रविवार, १९ ऑक्टोबर, २०२५

जे आहे त्याचे भान आणि जे नाही त्याची आस : Habituation, Scarcity Principle, Relative Deprivation, Hedonic Treadmill

 

जे आहे त्याचे भान आणि जे नाही त्याची आस

“जी गोष्ट आपल्याकडे आहे तिची किंमत नसते, पण जी मिळालेली नाही तिची किंमत अधिक वाटते” हे विधान केवळ एक भावनिक निरीक्षण नसून मानवी जीवनातील अतिशय गूढ आणि सातत्यपूर्ण प्रवृत्तीचे दर्शन घडवते. मनुष्य हा समाधानापेक्षा असंतोषाच्या दिशेने अधिक झुकणारा प्राणी आहे. त्याच्या अपेक्षा, आकांक्षा, आणि तुलना करण्याची प्रवृत्ती यामुळे तो वर्तमानातील गोष्टींचे मूल्य कमी मानतो आणि भविष्यकाळातील किंवा न मिळालेल्या गोष्टींना अधिक महत्त्व देतो. मानवी विचारप्रक्रियेत ही घटना भावनिक, सामाजिक, आणि बौद्धिक स्तरांवर प्रकट होते. मानसशास्त्र, समाजशास्त्र आणि तत्त्वज्ञान या सर्व शाखांनी या घटनेचे विश्लेषण विविध अंगांनी केले आहे.

‘हॅबिच्युएशन’ (Habituation): सवय होण्याची प्रक्रिया

मानवाचे मन अत्यंत संवेदनक्षम आणि अनुकूलनक्षम आहे. कोणत्याही नवीन अनुभवाशी ते जलद गतीने जुळवून घेते. या प्रक्रियेला मानसशास्त्रात ‘हॅबिच्युएशन’ म्हटले जाते. “हॅबिच्युएशनम्हणजे कोणत्याही वारंवार येणाऱ्या उद्दिपकास प्रतिसाद हळूहळू कमी होणे किंवा थांबणे. म्हणजेच, ज्या गोष्टीचा आपण सतत अनुभव घेतो त्या गोष्टीचे नवीनपण (novelty) संपल्यावर मन त्या उद्दिपकाकडे दुर्लक्ष करू लागते.

उदाहरणार्थ, जर आपण सुरुवातीला एखाद्या सुगंधी फुलाजवळ बसलो तर त्याचा सुगंध तीव्र जाणवतो. पण काही वेळानंतर तोच सुगंध कमी जाणवतो किंवा जाणवतच नाही. हे कारण म्हणजे मेंदू त्या सुगंधाला “नवीन” उद्दीपक म्हणून पाहणे थांबवतो. हेच तत्त्व जीवनातील इतर क्षेत्रांनाही लागू होतो जसे नवी वस्तू, नवी नोकरी, नवे नातं, नवे घर, किंवा नवा दर्जा मिळाल्यावर सुरुवातीचा आनंद काही काळ टिकतो, पण थोड्याच वेळात मन त्या गोष्टीशी सवय करून घेतं आणि तिचं भावनिक मूल्य कमी होतं. उदाहरणार्थ, रेल्वे ट्रॅकजवळ राहणारे लोक सुरुवातीला गाडीच्या आवाजाने जागे होतात, पण काही दिवसांनी ते त्या आवाजाकडे लक्ष देत नाहीत, कारण मेंदूला समजते की तो आवाज धोकादायक नाही.

न्यूरोसायन्स च्या दृष्टीने पाहिले, तर हॅबिच्युएशनमध्ये मेंदूतील न्यूरॉन्सच्या प्रतिसादाची तीव्रता कमी होत जाते. सुरुवातीला उद्दिपकामुळे न्यूरल सिग्नलिंग सक्रिय होते, पण तोच उद्दिपक वारंवार मिळाल्यावर सायनॅप्टिक ट्रान्समिशन कमी होते (Rankin et al., 2009). म्हणजेच, न्यूरॉन्स त्या उद्दिपकास कमी प्रतिसाद देतात, कारण तो आता “नवीन” राहत नाही.

मानवाच्या भावनिक जगातही हॅबिच्युएशन महत्त्वाची भूमिका बजावते. जेव्हा आपण एखादी वस्तू खरेदी करतो किंवा यश मिळवतो, तेव्हा त्या नव्या गोष्टीशी संबंधित आनंद तीव्र असतो. पण काही काळानंतर तोच आनंद कमी होतो. या घटनेला Hedonic Adaptation असे म्हणतात (Brickman & Campbell, 1971), जी हॅबिच्युएशनची भावनिक आवृत्ती मानली जाते. उदाहरणार्थ, नवीन मोबाइल घेतल्यावर काही दिवस आपण त्याचा आनंद घेतो, पण थोड्याच काळात तो "सामान्य" वाटू लागतो, कारण आपले मन त्या वस्तूशी सवय करून घेते. ही प्रक्रिया केवळ वस्तूंवरच नव्हे, तर नात्यांवरही लागू होते. दीर्घकाळ एकत्र असताना, जोडीदार किंवा मित्र यांच्याशी संबंधित आनंद आणि उत्सुकता कमी जाणवू लागते, कारण नात्याचा “नवीनपणा” कमी होतो. काही संशोधकांनी हे स्पष्ट केले आहे की नात्यांमध्ये ताजेपणा राखण्यासाठी novel experiences आणि shared new activities आवश्यक असतात (Aron et al., 2000).

जसे आपण एखाद्या फुलाचा सुगंध किंवा पंख्याचा आवाज काही वेळानंतर लक्षात घेत नाही, तसेच जीवनातील उपलब्ध गोष्टींचे भानही कमी होत जाते. मन त्या गोष्टींशी इतके जुळवून घेते की त्या अदृश्यसदृश होतात. म्हणूनच लोकांना जे नाही, ते अधिक आकर्षक वाटते, कारण त्यात अजून “नवीनतेचा” घटक शिल्लक असतो.

हॅबिच्युएशन ही एक नैसर्गिक आणि उपयुक्त प्रक्रिया आहे, कारण ती आपल्याला सततच्या उद्दिपकापासून मानसिक थकवा येऊ न देण्याचे कार्य करते. पण जीवनात आनंद आणि समाधान टिकवण्यासाठी, कृतज्ञतेची आणि जाणीवपूर्वक जागरूकतेची सवय विकसित करणे आवश्यक आहे. जेव्हा आपण जागरूकतेने आपल्या दैनंदिन गोष्टींकडे पाहतो, तेव्हा “सवय झालेलं” पुन्हा अर्थपूर्ण वाटू लागतं.

कमी मिळणारे अधिक आकर्षक’: Scarcity Principle

मानवी स्वभावाच्या गाभ्यात एक अतिशय सूक्ष्म पण शक्तिशाली प्रवृत्ती कार्यरत असते ती म्हणजे दुर्मिळतेचे आकर्षण. म्हणजेच, जी गोष्ट कमी प्रमाणात उपलब्ध आहे किंवा जी मिळवणे कठीण आहे, ती मनुष्याला अधिक मौल्यवान आणि आकर्षक वाटते. मानसशास्त्रात या प्रवृत्तीला ‘Scarcity Principle’ असे म्हणतात. या तत्त्वाचे सैद्धांतिक रूप प्रसिद्ध सामाजिक मानसशास्त्रज्ञ रॉबर्ट सिआल्डिनी यांनी त्यांच्या सुप्रसिद्ध पुस्तक Influence: The Psychology of Persuasion (1984) मध्ये दिले. त्यांनी सांगितले की “Opportunities seem more valuable to us when they are less available.” म्हणजेच, जेव्हा एखादी संधी, वस्तू किंवा अनुभव कमी प्रमाणात उपलब्ध असतो, तेव्हा त्याचे मूल्य आपल्या मनात आपोआप वाढते (Cialdini, 1984).

मानवी मनाच्या मूल्यनिर्धारणाची प्रक्रिया वस्तूच्या वस्तुनिष्ठ गुणवत्तेवर नव्हे, तर तिच्या उपलब्धतेच्या स्थितीवर अवलंबून असते. जे सहज मिळते, त्याची किंमत आपोआप कमी वाटते, आणि जे मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागतो, ते अधिक मौल्यवान वाटते. हा परिणाम भावनिक आणि बोधनिक दोन्ही पातळ्यांवर घडतो. सिआल्डिनी (2009) यांच्या मते, दुर्लभता आपल्यात “psychological reactance” निर्माण करते. Brehm (1966) यांनी मांडलेल्या Psychological Reactance Theory नुसार, जेव्हा एखादी वस्तू किंवा पर्याय आपल्यापासून काढून घेतला जातो किंवा मिळण्याची शक्यता कमी होते, तेव्हा आपल्या स्वातंत्र्यावर बंधन आल्यासारखे वाटते. परिणामी, ती गोष्ट मिळवण्याची इच्छा अधिक तीव्र होते. म्हणजेच, "गमावण्याची भीती" (fear of loss) ही "मिळवण्याच्या आनंदा" पेक्षा अधिक प्रभावी ठरते (Kahneman & Tversky, 1979).

मानव आपल्या निर्णय प्रक्रियेत अनेकदा heuristics म्हणजेच मानसिक शॉर्टकट वापरतो. Scarcity heuristic म्हणजे अशी प्रवृत्ती की “जर काही कमी प्रमाणात उपलब्ध आहे, तर ते नक्कीच चांगले किंवा मौल्यवान असेल.” उदा. मर्यादित आवृत्तीची वस्तू, फक्त काही जागा उरल्या आहेत असा जाहिरातीतील संदेश, किंवा “Limited Time Offer” अशी घोषणा, या सर्व गोष्टी आपल्या निर्णय क्षमतेवर परिणाम करतात. संशोधन दर्शवते की जेव्हा वस्तू किंवा सेवा “मर्यादित” म्हणून सादर केली जाते, तेव्हा ग्राहक ती अधिक लवकर खरेदी करतात (Aggarwal, Jun & Huh, 2011).

ही प्रतिक्रिया evolutionary psychology च्या संदर्भातही समजली जाऊ शकते. प्राचीन काळात संसाधनांची मर्यादा आणि स्पर्धा ही जगण्यासाठी अत्यावश्यक बाब होती. त्यामुळे जे दुर्मिळ आहे, ते आवश्यक आणि सुरक्षिततेसाठी महत्त्वाचे असू शकते, अशी विचारप्रवृत्ती आपल्या मेंदूमध्ये विकसित झाली आहे. याचे काही व्यवहारातील उदाहरणे आणि उपयोग:

  • मार्केटिंगमध्ये: कंपन्या “Limited Stock”, “Only 2 items left” किंवा “Offer ends today” अशा घोषणांद्वारे ग्राहकांच्या मनात दुर्मिळतेचा भाव निर्माण करतात. Amazon, Flipkart किंवा Myntra सारख्या ई-कॉमर्स साइट्स याच तत्त्वाचा उपयोग करून विक्री वाढवतात.
  • सामाजिक संबंधांमध्ये: एखाद्या व्यक्तीचे लक्ष किंवा वेळ मर्यादित असेल, तर त्या व्यक्तीबद्दलची आकर्षणाची तीव्रता वाढते. म्हणजेच, जे सहज उपलब्ध नसते, ते अधिक “महत्त्वाचे” वाटते.
  • नोकरी किंवा शैक्षणिक संधींमध्ये: “फक्त काही जागा उरल्या आहेत” असे जाहीर झाले की उमेदवारांच्या अर्जांची संख्या झपाट्याने वाढते. येथे निर्णयभावना "गमावण्याची शक्यता" या भीतीमुळे वेगाने आकार घेते.

Worchel, Lee, & Adewole (1975) यांच्या प्रसिद्ध प्रयोगात सहभागींना कुकीज दिल्या गेल्या. एका गटाला सहा कुकीज, तर दुसऱ्या गटाला फक्त दोन कुकीज दिल्या गेल्या. परिणाम असे दर्शवतात की दोन कुकीज असलेला गट त्या कुकीजना अधिक स्वादिष्ट आणि मौल्यवान मानत होता. जरी दोन्ही गटांना एकसारख्या कुकीज दिल्या होत्या तरीही. या प्रयोगाने Scarcity Principle चे ठोस प्रायोगिक प्रमाण दिले. Lynn (1991) यांनी “Scarcity effects on value: A quantitative review of the commodity theory literature” या मेटा-अभ्यासातून दाखवले की दुर्लभता जवळपास सर्व संस्कृतींमध्ये आणि संदर्भांमध्ये मूल्यवृद्धी घडवते.

तत्त्वज्ञानाच्या दृष्टीने पाहिले तर, “दुर्मिळतेचे आकर्षण” हा मानवी असंतोषाचा आणि आकांक्षेचा एक विस्तार आहे. भारतीय तत्त्वज्ञानातही “मोह” आणि “तृष्णा” या संकल्पना याच दिशेने लक्ष वेधतात. मनुष्याला जे मिळत नाही, त्याच्याकडे त्याचे मन ओढले जाते, कारण मनाचे स्वभावच “अपूर्णतेच्या” अनुभवातून प्रेरित असतो. त्यामुळे Scarcity Principle हे केवळ मानसशास्त्रीय नसून तत्त्वज्ञानात्मक सत्यही ठरते.

तुलना (Comparison) आणि ‘Relative Deprivation’

मानव हा सामाजिक प्राणी असल्यामुळे त्याचे विचार, भावना आणि समाधान हे केवळ स्वतःच्या अंतर्गत निकषांवर अवलंबून नसते, तर ते समाजातील इतर लोकांच्या वर्तन, उपलब्धी आणि परिस्थितीशी तुलना करून ठरवले जाते. मनुष्य स्वतःचा “मी कोण आहे” आणि “माझ्याकडे काय आहे” याचा अंदाज थेट मिळकतीवर नाही, तर इतरांच्या तुलनेत माझी स्थिती काय आहे यावरून घेतो. या प्रवृत्तीला मानसशास्त्रात Relative Deprivation म्हणजेच “सापेक्ष वंचितता” असे म्हणतात.

‘Relative Deprivation’ ही संकल्पना सर्वप्रथम अमेरिकन समाजशास्त्रज्ञ सॅम्युएल स्टॉफ़र आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी त्यांच्या ग्रंथात “The American Soldier” (1949) मध्ये मांडली. दुसऱ्या महायुद्धातील अमेरिकन सैनिकांच्या समाधानाच्या अभ्यासात त्यांनी आढळले की सैनिकांचे समाधान हे त्यांच्या वास्तविक परिस्थितीवर नाही, तर इतर सैनिकांशी केलेल्या तुलनेवर अवलंबून होते. उदाहरणार्थ, सैन्याच्या काही शाखांमध्ये बढतीच्या संधी कमी होत्या, परंतु तेथील सैनिक अधिक समाधानी होते, कारण त्यांच्या भोवती असलेले सर्वजण तशाच परिस्थितीत होते. उलट ज्या शाखांमध्ये बढतीच्या अधिक संधी होत्या, तेथील सैनिक असमाधानी होते, कारण त्यांनी पाहिले की इतरांना ते अधिक मिळवत आहेत. या निरीक्षणातून ‘Relative Deprivation’ या मानसशास्त्रीय प्रक्रियेची मूळ कल्पना आकाराला आली (Stouffer et al., 1949).

‘Relative Deprivation’ म्हणजे अशी अवस्था ज्यात व्यक्तीला वाटते की ती इतरांच्या तुलनेत कमी लाभलेली किंवा वंचित आहे, जरी तिच्याकडे वस्तुनिष्ठ दृष्ट्या बरीच साधने असली तरी (Runciman, 1966). ब्रिटिश समाजशास्त्रज्ञ Walter G. Runciman यांनी या संकल्पनेचा पुढे विस्तार देत सांगितले की ही वंचितता वास्तविक नसून सापेक्ष असते, म्हणजे ती वस्तुस्थितीवर नाही तर मनाच्या जाणिवेवर अवलंबून असते. उदाहरणार्थ, एखादा कर्मचारी आपल्या पगारावर समाधानी असतो, पण जर त्याला कळले की त्याच पदावरील दुसऱ्याला अधिक पगार मिळतो, तर अचानक त्याचे समाधान नाहीसे होते. येथे बदल झालेला नसतो त्याच्या प्रत्यक्ष स्थितीत, तर तुलनेच्या निकषात.

‘Relative Deprivation’ संकल्पना ‘Social Comparison Theory’शी (Festinger, 1954) निकट व संबंधित आहे. लिऑन फेस्टिंजर यांनी मांडले की माणूस आपल्या क्षमतांची आणि मूल्यांची तुलना इतरांशी करून करतो. ही तुलना upward (आपल्यापेक्षा चांगल्या व्यक्तींशी) किंवा downward (आपल्यापेक्षा कमी व्यक्तींशी) असू शकते. Upward comparison प्रगतीसाठी प्रेरणा देऊ शकते, पण त्याच वेळी असंतोष आणि वंचिततेची भावना निर्माण करू शकते. Downward comparison तात्पुरते समाधान देऊ शकते, पण प्रगतीची प्रेरणा कमी करते.

‘Relative Deprivation’ ही केवळ एक संकल्पना नसून तिचे अनेक मानसिक आणि सामाजिक परिणाम आढळतात. मानसशास्त्रज्ञांनी दाखवले आहे की सतत इतरांशी तुलना करणाऱ्या व्यक्तींमध्ये नैराश्य, आत्मदुःख, आणि राग अधिक आढळतो (Smith et al., 2012). याव्यतिरिक्त, सामाजिक पातळीवर ही भावना असंतोष, बंडखोरी आणि सामाजिक संघर्षाचे मूळ बनू शकते (Walker & Smith, 2002). जेव्हा एखादा गट स्वतःला दुसऱ्या गटाच्या तुलनेत वंचित समजतो, तेव्हा सामाजिक असमानता, आंदोलन आणि क्रांती यांसारख्या घटना घडतात. उदा. नागरी हक्क चळवळी, स्त्रीवादी चळवळी, किंवा आर्थिक असमानतेविरुद्धचे आंदोलन.

आजच्या डिजिटल युगात, ‘Relative Deprivation’ अधिक तीव्र स्वरूपात दिसून येते. सोशल मीडियावर लोक आपले “सर्वोत्तम क्षण” दाखवतात जसे प्रवास, संपत्ती, सौंदर्य, यश इत्यादी. यामुळे पाहणाऱ्याच्या मनात सतत upward comparison निर्माण होते, ज्यामुळे असंतोष, अपूर्णतेची भावना, आणि स्व-आदर यातील घट निर्माण होते (Vogel et al., 2014). अनेक अभ्यासांनी दाखवले आहे की सतत सामाजिक माध्यमांवरील तुलना केल्याने व्यक्तीचे मानसिक आरोग्य बिघडते आणि जीवनातील समाधान कमी होते (Appel et al., 2016).

तुलना नेहमी नकारात्मक नसते ती योग्य रीतीने वापरल्यास ती आत्मपरीक्षण आणि विकासाची प्रेरणा देऊ शकते. जर व्यक्ती इतरांशी तुलना करून स्वतःच्या क्षमतेचा विचार रचनात्मक पद्धतीने करते, तर ती सुधारण्याचा मार्ग स्वीकारते. पण जेव्हा ही तुलना आत्म-निंदा, मत्सर किंवा वंचनेत रूपांतरित होते, तेव्हा मानसिक असंतुलन निर्माण होते.

मानवाचे समाधान हे वस्तुनिष्ठ उपलब्धीपेक्षा सापेक्ष जाणिवांवर आधारित असते. "माझ्याकडे काय आहे" यापेक्षा "इतरांकडे काय आहे आणि मी कुठे उभा आहे" हेच आपल्या समाधानाचा मापदंड ठरतो.  ‘Relative Deprivation’ ही नैसर्गिक मानवी प्रवृत्ती असली तरी, तिच्या नकारात्मक परिणामांपासून बचाव करण्यासाठी कृतज्ञतेचा आणि स्वतःच्या प्रगतीचा दृष्टीकोन आवश्यक आहे. कारण शेवटी, तुलना नेहमी टाळता येत नाही, पण ती जागरूकतेने वापरली तर ती प्रेरणेत रूपांतरित होऊ शकते.

‘Hedonic Treadmill’ — आनंदाचा चक्रव्यूह

मानवाचे मन आनंदाच्या शोधात सदैव धावत असते. पण हा धावण्याचा प्रवास एका चक्रात अडकलेला असतो ज्यातून तो बाहेर पडत नाही. या मानसशास्त्रीय प्रक्रियेला “Hedonic Treadmill” किंवा “Hedonic Adaptation” असे म्हणतात. ही संकल्पना प्रथम Philip Brickman आणि Donald T. Campbell यांनी 1971 मध्ये त्यांच्या प्रसिद्ध लेखात मांडली (“Hedonic Relativism and Planning the Good Society”, 1971). त्यांनी सांगितले की मनुष्य आपल्या परिस्थितीत बदल झाल्यावर जसे की संपत्ती, यश, नातेसंबंध किंवा आरोग्य सुधारल्यावर सुरुवातीला आनंदात वाढ होते; पण काही काळानंतर तो पुन्हा आपल्या मूळ आनंदाच्या पातळीवर परत येतो.

या सिद्धांतानुसार, प्रत्येक व्यक्तीच्या मनात एक "hedonic set point" असतो म्हणजेच आनंदाचा एक स्थिर स्तर. काही काळासाठी परिस्थिती सुधारल्यास आपण अधिक आनंदी होतो, पण ही वाढ तात्पुरती असते. जसे की, नवीन घर घेतल्यावर, बढती मिळाल्यावर किंवा लग्न झाल्यावर आपण उत्साहित आणि समाधानी होतो. परंतु काही महिन्यांनंतर तो उत्साह मंदावतो आणि जीवन पुन्हा "सामान्य" वाटू लागते. Brickman आणि Campbell यांनी दाखवून दिले की, "happiness tends to return to its baseline level despite major positive or negative life events." (Brickman & Campbell, 1971).

मनुष्य कोणत्याही परिस्थितीशी ती चांगली किंवा वाईट असो कालांतराने मानसिकदृष्ट्या जुळवून घेतो, ही प्रक्रिया “hedonic adaptation” म्हणून ओळखली जाते. हा जुळवून घेण्याचा गुणधर्म जैविक आणि मानसशास्त्रीय दोन्ही कारणांवर आधारित आहे. न्यूरोसायन्सच्या दृष्टीने पाहता, मेंदूतील डोपामिन स्राव सुरुवातीला वाढतो, पण लवकरच त्याची पातळी पुन्हा सामान्य होते (Schultz, 2000). त्यामुळे “नवीन” आनंदाचा अनुभव काळानुसार आपल्यासाठी “सामान्य” बनतो.

"Hedonic Treadmill" या शब्दातील treadmill म्हणजे व्यायामासाठी वापरले जाणारे धावपटूचे यंत्र जिथे व्यक्ती धावत असते, पण प्रत्यक्षात कुठेच पोहोचत नाही. तसंच, मनुष्यही आनंदासाठी सतत धावत राहतो, नवीन वस्तू, अनुभव, नाती आणि यश शोधत राहतो पण शेवटी तो पुन्हा त्याच भावनिक पातळीवर येतो. Brickman आणि सहकाऱ्यांनी पुढे 1978 मध्ये एक प्रसिद्ध अभ्यास केला, ज्यात त्यांनी lottery winners आणि paraplegics (अपंगत्व आलेले व्यक्ती) यांचा आनंदाचा स्तर तुलना केला. त्यातून दिसून आले की, लॉटरी जिंकल्यानंतर काही महिन्यांत विजेत्यांचा आनंदाचा स्तर पुन्हा सामान्य झाला, तर अपंगत्व आलेल्या व्यक्तींच्या आनंदातही दीर्घकाळात सुधारणा झाली (Brickman, Coates & Janoff-Bulman, 1978). यावरून त्यांनी निष्कर्ष काढला की “मानव कोणत्याही परिस्थितीत शेवटी आपल्या मूळ भावनिक पातळीवर परततो.”

तथापि, पुढील संशोधनात काही मानसशास्त्रज्ञांनी असे दाखवले आहे की हॅडोनिक अ‍ॅडॅप्टेशन सर्व क्षेत्रांमध्ये सारखे कार्य करत नाही. उदाहरणार्थ, Lyubomirsky (2011) आणि Sheldon & Lyubomirsky (2012) यांनी सुचवले की ज्या गोष्टींमध्ये कृतज्ञता, अर्थपूर्ण नाती आणि वैयक्तिक विकास यांचा समावेश आहे, त्या अनुभवांमध्ये adaptation कमी होते. म्हणजेच, “भौतिक किंवा बाह्य सुख” लवकर फिके पडते, पण “अर्थपूर्ण आनंद” टिकाऊ असतो.

“Hedonic treadmill” आपल्याला हे शिकवते की बाह्य परिस्थितींवर अवलंबून असलेला आनंद अस्थिर असतो. जरी भौतिक प्रगती महत्त्वाची असली तरी ती कायमस्वरूपी समाधान देत नाही. म्हणूनच मानसशास्त्रज्ञ Martin Seligman (2002) यांनी “Positive Psychology” च्या माध्यमातून eudaimonic happiness म्हणजेच “अर्थपूर्ण आणि उद्देशपूर्ण आनंद” या संकल्पनेवर भर दिला. हा आनंद बाह्य यशावर नव्हे, तर वैयक्तिक मूल्ये, नाती आणि अंतर्मनाच्या समाधानावर आधारित असतो.

तत्त्वज्ञानात्मक दृष्टी — "असंतोष हेच प्रगतीचे मूळ"

मानवी जीवनातील असंतोष हा एक विरोधाभासी घटक आहे; तो दुःखाचा स्रोतही आहे आणि प्रगतीचा प्रेरणास्त्रोतही. भारतीय तसेच बौद्ध तत्त्वज्ञानात या विरोधाभासाचा सखोल अभ्यास आढळतो. बुद्ध, उपनिषदकार, तसेच आधुनिक विचारवंत सर्वांनी या ‘असंतोषा’कडे वेगवेगळ्या दृष्टिकोनातून पाहिले आहे.

गौतम बुद्धांनी मांडलेल्या चार आर्य सत्यामध्ये (Four Noble Truths) दुसरे सत्य आहे  समुदय, म्हणजे दुःखाचे कारण. बुद्ध म्हणतात: तृष्णा पच्चया दुःखं” (Craving (tṛṣṇā) is the root of suffering.) तृष्णा म्हणजे केवळ भौतिक वस्तूंची इच्छा नव्हे, तर सतत अधिक मिळवण्याची, बदल घडवण्याची, स्वतःच्या स्थितीत समाधान न मिळण्याची अंतर्गत अस्वस्थता. ही अस्वस्थता पूर्ण न झाल्यास दुःख निर्माण करते. त्यामुळे बुद्धांच्या दृष्टीने असंतोष हा ‘आत्मशांतीचा शत्रू’ आहे. निर्वाण म्हणजेच या तृष्णेचा पूर्ण क्षय अशी या तत्त्वज्ञानाची व्याख्या आहे.

तथापि, भारतीय तत्त्वज्ञानातील सर्वच दर्शनशास्त्रे ‘इच्छा’ यास नकारात्मक समजत नाहीत. गीतामध्ये श्रीकृष्ण म्हणतात कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन।” म्हणजेच, कर्म करणे हे आपले कर्तव्य आहे; परिणामाची आसक्ती (फळाची अपेक्षा) दुःख निर्माण करते. येथे सूक्ष्म फरक लक्षात येतो; इच्छा स्वतःत दोष नाही, पण तिच्याशी असलेली आसक्ती दुःखाचे मूळ ठरते. मनुष्याची प्रगती ‘इच्छा’मुळेच सुरू होते नवनिर्मितीची, ज्ञानाची, न्यायाची, आणि सुखी जीवनाची. परंतु जेव्हा ही इच्छा स्वार्थी, अहंकारी किंवा अनियंत्रित होते, तेव्हा ती तृष्णेत रूपांतरित होते.

मानवी इतिहासाकडे पाहिले, तर असंतोष हा सभ्यतेच्या विकासाचा इंजिन ठरला आहे. ज्या वेळी मानवाने आपल्या परिस्थितीबद्दल, अंधश्रद्धेबद्दल, अन्यायाबद्दल, किंवा अज्ञानाबद्दल असंतोष व्यक्त केला तेव्हाच ज्ञानक्रांती, सामाजिक सुधारणा, आणि वैज्ञानिक प्रगती घडली. गॅलिलिओने विद्यमान खगोलशास्त्रीय विश्वासांविषयी असंतोष व्यक्त केला म्हणून आधुनिक विज्ञानाचा पाया घातला. बुद्ध स्वतः असंतुष्ट होते, त्यांनी ऐश्वर्य आणि वैभव असूनही जीवनातील दुःखाचे कारण शोधण्याचा प्रयत्न केला. महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, गांधीजी यांचा असंतोष सामाजिक विषमतेविरुद्ध होता, आणि तोच असंतोष समाजपरिवर्तनाचे साधन ठरला. म्हणजेच, असंतोषानेच मानवाला विचार करण्यास, प्रश्न विचारण्यास, आणि प्रणाली बदलण्यास प्रवृत्त केले.

आधुनिक मानसशास्त्रात “Optimal Frustration” (Heinz Kohut, 1971) हा सिद्धांत सांगतो की अल्प प्रमाणातील असंतोष किंवा अपूर्णता ही व्यक्तिमत्व विकासासाठी आवश्यक असते. ती व्यक्तीला नव्या कौशल्यांचा शोध घेण्यासाठी, अधिक प्रगल्भ विचार करण्यासाठी प्रेरित करते. त्याचप्रमाणे, Abraham Maslow यांच्या Hierarchy of Needs (1943) नुसार, जेव्हा व्यक्तीची मूलभूत गरजा पूर्ण होतात, तेव्हा ती “Self-Actualization” च्या दिशेने वाटचाल करते म्हणजेच, स्वतःचा सर्वोच्च विकास. ही वाटचाल सुद्धा “अजून काही मिळवायचे आहे” या असंतोषातूनच सुरू होते.

बौद्ध तत्त्वज्ञान आपल्याला असक्तता (Non-attachment) शिकवते, तर भारतीय तत्त्वज्ञान आपल्याला कर्तव्यशीलता (Karma-yoga) शिकवते. या दोन दृष्टिकोनांचा संगम म्हणजे “सजग असंतोष” (Mindful Dissatisfaction). यात आपण आपल्या जीवनस्थितीबद्दल असंतोष बाळगतो, पण तो असंतोष विनाशकारी न होता रचनात्मक असतो. तो आपल्याला बदल, नवकल्पना आणि आत्मविकासाकडे नेतो, पण आत्मशांती हरवू देत नाही.

असंतोष हा मानवी चेतनेचा अविभाज्य भाग आहे. तोच असंतोष जेव्हा अजाणतेपणाने जगला जातो, तेव्हा तो दुःख निर्माण करतो; पण तोच असंतोष जागरूकतेने जगला गेला, तर तो प्रगतीचे बीज बनतो. गौतम बुद्धांनी ज्या तृष्णेचा त्याग करण्यास सांगितला, ती ‘अंध तृष्णा’ होती; परंतु जागरूक आणि करुणामय असंतोष हा मानवतेच्या विकासाचा मार्ग आहे.

असंतोष नसेल तर स्थैर्य येईल; पण प्रगती थांबेल. असंतोष असेल तर वेदना येतील; पण नव्या उषःकाळाची पहाटही येईल.”

मनोवृत्तीतील बदल: कृतज्ञता आणि जागरूकता

मनुष्याच्या मानसिक समाधानाचा पाया बाह्य वस्तूंमध्ये नसून, त्याच्या दृष्टिकोनात असतो. आधुनिक मानसशास्त्रात असे मानले जाते की आनंद आणि समाधान हे केवळ परिस्थितींवर अवलंबून नसतात, तर आपल्या मनोवृत्तीवर म्हणजेच आपण त्या परिस्थितींकडे कसे पाहतो, हे ठरवते की आपण किती समाधानी आहोत (Seligman, 2002). Appreciation म्हणजे जीवनात जे आहे त्याचे मोल ओळखणे, तर Awareness म्हणजे त्या अनुभवांची जाणीवपूर्वक जाणीव ठेवणे. या दोन मानसिक सवयींमुळे मनुष्य सतत तुलना, असंतोष आणि अधीरतेपासून मुक्त होऊ शकतो.

1. कृतज्ञता (Gratitude)

कृतज्ञता ही सकारात्मक मानसशास्त्रातील सर्वात प्रभावी आणि प्रायोगिक संकल्पनांपैकी एक मानली जाते. Emmons आणि McCullough (2003) यांच्या प्रसिद्ध संशोधनानुसार, जे लोक दररोज किंवा साप्ताहिक पातळीवर कृतज्ञतेचा जर्नल लिहितात म्हणजेच आपल्या जीवनात घडलेल्या चांगल्या गोष्टींची नोंद ठेवतात त्यांचे मानसिक समाधान, आत्म-सन्मान आणि झोपेची गुणवत्ता अधिक चांगली असते. कृतज्ञता लेखन करताना आपण दररोज थोडा वेळ देऊन विचार करतो:

  • आज माझ्या आयुष्यात कोणत्या तीन गोष्टींबद्दल मी आभारी आहे?
  • कोणत्या व्यक्तीने आज माझ्या जीवनात आनंदाचा क्षण निर्माण केला?
  • माझ्याकडे असलेले कोणते संसाधन मला मदत करते?

ही प्रक्रिया आपल्याला आपल्या आयुष्यातील सकारात्मक पैलूंची जाणीव करून देते, ज्यामुळे “जे नाही” याऐवजी “जे आहे” या दृष्टिकोनावर लक्ष केंद्रित होते. Robert Emmons (2010) यांनी सांगितले आहे की, कृतज्ञता केवळ आनंद वाढवते असे नाही, तर ती depression आणि envy सारख्या नकारात्मक भावनांपासूनही बचाव करते.

Gratitude turns what we have into enough.” - Melody Beattie

2. सजगता/ जागरुकता/ आत्मभान (Mindfulness)

Mindfulness म्हणजे वर्तमान क्षणाची निष्पक्ष आणि सजग जाणीव ठेवणे (Kabat-Zinn, 1990). मानवी मन भूतकाळातील पश्चात्ताप किंवा भविष्याच्या चिंतेत हरवून जाते. त्यामुळे “आत्ता आणि येथे” असलेल्या वास्तवाचा अनुभव घेताना आपण अनुपस्थित असतो. Mindfulness meditation ही साधना मनाला वर्तमान क्षणात स्थिर ठेवते, विचार आणि भावना “जशा आहेत तशा” पाहण्याची क्षमता विकसित करते.

अनेक वैज्ञानिक संशोधनांनी दाखवले आहे की Mindfulness च्या नियमित सरावामुळे तणाव कमी होतो, amygdala (भीती आणि चिंता नियंत्रक मेंदूचा भाग) ची क्रियाशीलता घटते, आणि prefrontal cortex अधिक सक्रिय होतो, जो निर्णयक्षमतेशी आणि आत्मनियंत्रणाशी संबंधित आहे (Tang et al., 2015; Davidson & Kabat-Zinn, 2003).

वर्तमान क्षणात राहणे म्हणजे “मला आणखी काय हवं आहे?” या विचारांपासून दूर जाऊन “माझ्याकडे सध्या काय आहे?” याची जाणीव होणे. ही जागरूकता हीच Awareness ची खरी सुरुवात आहे. “The present moment is filled with joy and happiness. If you are attentive, you will see it.” - Thich Nhat Hanh

3. Digital Detox: तुलना निर्माण करणाऱ्या माध्यमांपासून दूर राहणे

आजच्या डिजिटल युगात सोशल मीडिया ही सतत तुलना निर्माण करणारी सर्वात मोठी शक्ती बनली आहे. आपल्याला इतरांचे यश, संपत्ती, सौंदर्य, प्रवास, आणि आनंदाचे क्षण असे “संपादित जीवन” दिसते ज्यामुळे आपले वास्तव अपूर्ण वाटते. या घटनेला मानसशास्त्रात “Highlight Reel Effect” किंवा “Social Comparison Trap” म्हटले जाते (Vogel et al., 2014).

Digital Detox म्हणजे काही काळासाठी डिजिटल साधनांपासून विशेषतः सोशल मीडियापासून जाणीवपूर्वक दूर राहणे. ही कृती मेंदूला सततच्या उत्तेजनांपासून विश्रांती देते, आणि स्वतःशी असलेले नाते पुन्हा प्रस्थापित करते. Przybylski आणि Weinstein (2017) यांच्या अभ्यासानुसार, सोशल मीडियापासून अल्पकाळाचा ब्रेक घेणारे लोक अधिक शांत, केंद्रित आणि भावनिकदृष्ट्या स्थिर राहतात. Digital Detox म्हणजे फक्त मोबाईल बंद करणे नाही; ते म्हणजे आपल्या लक्षावर नियंत्रण मिळवणे आणि “इतरांशी तुलना” या मानसिक सापळ्यातून बाहेर पडणे. हा प्रवास “Disconnect to reconnect” असा असावा.

4. Self-reflection: मी काय मिळवलं आहे?” याचा विचार करणे

Self-reflection म्हणजे स्वतःच्या अनुभवांवर, कृतींवर आणि भावनांवर चिंतन करणे. ही प्रक्रिया आपल्याला “मी कोण आहे?” आणि “मी कुठे पोहोचलो आहे?” या मूलभूत प्रश्नांशी जोडते. मानसशास्त्रज्ञ Donald Schön (1983) यांनी "Reflective Practice" ही संकल्पना मांडली, ज्या अंतर्गत व्यक्ती आपल्या अनुभवांमधून शिकते आणि स्वतःमध्ये सुधारणा घडवते. Self-reflection केल्याने आपल्याला दोन महत्त्वाच्या गोष्टी जाणवतात:

  • आपण किती काही आधीच साध्य केले आहे, आणि
  • आपले आयुष्य किती अर्थपूर्ण आहे.

यामुळे "मी अजून काहीच केलं नाही" या नकारात्मक विचारांवर अंकुश बसतो. कधी कधी आपण ज्या गोष्टींना “सामान्य” समजतो जसे की शिक्षण, आरोग्य, मित्र, कुटुंब त्या इतरांसाठी दुर्मिळ असतात. Self-reflection हाच तो आरसा आहे जो आपल्याला आपल्या मूल्यांची आणि प्राप्तीची खरी ओळख करून देतो.

The unexamined life is not worth living.” Socrates

Appreciation आणि Awareness या दोन मानसिक वृत्ती जीवनातील समाधानाचा पाया मजबूत करतात. कृतज्ञतेने आपण “जे मिळाले आहे त्याचे मोल” ओळखतो, आणि जागरूकतेने “त्या अनुभवाची उपस्थिती” जगतो. जेव्हा आपण या दोन गोष्टींना आपल्या दैनंदिन जीवनात सवयीने रुजवतो. कृतज्ञता लेखन, mindfulness, डिजिटल विश्रांती, आणि आत्मचिंतनाच्या माध्यमातून, तेव्हा आपले मन तुलना आणि असंतोषाच्या चक्रातून मुक्त होऊन, शांत, समृद्ध आणि समाधानपूर्ण बनते.

Happiness is not about getting what you want; it’s about wanting what you have.”

समारोप:

किंमत खर्‍या अर्थाने आपल्या दृष्टिकोनात असते. जी गोष्ट आपल्याकडे आहे तिची किंमत कमी वाटणे ही मानवी प्रवृत्ती नैसर्गिक आहे, परंतु ती अपरिवर्तनीय नाही. जर आपण स्वतःमध्ये जागरूकता, कृतज्ञता आणि संतोष यांचा अभ्यास केला, तर आपल्याला जीवनातील साध्या गोष्टींचा सुद्धा अधिक आनंद आणि समाधान अनुभवता येऊ शकते. शेवटी, खरी संपत्ती वस्तूंमध्ये नसून, आपल्या मनाच्या समाधानाच्या जाणिवेत आहे. जेव्हा आपण आपल्याकडे असलेल्या गोष्टींची खरी किंमत ओळखतो, तेव्हा जीवन अधिक समृद्ध, सुखी आणि संतुलित बनते.

(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)

संदर्भ:

Aggarwal, P., Jun, S. Y., & Huh, J. H. (2011). Scarcity messages: A consumer competition perspective. Journal of Advertising, 40(3), 19–30.

Ambedkar, B. R. (1948). The Buddha and His Dhamma. Bombay: Siddharth College Publications.Seligman, M. E. P. (2002). Authentic Happiness: Using the New Positive Psychology to Realize Your Potential for Lasting Fulfillment. New York: Free Press.

Appel, H., Gerlach, A. L., & Crusius, J. (2016). The interplay between social comparison and Facebook use: A review. Current Opinion in Psychology, 9, 44–49.

Aron, A., Norman, C. C., Aron, E. N., McKenna, C., & Heyman, R. E. (2000). Couples’ shared participation in novel and arousing activities and experienced relationship quality. Journal of Personality and Social Psychology, 78(2), 273–284.

Brehm, J. W. (1966). A Theory of Psychological Reactance. New York: Academic Press.

Brickman, P., & Campbell, D. T. (1971). Hedonic relativism and planning the good society. In M. H. Appley (Ed.), Adaptation-level theory (pp. 287–302). Academic Press.

Brickman, P., Coates, D., & Janoff-Bulman, R. (1978). Lottery winners and accident victims: Is happiness relative? Journal of Personality and Social Psychology, 36(8), 917–927.

Cialdini, R. B. (1984). Influence: The Psychology of Persuasion. Harper Collins.

Davidson, R. J., & Kabat-Zinn, J. (2003). Alterations in brain and immune function produced by mindfulness meditation. Psychosomatic Medicine, 65(4), 564–570.

Easterlin, R. A. (1974). Does economic growth improve the human lot? In P. A. David & M. W. Reder (Eds.), Nations and households in economic growth (pp. 89–125). New York: Academic Press.

Emmons, R. A., & McCullough, M. E. (2003). Counting blessings versus burdens: An experimental investigation of gratitude and subjective well-being in daily life. Journal of Personality and Social Psychology, 84(2), 377–389.

Festinger, L. (1954). A Theory of Social Comparison Processes. Human Relations, 7(2), 117–140.

Kabat-Zinn, J. (1990). Full Catastrophe Living: Using the Wisdom of Your Body and Mind to Face Stress, Pain, and Illness. Delacorte.

Kahneman, D., & Tversky, A. (1979). Prospect Theory: An Analysis of Decision under Risk. Econometrica, 47(2), 263–291.

Kohut, H. (1971). The Analysis of the Self. New York: International Universities Press.

Lynn, M. (1991). Scarcity effects on value: A quantitative review of the commodity theory literature. Psychology & Marketing, 8(1), 43–57.

Lyubomirsky, S. (2011). Hedonic adaptation to positive and negative experiences. In S. Folkman (Ed.), The Oxford handbook of stress, health, and coping. Oxford University Press.

Maslow, A. H. (1943). A theory of human motivation. Psychological Review, 50(4), 370–396.

Przybylski, A. K., & Weinstein, N. (2017). Digital screen time limits and young people's psychological well-being: Evidence from a population-based study. Computers in Human Behavior, 76, 396–404.

Rankin, C. H., Abrams, T., Barry, R. J., Bhatnagar, S., Clayton, D. F., Colombo, J., ... & Thompson, R. F. (2009). Habituation revisited: An updated and revised description of the behavioral characteristics of habituation. Neurobiology of Learning and Memory, 92(2), 135–138.

Runciman, W. G. (1966). Relative Deprivation and Social Justice: A Study of Attitudes to Social Inequality in Twentieth-Century England. Routledge & Kegan Paul.

Schön, D. A. (1983). The Reflective Practitioner: How Professionals Think in Action. Basic Books.

Schultz, W. (2000). Multiple reward signals in the brain. Nature Reviews Neuroscience, 1(3), 199–207.

Seligman, M. E. P. (2002). Authentic Happiness. Free Press.

Sheldon, K. M., & Lyubomirsky, S. (2012). The challenge of staying happier: Testing the hedonic adaptation prevention model. Personality and Social Psychology Bulletin, 38(5), 670–680.

Smith, H. J., Pettigrew, T. F., Pippin, G. M., & Bialosiewicz, S. (2012). Relative deprivation: A theoretical and meta-analytic review. Personality and Social Psychology Review, 16(3), 203–232.

Stouffer, S. A., Suchman, E. A., DeVinney, L. C., Star, S. A., & Williams Jr., R. M. (1949). The American Soldier: Adjustment During Army Life. Princeton University Press.

Tang, Y. Y., Hölzel, B. K., & Posner, M. I. (2015). The neuroscience of mindfulness meditation. Nature Reviews Neuroscience, 16(4), 213–225.

Thompson, R. F., & Spencer, W. A. (1966). Habituation: A model phenomenon for the study of neuronal substrates of behavior. Psychological Review, 73(1), 16–43.

Vogel, E. A., Rose, J. P., Roberts, L. R., & Eckles, K. (2014). Social comparison, social media, and self-esteem. Psychology of Popular Media Culture, 3(4), 206–222.

Worchel, S., Lee, J., & Adewole, A. (1975). Effects of supply and demand on ratings of object value. Journal of Personality and Social Psychology, 32(5), 906–914.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments and suggestions

जे आहे त्याचे भान आणि जे नाही त्याची आस : Habituation, Scarcity Principle, Relative Deprivation, Hedonic Treadmill

  जे आहे त्याचे भान आणि जे नाही त्याची आस “जी गोष्ट आपल्याकडे आहे तिची किंमत नसते , पण जी मिळालेली नाही तिची किंमत अधिक वाटते” हे विधान के...