सोमवार, ५ जुलै, २०२१

कार्यालयीन मानसिक आरोग्य | Mental Health at Workplace

 

कार्यालयीन मानसिक आरोग्य

आज जागतिक पातळीवर 30 कोटी लोक डिप्रेशनने ग्रासलेले आहेत. त्यामुळे डिप्रेशन मानवास पंगू बनविन्याचे एक प्रमुख कारण बनले आहे. यातील कांही लोक चिंताग्रस्त असलेलेही आढळून आलेली आहेत. अलिकडील WHO (जागतिक आरोग्य संघटना) च्या अभ्यासावरून डिप्रेशन व चिंतेमुळे जागतिक पातळीवर 1 अब्ज अमेरिकन डॉलरएवढे नुकसान घडून आलेले आहे. आज मानसिक आरोग्य विषयक समस्येमुळे बेरोजगारी हा मोठा धोका निर्माण झाला आहे. कार्यालयीन वातावरण नकारात्मकतेमुळे शारीरिक व मानसिक समस्या उदभवू शकते आणि त्यामुळे लोक नोकरी गमावू शकतात. कार्यालय ही अशी जागा आहे ज्या ठिकाणी मानसिक आरोग्यास चालना मिळते व मानसिक अस्वास्थ लोकांना आधार मिळतो. यामुळे कार्यालयीन अनुपस्थिती कमी होऊन उत्पादकता वाढीमुळे आर्थिक वृध्दी घडून येते. WHO ने 2017 हे वर्ष कार्यालयीन मानसिक आरोग्यावर भर देऊन काम कारावयाचे ठरविले होते? ज्यामुळे कर्मचा–यांचे ताण – तणाव व कार्यक्लांती (burnout) यांची तीव्रता कमी होण्यास मदत होईल.

आरोग्यासाठी कामाशी निगडित घटक:

        सद्याच्या परिस्थितीत मानसिक आरोग्यास धोका निर्माण करू शकतील असे अनेक घटक उपस्थित आहेत. संघटनात्मक व व्यवस्थापकीय परिस्थिती, कर्मचा–यांची कौशल्ये व क्षमता आणि कर्मचा–यांना नेमून दिलेले कार्य पूर्ण करण्यास मिळणारा आधार यातून होणारी आंतरक्रियात्मक धोके जास्त आहेत. उदा. एकाद्या कर्मचा–यांकडे नेमून दिलेले कार्य पूर्ण करण्याची कौशल्ये जरी असली तरी ते कार्य पूर्ण करण्यासाठी आवश्यक स्त्रोत नसतील किंवा व्यवस्थापकीय व संघटनात्मक आधार मिळाला नाही तर समस्या निर्माण होतात. कामाशी संबंधीत आरोग्य व सुरक्षतेविषयी अपु–या योजना, अपुरे संभाषण व व्यवस्थापकीय व्यवहार, निर्णयप्रक्रियेतील मर्यादित सहभाग किंवा विशिष्ट कार्यक्षेत्रातील नियंञणाचा अभाव, कर्मचा–यांसाठी पाठिंब्यांचा अभाव, अलवचिक कामाच्या वेळा आणि अस्पष्ट कामाचे स्वरूप किंवा अस्पष्ट संघटनात्मक उद्दिष्टे अशा घटकांचा समावेश होतो.

व्यक्तिच्या क्षमतेच्या विपरित काम देणे किंवा अति आणि असंबंधित कार्यभार यासारखे कामाच्या स्वरूपाशी निगडित कार्यालयीन धोके असू शकतात. काही कामाच्या ठिकाणी अतिशय अवघड कार्य पार पाडावे लागते. यामुळे मानसिक आरोग्यावर त्याचा परिणाम दिसून येतो व मानसिक अस्वास्थ्याची लक्षणे दिसतात परिणामी व्यक्तिला मादकद्रव्ये व पदार्थ सेवनासाठी उद्यूक्त करतात. जर समूह व सामाजिक पाठिंबा कमी पडल्यास याचे प्रमाण वाढण्याची शक्यता दाट असते.

कर्मचा–यांच्या कामाशी निगडित ताण वाढण्याची प्रमुख कारणेही कार्यालयातील कामाचा दबाव, अनियमितता, नियोजनाचा अभाव व मानसिक छळ हे आहेत असे संशोधनातून दिसून आलेले आहे. सद्या कर्मचा–यांच्या आरोग्यामध्ये याचा मोठा धोका असलेला दिसून येतो. त्यामुळे कर्मचा–यांमध्ये शारीरिक व मानसिक समस्या निर्माण झालेल्या आहेत. याचा परिणाम म्हणून कर्मचा–यांची उत्पादकता कमी झाली आहे. त्याचबरोबर त्याचा नकारात्मक परिणाम हा त्यांच्या कौटुंबिक व सामाजिक आंतरक्रियावरही झालेला दिसून येतो.

सदॄढ कामाची जागा निर्माण करणे:

सर्व कर्मचा–यांच्या चांगल्या आरोग्याचे संरक्षण, प्रोत्साहन, सुरक्षितता व जीवन कल्याणाव्दारे कर्मचारी व व्यवस्थापकांच्या सक्रिय सहभागातून आपण सदॄढ कार्यस्थळ निर्माण करू शकतो. अलिकडेच world economic forum नी 3 सक्षम दॄष्टिकोन सुचचिलेले आहेत.   कामाशी निगडित धोकादायक घटकांच्या क्षीणणाव्दारे मानसिक आरोग्याचे संरक्षण करणे,  कर्मचा–यांच्या क्षमता व कामाविषयी सकारात्मक दॄष्टिकोन विकसित करून मानसिक आरोग्यास चालना देणे. आणि कारणांची फिकीर न करता मानसिक आरोग्य समस्या सांगणे. याच्या पुर्ततेसाठी पुढील गोष्टी निर्माण करणे आवश्यक आहे.

1. कार्यस्थळ वातावरणाची जाणिव–जागृती आणि विविध कर्मचाऱ्यासाठी सुयोग्य मानसिक आरोग्यास चालना देऊन ते कसे आत्मसात करता येर्इल याची माहिती देणे.

2. संघटनेमधील नेतॄत्व प्रेरणेतून शिकणे व ते आमलात आणणे.

3. इतर कंपन्याना भेडसावणा–या अडचणीना ते कसे सामोरे गेले याचा शोध घेणे.

4. कर्मचा–यांच्या वैयक्तिक गरजा व संधी ओळखून कार्यस्थळावरील मानसिक आरोग्यासाठी चांगल्या योजना विकसित करण्यासाठी मदत करणे.

5. व्यक्तिंना कोणाकडून मदत व आधार मिळू शकेल अशा स्त्रोतांची जाणिव करून देणे.

कार्यस्थळातील मानसिक आरोग्याचे संरक्षण व उन्नतीसाठी उपाय व चांगल्या पद्धती.

1. अतिताण, घातक मनोविकारी घटक, आजारीपण यांच्या व्यवस्थापनासाठी स्त्रोत पुरवणे आणि यासाठी सुरक्षित योजना व चांगल्या पद्धतींचा अवलंब आणि अंमलबजावणी करणे.

2. आवश्यक त्यावेळी मदत करणारा सेवकवर्ग निर्माण करणे.

3. निर्णयप्रक्रियेत कर्मचाऱ्यांचा सहभाग घेणे ज्यामुळे संघटनेत संतुलित कार्यशैली विकसित होर्इल.

4. कर्मचा–यांच्या करियर विकसनासाठी कार्यक्रम राबविणे.

5. कर्मचा–यांच्या योगदानाबद्दल त्यांचा गौरव व सन्मान करणे.

एखादी गोष्ट होऊच नये म्हणून जशी काळजी घेतली जाते त्याप्रकारे कर्मचा–यांचे मानसिक आरोग्य चांगले रहावे यासाठी काळजी घेणे, वेळेत लक्ष देणे, आधार व पुर्नवसन या गोष्टी तात्काळ करणे. यासाठी प्रत्येक संघटनेने व कार्यालयांनी अशी व्यवस्था करणे अपेक्षित आहे. त्याचबरोबर सर्वात महत्वाचा घटक म्हणजे सह-कर्मचारी वर्गांनी आपल्या सहका–यांची काळजी घेणे व त्यांना आवश्यक त्यावेळी मदत करणे काळाची गरज बनली आहे. एकमेक सहाय्य करू अवघे धरू सुपंथ...

कार्यालयातील मानसिक अस्वास्थ्य व्यक्तिंना आधार:

आपल्या समाजात कायद्याने का असेना कार्यालयात दिव्यांग व्यक्तिंना सामावून घेण्यास मदत केलेली आहे. त्याप्रकारे एखाद्या मानसिक अस्वास्थ्य व्यक्तिला सामावून घेऊन त्यांनाही सन्मानाने काम करण्यास मदत केली पाहिजे. आपल्या समाजात आजही मानसिक अस्वास्थ्य व्यक्तिला वाळीत टाकले जाते. मुळात अशा परिस्थितीत त्याला जास्त आधाराची गरज असते. कार्यालये व संघटनेने अशा व्यक्तिंसाठी लवचिक कार्यभार, कमी गुंतागुंतीचे कार्ये किंवा जमेल अशा कार्यांची जबाबदारी द्यावी जेणेकरून ते हळूहळू पुर्वस्थितीत येऊ शकतील.

अमेरिकासारख्या विकसित देशात मानसिक अस्वास्थ्य व्यक्तिंसाठी कामावर रूजू होण्यास व त्यांना सन्मानाने काम करण्यासंबंधीचे कायदे आहेत. पण भारतात यासाठी ऑगष्ट, 2017 साल उजाडावे लागले. याव्दारे कोणत्याही मानसिक अस्वास्थ्य व्यक्तिस भेदभावाची वागणूक देता कामा नये. हे झाले कायद्याचे पण त्यांचा एक माणूस म्हणून जगण्याचा अधिकार आपण हिसकावू शकत नाही.

WHO ची जबाबदारी:

WHO ने मानसिक आरोग्यासाठी प्रत्येक वर्षी वेगवेगळया घटकांना समोर ठेऊन जागतिक पातळीवर भरीव काम करत आलेली आहे? त्यासाठी WHO ने 2008 पासून वेगवेगळया कार्मचारी घटकासाठी कार्यरत राहीली आहे. तसेच सर्वांचे मानसिक आरोग्य चांगले रहावे यासाठी 2013 ते 2020 असा मोठा कृती कार्यक्रम आखलेला आहे. त्याव्दारे जगभर लोकांच्या जीवनाचा दर्जा उंचावून स्वास्थपूर्ण जीवन जगता यावे यासाठी ही संस्था मदत करते. जगभर मानवी मूल्यांना महत्व प्राप्त करून देण्यासाठी WHO प्रयत्नशील असून सर्वांचे मानसिक आरोग्य सदॄढ रहावे यासाठी ही संस्था अखंडपणे प्रयत्नशील आहे.

केवळ WHO ने जबाबदारी घ्यावी आपण काहीही करणार नाही का? तर आपलीही तितकीच किंबहुना सगळ्यात जास्त जबाबदारी आहे. कारण आपल्या निष्क्रिय वृत्तीने अनेक समस्या निर्माण होतात. त्यासाठी सर्वाना एकत्र घेऊन चर्चा घडून मार्ग शोधणे व समस्याग्रस्त व्यक्तिंना आधार मिळवून देण्याचे खुप महत्वाचे काम आपण करू शकतो.

                                            
                     (सदर लेखातील चित्र, इमेज Google वरून साभार)

मंगळवार, ८ जून, २०२१

इंटरनेट आणि डिजिटल साक्षरता | Internet and Digital Literacy

 इंटरनेट आणि डिजिटल साक्षरता

अब्राहम मास्लो या मानवतावादी मानसशास्त्रज्ञाने गरजांची अधिश्रेणी सांगितलेली आहे. या गराजांच्या अधिश्रेणीमध्ये अन्न, वस्त्र, आराम या मानवाच्या मूलभूत आणि अत्यावश्यक गरजा आहेत असा सिद्धांत मांडलेला आहे. या मूलभूत गरजा पूर्ण करण्यामध्येच अनेक लोकांचे आयुष्य खर्ची पडते. पण आजकाल आजूबाजूला दिवसेंदिवस वाढणाऱ्या धकाधकीच्या परिस्थितीमुळे ताण-तणाव आणि असुरक्षितताही वाढली आहे. त्यामुळे मन दुसरीकडे रमवण्यासाठी करमणूक ही एक महत्त्वाची गरज बनलेली आहे.

कधीकधी आर्थिक परिस्थितीमुळे एखादी वस्तू घेणे आपल्याला परवडत नाही. पण ती वस्तू आपण घ्यावी असे आपल्या मनात सतत सुरू असते आणि तीच वस्तू कोणी आपल्याला दिली तर आपल्या आनंदाला पारावर उरत नाही. रेडू या चित्रपटात देखील रेडिओसाठी वेड्या असणाऱ्या एका माणसाची कथा आपल्याला पाहायला मिळते. आपण कधी रेडिओ घेऊच शकत नाही असे या व्यक्तिला वाटत असते. पण तोच रेडिओ त्याच्या आयुष्यात आल्यानंतर हा रेडू त्याच्या आयुष्याचा भाग कसे बनतो हे मजेशीरपणे दिग्दर्शकाने चित्रपटात मांडलेले आहे. प्रत्येक वेळी जनसामान्यांना नाटक-सिनेमा ही परवडणारी करमणूक नव्हती.

पूर्वीच्या काळी घरात रेडिओ असणे प्रतिष्ठेचे आणि करमणुकीचे साधन होते. वरील कथेतील अनेक पात्रे आपण ऐंशी-नव्वदीच्या कालखंडात अनुभवलेली असतील. त्यानंतर लॅंडलाइन घरात असणे प्रतिष्ठेचे होऊन गेले, त्यानंतर पूर्ण जगच एका खिडकीत मावेल अशी गोष्ट घरात आली आणि अबलावृद्ध आपला पुर्ण वेळ त्या टीव्हीच्या समोर घालवू लागले; त्यावेळी चॅनेल्स मर्यादित होते म्हणून टीव्हीचा वापरही मर्यादित होता पण आज सगळंच अमर्यादित झालेलं पाहायला मिळते. भारतात एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीस इंटरनेट सावकाश आपले अस्तित्व दाखवू लागले होते. अनेक लोक मोबाइल फोन प्रतिष्ठा म्हणून वापरत होते. पण बऱ्याच लोकांना त्याचा फायदा त्यांच्या वैयक्तिक आणि व्यावसाईक कामासाठी झालेला होता. पण आज चित्र पूर्णपणे बदललेले आहे कारण मोबाइल आणि इंटरनेट हे आपल्या जीवनाचे अविभाज्य घटक होऊन बसलेले आहेत. ज्या मोबाइलला शाळेत प्रवेश नव्हता त्याच मोबईलवर आज शाळा सुरू आहे.

सिस्को या नेटवर्किंग कंपनीने केलेल्या सर्वेक्षणात ३३ टक्के तरुणांनी इंटरनेटशिवाय जगणे शक्य नसल्याचे मान्य केलेले आहे. पाच पैकी चार कॉलेज विद्यार्थी आणि तरुण नोकरदारांनी इंटरनेट आजच्या युगात महत्त्वाचे असून आपल्या आयुष्यातील अविभाज्य घटक बनले असल्याचे म्हटले आहे.  भारतातील ९५ टक्के तरुणांनी इंटरनेट हे आमच्यासाठी पाणी, अन्न, शुद्ध हवा आणि निवारा इतकेच महत्त्वाचे असल्याचे मान्य केलेले आहे. याचबरोबर सोशल मीडिया आणि स्मार्ट मोबाइलमुळे इंटरनेटचा वापर वाढल्याची माहिती सिस्को इंडिया सर्वेक्षणातून समोर आली आहे. गाणी ऐकणे, मित्रांशी गप्पा मारणे यासाठी इंटरनेट हे माध्यम अधिक प्रभावी आणि योग्य असल्याचे ४० टक्के तरुणांचे म्हणणे आहे. पण दुसरी बाजू अशी आहे की काही युवक याच्या पूर्ण आहारी गेलेले आहेत. अनेक लोकांना नोमोफोबिया (मोबाइल काम करत नाही याची भीती किंवा चिंता) सारख्या मानसिक विकृतीने ग्रासलेले आहे. तसेच अनेक लोकांना योग्य खबरदारी न घेतल्यामुळे अनेक ऑनलाइन गैरप्रकारांना सामोरे जावे लागले आहे. त्यामुळेच आज आपण डिजिटल किंवा इंटरनेट साक्षर होणे गरजेचे बनलेले आहे.

डिजिटल अधिकार

डिजिटलायझेशनच्या युगात इंटरनेट हे संप्रेषण आणि माहिती संप्रेषणाचे एक महत्त्वपूर्ण माध्यम बनले आहे. एकविसाव्या शतकाच्या सुरुवातीस इंटरनेट असणे ही प्रतिष्ठेची बाब मानली जात असे, परंतु सध्याच्या काळात इंटरनेट ही सर्वांची गरज बनली आहे. इंटरनेटची गरज लक्षात घेऊन केरळ हायकोर्टाने अलीकडेच फहिमा शिरीन विरुद्ध केरळ राज्य प्रकरणात, इंटरनेटवर प्रवेश मिळवण्याचा मूलभूत अधिकार, या कलमांतर्गत गोपनीयता आणि शिक्षणाच्या अधिकाराचा एक भाग म्हणून जाहीर केलेले आहे.

केरळच्या कोझिकोड येथे शिक्षण घेत असलेल्या एका विद्यार्थिनीला वसतिगृहात प्रतिबंधित कालावधीत मोबाइल फोन वापरल्यामुळे महाविद्यालयीन वसतिगृहातून काढून टाकण्यात आले. यावर त्या विद्यार्थिनीने केरळ उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. वसतिगृहांमध्ये बंदीचा हा प्रकार लिंगाच्या आधारे भेदभाव करणारा होता, असा दावाही याचिकाकर्त्याने केला होता, दाखल केलेल्या याचिकेवर सुनावणी दरम्यान न्यायमूर्ती पी. व्ही. आशा यांनी इंटरनेट अॅक्सेस हा मूलभूत अधिकार म्हणून घोषित केला आहे.

इंटरनेटचे महत्त्व

  • इंटरनेट हे संप्रेषणाचे एक अनमोल साधन आहे आणि सध्याच्या युगात इंटरनेट उपलब्धतेमुळे संप्रेषण सोपे आणि सोयीस्कर झाले आहे हे नाकारता येणार नाही.
  • इंटरनेटने आतापर्यंत अशा प्रकारच्या सुविधा नसलेल्या दुर्गम भागात राहणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी उत्तम शिक्षणाचा पर्यायदेखील (मर्यादित का असेना) उघडला आहे.
  • इंटरनेटच्या माध्यमाने माहिती क्षेत्रातही क्रांती घडली आहे. आता आपण काही मिनिटांतच इंटरनेटद्वारे कोणत्याही प्रकारची माहिती मिळवू शकतो.
  • माहिती सहज उपलब्ध झाल्यामुळे सामान्य लोकांनाही त्यांच्या हक्कांची जाणीव झालेली आहे.

सर्व सेवा ऑनलाईन उपलब्ध करुन देऊन शासनाचा खर्च कमी करणे देखील सुनिश्चित केले जाऊ शकते:

  • हे सरकारची जबाबदारी आणि पारदर्शकता वाढवते.
  • शासकीय योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीस मदत होते.
  • राजकारण आणि लोकशाहीमध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्यात देखील मदत होते.
  • हे चांगले शिक्षण, आरोग्य आणि रोजगाराच्या संधी उपलब्ध करुन देण्याच्या सरकारच्या प्रयत्नांना प्रोत्साहन देते.
  • हे भारतीय समाजातील सामाजिक-सांस्कृतिक विवधतेसाठी उपयुक्त आहे.

शिक्षणात इंटरनेटची भूमिका

  • शिक्षण क्षेत्रात इंटरनेटची महत्त्वपूर्ण भूमिका आहे, यात काही शंका नाही की सध्या बहुतेक सर्व लोक त्यांच्या समस्या आणि प्रश्नांसाठी गुगलवर शोध घेतात.
  • इंटरनेटवर जवळजवळ सर्व विषयांवर बरेच ज्ञान उपलब्ध आहे, जे आपल्या गरजेनुसार कधीही शोधले जाऊ शकते. (त्याची विश्वसनियतता आणि अस्सलपणा तपासणे गरजेचे आहे)

शिक्षणातील इंटरनेटचे फायदेः

  • देशातील शिक्षणासमोरील सर्वात मोठा अडथळा म्हणजे शिक्षणाचा खर्च, परंतु इंटरनेटने हा अडसर बर्‍याच अंशी दूर केला आहे. याबरोबरच शिक्षणाच्या गुणवत्तेत सुधारणा देखील इंटरनेटच्या माध्यमातून शक्य झाली आहे.
  • शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात संवाद साधण्यास इंटरनेटमुळे सुलभ झाले आहे. (कोविड-19 महामारीच्या काळात आपण त्याचा अनुभव घेतच आहोत)

भारतात इंटरनेट उपलब्धतेपुढील आव्हाने

  • गेल्या काही वर्षांमध्ये बर्‍याच खाजगी आणि सरकारी सेवा डिजिटल करण्यात आल्या आहेत आणि त्यातील काही केवळ ऑनलाइन उपलब्ध आहेत ज्यामुळे डिजिटल अशिक्षित लोकांना असमानता निर्माण झाली.
  • विश्वसनीय माहिती, पायाभूत सुविधा आणि डिजिटल साक्षरतेच्या अभावामुळे उद्भवणारे डिजिटल तफावत यामुळे सामाजिक आणि आर्थिक मागासलेपण येते.
  • डिजिटल विभाजन संपूर्ण सामाजिक आणि आर्थिक स्पेक्ट्रममध्ये म्हणजे ग्रामीण आणि शहरी भारत, श्रीमंत आणि गरीब, भारतातील लोकसंख्याशास्त्रीय प्रोफाइल (वृद्ध आणि तरुण, स्त्री आणि पुरुष) मध्ये पाहिले जाऊ शकते.
  • 2016 च्या मध्यभागी जाहीर केलेल्या अहवालात असे दिसून आले आहे की भारतात डिजिटल साक्षरता दर 10 टक्क्यांपेक्षा कमी आहे.

डिजिटल साक्षरतेचा अर्थ

    डिजिटल साक्षरता म्हणजे इंटरनेट वापरणे आणि डिजिटल जगाशी जुळवून घेण्यासाठी आवश्यक अशा कौशल्यांचा समूह होय. मुद्रण माध्यमाची व्याप्ती हळूहळू कमी होत चालली आहे आणि ऑनलाइन उपलब्ध माहितीची व्याप्ती व्यापक होत चालली आहे, ऑनलाइन उपलब्ध माहिती समजण्यासाठी डिजिटल साक्षरता आवश्यक आहे.

डिजिटल साक्षरता आणि भारत

हे लक्षात घेण्याजोगे आहे की चीननंतर भारत ही जगातील दुसरी सर्वात मोठे ऑनलाइन बाजारपेठ आहे.

  • जानेवारी 2021 मध्ये भारतात 624 दशलक्ष इंटरनेट वापरकर्ते होते.
  • 2020 ते 2021 दरम्यान भारतात इंटरनेट वापरणाऱ्यांची संख्या 47 दशलक्ष म्हणजे 8.2% ने  वाढली आहे.
  • जानेवारी 2021 मध्ये भारतात इंटरनेटचे प्रमाण एकूण लोकसंख्येच्या 45% इतके होते.
  • वरील आकडेवारीने हे स्पष्ट केले आहे की भारताचा इंटरनेट बेस खूप विस्तृत आहे, ज्यामुळे येथे डिजिटल साक्षरतेचा विषय खूप महत्वाचा बनला आहे.

डिजिटल साक्षरतेसाठी भारताचे प्रयत्न

भारतनेट प्रोग्राम:

  • भारतनेट प्रकल्पाला पूर्वी ऑप्टिकल फायबर कम्युनिकेशन नेटवर्क असे नाव देण्यात आले होते.
  • या प्रकल्पातील उद्दीष्ट म्हणजे ग्रामीण आणि दुर्गम भागातील नागरिकांना आणि राज्य आणि खाजगी क्षेत्राच्या सहभागाने संस्थांना प्रवेशयोग्य ब्रॉडबँड सेवा प्रदान करणे.
  • भारतनेट प्रकल्पांतर्गत अडीच लाखाहून अधिक ग्रामपंचायतींना परवडेल अशा दराने ऑप्टिकल फायबरच्या माध्यमातून हाय स्पीड ब्रॉडबँड उपलब्ध करुन देणार आहेत. त्याअंतर्गत ब्रॉडबँडचा वेग 2 ते 20 एमबीपीएस पर्यंत ठेवण्यात आला आहे.
  • प्रोजेक्टला युनिव्हर्सल सर्व्हिस बिलिगेशन फंड (USOF) यांनी वित्तपुरवठा केला आहे.
  • त्याअंतर्गत शाळा, आरोग्य केंद्रे आणि कौशल्य विकास केंद्रांमध्ये मोफत इंटरनेट कनेक्शन देण्यात येणार आहे.

राष्ट्रीय डिजिटल साक्षरता अभियान

    सन 2020 पर्यंत भारतातील प्रत्येक घरात किमान एक व्यक्ती डिजिटल साक्षर व्हावी या उद्देशाने राष्ट्रीय डिजिटल साक्षरता अभियान (एनडीएलएम) सुरू करण्यात आली होती. या प्रकल्पातील उद्दीष्ट तांत्रिकदृष्ट्या निरक्षर प्रौढांना वेगाने डिजिटलायझिंग जगात त्यांचे स्थान शोधण्यात मदत करणे हा आहे.

सायबर गुन्हे:

2019 मध्ये, इतर राज्याच्या तुलनेत ऑनलाइन बँकिंगशी संबंधित सर्वाधिक फसवणूकीची गुन्हे महाराष्ट्र राज्यातील अधिकाऱ्यांकडे अंदाजे 552 खटले नोंदविण्यात आले. 2019 मध्ये देशात इंटरनेट बँकिंग फसवणूकीची सुमारे दोन हजार प्रकरणे नोंदवली गेली. या प्रकारचा गुन्हा भारतीय दंड संहितेच्या कलम 420 च्या अखत्यारीत आला आहे.

टेलिनॉरने नुकत्याच केलेल्या सर्वेक्षणानुसार आशियाई देशांच्या तुलनेत भारतीयांनी ऑनलाइन फसवणूकीमध्ये सर्वाधिक पैसे गमावलेले आहेत. आकडेवारीनुसार 36% भारतीयांची ऑनलाईन फसवणूक करण्यात आली, या इंटरनेट फसवणूकीमुळे प्रत्येक व्यक्तीसाठी सरासरी 8.19 लाख रूपयांचे आर्थिक नुकसान झाले आहे, तर आशियातील प्रत्येक व्यक्तीसाठी 6.81 लाख रुपये आहे. या सर्वेक्षणात असेही दिसून आले आहे की 17% वापरकर्ते बनावट बँक ई-मेल फसवणूकीला बळी पडले आहेत.

इंटरनेट बँकिंगचा वापर सुरक्षितपणे करण्यासाठी टिप्स:

1. नेहमी अस्सल अँटी-व्हायरस सॉफ्टवेअर वापरा (फुकटचे अँटी-व्हायरस वापरू नका). 

२. सार्वजनिक वाय-फाय किंवा व्हीपीएन सॉफ्टवेअर वापरणे टाळा.

3. आपल्या स्मार्टफोनची ऑपरेटिंग सिस्टम अद्ययावत करा.

4. आपला पासवर्ड नियमितपणे बदलत रहा आणि तो अधिक संदिग्ध असावा.

5. सर्व बँकिंग व्यवहाराच्या सूचना मोबाइलवर मिळण्यासाठी बँकेला विनंती करा.

6. इतर मोबाइल किंवा डीवाईसवरून आपल्या नेट-बँकिंग खात्यावर साइन इन करणे टाळा.

7. सामान्यत: इंटरनेट ब्राउझ करताना वेबसाइटच्या यूआरएलची सुरूवात "http" च्या अक्षराने होते. तथापि, सुरक्षित इंटरनेट ब्राउझ करण्यासाठी तो "https" ने सुरू झाला पाहिजे - शेवटी "s" (secure) लक्षात घ्या.

8. सगळ्यात महत्त्वाचे अनओळखी मेसेज किंवा मेलमधील लिंकवर क्लिक करून नेट-बँकिंग करू नका.

9. आपले बँक अकाऊंट नंबर, डेबिट/ क्रेडिट कार्ड नंबर आणि पिन कोणालाही सांगू अगर देऊ नका.

10. आपले नेट-बँकिंग किंवा ऑनलाइन खरेदी सुरक्षित करण्यासाठी डिजिटल साक्षर बना. 

(सदर लेखातील चित्र, इमेज Google वरून साभार)


सोमवार, १७ मे, २०२१

अवसाद | औदासीन्य | Depression

 अवसाद किंवा औदासीन्य (Depression)

एकविसाव्या शतकात प्रत्येकजण ताण-तणावाशी झगडत आहे. अशी मानसिक स्थिती कमिअधिकपणे आपण प्रत्येकजण अनुभवतो. आपली मानसिक स्थिती आणि बाह्य परिस्थितीमध्ये संतुलन आणि सुसंवाद निर्माण न झाल्याने तणाव निर्माण होतो. तणावामुळे आपल्या जीवनात अनेक मनोविकार उद्भवत असतात. सामान्यपने दैनंदिन जीवनात थोड्या प्रमाणात ताण-तणाव असणे समस्या नसून आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी असा ताण घेणे आवश्यक आहे, परंतु जर ते आपल्या भावनिक आणि शारीरिक जीवनाचा भाग बनले तर ते धोकादायक सिद्ध होऊ शकतात. आपल्या जीवनात केंव्हातरी आपण निरुत्साह आणि निराश यासारख्या नकारात्मक भावनांचा अनुभव घेतलेला आहे. अपयश, संघर्ष आणि नातेसंबंधातील दुराव्यामुळे दु:खी होणे सामान्य आहे. परंतु जर निरुत्साह, दुःख, असहायता, निराशा यासारख्या भावना काही दिवसांपासून ते काही महिन्यांपर्यंत टिकून राहत असतील आणि एखाद्या व्यक्तीला आपली दैनंदिन कामे करण्यात अडथळा निर्माण होत असेल तर ते औदासीन्य/ अवसाद  (depression) या मानसिक आजाराची लक्षणे असू शकतात.

सोमवार, १० मे, २०२१

प्रतिभावान लोकांची गुणवैशिष्टे | बुद्धिमत्ता म्हणजे काय | Intelligent People

 

प्रतिभावान लोकांची गुणवैशिष्टे

बुद्धी हा शब्द आपण सामान्यपणे आपल्या दैनंदिन संभाषणामध्ये अनेकवेळा वापरतो. आपण दैनंदिन जीवनात 'बुद्धिमत्ता' हा शब्द वेगवान गतीने शिकणे आणि समजून घेण्यासाठी, प्रखर स्मरणशक्ती आणि तार्किक विचारांसाठी वापरतो. 'बुद्धी' हा शब्द सामान्य अर्थाने वेगळा असल्याने मानसशास्त्रज्ञानी तो विशिष्ट अर्थाने वापरला आहे. सुरवातीपासूनच अनेक मानसशास्त्रज्ञांनी बुद्धिमत्ता या शब्दाची व्याख्या करण्याचा प्रयत्न केला. सर्वप्रथम, बोरिंग (1923) यांनी बुद्धिमत्तेची कार्यात्मक व्याख्या सांगितली की “बुद्धिमत्ता चाचण्याद्वारे जे मापन केले जाते ती बुद्धिमत्ता”. परंतु या व्याख्यातून बुद्धिमत्तेच्या स्वरूपाबद्दल निश्चित अर्थ प्राप्त होत नाही. कारण बुद्धिमत्ता मापण्यासाठी अनेक चाचण्या उपलब्ध आहेत, यापैकी कोणत्या चाचणीद्वारे केले गेलेले मापन बुद्धिमत्ता असे म्हणता येईल?. बोरिंगनंतर अनेक मानसशास्त्रज्ञांनी बुद्धिमत्तेची व्याख्या वेगवेगळ्या प्रकारे करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या सर्व व्याख्या तीन मूलभूत प्रकारात विभागल्या जाऊ शकतात -

सोमवार, ३ मे, २०२१

विषारी लोक | टॉक्सिक पीपल | Toxic People

 

विषारी लोक | टॉक्सिक पीपल | Toxic People

शौर्य दहा वर्षाचा असताना एका मुलाबरोबर त्याचे कडक्याचे भांडण झाले होते. भांडणाचे कारण होते तो मुलगा अर्वाच्य शिवीगाळ करतो म्हणून पण कोल्हापूर सारख्या शहरात शिवी ही सर्वसामान्य मानली जाते. शौर्यला विचारले की शिवी दिली म्हणून काय झाले? त्यावर तो म्हणाला होता की “त्याच्या अशा वागण्याने आमच्या खेळात व्यत्यय येतो आणि सर्वजन खेळ सोडून एकमेकांना शिवी देतात आणि शेवट भांडणाने होतो. त्यामुळे तो मुलगा जवळून जरी गेला तरी त्रास होतो त्यामुळे त्याच्याशी खेळणे टाळतो.” आपणासही असा अनुभव आला असेल की काही लोक आपल्या जवळ असतील तर खूपच आल्हाददायक वाटते आणि काही लोक कधी निघून जातील असे वाटत राहते. आपण नेहमी आल्हाददायक लोकांना भेटण्याचा प्रयत्न करत असतो तर विषारी लोकांना टाळण्याचा कसोशीने प्रयत्न करत असतो. 

Gen Z: नव्या पिढीचे जग

  Gen Z: नव्या पिढीचे जग (सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार) मानवी इतिहासात प्रत्येक कालखंडाने स्वतःची एक पिढी घडवली आहे. युद्धोत्त...