अवधान
(Attention)
मानसशास्त्राच्या
अभ्यासामध्ये अवधान ही संकल्पना अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. आपल्या दैनंदिन
जीवनात आपण एका क्षणी असंख्य उद्दीपकांना (stimuli) सामोरे जातो; ध्वनी, प्रकाश, गंध,
चव, स्पर्श यांसोबतच विचार आणि भावनांचेही
उत्तेजन सतत अनुभवास येते. परंतु मनुष्याच्या मानसिक क्षमतेला एकाच वेळी सर्व उद्दिपकावर
लक्ष केंद्रित करणे शक्य नसते. या असंख्य अनुभवांमधून एखाद्या निवडक अनुभवाकडे
किंवा वस्तूकडे लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता म्हणजेच अवधान होय. मानसशास्त्रीय
दृष्टिकोनातून अवधान ही बोधात्मक प्रक्रिया असून ती अध्ययन, स्मरणशक्ती,
समस्या सोडवणे, निर्णय घेणे आणि सर्जनशीलता यांसारख्या
इतर मानसिक कार्यप्रणालींसाठी आधारभूत ठरते (Anderson, 2010).
म्हणूनच बोधनिक मानसशास्त्रात आणि शैक्षणिक मानसशास्त्रात अवधानाला केंद्रस्थानी
ठेवले जाते.
अवधानाची
व्याख्या
अवधानाबद्दल
अनेक मानसशास्त्रज्ञांनी आपापल्या पद्धतीने व्याख्या दिल्या असून त्यामधून या
प्रक्रियेचे विविध पैलू समोर येतात.
- प्रथम, विल्यम जेम्स (1890) यांनी अवधानाला बोधन प्रक्रियेतील निवडकता आणि
एकाग्रतेची भूमिका अधोरेखित करून व्याख्या दिली. त्यांच्या मते, “अवधान म्हणजे मनाची ती प्रक्रिया आहे ज्यामध्ये व्यक्ती अनेक अनुभवांपैकी
एका अनुभवाची निवड करून त्यावर एकाग्रतेने लक्ष केंद्रित करते.”. या व्याख्येतून
अवधानाच्या निवडकतेचे स्वरूप स्पष्ट होते.