रविवार, २२ फेब्रुवारी, २०२६

आई-मुलाचे नाते: Harry Harlow आणि माकडांवरील प्रयोग

 

आई-मुलाचे नाते: Harry Harlow आणि माकडांवरील प्रयोग

(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)

“माणूस असो की प्राणी आई प्रत्येकालाच हवी.” ही भावना केवळ काव्यात्म वाक्य नाही, तर जैविक आणि मानसशास्त्रीय सत्य आहे. जुलै 2025 मध्ये जपानमधील इचिकावा सिटी प्राणीसंग्रहालयात जन्मलेल्या एका लहान माकडाच्या पिल्लाची कहाणी सोशल मीडियावर व्हायरल झाली आणि जगभरातील लोकांच्या हृदयाला भिडली. जन्मताच आईने त्याला दूर ढकलले; इतर माकडांनीही त्याला गटात स्वीकारले नाही. कर्मचाऱ्यांनी त्याची काळजी घेतली, त्याला खायला दिले आणि प्रेमाने त्याचे नाव “पंच” ठेवले. परंतु पंचच्या वर्तनात एक वेगळीच कहाणी दडलेली होती, तो सतत आपल्या आईकडे जाण्याचा प्रयत्न करत असे, नाकारला गेला की घाबरून परत येई, आणि मग कर्मचाऱ्यांनी पुरविलेल्या एका मऊ खेळण्याला घट्ट मिठी मारून बसत असे. त्या खेळण्यात त्याला सुरक्षितता आणि ऊब सापडत होती.

पंचच्या या वर्तनात लोकांना स्वतःचे बालपण, स्वतःचा एकटेपणा आणि भावनिक गरजा दिसू लागल्या. काहींनी त्याला दत्तक घेण्याची इच्छा व्यक्त केली; काहींनी त्या खेळण्याला “आईचा पर्याय” असे म्हटले. हळूहळू प्राणीसंग्रहालयाच्या प्रयत्नांमुळे इतर माकडांनी पंचला स्वीकारायला सुरुवात केली, त्याच्याशी खेळू लागली, त्याला गटात सामावून घेतले. पण या संपूर्ण घटनेने एक मूलभूत प्रश्न पुन्हा समोर आणला आईच्या प्रेमाची आणि सुरक्षित बंधाची गरज ही किती खोलवर आणि सार्वत्रिक आहे?

https://youtu.be/tLOvRdsVUhQ?si=2vcy-Qj0D9xs4EWa

Harry Harlow आणि माकडांवरील प्रयोग यावरील व्हिडिओ पाहण्यासाठी

याच प्रश्नाचे वैज्ञानिक उत्तर शोधण्याचा प्रयत्न 20व्या शतकात Harry Harlow (1959) यांनी केला. त्यांच्या रिसस माकडांवरील प्रयोगांनी दाखवून दिले की पिल्लांना केवळ अन्न नव्हे, तर स्पर्श, ऊब आणि भावनिक आधाराची तीव्र गरज असते. पंच जसा मऊ खेळण्याला चिकटून सुरक्षितता शोधत होता, तसाच हरलो यांच्या प्रयोगातील माकडांचा कल “cloth mother” कडे होता कारण तेथे त्यांना contact comfort मिळत होते. पंचची कहाणी ही केवळ एका माकडाची गोष्ट नाही; ती बालपणातील भावनिक वंचिततेची, स्वीकाराच्या शोधाची आणि सुरक्षिततेच्या गरजेची प्रतीकात्मक कहाणी आहे. म्हणूनच हरलो यांच्या प्रयोगांचा विचार करताना आपण केवळ भूतकाळातील संशोधन पाहत नाही, तर आजच्या समाजातील अनाथालयांतील मुलांपासून ते डिजिटल युगातील भावनिक दुराव्यापर्यंत अनेक वास्तवांकडेही पाहतो. प्रेम, स्पर्श आणि भावनिक उपलब्धता या गरजा मानवापुरत्याच मर्यादित नाहीत; त्या जीवनाच्या मुळाशी आहेत.

मानसशास्त्राच्या इतिहासात काही प्रयोग असे आहेत ज्यांनी संपूर्ण विचारपद्धती बदलून टाकली. त्यापैकी एक अत्यंत प्रभावी आणि वादग्रस्त प्रयोग म्हणजे हॅरी हरलो यांचे माकडांवरील प्रयोग. या प्रयोगांनी आई-मुलाच्या नात्यातील भावनिक बंध (attachment) याबद्दलच्या पारंपरिक समजुतींना आव्हान दिले आणि मानसशास्त्रात एक नवे पर्व सुरू केले.

प्रयोगाची पार्श्वभूमी :  (1940-50 चे दशक)

1940-50 च्या दशकात अमेरिकन मानसशास्त्रावर वर्तनवादी दृष्टिकोनाचे वर्चस्व होते. या विचारसरणीचा पाया John B. Watson आणि B. F. Skinner यांसारख्या मानसशास्त्रज्ञांनी घातला होता. वर्तनवादानुसार मानवी वर्तन हे बाह्य उद्दीपक आणि प्रतिसाद यांच्या संबंधातून समजून घेता येते; अंतर्गत भावनिक अनुभव, प्रेम, जिव्हाळा किंवा सुरक्षितता यांसारख्या संकल्पना मोजता येत नाहीत म्हणून त्या वैज्ञानिक अभ्यासाच्या कक्षेबाहेर मानल्या जात. या पार्श्वभूमीवर बालविकास आणि आई-मुलाचे नाते यांचे स्पष्टीकरणही मापनीय वर्तनाच्या चौकटीत केले जात होते (Watson, 1928; Skinner, 1953).

त्या काळातील प्रमुख समजुतीनुसार, मुलांना आईशी जडणारा बंध (attachment) हा प्रामुख्याने अन्न देण्यामुळे निर्माण होतो. ही संकल्पना drive reduction theory शी संबंधित होती. जैविक गरज (उदा. भूक) पूर्ण करणारी व्यक्ती म्हणजे आई, म्हणून मुलाला तिच्याशी सकारात्मक संबंध निर्माण होतो, असा युक्तिवाद मांडला गेला. म्हणजेच, आई ही “अन्नाचा स्रोत” असल्यामुळेच मुलाला तिच्याशी प्रेम किंवा जिव्हाळा वाटतो. या मतानुसार, जर अन्न देणारी व्यक्ती बदलली, तर मुलाचा जिव्हाळाही त्या व्यक्तीकडे वळेल. त्यामुळे भावनिक बंध हा जैविक गरजांची पूर्तता करणाऱ्या reinforcement प्रक्रियेचा परिणाम आहे, असे मानले गेले (Dollard & Miller, 1950).

याच काळात काही मनोविश्लेषणात्मक विचारवंतांनीही आई-मुलाच्या नात्याचा उगम मौखिक अवस्थेतील (oral stage) समाधानाशी जोडला होता. उदाहरणार्थ, Sigmund Freud यांच्या मनोविश्लेषणानुसार बालकाचे प्रारंभीचे समाधान हे स्तनपानाशी निगडित असते; त्यामुळे आईशी असलेले प्रेम हे अन्नाशी संबंधित जैविक अनुभवातून विकसित होते (Freud, 1905/1953). अशा प्रकारे, वर्तनवाद आणि मनोविश्लेषण या दोन्ही परंपरांमध्ये आई-मुलाच्या नात्याचे मूळ अन्न व जैविक गरजांची पूर्तता यामध्येच शोधले गेले.

परंतु या सर्व दृष्टिकोनांमध्ये स्पर्श, ऊब, शारीरिक जवळीकता, सुरक्षिततेची भावना आणि भावनिक आश्रय यांना गौण स्थान होते. बालकाच्या भावनिक सुरक्षिततेचा स्वतंत्र मानसशास्त्रीय घटक म्हणून विचार केला जात नव्हता. याच ठिकाणी Harry Harlow यांनी या प्रचलित मताला आव्हान दिले. हरलो यांना असे वाटत होते की मुलांना केवळ अन्न नव्हे, तर “contact comfort” म्हणजे स्पर्शातून मिळणारी ऊब आणि सुरक्षितता ही मूलभूत मानसशास्त्रीय गरज आहे. त्यांच्या मते, आई-मुलाचे नाते हे केवळ भुकेच्या समाधानावर आधारित नसून, ते भावनिक बंध आणि सुरक्षिततेच्या अनुभवावर आधारलेले असते (Harlow, 1958).

या पार्श्वभूमीवर हरलो यांनी माकडांवर केलेले प्रयोग हे त्या काळातील वर्तनवादी सिद्धांतांना प्रत्यक्ष आव्हान देणारे ठरले. त्यांनी दाखवून दिले की जरी अन्न लोखंडी कृत्रिम “आई” कडे असले तरी माकडांची पिल्ले मऊ कापडी “आई” कडे अधिक आकर्षित होत होती. यामुळे अन्नावर आधारित जडणघडणीची संकल्पना अपुरी ठरली आणि भावनिक सुरक्षिततेचे महत्त्व अधोरेखित झाले. पुढे या निष्कर्षांमुळे John Bowlby यांच्या अटॅचमेंट सिद्धांताला अधिक भक्कम प्रायोगिक आधार मिळाला (Bowlby, 1969).

अशा प्रकारे, 1940-50 च्या दशकातील प्रचलित वर्तनवादी विचारधारा ही आई-मुलाच्या नात्याला मुख्यतः जैविक गरजांच्या पूर्ततेचा परिणाम मानत होती; परंतु हरलो यांनी भावनिक सुरक्षितता, स्पर्श आणि ऊब या घटकांना वैज्ञानिक अधिष्ठान देऊन बालविकासाच्या समजुतीत मूलभूत बदल घडवून आणला.

प्रयोगाची रचना (Wire Mother vs. Cloth Mother)

Harry Harlow यांनी 1950 च्या दशकात University of Wisconsin–Madison येथे Rhesus monkeys (Macaca mulatta) या प्रजातीच्या माकडांवर आई–पिल्लू जडणघडणीचा अभ्यास करण्यासाठी नियंत्रित प्रयोगरचना विकसित केली. या प्रयोगात नवजात माकडांच्या पिल्लांना जन्मानंतर काही दिवसा नंतर त्यांच्या जैविक आईपासून वेगळे करून स्वतंत्र पिंजऱ्यात ठेवण्यात आले. प्रत्येक पिंजऱ्यात दोन कृत्रिम “आई” (surrogate mothers) ठेवण्यात आल्या:

  • लोखंडी (wire) आई — स्टीलच्या तारांनी बनविलेली संरचना; अनेक स्थितींमध्ये या surrogate कडे दूधाची बाटली जोडलेली असे.
  • कापडी (cloth) आई — लाकडी/तारांच्या फ्रेमवर मऊ टेरी-क्लॉथ/कापड गुंडाळलेले; सामान्यतः या surrogate आईकडे दूध नाही, पण ती स्पर्शास मऊ व उबदार वाटेल अशी रचना केली होती.

या रचनेत अन्नाचा स्रोत (feeding) आणि स्पर्श-ऊब (contact comfort) हे दोन घटक वेगळे करून पिल्ले कोणत्या surrogate आईकडे अधिक वेळ घालवतात हे मोजले गेले. काही प्रयत्नात अन्न लोखंडी आईकडे ठेवले गेले; तर काही नियंत्रणस्थितींमध्ये अन्न कापडी आईकडे ठेवूनही निरीक्षण केले गेले, जेणेकरून “अन्न-आधारित जडणघडण” विरुद्ध “स्पर्श-आधारित जडणघडण” यांची स्पष्ट तुलना करता येईल (Harlow & Zimmermann, 1959).

हरलो यांनी संख्यात्मक पद्धती वापरून पिल्ले प्रत्येक surrogate आईकडे दिवसातील किती तास घालवतात, भीतीदायक उद्दीपक (उदा., मोठा आवाज/अनोळखी वस्तू) दिल्यावर ती कोणत्या surrogate आईकडे धाव घेतात, तसेच नवीन वातावरणात अन्वेषण करताना “secure base” म्हणून कोणत्या surrogate आईचा उपयोग करतात हे मोजले. पिल्लांच्या चिकटून राहण्याची वारंवारता, दूधपानाचा कालावधी, आणि भीतीच्या प्रसंगी संपर्क शोधण्याची तीव्रता ही प्रमुख अवलंबी परिवर्त्ये (dependent variables) होती (Harlow, 1958).

या अभ्यासात प्रयोगपरिस्थिती काटेकोरपणे नियंत्रित करण्यात आली तापमान, प्रकाश, पिंजऱ्याची मांडणी, surrogate आईची उंची/आकार यांत सातत्य ठेवले गेले. काही परिस्थितींमध्ये दोन्ही surrogate आईकडे अन्न उपलब्ध करून देऊनही पिल्ले कोणत्या surrogate कडे जास्त वेळ घालवतात हे पाहिले गेले; यामुळे “अन्न” हा एकमेव निर्णायक घटक नाही, हे तपासता आले. अशा नियंत्रणांमुळे निष्कर्षांची अंतर्गत वैधता बळकट झाली.

हरलो यांचा हेतू वर्तनवादातील drive-reduction theory (भूक कमी करणारी व्यक्ती = जडणघडणीचा स्रोत) या गृहितकाला अनुभवाधारित आव्हान देणे हा होता. “Contact comfort” हा स्वतंत्र परिवर्त्य वेगळा करून त्यांनी दाखवण्याचा प्रयत्न केला की स्पर्शातून मिळणारी सुरक्षितता आणि ऊब ही जडणघडणीची मध्यवर्ती प्रेरक शक्ती असू शकते. ही प्रयोगरचना पुढे जाऊन John Bowlby यांच्या Attachment Theory ला प्रायोगिक पाठबळ देणारी ठरली.

प्रयोगातील निष्कर्ष

Harry Harlow यांनी 1958 मध्ये प्रकाशित केलेल्या “The Nature of Love” या क्लासिक लेखात स्पष्ट केले की, रिसस माकडांच्या पिल्लांना दोन कृत्रिम surrogate आई दिल्या असता पिल्लांनी आपल्या वेळेचा प्रचंड मोठा भाग कापडी आईला चिकटून घालवला (Harlow, 1958). प्रयोगात दूधाची बाटली लोखंडी आईकडे असतानाही, पिल्ले फक्त दूध पिण्यापुरती लोखंडी आईकडे जात आणि लगेच कापडी आईकडे परतत. वेळेचे संख्यात्मक निरीक्षण दर्शवते की पिल्ले दररोज सुमारे 15–18 तास कापडी आईकडे आणि फारच कमी वेळ लोखंडी आईकडे घालवत (Harlow & Zimmerman, 1959).

या निष्कर्षाचा सैद्धांतिक अर्थ असा की, जडणघडण ही केवळ “अन्न-पुरवठ्यावर” आधारित नसून स्पर्शातून मिळणारी ऊब, मृदुता आणि शारीरिक सुरक्षिततेची अनुभूती या घटकांवर निर्णायकपणे अवलंबून असते. त्या काळातील वर्तनवादी भूमिकेनुसार आई-मुलाचे प्रेम हे प्रामुख्याने अन्नाशी संलग्न असते; परंतु हरलो यांच्या प्रयोगांनी या गृहितकाला थेट आव्हान दिले. माकडांची पिल्ले दूध देणाऱ्या लोखंडी आईपेक्षा दूध न देणाऱ्या कापडी आईला अधिक प्राधान्य देतात, हा निष्कर्ष सूचित करतो की भावनिक सुरक्षितता ही जैविकदृष्ट्या मूलभूत गरज आहे. हरलो (1958) यांनी याला “contact comfort” ही संज्ञा दिली आणि प्रेमाच्या स्वरूपाचे मूळ स्पर्शाधारित आश्वासकतेत आहे, असे प्रतिपादन केले.

याच संदर्भात, पुढील अभ्यासांमध्ये असेही आढळले की ज्यांना कापडी आई उपलब्ध होती, त्या पिल्लांमध्ये ताण-प्रतिक्रिया तुलनेने कमी होती; उलट केवळ लोखंडी आई असलेल्या परिस्थितीत पिल्लांमध्ये अस्वस्थता, हालचालींची पुनरावृत्ती आणि तणावाची लक्षणे अधिक दिसून आली (Harlow & Zimmerman, 1959). त्यामुळे, संपर्क-आधारित सुरक्षितता ही भावनिक नियमनासाठी अत्यावश्यक आहे, हा निष्कर्ष अधिक दृढ झाला.

हरलो यांच्या प्रयोगांतील दुसरा महत्त्वाचा पैलू म्हणजे भीती किंवा तणावाच्या प्रसंगी पिल्लांची प्रतिक्रिया. प्रयोगात माकडांच्या पिल्लांसमोर अनोळखी किंवा भीतीदायक वस्तू (उदा., मोठी खेळणी किंवा हालचाल करणारी यांत्रिक वस्तू) ठेवली गेली असता, पिल्लांनी त्वरित कापडी आईकडे धाव घेतली आणि तिला घट्ट चिकटून बसले (Harlow, 1958). लोखंडी आईकडे अशी आश्रय-प्रतिक्रिया दिसून आली नाही. कापडी आईच्या उपस्थितीत पिल्लांनी भीती कमी झाल्यावर त्या नवीन वस्तूंचे अन्वेषण करण्याचे धाडस दाखवले; परंतु कापडी आई अनुपस्थित असताना अन्वेषणाची प्रवृत्ती लक्षणीयरीत्या घटली.

या वर्तनातून “आई” ही केवळ अन्नाचा स्रोत नसून भावनिक आश्रय आहे, ही संकल्पना स्पष्ट होते. “Secure base” या संकल्पनेनुसार, बालक सुरक्षित व्यक्तीच्या उपस्थितीत जगाचा शोध घेण्यास अधिक सक्षम होते आणि भीतीच्या प्रसंगी त्या व्यक्तीकडे परत येते. ही संकल्पना पुढे John Bowlby यांच्या Attachment Theory मध्ये केंद्रस्थानी आली (Bowlby, 1969). तसेच Mary Ainsworth यांनी “Strange Situation” अभ्यासात सुरक्षित जडणघडण असलेल्या बालकांमध्ये हाच नमुना आढळल्याचे दाखवले, बालक आईच्या उपस्थितीत अन्वेषण करते आणि तणावाच्या वेळी तिच्याकडे परत येते (Ainsworth et al., 1978).

म्हणूनच, हरलो यांच्या निष्कर्षांनी दोन मूलभूत गोष्टी अधोरेखित केल्या: (१) प्रेम आणि जडणघडण यांचे मूळ स्पर्शाधारित सुरक्षिततेत आहे; आणि (२) सुरक्षित जडणघडण ही अन्वेषण, आत्मविश्वास आणि भावनिक स्थैर्य यांच्या विकासासाठी पाया घालते. या प्रयोगांमुळे बालविकास, अनाथालयातील संगोपन, तसेच पालकत्वाच्या पद्धती यांविषयीच्या धोरणांमध्ये आमूलाग्र बदल घडून आले.

सामाजिक आणि भावनिक परिणाम

Harry Harlow यांनी 1950–60 च्या दशकात केलेल्या रिसस माकडांवरील प्रयोगांमध्ये आईपासून पूर्णपणे वेगळे वाढवलेल्या पिल्लांमध्ये गंभीर सामाजिक आणि भावनिक विकृती आढळल्या. आईपासून लवकर वेगळे केलेल्या आणि सामाजिक एकाकीपणात वाढवलेल्या माकडांची सामाजिक परिपक्वता बाधित झाली. ही पिल्ले इतर माकडांशी संवाद साधताना अस्थिर, भीतीग्रस्त किंवा अयोग्य प्रतिसाद देत असत. खेळण्याची, परस्पर संवादाची आणि समूहात मिसळण्याची त्यांची क्षमता कमी झाली होती (Harlow & Zimmermann, 1959).

काही माकडांमध्ये तीव्र आक्रमकता दिसून आली, तर काहींमध्ये अत्यंत भीरू, आत्मसंकोची आणि निष्क्रिय वर्तन आढळले. प्रौढत्वात पोहोचल्यावर त्यांना लैंगिक आणि पालकत्वाच्या भूमिकाही योग्य प्रकारे निभावता आल्या नाहीत. काही मादी माकडांनी स्वतःच्या पिल्लांकडे दुर्लक्ष केले किंवा आक्रमक वर्तन केले (Harlow & Harlow, 1962). सामाजिक कौशल्यांचा अभाव आणि भावनिक असंतुलन हे दीर्घकालीन परिणाम होते.

अत्यंत एकाकी अवस्थेत वाढवलेल्या माकडांमध्ये “depression-like symptoms” दिसून आले जसे की हालचाल कमी होणे, स्वतःला मिठी मारून बसणे, डोळस संपर्क टाळणे, आणि पर्यावरणाविषयी उदासीनता. ही लक्षणे मानवी नैराश्याशी साधर्म्य दर्शवतात (Suomi, Harlow & Kimball, 1971). या निरीक्षणांवरून असे स्पष्ट झाले की बालपणातील भावनिक वंचितता केवळ तात्पुरती समस्या नसून दीर्घकालीन मानसिक, सामाजिक आणि जैविक परिणाम घडवू शकते. निष्कर्षांमुळे वैकासिक मानसशास्त्रात एक महत्त्वाचा सिद्धांत दृढ झाला कि लहान वयातील भावनिक अनुभव व्यक्तिमत्त्वाच्या पायाभूत रचनेवर परिणाम करतात.

जॉन बोल्बी आणि अटॅचमेंट थिअरीशी संबंध

John Bowlby यांनी मांडलेल्या Attachment Theory नुसार, मुलांच्या भावनिक सुरक्षिततेसाठी प्राथमिक पालकांशी सुरक्षित बंध आवश्यक असतो. बोल्बी यांनी “maternal deprivation hypothesis” मांडताना सांगितले की आईपासून दीर्घकाळ वेगळेपणा मुलांच्या भावनिक आणि सामाजिक विकासावर प्रतिकूल परिणाम करतो (Bowlby, 1969/1982).

हरलो यांच्या प्रयोगांनी बोल्बी यांच्या सिद्धांताला प्रायोगिक आधार दिला. हरलो यांनी दाखवून दिले की अन्न देणारी “wire mother” नव्हे तर स्पर्श व ऊब देणारी “cloth mother” ही पिल्लांसाठी सुरक्षित आधार ठरते. बोल्बी यांच्या मतेही पालक हे मुलांसाठी सुरक्षित आधारस्थान असते, जिथून मूल बाह्य जगाचा शोध घेते आणि भीतीच्या वेळी परत येते.

तसेच Mary Ainsworth यांनी 1970 च्या दशकात “Strange Situation” पद्धतीद्वारे सुरक्षित, असुरक्षित-टाळणारी आणि असुरक्षित-चंचल जडणघडण प्रकार ओळखले (Ainsworth et al., 1978). त्यांच्या निष्कर्षांनुसार, ज्या मुलांना सातत्यपूर्ण आणि भावनिक प्रतिसाद देणारे पालक लाभतात, त्यांच्यात सुरक्षित जडणघडण विकसित होते. हरलो यांच्या निष्कर्षांमुळे मानवी अटॅचमेंट संशोधनाला जैविक व प्रायोगिक पुष्टी मिळाली.

नैतिक वाद (Ethical Controversy)

Harry Harlow यांच्या प्रयोगांवर नंतर तीव्र नैतिक टीका झाली. पिल्लांना त्यांच्या आईपासून वेगळे करणे, “pit of despair” सारख्या उपकरणांमध्ये दीर्घकाळ एकाकी ठेवणे, आणि जाणीवपूर्वक मानसिक त्रास देणे या सर्व बाबींमुळे प्राणी-अधिकार कार्यकर्त्यांनी आणि नैतिक तज्ज्ञांनी आक्षेप घेतला (Blum, 2002).

त्या काळात संशोधनासाठी आजसारख्या कठोर नैतिक मार्गदर्शक तत्त्वांचा अभाव होता. आज मात्र Institutional Animal Care and Use Committees (IACUC) आणि इतर नैतिक समित्या प्राण्यांवरील प्रयोगांसाठी कठोर निकष लावतात. संशोधनात “minimization of harm” आणि “ethical justification” आवश्यक मानले जाते. त्यामुळे हरलो यांच्यासारख्या तीव्र सामाजिक-वंचितता प्रयोगांना आज मान्यता मिळणे अशक्य आहे.

मानसशास्त्रीय आणि सामाजिक महत्त्व

हरलो यांच्या संशोधनामुळे “contact comfort” ही संकल्पना मानसशास्त्रात मध्यवर्ती ठरली. स्पर्श, ऊब आणि शारीरिक जवळीक या केवळ भावनिक नव्हे तर जैविक गरजा आहेत, हे त्यांनी सिद्ध केले. पुढील संशोधनात दिसून आले की त्वचास्पर्शामुळे ऑक्सिटोसिनसारखे हार्मोन्स स्रवतात, जे भावनिक बंध दृढ करतात (Carter, 1998).

या निष्कर्षांचा प्रभाव अनाथालये आणि बालसंगोपन धोरणांवरही पडला. 20व्या शतकाच्या मध्यात अनेक अनाथालयांमध्ये मुलांना अन्न व स्वच्छता मिळत असली तरी भावनिक संपर्काचा अभाव होता. हरलो यांच्या संशोधनानंतर बालसंगोपनात “responsive caregiving” वर भर देण्यात आला.

त्यामुळे स्पष्ट झाले की केवळ भौतिक गरजा पूर्ण करून बालविकास साध्य होत नाही. पालकत्वात “emotional availability” म्हणजे मुलाच्या भावनिक गरजांना संवेदनशील प्रतिसाद देणे अत्यंत महत्त्वाचे आहे. सुरक्षित जडणघडण असलेल्या मुलांमध्ये आत्मविश्वास, सामाजिक कौशल्ये आणि भावनिक स्थैर्य अधिक आढळते (Sroufe, 2005).

आजच्या संदर्भात महत्त्व

आज डिजिटल युगात पालक मुलांना उत्कृष्ट शैक्षणिक साधने, तांत्रिक सुविधा आणि भौतिक सुखसोयी देतात; परंतु वेळ, स्पर्श, संवाद आणि भावनिक साथ यांची कमतरता वाढताना दिसते. संशोधन दर्शवते की पालक-अपत्य संवादातील गुणवत्तापूर्ण वेळ भावनिक सुरक्षिततेसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. हरलो यांच्या प्रयोगांनी आपल्याला एक मूलभूत सत्य शिकवले प्रेम, स्पर्श आणि भावनिक बंध ही जैविक व मानसशास्त्रीय गरज आहेत; त्या लक्झरी नाहीत. बालपणातील सुरक्षित बंध हे मानसिक आरोग्याचे पायाभूत तत्त्व आहे.

समारोप:

Harry Harlow यांचे माकडांवरील प्रयोग हा मानसशास्त्रातील एक ऐतिहासिक टप्पा आहेत. त्यांनी सिद्ध केले की, आई-मुलाचे नाते केवळ अन्नावर आधारित नसते ते स्पर्श, ऊब आणि सुरक्षितता या मुलाच्या व्यक्तिमत्त्व विकासासाठी अत्यावश्यक आहेत. तसेच बालपणातील भावनिक अनुभव आयुष्यभर परिणाम करतात. हा प्रयोग वादग्रस्त असला तरी त्यांनी मानवाच्या भावनिक विकासाविषयीची समज अधिक सखोल केली.

संदर्भ:

Ainsworth, M. D. S., Blehar, M. C., Waters, E., & Wall, S. (1978). Patterns of attachment: A psychological study of the strange situation. Hillsdale, NJ: Erlbaum.

Blum, D. (2002). Love at Goon Park. Perseus Publishing.

Bowlby, J. (1969/1982). Attachment and loss: Vol. 1. Attachment. Basic Books.

Carter, C. S. (1998). Neuroendocrine perspectives on social attachment. Psychoneuroendocrinology, 23(8), 779–818.

Dollard, J., & Miller, N. E. (1950). Personality and Psychotherapy. New York: McGraw-Hill.

Freud, S. (1953). Three Essays on the Theory of Sexuality. (Original work published 1905).

Harlow, H. F. (1958). The nature of love. American Psychologist, 13(12), 673–685.

Harlow, H. F., & Harlow, M. K. (1962). Social deprivation in monkeys. Scientific American, 207(5), 136–146.

Harlow, H. F., & Zimmerman, R. R. (1959). Affectional responses in the infant monkey. Science, 130(3373), 421–432.

Skinner, B. F. (1953). Science and Human Behavior. New York: Macmillan.

Sroufe, L. A. (2005). Attachment and development. Attachment & Human Development, 7(4), 349–367.

Suomi, S. J., Harlow, H. F., & Kimball, S. D. (1971). Behavioural effects of prolonged partial social isolation in rhesus monkeys. Psychological Reports, 29, 1171–1177.

Watson, J. B. (1928). Psychological Care of Infant and Child. New York: Norton.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments and suggestions

आई-मुलाचे नाते: Harry Harlow आणि माकडांवरील प्रयोग

  आई-मुलाचे नाते: Harry Harlow आणि माकडांवरील प्रयोग (सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार) “माणूस असो की प्राणी आई प्रत्येकालाच हवी.”...