अब्राहम
मॅस्लो (Abraham Maslow): मानवी
क्षमतेवर विश्वास ठेवणारा मानसशास्त्रज्ञ

(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)
20व्या
शतकातील मानसशास्त्र प्रामुख्याने दोन प्रवाहांनी व्यापलेले होते सिग्मंड फ्रायड यांच्या
मनोविश्लेषणात्मक दृष्टिकोनाने मानवी वर्तनातील अचेतन प्रेरणांवर भर दिला; तर जॉन वॅटसन आणि बी. एफ. स्किनर यांच्या वर्तनवादाने निरीक्षणयोग्य वर्तन
आणि उद्दीपक-प्रतिसाद यावर भर दिला. या दोन्ही दृष्टिकोनांमध्ये मानवी जीवनातील
सर्जनशीलता, अर्थशोध, मूल्ये आणि
आत्मविकास या पैलूंना तुलनेने कमी स्थान मिळाले.
याच पार्श्वभूमीवर अब्राहम मॅस्लो यांनी मानसशास्त्राला एक सकारात्मक, आशावादी आणि मानवी क्षमतेवर विश्वास ठेवणारा दृष्टिकोन दिला. त्यांच्या 1943 मधील “A Theory of Human Motivation” या लेखात त्यांनी गरजांची अधिश्रेणी मांडली (Maslow, 1943). पुढे Motivation and Personality (1954) या ग्रंथात त्यांनी या सिद्धांताचे सविस्तर स्पष्टीकरण केले. मॅस्लो यांच्या मते, मानसशास्त्राने केवळ मानसिक आजारांचा अभ्यास न करता “सर्वोत्तम आणि निरोगी व्यक्तिमत्त्व” यांचाही अभ्यास करणे आवश्यक आहे (Maslow, 1954). यामुळेच त्यांना मानवतावादी मानसशास्त्राचा प्रमुख प्रवर्तक मानले जाते.
बालपण
आणि संघर्ष
अब्राहम
मॅस्लो यांचा जन्म 1 एप्रिल 1908 रोजी न्यूयॉर्क, अमेरिका येथे झाला. त्यांचे आई-वडील रशियन ज्यू स्थलांतरित होते. ते सात
भावंडांमध्ये सर्वात मोठे होते. कुटुंब आर्थिकदृष्ट्या स्थिर असले तरी भावनिक
वातावरण कठोर आणि शिस्तबद्ध होते (Hoffman, 1988).
मॅस्लो
यांनी त्यांच्या काही आत्मचरित्रात्मक टिपणांमध्ये आईबरोबरचे नाते तणावपूर्ण
असल्याचे नमूद केले आहे. त्यांना बालपणी भावनिक जिव्हाळा आणि स्वीकार कमी प्रमाणात
मिळाल्याची जाणीव होती. या अनुभवामुळे ते लहानपणी एकाकी, अंतर्मुख आणि पुस्तकप्रिय झाले. त्यांनी स्वतः नमूद केले आहे की वाचन हेच
त्यांचे आश्रयस्थान होते (Maslow, 1968). या एकाकीपणाने
त्यांच्या मनात एक मूलभूत प्रश्न निर्माण केला की “मनुष्य आनंदी, अर्थपूर्ण आणि परिपूर्ण जीवन कसे जगू शकतो?”
हीच
जिज्ञासा पुढे त्यांच्या संशोधनाची प्रेरणा ठरली. मानसशास्त्रातील बहुतेक सिद्धांत
मानवी दुर्बलता, भीती किंवा विकृती यांवर लक्ष
केंद्रित करत होते; परंतु मॅस्लो यांनी मानवी सामर्थ्य,
मूल्ये आणि उच्च अनुभव यांचा शोध घेण्याचा निर्धार केला (Maslow,
1964).
शिक्षण
आणि बौद्धिक प्रवास
मॅस्लो
यांनी सुरुवातीला सिटी कॉलेज ऑफ न्यूयॉर्क येथे कायद्याचे शिक्षण घेण्यास सुरुवात
केली; परंतु त्यांना त्या क्षेत्रात रस वाटला नाही. पुढे
त्यांनी विस्कॉन्सिन विद्यापीठात प्रवेश घेतला आणि मानसशास्त्र विषयात पदवी व
पीएच.डी. पूर्ण केली. त्यांच्या डॉक्टरेट संशोधनाचा विषय प्रायोगिक मानसशास्त्राशी
संबंधित होता आणि त्यांच्यावर त्या काळातील वर्तनवादाचा प्रभाव होता (Hergenhahn
& Henley, 2014).
विस्कॉन्सिनमध्ये
त्यांच्यावर प्रामुख्याने प्रयोगात्मक संशोधनाची परंपरा आणि वर्तनवादी
दृष्टिकोनाचा प्रभाव पडला. जॉन वॅटसन आणि बी. एफ. स्किनर यांच्या विचारांनुसार
वर्तन हे पर्यावरणीय उत्तेजनांना दिलेली प्रतिक्रिया आहे. तथापि, मॅस्लो यांना लवकरच जाणवले की मानवाला केवळ “उत्तेजन-प्रतिक्रिया यंत्रणा”
म्हणून पाहणे अपूर्ण आहे.
न्यूयॉर्कमध्ये
परतल्यानंतर त्यांचा संपर्क गेस्टाल्ट मानसशास्त्रज्ञ आणि सामाजिक विचारवंतांशी
आला. विशेषतः Kurt Goldstein यांच्या ‘self-actualization’
या संकल्पनेचा त्यांच्यावर प्रभाव पडला. गोल्डस्टीन यांच्या मते,
प्रत्येक सजीव आपल्या अंतर्गत क्षमतेच्या पूर्णत्वाकडे प्रवास करतो.
ही कल्पना मॅस्लो यांच्या पुढील सिद्धांताची बीज ठरली (Goldstein, 1939/1995). तसेच, न्यूयॉर्कमधील बौद्धिक वातावरणात
त्यांना आल्फ्रेड अॅडलर आणि एरिच फ्रॉम यांसारख्या विचारवंतांचे मानवकेंद्री विचार
समजले. यामुळे त्यांची दृष्टी वर्तनवादाच्या मर्यादांपलीकडे जाऊन मानवी मूल्ये,
स्वातंत्र्य आणि सर्जनशीलता यांकडे वळली.
मॅस्लो
यांनी पुढे स्पष्ट केले की, “मानव केवळ
प्रवृत्तींच्या किंवा पर्यावरणाच्या बंधनात अडकलेला नाही; तो
अर्थ शोधणारा, निवड करणारा आणि स्वतःच्या क्षमतेचा शोध
घेणारा सर्जनशील प्राणी आहे.” याच विचारातून पुढे मानवतावादी मानसशास्त्राची
पायाभरणी झाली, मनोविश्लेषण आणि वर्तनवाद यांच्या पलीकडील एक
सकारात्मक, मूल्यकेंद्री दृष्टिकोन ज्याला “तिसरी शक्ती” (Third
Force) असेही संबोधले जाते (Goble, 1970).
गरजांची अधिश्रेणी (Hierarchy
of Needs) – एक क्रांतिकारी कल्पना
मानवतावादी मानसशास्त्राचे प्रमुख
प्रवर्तक Abraham Maslow यांनी 1943 साली “A
Theory of Human Motivation” या संशोधन लेखात मानवी प्रेरणेचे एक सुसंघटित
मॉडेल मांडले (Maslow, 1943). पुढे Motivation and
Personality (1954) या ग्रंथात त्यांनी या संकल्पनेचा अधिक विस्तार केला. मॅस्लो
यांच्या मते, मानवी वर्तन हे केवळ बाह्य उत्तेजनांना प्रतिसाद
नसून, ते अंतर्गत गरजांच्या क्रमिक पूर्ततेने प्रेरित होते. त्यांनी या
गरजांना पाच स्तरांत विभागून “गरजांची अधिश्रेणी” ही संकल्पना
मांडली. ही संकल्पना केवळ मानसशास्त्रापुरती मर्यादित न राहता शिक्षण, व्यवस्थापन, समुपदेशन आणि
नेतृत्वशास्त्रातही अत्यंत प्रभावी ठरली.
(1) शारीरिक गरजा (Physiological
Needs)
मॅस्लो यांच्या मते सर्वात मूलभूत
आणि तातडीच्या गरजा म्हणजे शारीरिक गरजा ज्यामध्ये अन्न, पाणी, झोप, श्वसन, लैंगिक गरजा
आणि शरीराचे तापमान संतुलित ठेवणे. या गरजा अपूर्ण राहिल्यास व्यक्तीचे संपूर्ण
लक्ष त्या गरजांच्या पूर्ततेकडे केंद्रीत होते. उदाहरणार्थ, उपाशी
व्यक्तीला स्व-आदर किंवा सर्जनशीलतेपेक्षा अन्न अधिक महत्त्वाचे वाटते. त्यामुळे
या गरजा मानवी अस्तित्वाचा पाया आहेत (Maslow, 1943). 21व्या
शतकात मोबाईल आणि चार्जर हेही या मुलभूत गरजांमध्ये समाविष्ट करावे लागेल आज अशी
अवस्था आहे.
(2) सुरक्षिततेच्या गरजा (Safety
Needs)
शारीरिक गरजा काही प्रमाणात पूर्ण
झाल्यानंतर व्यक्ती सुरक्षिततेकडे लक्ष देते. यात शारीरिक सुरक्षितता, आर्थिक स्थैर्य, आरोग्य, नोकरीची हमी
आणि कायदेशीर संरक्षण यांचा समावेश होतो. बालकांना स्थिर आणि संरक्षित वातावरणाची
गरज असते; तर प्रौढ व्यक्तींना आर्थिक व सामाजिक सुरक्षिततेची आवश्यकता असते.
मॅस्लो यांच्या मते, अस्थिर आणि भीतीदायक वातावरण
व्यक्तीच्या मानसिक विकासात अडथळा निर्माण करते (Maslow, 1954).
(3) प्रेम आणि संबंधितता (Love
and Belongingness Needs)
मानव हा सामाजिक प्राणी असल्यामुळे
त्याला प्रेम, आपलेपणा आणि स्वीकाराची गरज असते. कुटुंब, मित्र, सहकारी आणि
सामाजिक समूह यांच्याशी असलेले नाते व्यक्तीच्या मानसिक आरोग्यासाठी अत्यावश्यक
असते. जर या गरजा पूर्ण झाल्या नाहीत तर व्यक्ती एकाकीपणा, निराशा आणि
सामाजिक अलगाव अनुभवू शकते. आधुनिक मानसशास्त्रातील अनेक संशोधनांनी सामाजिक आधार हा मानसिक आरोग्याचा महत्त्वाचा घटक असल्याचे सिद्ध केले आहे (Baumeister
& Leary, 1995).
(4) स्व-आदर आणि सन्मान (Esteem
Needs)
या स्तरावर व्यक्ती आत्मसन्मान, आत्मविश्वास, यश, प्रतिष्ठा आणि
इतरांकडून मिळणाऱ्या सन्मानाची अपेक्षा करते. मॅस्लो यांनी आदराच्या गरजांना दोन
भागांत विभागले (१) अंतर्गत स्व-आदर (self-respect) आणि (२) बाह्य
प्रतिष्ठा (recognition). जर या गरजा पूर्ण झाल्या तर
व्यक्तीमध्ये आत्मविश्वास वाढतो; अन्यथा न्यूनगंड आणि असमर्थतेची
भावना निर्माण होऊ शकते (Maslow, 1954).
(5) आत्म-वास्तविकीकरण (Self-Actualization)
ही गरजांची अधिश्रेणीतील सर्वोच्च
पायरी आहे. आत्म-वास्तविकीकरण म्हणजे स्वतःच्या अंतर्गत क्षमतांचा आणि
सर्जनशीलतेचा पूर्ण विकास करणे. मॅस्लो यांच्या मते, “What a man
can be, he must be.” म्हणजेच व्यक्ती जे होऊ शकते ते होणे ही तिची अंतर्गत प्रेरणा असते. आत्म-वास्तविकीकरण
प्राप्त व्यक्ती वास्तव स्वीकारते, सर्जनशील असते, नैतिक
मूल्यांना जपते आणि जीवनातील गूढ अनुभवांना महत्त्व देते (Maslow,
1968).
मॅस्लो यांच्या मते, खालच्या गरजा
मोठ्या प्रमाणात पूर्ण झाल्यानंतरच व्यक्ती वरच्या गरजांकडे वळते. मात्र त्यांनी
हेही मान्य केले की हा क्रम पूर्णपणे कठोर (rigid) नाही. काही
व्यक्ती उच्च आदर्शांसाठी शारीरिक किंवा सुरक्षिततेच्या गरजांकडे दुर्लक्ष करू
शकतात उदा., समाजसुधारक किंवा कलाकार. Wahba
& Bridwell (1976) यांच्या संशोधनांनी या मॉडेलवर टीका केली
असली तरी, प्रेरणेच्या अभ्यासासाठी हे मॉडेल एक महत्त्वपूर्ण आधार ठरले.
गरजांची अधिश्रेणीचे विविध
क्षेत्रांवरील प्रभाव
शिक्षण: शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या मूलभूत
गरजांची पूर्तता (सुरक्षित वातावरण, स्वीकार) केली
तरच उच्च शिक्षणप्राप्ती आणि सर्जनशीलता वाढते, ही कल्पना
शिक्षणशास्त्रात महत्त्वाची ठरली.
व्यवस्थापन आणि नेतृत्व: कर्मचाऱ्यांच्या केवळ
वेतनाच्या गरजा पूर्ण करून चालत नाही; त्यांना आदर, मान्यता आणि
आत्मविकासाच्या संधी देणे आवश्यक आहे, ही भूमिका
आधुनिक व्यवस्थापनतत्त्वज्ञानात स्वीकारली गेली (Robbins &
Judge, 2017).
समुपदेशन आणि व्यक्तिमत्व विकास: समुपदेशक
व्यक्तीच्या अपूर्ण गरजांची ओळख करून तिच्या विकासासाठी मार्गदर्शन करतात. आत्म-वास्तविकीकरण
हा व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमांचा केंद्रबिंदू बनला आहे.
मॅस्लो यांची “गरजांची अधिश्रेणी” ही
संकल्पना मानवी प्रेरणेचे एक सकारात्मक, आशावादी आणि
विकासाभिमुख चित्र उभे करते. त्यांनी दाखवून दिले की मानव केवळ तग धरणारा प्राणी नाही, तर स्वतःच्या सर्वोच्च क्षमतेचा शोध
घेणारा सर्जनशील अस्तित्व आहे. म्हणूनच ही संकल्पना आजही मानसशास्त्र, शिक्षण, व्यवस्थापन आणि
समाजविकास क्षेत्रात मार्गदर्शक ठरते.
मानवतावादी मानसशास्त्राचा पाया
20व्या शतकाच्या पूर्वार्धात
मानसशास्त्र मुख्यतः वर्तनवाद आणि मनोविश्लेषण हे दोन प्रभावी प्रवाहांत विभागले
गेले होते. वर्तनवाद या दृष्टिकोनानुसार, मानसशास्त्र हे
केवळ निरीक्षण करता येणाऱ्या वर्तनाचा अभ्यास करणारे
शास्त्र असावे; अंतर्मन, भावना किंवा
चेतना यांसारख्या संकल्पना “वैज्ञानिक” पद्धतीने मोजता येत नाहीत, म्हणून त्यांना
अभ्यासातून वगळले गेले (Watson, 1913; Skinner, 1953). या
प्रवाहात मानवाला मुख्यतः उद्दीपक-प्रतिसाद यंत्रणा म्हणून पाहिले गेले. परिणामी, व्यक्तीची
अंतर्गत सर्जनशीलता, नैतिक निवड किंवा स्वायत्तता यांना
फारसा वाव उरला नाही.
दुसरीकडे, मनोविश्लेषणाचा पाया सिग्मंड फ्रायड यांनी घातला. फ्रॉइड यांच्या मते, मानवी वर्तनाचे
मूळ अचेतन प्रवृत्ती, लैंगिक व
आक्रमक प्रेरणा आणि बालपणीचे अनुभव यांत आहे (Freud, 1900/1953). या
दृष्टिकोनात व्यक्ती प्रामुख्याने अंतर्गत संघर्षांनी ग्रस्त, न्युरोटिक आणि
असुरक्षित मानली गेली. जरी फ्रॉइड यांनी मानवी मनाचे गूढ उलगडण्याचे मोठे कार्य
केले, तरी त्यांचा दृष्टिकोन मुख्यतः मानसिक विकार, ताण आणि
रोगात्मक (pathological) प्रक्रियांवर केंद्रित होता.
या दोन्ही प्रवाहांच्या
पार्श्वभूमीवर अब्राहम मॅस्लो यांनी 1950-60 च्या
दशकात मानवतावादी मानसशास्त्र हा एक तिसरा मार्ग सुचविला. मॅस्लो यांच्या
मते, वर्तनवाद मानवाला यंत्रवत् बनवतो, तर मनोविश्लेषण
मानवाला रोगग्रस्त आणि संघर्षप्रधान मानतो. या दोन्ही दृष्टिकोनांत “मानवी
सामर्थ्य”, “इच्छाशक्ती” आणि “अर्थपूर्णता” यांना पुरेसे स्थान मिळत नाही. म्हणून त्यांनी मानसशास्त्राला “तिसरी
शक्ती” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानवतावादी चळवळीची
सुरुवात केली (Maslow, 1968).
मॅस्लो यांच्या मते, मानसशास्त्राने
केवळ मानसिक विकारांचा अभ्यास न करता, निरोगी, सर्जनशील आणि
नैतिक व्यक्तिमत्वाचाही अभ्यास करायला हवा. त्यांनी असे स्पष्टपणे नमूद केले की, “मानसशास्त्राने
केवळ न्युरोसिसचा अभ्यास केल्यास ते अपूर्ण राहील; आपल्याला
आरोग्य आणि उत्कृष्टतेचाही अभ्यास करावा लागेल” (Maslow, 1954).
त्यांच्या Motivation and Personality (1954) या
ग्रंथात त्यांनी गरजांची अधिश्रेणी मांडून आत्म-वास्तविकीरण ही संकल्पना
केंद्रस्थानी आणली. त्यांच्या मते, आत्म-वास्तविकीरण
म्हणजे व्यक्तीने स्वतःच्या सर्वोच्च क्षमतेचा विकास करणे “What
a man can be, he must be.”
या संकल्पनेचा अनुभवजन्य पाया
घालण्यासाठी मॅस्लो यांनी काही ऐतिहासिक आणि समकालीन महान व्यक्तींचा अभ्यास केला.
उदाहरणार्थ, त्यांनी Albert
Einstein, Abraham Lincoln आणि Eleanor
Roosevelt यांसारख्या व्यक्तिमत्वांचा जीवनप्रवास विश्लेषित केला. त्यांना या
व्यक्तींमध्ये काही समान वैशिष्ट्ये आढळली जसे वास्तवाचे स्पष्ट आकलन, नैतिकता, सर्जनशीलता, मानवतावादी
मूल्ये, स्वतंत्र विचारसरणी आणि “पीक अनुभव” घेण्याची क्षमता (Maslow,
1962).
मॅस्लो यांच्या या दृष्टिकोनामुळे
मानसशास्त्रात एक महत्त्वपूर्ण परिवर्तन घडले. त्यांनी रोगात्मकतेवर केंद्रित दृष्टिकोनातून सकारात्मकता, आरोग्य आणि
उत्कर्ष यांकडे लक्ष वळवले. पुढे कार्ल रॉजर्स यांनी व्यक्तिकेंद्रित समुपदेशन विकसित करून
मानवतावादी मानसशास्त्राला व्यावहारिक आधार दिला (Rogers, 1961).
एकंदरीत, मानवतावादी
मानसशास्त्राने मानवी व्यक्तिमत्वाकडे पाहण्याची दिशा बदलली. यात मानवाला केवळ
प्रवृत्तींचे गुलाम किंवा बाह्य उत्तेजनांचा परिणाम मानले गेले नाही; उलट तो
स्वायत्त, सर्जनशील आणि नैतिक निवड करू शकणारा प्राणी म्हणून स्वीकारला गेला.
हीच मानवतावादी मानसशास्त्राची बौद्धिक आणि नैतिक पायाभरणी ठरली.
आत्म-वास्तविकीकरण – जीवनाचा
सर्वोच्च टप्पा
आत्म-वास्तविकीकरण ही संकल्पना
मानवतावादी मानसशास्त्रातील सर्वात प्रभावी आणि सखोल कल्पनांपैकी एक मानली जाते.
मॅस्लो यांनी 1943 मध्ये प्रकाशित झालेल्या त्यांच्या प्रसिद्ध लेखात “A
Theory of Human Motivation” आणि नंतरच्या Motivation and
Personality (1954) या ग्रंथात या संकल्पनेचे सविस्तर स्पष्टीकरण केले आहे (Maslow,
1943; 1954).
त्यांच्या मते, मानवाच्या गरजांची एक श्रेणी असते आणि त्या श्रेणीतील सर्वोच्च स्तर म्हणजे आत्म-वास्तविकीकरण. हे
केवळ यश, पैसा किंवा प्रतिष्ठा मिळवणे नसून, “स्वतःमध्ये
दडलेल्या सर्वोच्च क्षमतेचा विकास” होय.
मॅस्लो यांच्या मते, प्रत्येक
व्यक्तीमध्ये काही सुप्त क्षमता असतात. या
क्षमतांची पूर्ण अभिव्यक्ती म्हणजे आत्म-वास्तविकीकरण. त्यांनी प्रसिद्ध वाक्यात
म्हटले आहे “What a man can be, he must be.” (Maslow, 1954) या
विधानाचा अर्थ असा की माणूस ज्या उंचीपर्यंत जाऊ शकतो, त्या
उंचीपर्यंत जाण्याची त्याची अंतर्गत गरज असते. ही गरज बाह्य बक्षिसांवर आधारित
नसून अंतःप्रेरणेतून निर्माण होते.
1. स्वतःची खरी क्षमता ओळखणे
आत्म-वास्तविकीकरणाचा पहिला पैलू
म्हणजे स्वतःच्या सामर्थ्यांची जाणीव आणि त्यांचा विकास. मॅस्लो यांच्या मते, आत्म-वास्तविक
व्यक्ती स्वतःला जसे आहे तसे स्वीकारते. ती
व्यक्ती आपल्या मर्यादा आणि गुण यांची जाणीव ठेवून त्यांचा सकारात्मक उपयोग करते.
अशा व्यक्तींचा अभ्यास करताना मॅस्लो यांनी अब्राहम लिंकन, अल्बर्ट
आइन्स्टाईन, एलेनॉर रूझवेल्ट यांसारख्या व्यक्तींची उदाहरणे
दिली (Maslow, 1954). त्यांच्या जीवनात केवळ बाह्य यश नव्हते, तर अंतर्गत
प्रामाणिकपणा आणि उद्देशपूर्णता होती.
2. सर्जनशीलता आणि नैतिकता
मॅस्लो यांच्या मते, आत्म-वास्तविक
व्यक्ती सर्जनशील असते. ही सर्जनशीलता केवळ कला किंवा साहित्यापुरती मर्यादित नसून, जीवन
जगण्याच्या पद्धतीतही दिसते. अशा व्यक्ती समस्यांकडे नव्या दृष्टिकोनातून पाहतात.
त्यांच्यात “Being-values” (B-values) म्हणजे सत्य, सौंदर्य, न्याय, साधेपणा आणि
पूर्णत्व यांसारखी मूल्ये आढळतात (Maslow, 1968). त्यांच्या
मते, आत्म-वास्तविक व्यक्ती नैतिकदृष्ट्या प्रगल्भ असते. ती समाजाच्या
अंधानुकरणाऐवजी विवेकबुद्धीने निर्णय घेते. ही नैतिकता बाह्य बंधनांमुळे नव्हे, तर अंतःप्रेरित
असते.
3. वास्तवाचा स्वीकार
आत्म-वास्तविकीकरण म्हणजे वास्तवाचा
स्वीकार. मॅस्लो यांच्या संशोधनानुसार आत्म-वास्तविक व्यक्ती “reality-centered”
असते. ती भ्रम, पूर्वग्रह
किंवा अतिरेकी अपेक्षा यांपासून दूर राहते. अशा व्यक्ती जीवनातील दु:ख, अपयश किंवा
मर्यादा यांना नाकारत नाहीत, तर त्यांचा स्वीकार करून पुढे जातात
(Maslow, 1954).
ही वृत्ती मानसशास्त्रीय
दृष्टिकोनातून महत्त्वाची आहे, कारण ती मानसिक आरोग्याशी संबंधित
आहे. आधुनिक सकारात्मक मानसशास्त्र (Positive
Psychology) देखील या दृष्टिकोनाला समर्थन देते (Seligman &
Csikszentmihalyi, 2000).
4. जीवनाचा सखोल अनुभव – Peak
Experiences
मॅस्लो यांनी आत्म-वास्तविकीकरणाशी
संबंधित “Peak Experiences” ही संकल्पना मांडली (Maslow,
1964). Peak
experience म्हणजे जीवनातील अत्युच्च, अर्थपूर्ण आणि
आनंददायी क्षण जसे की निसर्गातील सौंदर्याचा अनुभव, सर्जनशीलतेचा
उत्कर्ष, किंवा अध्यात्मिक समाधान.
या क्षणांत व्यक्तीला स्वतःशी आणि
विश्वाशी एकरूप झाल्याचा अनुभव येतो. अशा अनुभवांमुळे जीवन अधिक अर्थपूर्ण आणि
समृद्ध होते. मॅस्लो यांच्या मते, हे अनुभव आत्म-वास्तविकीकरणाचे सूचक
आहेत.
वैयक्तिक जीवन आणि शेवटचे दिवस
अब्राहम
मॅस्लो यांनी 1951 साली Brandeis
University येथे मानसशास्त्र विभागाचे प्रमुख म्हणून
कार्यभार स्वीकारला. ब्रँडाइस विद्यापीठ हे त्या काळात नव्याने स्थापन झालेले आणि
बौद्धिक दृष्ट्या प्रगतिशील वातावरण असलेले संस्थान होते. मॅस्लो यांनी येथे 1969 पर्यंत
अध्यापन व संशोधन केले. त्यांच्या नेतृत्वाखाली ब्रँडाइस येथे मानवतावादी
मानसशास्त्राचा एक स्वतंत्र आणि प्रभावी प्रवाह निर्माण झाला. कार्ल रॉजर्ससारख्या
विचारवंतांशी त्यांचा बौद्धिक संवाद होता, ज्यामुळे
“तिसरी शक्ती” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या Humanistic
Psychology चा पाया अधिक दृढ झाला (Maslow, 1968).
विद्यार्थ्यांमध्ये ते अत्यंत
लोकप्रिय होते. त्यांच्या अध्यापनशैलीत केवळ सिद्धांत नव्हता, तर वैयक्तिक
अनुभव, आत्मपरिक्षण आणि जीवनाचा अर्थ शोधण्याची प्रेरणा होती. ते
विद्यार्थ्यांना केवळ ‘चांगले मानसशास्त्रज्ञ’ नव्हे, तर ‘चांगले
माणूस’ होण्याचे आवाहन करत. त्यांच्या वर्गात आत्म-वास्तविकीकरण, पीक-एक्स्पिरियन्सेस आणि सर्जनशीलता यांसारख्या संकल्पनांवर मुक्त चर्चा होत असे (Maslow,
1964).
1960च्या दशकात त्यांनी आरोग्याच्या
काही समस्या अनुभवल्या; विशेषतः हृदयविकाराचे झटके आले. 1969
साली त्यांनी ब्रँडाइस सोडले आणि कॅलिफोर्नियातील लाफ्लिन फाउंडेशनमध्ये निवासी फेलो म्हणून कार्य केले, जिथे त्यांनी
व्यवस्थापन, उद्योगसंस्कृती आणि मानवी क्षमता या विषयांवर लेखन केले. 8 जून 1970 रोजी कॅलिफोर्नियामध्ये त्यांचे
हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले (Hoffman, 1988).
त्यांच्या निधनानंतरही त्यांचे विचार
मानसशास्त्र, शिक्षण, व्यवस्थापन आणि
समुपदेशन क्षेत्रात व्यापक प्रमाणात वापरले जात आहेत. विशेषतः गरजांची अधिश्रेणी
ही संकल्पना आजही नेतृत्व प्रशिक्षण, कर्मचारी
प्रेरणा, शैक्षणिक धोरणे आणि व्यक्तिमत्व विकास कार्यक्रमांमध्ये मूलभूत चौकट
म्हणून स्वीकारली जाते (Maslow, 1954).
प्रेरणादायी वारसा
मॅस्लो यांचे जीवन आणि कार्य केवळ
शैक्षणिक योगदानापुरते मर्यादित नाही; ते एक
प्रेरणादायी जीवनदृष्टी देतात. त्यांच्या आत्मचरित्रात्मक नोंदींमधून स्पष्ट होते
की त्यांचे बालपण भावनिकदृष्ट्या कठीण होते. त्यांनी स्वतः मान्य केले आहे की
बालपणातील एकाकीपणा आणि असुरक्षिततेच्या अनुभवांमुळेच त्यांना “मानवी आनंद आणि
परिपूर्णता” या विषयाचा शोध घ्यायची प्रेरणा मिळाली (Hoffman,
1988). यावरून
हे अधोरेखित होते की कठीण बालपणही महान विचारांची बीजे पेरू शकते.
मॅस्लो यांनी मानसशास्त्राला
रोग-केंद्रित दृष्टिकोनातून बाहेर काढून
क्षमता-केंद्रित दृष्टिकोन दिला. त्यांच्या मते, माणूस केवळ
न्यूनगंड, प्रवृत्ती किंवा संघर्षांनी बनलेला नसून तो सर्जनशील, नैतिक आणि
अर्थशोधी अस्तित्व आहे (Maslow, 1968). म्हणूनच त्यांनी ठामपणे
मांडले की माणूस केवळ समस्या नसून शक्यता आहे.
त्यांच्या “What
a man can be, he must be” या विधानात आत्म-वास्तविकीकरणाची संकल्पना
स्पष्ट होते (Maslow, 1954). त्यांच्या मते, स्वतःच्या
क्षमतांचा पूर्ण विकास करणे हीच मानवी प्रेरणेची सर्वोच्च अवस्था आहे. त्यामुळे
स्वतःच्या क्षमतेचा शोध घेणे हीच खरी प्रेरणा आहे हा संदेश त्यांच्या सिद्धांतातून
स्पष्टपणे पुढे येतो.
याशिवाय, त्यांनी मानसिक
आरोग्याची व्याख्या फक्त मानसिक विकारांचा अभाव म्हणून न करता, जीवनातील अर्थ, मूल्ये, सर्जनशीलता आणि
पीक-अनुभव यांचा सक्रिय शोध म्हणून केली (Maslow,
1964).
त्यामुळे मानसिक आरोग्य म्हणजे केवळ विकारांचा अभाव नव्हे, तर अर्थपूर्ण
आणि समृद्ध जीवन जगणे आहे हा त्यांचा मूलभूत संदेश ठरतो.
आज सकारात्मक मानसशास्त्र या आधुनिक प्रवाहावरही मॅस्लो यांच्या विचारांचा खोलवर प्रभाव दिसून
येतो. मानवी सामर्थ्य, आनंद, आशा आणि
अर्थपूर्णता यांचा अभ्यास करण्याची प्रेरणा त्यांच्या मानवतावादी दृष्टिकोनातूनच
पुढे आली आहे.
समारोप:
अब्राहम मॅस्लो यांनी मानवाकडे
पाहण्याची दृष्टीच बदलून टाकली. त्यांनी दाखवून दिले की प्रत्येक माणसात एक
“सर्वोच्च स्वरूप” दडलेले आहे. परिस्थिती, संघर्ष आणि
मर्यादा यांपलीकडे जाऊन स्वतःच्या क्षमतेचा विकास करणे हाच त्यांचा खरा संदेश आहे.
आजच्या स्पर्धात्मक आणि तणावग्रस्त जगात मॅस्लो यांची शिकवण अधिकच महत्त्वाची
ठरते. कारण शेवटी, यश म्हणजे फक्त बाह्य उपलब्धी नव्हे; तर स्वतःला
ओळखून, स्वीकारून आणि विकसित करून जगणे हेच खरे आत्म-वास्तविकीकरण आहे.
संदर्भ
Baumeister, R. F.,
& Leary, M. R. (1995). The need to belong.
Psychological Bulletin, 117(3), 497–529.
Freud, S. (1900/1953). The Interpretation of Dreams.
Goble, F. (1970). The Third Force: The Psychology of Abraham Maslow.
Grossman.
Goldstein, K. (1939/1995). The Organism. Zone Books.
Hergenhahn, B. R.,
& Henley, T. (2014). An Introduction to the History of
Psychology. Cengage Learning.
Hoffman, E. (1988). The Right to Be Human: A Biography of Abraham Maslow.
McGraw-Hill.
Maslow, A. H. (1943). A theory of human motivation. Psychological Review, 50(4), 370–396.
Maslow, A. H. (1954). Motivation and Personality. Harper & Row.
Maslow, A. H. (1964). Religions, Values, and Peak-Experiences. Ohio State
University Press.
Maslow, A. H. (1968). Toward a Psychology of Being. Van Nostrand.
Robbins, S. P.,
& Judge, T. A. (2017). Organizational Behavior (17th ed.). Pearson.
Rogers, C. R. (1961). On Becoming a Person. Houghton Mifflin
Seligman, M. E.
P., & Csikszentmihalyi, M. (2000). Positive
Psychology: An Introduction. American Psychologist, 55(1),
5–14.
Skinner, B. F. (1953). Science and Human Behavior.
Wahba, M. A.,
& Bridwell, L. G. (1976). Maslow reconsidered.
Organizational Behavior and Human Performance, 15(2), 212–240.
Watson, J. B. (1913). Psychology as the Behaviorist Views It. Psychological
Review.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thank you for your comments and suggestions