निवडीचा
विरोधाभास (The Paradox of Choice)
आधुनिक
लोकशाही आणि मुक्त बाजारव्यवस्थेचा एक मूलभूत गाभा म्हणजे निवडीचे स्वातंत्र्य.
सर्वसाधारणपणे असे गृहित धरले जाते की जसे-जसे पर्याय वाढतात, तसे व्यक्तीचे स्वातंत्र्य वाढते, निर्णय अधिक
वैयक्तिक होतात आणि परिणामी समाधान व आनंदात भर पडते. ही धारणा विशेषतः उपभोक्ता
संस्कृतीत, शिक्षणव्यवस्थेत आणि करिअर निवडीत प्रकर्षाने
दिसून येते. तथापि, समकालीन मानसशास्त्रीय संशोधन या
लोकप्रिय समजुतीला गंभीर आव्हान देते.
आधुनिक
मानसशास्त्र असे सूचित करते की अतिप्रमाणात उपलब्ध असलेले पर्याय माणसासाठी वरदान
न ठरता ओझे ठरू शकतात. पर्यायांची संख्या वाढत गेली की व्यक्ती गोंधळून जाते, निर्णय घेण्याची क्षमता कमी होते आणि निवड केल्यानंतरही समाधान मिळत नाही.
अनेक वेळा ही परिस्थिती चिंता, पश्चात्ताप (regret) आणि आत्मदोषाकडे (self-blame) नेते. या विरोधाभासी
वास्तवालाच निवडीचा विरोधाभास (The Paradox of Choice) असे
म्हटले जाते.
ही
संकल्पना व्यापकपणे चर्चेत आली ती मानसशास्त्रज्ञ Barry Schwartz यांच्या The Paradox of Choice या ग्रंथामुळे. Schwartz
यांनी असे प्रतिपादन केले की आधुनिक समाजात पर्यायांचे प्रचंड
वाढलेले प्रमाण व्यक्तीच्या जीवन-कल्याणात वाढ न करता, अनेकदा
मानसिक अस्वस्थता वाढवते. त्यामुळे ही संकल्पना केवळ उपभोगाच्या क्षेत्रापुरती
मर्यादित न राहता शिक्षण, करिअर, नातेसंबंध,
वैयक्तिक ओळख आणि मानसिक आरोग्य या सर्व क्षेत्रांमध्ये अत्यंत
उपयुक्त ठरते.
निवडीचा
विरोधाभास म्हणजे काय?
निवडीचा
विरोधाभास म्हणजे अशी मानसशास्त्रीय अवस्था जिथे पर्यायांची संख्या वाढत असताना, व्यक्तीचे समाधान मात्र घटत जाते. साध्या शब्दांत सांगायचे झाल्यास,
कमी पर्याय असतील तर निर्णय घेणे तुलनेने सोपे असते. निवड स्पष्ट
असते, अपेक्षा मर्यादित असतात आणि निर्णयानंतर समाधान
मिळण्याची शक्यता जास्त असते. परंतु जेव्हा पर्यायांची संख्या प्रचंड प्रमाणात
वाढते, तेव्हा हीच प्रक्रिया उलटी होते.
अधिक
पर्याय उपलब्ध असतील, तर प्रथम निर्णय
घेणेच कठीण बनते. व्यक्ती प्रत्येक पर्यायाचे फायदे-तोटे तोलू लागते, तुलना वाढते आणि कोणताही पर्याय पूर्णपणे योग्य वाटत नाही. या
प्रक्रियेमुळे decision paralysis म्हणजेच निर्णय घेण्यात
अडथळा निर्माण होतो. काही वेळा व्यक्ती निर्णयच टाळते, तर
कधी घाईघाईने निर्णय घेते, जो नंतर चुकीचा वाटू शकतो.
दुसरे
म्हणजे, अधिक पर्याय असल्यामुळे चूक होईल याची भीती (fear
of making the wrong choice) तीव्र होते. “इतके पर्याय असताना
चुकीची निवड करणे म्हणजे माझे अपयश” अशी भावना निर्माण होते. परिणामी निर्णयाशी
निगडित ताण वाढतो.
तिसरे
महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे counterfactual thinking म्हणजेच “मी हा पर्याय निवडला नसता तर?” किंवा
“याहून चांगला पर्याय मी गमावला का?” असा सतत येणारा विचार.
निवड केल्यानंतरही मेंदू पर्यायांची तुलना थांबवत नाही. त्यामुळे निवडलेला पर्याय
कितीही योग्य असला, तरी समाधान कमी होते.
अंततः, निवडीचा विरोधाभास असा परिणाम घडवतो की व्यक्ती आनंदी होण्याऐवजी अधिक
अस्वस्थ, असमाधानी आणि मानसिकदृष्ट्या थकलेली असते. Schwartz
यांच्या मते, आधुनिक समाजातील वाढती चिंता,
नैराश्य आणि आत्मसमाधानाचा अभाव यामागे अति-निवडीचा (over
choice) मोठा वाटा आहे.
मानसशास्त्रीय स्पष्टीकरण आणि
विश्लेषण
1. निर्णयाचा मानसिक भार (Cognitive
Load)
मानवी मेंदूची माहिती प्रक्रिया
करण्याची क्षमता नैसर्गिकरीत्या मर्यादित असते. बोधात्मक मानसशास्त्रानुसार, कार्यरत स्मृती
(working memory) एकाच वेळी मर्यादित प्रमाणातच माहिती हाताळू
शकते. जेव्हा एखाद्या व्यक्तीसमोर निर्णय घेण्यासाठी फार मोठ्या प्रमाणावर पर्याय
उपलब्ध असतात, तेव्हा त्या सर्व पर्यायांचे विश्लेषण, तुलना आणि
संभाव्य परिणामांचा विचार करणे मेंदूसाठी अत्यंत ताण-तणावाचे ठरते. या अवस्थेला Cognitive
Load असे
म्हणतात.
John
Sweller यांनी मांडलेल्या Cognitive Load Theory नुसार, जर बोधात्मक भार
कार्यरत स्मृतीच्या क्षमतेपेक्षा जास्त झाला, तर निर्णयाची
गुणवत्ता घसरते आणि व्यक्ती गोंधळलेली किंवा निष्क्रिय होते. निवडीचे पर्याय वाढले
की मेंदूवर येणारा हा भार वाढतो आणि परिणामी निर्णय पुढे ढकलणे, टाळणे किंवा
घाईघाईत निर्णय घेणे अशा प्रतिक्रिया दिसून येतात.
याच प्रक्रियेचा पुढील टप्पा म्हणजे decision
fatigue सतत निर्णय घ्यावे लागल्यामुळे मानसिक ऊर्जा कमी
होणे. Roy Baumeister (1998) यांच्या
संशोधनानुसार, निर्णय घेणे हीसुद्धा मानसिक ऊर्जा खर्च करणारी
प्रक्रिया आहे. दिवसा अखेरीस किंवा पर्यायांची संख्या वाढल्यानंतर व्यक्ती अधिक
चुकीचे, भावनिक किंवा टाळणारे निर्णय घेते. त्यामुळे, “अधिक पर्याय =
अधिक स्वातंत्र्य” ही कल्पना मानसशास्त्रीयदृष्ट्या अपुरी ठरते (Sweller,
1988).
2. पश्चात्ताप आणि आत्मदोष (Regret
& Self-Blame)
पर्यायांची संख्या वाढली की
निर्णयानंतर होणारा पश्चात्ताप अधिक तीव्र होतो. कारण, प्रत्येक
निवडीसोबत न निवडलेल्या असंख्य पर्यायांची जाणीव मनात सतत राहते. जर निर्णय
अपेक्षेप्रमाणे यशस्वी झाला नाही, तर व्यक्ती परिस्थिती, नशीब किंवा
मर्यादा यांना दोष देण्याऐवजी स्वतःलाच जबाबदार धरते.
मानसशास्त्रीयदृष्ट्या याचे कारण असे
की, अधिक पर्याय असतील तर “योग्य निर्णय घेण्याची पूर्ण संधी माझ्याकडे
होती” असा अंतर्गत समज (illusion of control) तयार होतो.
त्यामुळे अपयश आल्यास विचार असा होतो. “इतके पर्याय असूनही मी योग्य निवड का करू
शकलो नाही?”
Barry
Schwartz यांच्या मते, पर्याय जितके जास्त, तितकी
आत्मदोषाची तीव्रता वाढते. कारण व्यक्तीला वाटते की चुकीचा निर्णय हा तिच्या
अकार्यक्षमतेचा पुरावा आहे, परिस्थितीचा नाही. यामुळे स्व-आदर कमी
होतो आणि समाधानाऐवजी मानसिक अस्वस्थता वाढते (Schwartz, 2004).
तसेच,
counterfactual thinking म्हणजे “जर मी तो पर्याय निवडला असता
तर…” अशा विचारांची साखळी देखील अधिक पर्यायांच्या परिस्थितीत अधिक सक्रिय होते, ज्यामुळे
पश्चात्ताप दीर्घकाळ टिकून राहतो (Zeelenberg
& Pieters, 2007).
3. परिपूर्णतेचा सापळा (Maximization
Trap)
निवडीच्या प्रक्रियेत सर्व व्यक्ती
सारख्या पद्धतीने निर्णय घेत नाहीत. The Paradox of
Choice या ग्रंथात Barry Schwartz यांनी Maximizers
आणि Satisficers अशा दोन
प्रकारच्या निर्णयकर्त्यांचे वर्णन केले आहे.
Maximizers
म्हणजे असे लोक
जे प्रत्येक निर्णयात “सर्वोत्तमच” पर्याय शोधण्याचा प्रयत्न करतात. अशा व्यक्ती
प्रत्येक उपलब्ध पर्यायाची सखोल तुलना करतात, अधिक माहिती
गोळा करतात आणि निर्णय घेण्यास जास्त वेळ घेतात. परंतु संशोधनातून असे दिसून आले
आहे की, या परिपूर्णतेच्या शोधामुळे त्यांना समाधान कमी मिळते, कारण
निर्णयानंतरही ते सतत इतर पर्यायांशी तुलना करत राहतात. परिणामी, आनंदाऐवजी शंका, असमाधान आणि
पश्चात्ताप वाढतो.
याउलट, Satisficers म्हणजे असे लोक
जे “पुरेसं चांगलं” (good enough) पर्याय स्वीकारतात. ते
परिपूर्णतेपेक्षा कार्यक्षमतेवर भर देतात. अभ्यास दर्शवितात की,
Satisficers निर्णय लवकर घेतात, निर्णयानंतर तुलना कमी करतात आणि
मानसिकदृष्ट्या अधिक समाधानी असतात (Schwartz et
al., 2002).
म्हणूनच,
Maximization Trap हा निवडीच्या विरोधाभासाचा एक महत्त्वाचा घटक ठरतो जिथे सर्वोत्तम
शोधण्याची वृत्तीच आनंदाला अडथळा ठरते.
दैनंदिन जीवनातील उदाहरणे
1. ग्राहक संस्कृती (Consumer
Culture)
आधुनिक ग्राहक संस्कृती ही निवडीच्या
अतिरेकाचे सर्वात ठळक उदाहरण आहे. मोबाईल फोन, कपडे,
OTT प्लॅटफॉर्म, ऑनलाइन कोर्सेस, अॅप्स, इलेक्ट्रॉनिक
गॅजेट्स या प्रत्येक क्षेत्रात पर्यायांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढलेली दिसते.
उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीने नवीन स्मार्टफोन खरेदी करायचा
ठरवला, तर त्याच्यासमोर शेकडो मॉडेल्स, ब्रँड्स, फीचर्स, किंमत श्रेणी
आणि रिव्ह्यूज उपलब्ध असतात. ही परिस्थिती निर्णय सुलभ करण्याऐवजी निर्णय
प्रक्रियेलाच गुंतागुंतीची आणि तणावपूर्ण बनवते.
मानसशास्त्रीय संशोधनानुसार, पर्याय खूप
जास्त असतील तर व्यक्ती निर्णय घेण्यास उशीर करते किंवा निर्णय टाळण्याकडे झुकते. Barry
Schwartz यांनी स्पष्ट केल्याप्रमाणे, जास्त पर्याय
हे स्वातंत्र्य वाढवत नाहीत, तर decision
paralysis निर्माण करतात (Schwartz, 2004). त्यामुळे अनेकदा ग्राहक खरेदी
करण्याचा निर्णय पुढे ढकलतात, “थोडं अजून शोधू” या विचारात अडकतात, आणि शेवटी
मानसिक थकवा अनुभवतात.
खरेदी केल्यानंतरही समाधान न मिळणे
हा निवडीच्या विरोधाभासाचा दुसरा महत्त्वाचा परिणाम आहे. कारण अनेक पर्यायांपैकी
एक निवडल्यावर, उरलेल्या पर्यायांची सतत मानसिक तुलना सुरू
राहते “हा फोन घेतला, पण दुसरा कदाचित जास्त चांगला असता”.
या सततच्या तुलनेमुळे पश्चाताप वाढतो आणि समाधान कमी होते. संशोधनात असे आढळून आले
आहे की, अधिक पर्याय असलेल्या परिस्थितीत लोक खरेदी केल्यानंतर स्वतःच्या
निर्णयावर कमी विश्वास ठेवतात (Iyengar & Lepper, 2000).
याच प्रक्रियेतून सतत अपग्रेड
करण्याची इच्छा निर्माण होते. बाजारपेठेत नवीन मॉडेल्स, नवीन फीचर्स
आणि “better version” सतत उपलब्ध होत असल्याने, ग्राहकाला
स्वतःची निवड अपुरी वाटू लागते. यामुळे उपभोगतावादी मानसिकता (consumerist
mindset) वाढते आणि मानसिक समाधानाऐवजी सतत असमाधानाची भावना तयार होते (Schwartz,
2016).
2. करिअर निवड (Career Choice)
आजच्या विद्यार्थ्यांसमोर करिअरच्या
असंख्य संधी उपलब्ध आहेत, परंपरागत क्षेत्रे (वैद्यकीय, अभियांत्रिकी, शिक्षण)
यांसोबतच डेटा सायन्स, AI, UX डिझाईन, कंटेंट क्रिएशन, स्पोर्ट्स
सायकॉलॉजी, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, सोशल वर्क, उद्योजकता
इत्यादी अनेक नवीन पर्याय खुले झाले आहेत. वरवर पाहता हे चित्र सकारात्मक वाटते; मात्र
मानसशास्त्रीय दृष्टीने ही परिस्थिती निर्णय अडचणीचे (career
indecision) प्रमुख कारण ठरते.
असंख्य पर्यायांमुळे विद्यार्थी
अनेकदा करिअरचा निर्णय पुढे ढकलतात. “आणखी माहिती मिळवू”, “थोडा वेळ घेऊ”
या विचारातून निर्णय लांबणीवर पडतो. यालाच analysis
paralysis असे म्हणतात. करिअर निवड ही आयुष्याशी निगडित असल्याने, चूक होण्याची
भीती अधिक तीव्र होते. Barry
Schwartz यांच्या मते, जेव्हा निवडीला अंतिम आणि
आयुष्यभराचे परिणाम जोडले जातात, तेव्हा निवडीचा विरोधाभास अधिक तीव्र
स्वरूपात प्रकट होतो (Schwartz, 2004).
“चूक झाली तर?” ही भीती
विद्यार्थ्यांच्या मानसिक आरोग्यावर परिणाम करते. अनेक विद्यार्थी स्वतःच्या
निर्णयावर विश्वास ठेवू शकत नाहीत, सतत इतरांशी
तुलना करतात, आणि करिअर निवडल्यानंतरही समाधान अनुभवत नाहीत.
परिणामी, करिअर बदल, अस्थिरता,
burnout आणि स्व-मूल्य कमी होण्यासारख्या समस्या उद्भवतात. संशोधनानुसार,
maximizer वृत्ती असलेले विद्यार्थी (सर्वोत्तमच हवे अशी अपेक्षा ठेवणारे)
करिअरबाबत अधिक असमाधानी असतात (Schwartz et al., 2002).
3. नातेसंबंध आणि विवाह (Relationships
and Marriage)
निवडीचा विरोधाभास केवळ बाजारपेठ
किंवा करिअरपुरता मर्यादित नसून, तो मानवी नातेसंबंधांमध्येही खोलवर
परिणाम करतो. डेटिंग अॅप्स, सोशल मीडिया आणि डिजिटल
नेटवर्किंगमुळे आज संभाव्य जोडीदारांची संख्या अक्षरशः अमर्याद झाली आहे. प्रत्येक
वेळी नवीन प्रोफाइल, नवीन व्यक्ती, नवीन शक्यता
उपलब्ध असल्याने “याहून चांगला जोडीदार मिळेल का?” हा प्रश्न सतत
मनात घोळत राहतो. पण अनुभव सांगतो की “शादी का लड्डू जो खाये ओ पचताये और जो ना
खाये ओभी पचताये” अशी गत होऊन बसते.
या परिस्थितीचा पहिला परिणाम म्हणजे
नातेसंबंधात स्थैर्य कमी होणे. एका नात्यात असतानाही, इतर पर्याय
उपलब्ध असल्याची जाणीव मनात राहते. त्यामुळे नात्यांमध्ये समाधान कमी होते आणि छोट्या
छोट्या अडचणीत नातं तोडण्याचा विचार लवकर होतो. मानसशास्त्रज्ञांच्या मते, अधिक पर्याय
उपलब्ध असतील तर व्यक्ती नातेसंबंधांमध्ये बांधिलकी कमी दाखवते (Lenton
& Francesconi, 2010).
दुसरा महत्त्वाचा परिणाम म्हणजे
बांधिलकीची भीती. विवाह किंवा दीर्घकालीन नातेसंबंध
म्हणजे एका पर्यायावर ठाम राहणे; परंतु निवडीचा विरोधाभास असलेल्या
समाजात हे मानसिकदृष्ट्या कठीण होते. एकदा बांधील झालो तर उरलेले पर्याय कायमचे
बंद होतील ही भीती व्यक्तीला निर्णय टाळण्याकडे प्रवृत्त करते. परिणामी, अनेक लोक
दीर्घकाळ “अस्पष्ट नात्यांमध्ये” अडकून राहतात, ज्याचा मानसिक
आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो.
निवडीचा विरोधाभास आणि मानसिक आरोग्य
1. निवडीचा विरोधाभास : मानसिक आरोग्याशी असलेले
नाते
आधुनिक मानसशास्त्रात निवडीचा
विरोधाभास ही संकल्पना केवळ ग्राहक वर्तनापुरती
मर्यादित नसून ती थेट मानसिक आरोग्याशी निगडित आहे. The
Paradox of Choice या ग्रंथात स्पष्टपणे मांडले जाते की, जेव्हा
व्यक्तीसमोर पर्यायांची संख्या अतिशय मोठी असते, तेव्हा
स्वातंत्र्याची भावना वाढण्याऐवजी मानसिक ताण, अस्वस्थता आणि
असमाधान वाढते (Schwartz, 2004). निर्णय घेण्याची प्रक्रिया ही
केवळ तार्किक नसून ती भावनिक आणि बोधनिक प्रक्रिया असल्याने, जास्त पर्याय
ही प्रक्रिया अधिक गुंतागुंतीची बनवतात.
2. अतिरिक्त निवड आणि चिंता
अतिरिक्त निवडीमुळे सर्वात आधी
वाढणारी समस्या म्हणजे चिंता. अनेक पर्यायांपैकी “योग्य” पर्याय
निवडण्याची जबाबदारी पूर्णपणे व्यक्तीवर येते. यामुळे चूक होईल का?, याहून चांगला
पर्याय राहून तर गेला नाही ना? अशा विचारांची साखळी सुरू होते. Iyengar
आणि Lepper
(2000)
यांच्या प्रसिद्ध संशोधनात असे आढळले की, जास्त पर्याय
दिलेल्या व्यक्ती निर्णय घेण्यास कमी प्रवृत्त होतात आणि निर्णय घेतल्यानंतरही
अधिक तणाव अनुभवतात. ही सततची मानसिक तुलना चिंता विकारांना (Generalized
Anxiety Disorder) पोषक ठरू शकते.
3. निर्णय टाळण्याची प्रवृत्ती
जेव्हा निर्णय घेणे मानसिकदृष्ट्या
क्लेशकारक बनते, तेव्हा अनेक व्यक्ती निर्णयच टाळण्याची
प्रवृत्ती स्वीकारतात. याला Decision Avoidance किंवा Choice
Paralysis असे म्हटले जाते. निवडीचे परिणाम गंभीर असतील (उदा. करिअर, विवाह, शिक्षण), तेव्हा ही
प्रवृत्ती अधिक तीव्र होते. Baumeister et al. (1998) यांनी
मांडलेल्या Decision Fatigue संकल्पनेनुसार, सतत निर्णय
घ्यावे लागल्यास व्यक्तीची स्व-नियंत्रण क्षमता कमी होते आणि शेवटी निर्णय न घेणे
हा “सुरक्षित” मार्ग वाटू लागतो.
4. कमी स्व-समाधान (Reduced
Self-Satisfaction)
निवडीचा विरोधाभास व्यक्तीच्या स्व-समाधानावर
थेट परिणाम करतो. अधिक पर्याय असल्यास अपेक्षा वाढतात. परिणामी, निवड कितीही
चांगली असली तरी ती “पुरेशी सर्वोत्तम” वाटत नाही. Schwartz (2004) यांनी Maximizers
आणि Satisficers
यातील फरक
स्पष्ट केला आहे. परिपूर्ण पर्याय शोधणारे Maximizers अधिक यशस्वी
असले तरी मानसिकदृष्ट्या कमी समाधानी असतात. सततची तुलना आणि अपेक्षाभंगामुळे स्व-समाधान
घटते.
5. अवसादाची भावना (Depressive
Tendencies)
अतिरिक्त निवडीमुळे निर्माण होणारी
चिंता, पश्चाताप आणि आत्मदोष यांची परिणती अनेकदा अवसादाच्या भावनेत होते.
“सर्व काही माझ्या हातात असूनही मी आनंदी का नाही?” हा प्रश्न
व्यक्तीला आत्मदोषाकडे नेतो. Seligman (1975) यांच्या Learned
Helplessness संकल्पनेशी हे साम्य दर्शवते, जिथे
नियंत्रणाची भावना असूनही व्यक्तीस मानसिकदृष्ट्या असहाय्य वाटू लागते. संशोधन
सूचित करते की उच्च अपेक्षा आणि कमी समाधान यांचा संगम अवसादाची जोखीम वाढवतो (Schwartz
et al., 2002).
6. शहरी, मध्यमवर्गीय
आणि उच्चशिक्षित समाजात तीव्रता
निवडीचा विरोधाभास विशेषतः शहरी, मध्यमवर्गीय
आणि उच्चशिक्षित समाजात अधिक तीव्रपणे दिसतो. या वर्गाकडे आर्थिक व शैक्षणिक
संसाधने अधिक असतात, पर्यायांची उपलब्धता मोठ्या प्रमाणात असते, “स्वतःची जबाबदारी
स्वतः” ही मूल्यव्यवस्था प्रबळ असते. यामुळे अपयशाचे खापर परिस्थितीवर न फोडता
स्वतःवरच फोडले जाते. Cross-cultural studies दर्शवतात की
सामूहिक संस्कृतींपेक्षा (collectivist cultures) व्यक्तिवादी
संस्कृतींमध्ये (individualistic cultures) निवडीशी निगडित
मानसिक ताण अधिक आढळतो (Markus & Kitayama, 1991).
उपाय आणि व्यावहारिक मार्ग
1. पर्यायांची मर्यादा ठेवणे: मानसशास्त्रीय
दृष्टिकोनातून पर्याय कमी करणे हे मानसिक आरोग्यास पोषक ठरते. सर्व शक्यता
तपासण्याऐवजी, काही ठराविक निकषांनुसार 3–5 पर्यायांपुरते
स्वतःला मर्यादित ठेवल्यास बोधनिक भार कमी होतो. Iyengar (2010) यांच्या
मते, structured choice मुळे निर्णय प्रक्रिया सुलभ होते आणि समाधान
वाढते.
2. “पुरेसं चांगलं” (Satisficing)
स्वीकारणे: परिपूर्णतेचा
हट्ट सोडून कार्यक्षम आणि समाधानकारक पर्याय स्वीकारणे ही मानसिक लवचिकतेची खूण
आहे. Satisficing वृत्ती असलेल्या व्यक्ती कमी चिंता अनुभवतात आणि
निर्णयानंतर अधिक समाधानी राहतात (Schwartz et
al., 2002).
हा दृष्टिकोन विशेषतः करिअर आणि वैयक्तिक नातेसंबंधांमध्ये उपयुक्त ठरतो.
3. निर्णयानंतर तुलना थांबवणे: निर्णय
घेतल्यानंतर सतत पर्यायी शक्यतांचा विचार केल्यास post-decisional
regret वाढतो. फेस्टिंगर यांच्या Cognitive
Dissonance Theory नुसार, निर्णयानंतर निवडलेल्या पर्यायाचे
सकारात्मक पैलू अधोरेखित केल्यास मानसिक समाधान वाढते. त्यामुळे तुलना थांबवणे हा
मानसिक आरोग्यासाठी महत्त्वाचा उपाय ठरतो.
4. मूल्यांवर आधारित निवड: समाज, ट्रेंड किंवा FoMO
ऐवजी स्वतःच्या
मूल्यांवर आधारित निर्णय घेतल्यास मानसिक स्थैर्य वाढते. Acceptance
and Commitment Therapy (ACT) मध्ये मूल्याधारित निवडींना विशेष महत्त्व दिले
जाते (Hayes et al., 2006). मूल्यांशी सुसंगत निर्णय घेतल्यास पर्याय
कितीही असले तरी मानसिक संघर्ष कमी होतो.
समारोप:
निवडीचा विरोधाभास आपल्याला हे
शिकवतो की स्वातंत्र्य आणि आनंद यांचे नाते सरळसोट नसते. कधी कधी कमी पर्याय, कमी अपेक्षा
आणि स्पष्ट मूल्ये हेच खऱ्या समाधानाचे स्रोत ठरतात. आजच्या “सर्व काही उपलब्ध
आहे” या युगात, काय न निवडायचे हे ठरवणे हे सुद्धा एक महत्त्वाचे
मानसिक कौशल्ये आहे.
![]() |
| (सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार) |
संदर्भ:
Baumeister,
R. F., et al. (1998). Ego depletion: Is the active self a
limited resource? Journal of Personality and Social Psychology, 74(5),
1252–1265.
Chernev,
A., Böckenholt, U., & Goodman, J. (2015). Choice
overload: A conceptual review and meta-analysis. Journal of Consumer
Psychology, 25(2), 333–358.
Hayes,
S. C., et al. (2006). Acceptance and Commitment Therapy.
Behaviour Research and Therapy, 44(1), 1–25.
Iyengar,
S. S., & Lepper, M. R. (2000). When choice is
demotivating: Can one desire too much of a good thing? Journal of Personality
and Social Psychology, 79(6), 995–1006.
Kahneman,
D. (2011). Thinking, Fast and Slow. New York: Farrar,
Straus and Giroux.
Lenton,
A. P., & Francesconi, M. (2010). Too much of a good
thing? Variety is confusing in mate choice. Psychology of Women Quarterly, 34(4), 487–498.
Markus,
H. R., & Kitayama, S. (1991). Culture and the self.
Psychological Review, 98(2), 224–253.
Schwartz,
B. (2004). The Paradox of Choice: Why More Is Less.
HarperCollins.
Schwartz,
B., Ward, A., Monterosso, J., Lyubomirsky, S., White, K., & Lehman, D. R. (2002). Maximizing versus satisficing: Happiness is a matter of
choice. Journal of Personality and Social Psychology, 83(5),
1178–1197.
Sweller,
J. (1988). Cognitive load during problem solving.
Cognitive Science.
Zeelenberg,
M., & Pieters, R. (2007). A theory of regret
regulation. Journal of Consumer Psychology.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thank you for your comments and suggestions