व्यक्तिमत्त्व
(Personality)
मानव
हा केवळ जैविक घटक नसून एक गुंतागुंतीचा, विचारशील आणि सामाजिक प्राणी आहे. त्याच्या वर्तनातील सातत्य, विचारप्रक्रियेतील स्थैर्य, आणि परिस्थितीप्रमाणे
प्रतिसाद देण्याची वैशिष्ट्यपूर्ण शैली या सर्वांवरून व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व
ओळखले जाते. व्यक्तिमत्व हे मानवी जीवनातील सर्वाधिक महत्त्वाचे मानसिक अंग आहे
कारण ते व्यक्तीच्या संपूर्ण वर्तनाला दिशा देणारे, त्याच्या
निर्णयक्षमतेवर आणि सामाजिक आंतरक्रियांवर परिणाम करणारे केंद्रबिंदू असते.
व्यक्तिमत्त्वाचे
स्वरूप स्थिर आणि गतिशील अशा दोन्ही गुणांनी युक्त असते. स्थिर म्हणजे व्यक्तीचे
विशिष्ट गुण (traits) दीर्घकाळ टिकून राहतात,
तर गतिशील म्हणजे व्यक्तिमत्त्व काळानुसार बदलत आणि विकसित होत
राहते (Allport, 1937). त्यामुळेच व्यक्तिमत्त्व हे “काय
आहे” यापेक्षा “कसे घडते आणि वर्तन कसे होते” हे स्पष्ट करणारी मानसशास्त्रीय
संकल्पना आहे. प्रत्येक व्यक्ती तिच्या अनुभवांच्या, भावनांच्या,
विचारांच्या आणि मूल्यांच्या अद्वितीय संगमामुळे इतरांपेक्षा वेगळी
ठरते.
उदाहरणार्थ, दोन व्यक्ती समान परिस्थितून आल्या असल्या तरी त्यांचा प्रतिसाद वेगळा
असतो, एकजण आव्हानाला आत्मविश्वासाने सामोरा जातो, तर दुसरा
चिंतेत बुडतो. या फरकाचे मूळ त्यांच्या व्यक्तिमत्त्वात असते. म्हणूनच, व्यक्तिमत्त्व समजून घेणे म्हणजे मानवी वर्तनाचा गाभा समजून घेणे होय.
व्यक्तिमत्त्वाची
व्याख्या
"Personality"
हा शब्द लॅटिन भाषेतील Persona या शब्दापासून
आला आहे. Persona म्हणजे “मुखवटा” प्राचीन ग्रीक आणि रोमन
नाट्यकलेमध्ये कलाकार वेगवेगळ्या भूमिकांसाठी मुखवटे वापरत असत. या शब्दाचा
तात्पर्य नंतर “व्यक्ती समाजात कोणत्या प्रकारे स्वतःला सादर करते” यापर्यंत
विस्तारला (Ewen, 2010). हळूहळू मानसशास्त्रात या संकल्पनेचा
अर्थ केवळ बाह्य वर्तनापुरता मर्यादित न राहता अंतर्गत मानसिक आणि भावनिक
प्रक्रियांपर्यंत पोहोचला.
व्यक्तिमत्त्व म्हणजे व्यक्तीच्या अंतर्गत व बाह्य गुणांचा असा समुच्चय जो तिच्या विशिष्ट वर्तनाला आकार देतो. Gordon Allport (1937) यांनी व्यक्तिमत्त्वाची सर्वाधिक प्रभावी आणि शास्त्रीय व्याख्या दिली. त्यांच्या मते, “Personality is the dynamic organization within the individual of those psychophysical systems that determine his unique adjustment to his environment.”
या
व्याख्येनुसार व्यक्तिमत्त्व हे मनो-शारीरिक प्रणालींचे एक गतिशील संयोजन आहे, जे व्यक्तीच्या वातावरणाशी जुळवून घेण्याच्या पद्धतीला दिशा देते. Psychophysical
systems म्हणजे व्यक्तीच्या मनोवृत्ती आणि शारीरिक रचनांमधील परस्पर
संबंध. त्यामुळे व्यक्तिमत्त्व हे केवळ मानसिक संकल्पना नसून त्यात जैविक
घटकांचाही सहभाग असतो. Allport यांच्या या व्याख्येत “dynamic
organization” हा शब्द महत्त्वाचा आहे, कारण
तो व्यक्तिमत्त्वाच्या बदलत्या, विकसित होणाऱ्या स्वरूपाकडे
लक्ष वेधतो.
Hans J. Eysenck (1971) यांनी व्यक्तिमत्त्वाच्या स्थैर्य आणि वैज्ञानिक मोजमापावर भर दिला. त्यांच्या मते, “Personality is the more or less stable and enduring organization of a person’s character, temperament, intellect, and physique which determines his unique adjustment to the environment.”
Eysenck
यांच्या मते व्यक्तिमत्त्व चार प्रमुख घटकांनी बनते character
(नैतिकता व मूल्यव्यवस्था), temperament (भावनिक
प्रतिसादाची शैली), intellect (बुद्धिमत्ता) आणि physique
(शारीरिक रचना). हे सर्व घटक एकत्रितपणे व्यक्तीच्या वर्तनाची
सुसंगतता निर्माण करतात. त्यांच्या दृष्टीने व्यक्तिमत्त्व हे stable yet
adaptable म्हणजेच स्थिर पण वातावरणानुसार बदलणारे असते. Eysenck
यांनी व्यक्तिमत्त्वाचे scientific measurement करण्यासाठी factor analysis या सांख्यिकीय पद्धतीचा
वापर केला आणि तीन प्रमुख परिमाणे (Extraversion, Neuroticism,
Psychoticism) प्रस्तावित केली.
या
व्याख्येचा महत्त्वाचा पैलू म्हणजे व्यक्तिमत्त्वाच्या मापनक्षम स्वरूपावर भर,
म्हणजेच व्यक्तिमत्त्व केवळ वर्णनात्मक संकल्पना नसून वैज्ञानिकरीत्या अभ्यासता
येणारे घटकांचे संयोजन आहे.
Raymond
B. Cattell (1950) यांनी व्यक्तिमत्त्वाचे वर्णन अत्यंत कार्यात्मक
(functional) दृष्टिकोनातून केले. त्यांच्या मते “Personality
is that which permits a prediction of what a person will do in a given
situation.”
Cattell
यांच्या दृष्टीने व्यक्तिमत्त्व हे “वर्तनाचे भाकीत करता येईल असे
काहीतरी” आहे. म्हणजेच, व्यक्तिमत्त्व समजून घेण्याचा खरा
हेतू म्हणजे व्यक्ती विशिष्ट परिस्थितीत कसे वागेल याचा अंदाज घेणे. त्यांनी
व्यक्तिमत्त्वाचा अभ्यास empirical approach द्वारे केला आणि
16 Personality Factors (16 PF) या
चाचणीचा विकास केला. त्यांच्या मतानुसार व्यक्तिमत्त्वाच्या संरचनेत “surface
traits” (वरवर दिसणारे गुण) आणि “source traits” (गाभ्यातील स्थिर गुण) असे दोन स्तर असतात.
Cattell
यांच्या दृष्टिकोनातून व्यक्तिमत्त्व म्हणजे सतत निरीक्षण, मोजमाप आणि विश्लेषण करण्यायोग्य अशी सुसंगत प्रणाली आहे. त्यामुळे
त्यांनी मानसशास्त्रात व्यक्तिमत्त्व संशोधनासाठी factor analytic
tradition दृढ केली, जी आजही आधुनिक trait
psychology मध्ये वापरली जाते (Chamorro-Premuzic, 2011).
वरील
तिन्ही व्याख्यांमधून व्यक्तिमत्त्वाच्या तीन वेगवेगळ्या परंतु परस्परपूरक
दृष्टिकोनांचा परिचय मिळतो.
- Allport यांनी व्यक्तिमत्त्वाचे “अंतर्गत संघटन” आणि “गतिशीलता” अधोरेखित केली.
- Eysenck यांनी व्यक्तिमत्त्वाचे “स्थैर्य” आणि “वैज्ञानिक मापन” यावर भर दिला.
- Cattell यांनी व्यक्तिमत्त्वाच्या “भाकीत क्षमते” कडे लक्ष वेधले.
या सर्वांमुळे व्यक्तिमत्त्व ही केवळ
गुणांची यादी नसून मानसिक, जैविक आणि सामाजिक घटकांच्या
परस्परसंवादातून घडणारी एक जटिल प्रक्रिया असल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे
व्यक्तिमत्त्वाच्या अभ्यासात जैविक, बोधनिक, भावनिक आणि सामाजिक परिमाणांचा समतोल विचार आवश्यक ठरतो.
व्यक्तिमत्त्वाचे घटक (Factors
of Personality)
व्यक्तिमत्त्व ही एक स्थिर, पण गतिशील अशी
मानसिक आणि वर्तनात्मक रचना आहे, जी व्यक्तीच्या जीवनातील विविध अनुभव, शारीरिक घटक, भावनिक संतुलन, सामाजिक
परिस्थिती, आणि नैतिक मूल्ये यांच्या परस्परसंबंधातून घडते.
मानसशास्त्रज्ञांच्या मते, व्यक्तिमत्त्व हे एका घटकावर अवलंबून
नसून, विविध अंतर्गत आणि बाह्य घटकांच्या सजीव समन्वयातून तयार होते (Allport,
1937;
Eysenck, 1971). खाली व्यक्तिमत्त्वावर प्रभाव टाकणाऱ्या प्रमुख घटकांचा
सविस्तर आढावा घेतलेला आहे.
1. शारीरिक घटक (Physical
Factors)
व्यक्तिमत्त्वाचा पाया शारीरिक
घटकांवर मोठ्या प्रमाणात अवलंबून असतो. व्यक्तीची शरीररचना, उंची, वजन, त्वचेचा रंग, चेहऱ्यावरील
भाव, आवाजाची पट्टी, आरोग्यस्थिती, आणि शारीरिक
आकर्षकता हे घटक तिच्या सामाजिक परस्परसंवादावर परिणाम घडवतात (Sheldon,
1940).
उदाहरणार्थ, उंच आणि आत्मविश्वासपूर्ण दिसणाऱ्या व्यक्तीकडे
लोक सहसा अधिक विश्वासाने पाहतात, तर अशक्त किंवा अस्वस्थ दिसणाऱ्या
व्यक्तीबद्दल सामाजिक प्रतिसाद कमी उत्साही असू शकतो.
William
Sheldon (1940) यांनी शरीरप्रकारानुसार व्यक्तिमत्त्वाचे तीन प्रकार मांडले, Ectomorph
(सडपातळ
व विचारशील), Mesomorph (मजबूत व आत्मविश्वासी) आणि Endomorph
(गोलाकार
व समाजशील). हे वर्गीकरण शरीररचना आणि वर्तनातील संबंध दाखवते. त्याचप्रमाणे,
Kretschmer (1925) यांनीही शरीरप्रकार आणि मानसिक विकृती यांचा संबंध शोधण्याचा
प्रयत्न केला होता. या सिद्धांतांवर नंतर टीका झाली असली तरी, त्यांनी
शारीरिक घटकांचा व्यक्तिमत्त्वावर होणारा प्रभाव अधोरेखित केला (Hall
& Lindzey, 1985).
शारीरिक घटक हे व्यक्तीच्या स्व-संकल्पना
आणि स्व-प्रतिमेवर देखील परिणाम करतात. शारीरिक आकर्षकता किंवा आरोग्याविषयीची
सकारात्मक धारणा आत्मविश्वास वाढवते, ज्यामुळे
सामाजिक परस्परसंवाद अधिक प्रभावी होतो (Feingold, 1992).
2. बौद्धिक घटक (Intellectual
Factors)
व्यक्तिमत्त्वाचे दुसरे महत्त्वाचे
अंग म्हणजे बौद्धिक घटक, म्हणजेच व्यक्तीची विचारशक्ती, समस्या
सोडविण्याची क्षमता, आणि तर्कशुद्ध निर्णय घेण्याची
प्रवृत्ती. Binet आणि Simon (1905) यांनी
बुद्धिमत्तेचे मापन करण्यासाठी प्रथम बुद्धिमत्ता चाचणी तयार केली आणि त्यातून
स्पष्ट झाले की बौद्धिक क्षमतांचा वर्तनावर आणि व्यक्तिमत्त्वाच्या अभिव्यक्तीवर
प्रभाव पडतो.
बुद्धिमान व्यक्ती परिस्थितींचे
विश्लेषण अधिक प्रभावीपणे करते, त्यामुळे तिचा भावनिक प्रतिसादही
संतुलित असतो. Piaget (1952) यांनी सांगितल्याप्रमाणे, बोधात्मक विकास हा विचार आणि निर्णय प्रक्रियेचा पाया आहे, जो व्यक्तीच्या
व्यक्तिमत्त्वाला दिशा देतो. उदाहरणार्थ,
Conscientiousness हा “Big Five” मॉडेलमधील एक गुण आहे, जो बुद्धिमत्ता, नियोजनशक्ती, आणि स्व-नियंत्रणाशी
निगडित आहे (Costa & McCrae, 1992).
याशिवाय, बौद्धिक घटक
केवळ शैक्षणिक ज्ञानापुरते मर्यादित नसतात. Gardner (1983) यांनी “Multiple
Intelligences” सिद्धांत मांडला, ज्यात भाषिक, सामाजिक, भावनिक आणि
कलात्मक बुद्धिमत्ता व्यक्तिमत्त्वाच्या जडण-घडणीत समान महत्त्वाचे असल्याचे नमूद
केले. त्यामुळे व्यक्तीचे व्यक्तिमत्त्व हे तिच्या बौद्धिक विविधतेचे एक प्रतिबिंब
असते.
3. भावनिक घटक (Emotional
Factors)
भावना म्हणजे व्यक्तीच्या
अंतःप्रेरणांना बाह्य जगाशी जोडणारा पूल. Goleman (1995) यांच्या
मते, भावनिक बुद्धिमत्ता हा
व्यक्तिमत्त्वाचा गाभा आहे. व्यक्ती स्वतःच्या आणि इतरांच्या भावनांना ओळखून
त्यांचे नियमन करू शकते का, यावर तिच्या सामाजिक आणि व्यावसायिक
यशाचे प्रमाण ठरते.
फ्रॉईडच्या Psychoanalytic
Theory नुसार, व्यक्तिमत्त्वातील अनेक संघर्ष
अवचेतन भावनांमधून निर्माण होतात. जर या भावनांचे नियमन योग्य प्रकारे झाले नाही, तर व्यक्ती
चिडचिड, भीती, असुरक्षितता अशा भावनिक अस्थैर्याचा
अनुभव घेते (Freud, 1923). उलट, भावनिक संतुलन
असलेली व्यक्ती आत्मविश्वासपूर्ण आणि सहनशील असते.
Schachter
आणि Singer
(1962)
यांच्या “Two-Factor Theory of Emotion” नुसार, भावनिक अनुभवात
शारीरिक जागृती (arousal) आणि बोधात्मक व्याख्या (cognitive
labeling) दोन्ही घटक महत्त्वाचे असतात. त्यामुळे भावनिक परिपक्वता म्हणजे केवळ
भावना दाबून ठेवणे नव्हे, तर त्यांचा योग्य उपयोग आणि
अभिव्यक्ती करणे. भावनांचे नियंत्रण, सहानुभूती, आणि सामाजिक
संवेदनशीलता हे सर्व घटक एकत्र येऊन व्यक्तिमत्त्वाच्या भावनिक अंगाला घडवतात (Salovey
& Mayer, 1990).
4. सामाजिक घटक (Social Factors)
मानव हा सामाजिक प्राणी आहे.
त्यामुळे व्यक्तिमत्त्वाच्या विकासात सामाजिक घटकांची भूमिका अत्यंत मूलभूत आहे.
व्यक्ती जन्मतः समाजात प्रवेश करते आणि तिची ओळख, वर्तन, व मूल्ये या
सर्व गोष्टी सामाजिक प्रक्रियेतून आकार घेतात (Mead, 1934).
कुटुंब हे व्यक्तिमत्त्वाचे पहिले
शाळा मानले जाते. पालकांचा दृष्टिकोन, संगोपन पद्धती, आणि सामाजिक
संस्कार व्यक्तीच्या वर्तनशैलीवर दीर्घकालीन प्रभाव टाकतात (Baumrind,
1967).
उदाहरणार्थ, authoritative पालकत्वामुळे आत्मविश्वासी आणि
जबाबदार मुलं घडतात, तर authoritarian पालकत्वामुळे
दबलेले किंवा बंडखोर वर्तन दिसू शकते.
याशिवाय, शाळा, मित्रपरिवार, आणि माध्यमं (Media)
हे देखील
व्यक्तिमत्त्वास आकार देणारे घटक आहेत. Bandura
(1977)
यांच्या “Social Learning Theory” नुसार, व्यक्ती
इतरांच्या वर्तनाचे अनुकरण करून शिकते.
त्यामुळे समाजातील आदर्श, मूल्ये आणि प्रचलित विचारसरणी
व्यक्तिमत्त्वाच्या जडण-घडणीत निर्णायक भूमिका बजावतात. सामाजिक स्तर, संस्कृती, भाषा, धर्म आणि
लिंगभेद या घटकांचाही परिणाम व्यक्तिमत्त्वावर होतो. उदाहरणार्थ, सामूहिक
संस्कृतीतील व्यक्ती अधिक सहकार्यशील असते, तर वैयक्तिक
संस्कृतीतील व्यक्ती आत्मनिर्भरतेला प्राधान्य देते.
5. नैतिक व मूल्याधिष्ठित घटक (Moral
and Value Factors)
व्यक्तिमत्त्वाचा शेवटचा आणि
सर्वाधिक अंतर्गत घटक म्हणजे नैतिक व मूल्याधिष्ठित घटक. हे घटक व्यक्तीच्या
वर्तनामागील नैतिक दृष्टीकोन, सदसद्विवेकबुद्धी, आणि जीवनातील
तत्त्वज्ञान ठरवतात (Kohlberg, 1976).
Lawrence
Kohlberg यांनी नैतिक विकासाच्या सहा पायऱ्यांचा सिद्धांत मांडला, ज्यामध्ये
व्यक्ती स्वार्थातून समाजाभिमुख आणि अखेरीस तत्त्वनिष्ठ वर्तनाकडे प्रगती करते.
मूल्याधिष्ठित व्यक्तिमत्त्व म्हणजे केवळ बाह्य नियमांचे पालन नव्हे, तर अंतःकरणातून
प्रामाणिकपणे वागण्याची प्रवृत्ती (Rokeach, 1973).
Carl
Rogers (1961) यांच्या मते, व्यक्तिमत्त्वातील सुसंवाद (Congruence)
म्हणजेच बाह्य
वर्तन आणि अंतर्गत मूल्यांतील सुसंगती. जर व्यक्तीचे वर्तन तिच्या मूल्यांशी
सुसंगत असेल, तर ती आत्मसंतुष्ट आणि मानसिकदृष्ट्या स्वस्थ
राहते. धार्मिक श्रद्धा, सामाजिक मूल्ये, आणि जीवनातील
उद्दिष्टे हे घटक व्यक्तीच्या निर्णयक्षमतेला दिशा देतात. त्यामुळे नैतिकतेशिवाय
व्यक्तिमत्त्व अपूर्ण राहते, कारण तीच व्यक्तीच्या “मानवीत्वाचा”
पाया असते.
शारीरिक, बौद्धिक, भावनिक, सामाजिक आणि
नैतिक हे वरील सर्व घटक परस्परावलंबी आहेत. व्यक्तिमत्त्व ही स्थिर रचना नसून सतत
विकसित होणारी प्रक्रिया आहे. एका घटकातील बदल इतर घटकांवर परिणाम करतो.
उदाहरणार्थ, शारीरिक आजारामुळे भावनिक संतुलन ढळू शकते, किंवा सामाजिक
प्रोत्साहनामुळे आत्मविश्वास वाढू शकतो. म्हणूनच, व्यक्तिमत्त्व
समजण्यासाठी सर्व घटकांचा एकत्र विचार आवश्यक आहे.
व्यक्तिमत्त्वाचे प्रकार (Types
of Personality) (यावरील स्वतंत्र लेख पहा)
मानसशास्त्रात व्यक्तिमत्त्वाचे अनेक वर्गीकरण
आढळतात:
1. हिप्पोक्रेटिसचे शारीरिक वर्गीकरण (Physiological
Classification):
- Sanguine – रक्तप्रधान (आशावादी, आनंदी व उत्साही)
- Choleric – पित्तप्रधान (शिघ्रकोपी, उतावळा व उत्तेजनशील)
- Phlegmatic – कफत्तप्रधान (सुस्त, निरुत्साही व आळशी)
- Melancholic – वातप्रधान (अस्वस्थ, उदास व अंतर्मुख)
2. युंगचे वर्गीकरण (Carl
Jung’s Typology):
- Introvert (अंतर्मुख) — स्वतःच्या विचारविश्वात रमणारा.
- Extrovert (बहिर्मुख) — सामाजिक, खुल्या मनाचा, बाह्यजगाशी जोडलेला.
- Ambivert (अंतरमुख-बहिर्मुख मिश्र प्रकार) — दोन्ही गुण असलेला संतुलित व्यक्ती.
3. Allport चे व्यक्तिमत्व गुणविशेषाचे मुलभूत प्रवर्ग (Traits):
- Cardinal (प्रधान- व्यक्तिमत्त्वाचा एकच गुण)
- Central (केंद्रीय – 5 त 10 केंद्रिय गुणविशेष)
- Secondary (दुय्यम – कमी प्रभावी गुणविशेष)
4. Eysenck
चे तीन परिमाण
(Dimensions):
- Extraversion vs. Introversion
- Neuroticism vs. Stability
- Psychoticism
5. The
Big Five Model (Costa & McCrae, 1992):
आधुनिक मानसशास्त्रात
व्यक्तिमत्त्वाचे सर्वाधिक स्वीकारलेले मॉडेल म्हणजे “Big
Five Model.” यात पाच प्रमुख गुणांचा समावेश आहे:
- Openness to Experience (मुक्त मनोवृत्ती)
- Conscientiousness (जबाबदारी व शिस्त)
- Extraversion (बहिर्मुखता)
- Agreeableness (सहकार्यशीलता)
- Neuroticism (भावनिक अस्थैर्य)
व्यक्तिमत्त्वाचे सिद्धांत
- मनोविश्लेषणात्मक सिद्धांत (Psychoanalytic Theory – Sigmund Freud): फ्रॉईड यांच्या मते व्यक्तिमत्त्व तीन घटकांपासून बनलेले असते — Id (आवेग), Ego (वास्तवता), आणि Superego (नैतिकता). अबोध मनातील संघर्ष व्यक्तिमत्त्वावर परिणाम करतो.
- गुणसिद्धांत (Trait Theory – Allport, Cattell, Eysenck): या सिद्धांतानुसार व्यक्तिमत्त्व म्हणजे काही स्थिर गुणांचा संच. उदा., Allport यांनी 4500 गुणांचा उल्लेख केला होता.
- मानवतावादी सिद्धांत (Humanistic Theory – Maslow, Rogers): या दृष्टीने व्यक्तिमत्त्व म्हणजे आत्म-वास्तविकीकरणाचा (Self-Actualization) प्रवास. प्रत्येक व्यक्तीमध्ये वाढ आणि प्रगतीची नैसर्गिक प्रेरणा असते.
समारोप:
संतुलित व्यक्तिमत्त्व म्हणजे मानसिक
आरोग्याचे द्योतक आहे. भावनांचे योग्य व्यवस्थापन, सामाजिक
संबंधातील सुसंवाद, स्व-जागरूकता आणि स्व-आदर या
सर्वांचा परिणाम मानसिक आरोग्यावर होतो. Freud म्हणतात,
“Healthy person is one who can love and work.” व्यक्तिमत्त्व हे
मानवी अस्तित्वाचा गाभा आहे. ती जन्मजात घटकांवरच नव्हे तर जीवनानुभव, शिक्षण आणि स्व-परिवर्तनावर
आधारित असते. सकारात्मक व्यक्तिमत्त्व घडवण्यासाठी आत्मपरिक्षण, भावनिक संतुलन, समाजाशी
सुसंवाद आणि सतत शिकण्याची वृत्ती आवश्यक आहे. व्यक्तिमत्त्व हा स्थिर घटक नसून तो
सतत विकसित होणारा, बदलणारा आणि विकसित होण्याचा प्रवास
आहे.
![]() |
| (सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार) |
संदर्भ:
Allport,
G. W. (1937). Personality: A Psychological Interpretation.
Yale University Press.
Bandura,
A. (1977). Social Learning Theory. Prentice Hall.
Baumrind,
D. (1967). Child care practices anteceding three patterns
of preschool behavior. Genetic Psychology Monographs, 75(1),
43–88.
Cattell,
R. B. (1950). Personality: A Systematic Theoretical and
Factual Study. New York: McGraw-Hill.
Chamorro-Premuzic,
T. (2011). Personality and Individual Differences. Oxford:
Wiley-Blackwell.
Costa,
P. T., & McCrae, R. R. (1992). NEO PI-R Professional
Manual. Psychological Assessment Resources.
Ewen,
R. B. (2010). An Introduction to Theories of Personality (7th ed.). New York: Psychology Press.
Eysenck,
H. J. (1971). Readings in Extraversion and Introversion.
London: Staples Press.
Feingold,
A. (1992). Good-looking people are not what we think.
Psychological Bulletin, 111(2), 304–341.
Freud,
S. (1923). The Ego and the Id.
Goleman,
D. (1995). Emotional Intelligence. Bantam Books.
Hall,
C. S., & Lindzey, G. (1985). Theories of Personality.
Wiley.
Kohlberg,
L. (1976). Moral stages and moralization: The
cognitive-developmental approach.
Maslow,
A. H. (1954). Motivation and Personality.
Mead,
G. H. (1934). Mind, Self, and Society. University of
Chicago Press.
Pervin,
L. A., & John, O. P. (2001). Personality: Theory and
Research. New York: John Wiley & Sons.
Rogers,
C. (1961). On Becoming a Person. Houghton Mifflin.
Rokeach,
M. (1973). The Nature of Human Values. Free Press.
Salovey,
P., & Mayer, J. D. (1990). Emotional intelligence.
Imagination, Cognition and Personality, 9(3), 185–211.
Sheldon,
W. H. (1940). The Varieties of Human Physique. Harper

कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thank you for your comments and suggestions