माइंडफुलनेस: सजगपणे
जगण्याची क्षमता | Mindfulness
एका शहरात सागर आणि प्रीती
कुटुंबापासून दूर दोघेच रहात होते. त्यांना पाच वर्षाचा रोहन नावाचा मुलगा होता.
दोघेही कामावर जात असल्याने तो गुंतून राहावा म्हणून त्याला मोबाईल दिलेला होता.
रोहन कोणतीही गोष्ट करायची असेल तर मोबाईलशिवाय करू शकत नव्हता. प्रत्येक
गोष्टीसाठी त्याला मोबाईल लागायचा, जेवण करताना तर पहिली अटच ती असायची. त्याचे
आई-वडील सांगतात की मोबाईल दिल्याशिवाय तो जेवतच नाही.........
आज जवळपास सर्वच घरात वरील प्रसंग
घडताना दिसत असेल. मुले काय खात आहेत, पीत आहेत याचे भानच राहिलेले
नाही. हे भान किंवा अस्तित्वाची जाणीव असणे म्हणजे काय तर माइंडफुलनेस किंवा सजगता
होय. आपण माइंडफुलनेस ही एक मूलभूत मानवी क्षमता म्हणू शकतो, मानवाला कोणत्याही प्रसंगी पूर्णपणे सचेतन राहण्याची, जागरूक
राहण्याची, मन शांत ठेवून सारासार विचार करण्याची, आपण कोठे आहोत आणि आपण नेमकं काय करीत आहोत याची निष्पक्षपणे जाणीव असणे
होय.
थोडक्यात सांगायचे झाले तर
माइंडफुलनेस म्हणजे सद्य स्थितीत जगणे होय, दोन श्वासामधील जगणं होय. काही लोक
आपल्या भूतकाळात जगतात, तर काही लोक
आपल्या भविष्यकाळात विहार करत असतात. परंतु आपल्याला जर आनंदी राहायचे असेल तर आपण
वर्तमानात जगले पाहिजे आणि सद्य स्थितीतला क्षण जगता आला पाहिजे. आपणास जर कायमस्वरूपी
आनंदी राहायचे असेल तर आपण माइंडफुलनेसच्या मदतीने आनंदी राहू शकतो. काही लोकांचा
स्वभावच असा असतो की, ते तुरूंगामध्ये
जरी असले तरी तिथे आनंदी असतात आणि काहींचा स्वभाव असा असतो की त्यांना राज
महालात जरी ठेवले तरी ते कायम दुखी असतात.
माइंडफुलनेस
हा नेहमी आनंदी राहण्याचा एक राजमार्ग आहे. आपण विचार करत असाल की हे काय आणि कसे असते? खरं तर माइंडफुलनेस ही एक अशी पद्धत आहे, ज्याद्वारे
आपण आपल्या आत, आपल्या आजूबाजूला घडणाऱ्या घटना किंवा
परिस्थितींबद्दल जागरूकता निर्माण करतो. हे एक प्रकारचे ध्यानच आहे, फरक एवढाच आहे
की, एका विशिष्ट वेळी स्वतंत्रपणे लक्ष केंद्रित करण्याचा
प्रयत्न करण्याऐवजी, माइंडफुलनेसमध्ये, आपण आपले लक्ष त्या क्षणावर केंद्रित केले पाहिजे, आपण
जिथे आहोत, त्याच स्थितीत तो क्षण अनुभवणे आणि जगणे आवश्यक
आहे.
असे मानले जाते की माइंडफुलनेस
तंत्राच्या नियमित सरावाने आपण आनंदी राहू शकतो. वास्तविक, याद्वारे आपण
वर्तमान क्षणाशी जोडतो आणि परिस्थिती आहे तशी स्वीकारतो. आपण परिस्थिती बदलू शकत
नाही पण आपण आपली प्रतिक्रिया नक्कीच बदलू शकतो आणि परिस्थितीकडे बघण्याचा आपला दृष्टिकोनही
बदलू शकतो. यामुळे आपण हळूहळू प्रत्येक परिस्थिती स्वीकारायला आणि त्यात आनंदी
राहायला शिकतो. कारण आपण त्याची निवड केलेली असते “मी आनंदी आहे कारण मी आनंदी
राहण्याची निवड केलेली आहे”.