गुरुवार, ४ सप्टेंबर, २०२५

स्मृती/ स्मरण | Memory

 

स्मृती | Memory

मानवाच्या मानसिक जीवनात स्मृती हा सर्वात मूलभूत आणि महत्त्वाचा घटक मानला जातो. आपण जे काही अनुभवतो, शिकतो, वाचतो, ऐकतो किंवा पाहतो, त्याचे वेदनेंद्रियांद्वारे ग्रहण केलेले ठसे मेंदूमध्ये साठवले जातात. या साठवलेल्या ठशांचा गरजेप्रमाणे प्रत्यानयन करणे ही प्रक्रिया म्हणजे स्मृती होय. स्मृतीशिवाय मानवी ज्ञानसंपादन, शिक्षण, तर्कशक्ती, समस्या सोडविणे, तसेच दैनंदिन जीवनातील प्रत्येक कृती अशक्य ठरली असती. त्यामुळे स्मृती ही केवळ एक मानसिक प्रक्रिया नसून, ती मानवी व्यक्तिमत्त्वाच्या विकासाचा पाया आहे. मानसशास्त्रज्ञ विल्यम जेम्स (1890) यांनी स्मृतीला "मानसिक जीवनाचा आधारस्तंभ" असे म्हटले आहे. त्यांच्या मते, स्मृतीशिवाय माणूस अनुभवांमधून शिकू शकत नाही, त्यामुळे प्रत्येक क्षण वेगळा आणि अपूर्ण राहिला असता. म्हणूनच मानसशास्त्राच्या अभ्यासक्रमात स्मृतीचा विशेष अभ्यास केला जातो आणि ती मानवी वर्तनाच्या सर्व अंगांमध्ये केंद्रस्थानी मानली जाते.

स्मृतीची संकल्पना

स्मृती म्हणजे माहितीचे ग्रहण करणे (Encoding), ती संग्रहित करणे (Storage), आणि गरजेप्रमाणे पुन्हा आठवणे (Retrieval) या तीन प्रक्रियांचा एकत्रित परिणाम होय (Atkinson & Shiffrin, 1968). मानसशास्त्रज्ञांनी स्मृतीच्या या संकल्पनेचे स्पष्टीकरण देण्यासाठी विविध मॉडेल्स प्रस्तावित केले आहेत. त्यातील सर्वात महत्त्वाचे म्हणजे रिचर्ड अॅटकिन्सन आणि रिचर्ड शिफ्रिन यांनी मांडलेले Information Processing Model. या मॉडेलनुसार स्मृतीची कार्यप्रणाली संगणकाशी तुलना करता येते. जसे संगणक माहिती ग्रहण करतो, ती हार्ड डिस्कमध्ये संग्रहित करतो आणि आवश्यकतेनुसार वापरकर्त्याला उपलब्ध करून देतो, तसेच मानवी स्मृती कार्य करते.

या मॉडेलनुसार पहिला टप्पा म्हणजे ग्रहण (Encoding); यात बाह्य वातावरणातील माहिती वेदनेंद्रियांच्या साहाय्याने ग्रहण केली जाते आणि ती मानसिक प्रतीकांमध्ये रूपांतरित केली जाते. दुसरा टप्पा म्हणजे संग्रहण (Storage); या टप्प्यात ग्रहण केलेली माहिती तात्पुरत्या स्वरूपात किंवा दीर्घकाळासाठी स्मृतीत साठवली जाते. तिसरा आणि अंतिम टप्पा म्हणजे प्रत्यानयन (Retrieval); यात संग्रहित माहिती आवश्यकतेनुसार पुन्हा जागृत केली जाते व वापरली जाते (Baddeley, 1997).

म्हणजेच स्मृती ही केवळ "भूतकाळातील घटनांचे भांडार" नसून, ती एक सक्रिय मानसिक प्रक्रिया आहे, जी मानवी शिकण्याची क्षमता, विचार करण्याची पद्धत, वर्तन आणि भावनिक अनुभव यांना आकार देते. म्हणूनच स्मृती ही केवळ बोधनिक (Cognitive) मानसशास्त्रात नव्हे, तर संपूर्ण मानसशास्त्राच्या अभ्यासात एक अत्यंत महत्त्वपूर्ण संकल्पना मानली जाते.

स्मृती प्रक्रिया (Processes of Memory)

मानसशास्त्रज्ञांच्या मतानुसार स्मृती ही एक गतीशील मानसिक प्रक्रिया आहे. ती केवळ भूतकाळातील अनुभवांचे साठवण नाही, तर शिकणे, विचार करणे, निर्णय घेणे आणि समस्या सोडवणे या सर्व मानसिक कार्यांचा आधार आहे. स्मृतीची कार्यप्रणाली तीन प्रमुख टप्प्यांमध्ये विभागली जाते: ग्रहण (Encoding), संग्रहण (Storage) आणि प्रत्यानयन (Retrieval). (Atkinson & Shiffrin, 1968).

1. ग्रहण (Encoding)

ग्रहण म्हणजे बाह्य वातावरणातील माहिती वेदनेंद्रियांद्वारे ग्रहण करून ती मानसिक प्रतिमेत किंवा कोडमध्ये रूपांतरित करणे. आपण एखादे दृश्य पाहतो, आवाज ऐकतो किंवा एखादा गंध अनुभवतो, तेव्हा ही वेदनात्मक माहिती आपल्या मेंदूत एका विशिष्ट स्वरूपात रूपांतरित होते. ही ग्रहण प्रक्रिया मुख्यतः तीन प्रकारची असते:

  • दृश्य ग्रहण (Visual Encoding): प्रतिमा, रंग किंवा आकार यांच्या माध्यमातून माहिती लक्षात ठेवली जाते.
  • श्राव्य ग्रहण (Acoustic Encoding): आवाज, ध्वनी, शब्द यांचे ग्रहण.
  • अर्थग्रहण (Semantic Encoding): एखाद्या माहितीचा अर्थ लक्षात ठेवून ती स्मृतीत साठवणे. उदाहरणार्थ, एखादी ऐतिहासिक घटना केवळ तारीख लक्षात ठेवण्याऐवजी तिचा संदर्भ समजून घेतल्यास ती जास्त काळ लक्षात राहते (Craik & Lockhart, 1972).

ग्रहण योग्य पद्धतीने झाले नाही, तर ती माहिती पुढे संग्रहित (Storage) होत नाही किंवा सहज विस्मृतीत जाते. त्यामुळे शिकण्याच्या प्रक्रियेत ग्रहणाला अत्यंत महत्त्व आहे.

2. संग्रहण (Storage)

संग्रहण म्हणजे ग्रहण केलेली माहिती ठराविक कालावधीसाठी मेंदूत साठवून ठेवण्याची प्रक्रिया. Atkinson आणि Shiffrin (1968) यांच्या Multi-Store Model नुसार स्मृतीचे तीन स्तर आहेत:

  • वेदनिक स्मृती (Sensory Memory): काही सेकंदापुरती माहिती साठवणारी प्रणाली. उदा. विज चमकणे किंवा एखाद्या शब्दाचा ध्वनी.
  • अल्पकालीन स्मृती (Short-Term Memory): काही सेकंदांपासून ते एका मिनिटापर्यंत माहिती साठवून ठेवते. याची क्षमता सुमारे 7 ± 2 घटकांची असते (Miller, 1956).
  • दीर्घकालीन स्मृती (Long-Term Memory): दीर्घकाळ टिकणारी आणि जवळजवळ अमर्यादित क्षमता असलेली स्मृती. यात तथ्ये, अनुभव, सवयी व कौशल्ये साठवलेली असतात.

संग्रहण प्रक्रियेत माहिती संहिताबद्ध (Consolidated) होत जाते आणि ती न्यूरल नेटवर्क्समध्ये स्थिर स्वरूप घेते. आधुनिक संशोधनानुसार, हिप्पोकॅम्पस हा मेंदूतील भाग दीर्घकालीन स्मृतीच्या निर्मितीत महत्त्वाची भूमिका बजावतो (Squire, 2004).

3. प्रत्यानयन (Retrieval)

प्रत्यानयन म्हणजे साठवलेल्या माहितीचे आवश्यकतेप्रमाणे पुनःस्मरण किंवा आठवण करणे. आपण एखाद्या परीक्षेत प्रश्नाचे उत्तर लिहितो, एखाद्या मित्राचा चेहरा आठवतो किंवा गाण्याची ओळ गुणगुणतो, तेव्हा प्रत्यानयनाची प्रक्रिया घडते. प्रत्यानयनाचे दोन प्रकार आहेत:

  • ओळखणे (Recognition): पूर्वी पाहिलेली माहिती पुन्हा ओळखणे. उदा. बहुपर्यायी प्रश्नात योग्य पर्याय ओळखणे.
  • स्मरण (Recall): कोणतेही संकेत (Cues) न घेता माहिती आठवणे. उदा. कविता पाठ करणे.

कधीकधी माहिती संग्रहित असते, परंतु योग्य संकेतांच्या अभावामुळे ती आठवता येत नाही. याला Retrieval Failure म्हणतात. Tulving (1983) यांच्या मते, योग्य संकेत (Retrieval Cues) मिळाल्यास आठवण सोपी होते.

स्मृतीची प्रक्रिया ही एक अखंड शृंखला आहे ज्यात ग्रहण, संग्रहण आणि प्रत्यानयन हे तीन टप्पे एकमेकांशी जोडलेले आहेत. ग्रहण योग्य पद्धतीने झाले नाही, तर संग्रहण होणार नाही; संग्रहण जर स्थिर झाले नाही, तर प्रत्यानयन कठीण होईल. त्यामुळे स्मृतीच्या अभ्यासात या तीन टप्प्यांचे सखोल ज्ञान असणे आवश्यक आहे.

स्मृतीचे प्रकार

मानसशास्त्रात स्मृतीचा अभ्यास करताना विविध आधारांवर तिचे वर्गीकरण केले जाते. त्यापैकी एक महत्त्वाचे वर्गीकरण म्हणजे कालावधीवर आधारित स्मृती. स्मृती किती काळ टिकते यावरून तिला तीन प्रमुख प्रकारांत विभागले जाते: वेदनिक स्मृती, अल्पकालीन स्मृती आणि दीर्घकालीन स्मृती. या तीनही प्रकारांमध्ये माहितीचे ग्रहण, संग्रहण आणि प्रत्यानयन या प्रक्रिया वेगवेगळ्या पातळीवर घडतात. खाली या तीन प्रकारांचा सविस्तर आढावा घेतला आहे.

1. वेदनिक स्मृती (Sensory Memory)

वेदनिक स्मृती ही माहिती प्रक्रियेतील सर्वात पहिली पायरी आहे. आपल्या वेदनेंद्रियांद्वारे सतत विविध प्रकारची माहिती ग्रहण केली जाते. ही माहिती अगदी काही सेकंदापुरतीच टिकते आणि नंतर नाहीशी होते. उदाहरणार्थ, विज चमकणे काही क्षणांसाठी डोळ्यांसमोर ठसतो किंवा एखादा शब्द ऐकल्यावर त्याचा ध्वनी काही सेकंद मनात रेंगाळतो. या प्रकारच्या स्मृतीत दृश्य माहिती (Iconic memory) आणि श्राव्य माहिती (Echoic memory) हे उपप्रकार महत्त्वाचे आहेत (Neisser, 1967). Iconic memory साधारणत: 0.5 सेकंद टिकते, तर Echoic memory साधारण 34 सेकंद टिकते (Sperling, 1960). क्षणिक स्मृतीचा उद्देश म्हणजे पुढील टप्प्यात म्हणजे अल्पकालीन स्मृतीत जाणारी माहिती निवडणे. त्यामुळे ही स्मृती ही एक प्रकारे माहिती गाळण्याचे कार्य करते.

2. अल्पकालीन स्मृती (Short-Term Memory)

अल्पकालीन स्मृती ही क्षणिक स्मृतीनंतरची पायरी आहे. यात माहिती काही सेकंदांपासून काही मिनिटांपर्यंत टिकते. ही स्मृती मर्यादित कालावधी आणि मर्यादित क्षमतेची असते. जॉर्ज मिलर (1956) यांनी आपल्या प्रसिद्ध संशोधनात "The Magical Number Seven, Plus or Minus Two" हे तत्त्व मांडले. त्यानुसार अल्पकालीन स्मृती साधारणतः 7±2 घटकांपर्यंतची माहिती साठवू शकते. उदाहरणार्थ, एखादा नवा फोन नंबर किंवा OTP आपल्याला काही काळ लक्षात राहतो आणि नंतर आपण तो विसरतो, हे अल्पकालीन स्मृतीचे उदाहरण आहे. ही स्मृती टिकवण्यासाठी पुनरावृत्ती (rehearsal) महत्त्वाची ठरते. जर पुनरावृत्ती केली नाही, तर माहिती पटकन नाहीशी होते (Peterson & Peterson, 1959).

3. दीर्घकालीन स्मृती (Long-Term Memory)

दीर्घकालीन स्मृती ही मानवी स्मृती प्रणालीतील सर्वात महत्त्वाची व टिकाऊ पातळी आहे. यात माहिती काही तासांपासून संपूर्ण आयुष्यभर टिकू शकते. दीर्घकालीन स्मृतीमध्ये शालेय शिक्षणातील तथ्ये, वैयक्तिक जीवनातील अनुभव, वर्तनकौशल्ये, सांस्कृतिक माहिती आणि सामाजिक नियम अशा विविध प्रकारची माहिती संग्रहित असते. अॅटकिन्सन आणि शिफ्रिन (1968) यांच्या Multi-Store Model of Memory नुसार, अल्पकालीन स्मृतीतील माहिती पुनरावृत्ती (rehearsal) व संघटन (organization) यांद्वारे दीर्घकालीन स्मृतीत रूपांतरित होते. दीर्घकालीन स्मृती प्रचंड क्षमतेची असते आणि तिच्यातील माहिती प्रत्यानयन प्रक्रियेद्वारे पुन्हा सक्रिय करता येते. उदाहरणार्थ, बालपणातील एखादा अनुभव, शालेय दिवसातील शिकवण किंवा अनेक वर्षांनीही आठवणारा एखादा प्रसंग.

स्मृतीच्या या तीन स्तरांमुळे मानवी शिकण्याची आणि अनुभवांची प्रक्रिया सुसंगत पद्धतीने पुढे सरकते. वेदनिक स्मृती ही प्राथमिक गाळणीचे कार्य करते, अल्पकालीन स्मृती तात्पुरता साठवणुकीचा टप्पा आहे, तर दीर्घकालीन स्मृती ही आपल्या वैयक्तिक आणि सामाजिक जीवनाचा पाया आहे. या सर्व स्तरांचा समन्वय नसेल, तर शिकण्याची आणि स्मरणशक्तीची कार्यक्षमता अपुरी राहते.

दीर्घकालीन स्मृतीचे प्रकार

दीर्घकालीन स्मृतीचे दोन प्रकार पडतात: निर्देशनात्मक (Declarative Memory) आणि निर्देशनात्मक/ कृतीपर स्मृती (Non-Declarative MemoryProcedural Memory). यांनाचा अनुक्रमे व्यक्त आणि अव्यक्त स्मृती असे म्हणतात.

(अ) निर्देशनात्मक स्मृती (Declarative Memory)

निर्देशनात्मक स्मृतीला व्यक्त स्मृती (Explicit Memory) असेही म्हटले जाते. ही अशी स्मृती आहे जी व्यक्ती जाणीवपूर्वक आठवते आणि व्यक्त करू शकते. उदाहरणार्थ, एखादा ऐतिहासिक प्रसंग, शालेय अभ्यासातील तथ्ये, एखाद्या व्यक्तीचा वाढदिवस, किंवा आपण गेल्या वर्षी कुठे प्रवास केला हे आठवणे. या स्मृतीत माणसाला माहिती भाषिक स्वरूपात किंवा ठोस प्रतिमांच्या स्वरूपात आठवते.

Neisser (1967) यांनी सांगितल्याप्रमाणे स्मृती ही जाणीवपूर्वक प्रत्यानयनाची प्रक्रिया आहे, आणि त्यामध्ये व्यक्ती माहितीची आठवण ठेवून ती पुन्हा शब्दबद्ध करू शकते. निर्देशनात्मक स्मृती मेंदूतील हिप्पोकॅम्पस आणि मेडियल टेम्पोरल लोब यांच्यावर अवलंबून असते (Squire & Zola, 1996). त्यामुळे या भागाला इजा झाली की व्यक्तीला नवी माहिती लक्षात ठेवणे कठीण जाते.

Tulving (1972) यांनी निर्देशनात्मक स्मृतीचे दोन उपप्रकार मांडले अर्थपर स्मृती आणि घटनास्मृती.  त्यांनी निर्देशनात्मक स्मृतीला एक महत्त्वाचा पाया मानला आहे.

i. अर्थपर स्मृती (Semantic Memory)

Tulving (1972) यांच्या मते निर्देशनात्मक स्मृतीतील अर्थपर स्मृती म्हणजे जगाविषयीचे सामान्य ज्ञान, संकल्पना, शब्दांचा अर्थ, नियम, सूत्रे, आणि तथ्ये लक्षात ठेवणे.

उदाहरणार्थ, "पुणे महाराष्ट्रात आहे", "2+2 = 4", "पाणी 100 अंशांवर उकळते" ही माहिती आपल्याला वैयक्तिक अनुभवातून नाही, तर सामूहिक ज्ञानसाठ्यातून मिळते. अर्थपर स्मृतीमुळे माणूस भाषेचा वापर करू शकतो, तर्कशक्ती लावू शकतो आणि सामाजिक-सांस्कृतिक जीवनात सहभागी होऊ शकतो (Binder & Desai, 2011).

ii. घटना स्मृती (Episodic Memory)

घटना स्मृती म्हणजे व्यक्तीच्या आयुष्यातील विशिष्ट प्रसंग, अनुभव आणि घटनांची स्मृती. उदा. पहिल्यांदा शाळेत जाण्याचा दिवस, लग्नाचा समारंभ, मित्रांसोबतचा प्रवास इत्यादी. Tulving (1983) यांनी घटनास्मृतीला मानसिक “टाइम मशीन” असे संबोधले आहे, कारण त्याद्वारे व्यक्ती भूतकाळातील अनुभव पुन्हा "जणू काही प्रत्यक्ष अनुभवत आहे" अशा पद्धतीने आठवतो. ही स्मृती मेंदूतील हिप्पोकॅम्पसशी निगडित असून, ती व्यक्तीच्या वैयक्तिक ओळखीशी (Personal Identity) जोडलेली असते (Moscovitch et al., 2005).

(आ) अनिर्देशनात्मक/ कृतीपर स्मृती (Non-Declarative Memory/ Procedural Memory)

निर्देशनात्मक स्मृतीला अव्यक्त स्मृती (Implicit Memory) आणि कृतीपर असेही म्हटले जाते. या स्मृतीमध्ये माहिती नकळत आणि अबोध पातळीवर वापरली जाते. व्यक्तीला जाणीवपूर्वक ती आठवावी लागत नाही, तरीही ती वर्तनात आणि कृतीत दिसून येते. ती कौशल्ये, सवयी आणि "कसे करायचे" (How to do) यासंबंधी असते.

Anderson (2010) यांच्या मते, निर्देशनात्मक/ कृतीपर स्मृती ही शिकण्याच्या अनुभवावर आधारित असते आणि दीर्घकाळ टिकून राहते. तिचा मेंदूमधील बेसल गॅन्ग्लिया आणि सेरिबेलमशी (छोटा मेंदू) संबंध असल्याचे संशोधन दर्शवते.

उदाहरणार्थ, सायकल चालविणे, वाद्य वाजविणे, गाडी चालविणे शिलाई मशीनवर काम करणे, खेळातील कौशल्ये किंवा संगणकावर टायपिंग करणे ही सर्व कौशल्ये एकदा शिकली की नकळत वापरली जातात. व्यक्तीला "मी सायकल कशी चालवतो?" हे स्पष्ट सांगता येत नसले तरी तो सहजपणे ती चालवू शकतो. ही स्मृती जाणीवपूर्वक आठवली जात नाही, पण सततच्या सरावामुळे ती स्थिर होते. Graf & Schacter (1985) यांच्या संशोधनानुसार, निर्देशनात्मक/ कृतीपर स्मृती जाणीवेशिवाय वर्तनावर परिणाम करते, आणि ती कौशल्ये, सवयी तसेच सशर्त प्रतिक्रियांमध्ये दिसून येते.

वरील दीर्घकालीन प्रकारांवरून असे दिसते की स्मृती ही केवळ माहिती संग्रहित ठेवण्याची प्रक्रिया नसून ती जाणीवपूर्वक आठवणे (व्यक्त स्मृती), नकळत वापर (अव्यक्त स्मृती), तथ्यांचे ज्ञान (अर्थपर स्मृती), वैयक्तिक अनुभव (घटना स्मृती), आणि कौशल्यांचे आचरण (प्रक्रियात्मक स्मृती) अशा विविध पातळ्यांवर कार्यरत असते. Tulving, Squire, Schacter यांसारख्या मानसशास्त्रज्ञांच्या संशोधनामुळे स्मृतीचे स्वरूप व रचना अधिक स्पष्ट झाली आहे. या प्रकारांचे योग्य आकलन झाले, तर शिकणे, अध्यापन, आणि मानवी वर्तन समजून घेणे अधिक सुलभ होते.

स्मृती सुधारण्यासाठी उपाय (# याविषयावरील स्वतंत्र लेख पहा)

  • एकाग्रतेने शिकणे.
  • पुनरावृत्ती (Rehearsal) करणे.
  • माहितीला अर्थपूर्ण बनविणे.
  • संयोग (Association) पद्धत वापरणे.
  • पुरेशी झोप आणि निरोगी जीवनशैली ठेवणे.
  • मानसिक व्यायाम (पझल्स, वाचन, लेखन) करणे.

स्मृतीचे विकार (# याविषयावरील स्वतंत्र लेख पहा)

  • कधी कधी स्मृतीची कार्यक्षमता कमी होते किंवा विकृत स्वरूप धारण करते.
  • विस्मरण (Amnesia): माहिती आठवू न शकणे.
  • डिमेन्शिया (Dementia): वृद्धापकाळातील स्मृती क्षीण होणे.
  • अल्झायमर रोग (Alzheimer’s Disease): स्मृती, विचारशक्ती व वर्तनातील बिघाड.

समारोप:

स्मृती ही मानवी व्यक्तिमत्त्वाचा गाभा आहे. स्मृतीशिवाय शिकणे, अनुभवांचा उपयोग करणे आणि जीवन पुढे नेणे अशक्य आहे. म्हणूनच स्मृतीची निगा राखणे, तिचा विकास करणे आणि तिच्या मर्यादा समजून घेणे हे अत्यंत आवश्यक आहे. मानसशास्त्रातील अभ्यासक तसेच सर्वसामान्य व्यक्तीने स्मृतीच्या तत्त्वांचा योग्य वापर केला, तर व्यक्तिगत तसेच सामाजिक जीवन अधिक समृद्ध होऊ शकते.

(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)

संदर्भ:

Anderson, J. R. (2010). Cognitive Psychology and its Implications. Worth Publishers.

Atkinson, R. C., & Shiffrin, R. M. (1968). Human memory: A proposed system and its control processes. In K. W. Spence & J. T. Spence (Eds.), The psychology of learning and motivation (Vol. 2, pp. 89–195). Academic Press.

Baddeley, A. D. (1997). Human Memory: Theory and Practice. Psychology Press.

Binder, J. R., & Desai, R. H. (2011). The neurobiology of semantic memory. Trends in Cognitive Sciences, 15(11), 527-536.

Craik, F. I. M., & Lockhart, R. S. (1972). Levels of processing: A framework for memory research. Journal of Verbal Learning and Verbal Behavior, 11(6), 671–684.

Graf, P., & Schacter, D. L. (1985). Implicit and explicit memory for new associations in normal and amnesic subjects. Journal of Experimental Psychology: Learning, Memory, and Cognition, 11(3), 501–518.

James, W. (1890). The Principles of Psychology. New York: Henry Holt.

Miller, G. A. (1956). The magical number seven, plus or minus two: Some limits on our capacity for processing information. Psychological Review, 63(2), 81–97.

Moscovitch, M., Rosenbaum, R. S., Gilboa, A., Addis, D. R., Westmacott, R., Grady, C., ... & Nadel, L. (2005). Functional neuroanatomy of remote episodic, semantic and spatial memory: A unified account based on multiple trace theory. Journal of Anatomy, 207(1), 35-66.

Neisser, U. (1967). Cognitive Psychology. Englewood Cliffs, NJ: Prentice-Hall.

Peterson, L. R., & Peterson, M. J. (1959). Short-term retention of individual verbal items. Journal of Experimental Psychology, 58(3), 193–198.

Sperling, G. (1960). The information available in brief visual presentations. Psychological Monographs: General and Applied, 74(11), 1–29.

Squire, L. R. (2004). Memory systems of the brain: A brief history and current perspective. Neurobiology of Learning and Memory, 82(3), 171–177.

Squire, L. R., & Zola, S. M. (1996). Structure and function of declarative and nondeclarative memory systems. Proceedings of the National Academy of Sciences, 93(24), 13515-13522.

Tulving, E. (1972). Episodic and semantic memory. In E. Tulving & W. Donaldson (Eds.), Organization of Memory. New York: Academic Press.

Tulving, E. (1983). Elements of episodic memory. Oxford University Press.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments and suggestions

लेबलिंग सिद्धांत | Labelling Theory

  लेबलिंग सिद्धांत | Labelling Theory मानव समाज हे सामाजिक नियम , मूल्ये आणि अपेक्षांवर आधारित असते. प्रत्येक समाजात “योग्य” आणि “अयोग्य”...