मंगळवार, १६ सप्टेंबर, २०२५

अवधान |Attention

 

अवधान (Attention)

मानसशास्त्राच्या अभ्यासामध्ये अवधान ही संकल्पना अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते. आपल्या दैनंदिन जीवनात आपण एका क्षणी असंख्य उद्दीपकांना (stimuli) सामोरे जातो; ध्वनी, प्रकाश, गंध, चव, स्पर्श यांसोबतच विचार आणि भावनांचेही उत्तेजन सतत अनुभवास येते. परंतु मनुष्याच्या मानसिक क्षमतेला एकाच वेळी सर्व उद्दिपकावर लक्ष केंद्रित करणे शक्य नसते. या असंख्य अनुभवांमधून एखाद्या निवडक अनुभवाकडे किंवा वस्तूकडे लक्ष केंद्रीत करण्याची क्षमता म्हणजेच अवधान होय. मानसशास्त्रीय दृष्टिकोनातून अवधान ही बोधात्मक प्रक्रिया असून ती अध्ययन, स्मरणशक्ती, समस्या सोडवणे, निर्णय घेणे आणि सर्जनशीलता यांसारख्या इतर मानसिक कार्यप्रणालींसाठी आधारभूत ठरते (Anderson, 2010). म्हणूनच बोधनिक मानसशास्त्रात आणि शैक्षणिक मानसशास्त्रात अवधानाला केंद्रस्थानी ठेवले जाते.

अवधानाची व्याख्या

अवधानाबद्दल अनेक मानसशास्त्रज्ञांनी आपापल्या पद्धतीने व्याख्या दिल्या असून त्यामधून या प्रक्रियेचे विविध पैलू समोर येतात.

  • प्रथम, विल्यम जेम्स (1890) यांनी अवधानाला बोधन प्रक्रियेतील निवडकता आणि एकाग्रतेची भूमिका अधोरेखित करून व्याख्या दिली. त्यांच्या मते, “अवधान म्हणजे मनाची ती प्रक्रिया आहे ज्यामध्ये व्यक्ती अनेक अनुभवांपैकी एका अनुभवाची निवड करून त्यावर एकाग्रतेने लक्ष केंद्रित करते.” या व्याख्येतून अवधानाच्या निवडकतेचे स्वरूप स्पष्ट होते.

  • दुसरे, टिचनर यांनी अवधानाला बोधनेतील एकाग्रता व स्पष्टता निर्माण करणारी प्रक्रिया म्हणून व्याख्या केली. म्हणजेच, अवधान ज्या अनुभवावर केंद्रित केले जाते तो अनुभव इतर अनुभवांच्या तुलनेत अधिक जिवंत, स्पष्ट आणि ठळक बनतो.
  • आधुनिक बोधनिक मानसशास्त्राच्या दृष्टीने पाहता, अवधान ही अशी प्रक्रिया आहे जी मानसिक ऊर्जेचे योग्य नियोजन करून विशिष्ट उद्दिपकावर किंवा कार्यावर लक्ष केंद्रीत करते आणि अनावश्यक किंवा गौण उद्दिपकाकडे दुर्लक्ष करते (Anderson, 2010).

वरील व्याख्यांचा विचार करता, साध्या शब्दांत अवधान म्हणजे मनाची एकाग्रता आणि विशिष्ट विषयाची जाणीवपूर्वक निवड. ही निवड कधी जाणीवपूर्वक असते तर कधी परिस्थितीनुसार आपोआप घडते. अशा प्रकारे अवधान ही प्रक्रिया व्यक्तीच्या शैक्षणिक, व्यावसायिक आणि सामाजिक जीवनाच्या गुणवत्तेवर थेट परिणाम करते.

अवधानाची वैशिष्ट्ये (Characteristics of Attention)

1. निवडकता (Selectivity)

अवधानाचे सर्वात मूलभूत वैशिष्ट्य म्हणजे त्याची निवडकता. बाह्य जगात असंख्य उद्दीपक सतत आपल्या इंद्रियांना स्पर्श करीत असतात. पण मानवाचे मन या सर्व उद्दिपकाकडे एकाच वेळी लक्ष केंद्रित करू शकत नाही. त्यामुळे मन आपल्यासाठी त्या क्षणी महत्त्वाची असलेली काही उद्दीपक निवडते आणि इतर दुर्लक्ष करते. उदाहरणार्थ, वाचन करताना आपण पानावरील शब्दांकडे लक्ष देतो, पण आजूबाजूच्या आवाजांकडे कमी लक्ष जाते. मानसशास्त्रज्ञ ब्रॉडबेंट (Broadbent, 1958) यांनी त्यांच्या Filter Theory मध्ये स्पष्ट केले आहे की अवधान हे जणू फिल्टरप्रमाणे काम करते, जे असंख्य उद्दिपकापैकी काही निवडून इतरांना सोडते. ही निवडकता मनुष्याला माहितीच्या गोंधळात आवश्यक बाबींवर लक्ष केंद्रित करण्यास मदत करते.

2. एकाग्रता (Concentration)

अवधान हे केवळ निवडण्याची प्रक्रिया नसून निवडलेल्या घटकावर मानसिक उर्जा केंद्रित करण्याची क्षमता आहे. एकाग्रतेमुळे व्यक्ती निवडलेल्या उद्दिपाकावर दीर्घकाळ लक्ष केंद्रित करू शकते. उदाहरणार्थ, एखादा विद्यार्थी परीक्षेची तयारी करताना पुस्तक वाचतो, तेव्हा त्याचे अवधान पुस्तकातील माहितीवर केंद्रित असते. जेम्स (James, 1890) यांनी लिहिले आहे की, अवधान ही मानसिक उर्जेची ती एकाग्र प्रक्रिया आहे जी बोधावस्थेला विशिष्ट अनुभव अधिक सशक्त आणि जिवंत बनवते. या वैशिष्ट्यामुळे कार्यात सातत्य, अचूकता आणि सखोलता येते.

3. मर्यादित क्षमता (Limited Capacity)

मानवी मेंदूची माहिती प्रक्रिया करण्याची क्षमता मर्यादित आहे. म्हणूनच एकाच वेळी सर्व उद्दिपकावर लक्ष केंद्रित करणे शक्य होत नाही. अवधानाची ही मर्यादित क्षमता मानसशास्त्रातील अनेक सिद्धांतांचा आधार आहे. काह्नमन (Kahneman, 1973) यांच्या Resource Allocation Theory नुसार अवधान ही एक मानसिक साधनसंपत्ती आहे जी मर्यादित आहे आणि परिस्थितीनुसार वेगवेगळ्या कार्यांसाठी वाटली जाते. म्हणूनच आपण गाडी चालवताना संगीत ऐकू शकतो, पण जर रस्ता क्लिष्ट झाला तर आपले लक्ष संगीतावरून गाडी चालवण्याकडे वळते. यावरून स्पष्ट होते की अवधान मर्यादित आहे आणि त्याचे कार्य प्रभावीपणे विभागले गेले पाहिजे.

4. स्पष्टता (Clarity)

अवधानामुळे निवडलेला अनुभव किंवा उद्दीपक अधिक स्पष्ट, ठळक आणि जिवंत वाटतो. उदाहरणार्थ, गर्दीत एखादा आपला परिचित दिसल्यावर तो चेहरा इतरांपेक्षा अधिक स्पष्ट दिसतो. टिचनर (Titchener, 1909) यांनी नमूद केले आहे की अवधान बोधावस्थेला एकाग्रता आणि स्पष्टता प्रदान करते, ज्यामुळे संबंधित अनुभव मानसिक दृष्ट्या अधिक ठळक होतो. ही स्पष्टता केवळ बाह्य उद्दिपकापुरती मर्यादित नसून अंतर्गत विचार, आठवणी आणि भावनांनाही लागू होते. त्यामुळे अवधानाचे हे वैशिष्ट्य शिक्षण, निरीक्षण आणि निर्णय प्रक्रियेत अत्यंत महत्त्वाचे ठरते.

5. परिवर्तनीय (Shifting)

अवधान हे स्थिर नसून परिवर्तनीय आहे. म्हणजेच ते एका उद्दिपकापासून दुसऱ्याकडे वळू शकते. या वैशिष्ट्यामुळे मनुष्याला बदलत्या परिस्थितीत योग्य प्रतिसाद देणे शक्य होते. उदाहरणार्थ, विद्यार्थी अभ्यास करताना खिडकीबाहेर अचानक आवाज झाला तर त्याचे अवधान पुस्तकावरून आवाजाकडे वळते. पाश्लर (Pashler, 1998) यांनी सांगितले आहे की, अवधान हे जणू प्रकाशझोतासारखे आहे, जे परिस्थितीनुसार एका वस्तूपासून दुसऱ्याकडे सरकते. ही परिवर्तनीयता आवश्यक आहे कारण ती माणसाला सतत बदलणाऱ्या वातावरणात जगण्यास सक्षम बनवते.

अवधानाच्या या वैशिष्ट्यांमुळे हे स्पष्ट होते की अवधान ही बोधात्मक प्रक्रियेतील केंद्रबिंदू आहे. निवडकता, एकाग्रता, मर्यादित क्षमता, स्पष्टता आणि परिवर्तनीयता या वैशिष्ट्यांमुळे अवधानाचे स्वरूप अधिक स्पष्ट होते. या वैशिष्ट्यांचा अभ्यास शैक्षणिक, औद्योगिक तसेच दैनंदिन जीवनातील कार्यक्षमता वाढवण्यासाठी उपयोगी ठरतो.

अवधानाचे प्रकार

1. ऐच्छिक अवधान (Voluntary Attention)

ऐच्छिक अवधान म्हणजे जाणीवपूर्वक, उद्देशपूर्वक आणि प्रयत्नपूर्वक दिलेले अवधान होय. या प्रकारच्या अवधानामध्ये व्यक्ती स्वतःच्या इच्छेनुसार एखाद्या vनाची निवड करून त्यावर लक्ष केंद्रित करते. यामध्ये मानसिक प्रयत्न, आत्मनियंत्रण आणि एकाग्रता आवश्यक असते. उदाहरणार्थ, विद्यार्थी अभ्यास करताना आपल्या मनाला इतर गोष्टींपासून दूर ठेवून फक्त पुस्तकातील मजकुरावर लक्ष केंद्रित करतो. या प्रक्रियेत उद्दिष्ट साध्य करण्याची प्रेरणा, अंतर्गत स्वारस्य आणि शिस्त महत्त्वाची भूमिका बजावतात (James, 1890). मानसशास्त्रीय दृष्टीने पाहता, हे अवधान व्यक्तीच्या कार्यकारी नियंत्रणाशी संबंधित आहे आणि त्यासाठी मेंदूमधील प्रीफ्रंटल कॉर्टेक्स कार्यरत असतो (Posner & Petersen, 1990). त्यामुळे शिकणे, समस्या सोडवणे, आणि दीर्घकालीन कार्यांमध्ये याचे महत्त्व विशेष आहे.

2. अनैच्छिक अवधान (Involuntary Attention)

अनैच्छिक अवधान हे प्राथमिक आणि अनपेक्षित स्वरूपाचे असते. यात व्यक्ती स्वतःच्या इच्छा आणि बाह्य प्रेरणेमुळे त्या दिशेने आकर्षित होते. हे अवधान जाणीवपूर्वक प्रयत्न न करता घडते आणि अचानक घडणाऱ्या घटकांमुळे उद्भवते. उदाहरणार्थ, आपण शांतपणे बसलेले असताना एखादा मोठा आवाज, अचानक चमकणारा प्रकाश किंवा जलद हालचाल करणारी वस्तू आपले लक्ष खेचते. या प्रक्रियेवर उद्दिपकाची तीव्रता, नाविन्यता, विरोधाभास आणि गतिशीलता यांसारखे घटक परिणाम करतात (Anderson, 2010). न्यूरोसायन्सच्या अभ्यासानुसार, अनैच्छिक अवधान हे प्रामुख्याने लिम्बिक सिस्टीम व रेटिक्युलर अॅक्टिव्हेटिंग सिस्टीम यांच्या कार्याशी निगडित आहे (Sarter, Givens & Bruno, 2001). या प्रकारच्या अवधानामुळे धोका ओळखणे, सुरक्षितता राखणे आणि तात्काळ प्रतिक्रिया देणे शक्य होते.

3. स्वाभाविक अवधान (Habitual / Post-voluntary Attention)

अवधानाचे हे रूप ऐच्छिक आणि अनैच्छिक अवधानाच्या दरम्यानचे मानले जाते. सुरुवातीला व्यक्तीला प्रयत्नपूर्वक लक्ष केंद्रित करावे लागते, परंतु कालांतराने ती क्रिया सवयीत रुपांतर होते आणि त्यावर सहजतेने व आवडीने लक्ष दिले जाते. याला post-voluntary attention असेही म्हटले जाते. उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीस सुरुवातीला संगीत शिकताना प्रयत्नपूर्वक लक्ष द्यावे लागते; पण संगीताची आवड निर्माण झाल्यानंतर तो कोणत्याही प्रयत्नाशिवाय सहजतेने त्यात रमतो. या प्रकारच्या अवधानामध्ये अभिरुची आणि आनंद हे घटक मध्यवर्ती असतात (Titchener, 1908). मानसशास्त्रीय अभ्यासानुसार, दीर्घकालीन शिक्षण, सर्जनशील कार्ये आणि कलात्मक कार्यामध्ये हे अवधान विशेषतः प्रभावी ठरते (Csikszentmihalyi, 1990).

अवधानाचे ऐच्छिक, अनैच्छिक आणि स्वाभाविक हे तीन प्रकार मानवाच्या दैनंदिन जीवनात आणि बोधात्मक प्रक्रियांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावतात. ऐच्छिक अवधानामुळे स्व-नियंत्रण व शिकण्याची क्षमता वाढते, अनैच्छिक अवधान आपल्याला सतर्क ठेवते, तर स्वाभाविक अवधान अभिरुची आणि आनंदातून नैसर्गिक एकाग्रता साध्य करते. त्यामुळे मानसशास्त्र, शिक्षणशास्त्र आणि कार्यप्रेरणा यांच्या क्षेत्रात या प्रकारांचे सखोल ज्ञान अत्यंत आवश्यक आहे.

अवधानावर परिणाम करणारे घटक (नियामके)

अ. बाह्य घटक (External Factors)

मानसशास्त्रात असे मानले जाते की अवधान ही प्रक्रिया केवळ व्यक्तीच्या अंतर्गत मानसिक स्थितींवर अवलंबून नसून, बाह्य वातावरणातील उद्दिपकांच्या वैशिष्ट्यांवरही मोठ्या प्रमाणात अवलाम्बीन असते. जेव्हा आपल्या सभोवताल अनेक उद्दीपक असतात, तेव्हा त्यातील काही विशिष्ट वैशिष्ट्यांमुळे ते उद्दीपक आकर्षक ठरतात. याला अवधानावर परिणाम करणारे बाह्य घटक/ वस्तुनिष्ठ नियामाके असे म्हटले जाते.

1. उद्दिपकाची तीव्रता (Intensity)

उद्दिपक जितके तीव्र असेल तितके ते अवधान वेधून घेण्याची शक्यता जास्त असते. उदाहरणार्थ, मोठा आवाज, प्रखर प्रकाश, तीव्र वास किंवा चव ही तीव्रतेची उदाहरणे आहेत. मनुष्याच्या वेदनिक प्रणालीवर जेव्हा एखादे उद्दिपक प्रचंड ताकदीने परिणाम करते, तेव्हा ते सहजपणे इतर सर्व उद्दिपकांपेक्षा लक्ष वेधून घेते (Posner & Petersen, 1990). वर्गात शिक्षकाचा मोठा आवाज किंवा एखाद्या व्यक्तीने अचानक केलेले मोठ्याने हास्य यामुळे श्रोत्यांचे अवधान आपोआप तिकडे वळते. हे घटक arousal theory शी निगडित आहेत, ज्यात म्हटले आहे की तीव्र उद्दिपक व्यक्तीमध्ये उत्तेजना वाढवून लक्ष केंद्रीत करण्यास भाग पाडते (Eysenck, 1982).

2. नाविन्यता (Novelty)

जे उद्दिपक नवीन, अनपेक्षित किंवा अपरिचित असते, ते परिचित उद्दिपकांपेक्षा अधिक वेगाने अवधान खेचते. उदाहरणार्थ, एखाद्या ठिकाणी रोज ऐकू येणारा पंख्याचा आवाज आपण दुर्लक्ष करतो, पण अचानक एखादे नवीन गाणे लागले तर ते लगेच लक्ष वेधून घेते. नाविन्यपूर्ण घटकांबाबत मेंदू संवेदनशील असतो कारण त्यांचा संभाव्य धोका किंवा संधी यांच्याशी संबंध असू शकतो. त्यामुळे नवीन माहितीबाबत मेंदू एक प्रकारचा orienting reflex दाखवतो, ज्यात डोळे, कान व संपूर्ण शरीर नव्या उद्दिपकाकडे वळते. शिक्षणशास्त्रातही हे महत्त्वाचे आहे; विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण पद्धतीने माहिती दिल्यास त्यांचे अवधान टिकवून ठेवता येते (Ormrod, 2012).

3. विरोधाभास (Contrast)

जेव्हा एखादे उद्दिपक आपल्या आसपासच्या वातावरणाशी किंवा इतर उद्दिपकांशी भिन्न दिसते, तेव्हा ते अधिक आकर्षक ठरते. उदाहरणार्थ, काळ्या फळ्यावर लिहिलेला पांढरा खडू सहज लक्ष वेधतो किंवा शांत ठिकाणी अचानक झालेला आवाज जास्त लक्षवेधी ठरतो. हे घटक Gestalt Psychology च्या "figure-ground principle" शी संबंधित आहेत, ज्यात उद्दिपक त्याच्या पार्श्वभूमीपासून वेगळे दिसल्यास ते अवधान वेधते (Koffka, 1935). जाहिरात क्षेत्रात हे तत्त्व मोठ्या प्रमाणावर वापरले जाते. विरोधाभासी रंग, आकार किंवा अक्षरांचा वापर करून ग्राहकांचे लक्ष आकर्षित केले जाते.

4. गतिशीलता (Movement)

चालणाऱ्या वस्तू स्थिर वस्तूंहून अधिक अवधान वेधून घेतात. मानवाच्या उत्क्रांतीच्या इतिहासात हालचाल ही धोक्याचे किंवा संधीचे द्योतक होती, शिकारी जवळ येणे, शिकार पळणे किंवा हवामानात बदल होणे हे सर्व हालचालींमुळे ओळखता येते. त्यामुळे मेंदू स्वाभाविकपणे गतिशील वस्तूंवर लक्ष केंद्रीत करतो (Rizzolatti et al., 1994). उदाहरणार्थ, स्थिर चित्रांच्या तुलनेत चलतचित्र प्रेक्षकांचे लक्ष जास्त वेळ टिकवून ठेवते. याच कारणामुळे आधुनिक शिक्षण संसाधनांमध्ये animations किंवा videos चा वापर विद्यार्थ्यांचे अवधान केंद्रीत करण्यासाठी केला जातो.

5. आकर्षकता (Size, Color, Sound)

उद्दिपकाची रचना व सौंदर्यात्मक वैशिष्ट्येही अवधानावर प्रभाव टाकतात. एखादी वस्तू मोठ्या आकाराची (Size), ठळक किंवा तेजस्वी रंगाची (Color), अथवा मोहक व वेगळ्या स्वरूपाचा आवाज (Sound) निर्माण करणारी असेल, तर ती अवधान जास्त वेधून घेते (Goldstein, 2014). उदाहरणार्थ, मोठ्या फलकावरील जाहिरात, रंगीत कपडे किंवा मधुर संगीत यामुळे लोकांचे लक्ष आपोआप तिकडे वळते. याला stimulus salience असे म्हटले जाते, ज्यात उद्दिपकाचे संवेदनक्षम गुणधर्म त्याला इतरांपेक्षा ठळक करतात (Itti & Koch, 2001).

वरील विवेचनातून हे स्पष्ट होते की बाह्य वातावरणातील उद्दिपकांची वैशिष्ट्ये जसे की तीव्रता, नाविन्यता, विरोधाभास, गतिशीलता व आकर्षकता ही अवधानावर लक्षणीय परिणाम करतात. व्यक्ती कितीही जाणीवपूर्वक अवधान नियंत्रित करत असली तरी बाह्य घटक त्याला विचलित करू शकतात. त्यामुळे शिक्षण, जाहिरात, संवाद किंवा दैनंदिन जीवनात या घटकांचा योग्य वापर केल्यास अवधान प्रभावीपणे टिकवून ठेवता येते.

अंतर्गत घटक (Internal Factors)

बाह्य घटकांइतकेच अंतर्गत घटक देखील अवधानावर निर्णायक परिणाम घडवतात. अंतर्गत घटक म्हणजे व्यक्तीच्या मानसिक रचना, प्रेरणा, अभिरुची, अनुभव आणि भावनिक अवस्था यास व्यक्तिनिष्ठ नियामके असेही म्हणतात. हे घटक व्यक्तीच्या बोधनिक प्रक्रियेतून निर्माण होतात आणि कोणत्या उद्कदिपकाकडे लक्ष द्यायचे किंवा कोणते दुर्लक्षित करायचे हे ठरवतात. खाली पाच महत्त्वाचे अंतर्गत घटकांचा विचार केला आहे:

1. अभिरुची (Interest)

अवधानाच्या निवडीमध्ये अभिरुची हा घटक अत्यंत महत्त्वाचा ठरतो. एखाद्या विषयात किंवा कार्यात व्यक्तीला अंतर्गत आकर्षण असल्यास त्या कार्याकडे अवधान आपोआप केंद्रित होते. उदाहरणार्थ, संगीताची आवड असलेल्या विद्यार्थ्याचे लक्ष वर्गातल्या संगीतविषयक चर्चेकडे पटकन जाते. अभिरुची ही जाणीवपूर्वक न होता नैसर्गिकरित्या अवधान आकर्षित करणारी शक्ती आहे (Hidi & Renninger, 2006). संशोधनानुसार, अभिरुची अवधानाबरोबरच शिकण्याची गुणवत्ता व माहिती स्मरणशक्तीमध्ये टिकवून ठेवण्याची क्षमता वाढवते (Schiefele, 2009).

2. गरजा (Needs)

मानसशास्त्रानुसार, गरजा व्यक्तीच्या वर्तनास आणि अवधानास मार्गदर्शन करतात. Maslow (1943) च्या गरजांच्या श्रेणीक्रम सिद्धांतानुसार, व्यक्तीची भूक, तहान, सुरक्षितता, सामाजिक स्वीकृती, आदर किंवा आत्मसिद्धी या गरजा कोणत्या पातळीवर अपूर्ण आहेत यावर तिचे अवधान ठरते. उदाहरणार्थ, भुकेला व्यक्तीला भोजनासंबंधी उद्दिपकाकडे अधिक लक्ष लागते, तर सुरक्षिततेचा धोका जाणवणाऱ्या व्यक्तीचे अवधान सुरक्षेसंबंधी संकेतांकडे जाते. गरजा अवधानाला प्रेरक शक्ती देतात आणि त्या व्यक्तीच्या बोधात्मक प्राथमिकता ठरवतात (Deci & Ryan, 2000).

3. भावना (Emotions)

व्यक्तीच्या भावना अवधानाला मोठ्या प्रमाणावर प्रभावित करतात. तीव्र भावनिक अवस्था जसे की आनंद, राग, भीती किंवा दुःख यामुळे काही विशिष्ट उद्दिपकाकडे लक्ष जास्त जाते, तर इतर उद्दिपकाकडे लक्ष कमी होते. उदाहरणार्थ, भीती वाटत असताना एखाद्याचे लक्ष धोका निर्माण करणाऱ्या आवाज, हालचाली किंवा चेहऱ्यावरील भाव याकडे जाते. अशा अवस्थेत इतर सामान्य उद्दिपकाकडे लक्ष जात नाही. Posner आणि Rothbart (2007) यांच्या मते, भावना ही बोधात्मक संसाधनांचे नियोजन बदलतात आणि त्यामुळे अवधान विशिष्ट दिशेकडे वळते. म्हणूनच भावनिक संतुलन राखणाऱ्या व्यक्तींमध्ये अवधानाचे नियमन अधिक प्रभावी असते.

4. भूतकाळाचा अनुभव (Past Experience)

व्यक्तीचे भूतकाळातील अनुभव (Past Experience) अवधान निवडण्यावर महत्त्वपूर्ण प्रभाव टाकतात. पूर्वीच्या अनुभवांच्या आधारे व्यक्ती ठरवते की कोणत्या उत्तेजनाला महत्त्व द्यायचे. उदाहरणार्थ, वाहन अपघातातून गेलेल्या व्यक्तीला रस्त्यावरचा हॉर्न किंवा वेगाने येणारी गाडी त्वरित लक्ष वेधून घेते. Gibson (1979) च्या Perceptual Learning Theory नुसार, अनुभवामुळे संवेदनाक्षमता विकसित होते आणि त्याचा थेट परिणाम अवधानावर होतो. अनुभव हे केवळ स्मरणात राहिलेले प्रसंग नसून ते व्यक्तीच्या लक्ष केंद्रित करण्याच्या प्रवृत्तीला आकार देतात (Anderson, 2010).

5. मानसिक अवस्था (Mental Set)

मानसिक अवस्था म्हणजे एखाद्या परिस्थितीकडे पाहण्याची व्यक्तीची तयारी, वृत्ती किंवा मानसिक चौकट. ही अवस्था व्यक्तीला आधीपासून असलेल्या अपेक्षा, विश्वास आणि ध्येयांवर आधारित असते. उदाहरणार्थ, परीक्षेला बसलेला विद्यार्थी प्रश्नपत्रिकेतील संभाव्य प्रश्नांबाबत तयार असेल तर त्याचे अवधान त्या दिशेने केंद्रित होते. Bruner (1957) यांनी मानसिक अवस्थेला perception attention मध्ये निर्णायक मानले आहे. मानसिक अवस्था व्यक्तीच्या लक्ष देण्याच्या प्रक्रियेला पूर्वसूचना (pre-disposition) देते आणि कधी कधी चुकीच्या अपेक्षेमुळे अवधान दिशाभूल होऊ शकते (Eysenck & Keane, 2015).

वरील सर्व घटक अवधानावर थेट परिणाम घडवतात. अभिरुची आणि गरजा अवधानाला प्रेरणा देतात, भावना अवधानाची तीव्रता आणि दिशा बदलतात, भूतकाळाचा अनुभव अवधानाच्या निवडीला आकार देतो, तर मानसिक अवस्था लक्ष देण्याच्या चौकटी ठरवते. म्हणूनच अवधान ही फक्त बाह्य उत्तेजनांना प्रतिसाद देणारी प्रक्रिया नसून ती व्यक्तीच्या अंतर्गत मानसिक आणि भावनिक संरचनेशी सखोलपणे जोडलेली आहे.

अवधानाचे सिद्धांत (यावरील स्वतंत्र लेख पहा)

  • Filter Theory (Broadbent, 1958): माहिती निवडकपणे प्रक्रिया केली जाते; इतर माहिती फिल्टर होते
  • Attenuation Theory (Treisman, 1964): इतर माहिती पूर्णपणे नाहीशी होत नाही तर कमी प्रमाणात प्रक्रियेत राहते.
  • Resource Allocation Theory (Kahneman, 1973): अवधान ही मर्यादित साधनसंपत्ती आहे, जी परिस्थितीनुसार वाटली जाते.
  • Spotlight Theory: अवधान हे जणू प्रकाशझोतासारखे आहे, जे एका ठिकाणी केंद्रित असते.

अवधानाचे महत्त्व

  • शिक्षणात: अभ्यासातील एकाग्रता व स्मरणशक्ती सुधारते.
  • कामकाजात: उत्पादनक्षमता वाढते.
  • दैनंदिन जीवनात: निर्णय घेणे व समस्या सोडवणे सोपे होते.
  • मानसिक आरोग्यात: अवधान नियंत्रणामुळे ताण-तणाव व विचलन कमी करता येते.

समारोप:

अवधान ही केवळ मानसिक प्रक्रिया नसून ती माणसाच्या शिकण्याच्या व जगण्याच्या अनुभवाचा पाया आहे. योग्य अवधानाशिवाय स्मरण, चिंतन, कल्पनाशक्ती किंवा विचार या प्रक्रियांची पूर्णता शक्य होत नाही. त्यामुळे शिक्षण, कार्यक्षेत्र व व्यक्तिमत्त्व विकास या सर्वांमध्ये अवधानाचे नियोजन, प्रशिक्षण व जाणीवपूर्वक विकास आवश्यक आहे.

(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)

संदर्भ:

Anderson, J. R. (2010). Cognitive Psychology and Its Implications (7th ed.). Worth Publishers.

Broadbent, D. E. (1958). Perception and Communication. London: Pergamon Press.

Bruner, J. S. (1957). Going beyond the information given. In J. S. Bruner et al. (Eds.), Contemporary Approaches to Cognition. Harvard University Press.

Csikszentmihalyi, M. (1990). Flow: The Psychology of Optimal Experience. New York: Harper & Row.

Deci, E. L., & Ryan, R. M. (2000). The "what" and "why" of goal pursuits: Human needs and the self-determination of behavior. Psychological Inquiry, 11(4), 227–268.

Eysenck, M. W. (1982). Attention and Arousal: Cognition and Performance. Springer.

Eysenck, M. W., & Keane, M. T. (2015). Cognitive Psychology: A Student’s Handbook (7th ed.). Psychology Press.

Gibson, E. J. (1979). The Ecological Approach to Visual Perception. Houghton Mifflin.

Goldstein, E. B. (2014). Cognitive Psychology: Connecting Mind, Research, and Everyday Experience. Cengage Learning.

Hidi, S., & Renninger, K. A. (2006). The four-phase model of interest development. Educational Psychologist, 41(2), 111-127.

Itti, L., & Koch, C. (2001). Computational modelling of visual attention. Nature Reviews Neuroscience, 2(3), 194–203.

James, W. (1890). The Principles of Psychology. New York: Henry Holt.

Kahneman, D. (1973). Attention and Effort. Englewood Cliffs, NJ: Prentice-Hall.

Koffka, K. (1935). Principles of Gestalt Psychology. Harcourt, Brace & World.

Maslow, A. H. (1943). A theory of human motivation. Psychological Review, 50(4), 370–396.

Ormrod, J. E. (2012). Human Learning. Pearson Higher Ed.

Pashler, H. (1998). The Psychology of Attention. Cambridge, MA: MIT Press.

Pessoa, L. (2009). How do emotion and motivation direct executive control? Trends in Cognitive Sciences, 13(4), 160–166.

Posner, M. I., & Petersen, S. E. (1990). The attention system of the human brain. Annual Review of Neuroscience, 13(1), 25–42.

Posner, M. I., & Rothbart, M. K. (2007). Research on attention networks as a model for the integration of psychological science. Annual Review of Psychology, 58, 1–23.

Rizzolatti, G., Riggio, L., Dascola, I., & Umiltá, C. (1994). Reorienting attention across the horizontal and vertical meridians: Evidence in favor of premotor theory. Neuropsychologia, 32(5), 551–561.

Sarter, M., Givens, B., & Bruno, J. P. (2001). The cognitive neuroscience of sustained attention. Brain Research Reviews, 35(2), 146–160.

Schiefele, U. (2009). Situational and individual interest. In K. R. Wentzel & A. Wigfield (Eds.), Handbook of Motivation at School.

Titchener, E. B. (1908). Lectures on the Elementary Psychology of Feeling and Attention. New York: Macmillan.

Titchener, E. B. (1909). A Textbook of Psychology. New York: Macmillan.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Thank you for your comments and suggestions

संभाव्यतेची तत्त्वे आणि प्रसामान्य संभाव्य वक्र | Probability and Normal Probability Curve |

  संभाव्यतेची तत्त्वे आणि प्रसामान्य संभाव्य वक्र संख्याशास्त्राचे अध्ययन करताना संभाव्यता ( Probability) ही सर्वात महत्त्वाची आणि आधारभूत...