विस्मृती
| Forgetting
मानवी जीवनप्रवासात स्मृती ही एक अत्यंत मूलभूत व महत्त्वपूर्ण मानसशास्त्रीय प्रक्रिया मानली जाते. स्मृतीशिवाय व्यक्तीला स्वतःचे अनुभव, ज्ञान, मूल्ये, कौशल्ये आणि सामाजिक व्यवहार सतत टिकवून ठेवणे अशक्य झाले असते. स्मृतीमुळेच मनुष्य भूतकाळाशी जोडला जातो आणि भविष्याची योजना आखू शकतो (Atkinson & Shiffrin, 1968). स्मृती म्हणजे मिळालेल्या माहितीचे ग्रहण, साठवणूक व आवश्यकतेनुसार प्रत्यानयन करण्याची क्षमता होय. तथापि, सर्व माहिती कायमस्वरूपी मनात टिकत नाही. काही माहिती हळूहळू कमी होत जाते, काही ठराविक वेळेला आठवत नाही, तर काही अनुभव कायमचे नष्ट होतात. या प्रक्रियेला मानसशास्त्रात विस्मृती असे म्हटले जाते. त्यामुळे विस्मृती ही स्मृती प्रक्रियेचा केवळ नकारात्मक भाग नसून ती स्मृतीच्या कार्यप्रणालीतील एक नैसर्गिक घटक आहे (Ebbinghaus, 1885/1913).
विस्मृतीची
संकल्पना
मानसशास्त्रज्ञांनी विस्मृतीबाबत विविध व्याख्या दिल्या आहेत. क्रेब्स व जोली यांच्या मते, “जेव्हा व्यक्तीला पूर्वी शिकलेली माहिती योग्य वेळी आठवत नाही किंवा स्मरणातून ती पूर्णपणे नाहीशी होते, त्याला विस्मृती म्हणतात.” (Krebs & Jolly, 1986). ही व्याख्या विस्मृतीचे दोन महत्त्वाचे पैलू स्पष्ट करते:
- योग्य वेळी माहिती
आठवण्यात आलेले अपयश (failure to recall at the right time)
- माहितीचे स्मरणातून
पूर्णपणे नाहीसे होणे (permanent loss of memory trace).
सोप्या भाषेत सांगायचे झाले तर, शिकलेली
किंवा अनुभवलेली गोष्ट जेव्हा व्यक्तीला आवश्यक क्षणी आठवत नाही किंवा ती
स्मृतीतून पूर्णतः लुप्त होते, तेव्हा त्याला
विस्मरण म्हणतात. यावरून असे दिसते की विस्मृती ही केवळ "आठवण्यातील
अपयश" नसून ती स्मृतीमध्ये साठवलेल्या माहितीशी संबंधित जैविक,
मानसिक
आणि सामाजिक घटकांच्या परस्परसंवादातून उद्भवणारी प्रक्रिया आहे (Baddeley,
1997).
उदाहरणार्थ, एखाद्या
विद्यार्थ्याने परीक्षा देताना शिकलेली माहिती आठवली नाही,
तर
तो तात्पुरत्या विस्मृतीचा अनुभव घेतो. परंतु वृद्धापकाळामुळे जर माहिती
कायमस्वरूपी नाहीशी झाली असेल, तर ती शाश्वत
विस्मृती मानली जाते. त्यामुळे विस्मृती ही स्मृतीची अपयशी बाजू नसून मानवी बोधन
व
वर्तनाच्या मर्यादा अधोरेखित करणारी प्रक्रिया आहे.
विस्मृतीची
कारणे
मानवी स्मृती ही सतत बदलणारी आणि पुनर्रचित होणारी प्रक्रिया
आहे. स्मरणात असलेली माहिती कायमस्वरूपी टिकून राहत नाही. अनेक मानसिक, शारीरिक आणि सामाजिक घटकांमुळे विस्मृती
उद्भवते. खाली विस्मृतीची प्रमुख कारणे दिली आहेत.
1. कालप्रवाह (Passage of Time): ऱ्हास सिद्धांत (Decay Theory)
विस्मृतीचे सर्वात जुने स्पष्टीकरण म्हणजे ऱ्हास सिद्धांत. या सिद्धांतानुसार स्मरणात साठवलेली
माहिती कालांतराने हळूहळू क्षीण होत जाते,
जर
ती नियमितपणे वापरली नाही किंवा पुनरावृत्ती झाली नाही तर ती स्मरणातून लोप पावते
(Thorndike, 1914).
उदाहरणार्थ, लहानपणीच्या शाळेतील
सर्व सहाध्यायांची पूर्ण नावे आठवणे अनेकांना कठीण जाते, कारण ती माहिती कालांतराने अप्रासंगिक
ठरल्यामुळे स्मरणातून नाहीशी होते. संशोधनात असे दिसून आले आहे की मेंदूत साठवलेले
न्युरल ट्रेस सतत
सक्रिय न ठेवल्यास त्यांची तीव्रता कमी होते आणि ते प्रत्यानयनासाठी अनुपलब्ध
होतात (Ebbinghaus, 1885/1913).
2. व्यत्यय/ निरोधन (Interference Theory)
विस्मृतीचा आणखी एक महत्त्वाचा सिद्धांत म्हणजे व्यत्यय/
निरोधन सिद्धांत. यानुसार स्मृतीतील माहिती पूर्णपणे नाहीशी होत नाही, परंतु एकमेकांशी स्पर्धा करणाऱ्या
स्मृतीमुळे ती व्यक्तीला आठवता येत नाही (McGeoch,
1932).
व्यत्यय/ निरोधनाचे दोन प्रमुख प्रकार आहेत:
उत्तरलक्षी-निरोधन (Proactive Interference): जुनी माहिती नवीन
गोष्टी शिकण्यात अडथळा आणते. उदाहरणार्थ,
आपण
पूर्वी वापरत असलेल्या पासवर्डमुळे नवीन पासवर्ड लक्षात ठेवताना गोंधळ होणे.
भूतलक्षी-निरोधन (Retroactive Interference): नवीन माहितीमुळे जुनी
माहिती आठवणे कठीण होते. उदाहरणार्थ,
नुकत्याच
शिकलेल्या परकीय भाषेतील शब्दांमुळे आधी शिकलेले शब्द आठवायला त्रास होणे.
प्रायोगिक संशोधनाने दाखवले आहे की विद्यार्थ्यांना जर सतत
वेगवेगळ्या विषयांतील माहिती शिकवली गेली तर आधीची माहिती विसरण्याचा दर जास्त
असतो (Underwood, 1957).
3. अपुरी पुनरावृत्ती (Lack of Practice or Rehearsal)
स्मृती टिकवण्यासाठी पुनरावृत्ती महत्त्वाची आहे. जर व्यक्तीने
शिकलेली माहिती वेळोवेळी आठवून पाहिली नाही,
तर
ती माहिती दीर्घकालीन स्मृतीत साठवली जात नाही आणि विसरली जाते (Craik & Watkins, 1973).
शैक्षणिक पातळीवर विद्यार्थ्यांना शिकवताना सतत पुनरावृत्ती करणे याचे महत्त्व
अधोरेखित केले जाते, कारण
ती नसल्यास माहिती अल्पकालीन स्मृतीतच अडकून राहते आणि लवकर नाहीशी होते.
4. भावनिक घटक (Emotional Factors)
भावना आणि स्मृती यांचे घनिष्ठ नाते आहे. तीव्र ताण, भीती, चिंता किंवा नैराश्य यामुळे माहितीचे संहिताकरण (encoding) व्यवस्थित होत नाही, परिणामी विस्मृती वाढते (Kensinger & Schacter, 2006).
कधी कधी वेदनादायक किंवा अप्रिय अनुभव जाणूनबुजून विसरले जातात, ही प्रक्रिया मानसशास्त्रज्ञ सिग्मंड
फ्रॉईड (Freud, 1915/1957) यांनी दमन (Repression) या संकल्पनेतून स्पष्ट केली आहे. उदा., अपघातग्रस्त व्यक्तीला त्या घटनेचे
तपशील आठवत नाहीत, कारण
मनाने ते आठवणीच्या पातळीवरून ढकलून दिलेले असते.
5. प्रेरणा (Motivation)
काही वेळा विस्मृती ही व्यक्तीची मानसिक गरज असते. अप्रिय, लाजिरवाणे किंवा मानसिक वेदना देणारे
अनुभव विसरण्याची प्रवृत्ती नैसर्गिकरित्या दिसून येते. हे मोटिव्हेटेड फॉरगेटिंग म्हणून ओळखले जाते (Anderson & Green, 2001).
उदाहरणार्थ, अपमानास्पद प्रसंग
विसरण्याचा प्रयत्न करणे किंवा दुःखद आठवणींवर पडदा टाकणे. यामुळे मानसिक संतुलन
टिकवणे सोपे होते.
6. शारीरिक कारणे (Physiological Causes)
मेंदूची रचना आणि आरोग्य यांचा स्मृतीवर थेट परिणाम होतो.
मेंदूवरील इजा (head injury), न्यूरोलॉजिकल
विकार (उदा., Alzheimer’s disease,
dementia), मद्यपान, औषधांचे
दुष्परिणाम आणि वृद्धत्वामुळे स्मरणशक्ती हळूहळू क्षीण होते (Baddeley, Eysenck & Anderson, 2020).
विशेषतः वृद्धत्वात episodic
memory म्हणजेच वैयक्तिक अनुभव आठवण्याची क्षमता कमी होत जाते, तर semantic
memory म्हणजेच सामान्य ज्ञान तुलनेने टिकून राहते.
वरील सर्व कारणांचा एकत्रित परिणाम म्हणून विस्मृती घडते. काही
कारणे जैविक तर काही मानसिक स्वरूपाची असतात. शिक्षणशास्त्र, मानसोपचार आणि न्यूरोसायन्स या सर्व
क्षेत्रांत विस्मृती समजून घेणे महत्त्वाचे ठरते. कारण विस्मृती ही केवळ स्मृतीची
कमतरता नसून ती मानवी अनुभवांचे नियमन करणारी,
काही
वेळा मानसिक आरोग्यासाठी आवश्यक अशी प्रक्रिया आहे.
एबिंगहॉस विस्मृती वक्र (Ebbinghaus Forgetting Curve)
मानसशास्त्रातील स्मृती आणि विस्मृतीविषयीचे वैज्ञानिक संशोधन 19व्या
शतकात विशेषत्वाने पुढे आले. जर्मन मानसशास्त्रज्ञ हर्मन एबिंगहॉस (1850–1909) हे
विस्मृतीवरील पद्धतशीर प्रयोग करणारे पहिले वैज्ञानिक मानले जातात. त्यांच्या
अभ्यासामुळे आज आपण विस्मृतीची प्रक्रिया कालांतराने कशी घडते, याचा वैज्ञानिक आराखडा समजू शकतो.
निरर्थक
शब्दप्रयोगांचा (Nonsense
Syllables) वापर
एबिंगहॉस यांनी त्यांच्या प्रयोगांमध्ये अर्थपूर्ण शब्द किंवा
वाक्ये न वापरता निरर्थक अक्षरगट (Nonsense
syllables) तयार केले. हे अक्षरगट साधारणतः व्यंजन–स्वर–व्यंजन (CVC) या पद्धतीने तयार केले जात. उदाहरणार्थ:
BOK, DAX, KEP, ZIF इ.
यामागचा उद्देश असा होता की व्यक्तीला आधीपासून माहित असलेले
भाषिक किंवा वैयक्तिक अर्थज्ञान या प्रयोगात हस्तक्षेप करू नये. जर अर्थपूर्ण शब्द
वापरले गेले असते तर पूर्वानुभवामुळे
स्मरण
सोपे झाले असते. निरर्थक अक्षरगट वापरल्यामुळे स्मृती केवळ शिकलेल्या गोष्टींवर
आधारित आहे हे सुनिश्चित झाले (Ebbinghaus,
1885/1913).
एबिंगहॉस यांचे संशोधन विशेष आहे कारण त्यांनी प्रयोगासाठी
स्वतःलाच एकमेव प्रयोगार्थी (Subject) म्हणून
वापरले. त्यांनी हजारो निरर्थक अक्षरगट पाठ केले, ठराविक वेळेनंतर ते पुन्हा आठवण्याचा प्रयत्न केला आणि
स्मरणशक्तीतील घट नोंदवली. या प्रक्रियेत त्यांनी दोन महत्त्वाच्या तंत्रांचा वापर
केला:
- शिकलेली यादी पुन्हा
आठवण्याचा प्रयत्न (Recall Test)
- पुनराध्ययन (Relearning Method) आधी शिकलेली यादी पुन्हा शिकण्यासाठी लागणारा वेळ व प्रयत्न कमी होतात हे त्यांनी मोजले.
- यामुळे स्मरणशक्तीचे वैज्ञानिक परिमाण (Quantitative Measurement) करण्याचा मार्ग खुला झाला.
- वेगवेगळ्या कालावधीत
पुनराध्ययन (Relearning at Different
Intervals)
एबिंगहॉस यांनी शिकलेली यादी लगेच, काही मिनिटांनी, काही तासांनी, एक दिवसानंतर, काही दिवसानंतर व आठवड्यांनी पुन्हा
शिकली. त्यांनी लक्षात घेतले की —
- शिकून झाल्यानंतर पहिल्या काही तासांत स्मृतीत अतिशय झपाट्याने घट होते.
- त्यानंतर विस्मृतीची गती तुलनेने मंदावते.
- दीर्घ कालावधीनंतर काही प्रमाणात माहिती स्मरणात शिल्लक राहते.
उदाहरणार्थ,
- शिकून झाल्यानंतर 20 मिनिटांत साधारण 40% माहिती विसरली जाते.
- एका दिवसानंतर सुमारे 65% माहिती नाहीशी होते.
- एका आठवड्यानंतर 75–80% माहिती विसरली जाते.
विस्मृती
वक्र (Forgetting Curve)
एबिंगहॉस यांनी या निष्कर्षांचे ग्राफिक स्वरूपात मांडणी केली, ज्याला विस्मृती वक्र (Forgetting Curve) म्हणतात. हा वक्र
सुरुवातीला झपाट्याने खाली झुकतो, म्हणजे
सुरुवातीला स्मृतीची हानी खूप वेगाने होते. कालांतराने हा वक्र स्थिरावतो, म्हणजे नंतरच्या काळात विस्मरण तुलनेने
कमी प्रमाणात होते. याचा अर्थ असा की अध्ययनोत्तर कालावधी जसा लांबत गेला तशी
स्मृती अत्यंत पद्धतशीरपणे घटत गेली. हा वक्र स्मृती प्रक्रियेचे वैशिष्ट्य दाखवतो
की शिकलेली माहिती टिकवण्यासाठी पुनरावृत्ती आवश्यक आहे.
एबिंगहॉस
विस्मृती वक्राचे महत्त्व
- एबिंगहॉस यांच्या प्रयोगांमुळे मानसशास्त्रात काही मूलभूत गोष्टी स्पष्ट झाल्या:
- स्मृती ही मोजता येणारी व अभ्यासता येणारी मानसिक प्रक्रिया आहे.
- विस्मृती ही नियमबद्ध (Systematic) पद्धतीने घडते.
- माहिती टिकवण्यासाठी पुनरावृत्ती व अर्थपूर्ण संबंध जोडणे महत्त्वाचे आहे.
- विस्मृतीविषयक संशोधनासाठी वैज्ञानिक प्रयोगशैलीची सुरूवात एबिंगहॉस यांनी केली.
विस्मृतीचे प्रकार (Types of Forgetting)
मानवी स्मृती ही एक गुंतागुंतीची बोधनिक प्रक्रिया आहे.
प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात विस्मरणाची अनुभूती वेगवेगळ्या स्वरूपात दिसते.
मानसशास्त्रज्ञांनी विस्मृतीचे विविध प्रकार मांडले आहेत. त्यातील प्रमुख चार
प्रकार पुढीलप्रमाणे आहेत:
1. तात्पुरती
विस्मृती (Temporary Forgetting)
तात्पुरती विस्मृती ही अशी अवस्था आहे ज्यामध्ये एखादी माहिती
किंवा आठवण काही वेळासाठी स्मरणातून हरवते,
परंतु
नंतर योग्य संकेत (cues) किंवा
वेळ मिळाल्यावर ती पुन्हा आठवते. या प्रकारातील विस्मरण बहुधा retrieval failure शी संबंधित असते (Tulving & Pearlstone, 1966).
उदाहरणार्थ, एखाद्या व्यक्तीला
ओळखीच्या व्यक्तीचे नाव त्वरित आठवत नाही,
पण
थोड्या वेळाने किंवा संबंधित माहिती मिळाल्यावर ते नाव आठवते. याला “Tip-of-the-Tongue Phenomenon” (Brown &
McNeill, 1966) असेही म्हणतात.
तात्पुरती विस्मृती प्रामुख्याने मेंदूतील स्मृती संचयात
असलेल्या माहितीपर्यंत पोहोचण्यात येणाऱ्या अडचणीमुळे घडते, म्हणजेच माहिती नष्ट होत नाही तर
तात्पुरती लपून राहते.
2. शाश्वत विस्मृती (Permanent Forgetting)
शाश्वत विस्मृती म्हणजे अशी अवस्था की जिथे काही माहिती किंवा
आठवणी कायमस्वरूपी नष्ट होतात आणि कोणत्याही संकेताने त्या पुन्हा स्मरणात येत
नाहीत. ही अवस्था बहुधा decay theory शी
संबंधित मानली जाते, जिथे
स्मृती चिन्हे (memory traces)
कालांतराने
नष्ट होतात (Thorndike, 1914).
शाश्वत विस्मृतीचे प्रमुख कारणे म्हणजे –
- मेंदूवरील गंभीर इजा
(उदा., head injury)
- न्यूरोलॉजिकल विकार
(उदा., Alzheimer’s disease, Dementia)
- वृद्धत्वाशी संबंधित जैविक बदल (Craik & Salthouse, 2000)
उदाहरणार्थ,
Alzheimer’s असलेल्या व्यक्तीला आपल्या जवळच्या नातेवाईकांबद्दलची माहिती
कायमची विसरते.
3. सामान्य विस्मृती (Normal Forgetting)
सामान्य विस्मृती ही सर्वसामान्य व्यक्तींमध्ये आढळणारी
नैसर्गिक आणि आवश्यक प्रक्रिया आहे. प्रत्येक व्यक्तीला दररोज असंख्य अनुभव येतात, पण प्रत्येक अनुभव साठवून ठेवणे शक्य
नसते. म्हणूनच अनावश्यक माहिती कालांतराने नाहीशी होते.
Ebbinghaus (1885)
यांनी त्यांच्या प्रयोगांमधून दाखवून दिले की शिकलेली माहिती कालांतराने
विस्मृतीच्या “Forgetting Curve” प्रमाणे
कमी होत जाते. या प्रक्रियेमुळे व्यक्तीच्या स्मृतीत फक्त आवश्यक व उपयुक्त माहिती
टिकून राहते.
उदा., आपण एका दिवशी काय जेवलो याची माहिती
काही दिवसांनी विसरणे हे नैसर्गिक आहे.
4. असामान्य विस्मृती (Abnormal Forgetting / Amnesia)
असामान्य विस्मृती म्हणजे साध्या, नैसर्गिक विस्मृतीपेक्षा भिन्न अशी
अवस्था जिथे व्यक्तीची स्मृती कार्यक्षमता गंभीरपणे बाधित होते. याला Amnesia असे संबोधले जाते. Amnesia ही सामान्यतः शारीरिक इजा, मेंदूवरील धक्का, मानसिक आघात किंवा न्यूरोलॉजिकल विकार
यांमुळे उद्भवते (Kopelman, 2002).
अम्नेशियाचे प्रकार पुढीलप्रमाणे मानले जातात:
- Retrograde Amnesia: पूर्वीच्या आठवणी विसरणे (Russell & Nathan, 1946).
- Anterograde Amnesia: नवीन आठवणी निर्माण करण्यात असमर्थता (Scoville & Milner, 1957).
- Psychogenic Amnesia: मानसिक धक्का किंवा आघातामुळे उद्भवलेली स्मृतीहानी.
उदाहरणार्थ, अपघातानंतर
रुग्णाला अपघातापूर्वीची माहिती आठवत नाही (retrograde
amnesia), किंवा शस्त्रक्रियेनंतर त्याला नवीन माहिती लक्षात ठेवता येत
नाही (anterograde amnesia).
विस्मृती ही केवळ स्मृतीतील त्रुटी नसून मानवी मेंदूच्या
कार्यप्रणालीचा एक नैसर्गिक भाग आहे. तात्पुरती, शाश्वत, सामान्य
आणि असामान्य अशा प्रकारांमध्ये ती प्रकट होते. तात्पुरती व सामान्य विस्मृती ही
जीवनासाठी आवश्यक व नैसर्गिक आहे, तर
शाश्वत व असामान्य विस्मृती ही वैद्यकीय हस्तक्षेपाची गरज निर्माण करू शकते.
त्यामुळे विस्मृतीचे प्रकार समजणे हे मानसशास्त्र तसेच न्यूरोसायन्समध्ये अत्यंत
महत्त्वाचे आहे.
विस्मृती टाळण्यासाठी उपाय
- शिकलेल्या गोष्टींची नियमित पुनरावृत्ती करणे.
- माहितीला अर्थपूर्ण व संघटित पद्धतीने मांडणे.
- लक्षपूर्वक अभ्यास करणे व विचलन टाळणे.
- पुरेशी झोप घेणे व शारीरिक आरोग्य जपणे.
- मनोबल वाढविणाऱ्या तंत्रांचा वापर करणे (उदा., ध्यान, योग).
समारोप:
विस्मृती ही स्मृती प्रक्रियेतील अपरिहार्य गोष्ट आहे. ती
पूर्णपणे नकारात्मक नसून काहीवेळा ती उपयुक्तही ठरते. कारण प्रत्येक अनुभव मनात
साठवून ठेवणे शक्य नाही. जे उपयुक्त नाही ते विसरल्यामुळे व्यक्तीला जीवनात पुढे
जाणे सोपे होते. त्यामुळे विस्मृती ही मानवी मानसशास्त्रातील नैसर्गिक व
महत्त्वाची प्रक्रिया आहे.
(सर्व चित्रे आणि इमेजेस google वरून साभार)
संदर्भ:
Anderson,
J. R. (2010). Cognitive Psychology and Its Implications (7th ed.). Worth Publishers.
Anderson,
M. C., & Green, C. (2001). Suppressing unwanted
memories by executive control. Nature, 410(6826), 366–369.
Atkinson,
R. C., & Shiffrin, R. M. (1968). Human memory: A proposed system and its
control processes. In K. W. Spence & J. T. Spence (Eds.), The psychology of
learning and motivation (Vol. 2, pp. 89–195). Academic Press.
Baddeley,
A. (1997). Human Memory: Theory and Practice. Psychology
Press.
Baddeley,
A., Eysenck, M. W., & Anderson, M. C. (2020). Memory.
Psychology Press.
Brown,
R., & McNeill, D. (1966). The “tip of the tongue”
phenomenon. Journal of Verbal Learning and Verbal Behavior, 5(4),
325-337.
Craik,
F. I. M., & Salthouse, T. A. (Eds.). (2000). The
handbook of aging and cognition. Psychology Press.
Craik,
F. I., & Watkins, M. J. (1973). The role of rehearsal
in short-term memory. Journal of Verbal Learning and Verbal Behavior, 12(6), 599–607.
Ebbinghaus,
H. (1885/1913). Memory: A Contribution to Experimental
Psychology. New York: Teachers College, Columbia University.
Freud,
S. (1915/1957). Repression. In J. Strachey (Ed. &
Trans.), The Standard Edition of the Complete Psychological Works of Sigmund
Freud (Vol. 14). London: Hogarth Press.
Kensinger,
E. A., & Schacter, D. L. (2006). When the Red Sox
shocked the Yankees: Comparing negative and positive memories. Psychological
Science, 17(9), 725–733.
Kopelman,
M. D. (2002). Disorders of memory. Brain, 125(10),
2152–2190.
Krebs,
J. R., & Jolly, C. (1986). Behavioral Ecology: An Evolutionary Approach.
Blackwell Scientific Publications.
McGeoch,
J. A. (1932). Forgetting and the law of disuse.
Psychological Review, 39(4), 352–370.
Russell,
W. R., & Nathan, P. W. (1946). Traumatic amnesia.
Brain, 69(3), 280–300.
Scoville,
W. B., & Milner, B. (1957). Loss of recent memory
after bilateral hippocampal lesions. Journal of Neurology, Neurosurgery &
Psychiatry, 20(1), 11–21.
Thorndike,
E. L. (1914). The psychology of learning. Teachers
College, Columbia University.
Tulving,
E., & Pearlstone, Z. (1966). Availability versus
accessibility of information in memory for words. Journal of Verbal Learning
and Verbal Behavior, 5(4), 381–391.
Underwood, B. J. (1957). Interference and forgetting. Psychological Review, 64(1), 49–60.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा
Thank you for your comments and suggestions