नशा मुक्त अभियान: व्यसन (Addiction)
मानवी जीवनात "आवड" आणि "सवय" या दोन गोष्टी सामान्य मानल्या जातात. प्रत्येक व्यक्तीला काहीतरी गोष्टी करणे, पाहणे किंवा अनुभवणे आवडते; काहीतरी रोज करण्याची सवय लागते. परंतु जेव्हा ही सवय किंवा आवड अतिरेकी प्रमाणात आणि वारंवार केलेली व्यक्तीच्या दैनंदिन जीवनावर, शारीरिक व मानसिक आरोग्यावर तसेच नातेसंबंधांवर गंभीर परिणाम घडवू लागते, तेव्हा त्याला व्यसन असे म्हणतात (Koob & Le Moal, 2006). व्यसन ही फक्त वैयक्तिक समस्या नसून सामाजिक, कौटुंबिक आणि राष्ट्रीय स्तरावरही गंभीर परिणाम घडवणारी समस्या आहे. उदाहरणार्थ, दारू किंवा ड्रग्जच्या व्यसनामुळे केवळ शरीरावर परिणाम होत नाही तर व्यक्तीचा सामाजिक सहभाग, आर्थिक परिस्थिती, कौटुंबिक नाती आणि व्यावसायिक जीवन देखील बाधित होते.
व्यसनामुळे निर्माण होणारा सामाजिक परिणाम समाजाच्या विकासात अडथळा निर्माण करतो. अनेकदा व्यसनाधीन व्यक्ती अपराध, हिंसा, अपंगत्व आणि कुटुंबातील कलह यासारख्या समस्यांमध्ये अडकते, ज्यामुळे समाजातील सामान्य जीवनमानावर परिणाम होतो. म्हणूनच व्यसनाची समस्या वैयक्तिक न पाहता त्याचा सामाजिक आणि मानसिक दृष्टिकोनातून अभ्यास करणे गरजेचे आहे.