आयडिओमोटर
परिणाम (Ideomotor Effect)
मानवी
वर्तनातील अबोध प्रक्रियांचे स्पष्टीकरण देणाऱ्या सर्वात मनोरंजक आणि
वैज्ञानिकदृष्ट्या सिद्ध झालेल्या मानसशास्त्रीय घटनांपैकी एक म्हणजे आयडिओमोटर
परिणाम. दैनंदिन जीवनात आणि लोकप्रिय संस्कृतीत याचे निरीक्षण
विशेषतः ऑयजा बोर्ड (Ouija Board), डोजिंग रॉड्स, कॉइन मूव्हमेंट गेम्स, किंवा ऑटोमॅटिक रायटिंग
सारख्या उपक्रमांमध्ये केले जाते. अशा प्रसंगी सहभागींच्या हाताखालील वस्तू आपोआप
हालल्यासारख्या दिसतात, आणि सहभागी प्रामाणिकपणे सांगतात की
त्यांनी वस्तूला जाणीवपूर्वक स्पर्श केलेला नाही किंवा हालवलेले नाही. परंतु मेंदू
आधारित संशोधन दर्शवते की ही हालचाल कोणत्याही अलौकिक शक्तीमुळे होत नसून मानवी अबोध
मनातील सूक्ष्म स्नायू हालचालींमुळे होते (Wegner, 2002). विचार,
अपेक्षा किंवा कल्पना हे मेंदूमध्ये कायिक प्रक्रियांना अशा प्रकारे
सक्रिय करतात की व्यक्ती स्वतःहून सूक्ष्म हालचाली करण्यास प्रवृत्त होते, पण त्या इतक्या सूक्ष्म असतात की त्यांची जाणीव व्यक्तीला होत नाही.
त्यामुळे या प्रक्रियेला “अबोध मन-प्रेरित हालचाल” असेही संबोधले जाते (Haggard,
2008).
आयडिओमोटर परिणाम ही संकल्पना प्रथम
ब्रिटिश फिजिओलॉजिस्ट विलियम बेंजामिन कार्पेंटर यांनी 1852
मध्ये स्पष्ट केली. कार्पेंटर यांच्या मते, जेव्हा एखादी
कल्पना किंवा मानसिक प्रतिमा मनात सक्रिय होते, तेव्हा ती
अनाहूतपणे आणि अबोधपणे सूक्ष्म स्नायू हालचाली उद्भवते; या हालचाली
इतक्या हलक्या असतात की व्यक्तीला त्या घडत असल्याची जाणीवही होत नाही (Carpenter,
1852). येथे
"idea" आणि "motor action" यांचा
एकमेकांशी थेट संबंध दर्शविण्यात येतो—म्हणूनच यास Ideo-motor असे नाव दिले
गेले. सोप्या भाषेत सांगायचे झाले, तर विचार = सूक्ष्म
स्नायू सिग्नल.
जेव्हा आपण एखादी वस्तू हलवण्याची
कल्पनाही करतो, तेव्हा मेंदू मोटर सिस्टीमला अतिशय सूक्ष्म
सूचना देतो, आणि हात किंवा बोटं अजाणतेपणे हालतात (Bargh
& Morsella, 2008). ही हालचाल बाह्य वस्तूवर परिणाम करण्याइतकी असू शकते, विशेषतः
जेव्हा वस्तू हलण्यास संवेदनशील असतात, जसे की पेंडुलम, नाणी, किंवा हलक्या
बोर्डवरील सुचक.
आयडिओमोटर परिणाम : वैज्ञानिक
स्पष्टीकरण
1. बोधनिक स्तरावर (Cognitive
Level)
आयडिओमोटर परिणामाचे स्पष्टीकरण बोधनिक
मानसशास्त्राच्या दृष्टीकोनातून पाहिले तर, कल्पना, अपेक्षा आणि
मानसिक प्रतिमा या घटकांचा शरीराच्या हालचालींवर थेट परिणाम होत असल्याचे स्पष्ट
होते. एखादी कृती करण्याची कल्पना किंवा तिची अपेक्षा निर्माण होताच मेंदूतील motor
planning areas विशेषतः Supplementary Motor Area (SMA),
Premotor Cortex, आणि Posterior Parietal Cortex सूक्ष्मरित्या
सक्रिय होतात (Haggard, 2008). या सक्रियतेमुळे मेंदू स्नायूंना सूक्ष्म
विद्युत संकेत पाठवतो, ज्यामुळे अतिशय लहान स्नायू आकुंचन (micro-contractions)
निर्माण होतात, आणि व्यक्तीला
ते जाणवतही नाहीत. Wegner (2002) यांच्या संशोधनानुसार, विचार-क्रिया
संबंध (thought–action linkage) अत्यंत जलद आणि अबोधपणे घडतो; त्यामुळे
कल्पना फक्त मानसिक स्तरावर न राहता प्रत्यक्ष शारीरिक प्रतिसाद निर्माण करते.
म्हणूनच, पेंडुलम, सूचक बोर्ड, किंवा इतर
साधने विचारांच्या अनुरोधाने हलताना दिसतात, कारण सूक्ष्म आणि अबोध स्नायू हालचाली
त्यांच्या दिशेचा निर्धार करतात.
2. अबोध नियंत्रण (Unconscious
Control)
आयडिओमोटर परिणामाचे वैशिष्ट्य
म्हणजे व्यक्तीला जाणवत नसलेल्या, म्हणजेच अबोध स्तरावर होणाऱ्या
सूक्ष्म हालचाली. या हालचाली जाणीवपूर्वक हेतूपुर्वक स्वतंत्र असतात. Carpenter
(1852)
यांनी सर्वप्रथम स्पष्ट केले की "विचार किंवा अपेक्षा" अबोध स्नायू
हालचालींना जन्म देतात, ज्या व्यक्तीला स्वतः घडवत
असल्याचीही जाणीव नसते. आधुनिक न्यूरोसायन्स संशोधनाने हे पुष्टी केले आहे की अबोध
मोटर अॅक्टिव्हेशन हे Readiness
Potential किंवा Bereitschafts potential
नावाच्या
न्यूरल सिग्नलशी संबंधित आहे जो व्यक्तीला हालचाल करण्यापूर्वीच मेंदूत निर्माण
होतो, आणि व्यक्तीला हालचालीची जाणीव होण्यापूर्वी अनेक मिलिसेकंद आधी दिसतो
(Libet, 1985). यावरून स्पष्ट होते की अबोध प्रक्रियेचे नियंत्रण हे आयडिओमोटर
परिणामाचे केंद्र-बिंदू आहे. व्यक्तीला आपल्या हालचालींचा स्रोत बाह्य शक्ती किंवा
अलौकिक प्रभाव आहे असे वाटू शकते, कारण तिला त्या हालचाली स्वतःकडून
झाल्या याची जाणीव नसते.
3. स्व-सूचना परिणाम (Self-Suggestion
Effect)
स्व-सूचना हे आयडिओमोटर
परिणामातील एक महत्त्वाचे यंत्रणात्मक घटक आहे. व्यक्ती जेव्हा एखाद्या विशिष्ट
परिणामाची (उदा. पेंडुलम उजवीकडे हालणे) कल्पना करते किंवा त्याची अपेक्षा ठेवते, तेव्हा ही बोधात्मक
अपेक्षा अबोध स्नायू प्रणालीत सूक्ष्म सक्रियता निर्माण करते. Kirsch
आणि Lynn
(1998)
यांच्या अहवालानुसार अपेक्षा ही मनोकायिक प्रतिसादांना दिशा देणारी सर्वात प्रभावी
मानसशास्त्रीय शक्ती मानली जाते. यामुळे "expectation-driven
motor activation" घडते. अशा परिस्थितीत व्यक्ती पूर्ण निश्चयाने सांगते की तिने काही
हलवले नाही कारण ती हालचाल तिच्या जाणीवेला न येणाऱ्या अबोध सूक्ष्म स्नायू
आकुंचनातून उद्भवलेली असते. म्हणूनच, स्व-सूचना हा
केवळ मानसिक घटक नसून प्रत्यक्ष शारीरिक क्रिया निर्माण करणारा मनोशारीरिक घटक आहे.
4. मिरर न्यूरॉन्स आणि मोटर इमेजरी (Mirror
Neurons and Motor Imagery)
मिरर न्यूरॉन्स आणि मोटर इमेजरी ही
दोन जैव-मानसशास्त्रीय यंत्रणा आयडिओमोटर परिणाम समजण्यासाठी महत्त्वाची आहेत.
मोटर इमेजरी म्हणजे एखादी क्रिया मनोमन कल्पना
करणे; संशोधन दर्शवते की कल्पित क्रिया ही प्रत्यक्ष
क्रिया करण्यासाठी जबाबदार असलेल्या मेंदूच्या मोटर क्षेत्रांना सक्रिय करते (Jeannerod,
1994). यामुळे
विचार केलेली क्रिया सूक्ष्म किंवा अपूर्ण स्वरूपात शरीरातून व्यक्त होते.
त्याचप्रमाणे, मिरर न्यूरॉन सिस्टम विशेषतः प्रीमोटर आणि
पारिएटल कॉर्टेक्समध्ये हे एखादी क्रिया पाहताना किंवा कल्पना करतानाही सक्रिय होते
(Rizzolatti & Craighero, 2004). म्हणजेच, व्यक्ती
एखाद्या वस्तूला हलताना अपेक्षा करते किंवा कल्पना करते, तेव्हा
मेंदूतील मिरर न्यूरॉन्स प्रत्यक्ष हालचालीसारखीच न्यूरल सक्रियता निर्माण करतात, आणि परिणामी
सूक्ष्म स्नायू हालचाली घडतात. ही प्रक्रिया आयडिओमोटर परिणामाचा जैव-न्यूरोलॉजिकल
पाया स्पष्ट करते.
वरील सर्व वैज्ञानिक घटक बोधनिक
प्रक्रिया, अबोध नियंत्रण, स्व-सूचना आणि
मिरर न्यूरॉन्स एकत्रितपणे आयडिओमोटर परिणाम कसा तयार होतो याचे सखोल
जैव-मानसशास्त्रीय स्पष्टीकरण देतात. विचारांचे अबोध स्नायू हालचालींमध्ये रूपांतर
होणे ही मानवी मन–मेंदू–शरीर यांच्या परस्परसंलग्नतेची अत्यंत सूक्ष्म पण
महत्त्वपूर्ण साक्ष आहे.
आयडिओमोटर परिणाम:
1. Chevreul
Pendulum Experiment (शेवालिये पेंडुलम प्रयोग)
आयडिओमोटर परिणामाचे सर्वात
महत्त्वाचे आणि ऐतिहासिकदृष्ट्या पहिले प्रयोग म्हणजे शेवालिये
(1854)
यांनी केलेला पेंडुलम प्रयोग. या प्रयोगात एका व्यक्तीला हातात बारीक धाग्यावर
लटकवलेला छोटा पेंडुलम (लोलक) स्थिर ठेवायला सांगितले जात असे. त्यानंतर त्याला
“हा पेंडुलम हलू शकतो” किंवा “तो विशिष्ट दिशेने जाईल” अशी कल्पना मनात ठेवण्यास
सांगितले जात असे. विशेष म्हणजे, व्यक्तीला स्वतः हालचाल केली असे
वाटतही नसे, पण पेंडुलम काही क्षणात हलू लागे. वैज्ञानिक
विश्लेषण दर्शवते की हा हलण्याचा प्रकार कोणत्याही अलौकिक शक्तीमुळे किंवा अदृश्य
उर्जेमुळे नसून व्यक्तीच्या हातातील सूक्ष्म, अबोध स्नायू
हालचालींमुळे घडतो. पेंडुलम धाग्याने जोडलेला असल्याने या अत्यंत सूक्ष्म हालचाली
वाढत जातात आणि लोलक मोठा वर्तुळाकार किंवा लंबवर्तुळाकार मार्ग घेऊ लागतो. नंतर
केलेल्या प्रयोगांमध्ये जेव्हा सहभागींचे हात आधाराला घट्ट धरून ठेवले जातात किंवा
पेंडुलमला बाहेरचा आधार दिला जातो, तेव्हा तो हलत
नाही. यावरून स्पष्ट होते की हालचालींचा स्रोत अबोध मोटर क्रिया असतो (Hyman,
2010;
Carpenter, 1852).
2. Ouija Board किंवा Spirit
Board
Ouija
Board हे
आणखी एक लोकप्रिय उदाहरण आहे जिथे लोकांना असे वाटते की आत्मे किंवा अदृश्य शक्ती
त्यांच्या हातात ठेवलेल्या सूचक (planchette) ला दिशा देतात
आणि संदेश लिहून देतात. मात्र नियंत्रित वैज्ञानिक प्रयोगांनी दाखवले आहे की Ouija
बोर्डावरील
हालचालींचे 100% कारण आयडिओमोटर परिणाम आहे (Wegner, 2002). सहभागी
व्यक्ती जेव्हा प्रश्न विचारतात, तेव्हा त्यांच्या मेंदूत अपेक्षित
उत्तरांविषयी कल्पना, विश्वास आणि पूर्वानुभव सक्रिय
होतात. हे बोधनिक घटक हातातील स्नायूंना सूक्ष्म, अनाहूत हालचाली
करायला लावतात. अनेक प्रयोगांत जेव्हा सहभागींचे डोळे बांधले गेले किंवा त्यांना
बोर्डावरची अक्षरे बदलल्याचे न सांगता बोर्ड फिरवला गेला, तेव्हा planchette
च्या
हालचालींमध्ये गोंधळ निर्माण झाला किंवा हालचाली थांबल्या (Wiseman,
2011). यावरून
स्पष्ट होते की Ouija बोर्ड कार्य करण्यामागील संपूर्ण
यंत्रणा ही अभासित बाह्य शक्ती नव्हे, तर व्यक्तीच्या
अबोध स्तरावर तयार होणाऱ्या ideomotor सूक्ष्म हालचाली आहेत.
3. Dowsing Rods (डोजिंग रॉड्स किंवा पाणी शोधण्याची काठी)
इतिहासात आणि आजही काही ठिकाणी पाणी, धातू किंवा
खनिजे शोधण्यासाठी dowsing rods चा वापर केला जातो. या काठ्या हातात
धरल्यावर त्या काही दिशेला झुकतात किंवा हलतात, आणि लोक
त्यामागे “अलौकिक संवेदना” असल्याचा दावा करतात. मात्र नियंत्रित प्रयोगांनी हे
सिद्ध केले आहे की काठी हलण्यामागील एकमेव कारण म्हणजे व्यक्तीच्या अबोध स्नायू
हालचाली, ज्या त्यांच्या अपेक्षा, विश्वास किंवा
कल्पनांशी जोडलेल्या असतात (Hyman & Vogt, 2013).
संशोधकांनी जेव्हा dowsers ला blind
conditions मध्ये काम करण्यास सांगितले, म्हणजे पाणी खरोखर कुठे आहे हे त्यांना न
सांगता; तेव्हा त्यांना यश फक्त नशिबानेच मिळाले. हे दर्शवते की dowsing
rods कोणतीही
माहिती ओळखत नाहीत; उलट, व्यक्तीच्या
हातातील सूक्ष्म हालचाली काठ्यांना दिशा देते. Carpenter (1852) यांनी
याच प्रकारचे हालचाल-आधारित घटनांचे प्रारंभीचे वैज्ञानिक विश्लेषण केले होते, ज्यामुळे dowsing
हा आयडिओमोटर
सिद्धांताशी पूर्णपणे सुसंगत ठरतो.
4. Automatic
Writing (स्वयंचलित लेखन)
अनेक लोक असा दावा करतात की ते
एखाद्या अज्ञात शक्तीने प्रेरित होऊन "स्वयंचलित लेखन" करतात. या
प्रक्रियेत लिहिणाऱ्या व्यक्तीला असे वाटते की त्याच्या हातावर त्याचे स्वतःचे
नियंत्रण नाही, आणि शब्द “स्वतःच” लिहिले जात आहेत. मात्र
विज्ञान सांगते की ही प्रक्रिया देखील ideomotor
effect चेच एक विस्तारित रूप आहे (Lynn &
Rhue, 1991).
व्यक्तीचे विचार, भावना किंवा दडलेली अपेक्षा अबोध
स्तरावर मोटर सिस्टमला सक्रिय करतात, ज्यामुळे
लिहिण्याची क्रिया अशा प्रकारे घडते की त्या जणू बाहेरून नियंत्रित आहेत असे
भासवतात. न्यूरोसायंटिफिक अभ्यासात असे दिसून आले आहे की स्वयंचलित लेखनाच्या आधी
मेंदूतील premotor आणि supplementary
motor भागात
सूक्ष्म active potential दिसतो, हेच स्पष्ट पुरावे आहेत की ही हालचाल
मेंदूमधूनच उद्भवते, बाहेरील कोणत्याही गूढ शक्तीतून
नव्हे (Haggard, 2008).
मानसशास्त्रीय दृष्टीकोन (Psychological
Perspectives)
1. Psychodynamic
View (मनोगतिक
दृष्टिकोन)
Psychodynamic
सिद्धांतानुसार
आयडिओमोटर हालचाली या व्यक्तीच्या अबोध मनातील दडलेल्या इच्छांचे, संघर्षांचे
किंवा सुप्त विचारांचे शारीरिक प्रतिबिंब असतात (Freud, 1915). व्यक्ती
जाणीवपूर्वक एखादी भावना व्यक्त करू इच्छित नसली तरी तिचे अबोध मन त्या भावनेचे motor
expression निर्माण करू शकते. उदाहरणार्थ, एखाद्या Ouija
बोर्ड सत्रात
सहभागी असलेल्या व्यक्तीला काही विशिष्ट अपेक्षा किंवा आतल्या भावना असतील, तर त्या भावना अबोधपणे
स्नायूंच्या सूक्ष्म हालचालींमध्ये प्रकट होतात. मनोगतिक दृष्टीकोन हे स्पष्ट करतो
की आयडिओमोटर हालचाली या दडलेल्या भावनिक ऊर्जेच्या अभिव्यक्ती असू शकतात.
2. Cognitive-Behavioural
View (बोधात्मक-वर्तनवादी
दृष्टीकोन)
Cognitive-Behavioural
Psychology आयडिओमोटर परिणामाचे सर्वात स्पष्ट आणि वैज्ञानिक स्पष्टीकरण देते. या
दृष्टीकोनानुसार विचार आणि कृती यांच्यात एक
थेट, कार्यकारण संबंध असतो, ज्याला thought–action
coupling म्हणतात (Wegner, 2002). व्यक्ती जेव्हा एखाद्या वस्तू
हलण्याची कल्पना करते, तेव्हा मेंदू त्या क्रियेची मानसिक
नकाशा-रचना तयार करतो (motor imagery). या
प्रक्रियेमुळे सूक्ष्म स्नायू आकुंचन निर्माण होतो. सहभागी असे मानतात की त्यांनी
हालचाल केली नाही, कारण ही हालचाल जाणीवपूर्वक
नियंत्रणाबाहेर असते, पण physiologically
ती मोटर
सिस्टममधूनच येते. त्यामुळे पेंडुलम, dowsing rods किंवा Ouija
board मधील
हालचाली बोधात्मक सक्रियतेचे थेट परिणाम मानले जातात.
3. Neuroscientific
Perspective (मेंदूशास्त्रीय दृष्टीकोन)
न्यूरोसायन्सच्या अभ्यासांनी
आयडिओमोटर परिणामाला सर्वात ठोस जैविक आधारे दिली आहेत. fMRI
आणि EEG अभ्यास
दर्शवतात की एखादी ideomotor हालचाल होण्यापूर्वी मेंदूतील Supplementary
Motor Area (SMA), Premotor Cortex, आणि Primary Motor
Cortex (M1) या भागांमध्ये activity वाढते (Haggard,
2008). हे भाग motor
planning, anticipation आणि movement execution या
प्रक्रियांसाठी जबाबदार आहेत. हे सूक्ष्म neural signals इतके क्षीण
असतात की व्यक्तीला त्याची जाणीव होत नाही, परंतु
त्यांच्या आधारे बोटे, हात किंवा खांदे अत्यंत हलक्या हालचाली
करतात. यामुळे ideomotor effect हा अबोध न्यूरो-मोटर प्रक्रियेचा
परिणाम असल्याचे सशक्त जैव-वैज्ञानिक पुरावे समोर येतात.
Wegner
(2002)
यांनी या घटनेस “The Illusion of Conscious Will” असे संबोधले, म्हणजेच
आपल्याला वाटते की आपण हालचाल करत नाही, परंतु मेंदूची अबोध
प्रणाली आधीच निर्णय घेऊन हालचाल घडवून आणत असते.
दैनंदिन जीवनातील उपयोग:
1. बायोफीडबॅक (Biofeedback) आणि
ताण-नियंत्रण
बायोफीडबॅक ही एक आधुनिक, पुराव्यावर
आधारित मानसोपचार पद्धत आहे ज्यामध्ये व्यक्तीला
स्वतःच्या शारीरिक प्रतिसादांचे निरीक्षण आणि
नियमन शिकवले जाते. आयडिओमोटर परिणाम येथे अत्यंत महत्त्वाचा ठरतो, कारण
बायोफीडबॅक उपकरणे त्वचेतील विद्युत प्रतिकार, हृदयगतीतील बदल, सूक्ष्म
स्नायूंचे ताण इत्यादींचे मापन करतात आणि व्यक्तीस
त्वरित फीडबॅक देतात. या प्रक्रियेत, व्यक्ती जेव्हा
शांतता, आराम किंवा विश्रांतीबद्दल विचार करते, तेव्हा अबोधपणे
स्नायू सैल होतात आणि सूक्ष्म हालचाली कमी होतात, ज्याला आयडिओमोटर प्रतिसाद
म्हणतात. त्यामुळे विचार → स्नायू सैल होणे → ताण कमी होणे असा मनो-कायिक
चक्र विकसित
होतो. संशोधन दर्शवते की बायोफीडबॅकमुळे चिंता, ताण, दीर्घकालीन वेदना आणि डोकेदुखी सारख्या
समस्यांमध्ये सुधारणा होते, आणि या प्रक्रियेतील सूक्ष्म
स्नायू-नियंत्रण आयडिओमोटर सिद्धांतावरच आधारित आहे (Schwartz
& Andrasik, 2017; Basmajian, 1979). आयडिओमोटर प्रतिसादामुळे
शरीराला विचारांच्या प्रभावाखाली सूक्ष्म बदल घडतात, ज्याची जाणीव
व्यक्तीला नसते, आणि त्यामुळेच बायोफीडबॅक कार्यक्षम ठरतो.
2. हिप्नोथेरपी (Hypnotherapy) आणि आयडिओमोटर
संकेत
हिप्नोथेरपीमध्ये, व्यक्तीला
एकाग्रता आणि सूचनांसाठी संवेदनशील अशी हिप्नोटिक अवस्था निर्माण केली जाते. या
अवस्थेत दिल्या जाणाऱ्या सूचना अबोध मनावर थेट परिणाम करतात, ज्यामुळे
आयडिओमोटर प्रतिसाद सहजपणे दिसून येतात. उदाहरणार्थ, हिप्नोटिस्ट जर
सांगतो की “तुमचे हात हळूहळू उचलले जात आहेत,” तर प्रत्यक्षात
सूक्ष्म स्नायूंची अबोध हालचाल हाताला वर नेते. जरी व्यक्तीला
वाटते की हात स्वतःच वर जात आहे. या प्रक्रियेला ideomotor signalling
असे म्हणतात
आणि ती सुचनेचा परिणाम मानली जाते (Hilgard,
1991). अनेक
हिप्नोथेरपी तज्ञ समस्या शोधण्यासाठी आणि अबोध मनातील संघर्ष उघड करण्यासाठी “ideomotor
questioning techniques” वापरतात, जसे की
बोटांच्या हालचालीद्वारे हो/नाही अशी उत्तरे देणे. आयडिओमोटर हालचाली व्यक्तीच्या अबोध
मनातील प्रतिसादांचे सूक्ष्म, पण विश्वसनीय संकेत मानले जातात, ज्यामुळे PTSD,
फोबिया, वेदना-नियंत्रण
आणि व्यसन यामध्ये हिप्नोथेरपी प्रभावी ठरते (Lynn &
Rhue, 1991).
3. Lie Detection किंवा Truth
Testing मधील सूक्ष्म हालचाली
जरी पारंपरिक lie
detectors (polygraph) प्रामुख्याने हृदयगती, श्वसन आणि
त्वचेतील विद्युत प्रतिक्रियांवर आधारित असतात, तरीही अनेक
आधुनिक मनोवैज्ञानिक पद्धती सूक्ष्म हालचालींना अबोध सत्य प्रतिसाद
मानतात. आयडिओमोटर सिद्धांतानुसार, व्यक्ती जरी
काही लपवण्याचा प्रयत्न करीत असली तरी तिचे अबोध विचार शरीरात सूक्ष्म स्नायू
हालचाली निर्माण करतात. उदा. बोटांची लहान कंपने, पायांची
सूक्ष्म हालचाल, चेहऱ्यावर झटपट बदल. या हालचाली व्यक्तीला
स्वतःलाही जाणवत नाहीत. Paul Ekman (2003) यांच्या "micro-expression"
संकल्पनेत हेच
दाखवले गेले आहे की अबोध भावनिक प्रतिसाद दडपता येत नाहीत आणि ते शरीरातून प्रकट
होतात. काही Truth Verification तंत्रे (जसे कि EMG-based
micro-tension analysis) आयडिओमोटर प्रतिक्रिया मोजून फसवणूक किंवा
सत्यता मूल्यांकन करण्याचा प्रयत्न करतात. जरी हे पूर्णपणे अचूक मानले जात नसले, तरी
मानसशास्त्रीय संशोधनातील महत्त्वाचा भाग म्हणून आयडिओमोटर परिणामाचा अभ्यास खूप
उपयुक्त राहिला आहे.
गैरसमज आणि वैज्ञानिक दृष्टिकोन
आयडिओमोटर परिणामासंबंधी अनेक गैरसमज
आजही समाजात प्रचलित आहेत. विशेषतः Ouija board,
automatic writing, pendulum dowsing किंवा देवदेवता बोलावण्याच्या पद्धतींमध्ये
लोकांचा विश्वास असतो की एखादी अलौकिक शक्ती वस्तू हलवते. पण शास्त्रीय संशोधनांनी
वारंवार सिद्ध केले आहे की या सर्व हालचाली मानवी अबोध मनातील सूक्ष्म स्नायू
हालचालींपासून उत्पन्न होतात. Michel Chevreul, William Carpenter आणि नंतरच्या
आधुनिक संशोधकांनी केलेल्या नियंत्रित प्रयोगांत सहभागींचे डोळे बांधले असता, माहिती काढून
घेतली असता किंवा वस्तूला कोणत्याही बाह्य मार्गदर्शनाशिवाय ठेवले असता हालचाल
त्वरित थांबते. यावरून हे निर्विवाद सिद्ध होते की वस्तू हलण्यामागे कोणतीही
अलौकिक शक्ती नसून “विचार + अपेक्षा + अबोध सूक्ष्म स्नायू हालचाल = आयडिओमोटर
परिणाम” (Wegner, 2002; Hyman, 1999). म्हणूनच
वैज्ञानिक दृष्टिकोनातून, अशा घटनांकडे तर्कशुद्ध व
जैव-मानसशास्त्रीय दृष्टीने पाहणे आवश्यक आहे. अलौकिक स्पष्टीकरणे देण्याऐवजी
मनुष्याच्या अबोध प्रक्रियांचा अभ्यास केल्यास या घटनांचे खरे स्वरूप स्पष्ट होते.
समारोप:
आयडिओमोटर परिणाम मानवी मेंदू व
शरीरातील अदृश्य संबंधांचे जिवंत उदाहरण आहे. तो आपल्याला शिकवतो की जरी आपण ते
जाणत नसू तरी आपले विचार आपल्या कृतींना थेट आकार देतात. हे मानसशास्त्रीय तत्त्व
केवळ संशोधनापुरते मर्यादित नसून, ते आपल्या दैनंदिन जीवनातही दिसून
येते, विशेषतः जेव्हा आपण कल्पना करतो, स्वप्ने पाहतो, किंवा अजाणतेपणी
एखाद्या क्रियेच्या दिशेने जातो.
![]() |
| (सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार) |
संदर्भ:
Bargh,
J. A., & Morsella, E. (2008). The unconscious mind. Perspectives on
Psychological Science, 3(1), 73–79.
Basmajian,
J. V. (1979). Biofeedback: Principles and practice for
clinicians. Williams & Wilkins.
Carpenter,
W. B. (1852). On the Influence of Suggestion in Modifying and Directing
Muscular Movement, Independently of Volition. Royal Institution of Great
Britain.
Chevreul,
M. E. (1854). De la baguette divinatoire, du pendule dit explorateur et des
tables tournantes. Paris: Mallet-Bachelier.
Ekman,
P. (2003). Emotions revealed. Times Books.
Freud,
S. (1915). The Unconscious. Basic
Books
Haggard,
P. (2008). Human volition: towards a neuroscience of will. Nature Reviews
Neuroscience, 9(12), 934–946.
Hilgard,
E. R. (1991). Divided consciousness: Multiple controls in
human thought and action. Wiley.
Hyman,
R. (1999). The mischief-making of ideomotor action. The
Scientific Review of Mental Health Practice.
Hyman,
R., & Vogt, A. (2013). Investigations of Dowsing:
Ideomotor Action in Divining.
Jeannerod,
M. (1994). The representing brain: Neural correlates of
motor intention and imagery. Behavioral and Brain Sciences, 17(2),
187–245.
Kirsch,
I., & Lynn, S. J. (1998). Dissociation theories of
hypnosis. Psychological Bulletin, 123(1), 100–115.
Libet,
B. (1985). Unconscious cerebral initiative and the role of
conscious will. Behavioral and Brain Sciences, 8(4), 529–566.
Lynn,
S. J., & Rhue, J. W. (1991). Theories of hypnosis:
Current models and perspectives. Guilford Press.
Rizzolatti,
G., & Craighero, L. (2004). The mirror-neuron system.
Annual Review of Neuroscience, 27, 169–192.
Schwartz,
M. S., & Andrasik, F. (2017). Biofeedback: A
practitioner’s guide. Guilford Press.
Wegner,
D. M. (2002). The Illusion of Conscious Will. MIT Press.
Wiseman,
R. (2011). Paranormality: Why We See What Isn’t There. Guilford Press.

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thank you for your comments and suggestions