संलग्नता/आसक्ती
सिद्धांत (Attachment Theory)
मानव
हा मूलतः सामाजिक प्राणी आहे आणि त्याचे जीवनमान, भावनिक आरोग्य व सामाजिक परस्परसंवाद हे इतरांशी असलेल्या संबंधावर अवलंबून
असतात. बालक जन्मल्यापासूनच आई, वडील किंवा काळजीवाहक
यांच्याशी तो भावनिक नातेसंबंध निर्माण करू लागतो. या नातेसंबंधांमुळे त्याला
सुरक्षिततेची जाणीव, प्रेमाची अनुभूती आणि जगण्याचा आधार
मिळतो. मानसशास्त्राच्या क्षेत्रात या भावनिक व सामाजिक बंधांना “संलग्नता” (Attachment)
किंवा “आसक्ती” असे संबोधले जाते. संलग्नता म्हणजे केवळ एक भावनिक
नाते नसून ती एक मानसिक संरचना आहे, जी व्यक्तीच्या संपूर्ण
आयुष्यात व्यक्तिमत्त्व विकास, नातेसंबंध आणि मानसिक
आरोग्यावर खोलवर परिणाम करते (Ainsworth & Bowlby, 1991).
संलग्नतेचा
अभ्यास करणारा सर्वात महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे जॉन बॉल्बी आणि मेरी एन्सवर्थ यांनी
विकसित केलेला संलग्नता सिद्धांत. या सिद्धांताने
बालविकास मानसशास्त्रात नवा दृष्टीकोन दिला. विशेषतः बालक-पालक संबंध हे
व्यक्तिमत्त्व विकासासाठी किती निर्णायक असतात, हे या
सिद्धांतातून अधोरेखित झाले (Bretherton, 1992).
संलग्नता
सिद्धांताचा उगम
संलग्नता सिद्धांताची सुरुवात ब्रिटिश मानसोपचारतज्ज्ञ जॉन बॉल्बी यांनी केली. दुसऱ्या महायुद्धाच्या काळात आणि त्यानंतर अनेक मुलं त्यांच्या पालकांपासून विभक्त झाली होती. अशा मुलांच्या भावनिक वर्तनाचा अभ्यास करताना बॉल्बी यांच्या लक्षात आले की पालकांपासून दूर राहणे किंवा दुर्लक्ष यामुळे मुलांमध्ये असुरक्षितता, चिंता, आक्रमकता, सामाजिक अडचणी आणि भावनिक असंतुलन निर्माण होऊ शकते (Bowlby, 1969/1982). बॉल्बी यांनी या निरीक्षणांच्या आधारे असे मांडले की:
- बालकासाठी काळजीवाहक व्यक्ती (बहुतेक वेळा आई) ही केवळ अन्नाचा स्रोत नसून भावनिक सुरक्षिततेचा आधार असते.
- जेव्हा आई किंवा काळजीवाहक जवळ असतो तेव्हा मुलाला सुरक्षिततेची अनुभूती होते. परंतु, जेव्हा ही व्यक्ती दूर जाते किंवा अनुपस्थित राहते, तेव्हा मुलात चिंता, भीती आणि असुरक्षिततेची भावना निर्माण होते (Bowlby, 1973).
- त्यामुळे संलग्नता ही केवळ भावनिक गरज नसून जैविकदृष्ट्याही आवश्यक असलेली प्रक्रिया आहे.
बॉल्बी
यांच्या मते संलग्नता ही मानवी उत्क्रांतीचा एक महत्त्वाचा घटक आहे. मानव प्रजाती
टिकण्यासाठी लहान मुलांना मोठ्यांच्या संरक्षणाची गरज असते. म्हणूनच संलग्नतेची
प्रवृत्ती ही जैविकदृष्ट्या प्रोग्राम्ड आहे. संलग्नतेमुळे मुलं आई-वडील किंवा
काळजीवाहकांच्या जवळ राहतात आणि त्यामुळे त्यांच्या जगण्याची शक्यता वाढते. त्यामुळे
संलग्नता ही केवळ एक सामाजिक किंवा सांस्कृतिक संकल्पना नसून ती मानवाच्या
अस्तित्वाशी निगडित असलेली मूलभूत मानसशास्त्रीय व जैविक प्रक्रिया आहे.
मेरी एन्सवर्थ यांचे योगदान (Mary
Ainsworth’s Contribution)
संलग्नता सिद्धांताचा पाया जॉन
बॉल्बी यांनी रचला असला तरी त्याला वैज्ञानिकदृष्ट्या पुष्टी देण्याचे व त्याचे
अनुभवजन्य परीक्षण करण्याचे कार्य मानसशास्त्रज्ञ मेरी एन्सवर्थ (1913–1999) यांनी
केले. त्यांनी केलेल्या संशोधनामुळे संलग्नतेचे प्रकार, त्यांची
वैशिष्ट्ये व त्यांचे भविष्यातील परिणाम यांचा स्पष्ट उलगडा झाला. एन्सवर्थ यांनी
प्रामुख्याने “Strange Situation” प्रयोग (Ainsworth et al., 1978) विकसित करून मुलांच्या भावनिक बंधांचे
स्वरूप शोधून काढले.
“Strange
Situation” प्रयोग
1970 च्या दशकात मेरी
एन्सवर्थ यांनी 12 ते 18 महिन्यांच्या लहान मुलांवर हा प्रयोग केला. या प्रयोगात
मुलाला एक विशिष्ट प्रयोगशाळेत (lab setting) खेळण्यासाठी ठेवले जात असे आणि त्या
वेळी त्याच्यासोबत आई व एक अनोळखी व्यक्ती यांची उपस्थिती, गैरहजेरी आणि
पुनरागमन यांचा क्रमाने अनुभव दिला जात असे. एकूण आठ टप्पे (episodes)
असलेल्या या
प्रयोगात मुलाचे वर्तन, जसे की आईपासून विभक्त झाल्यावरची प्रतिक्रिया, अनोळखी
व्यक्तीसोबत असताना केलेले वर्तन आणि आई परत आल्यावरची प्रतिक्रिया काळजीपूर्वक
नोंदवली जात असे (Ainsworth et al., 1978). या
पद्धतीतून एन्सवर्थ यांनी मुलांच्या भावनिक बंधांचे चार प्रमुख प्रकार निश्चित
केले यालाच संलग्नता शैली देखील म्हणतात.
1. सुरक्षित संलग्नता (Secure
Attachment)
सुरक्षित संलग्नता असलेल्या मुलांचे
वर्तन संतुलित व विश्वासपूर्ण आढळते. आई जवळ असताना अशी मुलं आत्मविश्वासाने
खेळतात, वातावरणाचा शोध घेतात आणि गरज भासल्यास आईकडे भावनिक आधारासाठी परत
जातात. आई खोली सोडून गेल्यावर अशी मुलं थोडी दुःखी होतात, पण आई परत
आल्यावर लगेच शांत होतात आणि तिच्या उपस्थितीत पुन्हा निर्धास्त होतात. या
प्रकारच्या मुलांना भविष्यात स्वत:बद्दल सकारात्मक दृष्टीकोन असतो आणि इतरांशी
विश्वासार्ह, सहकार्यपूर्ण नातेसंबंध प्रस्थापित करण्याची
क्षमता विकसित होते (Bretherton, 1992).
2. टाळणारी संलग्नता (Avoidant
Attachment)
या प्रकारातील मुलं आईच्या उपस्थितीत
तिच्याकडे जास्त लक्ष देत नाहीत. आई खोली सोडून गेल्यावरही त्यांना फारसा फरक पडत
नाही, आणि ती परत आल्यावरही त्या मुलांनी जवळ जाणे किंवा प्रेम व्यक्त करणे
टाळलेले दिसते. अशा वर्तनातून हे लक्षात येते की मुलं भावनिक आधाराची अपेक्षा न
करता स्वतःचं नियंत्रण राखण्याचा प्रयत्न करतात. भविष्यात अशा व्यक्तींमध्ये
भावनिक अंतर राखण्याची प्रवृत्ती, नात्यांमध्ये गुंतण्यास अनिच्छा व
स्वावलंबनाचा अतिरेक दिसून येऊ शकतो (Main, Kaplan,
& Cassidy, 1985).
3. दुविधात्मक/चिंताग्रस्त संलग्नता (Ambivalent/Anxious
Attachment)
या प्रकारातील मुलं आई जवळ असतानाही
अस्वस्थ किंवा असमाधानी दिसतात. आई गेल्यावर तीव्र रडणे, संताप किंवा
असुरक्षितता व्यक्त करतात. आई परत आल्यावर ते तिच्याकडे प्रेमाने धाव घेतात पण
त्याचवेळी रागही व्यक्त करतात – जसे की तिच्या मिठीत जाण्याचा प्रयत्न करताना
पुन्हा तिला ढकलणे. या प्रकारच्या संलग्नतेत मुलं आईच्या उपलब्धतेबाबत दुविधा व
अनिश्चितता अनुभवतात. पुढील आयुष्यात अशा व्यक्तींमध्ये भावनिक अस्थिरता, नात्यांबाबत
जास्त अवलंबित्व, तसेच असुरक्षितता आढळते (Cassidy
& Berlin, 1994).
4. गोंधळलेली संलग्नता (Disorganized
Attachment)
हा प्रकार नंतरच्या संशोधनातून (Main
& Solomon, 1990) अधोरेखित झाला. अशा मुलांच्या वर्तनात ठोस पॅटर्न दिसून येत
नाही. आई जवळ जाण्याची इच्छा व्यक्त करतानाच तिची भीती वाटते, काही वेळा
आईकडे बघून गोंधळलेली किंवा विसंगत कृती केली जाते – जसे की धावत येऊन अचानक
थांबणे, मागे फिरणे किंवा चेहऱ्यावर विसंगत भाव. या प्रकाराची मुळे बहुतेक
वेळा आघातजन्य अनुभव, शारीरिक किंवा भावनिक हिंसा, दुर्लक्ष किंवा
असुरक्षित वातावरणात असतात. पुढील आयुष्यात या मुलांमध्ये मानसिक अस्थिरता, नात्यांबाबत
गोंधळ व भीतीचे मिश्रण दिसू शकते (Lyons-Ruth
& Jacobvitz, 2008).
मेरी एन्सवर्थ यांच्या संशोधनामुळे
संलग्नता सिद्धांताला अनुभवजन्य पाया मिळाला. त्यांनी दाखवून दिले की
बाल्यावस्थेतील पालक-अपत्य संबंधांचा पॅटर्न केवळ त्या क्षणापुरता न राहता प्रौढ
जीवनातील नातेसंबंध, भावनिक स्थैर्य व आत्मप्रतिमा यांवर
दीर्घकालीन प्रभाव टाकतो. त्यामुळे पालकत्वात प्रतिसादकता (responsiveness),
भावनिक
उपलब्धता (emotional availability) आणि प्रेमळ संवाद यांचा महत्त्वपूर्ण
सहभाग असल्याचे मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून स्पष्ट झाले.
संलग्नतेचे दीर्घकालीन परिणाम
बालपणात तयार होणारे संलग्नतेचे
नमुने (Attachment
Patterns) हे केवळ त्या काळापुरते मर्यादित नसून प्रौढावस्थेतील
नातेसंबंध, भावनिक स्थिरता आणि मानसिक आरोग्य यांवर दूरगामी
परिणाम करतात. जॉन बॉल्बी (Bowlby, 1969/1982) यांनी
मांडलेल्या मूलभूत गृहितकानुसार, बालपणी आई किंवा प्रमुख
काळजीवाहकाशी तयार होणारे “आंतर-कार्यक्षेत्रीय मॉडेल्स” (Internal Working
Models) नंतरच्या प्रत्येक सामाजिक व भावनिक नातेसंबंधासाठी चौकट
ठरवतात. याचा अर्थ असा की एखाद्या व्यक्तीने लहानपणी अनुभवलेली सुरक्षितता,
प्रतिसादकता आणि भावनिक आधार भविष्यात त्याच्या जोडीदार, मित्र किंवा सहकारी यांच्याशी असलेल्या व्यवहारात परावर्तित होते (Bretherton
& Munholland, 2008).
1. सुरक्षित संलग्नता (Secure Attachment)
सुरक्षित संलग्नता असलेल्या
प्रौढांना स्वतःबद्दल आणि इतरांबद्दल सकारात्मक दृष्टीकोन असतो. ते आत्मविश्वासाने
नात्यांत गुंततात, परस्पर सन्मान व सहकार्य टिकवतात आणि संघर्ष
उद्भवल्यास संवादाद्वारे त्यावर उपाय शोधतात (Feeney & Noller, 1990). संशोधनातून असे दिसून आले आहे की सुरक्षित संलग्नता असलेल्या
व्यक्तींमध्ये आत्म-सन्मान उच्च असतो, तणावाशी जुळवून
घेण्याची क्षमता जास्त असते आणि त्यांचे दीर्घकालीन नातेसंबंध तुलनेने स्थिर असतात
(Mikulincer & Shaver, 2007). त्यामुळे सुरक्षित
संलग्नता ही मानसिक आरोग्यासाठी एक संरक्षक घटक मानली जाते.
2. टाळणारी संलग्नता (Avoidant Attachment)
टाळणारी संलग्नता असलेले प्रौढ
नात्यांमध्ये जास्त भावनिक गुंतवणूक करण्याचे टाळतात. त्यांना जवळीक (intimacy) अस्वस्थ
करणारी वाटते आणि ते स्वावलंबनावर जास्त भर देतात (Hazan & Shaver, 1987). अशा व्यक्ती भावनिक गरजांना दडपतात, भावनांची
अभिव्यक्ती टाळतात व जोडीदाराशी अंतर राखतात. संशोधनानुसार, टाळणारी
संलग्नता असलेले लोक तणावाच्या प्रसंगी इतरांकडून आधार मागण्याऐवजी स्वतःला अलग
ठेवण्याची प्रवृत्ती दाखवतात (Fraley & Shaver, 2000).
दीर्घकालीन दृष्टीने हे नात्यांमध्ये असमाधान व असुरक्षितता निर्माण करू शकते.
3. चिंताग्रस्त संलग्नता (Anxious Attachment)
चिंताग्रस्त संलग्नता असलेल्या
व्यक्तींमध्ये स्वतःबद्दल नकारात्मक आणि इतरांबद्दल तुलनेने सकारात्मक दृष्टीकोन
असतो. त्यांना सतत नात्याबाबत असुरक्षितता वाटते आणि जोडीदाराच्या उपलब्धतेबाबत
अतीव अवलंबित्व असते (Cassidy & Shaver, 2016). ते लहानशा दुराव्यानेही
अस्वस्थ होतात आणि अनेकदा नात्यात "clinginess" किंवा
"possessiveness" दाखवतात. संशोधनातून असे दिसून
आले आहे की चिंताग्रस्त संलग्नता असलेल्या प्रौढांमध्ये मत्सर, भावनिक अस्थिरता आणि नात्यात वारंवार संघर्ष आढळतो (Mikulincer et
al., 2002). यामुळे दीर्घकालीन नातेसंबंध अस्थिर होण्याची शक्यता
वाढते.
4. गोंधळलेली संलग्नता (Disorganized Attachment)
गोंधळलेली संलग्नता ही सर्वात जास्त
गुंतागुंतीची व असुरक्षित पद्धत मानली जाते. बालपणी हिंसा, आघात किंवा दुर्लक्ष
अनुभवलेल्या मुलांमध्ये हा प्रकार विकसित होण्याची शक्यता जास्त असते (Main
& Solomon, 1990). प्रौढावस्थेत अशा व्यक्तींमध्ये नात्यांबाबत
विरोधाभासी वर्तन दिसून येते—एकीकडे जवळीक हवी असते, पण
त्याच वेळी त्याची भीतीही वाटते. त्यामुळे नात्यांत अस्थिरता, अनपेक्षित राग, हिंसक प्रवृत्ती किंवा भावनिक
असंतुलन निर्माण होऊ शकते (Lyons-Ruth & Jacobvitz, 2008).
दीर्घकालीन दृष्टीने हे मानसिक आरोग्याच्या समस्यांना—जसे की उदासी (depression),
व्यक्तिमत्त्व विकार (personality disorders) किंवा
नातेसंबंधातील हिंसा—आमंत्रण देऊ शकते.
संलग्नता सिद्धांताचे हे दीर्घकालीन
परिणाम दाखवतात की बालपणीचे भावनिक अनुभव आयुष्यभर परिणामकारक ठरतात. सुरक्षित
संलग्नता प्रौढावस्थेत आरोग्यदायी, स्थिर व प्रेमळ नातेसंबंध
निर्माण करते, तर असुरक्षित संलग्नतेचे प्रकार—टाळणारी,
चिंताग्रस्त आणि गोंधळलेली—हे नात्यांमध्ये अस्थिरता, अविश्वास आणि मानसिक अडचणी निर्माण करू शकतात. त्यामुळे बालकांना लहानपणी
भावनिक आधार, सुरक्षितता व प्रतिसादक पालकत्व देणे ही केवळ
तात्कालिक गरज नसून दीर्घकालीन सामाजिक व मानसिक आरोग्यासाठी अत्यावश्यक गुंतवणूक
आहे.
आधुनिक संदर्भात संलग्नता सिद्धांत
संलग्नता सिद्धांताचा उपयोग आज विविध
क्षेत्रांत मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. विशेषतः मानसोपचार (Psychotherapy) आणि
समुपदेशन या क्षेत्रांमध्ये तो अत्यंत महत्त्वाचा ठरतो. बालपणातील असुरक्षित
संलग्नता पद्धती प्रौढ वयात उद्भवणाऱ्या मानसिक आरोग्य समस्यांना कारणीभूत ठरू
शकतात. उदा., चिंताग्रस्त किंवा टाळणारी संलग्नता असलेली
व्यक्ती प्रौढावस्थेत नैराश्य, चिंता विकार किंवा भावनिक
अस्थिरतेशी झुंजताना दिसते (Mikulincer & Shaver, 2007). त्यामुळे मानसोपचारामध्ये रुग्णाच्या बालपणातील संलग्नतेचे नमुने ओळखणे,
त्यांचा वर्तमान नातेसंबंधांवर व आत्मसंकल्पनेवर कसा परिणाम झाला
आहे हे समजून घेणे, आणि त्यानुसार थेरपीची आखणी करणे
महत्त्वाचे मानले जाते.
शैक्षणिक क्षेत्रात, संलग्नता
सिद्धांताचे महत्त्व अधोरेखित केले जाते. मुलांच्या शिकण्याच्या प्रक्रियेत
त्यांच्या शिक्षकांशी असलेल्या नात्याचा मोठा वाटा असतो. शिक्षक जर बालकांना
भावनिक सुरक्षितता, स्वीकार आणि आधार देतील, तर ते मुलं शैक्षणिक यशाकडे जास्त प्रभावीपणे वाटचाल करतात (O’Connor
& McCartney, 2007). यालाच "teacher-student
attachment" असे म्हणतात. याउलट असुरक्षित संलग्नता असलेल्या
मुलांना शैक्षणिक ताण, कमी आत्मसन्मान आणि सामाजिक एकाकीपणा
जाणवतो. त्यामुळे शैक्षणिक धोरणांमध्ये प्रतिसादात्मक शिक्षकवृत्ती व सुरक्षित
शिक्षणपर्यावरणाला मोठा भर दिला जातो.
बालकांच्या पालनपोषणाच्या
पद्धतींमध्ये संलग्नता सिद्धांत थेट लागू होतो. Responsive Parenting म्हणजे
पालकांनी मुलांच्या गरजांकडे लक्ष देणे, त्यांच्या भावनिक
संकेतांना संवेदनशीलपणे प्रतिसाद देणे आणि सुरक्षित वातावरण उपलब्ध करून देणे होय.
अशा पालकत्वामुळे मुलांमध्ये सुरक्षित संलग्नता निर्माण होते, ज्याचा सकारात्मक परिणाम त्यांच्या भावनिक बुद्धिमत्तेवर, तणाव हाताळण्याच्या क्षमतेवर व सामाजिक कौशल्यांवर होतो (Cassidy
& Shaver, 2018). याउलट दुर्लक्ष, कठोर
शिस्त किंवा भावनिक दुर्बलता असलेले पालकत्व असुरक्षित संलग्नता वाढवते.
संलग्नता सिद्धांताचा उपयोग आज
व्यसनाधीनता संशोधनातदेखील केला जातो. संशोधन दर्शवते की असुरक्षित संलग्नता
असलेल्या व्यक्तींमध्ये मद्यपान, औषधांचे दुरुपयोग किंवा इतर व्यसनांकडे झुकण्याची
प्रवृत्ती जास्त असते (Thorberg & Lyvers, 2010). कारण
अशा व्यक्ती तणाव हाताळण्यासाठी किंवा भावनिक रिक्तता भरून काढण्यासाठी व्यसनांचा
वापर करतात. मानसोपचारतज्ज्ञ अशा प्रकरणांमध्ये व्यसनाच्या मूळ भावनिक कारणांचा
शोध घेण्यासाठी संलग्नता सिद्धांताचा वापर करतात.
याशिवाय, प्रौढावस्थेतील
आंतरव्यक्ती संबंधांच्या अभ्यासात देखील संलग्नता सिद्धांत महत्त्वाचा ठरतो.
प्रौढांच्या प्रेमसंबंधांमध्ये, विवाहामध्ये किंवा घनिष्ठ
मैत्रीत त्यांचे बालपणीचे संलग्नतेचे प्रकार परावर्तित होतात (Hazan &
Shaver, 1987). सुरक्षित संलग्नता असलेल्या व्यक्ती स्थिर, विश्वासार्ह व परस्पर सहाय्यकारी नातेसंबंध प्रस्थापित करतात. टाळणारे
प्रौढ भावनिक जवळीक टाळतात, तर चिंताग्रस्त संलग्नता असलेले
व्यक्ती नात्यात जास्त अवलंबित्व किंवा असुरक्षितता दाखवतात. त्यामुळे आजच्या
नातेसंबंध समुपदेशनामध्ये संलग्नता सिद्धांताला विशेष महत्त्व दिले जाते.
समारोप:
संलग्नता सिद्धांत मानवी नात्यांचा
पाया समजून घेण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहे. तो सांगतो की जीवनातील सुरुवातीचे
अनुभव आणि काळजीवाहकांशी असलेले बंध आपल्या भावनिक आरोग्याला, व्यक्तिमत्त्वाला
आणि भविष्यातील नात्यांना दिशा देतात. त्यामुळे सुरक्षित, प्रेमळ
आणि प्रतिसादक संबंध निर्माण करणे हे प्रत्येक पालक, शिक्षक
व समाजाचे महत्त्वाचे कर्तव्य आहे.
(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)
संदर्भ
Ainsworth,
M. D. S., & Bowlby, J. (1991). An ethological approach
to personality development. American Psychologist, 46(4), 333–341.
Ainsworth,
M. D. S., Blehar, M. C., Waters, E., & Wall, S. (1978). Patterns
of attachment: A psychological study of the Strange Situation. Hillsdale, NJ:
Erlbaum.
Bowlby,
J. (1969/1982). Attachment and loss: Vol. 1.
Attachment. New York: Basic Books.
Bowlby,
J. (1973). Attachment and loss: Vol. 2. Separation:
Anxiety and anger. New York: Basic Books.
Bretherton,
I. (1992). The origins of attachment theory: John Bowlby
and Mary Ainsworth. Developmental Psychology, 28(5), 759–775.
Bretherton,
I., & Munholland, K. A. (2008). Internal working
models in attachment relationships: Elaborating a central construct in
attachment theory. In J. Cassidy & P. R. Shaver (Eds.), Handbook of
attachment: Theory, research, and clinical applications (2nd
ed., pp. 102–127). Guilford Press.
Cassidy,
J., & Berlin, L. J. (1994). The insecure/ambivalent
pattern of attachment: Theory and research. Child Development, 65(4),
971–991.
Cassidy,
J., & Shaver, P. R. (Eds.). (2016). Handbook of
attachment: Theory, research, and clinical applications (3rd
ed.). Guilford Press.
Feeney,
J. A., & Noller, P. (1990). Attachment style as a
predictor of adult romantic relationships. Journal of Personality and Social
Psychology, 58(2), 281–291.
Fraley,
R. C., & Shaver, P. R. (2000). Adult romantic
attachment: Theoretical developments, emerging controversies, and unanswered
questions. Review of General Psychology, 4(2), 132–154.
Hazan,
C., & Shaver, P. (1987). Romantic love conceptualized
as an attachment process. Journal of Personality and Social Psychology, 52(3), 511–524.
Lyons-Ruth,
K., & Jacobvitz, D. (2008). Attachment
disorganization: Genetic factors, parenting contexts, and developmental
transformation from infancy to adulthood. In J. Cassidy & P. R. Shaver
(Eds.), Handbook of attachment: Theory, research, and clinical applications (2nd ed., pp. 666–697). Guilford Press.
Main,
M., & Solomon, J. (1990). Procedures for identifying
infants as disorganized/disoriented during the Ainsworth Strange Situation. In
M. T. Greenberg, D. Cicchetti, & E. M. Cummings (Eds.), Attachment in the
preschool years: Theory, research, and intervention (pp. 121–160).
University of Chicago Press.
Main,
M., Kaplan, N., & Cassidy, J. (1985). Security in
infancy, childhood, and adulthood: A move to the level of representation.
Monographs of the Society for Research in Child Development, 50(1–2),
66–104.
Mikulincer,
M., & Shaver, P. R. (2007). Attachment in adulthood: Structure, dynamics,
and change. Guilford Press.
Mikulincer,
M., Gillath, O., & Shaver, P. R. (2002). Activation of the attachment
system in adulthood: Threat-related primes increase the accessibility of mental
representations of attachment figures. Journal of Personality and Social
Psychology, 83(4), 881–895.
O’Connor,
E., & McCartney, K. (2007). Examining teacher–child
relationships and achievement as part of an ecological model of development.
American Educational Research Journal, 44(2), 340–369.
Thorberg,
F. A., & Lyvers, M. (2010). Attachment in relation to
affect regulation and interpersonal functioning among substance use disorder
patients. Addictive Behaviors, 35(7), 700–705.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thank you for your comments and suggestions