अल्बर्ट
बंडूरा (Albert Bandura): निरीक्षण
आणि मानवी क्षमतेचा शोध
![]() |
| (सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार) |
मानसशास्त्राच्या
इतिहासात काही विचारवंत असे झाले की ज्यांनी केवळ नवे सिद्धांत मांडले नाहीत, तर मानवी स्वभावाविषयीची मूलभूत समजच बदलून टाकली. अल्बर्ट बंडूरा हे अशाच
परिवर्तनशील मानसशास्त्रज्ञांपैकी एक. विसाव्या शतकाच्या उत्तरार्धात प्रभावी असलेल्या
वर्तनवाद आणि मनोविश्लेषण यांच्या दरम्यान त्यांनी एक मध्यममार्ग सुचवला कि मानव
केवळ बाह्य बक्षीस-शिक्षा किंवा अचेतन प्रेरणांचा परिणाम नसून, तो बोधनिक, सामाजिक आणि आत्मविश्वासपूर्ण एजंट आहे.
बंडूरा
यांनी मांडलेली सामाजिक अध्ययन सिद्धांत आणि नंतर विकसित केलेली सामाजिक-बोधनिक सिद्धांत
यांमुळे मानसशास्त्रात “मानव स्वतःचा शिल्पकार आहे” ही धारणा बळकट झाली (Bandura,
1977; Bandura, 1986). त्यांच्या मते, माणूस परिस्थितीचा निष्क्रीय बळी नसतो; तो निरीक्षण
करतो, अर्थ लावतो, अपेक्षा तयार करतो
आणि त्या अपेक्षांवर आधारित कृती करतो. या विचाराने अध्ययन, व्यक्तिमत्त्व,
आरोग्य, माध्यम अभ्यास आणि गुन्हेगारी
मानसशास्त्र यांसारख्या विविध क्षेत्रांमध्ये क्रांतिकारी बदल घडवले.
बालपण
आणि शिक्षण
अल्बर्ट
बंडूरा यांचा जन्म 4 डिसेंबर 1925 रोजी कॅनडातील अल्बर्टा प्रांतातील मुंडारे या
छोट्याशा गावात झाला. त्यांचे आई-वडील पूर्व युरोपमधील युक्रेनियन स्थलांतरित
होते. ग्रामीण आणि मर्यादित साधनसंपत्ती असलेल्या वातावरणात त्यांचे बालपण गेले.
त्यांच्या शाळेत शिक्षकांची संख्या कमी होती; त्यामुळे विद्यार्थ्यांना स्व-अध्ययनाची सवय लागली. या अनुभवाने त्यांच्या
पुढील विचारांवर खोल परिणाम केला.
बंडूरा
यांनी नंतर नमूद केले की मर्यादित शैक्षणिक साधनसंपत्ती असूनही, विद्यार्थ्यांनी स्वतः अभ्यास करून प्रगती केली, यातून त्यांना मानवी
क्षमतेवरील विश्वास दृढ झाला (Bandura, 2006). त्यांची
प्रसिद्ध धारणा “People are producers of their own life circumstances,
not just products of them” याच जीवनानुभवातून विकसित झाली.
त्यांनी
कॅनडातील University of British Columbia येथून
मानसशास्त्रात पदवी पूर्ण केली. विशेष म्हणजे त्यांनी मानसशास्त्र हा विषय
योगायोगाने निवडला होता, त्याचे झाले असे कि त्यांच्या
अभ्यासक्रमात जागा रिकामी असल्याने त्यांनी तो विषय घेतला; परंतु
पुढे तोच त्यांच्या आयुष्याचा ध्यास ठरला. त्यानंतर त्यांनी अमेरिकेतील University
of Iowa येथे पीएच.डी. पूर्ण केली (1952). त्या काळात आयोवा
विद्यापीठ हे सामाजिक अध्ययन आणि वर्तन संशोधनाचे प्रमुख केंद्र होते, ज्याचा बंडूरा यांच्या विचारांवर प्रभाव पडला.
पीएच.डी.
पूर्ण केल्यानंतर ते Stanford University येथे
प्राध्यापक म्हणून रुजू झाले (1953) आणि संपूर्ण कारकीर्द तेथेच व्यतीत केली.
स्टॅनफर्डमध्ये त्यांनी सामाजिक अधिगम, आक्रमकता, माध्यमांचा प्रभाव, आणि स्व-सक्षमता यांवर व्यापक
संशोधन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक संशोधकांनी पुढे मानसशास्त्रात
महत्त्वपूर्ण योगदान दिले.
स्व-अध्ययन
ते स्व-सक्षमता: जीवनानुभव आणि सिद्धांत
बंडूरा
यांच्या बालपणातील अनुभव जसे मर्यादित साधनसंपत्ती, स्व-अभ्यास, आणि सामाजिक निरीक्षण हे त्यांच्या
पुढील सिद्धांतांमध्ये प्रतिबिंबित झाले. त्यांनी मानवी वर्तनाकडे केवळ “उद्दीपक-प्रतिसाद”
या चौकटीत न पाहता, बोधात्मक प्रक्रियेच्या नजरेतून पाहिले.
त्यांच्या मते, मानव “symbolizing, forethought,
vicarious learning, self-regulation, and self-reflection” या
क्षमतांनी युक्त असतो (Bandura, 1986).
याच
पार्श्वभूमीवर त्यांनी पुढे स्व-सक्षमता ही संकल्पना म्हणजे एखादे कार्य
यशस्वीरीत्या पार पाडण्याच्या स्वतःच्या क्षमतेवरील विश्वास विकसित केली. ही
संकल्पना त्यांच्या 1977 मधील ऐतिहासिक लेखात स्पष्ट झाली (Bandura,
1977). स्व-सक्षमता हे केवळ व्यक्तिमत्त्वाचे वैशिष्ट्य नसून,
ते कार्यविशिष्ट (task-specific) आणि
परिस्थितीनुरूप बदलणारे असते.
त्यांच्या
मते, व्यक्तीच्या अपेक्षा आणि स्वतःवरील विश्वास हेच
तिच्या प्रयत्नांची तीव्रता, चिकाटी आणि भावनिक प्रतिसाद
ठरवतात. म्हणूनच बंडूरा यांचे मानसशास्त्र हे “सक्षमीकरणाचे मानसशास्त्र” (Psychology
of Empowerment) म्हणून ओळखले जाते.
![]() |
| (सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार) |
Bobo Doll प्रयोग:
निरीक्षणातून शिकण्याचा वैज्ञानिक पुरावा
1961 साली अल्बर्ट बंडूरा, डोरोथी रॉस आणि
शीला रॉस यांनी केलेला Bobo Doll Experiment हा आधुनिक
सामाजिक मानसशास्त्रातील एक क्रांतिकारी टप्पा मानला जातो (Bandura,
Ross & Ross, 1961). त्या काळात वर्तनवादी दृष्टिकोन
प्रचलित होता. B. F. Skinner आणि John B. Watson यांसारख्या
मानसशास्त्रज्ञांच्या मतानुसार शिकणे हे मुख्यतः बक्षीस आणि शिक्षा यांवर आधारित असते. परंतु बंडूरा यांनी या संकल्पनेला आव्हान देत
दाखवून दिले की माणूस विशेषतः मुले हे केवळ निरीक्षण करूनही नवीन वर्तन आत्मसात
करू शकतात.
1. प्रयोगाची पार्श्वभूमी आणि रचना
1959–60 च्या दशकात दूरदर्शन आणि
माध्यमांमधील हिंसेचा मुलांवर काय परिणाम होतो, हा प्रश्न
समाजात चर्चेत होता. बंडूरा यांनी या सामाजिक प्रश्नाला वैज्ञानिक चौकटीत
तपासण्याचे ठरवले. त्यांना हे जाणून घ्यायचे होते की मुले प्रत्यक्ष बक्षीस किंवा
शिक्षा न मिळताही फक्त पाहून आक्रमक वर्तन शिकतात का?
या प्रयोगात 3 ते 6 वर्षे वयोगटातील 72
मुलांचा सहभाग होता. मुलांना तीन गटांमध्ये विभागले गेले:
आक्रमक मॉडेल गट – या गटातील मुलांनी एका प्रौढ
व्यक्तीला फुगवता येणाऱ्या “Bobo” बाहुलीवर लाथा-बुक्क्यांनी मारताना, हातोड्याने
मारताना आणि आक्रमक शब्द वापरताना पाहिले.
अनाक्रमक मॉडेल गट – या गटातील मुलांनी प्रौढ
व्यक्तीला त्या बाहुलीबरोबर शांतपणे खेळताना पाहिले.
नियंत्रक गट (Control Group)
– या
गटातील मुलांनी कोणतेही मॉडेल पाहिले नाही.
यानंतर सर्व मुलांना स्वतंत्र खोलीत
नेऊन Bobo बाहुलीसह खेळण्यास दिले गेले. संशोधकांनी मुलांचे वर्तन बारकाईने
निरीक्षण केले.
2. प्रयोगाचे निष्कर्ष
परिणाम अत्यंत स्पष्ट होते. ज्या
मुलांनी प्रौढ व्यक्तीचे आक्रमक वर्तन पाहिले होते, त्यांनी त्याच
पद्धतीने बाहुलीवर आक्रमक हल्ले केले. त्यांनी केवळ शारीरिक आक्रमकता दाखवली नाही, तर प्रौढांनी
वापरलेले शब्द आणि वाक्येही तंतोतंत पुनरावृत्त केली (Bandura
et al., 1961). याउलट, अनाक्रमक मॉडेल पाहिलेल्या मुलांनी
तुलनेने शांत वर्तन केले. नियंत्रण गटातील मुलांमध्ये आक्रमकता सर्वात कमी दिसली.
3. निरीक्षणातून शिकणे (Observational
Learning)
या प्रयोगातून बंडूरा यांनी सिद्ध
केले की शिकण्यासाठी प्रत्यक्ष reinforcement आवश्यक नसते. मुले “vicarious
learning” म्हणजेच परोक्ष अनुभवातून शिकतात. त्यांनी हे दाखवले की शिकण्याची
प्रक्रिया चार टप्प्यांत घडते (Bandura, 1977): (सविस्तर वर्णन पुढे दिलेले
आहे)
Attention (अवधान) –
मुलांनी मॉडेलकडे लक्ष दिले.
Retention (स्मरण) –
पाहिलेले वर्तन स्मरणात ठेवले.
Reproduction (पुनरुत्पादन) –
ते वर्तन कृतीत उतरवले.
Motivation (प्रेरणा) –
परिस्थिती मिळताच ते वर्तन व्यक्त केले.
4. बक्षीस-शिक्षेविना
शिकणे
नंतरच्या 1963 च्या अभ्यासात (Bandura,
Ross & Ross, 1963) असे आढळले की जर मॉडेलला आक्रमक वर्तनासाठी बक्षीस मिळाले, तर मुलांची
आक्रमकता वाढते; आणि जर शिक्षा मिळाली, तर ती कमी
होते. परंतु महत्त्वाचा मुद्दा असा की मुलांनी वर्तन शिकलेले असते, फक्त ते व्यक्त
करायचे की नाही हे परिस्थितीवर अवलंबून असते. यामुळे वर्तन
वादाच्या “reinforcement-only learning” या भूमिकेला
मर्यादा असल्याचे स्पष्ट झाले.
5. माध्यमांचा
प्रभाव
या प्रयोगाने माध्यमांतील हिंसेबद्दल
गंभीर प्रश्न उपस्थित केले. जर मुले प्रत्यक्ष जीवनातील मॉडेल्सकडून शिकतात, तर चित्रपट, दूरदर्शन, आणि आजच्या
काळात सोशल मीडिया हे सर्व प्रभावी मॉडेल ठरतात. पुढील दशकांत माध्यम-हिंसेवरील
संशोधनाला या प्रयोगाने भक्कम पाया दिला (Huesmann, 1998).
Social Learning
Theory कडे वाटचाल
या निष्कर्षांवर आधारित बंडूरा यांनी
Social Learning Theory विकसित केली (Bandura, 1977). या
सिद्धांतानुसार माणूस हा सक्रिय, विचारशील आणि पर्यावरणाशी संवाद
साधणारा घटक आहे. तो केवळ प्रतिक्रियाशील नसून, निरीक्षण, अपेक्षा आणि
आत्मविश्वास यांच्या आधारे वर्तन घडवतो. या
दृष्टिकोनाला एक महत्त्वपूर्ण बौद्धिक आव्हान दिले. त्यांनी मांडले की माणूस केवळ
बाह्य बक्षीस-शिक्षेवर प्रतिक्रिया देणारा जीव नाही; तो विचार करणारा, निरीक्षण करणारा आणि स्व-नियंत्रित व्यक्ती आहे. त्यांच्या Social
Learning Theory (नंतर Social Cognitive Theory) ने अध्ययन प्रक्रियेला एक बोधात्मक व सामाजिक परिमाण दिले (Bandura,
1977; 1986).
1. Social Learning Theory: मूलभूत
गाभा
बंडूरा यांच्या मते अध्ययन हे केवळ
प्रत्यक्ष अनुभवातूनच होत नाही; ते निरीक्षण आणि आदर्श यातून देखील होते. 1961 मधील
प्रसिद्ध Bobo Doll प्रयोगातून त्यांनी दाखवून दिले की मुले
प्रौढांच्या आक्रमक वर्तनाचे अनुकरण करतात, जरी त्यांना थेट
बक्षीस किंवा शिक्षा मिळालेली नसली तरी (Bandura, Ross & Ross, 1961). यातून पुढील निष्कर्ष समोर आला:
वर्तन शिकण्यासाठी प्रत्यक्ष reinforcement आवश्यक
नाही.
सामाजिक मॉडेल (पालक, शिक्षक, माध्यमातील पात्रे) अत्यंत प्रभावी असतात.
शिक्षणात संज्ञानात्मक प्रक्रिया (विचार, अपेक्षा, कल्पना) मध्यवर्ती भूमिका बजावतात.
यामुळे वर्तनवादाच्या यांत्रिक
मॉडेलऐवजी एक अधिक मानवी, गतिशील आणि सामाजिक मॉडेल पुढे आले.
2. शिक्षणाचे चार घटक (Four Processes of Observational
Learning)
Bandura (1977)
यांच्या मते निरीक्षणातून शिक्षण घडण्यासाठी चार परस्परसंबंधित प्रक्रिया आवश्यक
आहेत:
अ. अवधान (Attention):
कोणतेही वर्तन शिकण्यासाठी प्रथम
त्या मॉडेलकडे लक्ष देणे आवश्यक असते. व्यक्तीचे लक्ष आकर्षित करणारे घटक जसे मॉडेलची
प्रतिष्ठा,
आकर्षकता, अधिकार, किंवा
भावनिक प्रभाव हे महत्त्वाचे असतात. उदाहरणार्थ, एखादा
लोकप्रिय शिक्षक किंवा प्रसिद्ध सेलिब्रिटी विद्यार्थ्यांवर अधिक प्रभाव टाकतो. यातून
शिक्षणशास्त्रात "Teacher as Role Model" ही
संकल्पना बळकट झाली. माध्यम संशोधनातही जाहिरातीतील व्यक्तिमत्त्वांचा प्रभाव
अभ्यासला जाऊ लागला (Bandura, 2001).
ब. स्मरण (Retention)
लक्ष दिल्यानंतर निरीक्षित वर्तन
स्मरणात साठवले गेले पाहिजे. ही प्रक्रिया प्रतिमा (imaginal coding) आणि
भाषिक प्रतिकात्मकता (verbal coding) यांद्वारे घडते. उदा.,
मुलगा एखाद्या क्रिकेटपटूची फलंदाजी पाहतो आणि तिचे मानसिक चित्र
तयार करतो. स्मरणाशिवाय अनुकरण शक्य नाही. त्यामुळे शिक्षण प्रक्रियेत पुनरावृत्ती,
नोट्स, आणि मानसिक पुनर्रचना (mental
rehearsal) महत्त्वाची ठरते.
क. पुनरुत्पादन (Reproduction):
स्मरणात साठवलेले वर्तन प्रत्यक्ष
कृतीत आणण्यासाठी शारीरिक आणि संज्ञानात्मक क्षमता आवश्यक असते. एखाद्या मुलाने
पियानोवादन पाहिले, परंतु त्याच्याकडे आवश्यक कौशल्य नसेल तर तो ते
त्वरित पुनरुत्पादित करू शकत नाही. यामुळे कौशल्य विकास (skill
acquisition) आणि सराव (practice) यांचे
महत्त्व अधोरेखित होते.
ड. प्रेरणा (Motivation)
एखादे वर्तन शिकले असले तरी ते
व्यक्त केले जाईलच असे नाही. व्यक्तीला ते करण्याची प्रेरणा असावी लागते. प्रेरणा
तीन प्रकारची असू शकते:
प्रत्यक्ष बक्षीस (Direct reinforcement)
परोक्ष बक्षीस (Vicarious reinforcement)
स्व-प्रेरणा (Self-reinforcement)
उदा., एखाद्या विद्यार्थ्याने दुसऱ्या
विद्यार्थ्याला चांगले गुण मिळताना पाहिले, तर तोही अभ्यास
करण्यास प्रेरित होऊ शकतो. ही प्रक्रिया गुन्हेगारी मानसशास्त्रात विशेष
महत्त्वाची आहे—माध्यमांतील हिंसक मॉडेल्स पाहून व्यक्तीमध्ये आक्रमकता वाढू शकते
(Bandura, 1973).
3. Reciprocal Determinism: त्रिकोणी
परस्परसंबंध
Bandura (1986) यांनी
पुढे "Reciprocal Determinism" ही संकल्पना
मांडली. त्यांच्या मते वर्तन, वैयक्तिक घटक (विचार, भावना) आणि पर्यावरण हे तिन्ही एकमेकांवर प्रभाव टाकतात. ही संकल्पना
आधुनिक शैक्षणिक मानसशास्त्र, बालविकास संशोधन आणि
गुन्हेगारी विश्लेषणासाठी अत्यंत उपयुक्त ठरली आहे. व्यक्ती फक्त पर्यावरणाचा
परिणाम नसून पर्यावरणालाही आकार देणारी असते.
4. विविध क्षेत्रांवरील प्रभाव
शिक्षणशास्त्र: Teacher modeling, peer learning आणि
self-efficacy या संकल्पना शिक्षण क्षेत्रात व्यापकपणे
वापरल्या जातात. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढविणे ही शिक्षणाची मध्यवर्ती बाब
बनली आहे.
बालविकास: पालकांचे वर्तन, माध्यमातील पात्रे,
आणि सामाजिक वातावरण मुलांच्या व्यक्तिमत्त्व घडवण्यात निर्णायक
ठरतात.
माध्यम संशोधन: हिंसक टीव्ही कार्यक्रम, गेम्स आणि सोशल
मीडियाचा परिणाम समजून घेण्यासाठी Social Learning Theory आधारभूत
ठरली आहे (Bandura, 2001).
गुन्हेगारी मानसशास्त्र: आक्रमकता आणि
गुन्हेगारी वर्तन हे निरीक्षणातून शिकले जाऊ शकते, या निष्कर्षामुळे गुन्हे
प्रतिबंधात्मक कार्यक्रमांमध्ये सकारात्मक मॉडेलिंगवर भर दिला जातो.
Self-Efficacy संकल्पना: “मी करू
शकतो” हा विश्वास
1. Self-Efficacy: संकल्पनेचा सखोल
अर्थ
1977 मध्ये अल्बर्ट बंडूरा यांनी “Self-Efficacy: Toward a Unifying
Theory of Behavioral Change” या ऐतिहासिक लेखातून Self-Efficacy
ही संकल्पना मांडली (Bandura, 1977).
त्यांच्या मते Self-Efficacy म्हणजे एखादे विशिष्ट कार्य
यशस्वीपणे पार पाडण्याबाबत व्यक्तीची स्वतःच्या क्षमतेवर असलेली श्रद्धा. ही केवळ
सर्वसाधारण आत्मविश्वासाची भावना नसून परिस्थिती-विशिष्ट आणि कार्य-विशिष्ट (task-specific)
विश्वास आहे.
बंडूरा (1986, 1997) यांच्या
सामाजिक-बोधनिक सिद्धांतानुसार मानवी वर्तन हे वैयक्तिक घटक, वर्तन आणि पर्यावरण यांच्या परस्पर प्रभावातून घडते. या त्रिकोणीय
परस्परसंवादात Self-Efficacy हा मध्यवर्ती घटक आहे. एखाद्या
व्यक्तीकडे कौशल्य असले तरी जर तिला “मी हे करू शकतो” असा विश्वास नसेल, तर ती प्रयत्न करणार नाही किंवा लवकर हार मानेल. त्यामुळे यशामध्ये
कौशल्याइतकीच, किंबहुना काही वेळा त्याहून अधिक Self-Efficacy निर्णायक ठरते. Self-Efficacy तीन स्तरांवर परिणाम
घडवते:
निवड (Choice behavior) – व्यक्ती कोणते
कार्य स्वीकारते किंवा टाळते.
प्रयत्न व चिकाटी (Effort & Persistence) – अडचणी आल्या तरी किती काळ टिकते.
भावनिक प्रतिक्रिया (Emotional reactions) – ताण, भीती, उत्साह यांचे
नियमन.
2. Self-Efficacy चे चार स्रोत
बंडूरा (1997) यांनी Self-Efficacy विकसित
होण्याचे चार प्रमुख स्रोत स्पष्ट केले आहेत:
अ. Mastery Experience (स्वतःचा
यशस्वी अनुभव)
हा Self-Efficacy वाढवण्याचा सर्वात
प्रभावी स्रोत मानला जातो. एखादे कार्य यशस्वीपणे पूर्ण केल्यावर व्यक्तीला “मी
करू शकतो” हा ठोस अनुभव मिळतो. उदाहरणार्थ, विद्यार्थी
एखाद्या कठीण परीक्षेत यशस्वी झाला तर पुढील आव्हानांना तो अधिक आत्मविश्वासाने
सामोरा जातो. उलट सतत अपयश आल्यास Self-Efficacy कमी होऊ
शकते. त्यामुळे शैक्षणिक आणि प्रशिक्षण प्रक्रियेत टप्प्याटप्प्याने यशस्वी अनुभव
देणे अत्यंत महत्त्वाचे ठरते (Bandura, 1997).
ब. Vicarious Experience (इतरांचे
निरीक्षण)
इतर व्यक्ती आपल्यासारख्या
परिस्थितीत यशस्वी होताना पाहणे हे देखील Self-Efficacy वाढवते. विशेषतः
जेव्हा “माझ्यासारखाच” एखादा व्यक्ती यश मिळवतो, तेव्हा
निरीक्षकाच्या मनातही “जर तो करू शकतो तर मीही करू शकतो” असा विश्वास निर्माण
होतो. ही संकल्पना बंडूरा यांच्या Social Learning Theory शी
संबंधित आहे (Bandura, 1986). माध्यमे, आदर्श व्यक्तिमत्त्वे, शिक्षक, प्रशिक्षक हे सर्व Vicarious Experience चे स्रोत
ठरू शकतात.
क. Verbal Persuasion (प्रोत्साहन व
सकारात्मक अभिप्राय)
विश्वासार्ह व्यक्तीकडून मिळणारे
प्रोत्साहन,
सकारात्मक अभिप्राय किंवा मार्गदर्शन Self-Efficacy वाढवते. शिक्षक, पालक, प्रशिक्षक
किंवा थेरपिस्ट जर व्यक्तीला तिच्या क्षमतेबद्दल सकारात्मक संदेश देतात, तर ती अधिक प्रयत्नशील बनते. तथापि, बंडूरा यांनी
स्पष्ट केले आहे की केवळ शब्द पुरेसे नसतात; ते वास्तववादी
आणि अनुभवाधारित असणे आवश्यक आहे (Bandura, 1997).
ड. Emotional & Physiological States (भावनिक आणि शारीरिक स्थिती)
व्यक्तीची भावनिक अवस्था तिच्या Self-Efficacy वर
परिणाम करते. जास्त ताण, भीती, घबराट
किंवा शारीरिक अस्वस्थता असल्यास व्यक्ती स्वतःच्या क्षमतेबद्दल शंका घेते. उलट
शांतता, स्थैर्य आणि सकारात्मक भावनिक स्थिती असल्यास Self-Efficacy
वाढते. उदाहरणार्थ, सार्वजनिक भाषणापूर्वीची
घबराट कमी केल्यास व्यक्तीचा आत्मविश्वास वाढतो.
3. विविध क्षेत्रांतील उपयोग
(अ) शैक्षणिक मानसशास्त्र
शैक्षणिक संशोधनात Self-Efficacy हा
शैक्षणिक यशाचा महत्त्वाचा भविष्यवेधी मानला जातो (Schunk, 1991;
Pajares, 1996). ज्या विद्यार्थ्यांचा शैक्षणिक Self-Efficacy
जास्त असतो ते कठीण विषय स्वीकारतात, अधिक
अभ्यास करतात आणि अपयशानंतरही प्रयत्न सुरू ठेवतात. त्यामुळे आधुनिक शिक्षणपद्धतीत
विद्यार्थ्यांना छोटे-छोटे यशस्वी अनुभव देणे, सकारात्मक
अभिप्राय देणे आणि आदर्श मॉडेल्स उपलब्ध करून देणे यावर भर दिला जातो.
(ब) क्रीडा मानसशास्त्र
क्रीडा क्षेत्रात Self-Efficacy खेळाडूच्या
कामगिरीवर थेट परिणाम करते. उच्च Self-Efficacy असलेले
खेळाडू स्पर्धात्मक तणावाला अधिक प्रभावीपणे सामोरे जातात (Feltz et al., 2008). प्रशिक्षक खेळाडूंना सकारात्मक स्व-संवाद, कल्पनाचित्रण
(visualization) आणि पूर्वानुभवांचे पुनरावलोकन यांद्वारे Self-Efficacy
वाढवण्याचे प्रशिक्षण देतात.
(क) क्लिनिकल थेरपी
बोधनिक-वर्तन थेरपी (CBT) मध्ये Self-Efficacy
वाढवणे हे एक प्रमुख उद्दिष्ट असते. नैराश्य, फोबिया,
व्यसनाधीनता इत्यादी समस्यांमध्ये व्यक्ती स्वतःला असमर्थ समजते.
थेरपीत टप्प्याटप्प्याने यशस्वी अनुभव देऊन आणि नकारात्मक विचारांना आव्हान देऊन Self-Efficacy
वाढवली जाते (Bandura, 1997). संशोधन दर्शवते
की वाढलेली Self-Efficacy उपचारांच्या यशात महत्त्वाची
भूमिका बजावते.
(ड) व्यक्तिमत्त्व विकास व नेतृत्व
Self-Efficacy हा
व्यक्तिमत्त्व विकासातील मुख्य घटक आहे. उच्च Self-Efficacy असलेली
व्यक्ती ध्येय निश्चित करते, जोखीम स्वीकारते आणि दीर्घकालीन
प्रयत्न करते. नेतृत्व संशोधनात देखील “Leader Self-Efficacy” हा प्रभावी नेतृत्वाशी संबंधित आढळतो (Chemers et al., 2000). त्यामुळे व्यक्तिमत्त्व विकास कार्यक्रमांमध्ये आत्मविश्वास वृद्धी,
कौशल्य प्रशिक्षण आणि अनुभवाधारित शिक्षणावर भर दिला जातो.
जागतिक सन्मान
अल्बर्ट बंडूरा हे विसाव्या आणि
एकविसाव्या शतकातील सर्वात प्रभावशाली मानसशास्त्रज्ञांपैकी एक मानले जातात. 1974
साली ते American
Psychological Association (APA) चे अध्यक्ष म्हणून निवडले गेले. हे
पद केवळ प्रशासकीय सन्मान नसून त्या काळातील मानसशास्त्रातील बौद्धिक नेतृत्वाचे
प्रतीक होते. अध्यक्षीय भाषणात त्यांनी “Self-Efficacy: Toward a Unifying
Theory of Behavioural Change” या संकल्पनेचा पाया अधिक मजबूत केला
(Bandura, 1977). APA अध्यक्षपद हे
त्यांच्या कार्याच्या जागतिक मान्यतेचे औपचारिक अधोरेखन होते.
याशिवाय त्यांना अनेक प्रतिष्ठित
आंतरराष्ट्रीय पुरस्कारांनी गौरविण्यात आले. 1980 साली त्यांना APA कडून “Distinguished
Scientific Contribution Award” प्रदान करण्यात आला. 2004 मध्ये
त्यांना American Psychological Foundation कडून “Gold
Medal Award for Lifetime Achievement in the Science of Psychology” मिळाला. 2015 साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष Barack Obama यांनी त्यांना National Medal of Science हा
अमेरिकेतील सर्वोच्च वैज्ञानिक सन्मान प्रदान केला. या सन्मानातून त्यांच्या
संशोधनाने केवळ मानसशास्त्रच नव्हे तर शिक्षण, आरोग्य,
सामाजिक धोरण आणि माध्यम संशोधन या सर्व क्षेत्रांवर केलेल्या
व्यापक प्रभावाची दखल घेण्यात आली.
शास्त्रीय प्रभावाच्या दृष्टीने
बंडूरा हे जगातील सर्वाधिक सायटेड मानसशास्त्रज्ञांपैकी एक होते. विविध
सायंटोमेट्रिक अभ्यासांनुसार (Haggbloom et al., 2002) ते २०व्या शतकातील चौथ्या
क्रमांकाचे सर्वाधिक प्रभावशाली मानसशास्त्रज्ञ ठरले. Google Scholar आणि Web of Science सारख्या डेटाबेसमध्ये त्यांच्या
संशोधनाला लाखो सायटेशन्स मिळाली आहेत. विशेषतः Social Learning Theory (1977) आणि Self-Efficacy: The Exercise of Control (1997)
या ग्रंथांनी संशोधनविश्वात दीर्घकालीन प्रभाव निर्माण केला आहे (Bandura, 1997).
26 जुलै 2021 रोजी त्यांचे निधन झाले; तथापि त्यांच्या
सिद्धांतांचा प्रभाव अद्यापही तितकाच प्रभावी आहे. Self-efficacy,
reciprocal determinism आणि observational learning या संकल्पना आजही आधुनिक मानसशास्त्रातील अभ्यासक्रमाचा मुख्य भाग आहेत.
त्यामुळे त्यांचे शारीरिक अस्तित्व संपले असले तरी त्यांचे विचार, मॉडेल्स आणि संशोधनपद्धती जागतिक पातळीवर जिवंत आणि कार्यरत आहेत—हेच एका
खऱ्या वैज्ञानिक वारशाचे लक्षण आहे.
समारोप:
अल्बर्ट बंडूरा यांनी मानसशास्त्राला
केवळ सिद्धांत दिले नाहीत; त्यांनी मानवाला स्वतःकडे नव्या दृष्टीने पाहायला
शिकवले. त्यांचा संदेश स्पष्ट आहे की “आपल्या क्षमतेवर विश्वास ठेवा; कारण विश्वासच कृती निर्माण करतो आणि कृतीच भविष्य घडवते.”
संदर्भ:
Bandura, A. (1973). Aggression: A social learning analysis. Prentice-Hall.
Bandura, A. (1977). Self-efficacy: Toward a unifying theory of behavioral
change. Psychological Review, 84(2), 191–215.
Bandura, A. (1977). Social Learning Theory. Prentice-Hall.
Bandura, A. (1986). Social foundations of thought and action: A social
cognitive theory. Prentice-Hall.
Bandura, A. (1997). Self-efficacy: The exercise of control. W. H. Freeman.
Bandura, A. (2001). Social cognitive theory of mass communication. Media
Psychology, 3(3), 265–299.
Bandura, A. (2001). Social cognitive theory: An agentic perspective. Annual
Review of Psychology, 52, 1–26.
Bandura, A. (2006). Toward a psychology of human agency. Perspectives on
Psychological Science, 1(2), 164–180.
Bandura, A., Ross,
D., & Ross, S. A. (1961). Transmission of aggression
through imitation of aggressive models. Journal of Abnormal and Social
Psychology, 63, 575–582.
Bandura, A., Ross,
D., & Ross, S. A. (1963). Imitation of film-mediated
aggressive models. Journal of Abnormal and Social Psychology, 66,
3–11.
Chemers, M. M.,
Watson, C. B., & May, S. T. (2000). Dispositional
affect and leadership effectiveness. Journal of Personality and Social
Psychology, 78(3), 493–505.
Feltz, D. L.,
Short, S. E., & Sullivan, P. J. (2008). Self-efficacy
in sport. Human Kinetics.
Haggbloom, S. J.,
et al. (2002). The 100 most eminent
psychologists of the 20th century. Review of General
Psychology, 6(2), 139–152.
Huesmann, L. R. (1998). The role of social information processing and cognitive
schema in the acquisition and maintenance of habitual aggressive behavior.
Pajares, F. (1996). Self-efficacy beliefs in academic settings. Review of
Educational Research, 66(4), 543–578.
Schunk, D. H. (1991). Self-efficacy and academic motivation. Educational
Psychologist, 26(3–4), 207–231.
Skinner, B. F. (1953). Science and Human Behavior. Macmillan.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thank you for your comments and suggestions