भावना, विचार, सवयी आणि
चेतनेचा सूक्ष्म मानसशास्त्रीय आराखडा सादर करते (Bodhi, 2000).
1. रूप (Rūpa) – शारीरिक घटक
रूप स्कंध म्हणजे भौतिक किंवा
शारीरिक घटक. यात मानवी शरीर तसेच बाह्य भौतिक जगाशी संबंधित घटकांचा समावेश होतो.
बौद्ध मानसशास्त्रात रूप म्हणजे केवळ शरीररचना नसून, पंचेंद्रियांना
(दृष्टी, श्रवण, घ्राण, रसना, स्पर्श)
जाणवणारे भौतिक उद्दीपन (sensory stimuli) देखील त्यात
समाविष्ट असते. आधुनिक मानसशास्त्रातील sensation या संकल्पनेशी
रूप स्कंधाचे साधर्म्य दिसते, कारण दोन्ही ठिकाणी बाह्य उद्दीपक आणि
शरीर यांचा परस्परसंबंध महत्त्वाचा मानला जातो. बुद्धांच्या मते मानसिक अनुभवांची
सुरुवात अनेकदा भौतिक उद्दीपनांपासून होते, म्हणून रूप हा
मानसिक प्रक्रियेचा पाया आहे (Gethin, 1998).
2. वेदना (Vedanā) – सुख, दुःख व तटस्थ
भावना
वेदना स्कंध म्हणजे अनुभवातून
निर्माण होणारी भावनिक गुणवत्ता जसे सुखद, दुःखद किंवा
तटस्थ. बौद्ध मानसशास्त्रात वेदना म्हणजे भावना (emotion) नव्हे, तर भावनिक
अनुभवाचा प्राथमिक, तात्काळ स्तर आहे. उदाहरणार्थ, एखादा शब्द
ऐकताना सुखद वाटणे किंवा अप्रिय वाटणे ही वेदना आहे. आधुनिक मानसशास्त्रातील affective
experience किंवा basic emotional valence या संकल्पनेशी
वेदना स्कंध जुळतो. बुद्धांनी दुःखाच्या मुळाशी वेदनांबद्दलची आसक्ती किंवा
तिरस्कार असल्याचे सांगितले आहे, त्यामुळे वेदनांचे जागरूक निरीक्षण (mindful
awareness) हे मानसिक आरोग्यासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जाते (Bhikkhu
Bodhi, 2005).
3. संज्ञा (Saññā) – ओळख, अर्थनिर्णय,
Perception
संज्ञा स्कंध म्हणजे एखाद्या उद्दीपकाची
ओळख पटवणे, त्याला नाव देणे आणि अर्थ लावणे. आधुनिक
मानसशास्त्रात यालाच perception किंवा cognitive
labeling म्हटले जाते. उदाहरणार्थ, डोळ्यांनी
एखादी आकृती पाहिल्यानंतर “हा माणूस आहे” किंवा “हा धोका आहे” असे ठरवणे ही
संज्ञेची प्रक्रिया आहे. बौद्ध मानसशास्त्रात संज्ञेला अत्यंत महत्त्व दिले जाते, कारण चुकीच्या
संज्ञेमुळे भ्रम (illusion) आणि अविद्या (ignorance)
निर्माण होते.
आधुनिक बोधनिक मानसशास्त्रामध्ये perception
आणि interpretation
यांचा विचार
ज्या प्रकारे केला जातो, त्याची बीजे संज्ञा स्कंधाच्या
विश्लेषणात स्पष्टपणे दिसतात (Gethin, 1998).
4. संस्कार (Saṅkhāra) – सवयी, प्रवृत्ती, मानसिक
प्रतिक्रिया
संस्कार स्कंध हा सर्वात व्यापक आणि
मानसशास्त्रीय दृष्ट्या महत्त्वाचा स्कंध मानला जातो. यात सवयी, वृत्ती, प्रेरणा, इच्छाशक्ती, निर्णय, तसेच स्वयंचलित
मानसिक प्रतिक्रिया (habitual responses) यांचा समावेश
होतो. आधुनिक मानसशास्त्रातील cognition, learning, conditioning आणि behavioural
tendencies या संकल्पनांशी संस्कार स्कंधाचे जवळचे नाते आहे. बौद्ध
मानसशास्त्रानुसार कर्म ही संकल्पना संस्कारांशी जोडलेली आहे कारण वारंवार
केलेल्या मानसिक वर्तनामुळे विशिष्ट प्रवृत्ती दृढ होतात. Cognitive-behavioural
psychology मध्ये ज्या प्रकारे maladaptive thought patterns आणि habits
यांचा अभ्यास
केला जातो, त्याच्याशी संस्कार स्कंधाची मांडणी सुसंगत आहे
(Harvey, 2013).
5. विज्ञान (Viññāṇa) – चेतना, जाणीव
विज्ञान स्कंध म्हणजे चेतना किंवा जाणीव. हा स्कंध पंचेंद्रिय चेतना आणि
मानसिक चेतना अशा दोन्ही पातळ्यांवर कार्य करतो. बौद्ध मानसशास्त्रात चेतना ही
स्थिर आत्मा नसून, विशिष्ट उद्दीपक, इंद्रिय आणि मन
यांच्या संयोगातून क्षणोक्षणी निर्माण होणारी प्रक्रिया आहे. आधुनिक
मानसशास्त्रातील consciousness या संकल्पनेशी विज्ञान स्कंधाचे
साधर्म्य आहे. मात्र बौद्ध दृष्टिकोनात चेतना ही स्वतंत्र सत्ता नसून इतर
स्कंधांवर अवलंबून आहे. ही मांडणी contemporary
process-oriented theories of consciousness शी मिळतीजुळती आहे (Varela,
Thompson & Rosch, 1991).
पंचस्कंधांची संकल्पना आधुनिक
मानसशास्त्रातील sensation, perception, emotion,
cognition आणि consciousness या मूलभूत प्रक्रियांशी स्पष्ट
साधर्म्य दर्शवते. फरक इतकाच की बौद्ध मानसशास्त्र या प्रक्रियांना केवळ
वर्णनात्मक पातळीवर न थांबवता, दुःखनिवारण आणि मानसिक मुक्तीच्या
दिशेने वापरते. त्यामुळे पंचस्कंध हे केवळ तात्त्विक वर्गीकरण नसून, मानवी अनुभव
समजून घेण्यासाठी आणि त्यावर रूपांतर घडवण्यासाठी उपयुक्त असे एक सखोल
मानसशास्त्रीय मॉडेल आहे.
दुःखाची संकल्पना आणि मानसिक आरोग्य
बौद्ध मानसशास्त्राचा केंद्रस्थानी
असलेला मूलभूत विचार म्हणजे दुःख. गौतम बुद्ध यांच्या मते दुःख ही केवळ
शारीरिक वेदना किंवा दुःखद घटना यापुरती मर्यादित संकल्पना नाही, तर ती मानवी
अस्तित्वाशी निगडित असलेली एक व्यापक मानसिक अवस्था आहे. बुद्धांनी दुःखाचे तीन
प्रमुख प्रकार स्पष्ट केले आहेत: दुःख-दुःखता (प्रत्यक्ष वेदना), विपरिणाम-दुःखता
(सुख नष्ट झाल्यावर निर्माण होणारे दुःख) आणि संस्कार-दुःखता (सतत बदलणाऱ्या
जीवनप्रक्रियेमुळे निर्माण होणारी अस्थिरता). यावरून स्पष्ट होते की दुःख म्हणजे
अस्थिरता, असमाधान, अपूर्णतेची भावना आणि मानसिक ताण
यांचा एकत्रित अनुभव आहे (Rahula, 1974).
बौद्ध मानसशास्त्रानुसार दुःखाची
मुळे बाह्य परिस्थितीत नसून, मानवी मनाच्या अंतर्गत
प्रक्रियांमध्ये दडलेली आहेत. बुद्धांनी दुःखाची प्रमुख मानसिक कारणे म्हणून
तृष्णा (craving), अविद्या (ignorance) आणि आसक्ती (attachment)
यांचा उल्लेख
केला आहे. तृष्णा म्हणजे सुख, सत्ता, नातेसंबंध
किंवा स्वतःच्या प्रतिमेशी असलेली अतिशय चिवट आस; अविद्या म्हणजे
वास्तवाचे चुकीचे आकलन; विशेषतः अनित्यता (impermanence), अनात्मता (non-self)
आणि दुःख या
जीवनसत्यांची अज्ञानता; तर आसक्ती म्हणजे बदलणाऱ्या
गोष्टींना स्थिर व कायमस्वरूपी मानण्याची मानसिक प्रवृत्ती (Bhikkhu
Bodhi, 2000). या तिन्ही घटकांमुळे मन सतत तणावग्रस्त, असमाधानी आणि
अस्थिर अवस्थेत राहते.
हा दृष्टिकोन आधुनिक clinical
psychology शी आश्चर्यकारकरित्या सुसंगत आहे. उदाहरणार्थ,
anxiety disorders मध्ये भविष्याबद्दलची अतिव चिंता ही तृष्णा व नियंत्रणाच्या इच्छेशी
संबंधित असते; depression मध्ये नकारात्मक आत्मप्रतिमा, भूतकाळातील
नुकसान याविषयीची आसक्ती आणि बदल स्वीकारण्यात असमर्थता दिसून येते; तर addiction
मध्ये सुखद
अनुभव पुन्हा पुन्हा मिळवण्याची तीव्र तृष्णा आणि तात्कालिक समाधानाला चिकटून
राहण्याची प्रवृत्ती आढळते (Beck, 1976; Marlatt &
Donovan, 2005). बौद्ध मानसशास्त्रात सांगितलेली तृष्णा ही आधुनिक
मानसशास्त्रातील maladaptive craving किंवा compulsive
desire याच्याशी थेट जोडली जाऊ शकते.
याशिवाय, अविद्येची
संकल्पना आधुनिक बोधनिक मानसशास्त्रामधील cognitive
distortions शी साधर्म्य दर्शवते. “मी कायम अपयशीच आहे”, “हे दुःख कधीच
संपणार नाही” अशा विचारांमुळे व्यक्ती वास्तवाचे चुकीचे आकलन करते आणि मानसिक आजार
अधिक तीव्र होतात (Beck et al., 1979). बौद्ध मानसशास्त्रात यालाच
अविद्या म्हटले आहे, ज्यात व्यक्ती बदलत्या वास्तवाला स्थिर समजते आणि त्यामुळे
दुःख वाढते.
बौद्ध दृष्टिकोनानुसार मानसिक
आरोग्याचा अंतिम उद्देश केवळ लक्षणे कमी करणे नसून, दुःखाच्या
मुळावरच प्रहार करणे आहे. तृष्णा कमी करणे, अविद्येचे
निरसन करणे आणि आसक्तीपासून मुक्त होणे ही प्रक्रिया सम्यक स्मृती (mindfulness)
आणि प्रज्ञा (insight)
यांच्या
माध्यमातून साध्य होते. म्हणूनच आजच्या काळात mindfulness-based
therapies या anxiety, depression आणि addiction
च्या उपचारात
प्रभावी ठरत आहेत (Kabat-Zinn, 1994; Segal,
Williams & Teasdale, 2002).
अष्टांगिक मार्ग आणि मानसिक परिवर्तन
बौद्ध मानसशास्त्रात अष्टांगिक मार्ग
हे केवळ नैतिक किंवा धार्मिक आचारसंहिता नसून, मानवी मनाच्या
परिवर्तनासाठी आखलेली एक सुसंगत मानसशास्त्रीय
प्रणाली आहे. गौतम बुद्ध यांनी मांडलेल्या या मार्गाचा मुख्य उद्देश म्हणजे
दुःखाच्या मूळ मानसिक कारणांचे निरसन करून मानसिक आरोग्य, स्थैर्य आणि
प्रज्ञा विकसित करणे. अष्टांगिक मार्गाचे तीन प्रमुख घटक मानले जातात: शील (ethical
conduct), समाधी (mental discipline) आणि प्रज्ञा (wisdom).
हे तीन घटक
परस्परावलंबी असून, व्यक्तीच्या विचार, भावना आणि
वर्तनात दीर्घकालीन व शाश्वत परिवर्तन घडवून आणतात (Rahula,
1974).
1. शील, समाधी आणि
प्रज्ञा यांचा मानसशास्त्रीय समन्वय
शील म्हणजे नैतिक आचरण जसे सम्यक
वाणी, सम्यक कर्मांत आणि सम्यक आजीविका. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून पाहता, शील हा self-regulation
चा पाया आहे.
नैतिक वर्तनामुळे अपराधभाव (guilt), बोधनिक विसंगती (cognitive
dissonance) आणि आंतरवैयक्तिक ताण कमी होतो, ज्याचा थेट
परिणाम मानसिक आरोग्यावर होतो. शीलामुळे व्यक्तीच्या जीवनात स्थैर्य निर्माण होते
आणि मन समाधीसाठी तयार होते.
समाधी म्हणजे मानसिक शिस्त व
एकाग्रता. शीलाशिवाय समाधी शक्य नाही आणि समाधीशिवाय प्रज्ञेचा विकास होत नाही, ही
त्रिसूत्री बौद्ध मानसशास्त्राची मध्यवर्ती संकल्पना आहे (Analayo,
2003).
2. सम्यक स्मृती (Mindfulness):
वर्तमान
क्षणाचे निष्पक्ष निरीक्षण
सम्यक स्मृती ही अष्टांगिक मार्गातील
सर्वांत महत्त्वाची आणि आधुनिक मानसशास्त्राशी थेट जोडली गेलेली संकल्पना आहे.
सम्यक स्मृती म्हणजे वर्तमान क्षणातील शारीरिक संवेदना, भावना, विचार आणि
मानसिक अवस्था यांचे निष्पक्ष, पूर्वग्रह विरहीत (non-judgmental)
निरीक्षण. येथे
अनुभव बदलण्याचा किंवा दडपण्याचा प्रयत्न नसून, “जसे आहे तसे”
पाहण्यावर भर दिला जातो.
मानसशास्त्रीयदृष्ट्या,
mindfulness मुळे rumination (सतत नकारात्मक विचार),
automatic negative thoughts आणि भावनिक प्रतिक्रिया कमी होते. संशोधनातून
असे दिसून आले आहे की mindfulness सरावामुळे attention
regulation, emotional regulation आणि metacognitive
awareness वाढते (Kabat-Zinn, 1994; Brown &
Ryan, 2003).
त्यामुळे anxiety, depression आणि stress यांसारख्या
समस्या कमी होण्यास मदत होते.
3. सम्यक समाधी: एकाग्रता आणि मानसिक स्थैर्य
सम्यक समाधी म्हणजे मनाची खोल
एकाग्रता आणि स्थैर्य. ही केवळ लक्ष केंद्रित करण्याची प्रक्रिया नसून, मनाच्या
विखुरलेल्या अवस्थेतून (scattered mind) स्थिर व एकाग्र
अवस्थेकडे नेणारी साधना आहे. बौद्ध मानसशास्त्रात समाधीमुळे मन शांत होते, भावनिक आवेग (impulses)
कमी होतात आणि
अंतर्दृष्टी (insight) विकसित होण्यास अनुकूल वातावरण तयार होते.
आधुनिक बोधनिक
मानसशास्त्रामध्ये concentration आणि attentional
control हे executive functions मानले जातात.
समाधीच्या सरावामुळे या executive functions मध्ये सुधारणा
होते, ज्याचा परिणाम decision-making, impulse control आणि emotional
balance यावर होतो (Lutz et al., 2008).
4. बौद्ध मानसशास्त्र आणि Mindfulness-Based
Therapies
आजच्या काळात Mindfulness-Based
Stress Reduction (MBSR) आणि Mindfulness-Based
Cognitive Therapy (MBCT) या मानसोपचार पद्धती थेट बौद्ध मानसशास्त्रातून
प्रेरित आहेत. MBSR ची मांडणी Jon Kabat-Zinn यांनी केली
असून, ती सम्यक स्मृतीच्या तत्त्वांवर आधारित आहे. MBCT
मध्ये mindfulness
आणि cognitive
therapy यांचा संगम असून, विशेषतः recurrent
depression च्या उपचारात ती प्रभावी ठरली आहे (Segal, Williams
& Teasdale, 2002).
महत्त्वाची बाब म्हणजे, या आधुनिक
उपचारपद्धती बौद्ध तत्त्वज्ञानातील आध्यात्मिक चौकट बाजूला ठेवून,
mindfulness ला एक psychological skill म्हणून
वापरतात. तरीही, त्यांचा मूळ गाभा हा अनुभवाचे निष्पक्ष निरीक्षण, स्वीकार आणि
जागरूकता या अष्टांगिक मार्गातील सम्यक स्मृती आणि सम्यक समाधीशी पूर्णपणे सुसंगत
आहे.
अष्टांगिक मार्ग हा मानसिक
परिवर्तनाचा एक समग्र आराखडा आहे. शील मानसिक स्थैर्याचा पाया घालतो, समाधी मनाला
शिस्त लावते, आणि प्रज्ञा वास्तवाचे यथार्थ आकलन घडवते. सम्यक
स्मृती आणि सम्यक समाधी या संकल्पना आजच्या आधुनिक मानसशास्त्रात
वैज्ञानिकदृष्ट्या उपयुक्त ठरल्या आहेत. त्यामुळे बौद्ध मानसशास्त्र हे केवळ
प्राचीन तत्त्वज्ञान नसून, आधुनिक मानसिक आरोग्याच्या
समस्यांसाठीही एक प्रभावी व सुसंगत दृष्टिकोन प्रदान करते.
समारोप:
बौद्ध मानसशास्त्र empirically
oriented आहे, स्वतःच्या अनुभवातून सत्य पडताळून पाहण्यावर भर देते. ही बाब
आधुनिक मानसशास्त्राशी सुसंगत आहे. फरक इतकाच की बौद्ध मानसशास्त्राचा अंतिम
उद्देश केवळ symptom reduction नसून, मानसिक मुक्ती
(liberation of mind) आहे म्हणून बौद्ध मानसशास्त्रास preventive measures मानले जाते. बौद्ध मानसशास्त्र मानवी मनाचे सूक्ष्म, नैतिक आणि
अनुभवाधारित विश्लेषण सादर करते. दुःख, भावना, विचार आणि
वर्तन यांचा परस्परसंबंध समजून घेण्यासाठी ही परंपरा आजही तितकीच उपयुक्त आहे.
आधुनिक मानसशास्त्र आणि मानसोपचार क्षेत्रासाठी बौद्ध मानसशास्त्र ही केवळ पूरक
नाही, तर एक सखोल दृष्टी देणारी ज्ञानपरंपरा आहे.
![]() |
| (सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार) |
संदर्भ:
Analayo, B. (2003). Satipaṭṭhāna: The Direct Path to Realization. Birmingham:
Windhorse Publications.
Beck, A. T. (1976). Cognitive Therapy and the Emotional Disorders. New York:
International Universities Press.
Beck, A. T., Rush,
A. J., Shaw, B. F., & Emery, G. (1979). Cognitive
Therapy of Depression. New York: Guilford Press.
Bodhi, B. (2000). The Connected Discourses of the Buddha. Wisdom
Publications.
Bodhi, B. (2005). In the Buddha’s Words. Wisdom Publications.
Brown, K. W.,
& Ryan, R. M. (2003). “The Benefits of Being Present:
Mindfulness and Its Role in Psychological Well-Being.” Journal of Personality
and Social Psychology, 84(4), 822–848.
Gethin, R. (1998). The Foundations of Buddhism. Oxford University Press.
Harvey, P. (2013). An Introduction to Buddhism: Teachings, History and
Practices. Cambridge University Press.
Kabat-Zinn, J. (1994). Wherever You Go, There You Are. New York: Hyperion.
Lutz, A., Slagter,
H. A., Dunne, J. D., & Davidson, R. J. (2008). “Attention
regulation and monitoring in meditation.” Trends in Cognitive Sciences, 12(4), 163–169.
Markus, H. R.,
& Kitayama, S. (1991). Culture and the self:
Implications for cognition, emotion, and motivation. Psychological Review, 98(2), 224–253.
Marlatt, G. A.,
& Donovan, D. M. (2005). Relapse Prevention. New York:
Guilford Press.
Rahula, W. (1974). What the Buddha Taught. New York: Grove Press.
Segal, Z. V.,
Williams, J. M. G., & Teasdale, J. D. (2002). Mindfulness-Based
Cognitive Therapy for Depression. New York: Guilford Press.
Varela, F. J.,
Thompson, E., & Rosch, E. (1991). The Embodied Mind:
Cognitive Science and Human Experience. Cambridge, MA: MIT Press.
Wallace, B. A.,
& Shapiro, S. L. (2006). Mental balance and
well-being: Building bridges between Buddhism and Western psychology. American
Psychologist, 61(7), 690–701.
चट्टोपाध्याय, देवीप्रसाद (1965). भारतीय दर्शन सरल परिचय, राजकमल
प्रकाशन
जोशी, गजानन (1994). भारतीय तत्त्वज्ञानाचा बृहद इतिहास (1 ते 12 खंड), मराठी तत्त्वज्ञान महाकोश मंडळ
कंगले, र. पं. (1985). श्रीमन्माधवाचार्यप्रणीत सर्वदर्शनसंग्रह (सटीप मराठी
भाषांतर) महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृति मंडळ
दीक्षित, श्रीनिवास (2009). भारतीय तत्त्वज्ञान - नववी आवृत्ती, फडके प्रकाशन

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thank you for your comments and suggestions